shabd-logo

भक्ती

4 June 2023

17 पाहिले 17
व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?

मुक्त होणे म्हणजे तरी काय? मुक्त होणे म्हणजे बांधलेले नसणे. मुक्त होणे म्हणजे मोकळे आहोत असे वाटणे. आपणांवर कोणतेही दडपण नाही असे अनुभवास येणे म्हणजेच मुक्त होणे. ना वासनांचा गुलाम, ना जगात कोणत्याही सत्तेचा गुलाम. स्वतःच्या समाधानाने, आनंदाने, उत्साहाने कर्म करीत राहणे म्हणजेच मोक्ष होय.

आपण हजारो कर्मे करीत असतो; परंतु त्यांचा आपणांवर बोजा असतो. त्या कर्मांमुळे आपण मेटाकुटीस येत असतो; आपण त्रस्त होत असतो. रडकुंडीस येत असतो. असे का होते? याची दोन कारणे आहेत. एक तर, जे कर्म आपण करीत असतो ते आपल्या आवडीचे नसते. ते आपल्या वर्णाचे नसते. तो परधर्म असतो. परंतु मोहाने तो अंगीकारलेला असतो. असा हा परधर्म भयावह असणार, आपणास संत्रस्त करणार, हे गीता गर्जून सांगत आहे.

एखादा शिक्षक घ्या. ज्याला शिक्षक-कर्मात आनंद नाही, मुलांच्या हार्दिक व बौद्धिक विकासात आनंद नाही, अशा शिक्षकाला त्या अध्यापनकार्यात कसा आनंद वाटेल? मुलांचे गृहपाठ तपासताना तो संतापेल. त्यांची प्रश्नोत्तरपत्रे तपासताना तो भराभर रेघोट्या मारील. त्यांच्या शंका ऐकून चिडेल. नवीन ग्रंथ वाचण्याचा त्याला बोजा वाटेल. अशा शिक्षकाला सारखे वाटत असेल, की दिवाळीची सुट्टी कधी येईल, नाताळ केव्हा येईल, मे महिना कधी उजाडेल ? ते शिक्षकाचे कर्म त्याच्या उरावर बसते. ते भूत त्याच्या मानगुटीस बसते. परंतु पोटासाठी म्हणून तो ते रडतखडत, चिडत-चरफडत करीत असतो. तो त्याचा वर्ण नसतो.

आज सर्व समाजात हेच दिसत आहे. वर्णाला स्थानच नाही. त्यामुळे वाटते ते कर्म वाटेल तो करीत आहे. आवड असो वा नसो, ते ते गुणधर्म असोत वा नसोत, पोटाला मिळेल ना? उचला ते काम, करा कसेतरी, असे होत आहे. ज्या समाजात अशी कर्मे होत असतात, त्या समाजाला कळा कशी चढणार? तो समाज सुखी, समृद्ध कसा होणार?

ज्या समाजातील कर्मात तेज नाही, आनंद नाही, उत्साह नाही, श्रद्धा नाही; त्या कर्माने त्या कर्म करणाऱ्यालाही असमाधान, व ते कर्म नीट न झाल्यामुळे समाजाचेही नुकसान. स्वतःचा अधःपात व समाजाचाही अधःपात. स्वतःची प्रतारणा व समाजाचीही वंचना.

जे कर्म आपल्या आवडीचे असते त्याचा कंटाळा आपणांस येत नाही. कोकिळाला जर आपण म्हणू, “आज तू सुट्टी घे, आज कुहू करू नकोस"; तर तो म्हणेल, “एक वेळ खाणेपिणे नसले तरी चालेल, परंतु मला कुहू करू दे. त्याने मला त्रास नाही. तो माझा आनंद आहे. ते कुहू करणे म्हणजेच माझे जीवन.” सर्व सृष्टीत हेच आहे. सूर्य-चंद्र, तारे-वारे यांना रविवारची सुट्टी नाही. समुद्र सारखी गर्जना करून राहिला आहे. नद्या जीवन असेपर्यंत सारख्या वाहात आहेत. जीवन आहे तो विश्रांती नाही. विश्रांतीची जरूरच नाही. कर्म म्हणजे विश्रांती. कारण कर्म म्हणजेच आनंद!

मुले खेळत असतात त्या वेळेस त्यांना कितीतरी श्रम होतात. त्या श्रमाचा बोजा त्यांना वाटत नाही. परंतु त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना मैल अर्धा मैल जावयास सांगा, त्यांना ते जड वाटेल. त्यांचे पाय दुखतील. ज्या कर्मात आत्मा रंगत नाही, हृदय समरस होत नाही, ते कर्म म्हणजे मरण होय. ते कर्म म्हणजे श्रृंखला होय. आपण सारे अशा ह्या वर्णहीन कर्माच्या शृंखलांनी रात्रंदिवस बद्ध झालेले आहोत. आपण सारे बद्ध आहोत. मुक्त कोणीच नाहीं.

कर्माचा बोजा वाटावयास नको असेल तर स्वधर्म शोधा. स्वधर्म म्हणजे स्वतःचा वर्ण शोधा, स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म उचला. त्यात तुम्ही रमाल, रंगाल. इतके तास काम केले, असे मनातही मग येणार नाही. काळाचे भान तुम्हांस राहणार नाही. तुम्ही काळाचे काळ व्हाल. वेळ कसा दवडावा अशी चिंता, असे संकट तुम्हांस पडणार नाही.

कर्म उत्कृष्ट व्हावयास आणि कर्माचा कंटाळा न वाटावा म्हणून कर्माची आवड असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी कर्म करावयाचे त्याच्याबद्दल मनात प्रेम हवे. कर्माबद्दल मनात प्रेम हवे, व ते कर्म ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याबद्दलही अपार प्रेम हवे. अध्यापनकर्माबद्दल आवड हवी व लहान मुलांबद्दल प्रेम हवे, तरच शिक्षक शिक्षणाच्या कामात रंगेल. ते काम त्याला बद्ध न करता मुक्त करील. सर्व मुलांच्या हृदयाशी, सर्व छात्रांच्या आत्म्याशी ते कर्म त्याला जोडील. त्या कर्माने या शरीरात कोंडलेला त्याचा आत्मा बाहेरच्या अनंत आत्म्याशी समरस होईल. म्हणजेच मोक्ष.

कर्मे आपल्या उरावर बसतात याचे एक कारण त्या कर्मांबद्दल अप्रीती, व दुसरे कारण म्हणजे ज्यांच्यासाठी कर्म करावयाचे त्यांच्याबद्दलही अप्रीती. ही दोन कारणे जर दूर झाली तर मोक्ष जवळ आला. कर्माबद्दलही प्रेम वाटू दे व त्या कर्माचा ज्यांच्याशी संबंध आहे त्यांच्याबद्दलही प्रेम वाटू दे..

आपण रुग्णालयातील उदाहरण घेऊ या. तेथे एखादी परिचारिका असेल. शूश्रूषेचे कर्म तिला प्रिय आहे. तिचा तो वर्ण आहे. परंतु आजारी पडलेल्या जीवाबद्दल जर तिला प्रेम वाटले नाही, तर तिचे ते कर्म तितकेसे उत्कृष्ट होणार नाही. ज्या रोग्याबद्दल तिला आपलेपणा वाटेल, प्रेम वाटेल त्याची सेवा करावयास ती कंटाळणार नाही. ज्याच्याबद्दल प्रेम वाटणार नाही, त्याचीही सेवाशुश्रूषा ती करील. परंतु ती सेवा तिला मुक्त करणार नाही. ती सेवा तिला ओझे वाटेल.

माता स्वतःच्या मुलांची सेवा किती प्रेमाने करते! त्या सेवेचा तिला त्रास नाही. एखाद्या मातेचा मुलगा आजारी असू दे. ती रात्रंदिवस त्याच्या उशापायथ्याशी बसते. तुम्ही त्या मातेला म्हणा, “माते! फार श्रमलीस. फार दमलीस या मुलाला मी रुग्णालयात ठेवण्याची व्यवस्था करतो.” तर ती माता काय म्हणेल? “मला कसले आहेत श्रम? दोन हातांऐवजी दहा हात असते तर आणखी सेवा केली असती. ही सेवा म्हणजे माझे समाधान आहे. तुम्ही मुलाला जर दूर न्याल तर मात्र मी कष्टी होईन!”

संत ती ती सेवाकर्मे करून मुक्तं झाले याचे कारण हेच होय. कबीर वस्त्रे विणी, वस्त्रे विणण्याचा त्याला कंटाळा नसे. तो त्या कर्मात रमे. तो वेठ मारीत नसे. “समाजरूपी देवाला ही वस्त्रे द्यावयाची आहेत; या माझ्या कर्मकुसुमांनी समाजदेव पूजावयाचा आहे”, अशी भावना त्याच्या हृदयात असे. त्यामुळे त्याचे ते कर्म उत्कृष्ट होई. भक्तिविजयात लिहिले आहे की बाजारात कबीर वस्त्रे मांडून बसे. लोक ती सणंगे पाहात. परंतु ती विकत घेण्याचे धाडस त्यांना होत नसे. त्या वस्त्रांची अनंत किंमत असेल असे त्यांना वाटे. ही सणंगे अमोल आहेत असे लोक म्हणत. त्या सवंगांवर लोकांची दृष्टी खिळून बसे. ती वस्त्रे ते पाहात उभे राहात. खरेच आहे. ती साधी वस्त्रे नव्हती. त्या वस्त्रांत कबिराचे हृदय ओतलेले असे. ज्या कर्मात हृदय ओतलेले आहे, आत्मा ओतलेला आहे त्या कर्माचे मोल कोण करील? त्या कर्माने परमेश्वर मिळत असतो, मोक्ष लाभत असतो.

गोरा कुंभार मडकी घडवी. त्याचे ते आवडीचे कर्म होते. परंतु ज्यांना मडकी द्यावयाची, त्या गिऱ्हाइकांबद्दल त्याला अपरंपार प्रेम वाटे. जनता म्हणजे त्याला रामाचे रूप वाटे. लोकांना फसवावयाचा विचारही त्याच्या मनात येत नसे. आज दिलेले मडके उद्या फुटेल, मग लौकर नवीन मडके खपेल असा विचार तो करीत नसे. बापाने विकत घेतलेले मडके मुलांच्या हयातीतही दिसेल, अशा वृत्तीने गोरा कुंभार मडकी बनवी.

म्हणून मडक्याची माती तुडविताना तो कंटाळत नसे. ते माती तुडविण्याचे काम वेद लिहिण्याइतकेच, गणितातील गहन सिद्धान्ताइतकेच पवित्र व महत्त्वाचे त्याला वाटे. ती माती तुडविता तुडविता तो स्वतःला विसरे. त्या मातीत स्वतःचे रांगत आलेले मूल तुडविले गेले तरी त्याला भान नव्हते! जनताजनार्दन त्याच्या अंतश्चक्षूंसमोर होता. मडके विकत घ्यावयास येणारा परमेश्वर त्याला दिसत होता. अशी तन्मयता मोक्ष देत असते; जीवनात अखंड आनंद निर्माण करीत असते. त्या आनंदाला तोटा नाही, त्या आनंदाचा वीट येत नाही. तो अवीट, अखूट, अतूट असा निर्मळ आनंद होता.

कर्म लहान की मोठे हा प्रश्नच नाही. ते कर्म करताना तुम्ही स्वतःला किती विसरता, हा प्रश्न आहे. कर्माची किंमत स्वतःला विसरण्यावर आहे. एखादा म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष घ्या, तो लाखो लोकांची सेवा करीत असतो. परंतु त्याचा अहंकारही तेवढाच जर मोठा असेल, तर त्या कर्माची किंमत नाही.

आपण ही गोष्ट गणितात मांडू या :

म्युनिसिपालिटीच्या अध्यक्षाचे काम; किती जणांची सेवा, ते अंशस्थानी लिहा आणि त्याचा अहंकार छेदस्थानी लिहा.

तीन लाख लोकांची सेवा
अहंकारही तेवढाच 

या अपूर्णांकाची किंमत काय? किंमत एक.

आता एका मातेचे उदाहरण घ्या. ती एकाच मुलाची सेवा करते. परंतु सेवा करताना स्वतःला विसरते, त्या सेवेचे रिपोर्ट ती लिहून प्रसिद्ध करीत नाही. तसे रिपोर्ट ती छापील तर महाभारते होतील. परंतु इतके ती करते, तरी काहीच नाही असे तिला वाटते. तिच्या कर्माची गणितात मांडणी करा.

एका मुलाची सेवा 
पूर्ण निरहंकारता (स्वत:ला शून्य करणे)

या अपूर्णांकाची काय किंमत? एकाला शून्याने भागिले तर भाग कितीचा लावावयाचा? तेथे कोणताही भाग लावा, तो अपुराच पडतो.

एक भागिले पूज्य, या अपूर्णांकाची किंमत अनंत आहे; आणि अनंत म्हणजेच मोक्ष.

एका लहानशा कर्मानेच मोक्ष मिळेल. जर कर्मात जिव्हाळा असेल तर त्या कर्मात आत्मा असेल. आपण दक्षिणा देतो त्या वेळेस ती ओली करून देतो. हेतू काय? ती दक्षिणा रुकाभर असेल, एक पै असेल; परंतु हृदयाचा ओलावा त्या दक्षिणेत आहे. म्हणून ती पै श्रीमंतांच्या अहंकारी लक्षावधी रुपयांच्या दानाहून अनंतपटींनी श्रेष्ठ आहे. रुक्मिणीचे एक भावभक्तीचे तुळशीपत्र सत्यभामेच्या सोन्याचांदीच्या, हिरे-माणकांच्या राशीहून वजनदार ठरते. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या शिवाच्या जटेतील एक केस कुबेराच्या संपत्तीहून वजनदार ठरतो.

म्हणून कर्म भक्तिमय करा. ज्याच्यासाठी कर्म करावयाचे त्यालाच देव माना. असे तुम्ही करू लागलात म्हणजे तुमच्या जड कर्मात किती रसमयता येते, याचा अनुभव तर घेऊन पाहा. समजा, माझी खानावळ आहे. माझा एखादा प्रिय मित्र जर जेवावयास यावयाचा असेल, तर मी किती काळजीपूर्वक स्वयंपाक करीन? किती प्रेमाने करीन? ती भाकरी भाजताना मला त्रास होणार नाही, चटणी वाटताना हात दुखणार नाहीत. मी ताट स्वच्छ ठेवीन. तांब्या स्वच्छ भरून ठेवीन. माशा दूर करण्याची दक्षता बाळगीन. माझ्या मित्रासाठी जर मी इतके करीन, तर माझ्याकडे जेवावयाला येणारे म्हणजे भगवंताच्याच मूर्ती आहेत अशी जर भावना मी करीन, तर माझ्या खानावळीचे कसे स्वरूप दिसेल बरे? किती स्वच्छता, किती प्रेम, किती अगत्य, किती आनंद, किती प्रसन्न वातावरण असेल, नाही? प्रत्यक्ष मोक्ष-लक्ष्मी येथे अवतरलेली दिसेल!

समाजसेवेचे कोणतेही कर्म घ्या. शाळा असो, खानावळ असो, दुकान असो, सलून असो. मामलेदार व्हा, वा म्युनिसिपल अधिकारी व्हा. या समाजदेवाची पूजा करावयाची आहे हे विसरू नका. म्हणजे तुमचे कर्म दिव्य झाल्याशिवाय राहणार नाही.

परंतु आज समाजात काय दिसते? गव्हर्नर यावयाचा असला म्हणजे म्युनिसिपालिटी जागी होते. मग रस्ते साफ होतात. गटारे धुतली जातात. परंतु लाखो लोक म्युनिसिपल हद्दीत राहतात, ती का मढी आहेत? त्यांना का स्वच्छता नको? त्यांना का घाणीच्या नरकात ठेवावयाचे? आज बडे लोक आपले देव झाले आहेत. ते आले म्हणजे कर्मे नीट करू लागतो. परंतु लाखो माणसे ही परब्रह्मे आहेत ही भावना बाळगून कर्मे होऊ लागतील तेव्हा भाग्य येईल, मोक्ष येईल, स्वातंत्र्य येईल. तोपर्यंत सर्वत्र अवकळाच असावयाची. सर्व समाजावर मृतकळाच यावयाची. तोपर्यंत आपली दुकाने, आपली हॉटेले, आपल्या खानावळी, आपल्या कचेऱ्या म्हणजे घाण, अव्यवस्था, निष्काळजीपणा, स्वार्थ यांनीच बरबटलेली असावयाची. आणि भारतीय संस्कृती हीन आहे असाच शेरा सारे जग मारील यात संशय नाही.

मोक्ष जप-तपात नसून धर्मात आहे, सेवाकर्मात आहे, आवडीचे कर्म हृदय ओतून करण्यात आहे. समाजदेवाची ही कर्ममय पूजा रसमय, गंधमय करण्यात आहे. त्या कर्माचाच जप करावयाचा. हे कर्म कसे उत्कृष्ट होईल, कसे तन्मयतेने करता येईल, याचीच चिंता बाळगावयाची.

यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।

असे गीता सांगते. जप म्हणजे निदिध्यास. कालच्यापेक्षा आजचे कर्म अधिक सुंदर होवो, आजच्यापेक्षा उद्याचे होवो, असे सारखे मनात वाटणे म्हणजेच जप. यानेच मोक्षाचे अधिकारी आपण होत असतो. हीच ती तळमळ. सेवा निर्दोष होण्याची तळमळ, सेवा निःस्वार्थी होण्याची तळमळ.

रात्री ईश्वराला प्रत्यहीची कर्मे अर्पण करावयाची असतात. या कर्मांचा नैवेद्य त्याला दाखवावयाचा आणि म्हणावयाचे, “देवा ! अजून हे कर्म निर्दोष होत नाही. कर्म करताना अजून स्वतःचा पूर्ण विसर पडत नाही. कीर्तीची, मानाची, पैशांची स्पृहा असते. निंदास्तुंतींनी मी खचतो. परंतु उद्या आजच्यापेक्षा अधिक सुंदर करीन बरे कर्म प्रयत्न करीन."

आपल्या हातून पूर्ण निर्दोष कर्म होत नाही म्हणून वाईट वाटले यात सारा धर्म आहे. हे जे अपूर्णत्वाचे अश्रू डोळ्यांतून भळभळतात त्यांत भक्तीचा जन्म आहे. गटे या जर्मन कवीने एके ठिकाणी म्हटले आहे, “जो कधी रडला नाही, त्याला देव दिसणार नाही.” स्वतःच्या अपूर्णतेचे अश्रू डोळ्यांत येऊन डोळे धुतले जातात. डोळे निर्मळ होतात. सर्वत्र भगवंत दिसू लागतो आणि या भगवंताची सेवामय पूजा करावयास अपरंपार उत्साह व उल्हास वाटतो.

अशा जिव्हाळ्याने कर्मे करा म्हणजे कधी थकवा वाटणार नाही. जनाबाई दळून कधी दमत नसे. नामदेवाच्या घरी नेहमी संत यावयाचे. जनाबाई त्यांच्या भक्तिप्रेमाच्या, ज्ञानाच्या गोष्टी ऐकावयास जात नसे; ती दळीत बसे. “आज माझ्या घरी देव आले आहेत; त्यांना चांगली भाकर पाहिजे. दाणे निवडून नीट बारीक दळू दे." अशा भावनेने जनाबाई दळी. तिचे हात दमत नसत. त्या हातांत जणू देव येऊन बसे. ते जनाबाईचे हात नसत; ते देवाचे हात होऊन जात. ते दळणे अपौरुषेय होत असे. ते दळणे म्हणजे अपौरुषेय वेद होता.

जवाहरलाल आठ आठ महिने दौरा काढीत हिंडतात. क्षणाची विश्रांती घेत नाहीत. दिवसातून दहा दहा सभा विमानातून, मोटारीतून, घोड्यावरून, उंटावरून सायकलीवरून, पायी, भिरीभिरी हिंडणे सदैव चालले आहे ! हा उत्साह कोठून येतो! त्या सेवेत ते तन्मय असतात. या दरिद्री नारायणाला कसा हसवू, कसा अन्नवस्त्राने नटवू, ज्ञानाने सजवू, हीच चिंता त्यांना असते. ती कर्ममय थोर पूजा असते.

महात्माजींचा क्षण न क्षण सेवेत जात असे. गांधी-आयर्विन कराराच्या वेळेला दिल्लीला महात्माजींना कधीकधी अर्धा तासच झोप मिळायची. रात्री दोन वाजता बोलणे संपवून येत आणि राहिलेले सूत कातण्यासाठी त्या वेळेस चरखा घेऊन बसत ! ती त्यांची मूर्ती डोळ्यांसमोर आणा म्हणजे हृदय सद्गदित झाल्याशिवाय राहणार नाही.

भक्तिमय कर्मात असा आनंद आहे. त्या कर्माचे ओझे नाही. एखादा मोठा लाकडाचा ओंडका असावा. तो किती जड असतो. कोणाच्या डोक्यात घातला तर कपाळमोक्षच व्हावयाचा. परंतु त्या लाकडाच्या ओंडक्याला काडी लावा, त्या ओंडक्याची चिमूटभर

निरुपद्रवी राख होईल! मऊमऊ राख खुशाल अंगाला फासावी! खुपणार नाही, रुतणार नाही. कर्माचे तसेच आहे. जे कर्म भाररूप वाटत असते, तेच भक्तिभावाने करू लागले म्हणजे सहज वाटते. खादी घरोघर जाऊन विकणे किती कठीण! परंतु त्या कर्मात भक्ती ओता, म्हणजे ते खादीचे गाठोडे वाटेल. मग ते गाठोडे आपण खाली ठेवणार नाही. पुंडलिकाने प्रत्यक्ष परमेश्वर समोर उभा राहिला तरी आईबापांचे पाय सोडले नाहीत. पुंडलिकाला माहीत होते, की या सेवाकर्माने देव दारात आला आहे. सेवाकर्म सोडून मी देवाकडे जाईन, तर देव पळेल. परंतु हे सेवाकर्म जोपर्यंत मी करीत आहे, तोपर्यंत युगे अठ्ठावीस हा पांडुरंग माझ्यासमोर उभा राहील व कृपादृष्टीची वृष्टी करील! तुकारामांनी मोठ्या प्रेमाने लिहिले आहे:

"कां रे पुंड्या मातलासी उभे केले विठोबासी ।"

पुंडलिका, माजलास होय तू? • माझ्या विठोबाला सारखे उभे 11

करून ठेविले आहेस ते!

परंतु तुकारामांनी तेच केले. देव समोर आला तरी माझे भजन थांबणार नाही असे ते म्हणतात. सेवेचे कर्म म्हणजेच सारे काही.

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी

विठ्ठल तोंडीं उच्चारा ।

विठ्ठल अवघ्या भांडवला

विठ्ठल बोला विठ्ठल ॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद

विठ्ठल छंद विठ्ठल |

विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकयामुखा विठ्ठल ||

या अभंगात जीवनाचे सारे तत्त्वज्ञान आले आहे. आपले कर्म, आपल्या कर्माची साधने, म्हणजे सारे ईश्वराचेच रूप. माझा चरखा म्हणजे माझे देव, माझे जाते म्हणजे माझा देव, माझी चूल म्हणजे माझा देव, माझा कारखाना म्हणजे देव, माझी खादी म्हणजे देव, माझी व्यायामशाळा म्हणजे देव, तेथील उपकरणे म्हणजे देव, प्रयोगशाळा म्हणजे देव, तेथील गॅस, तेथील ॲसिडे म्हणजे देव, सर्वत्र देवाचेच रूप !

काँग्रेसची संघटना असो, मजुरांची संघटना असो, शेतकरीसंघ असोत, युवक संघ असोत, ग्रामोद्योग असोत, प्रचंड कारखाने असोत, व्यायामशाळा काढा व औद्योगिक केंद्रे उघडा; ही सारी सेवेची कर्मे असतील, तर ती मंदिरे आहेत. तेथे सर्वत्र विठ्ठल आहे.

ती कर्मे करताना सुख मिळो वा दुःख मिळो, तेही विठ्ठलाचेच रूप. ती कर्मे करताना गळ्याला फास लागो वा फुलांचा हार गळ्यात पडो, दोन्ही सारखीच. मनाची चलबिचल नाही. भक्तीच्या प्रकाशात सारे सुंदर व सारे मंगलच आहे.

महात्माजींना एकदा एकाने प्रश्न विचारला, “तुमच्यावर इतक्या टीका होतात, तुम्हाला काय वाटते?" तो महापुरुष म्हणाला, “माझ्या अंतरंगी तंबोरा लागलेला असतो.” महात्माजींच्या हृदयात अखंड संगीत आहे. तेथे प्रक्षुब्धता नाही. सागरावर अनंत लाटा उसळतात. परंतु आत खाली समुद्र गंभीर असतो. तेथे प्रशान्त शान्ती असते.

महापुरुषांना हे कसे शक्य होते? कारण स्वार्थाला लवलेशही तेथे नसतो. जनतेची सेवा हेच एक ध्येय असते. आपण समुद्रात बुड्या मारतो, त्या वेळेस कितीतरी घनफूट पाणी आपल्या डोक्यावर असते. परंतु त्या पाण्याचा बोजा वाटत नाही. आपण पुनः पुन्हा बुड्या मारतो. पाण्यात लपतो, खेळतो, ठाव आणतो. परंतु त्या पाण्यातून बाहेर या. स्वतःसाठी एक घागर भरून घ्या. ती घागर तुमच्या डोक्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या डोक्याला, तुमच्या कमरेला तिचे ओझे झाल्याशिवाय राहणार नाही.

स्वतःच्या केवळ सुखासाठी केलेले प्रत्येक स्वार्थी कर्म म्हणजे बोजा आहे. त्याचे जिवाला ओझे होते. तो जोजारा होतो. परंतु हे कर्म जनतेसाठी आहे असे म्हणा, म्हणजे ओझे नाही. जनसागरात बुडा; तुमच्या स्वतःचा बिंदू जनतासिंधूत मिसळून टाका. म्हणजे मग जीवनात संगीत आल्याशिवाय राहणार नाही.

“ शान्ताकारं भुजगशयनम्” असे परमेश्वराचे वर्णन केलेले आहे. परमेश्वर सहस्रफणांच्या शेषावर निजला आहे. परंतु शांतपणे पहुडला आहे याचा अर्थ काय? परमेश्वर कोट्यवधी कर्मे करीत आहे. आपण झोपलो तरी देव झोपत नाही. तो मेघ पाठवीत असतो, तारे हसवीत असतो, कळ्या फुलवीत असतो. परमेश्वर झोपून विश्व कसे चालेल?

या विश्वाचा पसारा मांडणाऱ्या परमेश्वराला किती शिव्याशाप मिळत असतील! या जगात सर्वांत मोठा हुतात्मा कोणी असेल, तर तो परमेश्वर हा होय. परंतु तो परमेश्वर शिव्याशापांकडे लक्ष देत नाही. त्याला जे योग्य व परिणामी हिताचे वाटते ते तो करीतच आहे. शांतपणे, अविरत करीत आहे.

परमेश्वराचे हे वर्णन महापुरुषाला लागू पडते. महापुरुषही असेच शांतपणे ध्येयावर दृष्टी ठेवून पुढे जात असतात. त्यांची नितान्त निःस्वार्थता त्यांना अपार धैर्य व शांती देत असते. स्वार्थाला भय आहे, निःस्वार्थी वृत्तीला भय नाही.

एकच कर्म नेहमी करावे लागेल असे नाही. कधीकधी नेहमीची वर्णकर्मे दूर ठेवून इतर कर्मेही अंगीकारावी लागतील. आग लागली असता सर्वांनी धावले पाहिजे. भूकंप झाला असता सर्वांनी स्वयंसेवक झाले पाहिजे. बिहारमध्ये भूकंप झाला होता. धावले जवाहरलाल. तेथे स्वयंसेवक भेदरून उभे होते. मातीतून मुडदे काढण्याचे धैर्य त्यांना होईना. जवाहरलालांनी हात सरसावले! घेतले कुदळ- फावडे, लागले उकरायला ! त्याबरोबर सारे स्वयंसेवक संस्फूर्त झाले. प्रसंगी कोणतेही कर्म येवो, त्या कर्मात तितक्याच तडफेने, तितक्याच तन्मयतेने पडले पाहिजे.

आज भारतवर्ष दास्यात आहे. या पतित राष्ट्रास मुक्त करणे हा आज सर्वांचा मुख्य धर्म आहे. आपापल्या आवडीनिवडी क्षणभर बाजूस ठेवाव्या लागतील आणि स्वातंत्र्याच्या कोठल्या ना कोठल्या कर्मात रमावे लागेल. लोकमान्यांनी वेद-वेदान्ताचा, गणित- ज्योतिषाचा आनंद सोडला, हा त्यांचा सर्वांत मोठा त्याग होय. नामदार गोखल्यांना अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहावयाचा होता, न्यायमूर्तींचे चरित्र लिहावयाचे होते; परंतु हे सारे त्यांना दूर ठेवावे लागले. प्रफुल्लचंद्रांना शास्त्र आवडते; परंतु बंगाली खेड्यांत म्हातारपणी चरखा देत ते हिंडतात. राष्ट्र ज्या ज्या योगे बलवान होईल, ते ते कर्म आज हातात घ्या. राष्ट्रोद्धाराचे जे अनेक उद्योग आहेत त्यांतला जो आवडेल तो उचला. परंतु जे काही उचलाल त्यात हृदय ओता; त्याचा अहर्निश जप करा. म्हणजे तो उद्योग तुम्हांला मोक्ष देऊन तुमच्या राष्ट्रालाही मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही.

एका जपानी कामगाराला कोणी विचारले, “तू चांगले स्क्रू करतोस का?” त्या कामगाराने उत्तर दिले, “नुसते चांगलेच नाही, तर उत्कृष्ट स्क्रू मी तयार करतो." हेच उत्तर आपणा सर्वांस देता आले पाहिजे. मी जे जे कर्म करतो ते उत्कृष्ट, असे ज्याला म्हणता येईल तो धन्य होय.

एक जपानी मजूर गलबते बांधण्याच्या कामावर असे. तो वाचावयास शिकत होता. कोणी त्याला विचारले, “तू आता मोठा झालास, कशाला वाचावयास शिकतोस?” तो म्हणाला, “समजा, रशियाशी आमच्या देशाची लढाई सुरू झाली. त्या लढाईत आरमारी युद्धेही होतील. एखाद्या आरमारी युद्धात जपानी आरमाराचा जर विजय झाला, आणि तो विजय मिळवून देणाऱ्या गलबतांत जर हे गलबत असेल तर मला किती आनंद होईल! ज्या गलबतांना मी तयार करीत होतो, त्या गलबतांची नावे जर मी वर्तमानपत्रात वाचली तर मला कृतकृत्य वाटेल. मी म्हणेन की त्या गलबतात मी दोन खिळे मारले होते, मी दोन पत्रे ठोकले होते, मी दोन स्क्रू पिळले होते. मीही माझ्या देशाच्या युद्धात - माझ्या देशाच्या विजयात थोडा भागीदार आहे, असे मला वाटेल. ते वर्तमानपत्र वाचता यावे म्हणून मी शिकत आहे.”

आपल्या लहानशा कर्माबद्दल केवढी ही थोर दृष्टी! माझे हे लहानसे कर्मही देशाच्या उपयोगी पडेल, समाजाच्या उपयोगास येईल, म्हणून ते मी करीत आहे; व शक्य तितके उत्कृष्ट करीत आहे असे मनात वागवणे यात केवढा कर्ममहिमा आहे!

कर्म लहान असो वा मोठे असो. ते कर्म समाजाला मोक्ष देणारे करा, समाजाच्या उपयोगास येईल असे करा. समाजाच्या पूजेच्या कामी ते येईल, असे करा . लेख वा व्याख्याने द्या. उच्चारलेला शब्द, लिहिलेली ओळ समाजाचे भले करील अशी मनात खात्री असू दे. मी दिलेला माल समाजाला पुष्टी देईल, रोग देणार नाही, ही सर्वांची अंतरी निष्ठा असू दे. बौद्धिक खाणी द्या वा शारीरिक खाणी द्या. ती समाजाला धष्टपुष्ट करतील अशी असू देत. विषारी खाणी कृपा करून समाजाला देऊ नका.

अशा दिव्य कर्ममय जीवनाचा सर्वांस ध्यास लागू दे. “मोक्षाचे तो आम्हां नाही अवघड. " मोक्ष दारात आहे, शेतात आहे, कचेरीत आहे, चुलीजवळ आहे, कारखान्यात आहे, शाळेत आहे, सर्वत्र आहे. समाजाचा बुडालेला धंदा पुन्हा सजीव करून समाजाला भाकरी देऊ पाहणारा महापुरुष हा खरोखर संत आहे. समाजातील घाण दूर करून त्यांना स्वच्छतेत राहावयास शिकविणारा तो परम थोर ऋषी आहे. परपुष्ट कर्मशून्य जीव आता तुच्छ वाटू देत. केवळ हरी हरी म्हणणारे व भोगासाठी लालचावलेले जीव हे किडे वाटू देत.

पोटापुरतें काम । आणि अगत्य तो राम ।।

पोटासाठी कोणते तरी कर्म करा; परंतु ते करताना रामाला विसरू नका. दारूचे गुत्ते घालून पोटाला मिळवू नका. रामाला स्मरणे म्हणजे मंगलाला स्मरणे. समाजाच्या कल्याणाला स्मरणे.

कोणी कोणी नुसते मुखाने राम राम म्हणत बसतात. परंतु मुखाने राम म्हणा व हाताने काम करा, सेवा करा. मी माझ्या आईचा नुसता जप करीन तर ते आईला रुचणार नाही. आई म्हणेल, “माझे चार धंदे कर. जा, कळशी भरून आण.” आईची सेवा न करता मी आई आई म्हणत बसेन तर तो दंभ नाही का होणार? देवाचे नाव उच्चारा व हाताने सारखी सेवा चालू दे. ती सेवा म्हणजेच देवाचे नाव. महात्माजी एकदा म्हणाले, “चरखा हे माझ्या देवाचेच एक नाव आहे.” ईश्वराला सहस्रावधी नावे आहेत. प्रत्येक मंगल वस्तू म्हणजे त्याचेच स्वरूप आहे, त्याचेच नाव आहे.

मुखात देवाचे नाम व हातात सेवेचे काम. कधी कधी ईश्वराचे अपरंपार प्रेम दाटून आपोआप कर्म माझ्या हातून गळेल. समजा, माझ्या खानावळीत जेवणाऱ्या लोकांकडे ही देवाची रूपे आहेत या भावनेने मी पाहू लागलो. एखाद्या वेळेस ही भावना इतकी वाढेल, की मी वाढणे विसरून जाईन. त्या देवाच्या मूर्तीकडे पाहातच राहीन. माझे डोळे घळघळ वाहू लागतील. अष्टभाव दाटतील. रोमांच उभे राहतील.

"तनुवरी गुढियाच उभारती'

असा अनुभव येईल.

अशा रीतीने कर्म गळून पडणे म्हणजेच शेवटची स्थिती. ती कर्माची परमोच्च दशा होय. त्या वेळेस समोरचे जेवणारे न खाता तृप्त होतील. त्या वाढणाऱ्याच्या डोळ्यांतील प्रेमगंगांनी ते पुष्ट होतील. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणत, “ईश्वराचे नाव उच्चारताच जोपर्यंत तुझे डोळे भरून येत नाहीत तोपर्यंत कर्म सोडू नकोस.”

परंतु ती धन्यतेची स्थिती येताच जे पापात्मे खुशालचेंडूप्रमाणे भोजने झोडतात आणि मुखाने वरवर 'नारायण नारायण' म्हणतात, त्यांना समाजाने शेणगोळ्या प्रमाणे दूर भिरकावून दिले पाहिजे. भारतीय संस्कृती असे भिरकावून देण्यास सांगत आहे.

भारतीय संस्कृती सांगते, “कोणते तरी सेवाकर्म हाती घ्या, त्यात रमा. निरहंकार व्हा. निःस्वार्थ व्हा. त्या कर्माने समाजदेवतेची पूजा करावयाची आहे. हे विसरू नका; आणि उत्तरोत्तर ते सेवाकर्म उत्कृष्ट करीत करीत एक दिवस हा देह पडू दे व त्याचे सोने होऊ दे.' " भारतीय संस्कृती म्हणजे सेवेचा, कर्माचा अपरंपार महिमा.

परंतु आज ही संस्कृती भारली गेली आहे. मी रस्त्यात कर्मशून्य होऊन नारायण म्हणत बसलो, तर माझ्यापुढे पैशांचे ढीग पडतात. परंतु मी रस्त्यातील घाण दूर करीन, विष्ठा उचलीन तर मला प्यायला पाणी मिळत नाही; मग पोटभर जेवावयाची तर गोष्ट दूरच राहिली! कर्महीनांना पाद्यपूजा मिळत आहेत आणि कर्ममय, श्रममय ज्यांचे जीवन आहे, त्यांना लाथा बसत आहेत, त्यांचा पदोपदी उपहास होत आहे! भारतीय संस्कृतीचा आत्मा चिरडला गेला आहे. ज्यांना ज्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान असेल, त्यांनी स्वतः कर्ममय ज्यांचे

जीवन आहे त्यांना पूजावयास उठले पाहिजे. तैं झडझडून वहिला नीघ । इये भक्तीचिये वाटे

लाग।

तैं पावसी अव्यंग । निजधाम माझें ।।

मोक्षाचे, आनंदाचे परमधाम पाहिजे असेल, जेथे कोणतेही व्यंग नाही, दुःख नाही, वैशम्य नाही, दुष्काळ नाही, दारिद्र्य नाही, अज्ञान नाही, घाण नाही, रोग नाही, भांडण नाही, क्रोध-मत्सर नाही, ते परम मंगल स्वातंत्र्याचे धाम पाहिजे असेल, तर सारे मिथ्या अभिमान, सारी श्रेष्ठ-कनिष्ठपणाची कुभांडे, सर्व आलस्य, सारे स्वार्थ, सर्व भ्रामक कल्पना झडझडून फेकून द्या, आणि या सेवामय, कर्ममय, वर्णधर्ममय भक्तीच्या वाटेला लागा.

एक हात भू नांगरणे शत व्याख्यानांहुन थोर

एक हात खादी विणणें

मंत्रजपाहुन तें थोर एक वस्त्र वा रंगविणें

तव पांडित्याहुन थोर शेतकरी, तसे विणकरी, तसे रंगारी, बना देशाचे

आळशी न कुणी कामाचे, यापुढें ॥ एक नीट मडकें करणें

तव व्याख्यानाहुन एक नीट जोडा शिवणें थोर

चाकास धाव बसविणें

तव श्रीमंतीहुन थोर तव विद्वत्तेहुन थोर कुंभार, तसे चांभार, तसे लोहार बना देशाचे आळशी न कुणी कामाचे, यापुढें ॥

हा आता आपला मंत्र. ही आहे भारतीय संस्कृती.

बेंजामिन फ्रँकलिन इंग्लंडमधून अमेरिकेत जेव्हा परत गेला,

तेव्हा त्याला विचारण्यात आले, “इंग्लंडात काय पाहिलेस ?”

बेंजामिन म्हणाला, “इंग्लंडमध्ये सारे लोक उद्योगी आहेत. तेथे प्रत्येकजण काही ना काही करीतच असतो. इंग्लंडमध्ये वारा; वाफ वगैरेंनाही कामाला लावण्यात आले आहे, पवनचक्क्या फिरत असतात; वाफ वगैरेंनाही कामाला लावण्यात आले आहे, पवनचक्क्या फिरत असतात; वाफेने यंत्रे चालत असतात. इंग्लंडमध्ये सारे श्रमजीवी लोक आहेत. येथे एकच जंटलमन मला दिसला. "

“कोण तो?” सर्वांनी एकदम विचारले.

बेंजामिन म्हणाला, “पिग् - (डुक्कर ) ! हे डुक्कर मात्र काही काम करीत नव्हते. घूं घूं करीत भराभरा विष्ठा खात हिंडत होते!”

बेंजामिन श्रम न करणाऱ्याला डुक्कर म्हणत आहे. शिष्ट मनुष्याला, जंटलमनला बेंजामिन काय पदवी देत आहे ते पाहा. बेंजामिन श्रमहीनास सूकर म्हणत आहे. परंतु आपल्या देशात श्रमहीनास देव समजण्यात येत असते. अमेरिका वैभवात का व आपण दारिद्र्याच्या गर्तेत का हे यावरून दिसून येईल.

पूज्य शेतकऱ्याला आपण धिक्कारीत आहोत, हरिजनांना बहिष्कृत करीत आहोत आणि कर्महीन श्रीमंतांना वा धर्माच्या नावाने सर्वांना लुबाडणाऱ्यांना, भ्रष्टाकार माजविणाऱ्यांना, स्त्रियांची पातिव्रत्ये धुळीस मिळविणाऱ्यांना पूजीत बसलो आहोत. अतः पर भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी हा बावळटपणा, हा मूर्खपणा, करंटेपणा, दूर फेकून दिला पाहिजे. धुळीत काम करून मळलेला हा सर्वांहून मंगल व पवित्र असे मानावयास शिकले पाहिजे. आपणांस वाटत असते, धुळीत मळलेला मनुष्य अमंगळ. परंतु त्याचा कोठा स्वच्छ असतो. त्याला अंतःशुद्धी असते. याच्या उलट, बाहेरचे कपडे परीटघडीचे वापरणारा, अंगाला रोज साबण लावणारा, केस विंचरणारा, असा हा बाह्य स्वच्छतेचा पुतळा - परंतु त्याचे पोट तपासून पाहा. त्याच्या पोटात सारी घाण. त्याला सदैव अपचन व अजीर्ण. त्याच्या शौचाची सदैव तक्रार. त्याला बद्धकोष्ठाची व्यथा. श्रम करील तर ना कोठा स्वच्छ राहील!

सर्वजण विचार करा. भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखा. गीतेचे अंतरंग पाहा. घोड्याचे खरारे करणारा व पीतांबराचा तोबरा करून त्यातून घोड्यांना चंदी चारणारा तो गोपालकृष्ण डोळ्यांसमोर आणा, आणि जीवनाला शुद्ध वळण द्या. आजचा हा रडका संसार सुखमय, समृद्ध व आनंदमय करा. भारतीय संस्कृतीची उपासना करणारे राष्ट्र कधी दारिद्री व दास होणार नाही. खऱ्या सद्धर्माजवळ श्री, वैभव, जय, ही ठेवलेलीच असतात.

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा