shabd-logo

गुरू-शिष्य

5 June 2023

11 पाहिले 11
भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडे तिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.

गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, केवळ आचार्य नव्हे. शिक्षक किंवा आचार्य त्या त्या विशिष्ट ज्ञानाशी आपला थोडाफार परिचय करून देत असतात. त्यांचा हात धरून आपण ज्ञानाच्या अंगणात येतो. परंतु गुरु आपणांस ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो. त्या त्या ध्येयभूत ज्ञानाशी गुरू आपणांस एकरूप करून टाकतो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरु शिष्याचीही समाधी लावतो. शाळेत विद्यार्थी प्रश्न विचारतात, परंतु गुरूजवळ फारशी प्रश्नोत्तरे नसतात. तेथे न बोलता शंका मिटतात, न सांगता उत्तरे मिळतात. येथे पाहावयाचे, ऐकावयाचे. न बोलता गुरु शिकवितो. न विचारता शिष्य शिकतो. गुरु म्हणजे उचंबळणारा ज्ञानसागर! सच्छिष्याचा मुखचंद्र पाहून गुरु हेलावत असतो. गीतेमध्ये ज्ञानार्जनाचे प्रकार सांगितले आहेत: "तद्धिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया "

ते ज्ञान प्रणामाने, पुनःपुन्हा विचारण्याने, सेवेने प्राप्त करून घे. शिक्षकाजवळ परिश्रमाने आपण ज्ञान मिळवितो. परंतु गुरूजवळ प्रणाम व सेवा हेच ज्ञानाचे दोन मार्ग असतात. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरूजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे; परंतु भांडे जर वाकणार नाही, तर त्या भांड्यात त्या अनंत पाण्यातील एक थेंबही शिरणार नाही. तसेच ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणांजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणांस मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढविण्यासाठी नमावयाचे असते.

एखादा संगीत शिकू पाहणारा मुलगा एखादा संगीत - शाळेत जातो. तेथे काही वर्षे तो शिकतो. परंतु संगीताचे खरे ज्ञान त्याला होत नाही. संगीताशी त्याचा परिचय होतो. संगीताचा आत्मा त्याला केव्हा दिसणार? केव्हा समजणार? एखादा महान गायकाच्या संगतीत जेव्हा साधक होऊन तो वर्षानुवर्षे राहील, त्या गुरूची भक्तिप्रेमाने सेवा करील, जेव्हा जेव्हा गुरु राग आळवू लागेल तेव्हा तेव्हा नम्रपणे सर्व इंद्रियांचे कान करून तो राग तो ऐकेल, तेव्हाच खरी विद्या त्याला प्राप्त होईल. त्याच्या ओबडधोबड विद्येला तेव्हाच सुसंस्कृतता येईल, कळा चढेल.

केवळ विनम्र होऊन येणारा हा जो ज्ञानोपासक शिष्य, त्याची जातकुळी गुरु विचारीत नाही. तळमळ ही एकच वस्तू गुरु ओळखतो. शत्रूकडचा कचही प्रेमाने पायाशी आला, तर शुक्राचार्य त्याला संजीवनी देतील. रिकामा घडा घेऊन गुरूजवळ कोणीही या व वाका, तुमचा घडा भरून जाईल.

गुरू आपणांस संपूर्ण ज्ञानाची भेट करवितो. त्या त्या ज्ञानप्रांतातील या क्षणापर्यंतच्या सकल ज्ञानाशी तो आपली सांगड घालून देतो. सर्व भूतकाळ तो आपणांस दाखवितो. वर्तमानकाळाची ओळख देतो. भविष्यकाळाची दिशा सांगतो. गुरु म्हणजे आतापर्यंतचे संपूर्ण ज्ञान.

गुरु म्हणजे एक प्रकारे आपले ध्येय. आपल्याला ज्या ज्ञानाची तहान आहे, ते ज्ञान अधिक यथार्थपणे ज्याच्या ठिकाणी आपणांस प्रतीत होते, तो आपला गुरू होतो. गुरुभक्ती म्हणजे एक प्रकारे ध्येयभक्ती. गुरू या शब्दाऐवजी ध्येय शब्द योजा. म्हणजे गुरुभक्ती मग वेडगळपणा वाटणार नाही. फुललेल्या कमळातील रस पिण्यासाठी, रुंजी घालीत, अधीर होऊन ज्याप्रमाणे भुंगा येतो, अलगत त्या कमळाजवळ बसतो, त्या कमळातील रस पिता पिता तल्लीन होतो, – तसेच सच्छिष्याचे गुरूजवळ होते. गुरूला तो लुटतो. गुरूला सोडीत नाही. गुरूला रिकामे करण्यासाठी तो तडफडतो. परंतु गुरूला तेव्हाच रिते करता येईल, जेव्हा शिष्य स्वतः रिकामा असेल. स्वतःच्या जीवनाचे भांडे जितके मोठे व खोल, त्या मानाने गुरूपासून आपणांस घेता येईल.

समर्थांनी लिहिले आहे, 'नेणतेपण सोडूं नये ।' आपण नेणते आहोत, आपण अजून रिकामे आहोत, अजून भरपूर आपणांस शिकावयाचे आहे, असे सदैव वाटले पाहिजे. आणखी पुढे, आणखी पुढे, असे सदैव म्हटले पाहिजे. हाच विकासाचा मार्ग आहे. मी सारे समजलो, सारे शिकलो, असे म्हणताच विकास थांबतो.

ध्येय सदैव वाढतच असते. ध्येयरूपी गुरु अनंत आहे. त्याची सेवा किती केली तरी ती अपुरीच आहे. जन्मोजन्मी त्याची भक्ती करावी लागेल, तेव्हा कदाचित परिपूर्णता लाभेल. न्यूटन म्हणणार, “माझे ज्ञान सिंधूत बिंदू आहे.” सॉक्रेटिस म्हणणार, “मला काही समजत नाही, एवढेच मला समजते.”

त्या त्या शास्त्रातील अनंत ज्ञानासाठी कसे तडफडावे, कसे वेडे व्हावे, हे गुरू शिकवीत असतो. गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्ती असे शिष्याला वाटते. गुरू म्हणजे एक प्रतीक होते. गुरू म्हणजे मूर्त ज्ञानपिपासा, गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ. गुरू म्हणजे सत्याच्या प्रयोगाची उत्कटता. माझ्या गुरूला आदी नाही, अंत नाही. माझ्या गुरूला पूर्व नाही, पश्चिम नाही. माझा गुरू म्हणजे परिपूर्णता.

अशा गुरुला काही द्यावे लागत नाही. त्याला कितीही दिले तरी ते थोडे आहे. कितीही दिले तरी ते पुष्कळ आहे. मनुस्मृतीत सांगितले आहे, “अरे, तुझ्याजवळ द्यावयास काहीच नसेल तर खडावांचा एक जोड दे. एक उदककुंभ भरून दे. एक फूल दे." शिष्याने किती दिले हे पाहावयाचे नसते. जे दिले त्यात कृतज्ञतेचा सागर भरलेला असतो. सारे हृदय त्यात ओतलेले असते.

युरोप खंडात मी अमक्याचा शिष्य मी अमक्या गुरूच्या पायाशी बसून शिकलो, असे सांगण्यात मोठा अभिमान बाळगतात. सॉक्रेटिसाचा शिष्य म्हणवून घेण्यात प्लेटोला धन्यता वाटे. प्लेटोचा शिष्य म्हणवून घेण्यात ॲरिस्टॉटलला कृतार्थं वाटे. इब्सेनचा अनुयायी म्हणवून घेण्यात शॉला मोठेपणा वाटे. तर मार्क्सचा शिष्य म्हणवून घेण्यात लेनिनला गौरव वाटला असेल.

आपण कोणाचे तरी आहोत ही भावना फार थोर आहे. त्या भावनेत कृतज्ञता आहे. मी जगात एकांडा शिलेदार नाही. जगात सहकार्य आहे. त्याचा मला आधार, माझ्या पुढच्याला आधार. जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही. प्रत्येकजण पूर्वीच्या लोकांच्या खांद्यांवर उभा राहतो व आणखी दूरचे पाहतो. ज्ञानाचा इतिहास म्हणजे सहकार्याचा इतिहास, अखंड परंपरेचा इतिहास.

खरा गुरू आपल्या पुढे जाणाऱ्या शिष्याचे कौतुकच करतो. शिष्याकडून पराजय होण्यात गुरूला अपार आनंद होतो. कारण शिष्याचा विजय हा गुरूचाच विजय असतो. गुरूने जे पेरले त्याचाच तो विकास असतो. गुरू ज्या ज्ञानाची उपासना करीत होता, त्या ज्ञानाचीच ती पूजा असते. त्या ज्ञानाचेच ते वाढते वैभव असते. अण्णासाहेब पटवर्धन लोकमान्यांना शत आशीर्वाद देत व गोखले गांधींची स्तुतिस्तोत्रे गात.

गुरु स्वतःचे सारे ज्ञान शिष्याला देतो. त्याच्यापासून तो काहीही लपवून ठेवीत नाही. स्वतःचे महत्त्व कमी होईल म्हणून स्वतःची सर्व ज्ञानपुंजी न देणारे अहंभावी गुरु पुष्कळ असतात. परंतु ते गुरू नव्हेत. त्यांचे ज्ञान त्यांच्याबरोबर मरते. ज्या ज्ञानाची आपण उपासना केली, ते मरावे असे कोणास वाटेल? खऱ्या गुरूला ज्ञानाचा वृक्ष वाढत जावा असे वाटत असते. ज्ञानरूपाने गुरु अमर होत असतो. मिळविलेले देऊन टाकावयाचे. एके दिवशी श्रीरामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले, “मी सारे तुला आज देऊन टाकतो. माझी सारी साधना आज तुझ्यात ओततो. " केवढा दिव्य तो क्षण असेल! शिष्याला स्वतःच्या जीवनातील सारे अर्पण करणे!

गुरु म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे प्रतीक. गुरुच्या विचारातील किंवा सिद्धान्तातील काही चूक शिष्याला आढळली, तर ती चूक सच्छिष्य लपविणार नाही. गुरूने दिलेले ज्ञान अधिक निर्दोष करणे म्हणजेच गुरुपूजा. गुरूच्या चुका उराशी धरावयाच्या नाहीत. तो गुरूचा अपमान होईल. ज्ञानाची पूजा म्हणजेच गुरुभक्ती. गुरू जिवंत असता, तर ती चूक दाखविल्याबद्दल गुरु रागावला नसता. उलट, त्याने शिष्याला पोटाशी धरले असते. त्याचे कौतुक केले असते.

गुरूची अंधळी भक्ती गुरूला आवडत नाही. गुरूचे सिद्धान्त पुढे नेणे, गुरूचे प्रयोग आणखी चालविणे यातच खरी सेवा आहे. निर्भयपणे परंतु नम्रपणे ज्ञानाची उपासना करीत राहणे यात गुरुभक्ती आहे. एका दृष्टीने सारा भूतकाळ हा आपला गुरु आहे. सारे पूर्वज आपले गुरू आहेत. परंतु भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या, तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट, त्या थोर पूर्वजांना तो उपमर्द वाटेल.

आपणांस प्रिय व पूज्य असे कुटुंबातील कर्ते माणूस जर मेले, तर आपणांस वाईट वाटते. परंतु त्या मृतास मोहाने कवटाळीत का आपण बसतो? शेवटी त्या प्रिय परंतु मृत माणसाचे प्रेत आपणांस अग्नीच्या स्वाधीन करावे लागते. ते प्रेत घरात ठेवणे म्हणजे सडू देणे. ती त्या प्रेताची विटंबना होईल. त्याप्रमाणे पूर्वजांच्या मृत चालीरीती, सदोष विचारसरणी यांना आपण नम्रपणे आणि भक्तिभावाने मूठमाती देणे यातच पूर्वजांची पूजा आहे.

गुरुभक्ती म्हणजे शेवटी ज्ञानभक्ती हे विसरता कामा नये. पूर्वजांबद्दल आदर म्हणजे पूर्वजांच्या सदनुभवांबद्दल आदर. त्यांच्या प्रयत्नांबद्दल आदर. त्यांच्या धडाडीबद्दल, ज्ञाननिष्ठेबद्दल आदर. गुरूची पूजा म्हणजे सत्याची पूजा, ज्ञानाची पूजा, अनुभवाची पूजा. जोपर्यंत मनुष्याला ज्ञानाची तहान आहे, ज्ञानाबद्दल आदर आहे, तोपर्यंत जगात गुरुभक्ती राहणार.

भारतात गुरु शब्दापेक्षा सद्गुरू शब्दाचा महिमा आहे. सद्गुरू म्हणजे काय? गुरू त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणांस पुढे पुढे नेतो, परंतु सद्गुरू जीवनाची कला शिकवितो. संगीताचा आत्मा तानसेन दाखवील; चित्रकलेचा आत्मा अवनीन्द्रनाथ दाखवितील; नृत्यातील दिव्यता उदयशंकर दाखवितील; सृष्टिज्ञानातील अनंतता श्री. रामन दाखवितील; परंतु जीवनातील अनंतता कोण दाखविणार? जीवनातील संगीत कोण शिकविणार? जीवनातील मधुर नाच कोण शिकविणार?

“अध्यात्मविद्या विद्यानाम्” असे गीता सांगते. जीवन सुंदर करणे, स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम, निरुपाधी करणे ही सर्वांत थोर विद्या. ही विद्या शिकविणारा तो सद्गुरू. नेपोलियन युद्धशास्त्र शिकणाऱ्यांचा गुरु आहे. परंतु स्वतःच्या जीवनातील कामक्रोधांच्या वेगाशी लढावयास शिकविणारा तो सद्गुरू होय.

उत्कृष्ट वाद्य वाजविणारा मुलांबाळांवर संतापून त्यांना रडायला लावील! डामरातून सुंदर रंग काढणारा शास्त्रज्ञ जीवनाला डामर फासू शकेल! प्रकाशाची उपासना करणारे चंद्रशेखर रामन प्रत्यक्ष संसारात प्रांतीय भेदभावांचा अंधार उत्पन्न करतील ! सुंदर विचार देणारा पंडित बेकन खुशाल लाचलुचपत घेईल!

जगात शास्त्रांचा कितीही विकास झाला, तरी जोपर्यंत जीवनकला माणसास साधत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होय. समाजात परस्परांशी कसे वागावयाचे ते आधी शिका, असे महर्षी टॉल्स्टॉय म्हणत असत. जीवन मधुर कसे करावे हे संत सांगतात. रेडिओ ऐकून संसारात संगीत येणार नाही. तुमच्या या बाह्य टाकंटिक्यांनी रडका संसार मधुर होणार नाही. संगीत आत अंतरंगात सुरू झाले पाहिजे. हे जीवनातील सागरसंगीत सद्गुरू शिकवितो. तो हृदयात प्रकाश पाडतो. बुद्धीला सम करतो. प्रेमाचे डोळे देतो. तो कामक्रोधादी सर्पांचे दात पाडतो. तो द्वेषमत्सरादी व्याघ्रांना कोकरे बनवितो. सद्गुरू हा असा मोठा किमयागार असतो.

म्हणून भारतात सत्संग किंवा सज्जनांची सेवा यांना फार महत्त्व दिले आहे. 

सज्जनसंगतिरेका । भवति भवार्णव-तारण-

नौका।।

रवीद्रनाथ सृष्टीकडे कसे पाहतात, महात्माजी शांतपणे अविरत कसे कार्यमग्न असतात, हे त्यांच्याजवळ बसल्यानेच कळेल.

थोरांच्या संगतीत क्षणभर राहिले तरी संस्कार होतो. भगवान

बुद्धांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. एकदा भगवान बुद्ध एका नगराबाहेरच्या विशाल उद्यानात उतरले होते. त्यांच्या दर्शनासाठी लहान-मोठे, स्त्री-पुरुष, राव-रंक सारे जात होते. एके दिवशी प्रातःकाळी राजा एकटाच पायी दर्शनास जात होता. तिकडून दुसरा एक श्रीमंत व्यापारीही जात होता.

त्यांना वाटेत एक माळी भेटला. माळ्याच्या हातात एक रमणीय सुगंधी कमळ होते. शरद ऋतू संपून शिशिर ऋतू सुरू झालेला होता. कमळे दुर्मिळ झाली होती. ते दुर्मिळ कमळ विकत घेऊन आपण बुद्धदेवाच्या चरणी वाहावे असे राजास व त्या सावकारास दोघांसही वाटले.

सावकार माळ्याला म्हणाला, “माळीदादा, फुलाची काय

किंमत?”

माळी म्हणाला, “चार पैसे. "

राजा म्हणाला, “मी दोन आणे देतो. मला ते दें.

सावकार म्हणाला, “माळीदादा ! मी चार आणे देतो, मला दे. राजा म्हणाला, "मी आठ आणे देतो. "

सावकार म्हणाला, “मी रुपया देतो. "

अशा रीतीने किंमत वाढू लागली. माळी मनात म्हणाला, “हे दोघे ज्या गृहस्थाला कमळ नेऊन देणार, त्याला जर ते आपणच नेऊन दिले तर आपणांस अधिक किंमत मिळेल.” अशा विचाराने तो माळी त्या दोघांस म्हणाला, "मी कोणासच देत नाही. तुम्ही जा. " राजा व सावकार निघाले. त्यांच्या पाठोपाठ तो माळीही निघाला. भगवान बुद्ध एका शिलाखंडावर बसले होते. हजारो लोक उपदेश ऐकत होते. राजाने वंदन केले व निमूटपणे दूर जाऊन बसला. सावकाराने प्रणाम केला व तो • जाऊन बसला. त्याच्या पाठोपाठ तो माळीही होताच. भगवान बुद्धांच्या पायांवर ते कमळ ठेवून तो ही नम्रपणे दूर जाऊन बसला.

भगवान बुद्धांना पाहताच पैशाचे स्वार्थी विचार माळ्याच्या मनात उभे राहिले नाहीत. त्या पवित्र मूर्तीसमोर पवित्र विचारांनीच त्याचे हृदय भरून आले. त्या वातावरणात स्वार्थी विचार क्षणभरही जगू शकत नव्हते.

एक क्षणभर भेटीचा जर इतका परिणाम, तर तपेच्या तपे अशा महात्म्याच्या संगतीत दवडली तर जीवनाचे सोने का होणार नाही? संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितींत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.

आपले गढूळ जीवन अशा सदगुरूच्या सहवासात निर्मळ होऊ लागते. पटले जातात, प्रकाश येतो. प्रत्यक्ष प्रायोगिक शिक्षण प्रत्येक क्षणाक्षणाला मिळते. सद्गुरूच्या श्वासोच्छ्वासाबरोबर पावित्र्य येत असते. आईबाप देह देतात, जन्म देतात. परंतु या मातीच्या देहाचे सोने कसे करावे, हे सद्गुरू शिकवितो. भौतिक शास्त्रांतील गुरू मातीची माणके बनवितील. परंतु सद्गुरु जीवनाच्या मातीची माणिक मोती बनवितो, पशूचा मनुष्य करतो. वैचारिक जन्म देतो, सत्यसृष्टीत देतो. अशा सद्गुरूचे उतराई कसे होणार? ज्याने माकडाचे माणूस केले, पशूंचे पशुपती होण्याची हाती किल्ली दिली, त्या सद्गुरूचे ऋण कसे फिटणार? त्याचे कोणत्या शब्दांनी स्तवन करू? त्याला किती वानू, किती मानू, किती वाखाणू?

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

सद्गुरूचे वर्णन करावयास वाणी तोकडी पडते. गुरू म्हणजे देव, महादेव. गुरू म्हणजेच सर्व काही.
आपणाकडेच सद्गुरूंची परंपरा सांगण्याचा प्रघात आहे. सर्वांचा आदिगुरु म्हणजेच कैलासराणा शिव चंद्रमौळी, निर्मल, धवल अशा उंच कैलासावर राहणारा, शीलाचा चंद्र मिरवणारा, ज्ञानगंगा मस्तकी धारण करणारा, सर्पांना निर्विष करून फुलांच्या हाराप्रमाणे अंगावर खेळविणारा, सर्वस्वाचा त्याग करून विभूतींचे वैभव मानणारा, जगासाठी स्वतः हालाहल पिणारा, भुते-प्रेते- पिशाचे अशा पापयोनींनाही प्रेमाने जवळ घेऊन त्यांना मांगल्याचा पथ दाखविणारा, वैराग्याचा तृतीय नेत्र उघडा ठेवून वासनांचे भस्म करणारा, असा हा पशुपती मृत्युंजय शिव सर्वांचा आदिगुरु. त्याच्यापासून सर्वांची ज्ञानपरंपरा.

जनकाचा याज्ञवल्क्य गुरू, जनक शुक्राचार्यांचा गुरु, निवृत्तींचा शिष्य ज्ञानदेव, रामानंदांचे शिष्य कबीर, असे हे संबंध शब्दांनी वर्णन करता येणार नाहीत. जीवन स्वच्छ, शुद्ध, शांत व्हावे अशी जोपर्यंत तळमळ माणसास राहील तोपर्यंत हे संबंधही जगात राहतील. हे संबंध भारतातच नाही, तर जगातही राहतील. ते राहण्यातच जगाचे कल्याण आहे.

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा