वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत प्रकरणात आपण वर्ण म्हणजे काय, यासंबंधी थोडेसे विवेचन करू. आपापल्या वर्णाप्रमाणे प्रत्येकाने वागावे असे आपणांस सांगण्यात येत असते. परंतु वर्णाप्रमाणे वागणे म्हणजे काय? ब्राह्मणाने ब्राह्मणधर्माप्रमाणे वागावे, क्षत्रियाने क्षात्रधर्माप्रमाणे वागावे, वैश्याने वैश्यधर्मानुसार व शूद्राने शूद्रवृत्त्यनुसार वागावे, असे याचे स्पष्टीकरण करण्यात येत असते.
या सर्व बोलण्या-सांगण्यात एक वस्तू गृहीत धरलेली असते, की आई-बापांचेच सारे गुणधर्म मुलांत उतरत असतात. परंतु प्रत्यक्ष संसारात अनुभव तर तसा येत नाही. आईबापांच्याच आवडीनिवडी अपत्यांत आलेल्या असतात असे नाही. मायबापांपेक्षा अत्यंत भिन्न वृत्तीची मुले आपणांस दिसून येत असतात. हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद येतो.
परंतु आईबापांचे गुणधर्म उतरत नसले तरी मुले लहानपणापासून जे सभोवती पाहतील, त्याचाच ठसा त्यांच्या जीवनावर उमटल्याशिवाय राहणार नाही. त्या वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होईल. कीर्तनकाराचा मुलगा लहानपणापासून घरात कविता, आख्याने वगैरे ऐकेल. गाणाऱ्याचा मुलगा गाणे, तंबोरा, तबला, पेटी यांच्या संगतीत वाढेल. विणकराचा मुलगा हातमाग, पांजणी, ताणाबाणा, धोटा यांच्याशी परिचित असेल. शेतकऱ्यांच्या मुलाला नांगर, वखर, पाभर, पेरणी, निंदणी, खुरपणी, मोट, नाडा यांचा सराव असेल. सैन्यातील शिलेदाराचा मुलगा घोड्यावर बसेल, भाला फेकील, तलवार खेळवील. वाण्याचा मुलगा तराजू तोलील, मालाचे भाव सांगेल, पुडी नीट बांधून देईल, जमाखर्च राखील. चित्रकाराचा मुलगा रंगाशी रमेल. चर्मकाराचा मुलगा चामड्याशी खेळेल. अशा प्रकारे त्या त्या मुलाच्या भोवती जे वातावरण असेल, त्या वातावरणाचा तो बनेल.
मनुष्य केवळ परिस्थितीचा गोळा आहे का ? सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम होतो हे खरे; परंतु मुळात काही असेल तर त्याच्यावर परिणाम होईल. बीजच नसेल तर कितीही पाणी ओतले म्हणून का अंकुर वर येणार आहे? मुळात बीज हवे. आत जन्मतःच काहीतरी पाहिजे.
आईबापांचे गुणधर्म मुलांत येतात. वातावरणामुळे आईबापांचा वर्ण मुलांच्या जीवनाचा असणे शक्य व संभवनीय दिसते, असे प्राचीन काळात मानले गेले. परंतु त्या वेळच्या प्रयोगाप्रमाणे व संशोधनाप्रमाणे तसे ठरविले गेले. म्हणून आजही तसेच मानले पाहिजे असे नाही. आज शास्त्रे वाढली आहेत. जास्त शास्त्रीय दृष्टीने वर्णचिकित्सा आज करता येणे शक्य आहे.
ज्यानेत्याने आपल्या वर्णाप्रमाणे वागावे, हा सिद्धान्त त्रिकालाबाधित आहे. आपण वर्ण चार कल्पिले. परंतु हे फार व्यापक तऱ्हेने कल्पिले. ज्ञानाची उपासना करणारा ब्राह्मणवर्ण; परंतु ज्ञान शेकडो प्रकारचे आहे. अनंत वेद आहेत. वाढत्या काळाप्रमाणे ज्ञान वाढत आहे. मानसशास्त्र, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, पुनर्जन्मशास्त्र, सृष्टिशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रसायनशास्त्र, वातावरणशास्त्र, विद्युच्छास्त्र, संगीतशास्त्र, शारीरशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, उद्भिज्जशास्त्र, अशी शेकडो शास्त्रे आहेत. ज्ञानाची उपासना करणे हा एक वर्ण झाला. परंतु या एका वर्णाची ही शेकडो अंगे आहेत.
तसेच क्षत्रिय वर्णाचे. विमानयुद्ध, नाविकयुद्ध, जलयुद्ध, वातयुद्ध, शेकडो प्रकारची युद्धे अस्तित्वात येत आहेत.
वैश्यवर्ण-कृषिगोरक्षवाणिज्य म्हणजे वैश्यकर्म. परंतु प्रत्येकात शेकडो भाग आहेत. कोणी अफू पेरील, तरी कोणी तंबाखू लावील; कोणी कपाशी पेरील, तर कोणी भुईमूग. कोणी संत्री लावील तर कोणी द्राक्षे लावील. ज्याप्रमाणे शेतीचे शेकडो प्रकार, त्याप्रमाणे वाणिज्याचेही शेकडो प्रकार. हा कापसाचा व्यापारी, हा धान्याचा व्यापारी, हा तुपाचा व्यापारी, हा तेलाचा व्यापारी, हा गिरणीवाला, हा लोखंडवाला, असे शेकडो प्रकार आहेत.
आणि धंदे हजारो प्रकारचे. त्यामुळे हजारो ठिकाणी मजुरी करणारे शूद्रही हजारो कामांत पडतील.
या चार वर्णांत हजारो प्रकार सामावतात. या हजारो प्रकारांतील कोणती गोष्ट मुलाने उचलावी? मुलाने कोणत्या वर्णातील कोणता भाग पूजावा?
वर्ण या शब्दाचा अर्थ रंग असा आहे. आपण म्हणतो की, आकाशाचा वर्ण निळा आहे. मराठीत वर्ण या शब्दापासून वाण हा शब्द आला आहे. “गुण नाही पण वाण लागला" अशी जी म्हण आहे, त्या म्हणीतील वाण शब्दाचा अर्थ रंग हाच आहे. मी अमक्या वर्णाचा आहे, याचा अर्थ मी अमक्या रंगाचा आहे.
देवाने कोणता रंग देऊन मला पाठविले आहे? कोणते गुणधर्म
देऊन मला पाठविले आहे? कुहू करणे हा कोकिळाचा जीवनरंग आहे. मधुर सुगंध देणे गुलाबाचा जीवनधर्म आहे. माझ्यातून कोणता रंग, कोणता गंध बाहेर पडणार? कोणत्या रंगाचा विकास मला करावयाचा आहे?
मुलांच्या गुणधर्माचे परीक्षण केल्याशिवाय हे कसे कळणार? कोणता रंग घेऊन बालक जन्मले आहे, याचे शास्त्रीय संशोधन करावयास हवे. स्मृतींतून असे सांगितले आहे की, आपण जन्मताना सारे एकाच वर्णाचे असतो. आपणांस आधी वर्ण नसतो. वर्ण नसतो म्हणजे काय? वर्ण असतो; परंतु तो अस्पष्ट असतो, अप्रकट असतो. आठ वर्षांचे होईपर्यंत आपण वर्णहीनच असतो. वर्ण कळला म्हणजे उपनयन करावयाचे. वर्ण कळल्याशिवाय उपनयन तरी कसे करावयाचे हा प्रश्नच आहे.
आठ-दहा वर्षांचा मुलगा होईपर्यंत त्याचे गुणधर्म आपणांस कळू लागतात. एखाद्याला वाचनाचीच आवड दिसते. एखादा गातच बसतो. एखादा वाजवीत बसतो. एखादा घड्याळ जोडीत बसतो. एखादा फुलझाडांशी खेळतो. एखादा कुस्ती, मारामारी करतो. एखादा पक्ष्यांना गोफणी मारतो. मुलांच्या भिन्नभिन्न प्रवृत्ती दिसून येतात. मुलांचे भिन्नभिन्न गुणधर्म दिसून येतात.
स्वतंत्र देशांत निरनिराळ्या प्रकारचे शिक्षणप्रयोग होत असतात. मुलांचे वर्णशोधन करण्याचा प्रयत्न होत असतो. एखाद्या दिवाणखान्यात शेकडो वस्तू ठेवतात. तेथे रंग असतात, वाद्ये असतात, यंत्रे असतात, पुस्तके असतात; तेथे बाहेर घोडे असतात, फुले असतात, धान्ये पेरलेली असतात, सायकली असतात; कोणत्या वस्तूबरोबर मुलगा रमतो हे शिक्षकाने पाहावयाचे असते. ही बालफुलपाखरे तेथे सोडून द्यावयाची. हिंडत, फिरत, गुंगत ती कोठे अधिक काळ रमतात ते नमूद करून ठेवावयाचे. पुष्कळ दिवसांच्या निरीक्षणाने त्या मुलाच्या आवडीनिवडी शिक्षकास कळण्याचा संभव असतो. तो शिक्षक मग पालकांस कळवील की, तुमचा मुलगा चित्रकार होईल असे वाटते. तुमचा मुलगा उत्कृष्ट माळी होईल असे दिसते. यांत्रिक संशोधनाची बुद्धी तुमच्या मुलाची दिसते. मुलाचे गुणधर्म कळल्यावर त्या गुणाचा जेथे विकास होईल, तेथे त्याला पाठविणे हे पालकाचे व शिक्षणखात्याचे कर्तव्य ठरते.
उपनयन म्हणजे गुरूजवळ नेणे. कोणत्या गुरूजवळ न्यावयाचे? मुलाच्या विशिष्ट वर्णाचा विकास करू शकणाऱ्या गुरूजवळ न्यावयाचे. संगीताची आवड असणाऱ्या मुलाला आकडेमोड करणाऱ्या शिक्षकाकडे नेऊन काय फायदा ? तो त्या मुलाची संगीताची वृत्ती गुदमरवून टाकील. बाल-कोकिळाचा गळा दाबला जाईल. तो त्या मुलाच्या आत्म्याचा वधच होय.
ज्या राष्ट्रात, ज्या राज्यपद्धतीत व्यक्तीच्या वर्णाचे शास्त्रीय संशोधन होऊन त्याच्या वर्णाच्या विकासाला पूर्णपणे अवसर असतो, त्या वर्णविकासाच्या मार्गातील साऱ्या अडचणी दूर करण्यात येत असतात, ते राष्ट्र परम थोर होय. तेथील राज्यपद्धती खरी आदर्शभूत समजली पाहिजे.
परंतु स्वराज्य आल्याशिवाय हे कसे शक्य होईल? स्वराज्य यासाठी पाहिजे. व्यक्तीच्या विकासासाठी स्वराज्य पाहिजे. व्यक्तीचे ईश्वरी देणे वाढीस लागावे, यासाठी स्वराज्य पाहिजे. जोपर्यंत स्वराज्य नाही तोपर्यंत खरा वर्ण नाही. नामधारी वर्ण तोपर्यंत दिसतील. परंतु व्यक्तींच्या गुणधर्मांचे शास्त्रीय परीक्षण- निरीक्षण होणार नाही. विकासातील अडथळे दूर होणार नाहीत.
आज शाळेतील शिक्षकास कोणते अनुभव येतात? निरनिराळ्या गुणधर्मांच्या मुलांची आज कत्तल होत आहे. सर्वांना सदैव एकच शिक्षण. वर्ण-विकासास आज अवसर नाही. दारिद्र्यामुळे आज कोणत्याही मुलाला स्वतःच्या आवडीचे शिक्षण घेता येत नाही.
एखादया श्रीमंताला स्वतःच्या वर्णाप्रमाणे वागता येईल. परंतु सर्वांना ते शक्य आहे का? लोकमान्य टिळकांचा कोणता वर्ण होता? तत्त्वज्ञानात रमावें, गणितशास्त्रात डुंबावे हा त्यांच्या आत्म्याचा धर्म होता. कदाचित त्यांना त्या गुणधर्माचा विकास करणे शक्य झाले असते. परंतु त्यांच्या डोळ्यांना दिसले की, लाखो जीवानां आपल्या गुणधर्मांचा विकास करून घेणे या सर्वभक्षक पारतंत्र्यात शक्य नाही. म्हणून ते म्हणाले, “सर्वांच्या विकासमार्गांत आड येणारे पारतंत्र्य हे आधी दूर करू या." स्वराज्यासाठी लोकमान्य गेले. राष्ट्राचा वर्ण विकास नीट व्हावा, राष्ट्रात खरा वर्णधर्म आज ना उद्या केव्हा तरी यावा; म्हणून ते अविरत श्रमले.
महात्मा गांधी एकदा असेच म्हणाले. समाजसुधारक वृत्तीचे महात्माजी, परंतु राष्ट्राच्या विकासात पारतंत्र्य हा मोठा अडथळा असल्यामुळे तो दूर करण्यासाठी ते उठले. इतिहासाचार्य राजवाडे दुःखसंतापाने म्हणत, “पदोपदी स्वराज्याची आठवण येते.” स्वराज्य असते, तर राजवाड्यांनी केवढा ज्ञानप्रांत जिंकून घेतला असता याची कल्पनाही करवत नाही.
कितीतरी कलावान, कितीतरी शास्त्रज्ञ, कितीतरी शोधक बुद्धीचे कल्पक दास्यात धुळीत पडून मरतात. पारतंत्र्यात सर्वांत मोठे नुकसान जगाचे होत असेल, तर ते हेच होय.
वर्णविकासासाठी स्वराज्य पाहिजे. परंतु कोणत्या प्रकारच्या स्वराज्यात सर्वांच्या वर्णांचा विकास होईल? जे स्वराज्य मूठभर भांडवलवाल्यांचे आहे, त्या स्वराज्यात गोरगरिबांच्या मुलांचे गुणधर्म नीट संवर्धिले जातील का? सर्वांचा वर्णविकास व्हावयास पाहिजे असेल, तर साम्यवादाशिवाय गत्यंतर नाही. साम्यवादी राज्यपद्धतीतच सर्वांचे योग्य ते उपनयन होईल.
“स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः " हा श्रीगीतेतील चरण वारंवार म्हटला जातो. या चरणातील धर्म या शब्दाचा अर्थ हिंदु- धर्म, मुसलमान-धर्म असा नाही. येथील धर्म शब्दाचा अर्थ वर्ण असा आहे. अर्जुनाची क्षत्रिय वृत्ती होती. उत्तरगोग्रहणापर्यंत हजारो शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणे उडविणे यात त्याला आनंद वाटत होता. जन्मल्यापासून हाडीमांसी खिळलेली ही क्षत्रिय वृत्ती अर्जुन मोहामुळे टाकू इच्छीत होता. तो संन्यासाच्या गप्पा मारू लागतो. भिक्षा मागून जगेन म्हणतो. परंतु हे त्याचे स्मशानवैराग्य टिकले असते का? तो रानावनांत जाता व तेथेही हरिणे - पाखरे मारू लागता व त्यांचे मांस मिटक्या मारून खाता! अर्जुनाची फजिती झाली असती. वृत्तीने, वैराग्याने, चिंतनाने खरी संन्यासभूमिका सिद्ध झाली नसताना केवळ लहर म्हणून संन्यासी होणे यात दंभ आला असता.
जी वृत्ती अद्याप आपल्या आत्म्याची झाली नाही, ती एकदम अंगीकारू पाहणे भयावहच आहे. अंतरंगी आसक्ती असलेल्याने संन्यस्त होणे, यात स्वतःचा व समाजाचा अध:पात आहे. मनात शिक्षणाची आस्था नसणाऱ्याने शाळेत शिकविणे यात स्वतःलाही समाधान नाही, व राष्ट्रातील भावी पिढीचेच अपरंपार नुकसान आहे. आपला वर्ण समाजात कमी समजण्यात येत असला, तरी त्या वर्णानुरूप समाजाची सेवा करीत राहणे यातच विकास असतो. पाण्यापेक्षा दूध जगणार नाही-
" यज्जीवन जीवन तो दुग्धीं वांचेल काय हो मीन?"
ज्या नेत्याने स्वतःच्या धर्माप्रमाणे वागावे, म्हणजे स्वतःच्या वर्णधर्माप्रमाणे वागावे, स्वतःच्या गुणधर्माप्रमाणे वागावे व समाजसेवा करावी.
संस्कृतात न्यायशास्त्रात धर्म शब्दाची व्याख्या विशिष्ट अर्थाने करण्यात येत असते. ज्याशिवाय पदार्थ असूच शकत नाही, तो धर्म होय. उदाहरणार्थ, जाळणे हा अग्नीचा धर्म होय. उष्णतेशिवाय अग्नी असूच शकत नाही. शीतलत्वाशिवाय पाणी संभवत नाही. प्रकाशण्याशिवाय सूर्याला अर्थ नाही. आपण सूर्याला जर म्हणू, “तू तपू नकोस", तर तो म्हणेल, “मी न तपणे म्हणजे मी मरणे.” आपण वाऱ्याला जर म्हणू, “तू वाहू नकोस", तर तो म्हणेल, “मी वाहू नको तर काय करू? वाहणे म्हणजेच माझे जीवन. "
धर्म शब्दाचा हा अर्थं आहे. महात्माजींना विचारा, की “तुम्ही चरखा कातू नका", तर ते म्हणतील, “मग मी जगेन कसा?" जवाहरलालांना विचारा, “पददलितांसाठी नका असे जिवाचे रान करू”; तर ते म्हणतील, “मग माझ्या श्वासोच्छ्वासाला अर्थ काय?”
ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ज्याच्यासाठी जगावे
व मरावे असे वाटते, तो आपला वर्णधर्म होय. शेतकऱ्याला म्हणा, “तू शेत पेरू नकोस, गाईगुरे पोसू नकोस, मोट हाकू नकोस" त्याला कंटाळा येईल. शिक्षकाला खऱ्या शिक्षकाला मे महिन्याची सुट्टी कंटाळवाणी वाटते. शिकविणे हाच त्याचा परमानंद असतो. वाण्याला म्हणा, 'दुकानात बसू नकोस; भाव काय आहे त्याची चौकशी करू नकोस', तर त्याला जीवनात गोडी वाटणार नाही. आपल्या आवडीचे सेवेचे कर्म म्हणजे आपला प्राण होय. त्याच्यासाठी जगावे, मरावे असे वाटत असते.
असा जो स्वतःचा वर्ण, असा जो स्वतःचा सेवाधर्म, त्याच्यासाठी आपले सारे उद्योग असावेत. त्या वर्णाचा, त्या आपण रात्रंदिवस प्रयत्न करून विकास करावा; आणि मेल्यावर देवाजवळ जाऊन म्हणावे, “देवा! हे भांडवल तू मला दिले होतेस त्याची अशी मी वाढ केली. त्या भांडवलाची वाढ करून मी समाजाला सुखी केले. समाजपुरुषाची मी पूजा केली.” देव संतोषेल व तुम्हांला हृदयाशी धरील.