shabd-logo

अहिंसा

6 June 2023

12 पाहिले 12
‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारतीय हवा म्हणजे अहिंसेची हवा. भारतात जो श्वासोच्छ्वास करू लागेल, त्याच्या जीवनात हळूहळू हे अहिंसा तत्त्व शिरल्याशिवाय राहणार नाही.

परंतु या ‘अहिंसा परमो धर्मः' तत्त्वाची महती भारतास एकाएकी कळली असे नाही. फार मोठी तपश्चर्या या तत्त्वाच्या पाठीमागे आहे. मोठमोठे प्रयोग या गोष्टीसाठी झाले. वेदकाळापासून तो आजपर्यंत भारतीय संस्कृतीतील सोनेरी सूत्र म्हणजे अहिंसा हे होय. या सूत्राभोवती भारतातील धार्मिक, राजकीय, सामाजिक चळवळी गुंफिलेल्या आहेत. भारतवर्षाचा इतिहास म्हणजे एक प्रकारे अहिंसेच्या प्रयोगाचा इतिहास.

मनुष्यप्राणी हळूहूळू उत्क्रान्त होत आला आहे. मुंगीच्या पावलाने मानवजातीची प्रगती होत असते. भारतातील अहिंसेचा इतिहास पाहावयास लागू तर ही प्रगती कशी आस्ते आस्ते होत आली, ते आपणांस दिसून येईल.

अहिंसा या शब्दाचा अर्थ आज कितीतरी व्यापक झाला आहे. शब्दाने कोणाचे मन दुखविणे हीही हिंसा आज आपण मानतो. विचाराने, आचाराने, उच्चाराने कोणाचेही अकल्याण न चिंतणे, हा आजच्या अहिंसेचा अर्थ आहे.

प्राचीन काळीपासून मुख्यतः दोन गोष्टींसाठी हिंसा होत आली आहे: भक्षणासाठी व रक्षणासाठी मनुष्य खाण्यासाठी हिंसा करतो व स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून हिंसा करतो. तिसरेही एक कारण हिंसेसाठी असे, ते म्हणजे यज्ञ. परंतु या यज्ञीय हिंसेचाही भक्षणातच अंतर्भाव होतो. कारण मनुष्य जे खातो तेच देवाला देतो. यज्ञ म्हणजे देवांना आहुती देणे, हा मूळ अर्थ होता. आपल्यासाठी ऊन, पाऊस, फुले-फळे सर्व काही देणारे जे देव, त्यांना आपणही काही दिले पाहिजे, यातून यज्ञकल्पना निघाली. मग देवांना काय द्यावयाचे हा प्रश्न उत्पन्न झाला. साहजिकच जे आपल्याला आवडते ते देवाला द्यावे असे ठरले. आपल्याला मांस आवडते, तर देवालाही तेच द्या, असा धर्म झाला. म्हणून यज्ञीय हिंसा हीसुद्धा मनुष्याच्या भक्षणातून निर्माण झाली असावी असे वाटते.

अत्यंत प्राचीन काळी माणूस माणसासही खात असे. माणसांचे मांस सर्वांना चांगले असे त्यास वाटत असे. ज्या वेळेस माणूस माणसास खाई, त्या वेळेस देवासही माणसाचाच बळी देण्याची चाल असेल, यात शंका नाही. राजेंद्रलाल सारख्या पंडितांनी भारतवर्षात प्राचीन काळी नरमेधही होता असे लिहिले आहे.

परंतु विचारवंत मनुष्य विचार करू लागला. त्याला लाज वाटू लागली. आपल्यासारखीच सुखदुःखे असणारा हा जो मनुष्य, त्याला आपण कसे मारावे, कसे भाजून खावे, असा त्यांच्या मनात विचार आला आणि नरमांस खाण्याचे काही विचारी माणसांनी बंद केले. परंतु समाजातील सवयी एकदम जात नसतात. कोणीही नवीन विचार समाजाला दिला तर त्याचा छळ होतो. त्याची टर उडविण्यात येते. प्राचीन काळीही असेच झाले असेल.

मांस खा, पण निदान नरमांस तरी खाऊ नका, असे हे पहिले अहिंसेचे आचार्य आपल्या समाजास सांगू लागले. नरमांस भक्षावयाचे नाही अशा आणाशपथा लोक घेऊ लागले. परंतु ज्यांना ही चटक होती, त्यांना हे पाहवेना. नवीन व्रते घेणाऱ्यांना ते मुद्दाम नरमांस फसवून खावयास घालीत. वसिष्ठ ऋषी व कल्माषपाद राजा यांची अशीच गोष्ट आहे. वसिष्ठादी काही ऋषींना तेथे मुद्दाम फसवून नरमांस वाढण्यात आले. मागून ही गोष्ट कळल्यावर वसिष्ठाने त्या राजास शाप दिला.

वसिष्ठ नरमांस खाणारा आहे, उगीच बढाया मारतो, असेही काही म्हणत. नवव्रत घेणाऱ्या वसिष्ठांस अर्थात याचे वाईट वाटे. खादी वापरण्याचे व्रत असणाऱ्या व्यक्तीस जर कोणी म्हटले, 'अहो, तुम्ही चोरून विलायती वापरता, माहीत आहे!” तर त्याला कसे वाटेल बरे? वसिष्ठांची अशीच तगमग होत असेल. ऋग्वेदात एके ठिकाणी वसिष्ठ म्हणतात,

"अद्य मुरीय यदि यातुधानोऽस्मि"

" मी जर यातुधान असेन, तर या क्षणी माझे प्राण जावोत.” यातुधान म्हणजे राक्षस. यातुधान म्हणजे विशेषतः नरमांस भक्षण करणारे राक्षस, असाच अर्थ असावा.

अशा रीतीने समाजाचा छळ सोसून मानवाला विकासाकडे वसिष्ठादी विचारवंत नेत होते. नरमेध बंद पडले. हळूहळू नरमांसभक्षणही बंद झाले. परंतु मांसाशन थोडेच सुटले होते? पशुमांसभक्षण सुरू होतेच. वाटेल त्या पशूंचे मांस खात असत. परंतु त्यातही चवी असतातच. गायीचाही त्या वेळेस वध होत असे. गोमांस खाण्यात येत असे. परंतु ऋग्वेदातच गायीचा वध करू नका, गायीचा महान महिमा ओळखा, असे सांगणारे महर्षी दिसतात. गायीच्या महिम्याच्या सुंदर ऋचा ऋग्वेदातच कुठे कुठे आहेत.

माता रुद्राणां दुहिता वसूनां । स्वसाऽऽदित्यानां

अमृतस्य नाभिः ॥

“अरे, ही गाय रुद्रदेवांची माता आहे; वसुदेवाची दुहिता आहे; ही आदित्याची बहीण आहे; ही अमृताची झरी आहे." असे दिव्य, भव्य वर्णन प्रतिभावान ऋषी करीत आहे. त्याच सूक्तात 'निरपराधी गायीला वधू नका' असा स्पष्ट आदेश ऋषी देत आहे.

वेदातच गाय वाचविण्याचे जरी प्रयत्न दिसले तरी गाय म्हणताच गोपालकृष्ण डोळ्यांसमोर उभा राहतो. गायीची खरी थोरवी भगवान श्रीकृष्णांनीच भारत वासीयांस पटविली. या कृषिप्रधान देशाला गायी मारून कसे चालेल? गाय दूधही देते व शेतीला बैलही देते. अशा रीतीने दुहेरी फायदा आहे. नर व मादी दोहोंचा जेथे उपयोग नाही, तेथे एकाला मारावेच लागते. कारण नराचे काय करावयाचे ते समजत नाही. कोंबडी मारणार नाहीत, परंतु कोंबड्याचे काय करावयाचे? उत्पत्तीसाठी एक कोंबडा पुरे. बकरी मारणार नाहीत, परंतु बकऱ्याचे काय करावयाचे? शेळी मारणार नाहीत, परंतु बोकडाचे काय करावयाने? म्हैस पाळतील, परंतु रेड्याचे काय करावयाचे?

गायच असा एक प्राणी आहे, जी दुधासाठीही उपयोगी आहे व जिचे पुत्र बैल शेतीसाठी उपयोगी आहेत. मनुष्य तोच प्राणी, तोच पशू अहिंसेशिवाय पाळू शकेल, ज्यातील नर-मादींचा दोहोंचा उपयोग करून घेऊ शकेल. उपयोगाशिवाय आपण कोणासही पाळू शकणार नाही. मानवाचे ते सामर्थ्य नाही. जे काही काम करीत नाहीत, जे काही मिळवीत नाहीत अशा माणसांचाही जर घरात बोजा वाटतो, तर रिकामटेकडे पशू आणखी कोण बाळगणार?

गाय, बैल, मांजर, कुत्रा वगैरे प्राणी उपयोगी म्हणून माणसाने पाळले आहेत. श्रीकृष्णाने गायीचा अत्यंत उपयोग ओळखला. गोकुळात वाढलेल्या या कृष्णाला गायीचा महिमा कळला. मोठेपणी सर्वत्र गायीचा महिमा तो वर्णू लागला. 'गवळट कृष्ण' अशी त्याची थट्टा होऊ लागली. कृष्णही अभिमानाने म्हणू लागला, “होय. मी नुसता कृष्ण नाही. मी गोपालकृष्ण. गोपाळ हे माझे दूषण नसून भूषणच आहे. चक्रवर्ती श्रीकृष्ण म्हणून मिरवण्याची मला इच्छा नाही; गोपालकृष्ण या नावानेच माझी ओळख जगाला व्हावी अशी माझी इच्छा आहे.”

गाय म्हणझे देवता मानली जाऊ लागली. तिच्या रक्षणासाठी राजे प्राण पणाला लावू लागले. दिलीपराजाने गायीला वाचविण्यासाठी स्वतःचा देह सिंहापुढे केला. ज्या वेळेस राष्ट्राला नवीन ध्येय द्यावयाचे असते, त्या वेळेस त्या ध्येयासाठी सर्वस्वाचे बलिदान करावे लागते. ते ध्येय म्हणजेच देव, ते ध्येय म्हणजेच भगवान. आज खादी, चरखा वगैरे गोष्टींसाठी तुरुंगात मरेपर्यंत उपवास करू पाहणारे सत्याग्रही निघाले. त्या त्या नवीन ध्येयासाठी ते ध्येय देणारा कितपत कष्ट करावयास तयार आहे, हे जनता पाहात असते. प्रत्येक ध्येयार्थीला मरणाची परीक्षा द्यावी लागते. गायीचे ध्येय देणाऱ्यांनी असेच केले. समाजाला गोसेवेचे महत्त्व पटविण्यासाठी प्राण देणारे निघाले. आज भारतवासीयांत गायीचा जो एवढा महिमा आहे, तो फुकाफुकी आलेला नाही. परंतु गायीचे दूध न पिता, तिची निगा न राखता उगीच तिची शेपटी तोंडावरून फिरविणे, तिला रस्त्यात नमस्कार करणे, म्हणजे दंभ आहे. असला यांत्रिक धर्म केव्हाही तिरस्करणीयच होय.

एकाएकी गोमांसभक्षण बंद झाले नाही. भवभूती हा थोर महाराष्ट्रीय नाटककार सहाव्या-सातव्या शतकात झाला असावा. त्याच्या उत्तररामचरित या उत्कृष्ट नाटकात वाल्मीकीच्या आश्रमात वसिष्ठ-जनक वगैरे आले. त्या वेळेस अतिथींच्या सत्कारार्थ म्हणून कालवड मारण्यात आली, असा उल्लेख आहे. त्या दाढीवाल्या ऋषीने आपली कालवड मटकावली असे आश्रमीय मुले म्हणतात. याचा अर्थ असा, की भवभूतीला आपल्या नाटकात असा उल्लेख घालण्यात संकोच वाटला नाही. कदाचित प्राचीन काळची पद्धत म्हणूत नाटककाराने तसे लिहिले असावे.

उपनिषदांतून गोमांसभक्षणाचे उल्लेख आहेत. याज्ञवल्क्यासारखा तत्त्वज्ञानी गोमांस गोड लागते असे म्हणताना आढळतो. परंतु उपनिषदांतच मांसाशन बरे नाही, असे उल्लेख आढळतात. ओदनमहिमा सुधारक ऋषी वाढवू लागले होते.

ओदनमुद्नुवते परमेष्ठी वा एषः हे ओदन म्हणजे परमेश्वराचे स्वरूप आहे असे म्हणतात, असे हा

मंत्रद्रष्टा सांगत आहे. आणि हा मंत्र विशेषतः जेवावयाच्या वेळेस म्हणावयाचा आहे, हे लक्षात ठेविले पाहिजे.

आहाराचा विचारांवर परिणाम होतो, असे काही म्हणू लागले. “आहारशुद्धे सत्त्वशुद्धिः” अशी तत्त्वे रूढ होऊ लागली. निरनिराळे खाण्याचे प्रयोग होऊ लागले. 'नुसते मांसाशन करून बुद्धी चांगली होत नाही. ओदन व मांस या दोहोंच्या सेवनाने बुद्धी तेजस्वी होते' असे कोणी म्हणू लागले. अशा रीतीने हळूहळू मांसाशनाकडून जनता वनस्पत्याहाराकडे अधिकाधिक वळू लागली.

जी नवी दीक्षा द्यावयाची, जे नवीन व्रत द्यावयाचे, तेच अत्यंत उत्कटपणे सांगावयाचे हा नेहमीचा ध्येयवादी पुरुषांचा नियम येथेही दिसतो. ओदन म्हणझे देव, ओदन म्हणजे परमेष्ठी ओदन श्री देईल, सर्व काही देईल; असे मंत्रातून सांगण्यात येऊ लागले. गायीच्या दुधातुपाचाही याच वेळेस महिमा वाढविण्यात येऊ लागला. मांसानेच आयुष्य वाढेल असे नाही; हे तूप म्हणजेच आयुष्य, हे तूप म्हणजेच सर्व काही. तूप खा. देवांना तूपच आवडते.

आयुर्वै घृतम्

अशी ब्रीदवाक्ये फडकू लागली. घृताचा व ओदनाचा महिमा अशा रीतीने हे मांसाशननिवर्तक वाढवीत होते.

माणसाचे नरमांस सुटले, गोमांस सुटले, परंतु इतर मांसे सुटली नाहीत. गायीचा महिमा कळला, परंतु बोकडाचे मांस का खाऊ नये, कोकराचे मांस का खाऊ नये, हे माणसाला समजेना! शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या त्याला पाळाव्या लागत. दुधासाठी, लोकरीसाठी, त्या पाळण्यात येत; परंतु बोकड, बकरे यांची वास्त काय लावायची? मनुष्य त्यांना खाऊ लागला. त्यांचे हवी देऊ लागला. देवांना त्यांचे बळी मिळू लागले; ज्याप्रमाणे बकरे, बोकड तसेच हरणांचे. हिंदुस्थानात हरणांचे मोठेमोठे कळप आजही दिसतात. प्राचीन काळी हिंदुस्थान हरणांनी गजबजलेले असेल. कृषी करू पाहणाऱ्या समाजाला हरणांपासून त्रास होत असेल. मांसाशन कमी कमी होऊन मनुष्य कृषीकडे अधिक लक्ष देऊ लागला; परंतु जिकडे तिकडे हरणांचे कळप . शेती नीट होईना. हरणांना मारणे हा राजाचा धर्म झाला. शेतीचे रक्षण करणे हा राजधर्म होता. राजे मृगयेला निघत. मृगया म्हणजे गंमत नव्हती! लीलेने खेळ म्हणून हरणाचे कोवळे प्राण घेणे हा त्यात हेतू नव्हता. मृगया ही नृपाची लीला नसून त्याचा धर्म होता. शेती सांभाळण्यासाठी हा कठोर धर्म पाळावा लागे. राजाने ते मृगयेतील मांसच खावे असाही दंडक होता. जिभेसाठी आणखी हिंसा त्याने करू नये; हे हरणाचे मांसच त्याने पवित्र मानावे, तेच भक्षावे.

हरणे मारली जात याचे दयावंतांना वाईट वाटे. परंतु अपूर्ण मनुष्याचा इलाज नव्हता. आश्रमातून मुद्दाम हरणे थोडी सांभाळली जात. ऋषींचे आश्रम म्हणताच हरणे डोळ्यांसमोर येतात. शाकुंतलातील हरणावरचे प्रेम डोळ्यांत पाणी आणते. राजेलोक लाखो हरणे शेतीसाठी मारीत. त्या हरणांच्या कातड्यांना पवित्र मानण्यात आले. आपल्या शेतीसाठी हरणे मारावी लागली; त्या हरणाचे कातडे आपण बसायला घेऊ. जानव्यात त्याच्या कातड्याचा तुकडा घालू. हरणाला मारावे, परंतु ही मारल्यानंतरची कृतज्ञता होती. अपूर्ण मानवाची ही हृदयातील भावना होती.

विचारप्रसार चाललाच होता. मांसाशननिवृत्तीचे प्रयोग होतच होते. मांस एकदम तुम्हांला सुटणार नाही हे खरे; पण मधूनमधून खात जा, असे सुधारक सांगू लागले. “रोज बोकड, बकरे- कोकरे नका मारू. यज्ञात मारले तरी चालेल. यज्ञाच्या वेळेस हजारो लोक येतात. मेजवानी होते. त्या वेळेस हवे तर खा मांस.” असे ऋषि सांगत. परंतु लोकांना काय, पडत्या फळाची आज्ञा । “यज्ञात मांस खाल्ले तरी चालेल" असे म्हणताच दररोज यज्ञ होऊ लागले! बारा- बारा वर्षे चालणारे यज्ञ निर्माण करण्यात आले! खाण्यासाठी कशा युक्त्या शोधण्यात येऊ लागल्या! जिकडे तिकडे यज्ञ होऊ लागले, आणि ते पुन्हा देवासाठी!

आणि भारताचे महान भूषण भगवान बुद्ध जन्माला आले. श्रीकृष्णाने गाय वाचविली. बुद्ध भगवान कोकराला वाचवू लागले. धर्माच्या नावाखाली तरी पशुहत्या करू नका असे त्यांचे सांगणे असे. “अशा बलिदानाने स्वर्ग कसा मिळेल? मग आपल्या भावांचाच बळी द्या. म्हणजे फार मोठा स्वर्ग मिळेल. स्वतःचाच बळी द्या." असे ते सांगत. ज्या यज्ञात शेकडो कोकरांचे हनन व्हावयाचे होते, त्या ठिकाणी कारुण्यसिंधू बुद्ध जाऊन उभे राहिले. एक लंगडे कोकरू त्यांच्या खांद्यावर होते. प्रेममूर्ती बुद्धांनी राजाचे मन वळविले व ते हनन बंद केले बुद्धांनी यज्ञीय हिंसा जरी बंद केली, तरी मांसाशन सुटले नाही. कारण दुधासाठी, खतासाठी शेळ्या-बकऱ्या माणूस पाळतो. परंतु बोकड व बकरे हे काही शेतीच्या कामाला येत नाहीत. त्यांना पोसणे म्हणजे जड काम. ते पोसणे काही मोबदला देत नाही. यामुळे त्यांना मारतो व खातो. शेळ्या व बकऱ्या पाळणे सोडून दिले पाहिजे, किंवा बकरे-बोकड यांजकडून काही उपयोगी काम करून घेण्याची युक्ती शोधली पाहिजे. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाहीत. तोपर्यंत बकरे बोकड कापले जाणार व खाल्ले जाणार हे उघड आहे..

वेदांतील ऋषी, श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, श्रीमत् महावीर यांच्या दिव्य कार्यामुळे अहिंसेचा महिमा अपार वाढला. मांसाशनाची माणसास लाज वाटू लागली. मांसाशन हे भूषण आहे असे वाटेनासे झाले. खाण्यासाठी पशू मारावयाचाच असेल तर तो गाजावाजा करून, सोहळा करून तरी निदान मारू नका. माणसास हे शोभत नाही. नवीन पिढीच्या, मुलाबाळांच्या देखत देखत तरी नका मारू. बोकड मारावयाचा असेल तर

'असंदर्शने ग्रामात्

'गावापासून दूर, कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी मारा', असे सूत्रकार सांगू लागले.

यज्ञीय हिंसा बंद होऊ लागली. परंतु यज्ञात बोकड हा पाहिजेच अशी काहींची भावना होती. ऋषी म्हणू लागले, “पिठाचा बोकड करा व मारा.” “पिष्टमयी आकृतिः कृत्वा” अशी सूत्रे रचिली जाऊ लागली. यज्ञाच्या वेळेस पौष्टिक सातूच्या पिठाचे बोकड बनविण्यात येऊ लागले व त्या पिष्टमय आकृतींचे भाग यज्ञात हविले जाऊ लागले.

श्रावणी करताना आपण सातूच्या पिठाच्या गोळ्या खातो. हा त्या प्राचीन मांसाशननिवृत्तीच्या प्रयोगातील भाग आहे. पौष्टिक मांसाशनाऐवजी कोणते पौष्टिक अन्न देता येईल याचा विचार सुरु झाला. गाईचे तूप खा, सातूचे पीठ खा, तसेच देवांनाही यज्ञात द्या, असे प्रयोग करणारे सांगू लागले. लाखो; कोट्यवधी लोकांना मांसाशनापासून परावृत्त करणे ही सोपी गोष्ट नव्हती. लोकांचे समाधान करणे कठीण होते. देवाला बोकडच पाहिजे असा हट्ट धरणाऱ्या आडमुठ्यास 'पिठाचा बोकड कर, बोकड असला म्हणजे झाले' असे कसे तरी बाबापुता करून समजावून सांगण्यात आले. काही बुद्धिमान प्रयोग करणाऱ्यांनी देवाला नारळ द्यावा अशी उपाययोजना सुचविली. नारळ म्हणजे विश्वामित्राच्या सृष्टीतील मनुष्य. कदाचित नरमेध करणाऱ्या लोकांना परावृत्त करण्यासाठी विश्वामित्र वगैरे लोकांनी नारळाचा मनुष्यबळी द्या असे लोकांना सुचविले असेल. “ही पाहा नारळाची शेंडी, हे पाहा नारळाचे डोळे” असे अडाणी लोकांना समजावून सांगण्यात आले असेल. माणसाचे मुंडके कापून ते त्याच्या केसांनी हातात धरून त्यातील रक्ताचा देवावर अभिषेक करावयाचा, ते मुंडके देवासमोर टांगून ठेवावयाचे, बाकीचे धड भाजून खावयाचे, असा प्रघात असावा. देवापुढे नारळ फोडण्यात अगदी असेच सारे आहे. नारळाला शेंडी नसेल तर तो नारळ फोडण्यास योग्य नसतो. नारळ फोडावयाचा, त्यातील पाणी देवावर उडवावयाचे, एक कवटी देवापुढे ठेवावयाची; कोठे कोठे देवीसमोर नारळाची एक करवंटी टांगण्यात येते. उरलेली फोडून वाटण्यात येते. नारळ पौष्टिकही आहे. हे नारळाचे बलिदान ज्याने शोधून काढले, त्या कल्पनेची धन्य होय! नारळाच्या बलिदानाने नरमेध बंद झाले असतील.

देवांना शेंदूर लावावयाचा, याच्या मुळाशीही हिंसाबंदीप्रयोग आहे. ज्याचा बळी द्यावयाचा, त्याच्या रक्ताने देवाला लाल स्नान घालावयाचे. हजारो बलिदाने होत असतील व देव लाल होऊन जात असेल. नारळाच्या पाण्याने देव थोडाच लाल होणार? म्हणून देवाला लाल रंग देण्यात येऊ लागला. देवावर रक्ताचा अभिषेक करून त्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावीत. आता देवाच्या अंगच्या शेंदराये बोट भक्त कपाळाला लावतात! आपण भोजनपंक्तीत अद्याप लाल गंध ठेविले आहे. ते लाल गंध म्हणजे यज्ञीय बलिदानातील रक्ताची आठवण आहे. ती अद्याप आपण विसरू इच्छीत नाही! रक्ताचा विसर मानवाला पडेल तो सुदिन !

मांसाशननिवृत्तीचा हा प्रयोग अशा रीतीने चालत आलेला आहे. त्याच्यासाठी नवीन नवीन कल्पना मांडाव्या लागल्या. बहुजन समाजाला चुचकारून वळवावे लागले, मनाच्या कल्पनेचाही विकास झाला. त्रिसुपर्णाच्या मंत्रात तर

"आत्मा यजमानः, श्रद्धा पत्नी, मन्युः पशुः"

अशी भव्य कल्पना यज्ञाची मांडली आहे. त्रिसुपर्णाचा ऋषी म्हणतो, “अरे, बोकड काय बळी देता? तुमचे नाना विकार हेच पशू आहेत. या वासनाविकारांचे बळी द्या."

तुकारामांच्या एका अभंगात आहे:

एकसरें केला नेम । देवा दिले क्रोधकाम
हे कामक्रोधरूपी पशू सारखे थैमान घालीत आहेत. आपण त्यांना बांधू व कापू त्यांच्या मुंड्या. देवाला हे बलिदान सर्वांत आवडेल. आपणाला कोकराचे मांस आवडते, म्हणून देवाला कोकरू देऊ लागलो. आपण मधुदधिदुग्धघृत यांचे भक्त होताच देवाला पंचामृत मिळू लागले. जे आपणांस आवडते ते आपण देवाला देतो. परंतु आपणाला सर्वांत आवडणारी जर कोणती गोष्ट असेल, तर आपल्या वासना. आपण आपल्या वासनांचे गुलाम असतो. वासनांचा त्याग करवत नाही. अशा ज्या या अनंत वासना, त्यांचेच बलिदान कर. देऊन टाक हे विकार देवाला. या मन्युपशूचे हनन कर, हवन कर, म्हणजे मोक्ष दूर नाही !

निरनिराळे प्रयोग, यज्ञाच्या या भव्य उत्क्रान्त कल्पना, सतत प्रचार, इत्यादींमुळे व विभूतींच्या जीवनमात्राबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीत प्रकट झालेल्या अपार प्रेमामुळे भारतवर्षात मांसाशननिवृत्ती झपाट्याने होऊ लागली. हिंदुस्थानभर वैष्णवधर्माची जी प्रचंड लाट तेराव्या-चौदाव्या शतकापासून उठली, तिनेही हेच काम पुढे चालविले. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात मांसाशन निवृत्तीवर कटाक्ष असे. वारकऱ्याच्या व्रतात मांसाशनास थारा नाही. संतांच्या प्रचंड चळवळीमुळे लाखो लोक मांसाशनापासून परावृत्त झाले.

हिंदुस्थानात निरनिराळ्या जातींत रोटी-बेटीबंदी होण्याला मांसाशन-निवृत्ती हे मोठे कारण होते. ज्या जाती मांसाशन करीत, त्या जातींशी मांसाशन न करणाऱ्यांकडून रोटी-बेटी व्यवहार बंद करण्यात येई. निरनिराळ्या जातींत व त्यांच्या पुन्हा पोटजातींत जे श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे भाव आजही आहेत, त्यांच्या मुळाशी मांसाशनाचा प्रश्न आहे. ज्या जातींनी किंवा पोटजातींनी मांसाशन सोडले, त्या इतर मांसाशन करणाऱ्या जाती व पोटजाती यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागल्या. भारतीय समाजशास्त्रात मांसाशननिवृत्तीला महान स्थान आहे. मांसाशननिवृत्तीच्या चळवळीमुळे उलथापालथी झाल्या आहेत.

आजही आपण अशा गोष्टी पाहतो. खादी वापरणारा मनुष्य खादीवाल्याशीच सोयरीक जोडील. आपण नेहमी समान आचारविचार पाहात असतो. ज्यांचा आहार, आचारविचार समान, त्यांची जात एक. आज खादी वापरणारे, ग्रामोद्योगी वस्तू वापरणारे, यांची एक नवीनच जात होत आहे. त्यांच्या परस्परांशी सोयरिकी होत आहेत. नवीन ध्येय आले की नवीन जात निर्माण होते. त्या ध्येयाचे उपासक परस्परांच्या जवळजवळ येतात. त्यांचे संबंध वाढतात. वाढलेल्या संबंधाने जात वाढते, म्हणजे ते ध्येयच वाढते.

भक्षणहिंसा कमी करण्याचा प्रयोग भारतात झाला, त्याचप्रमाणे रक्षणार्थ हिंसाही कमी करण्याचे प्रयोग भारतीय संस्कृतीने केले; व धन्यतेची गोष्ट आहे की आजही तसे प्रयोग भारतात होत आहेत.

माणसाने माणसास खाऊ नये आणि माणसाने माणसास मारु नये हा माणुसकीचा पहिला धडा आहे. आज माणूस माणसास प्रत्यक्ष फारसा खात नाही, ही गोष्ट खरी. अजूनही पृथ्वीच्या पाठीवर नरमांसभक्षक जाती क्वचित कोठे आहेत. सुधारलेला मनुष्य त्यांना रानटी म्हणून संबोधितो, परंतु सुधारलेला मनुष्य मनुष्यास जाळून- भाजून खात नसला तरी खाण्याने अप्रत्यक्ष मार्ग त्याने शोधून काढले आहेत! रक्तशोषणाचे अन्नप्रकार सुधारलेल्या मानवाने प्रसृत केले आहेत! शस्त्रास्त्रसंपन्न होऊन दुर्बळांना गुलाम करावयाचे, त्यांची आर्थिक पिळवणूक करावयाची, आणि अशा सुधारलेल्या रीतीने जळूप्रमाणे त्यांचे रक्त प्यावयाचे, असा प्रकार इतिहासात रूढ झाला आहे!

अशा रीतीने दुसरा आपणांस जर गुलाम करावयास आला तर आपण काय करावयाचे? स्वसंरक्षणार्थ कोणता उपाय? स्वसंरक्षणार्थ हिंसेचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु काही लोकांना असे वाटू लागले, की अशी हिंसा करणे वाईट. निदान आपल्या हातून तरी अशी हिंसा होऊ नये. हिंसा करावयाची, तर काही लोकांनी ती करावी. त्यात त्यांनाच निष्णात होऊ द्यावे. ब्राह्मण क्षत्रियांना म्हणाले, “आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही अहिंसेचे व्रत घेतो. आमच्यावर जर कोणी हल्ला केला, तर तुम्ही आमचे संरक्षण करा.” परंतु हा विचार बरोबर नव्हता. विश्वामित्राने आपल्या यज्ञरक्षणार्थं राम-लक्ष्मणास बोलाविले. स्वतः विश्वामित्राने त्यांना धनुर्विद्या शिकविली. विश्वामित्र ब्रह्मर्षी झाला होता. तो राम-लक्ष्मणांस म्हणाला, “ राक्षस माझ्या यज्ञावर हल्ला करतील. तुम्ही त्या राक्षसांचा वध करा. मी तुम्हांला धनुर्विद्या शिकवितो. या विद्येने तुम्ही अजिंक्य व्हाल व राक्षसांचा सहज निःपात कराल.”

विश्वामित्र धनुर्विद्यावेत्ता होता; परंतु त्याने अहिंसेचा वसा घेतला. स्वतःचे संरक्षण व्हावे अशी तर इच्छा! तेव्हा परभारे राम- लक्ष्मणांकडून राक्षसांचा निःपात करण्याने त्याने ठरविले. आणि हिंसेचे साधनही त्या राजकुमारांच्या हातात त्याने दिले; अशाने त्या हिंसेची जबाबदारी त्या विश्वामित्रावर नव्हती का येत? राम-लक्ष्णमांपेक्षा त्यांना हिंसेचे साधन देऊन हिंसा करावयास शिकविणारा विश्वामित्रच अधिक हिंसक ठरतो. अहिंसेचे लटपटीने पदरात पडत नसते. पुण्य अशा

एखादा मनुष्य विंचू पाहताच दुसऱ्याला हाक मारतो. त्याच्या हातात चप्पल देतो. त्याला विंचू दाखवतो आणि म्हणतो, “मार, मार लौकर! पळेल, जाईल-" अशा माणसाला अहिंसेचे पुण्य कसे लागणार? त्याचप्रमाणे विश्वामित्रासारख्यांची स्थिती. केवळ क्षत्रियांवरच हिंसेचे कर्म सोपविल्यामुळे ते भयंकर हिंसक झाले. ते बलवान झाले. शत्रू नसेल तेव्हा ते प्रजेलाच छळू लागले! परशुरामाला हे सहन झाले नाही. हे माजलेले क्षत्रिय नाहीसे करावे असे त्याला वाटू लागले. हिंसेचे थैमान घालणाऱ्या क्षत्रियांचा संपूर्णपणे निःपात करावा असे त्याने निश्चित केले. हातात धनुष्यबाण व खांद्यावर कुऱ्हाड घेऊन तो क्षत्रियांना निपटीत चालला. क्षत्रियांचा तो कर्दनकाळ झाला. पुन:पुन्हा क्षत्रियांची छाटणी त्याने चालविली. बियालाही काणी क्षत्रिय उरू नये असे त्याला वाटत होते. एकवीस वेळा त्याने पृथ्वी निःक्षत्रिय केली; परंतु पुन्हा क्षत्रिय उगवतच!

शस्त्राने शस्त्र बंद करता येत नाही. तलवारीने तलवार दूर होणार नाही. युद्धाने युद्ध बंद होणार नाही. परशुरामाचा प्रयोग अपयशी झाला. सर्वांना पुनःपुन्हा मारीत सुटण्याच्या अभ्यासाने स्वतः परशुरामच एक भयंकर क्षत्रिय झाला ! तो ब्राह्मणांना क्षत्रिय बनवू लागला. स्वतःजवळची शस्त्रविद्या ब्राह्मणांस शिकविण्याचे त्याने ठरविले. ब्राह्मणांशिवाय कोणासही मी शस्त्रविद्या शिकविणार नाही असे त्याने घोषित केले. भीष्माला त्याने आधी ही विद्या दिली होती. कर्ण त्याच्याजवळ चोरून शिकला. परशुरामापासून शेकडो क्षत्रिय या प्रकारे तयार झाले. हिंसेने अहिंसा निर्माण करणाऱ्या परशुरामाने अधिक हिंसक निर्माण केले.

परशुरामाचा हेतू चांगला होता; परंतु त्याचा मार्ग चुकला. त्याचा प्रयोग सिद्धीस गेला नाही. ययातीच्या प्रयोगाप्रमाणेच हाही एक मोठा प्रयोग होता, भोग भोगून भोगून ययाती विरक्त होऊ पाहात होता. जगात वीस वर्षे हिंसाकाण्ड माजवून अहिंसा स्थापण्याचा प्रयोग परशुराम करू पाहात होता; परंतु जगात जे पेरू तेच उगवेल. हिंसेला अहिंसेची फळे कशी लागणार?

हिंसेने हिंसा संपणार नाही, युद्धाने युद्ध थांबणार नाही. असे जर असेल तर या युद्धातच जितकी कमी हिंसा करता येईल तितकी करावी असे ठरले. युद्ध टळत नाही; परंतु इतके तरी करू या: लहान मुलांना मारू नये. स्त्रियांवर हत्यार चालवू नये. वृद्ध अवध्य समजावेत. ज्याच्याजवळ शस्त्र नाही, त्याच्यावर शस्त्र उगारू नये. एकावर अनेकांनी हल्ला करू नये. दुसरा अडचणीत असता त्याच्याशी लगट करू नये. रात्री युद्ध करू नये. पदातींनी पदातींशी, रथींनी रथींशी, गदीनानी गदीनांशी लढावे. असे निरनिराळे युद्धधर्म निश्चित करण्यात आले. या सर्वांचा हेतू हिंसा कमी व्हावी, आवश्यक तेवढीच व्हावी, असा होता. या हिंसेतही अहिंसेची आठवण माणसाने ठेविली होती.

विश्वामित्र परभारे हिंसा करून अहिंसेचे पुण्य जोडू पाहात होता. परशुराम स्वतः हिंसक बनून अहिंसा स्थापू पाहात होता. हे दोन्ही प्रयोग चुकीचे होते. परंतु विचारी मनुष्य स्वस्थ बसला नाही. हिंसेवर उपाय शोधून काढणे जरूरच होते. हिंसेने हिंसा शमत नाही हे पाहिल्यावर स्वतः अहिंसक होऊन हिंसेला तोंड देण्याचे महात्माजींनी ठरविले. स्वतःच्या जीवनात हा अहिंसेचा प्रयोग हळूहळू त्यांनी सुरू केला. मुलाला मारून मुलगा सुधारतो, की त्याला न मारता प्रेमाने समजावून दिल्याने तो सुधारतो ? चाबकाने घोडा ताब्यात येतो, की त्याला वेळेवर चंदी दिल्याने, त्याचा खरारा केल्याने ताब्यात येतो? क्षमेचे सामर्थ्य अधिक की शस्त्राचे बळ अधिक? प्रेम बलवान की प्रहार बलवान ?

संत या गोष्टींचा प्रयोग करू लागले. स्वतःच्या वैयक्तिक, मर्यादित जीवनात या प्रयोगाचा त्यांनी अवलंब केला. प्रेमाचीच शक्ती अपार आहे असा त्यांना अनुभव आला. बंगालमध्ये चैतन्य म्हणून थोर संत होऊन गेले. एके दिवशी चैतन्य आपल्या शिष्यांसमवेत नामसंकीर्तन करीत रस्त्याने जात होते. टाळमृदंगाचा घोष सुरू होता. सारे रंगले होते.

"हरि बोल हरि बोल । भवसिंधु पार चल ।" असा गजर गगनात जात होता. इतक्यात दोघा दुष्टांनी येऊन चैतन्यांच्या मस्तकावर प्रहार केला. भळभळ रक्त वाहू लागले. चैतन्यांचा ब्रह्मचारी शिष्य नित्यानंद त्या दुष्टांवर धावला; परंतु थोर चैतन्य म्हणाले, “निताई! त्यांनी मला मारले तरी मी त्यांना प्रेमच देणार!”

भजन सुरू होते. चैतन्य ‘हरि बोल' म्हणत होते. सारे नाचत होते. ते दोघे दुष्टही नाचू लागले! त्या भजनरंगात तेही रंगले. चैतन्यांची अहिंसा अत्यंत प्रभावी ठरली. त्या दिवसापासून ते दुष्ट दारुडे अगदी निराळे झाले. चैतन्यांचे ते एकनिष्ठ सेवक झाले.

प्रेमाने पशूही क्रूरता विसरतात. अँड्रोक्लिस व सिंह ही गोष्ट जगात सुप्रसिद्धच आहे. सेवेने, प्रेमाने क्रूर पशूही जर माणसाळतात, तर प्रेमाने मनुष्य सुधारणार नाही का?

केलेले प्रेम व्यर्थ जात नाही. समजा, चैतन्यांच्या डोक्यावर आणखी प्रहार बसते व चैतन्य मरते तर? ते मरणही सुपरिणामी झाले असते. त्या मरणाचा त्या दोघांवर काहीच परिणाम नसता का झाला? कदाचित एक मरण त्यांना सुधारावयास पुरे पडले नसते. परंतु याचा अर्थ असा नाही की ते वाया गेले. सती सिंधूचे मरण शेवटी सुधाकराचे डोळे उघडविल्याशिवाय राहिले नाही. महान व्यक्तींनी आपापल्या वैयक्तिक जीवनात हिंसेवर अहिंसेचा प्रयोग लहान मोठ्या गोष्टींत आजपर्यंत अनेकदा करून पाहिला. सर्वांनी सांगितले, की हिंसेपेक्षा अहिंसेचे सामर्थ्य अपार आहे. शिक्षणशास्त्रज्ञ शेकडो पुस्तकांत सांगत आहेत की, मुलांना छड्या मारून सुधारू पाहणे हा चुकीचा मार्ग आहे. “छडी वाजे छम् छम् विद्या येई घम् घम्” हा सिद्धान्त शास्त्रीय नाही. शिक्षणशास्त्रातील नवीन तत्त्वे सर्व जागतिक व्यवहारात आणावयास हवीत. जग ही एक शाळाच आहे. आपणांस एकमेकांस सुधारावयाचे आहे. हे काम दंडुक्यापेक्षा दुसऱ्याच मार्गाने होणे शक्य आहे.

शास्त्रज्ञ प्रथम आपल्या लहानशा खोलीत पुनःपुन्हा प्रयोग करून पाहतो आणि तो संशयातीत असा यशस्वी झाला, तर जगापुढे मांडतो. मग तो प्रयोगालयातील प्रयोग सर्व जगात रूढ होतो. कोणत्याही ज्ञानाचे असेच आहे.

संतांच्या वैयक्तीक जीवनात अहिंसेचा प्रयोग यशस्वी झाला होता. हा प्रयोग व्यक्तिगत जीवनातून समाजाच्या जीवनात आणावयाचा होता. खोलीत सिद्ध झालेले ज्ञान समाजाच्या व्यवहारात रूढ करावयाचे होते. महात्मा गांधींनी हे काम हाती घेतले. संतांच्या जीवनातील अहिंसेचा प्रयोग महात्माजींनी सार्वजनिक जीवनात आणला. वर्गावर्गांचे, जाती-जातींचे, राष्ट्रा- राष्ट्रांचे तंटे या अहिंसेच्या मार्गाने सोडवावयाचे, असे त्यांनी ठरविले.

हिंसक व्यक्तीसमोर अहिंसक संत उभा राहतो, त्याप्रमाणे हिंसक वर्गाविरुद्ध अहिंसक वर्गाने उभे राहावयाचे. हिंसक जमीनदारांविरुद्ध अहिंसक शेतकऱ्यांनी उभे राहावयाचे. हिंसा हिंसेने शमत नाही; हिंसेवर अहिंसाच पाहिजे.

अहिंसेने हिंसा जिंकल्याचे इतिहासात उदाहरण नाही, असे सांगण्यात येते. व्यक्तिगत उदाहरणे तर पुष्कळ आहेत. सामुदायिक उदाहरणे मात्र नाहीत. पूर्वीच्या इतिहासात उदाहरण नाही म्हणून पुढे होणार नाही, असे कसे म्हणावयाचे? मानवी इतिहास काही पुरा झाला नाही. पूर्वीचेच सारखे करीत बसणे हे मंदगतीचे लक्षण आहे. आज दहा हजार वर्षे जगात लढाया होत आहेत. युद्धाने युद्ध थांबवू पाहात आहेत. परंतु युद्ध थांबत नाही. १८७० मध्ये जर्मनीने फ्रान्सला लोळविले. तर त्या तहात १९१४ चे युद्ध पेरलेले होते. जर्मनीचा सूड उगविण्यासाठी फ्रान्स अधीर होते. फ्रान्सने सूड उगविला. आता पुन्हा हिटलरने फ्रान्सचा सूड पुरेपूर उगवून घेतला आहे. एका लढाईत पुढील दहा लढायांचे बीज असते.

दहा हजार वर्षांच्या या अनुभवाने माणसाने शहाणे झाले पाहिजे. हा मार्ग चुकला; दहा हजार वर्षे हिंसा हिंसेशी झगडत आहे; परंतु हिंसा कमी होत नाही; हिंसा वाढतच आहे; ती अधिकच उग्र स्वरूप धारण करीत आहे; सोडू या हा मार्ग; नवीन मार्ग घेऊ; अहिंसेने हिंसा शमते का पाहू या, अशी महात्मा गांधींनी घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत, चंपारण्यात, बार्डोलीत त्यांनी प्रयोग केले. भारतव्यापक अशीही दोन-तीन वेळा त्यांनी ही अहिंसक चळवळ करून पाहिली.

जगातील ही अपूर्व गोष्ट होती. ज्या भारतात प्राचीन काळापासून अहिंसेचे प्रयोग होत आहेत, त्याच भारतातील एका महात्म्याने भारतात हा व्यापक व अभिनव प्रयोग केला. मानवजातीच्या इतिहासात एक नवीन पान उलटले गेले. दहा हजार वर्षांनंतर एक नवीन गोष्ट मानव इतिहासात लिहिली गेली.

हा प्रयोग बाल्यावस्थेत आहे. आजपर्यंत असा प्रयोग झाला नव्हता. संकुचित लोक म्हणतात, “हा प्रयोग फसला.” त्यांना हेच उत्तर की, “आजपर्यंत युद्धाच्या प्रयोगास दहा हजार वर्षे देण्यात आली. या अहिंसेच्या प्रयोगाला दहा हजार वर्षे द्या, आणि मग हा प्रयोग फसला की यशस्वी झाला ते ठरवू. साठ-सत्तर हजार लोक सहा महिने तुरुंगात बसून हा प्रयोग अजमावायचा नसतो; आणि या साठ-सत्तर हजारांतीलही 'केव्हा आम्ही सुटू' अशी चिंता बाळगणारेच पुष्कळ ! शस्त्रास्त्रांच्या युद्धात पन्नास-पन्नास लाख सैन्य आठ-आठ कोटी लोकसंख्येची राष्ट्रे उभारतात. त्याप्रमाणे या अहिंसक युद्धातही पस्तीस कोटी लोकांतून दोन-अडीच कोटी लोक जेव्हा मरावयास उभे राहतील, तेव्हाच या प्रयोगाची कदाचित सफलता वा विफलता दिसेल.” "

हिंसेच्या प्रयोगाला दहा-दहा हजार वर्षे मानवजात देते आणि अहिंसेच्या प्रयोगाला म्हणे मुदत सहा महिने; आणि सैन्य ? सहा महिने तुरुंगात जाणारे पन्नास-साठ हजार लोक! आणि तेवढ्यावरून हा प्रयोग फसला असे म्हणावयाचे? वाहवा रे बुद्धी !

ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रांच्या युद्धात दहा-दहा, वीस-वीस वर्षे शिकलेले, कसलेले सैनिक असतात, त्याप्रमाणे या अहिंसक सेनेतही अहिंसेची शिकवण दहा-दहा, वीस-वीस वर्षे ज्यांनी अंगी बानविण्याची खटपट केली आहे, असे लोक लागतात. असे नवे सैनिक निर्माण करण्याचा आरंभ महात्माजींनी केला आहे. जगातील एक प्रयोग ते करीत आहेत. हा प्रयोग जगात पुढे-मागे वाढत जाईल. असले प्रयोग मरत नसतात. असलेच प्रयोग मानवजातीला पुढे नेत असतात. हेच तारक प्रयोग होत.

अहिंसा म्हणजे नेभळेपणा व दुबळेपणा नाही. पळून जाणे म्हणजे अहिंसा नव्हे. शत्रूसमोर निःशस्त्र उभे राहता येत नसेल, तर त्याच्यावर घाव घालण्याच्या तयारीने उभे राहा; परंतु पळून जाणे हे सर्वस्वी त्याज्य व निंद्य होय, ही गोष्ट महात्माजींनी शंभरदा सांगितली आहे. “ शस्त्रांनी स्वराज्य घेता येत असेल तर घ्या. मी दूर उभा राहीन. परंतु गुलाम राहू नका. शस्त्रांनी लढता येत नसेल, तर माझ्या निःशस्त्र लढ्यात या. स्वातंत्र्याचा लढा चालविलाच पाहिजे. दास्यात तसेच खितपत पडणे मानवाला शोभत नाही” असे ते म्हणतात.

उद्या जगातील सारी लष्करे चुटकीसरशी नाहीशी होतील, असे महात्माजी म्हणत नाहीत. हिंदुस्थानातही लष्कर, आरमार सारे लागेल. शस्त्रास्त्रांची बंदी उठवावी, अशी दहा मागण्यांतील त्यांची एक मागणी होती. जगाचे आजचे स्वरूप ते ओळखतात. परंतु जगात नवीन आरंभ कोणी तरी केला पाहिजे. संतांचे काम वाढीस लावले पाहिजे, अहिंसेचे प्रयोग पुढे नेले पाहिजेत. भारतीय पूर्वजांचे हे थोर प्रयोग महात्माजी पुढे चालवीत आहेत. त्यांची केवळ थट्टा करणे हे हृदय व बुद्धी असलेल्या माणसास शोभत नाही.

भक्षणातील हिंसा व रक्षणातील हिंसा दोन्हीमध्ये महात्माजी आपल्या पूर्वजांचे अहिंसेचे प्रयोग पुढे नेत आहेत. दूध पिणे म्हणजेही एक प्रकारे मांसाशनच आहे. दूध हा वनस्पत्याहार नाही. दूध ही प्राणिज वस्तू आहे. अहिंसेचे मांसाशनवर्जनाचे व्रत चालवणाऱ्यास पुढे-मागे दूधही वर्ज्य करावे लागेल, असे विचार आज प्रकट होत आहेत. आपण देवीची लस टोचून घेतो यात हिंसा तर आहेच; गायींना अपार त्रास असतो हे तर खरेच; परंतु लस टोचणे म्हणजे काय? गायीच्या अंगातील लस आपल्या रक्तात भरून घेणे याचा अर्थ काय? आपण जिभेने गोमांस खाल्ले नाही, परंतु आपल्या शरीरातील रक्तात तर ते क्षणात गेले! विचार करून आचाराकडे पाहू लागले म्हणजे अंगावर शहारेच येतील !

याचा अर्थ असा नाही की दूध पिऊ नका, टोचून घेऊ नका. दुधाची जागा भरून काढणारा दुसरा पदार्थ मिळेपर्यंत दूध प्या, असेच अहिंसेचा उपासक म्हणेल. परंतु स्वतःच्या जीवनात तो प्रयोग करीत राहील. खाण्यापिण्याचे प्रयोग करील आणि दुधासारखी वनस्पती शोधील. देवी न टोचता देवी येणार नाही, असा एखादा उपाय शोधील.

अहिंसा अनंत आहे. महात्मे आपल्या जीवनात जेव्हा ती इतकी आणतात तेव्हा कोठे आपल्या जीवनात ती अल्पशी येते. आकाशात लाखो मेणबत्त्यांच्या शक्तीचा सूर्य जेव्हा सारखा जळत असतो, तेव्हा कोठे आपल्या अंगात ९८ अंश उष्णता जगण्यापुरती राहते.

महात्माजींसारखा अहिंसेचा उपासक आज कोण आहे? परंतु त्यांनाही आश्रमात वानर मारावे लागले. पिसाळलेली कुत्री मारावी लागली. बोरसद तालुक्यात प्लेग आला असता उंदीर मरण्याचा उपदेश कष्टाने त्यांना करावा लागला. त्या वेळेस त्यांनी जे लिहिले होते, ते किती हृदय पिळवटून लिहिले होते! “माझ्याइतकाच पिसवा - डासांना, उंदीर-घुशींना जगण्याचा अधिकार आहे. माझ्या मरणाने त्यांना जगू द्यावे असे मला वाटते, माझ्या हृदयात अनंत वेदना होत आहेत" अशा अर्थाचे ते करुण उद्गार होते!

गांधींनी पिसाळलेले कुत्रे मारले, प्लेग आणणारे उंदीर मारले, त्याच न्यायाने जी माणसे आम्हाला पिसाळलेली वाटतात, जी माणसे प्लेग आणणारी वाटतात त्यांना का मारू नये? असे कोणी कोणी प्रश्न करीत असतात.

कुत्रा मारताना गांधीचे हृदय पिळवटत होते. स्वतः मरून कुत्रा जगू द्यावा, असे त्यांच्या मनात येत होते. कुत्रा मारणे यात प्रौढी न समजता ते तो दुबळेपणा व स्वतःच्या जीवनाची आसक्ती समजत होते. तशी तुमची स्थिती आहे का ? तुम्ही तर मारण्यात प्रौढी व पुरुषार्थ मानता! तो स्वतःचा कमकुवतपणा न समजता परम धर्म समजता! मारण्याचे अंतिम तत्त्वज्ञान तयार करता ! हिंसेचा वेद बनविता !

गीतेच्या अठराव्या अध्यायात “ मारूनही मारणे होत नाही” असे सांगितले आहे; परंतु ही कोणाची स्थिती ? सर्व विश्व ज्याला आपलेसे वाटले, त्याच्या मारण्यातही जीवन आहे. आई मुलाला मारते; परंतु मूल आईच्याच ओच्यात तोंड खुपसून रडते. मारणाऱ्या आईला ते मूल सोडीत नाही. तिलाच ते बिलगते. आईचे ते मारणे, मारणे नसते.

हिंसेची तरफदारी करणाऱ्यांची हिंसा या परमोच्च स्थितीची असेल तर ती हिंसा हिंसा नसून अहिंसाच होय असे म्हणता येईल. रामाने रावणास मारले; परंतु रावण उद्धरून गेला असे आपण म्हणतो, यातील हाच भावार्थ. रामाला आपण एकदा परमेश्वर म्हटले म्हणजे त्याचे मारणे तुमचे-आमचे हिंसक मारणे न राहता ते तारक मारणे होते. ते आईच्या हातचे मारणे होते.

अर्जुनाला हिंसा करावयास श्रीकृष्णाने सांगितले. कारण त्याचा तो स्वभाव होता. ‘हिंसा म्हणजे परम धर्म' अशा रीतीने त्याने सांगितलेले नाही. आदल्या दिवसापर्यंत हिंसेच्या गप्पा मारणारा अर्जुन एका क्षणात अहिंसक कसा होणार? हिंसा-अहिंसा हा अर्जुनासमोर प्रश्न नसून आसक्ती व मोह हा प्रश्न होता. “मोह सोड' एवढेच त्याला श्रीकृष्णाचे सांगणे होते. “स्वजन आहेत म्हणून मारू नये असे तुला वाटते. दुसरे असते तर तू खुशाल त्यांचा फन्ना पाडला असतास. आकार तुला प्रिय आहेत. विशेष नामरूप प्रिय आहेत. ही आसक्ती आहे. हा मोह टाक." असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले; आणि अर्जुनही शेवटी म्हणतो, “नष्टो मोहः।”

गीतेचा हिंसा हा परम सिद्धान्त नाही. हिंसेतून हळूहळू मनुष्य पूर्ण अहिंसेकडे जाईल. अहिंसा हाच अंतिम सिद्धान्त होय. ते ध्येय गाठीपर्यंत आपला दुबळेपणा म्हणून मनुष्य हिंसा करीत राहील; परंतु 'मी हिंसा करणार' अशी जेव्हा तो ऐट मिरवू लागतो, तेव्हा मात्र मानवजातीचा अधःपात असतो.

आपण सारे घाव घालण्याचा हक्क मिळवायला अधीर असतो; परंतु प्रेम करण्याचा हक्क आधी मिळवून घ्या. आई अपार प्रेम करते, म्हणून तिला मरण्याचा अधिकार आहे.

मानवी जीवनात संपूर्ण अहिंसा शक्य नाही. संपूर्णता हे ध्येयच राहणार. ज्याप्रमाणे भूमितीत बिंदू हा प्रत्यक्षात कधी दाखविता येणार नाही, भूमितीतील रेखा प्रत्यक्षात दाखविता येणार नाही, त्याप्रमाणेच परिपूर्ण ज्ञानी, संपूर्ण प्रेमी, प्रत्यक्ष संसारात दाखविता येणार नाही, ज्याला लांबी नाही, रुंदी नाही, असा बिंदू अगदी लहानसा आपण फळ्यावर काढतो, ध्येयभूत बिंदूच्या जवळ असलेला असलेला असा बिंदू आपण काढतो, त्याप्रमाणे ध्येयभूत पुरुषाच्या जवळ जवळ गेलेले शुक-जनकादिक आपण दाखवितो; परंतु पूर्णत्वाच्या जवळजवळ जाणे म्हणजे संपूर्ण पूर्णता नव्हे.

किती झाले तरी या मृण्मय शरीरात आपण कोंडलेले आहोत. या मातीच्या मडक्यात संपूर्ण ज्ञान मावणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मडक्यातील पाण्याचे थंडीने जर स्वच्छ शुभ्र बर्फ झाले तर ते मडके फुटते, त्याप्रमाणे स्वच्छ व शुद्ध ज्ञान या देहात न मावल्यामुळे देहाचे मडके फुटते. ही देहाची खोळ गळल्याशिवाय परिपूर्णतेची भेट नाही.

"पडलें नारायणीं मोटळें हैं"

हे देहाचे मोटळे पडल्यावरच आत्मा परमात्म्याशी मिळून जातो.

परंतु संपूर्णपणे अहिंसा शक्य नाही म्हणून ती मुळीच आचरू नये असे नाही. शक्य तितके आपण पुढे पुढे जावे. शेतीतील शेकडो, लाखो किड्यांची हिंसा आपणांस टाळता येणार नाही. हजारो जीवजंतू न कळत आपल्या पायाखाली चुरडले जात असतील, परंतु असे हे चालणारच. जे अपरिहार्य आहे ते होईल. आपले काम इतकेच की मुद्दाम हिंसा करू नये. जीवनात अधिकाधिक अहिंसा आणण्याची खटपट करावी. चालताना काळजीपूर्वक चालावे, बोलताना काळजीपूर्वक बोलावे, कोणाचे मन दुखवू नये, कोणाचे अकल्याण चिंतू नये, कोणाचा तळतळाट घेऊ नये, घरोबा असावा. प्रेम जोडावे, सहकार्य वाढवावे. पशु-पक्षी, कीड-मुंगी यांची उगीच हिंसा करू नये. अशा रीतीने रोजच्या जीवनातच आपण अहिंसा अधिकाधिक आणू या. दररोज काही लढाई नाही. प्रत्येक क्षणी पायासमोर काही साप-विंचू नाहीत. अंगावर वृक-व्याघ्र हरघडीला येत नाहीत. ते अपवादात्मक प्रसंग आहेत. अपवादात्मक प्रसंगी दुबळेपणाने, लाजेने करा हिंसेचा वाटले तर अवलंब. परंतु इतर दैनंदिन व्यवहारात, समाजात हरघडी वागताना आपण उत्तरोत्तर अधिक प्रेमळ, अधिक सहानुभूती दाखविणारे, अधिक सहकार्याला उत्सुक असे होऊ या. हे जीवन सुखमय व निर्भय असे करू या. 

भारतात प्राचीन काळी आश्रम असत. जेथे अहिंसेचा अधिकांत अधिक प्रयोग दाखविता येईल अशी ती स्थाने असत. शहरात बाग असते. त्या बागेत गेल्यावर प्रसन्न वाटते. त्याप्रमाणे आजूबाजूच्या हिंसक संसारात अहिंसेला पूजणारे व भजणारे असे पावन व प्रसन्न आश्रम त्या काळात असत. सामान्य जनता मधूनमधून तेथे जाई व प्रेम शिकून येई.

दुष्यंत इतर ठिकाणी हिंसा करीत होता; परंतु आश्रमाजवळ येऊनही जेव्हा तो हिंसा करू लागला, तेव्हा आश्रमातील मुनी म्हणाले:

" न खलु न खलु बाणः सन्निपात्योऽयमस्मिन् । मृदुनि मृगशरीरे पुष्पराशाविवाग्निः ।। "

“राजा! या कोमल हरणावर नको रे नको बाण मारू." एकीकडे आकर्ण धनुष्य ओढणारा राजा दुष्यंत व एकीकडे त्या हरणांना अभय देणारे ते तपोधन! एकीकडे हिंसेत रमणारा राजस राजा व दुसरीकडे प्रेमाची पूजा करणारा सात्त्विक ऋषी ! राजाचे धनुष्य नमले. त्याचे हृदय विरघळले. आश्रमाने त्याच्यावर अहिंसेचा संस्कार केला.

विक्रमोर्वशीयम् नाटकात पुरुरवस राजाचा मुलगा आयू हा ऋषीच्या आश्रमात अध्ययनार्थ ठेवण्यात आलेला असतो; परंतु एके दिवशी आयू हिंसा करतो. एका सुंदर पक्ष्याला तो बाण मारतो. त्या कोवळ्या पंखात तो प्रखर बाण घुसतो. ऋषीला ही गोष्ट कळते. आश्रमात हिंसा ही गोष्ट त्याला सहन होत नाही. आश्रमाचे पवित्र व प्रेमळ वातावरण भंगणारा आश्रमात नको असे ऋषीला वाटते. त्या मुलांच्या धात्रीला तो सांगतो:

आश्रममिरुद्धमनेन आचरितम् ।
 निर्यातय हस्तन्यासम् ॥

आश्रमाच्या प्रणालीविरुद्ध याने वर्तन केले आहे, याला परत पाठवा, असे हे ठायी ठायी असणारे आश्रम भारतीय संस्कृती वाढवीत होते. या आश्रमांत प्रयोग होत होते. साप, मुंगुस, हरिण, सिंह, एके ठिकाणी प्रेमाने नांदविण्याचे प्रयोग होत होते; आणि सर्प-सिंहांनाही आश्रमात प्रेम दिले जाते आहे, त्या प्रेमामुळे सर्प- सिंहही प्रेमळ होत आहेत, असे दिव्य दृश्य आश्रमाला भेट देणारे बघत, तेव्हा ते गहिवरून जात! सर्प-सिंह दूर राहिले, आपण आपल्या शेजारच्या लोकांजवळ तरी प्रेमाने वागू या, समाजात तरी सहकार्याने, आनंदाने नांदू या; घरात तरी गोड राहू या, नांदू या असे ते मनाशी ठरवीत. आश्रमाच्या दर्शनाने प्रेमाचा धडा शिकून ते संसारात जात व संसार सुंदर करण्याचा प्रयत्न करीत.

आजही भारतवर्षात भारतीय संस्कृतीस उजाळा देणारे आश्रम आहेत. वर्ध्याच्या आश्रमात सापांना कोणी मारीत नाही. त्यांना धरून दूर सोडून देण्यात येते. विंचवांच्या नांग्या धरून त्यांना दूर सोडण्यात येते. एका गावात कॉलरा आला असताना त्या गावातील लोकांनी एक बोकड जिवंत पुरून देवीला बळी द्यावा असे ठरविले. देवीच्या मंदिरासमोर खोल खळगा खणण्यात आला, तिकडून बोकडाच्या बलिदानाची मिरवणूक आली. परंतु लोक येतात तो त्यांना रामनामाची धून ऐकू आली. वर्ध्याच्या आश्रमातील एक सत्याग्रही त्या खळग्यात उभा होता. रामरायाचे भजन त्याने चालविले होते. लोक म्हणाले, 'बाहेर या."

तो नम्रपणे म्हणाला, “बोकडाला पुरून कॉलरा जाणार असेल तर मलाच पुरा. माणसाला पुरल्याने देवी अधिकच प्रसन्न होईल आणि कायमचा कॉलरा जाईल. "

भगवान बुद्धांच्या आत्म्याला हे विसाव्या शतकातील दृश्य पाहून केवढे समाधान झाले असेल! त्या सत्याग्रहीचा विजय झाला.

प्रेमाचा विजय झाला. ज्ञानाचा विजय झाला! अहिंसेचा, प्रेमाचा पंथ दाखविणारे हे नवे आश्रम भारतवर्षाची

आशा आहेत. हे प्रेम भारतीय संसारात आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संसार सहानुभूतीचा व सहकार्याचा झाल्याशिवाय राहणार नाही.

जगात एकीकडे तोफा ओतल्या जात असताना भारतात प्रेमाचे प्रयोग होत आहेत. सरहद्दीवरचे झुंजार पठाण अहिंसेचे उपासक होत आहेत. शूर शिखांनी अनत्याचारी सत्याग्रह केले. आश्रमातून सर्प-विंचवांनाही प्रेम मिळत आहे. हजारो-लाखो लोक अहिंसेच्या झेंड्याखाली हिंसेसमोर उभे राहात आहेत. भारतातील हा देखावा पाहून देवांचेही डोळे भरून आले असतील ! या भारतभूमीतील या अहिंसेच्या कथा ऐकावयास, अहिंसेच्या या महान प्रयोगांची हकीकत ऐकावयास भगवंताचेही कान उत्सुक असतील!

धन्य ही 'अहिंसा परमो धर्मः' सांगणारी भारतीय संस्कृती ! धन्य ही प्राचीन ध्येयपरंपरा पुढे नेणारे आजचे विश्ववंद्य महात्माजी!

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा