shabd-logo

चार आश्रम

5 June 2023

27 पाहिले 27
सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.

मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा चार पायऱ्या सांगितल्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. संन्यास हे अंतिम ध्येय. शेवटी केवळ अनासक्त जीवन हे प्राप्तव्य. परंतु त्या ध्येयाकडे हळूहळू जाण्यासाठी पहिले तीन आश्रम आहेत. हळूहळू निर्वासन व्हावयाचे, निवृत्तकाम व्हावयाचे.

जन्मतः मनुष्य तीन ऋणे डोक्यावर घेऊन येतो, असे भारतीय संस्कृती सांगते. ऋषिऋण, पितृऋण व देवऋण. ही तीन ऋणे आपणांस फेडावयाची असतात. ब्रह्मचर्याश्रमात उत्कृष्ट ज्ञान संपादून आपण ऋषिऋण फेडतो, पुढे गृहस्थाश्रमात संतती निर्माण करून, तिचे नीट संवर्धन करून आपण पितृऋण फेडतो, आणि वानप्रस्थ व संन्यास या दोन आश्रमांच्या द्वारा सर्व समाजाची सेवा करून आपण देवऋण फेडतो. देव सर्व सृष्टीसाठी आहे. देवाचे ऋण फेडावयाचे म्हणजे आपणही सर्वांचे व्हावयाचे.

ब्रह्मचर्याश्रमात मुख्यतः ज्ञानाची उपासना. उपनयन झाल्यापासून ब्रह्मचर्याला सुरुवात होते. उपनयन म्हणजे ब्रह्मचर्यांची दीक्षा. ब्रह्मचर्य कोणत्या तरी ध्येयासाठी असते. ध्येयहीन ब्रह्मचर्य निरर्थक आहे. ध्येयहीन ब्रह्मचर्य टिकतही नाही. ज्ञानासाठी ब्रह्मचर्य. गुरूजवळे जोपर्यंत शिकत आहोत तोपर्यंत ब्रह्मचर्याची कास बळकट करून ठेविली पाहिजे.

उपनयनाच्या वेळेस सर्व ब्रह्मचर्याचाच महिमा आहे. सारी प्रतीके ब्रह्मचर्याची द्योतक आहेत. कमरेला तीनपदरी मौंजीमेखला बांधावयाची, कौपीन नेसवावयाचे, यात कोणता अर्थ आहे? कमर बळकट ठेव. तुला ज्ञान मिळवावयाचे आहे. विषयवासना मारून ठेव, तिला बांधून ठेव, लंगोटबंद गडी राहा. ब्रह्मचारी बटूला मेखला लेवविताना जे मंत्र म्हटले जातात ते मोठे सुंदर आहेतः

इयं दुरुक्तात् परिबाधमानात् शर्मं वरूथं पुनती न आगात् प्राणापानाभ्यां बलमाभरन्ती प्रिया देवानां सुभगा मेखलेयम् ॥ ऋतस्य गोप्त्री तपसः परस्पी घ्नती रक्षसः सहमाना अरातीः सा नः समन्तमनु परेहि भद्रया भर्तारस्ते मेखले मा रिषाम ॥

“ही मेखला पावन करणारी आहे. ही मेखला मला वेडेवाकडे बोलू देणार नाही. ही मेखला मला सुख देईल. प्राण आणि अपान यांच्याद्वारा सामर्थ्य देईल. ही मेखला तेजस्वी लोकांना प्रिय आहे. सत्याचे रक्षण करणारी, तपाला आधार देणारी, राक्षसांना मारणारी व शत्रूंना हाकलून देणारी अशी ही मेखला आहे. हे मेखले ! कल्याणकारक गोष्टींसह येऊन तू मला सर्व बाजूंनी वेढा दे. तुला धारण करीत असता कधीही नाश न होवो.”

ज्याची कमर कसलेली आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील? “ज्वलन्निव ब्रह्ममयेन तेजसा । " ब्रह्मचर्याच्या तेजाचा तो धगधगीत लोल असतो. सर्व अन्तर्बाह्य शत्रू त्याच्यापासून पळतील. मेखला बांधणे म्हणजे व्रतांनी बांधणे. मेखला बांधण्याच्या आधी दीक्षा देण्याचा एक विधी असतो, त्या वेळेस गुरू म्हणतो:

"मम व्रते हृदयं ते दधामि
 मम चित्तमनुचित्तं ते अस्तु 
 मम वाचमेकत्रतो जुषस्व
 बृहस्पतिष्ट्वा नियुनक्तु मह्यम्"

“हे बटो! तुझे हृदय माझ्या व्रताच्या ठिकाणी मी ठेवतो. माझ्या मनापाठोपाठ तुझे मन असो. एकनिष्ठेने, एकाग्रतेने माझे सांगणे ऐकत जा. तो बुद्धिपूजक बृहस्पती तुझी योजना माझ्याकडे करो.” गुरूचे शब्द नीट ऐकण्यासाठी व्रते पाहिजेत. एकाग्रता पाहिजे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे व्रतांचा राजा. ब्रह्मचर्यात सर्व व्रते येऊन जातात.

बटूचे हात हातात घेणारा गुरूही देवरूप मानला आहे: सविता ते हस्तमग्रभीत्

अग्निराचार्यस्तव

“बाळा ! अरे, मी नाही तुझे हात घेत; तर बुद्धीला चालना देणारा सवितादेव तुझे हात धरीत आहे. अग्नी हा तुझा आचार्य; मी नाही.” गुरु म्हणजे प्रकाश. ज्ञानप्रकाश देणाऱ्या तेजोरूप गुरूची उपासना ब्रह्मचाऱ्याने करावयाची आहे. उपनयनाच्या मंत्रात किंवा यज्ञोपवीताच्या मंत्रात सर्वत्र तेजाची उपासना आहे.

ब्रह्मचारी सर्व तेजस्वी देवतांचा आहे:

देव सवितरेष ते ब्रह्मचारी

तं गोपाय समामृत ॥

“हे सूर्यनारायणा ! हा ब्रह्मचारी तुझा आहे. त्याचे संरक्षण कर.

त्याला मरण प्राप्त न होवो.”

ब्रह्मचर्याश्रमात जाणे म्हणजे जणू पुनर्जन्म. आता संयमी व्हावयाचे. ध्येयाची उपासना सुरू करावयाचीः

युवा सुवासाः परिवीत आगात् स उ श्रेयान् भवति जायमानः

" हा तरुण ब्रह्मचारी आला. नवीन सुंदर वस्त्रे त्याने परिधान केली आहेत. त्याने यज्ञोपवीत घातले आहे, तो आता नवीन जन्म घेत आहे. तो कल्याणाकडे जात आहे.'

"तं धीरासः कवयः उन्नयन्ति स्वाथ्यो मनसा देवयन्तः ।"

"संयमी ज्ञानवंत गुरू त्याला उन्नतीप्रत नेवोत, तो तरुण अध्ययन करून. मनाने एकाग्र होऊन देवांना आवडणारा होवो, तेजस्वी होवो.”

अग्नीमध्ये समिधा होमिल्यावर जी प्रार्थना ब्रह्मचाऱ्याने म्हणावयाची, ती तेजस्वी आहे.

"मयि मेधां मयि प्रज्ञां मय्यग्निस्तेजो दधातु मयि मेधां मयि प्रज्ञां मयीन्द्र इन्द्रियं दधातु मयि मेधां मयि प्रज्ञां मयि सूर्यो भ्राजो दधातु यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम् यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम् यत्ते अग्ने हरस्तेनाहं हरस्वी भूयासम्”

“अग्नी माझ्या ठिकाणी बुद्धी, विचारशक्ती व तेज ठेवो. इंद्र माझ्या ठिकाणी बुद्धी, विचारशक्ती व सामर्थ्य ठेवो. सूर्य माझ्या ठिकाणी बुद्धी, विचारशक्ती व तेज ठेवो. हे अग्ने ! तुझ्या तेजाने मला तेजस्वी होऊ दे. तुझ्या विजयी तेजाने मला वर्चस्वी होऊ दे. सर्व खळमळ जाळून टाकणाऱ्या तुझ्या तेजाने मला खळमळ जाळून टाकणारा होऊ दे.' "

बटू मेखला व कौपीन धारण केल्यावर हातात दंड घेतो. त्या वेळेस तो मंत्र म्हणतो,

" अदान्तं दमयित्वा मां मार्गे संस्थापयन् स्वयम् ।

दण्डः करे स्थितो यस्मात्तस्माद्रक्ष यतो भयम् ।" हा दंड असंयत असलेल्या मला संयम शिकवील. हे दण्डा! कोठूनही भय येवो, त्यापासून तू माझे संरक्षण कर.

उपनयनाच्या शेवटी मेधासूक्त म्हणतात:

ॐ मेधां महामंगिरसो मेधां सप्तर्षयो दुदुः
 मेधामिंद्रश्चाग्निश्च मेधां धाता ददातु मे ॥
 मेधां मे वरुणो राजा मेधां देवी सरस्वती
 मेधां मे अश्विनौ दे वा वाधत्तां पुष्करस्रजा ।।
 या मेधा अप्सरस्सु गंधर्वेषु च यन्मनः
 दैवी या मानुषी मेधा सा मामाविशतादिह ॥
 यत्मेऽनूक्तं तद्रमतां शकेयं यदनुब्रुवे
 निशामितं नि शामये मयि श्रुतम् ॥
 सह व्रतेन भयासं ब्रह्मणा संगमेमहि
 शरीरं मे विचक्षण वाङ्गमे यधुमद् दुहे ।
 अवृद्धमहमसौ सूर्यो ब्रह्मण आणीः स्था श्रुतं मे मा प्र हासीः
मेधां देवीं मनसा रेजमानां
 गंधर्वजुष्टां प्रति नो जुषस्व
 महां मेधां वद मह्यं श्रियं वद
 मेधावी भूयासमजिरा चरिष्णुः ।।
 सदसस्पतिमद्भुतं प्रियमिन्द्रस्य काम्यस् 
 स निं मेधामयासिषं
 यां मेधां देवगणाः पितरश्चोपासते
 तया मा मेधयाऽग्ने मेधाविनं कुरु ।।
 मेधाव्यहं सुमनाः सुप्रतीकः श्रद्धामनाः सत्यमतिः
 सुशेवः
 महायशा धारयिष्णुः प्रवक्ता भूयासमस्येश्वरया
 प्रयोगे ।

“अंगिरस ऋषी व इतर सप्तर्षी, तसेच इंद्र, अग्नी व सृष्टिकर्ता हे मला बुद्धी देवोत. नीतिदेव, वरुणराजा व देवी सरस्वती मला बुद्धी देवोत. कमळांचे हार घालणारे अश्विनिदेव मला बुद्धी देवोत. जी मेधा गंधर्वलोकात आहे, देवलोकात आहे, मानवलोकात आहे, अशी ती त्रिभुवनव्यापक मेधा माझ्या बुद्धीत शिरो. जरी मी वरचेवर पठन केले नाही, तरीही जे पठन केले ते कायमचे मजजवळ राहो. जे मी शिकलो, ते वाटेल तेव्हा मला बोलता येऊ दे, जे ऐकेन ते कायमचे ऐकल्यासारखे होवो. इतर व्रतचारी लोकांप्रमाणे माझे व्रत असो. विद्वान लोकांशी माझा संबंध येऊ दे. माझी इंद्रिये जिज्ञासू असू देत. माझी वाणी मोहाचा तिरस्कार करणारी असू दे. वरवर गोड बोलणारी व मनात विष बाळगणारी नसू दे. माझा उत्साह अखंड असो. हा ज्ञानमय सूर्य माझे ज्ञान कधीही नष्ट न करो. बुद्धीत चमकणारी अशी जी ही मेधा, दिव्य लोकात असणारी ही जी मेधा, ती मला मिळो. मला मेधा द्या, तेज द्या. मला बुद्धिमान होऊ दे. हे शरीर जरी जीर्ण झाले, तरी त्यातील बुद्धी अजर अशी असो, बुद्धी सदैव तेजस्वी असो.

“सभेला जिंकून घेणारी, इंद्राला आवडणारी, अत्यंत अपूर्व अशी ही मेधा आहे. त्या मेधेसाठी मी खटपट करतो. ज्या मेधेची देव व पितर उपासना करितात, त्या मेधेने मला मेधावी करा. मी बुद्धिमान होऊ दे. सत्प्रवृत्तीचा होऊ दे. चांगल्या गोष्टींची पूजा करणारा, श्रद्धावान, सत्यनिष्ठ असा होऊ दे. मला ब्रह्मचर्याच्या तेजाने शोभणारा होऊ दे. मला कीर्तिमान होऊ दे. मला धीरव्रत होऊ दे. मला उत्कृष्ट वक्ता होऊ दे. कोणत्याही चर्चेच्या प्रसंगी माझ्या बुद्धीच्या प्रभावाने मला शोभू दे."

असे हे सुंदर मंत्र आहेत. उपनयन म्हणजे बुद्धिसंपन्न होण्यासाठी सुरू केलेले व्रत. हे जे ज्ञान मिळवावयाचे, ही जी धारणाशक्ती मिळवावयाची, ही जी अभंग स्मरणशक्ती मिळवावयाची, त्याच्यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याशिवाय एकाग्रता नाही. ब्रह्मचर्य म्हणजे सर्वेन्द्रियांची शक्ती एका ध्येयावर केन्द्रीभूत करणे. भिंगातून सूर्याचे किरण पुंजीभूत करून ज्याप्रमाणे ठिणगी पाडतात, त्याप्रमाणे सर्वत्र जाऊ पाहणाऱ्या इंद्रियांची शक्ती एके ठिकाणी आणून तिच्यातून अद्भुत तेज निर्माण करणे म्हणजे ब्रह्मचर्य.

भारतीय संस्कृतीत ब्रह्मचर्याचा अपार महिमा गाइलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मप्राप्तीसाठी जी वागणूक ठेवावयाची, ती वागणूक म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मप्राप्तीचे आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आपले ध्येय. आपणांस जे परमोच्च प्राप्तव्य वाटते, ते आपले ब्रह्म. ज्याच्यासाठी जगावे किंवा मरावे असे वाटते, ते आपले ब्रह्म.

सर्व शक्तींचा उपयोग केल्याशिवाय ध्येय प्राप्त होत नाही. ध्येय ज्या मानाने उच्च, त्या मानाने अधिकच सामर्थ्य लागणार. सर्व सामर्थ्य असूनही ध्येयापर्यंत हात पोचत नाहीत व मग आपण प्रार्थनेची कास धरतो. स्वतःचे सामर्थ्य इकडे तिकडे थोडेही खर्च होऊ न देता, सर्वच्या सर्वं ध्येयावर ओतूनही जेव्हा ध्येय दूर राहते, तेव्हाच खऱ्या प्रार्थनेचा उदय होतो.

उपनिषदांत एकेक अक्षर शिकण्यासाठी सहस्त्र वर्षे ब्रह्मचर्यपालन करून राहात, असे उल्लेख आहेत. ज्ञानाचा एक कण मिळावा यासाठी अशी तपस्या लागते.

ब्रह्मचारी तरुणाने कसे राहावे, याचे उपनिषदांत एके ठिकाणी

फार सुरेख वर्णन आहेः

“तरुणाने सत्प्रवृत्तीने असावे. दृढ अभ्यासी, आशावान, दृढ निश्चयी व सामर्थ्यसंपन्न असा तरुण असावा. ही सर्व धनधान्ययुक्त पृथ्वी त्याच्या पायाशी लोळण घेईल.”

“अशा तरुणाने नाच-तमाशे पाहू नयेत. निरनिराळ्या बैठकांना जाऊ नये. गप्पा मारीत बसू नये. त्याने एकान्तात बसून अध्ययन करावे. गुरू वेडावाकडा वागत असला तरी त्या गोष्टीचे अनुकरण करू नये. जरूर पडेल तितकेच स्त्रियांशी बोलावे. गोड स्वभावाचा, प्रेमळ, शांत, विनयी, दृढ निश्चयी निरलस, दैन्यहीन असा युवक असावा. पदोपदी त्याने संतापू नये. कोणाचा मत्सर करू नये. सांजसकाळ गुरूकडे पाणी वगैरे भरावे. रानात जाऊन मोळी आणावी आणि अध्ययन करावे.”

अशा प्रकारचा आदर्श उपनिषदांनी ठेविला होता. उपनयनाच्या वेळेसही उपदेश करताना “ स्वच्छ राहा. तू ब्रह्मचारी आहेस. दिवसा झोपू नकोस. सदैव कर्मात मग्न राहा. आचार्यांची सेवा करून ज्ञान मिळव. ज्ञानप्राप्ती होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळ", वगैरे सांगितले आहे.

ब्रह्मचर्य पाळणे ही गोष्ट सध्याच्या काळात फार कठीण होऊन बसली आहे. सभोवतालचे वातावरण फार दूषित झाले आहे. या सिनेमांनी, फोनोंनी, रेडिओंनी सर्व वातावरण दुबळे व नेभळे करून टाकले आहे. सर्वांची मने जशी पोखरली गेली आहेत. सारा लुसलुशीत व भुसभुशीत कारभार !

आपल्या मनात सर्व प्रकारच्या वासनांची बीजे आहेत; परंतु त्यांतील कोणती अंकुरित होऊ द्यावयाची आणि कोणती नाही हे ठरवावयाचे असते. जी बीजे अंकुरित व्हावयास नको असतील, त्यांना पाणी घातले नाही म्हणजे झाले. ती तशीच पडू द्यावीत. ती मरत नाहीत. ती फार चिवट असतात. परंतु अनेक जन्म जर त्यांना ओलावा न मिळाला, तर मग ती बीजे जळून जातात, मरून जातात.

डोळे हे जुलमी गडे। आग उगा लावु नका अशी पदे सारखी माझ्याभोवती ऐकू येतील तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे? मासिकांतून सारख्या स्त्रैण कथाच येतील तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे? सिनेमांतून मी सारखी चुंबने आलिंगनेच पाहीन तर माझे ब्रह्मचर्य कसे राहावे? माझ्या आजूबाजूचे सारे वातावरण मला भोगशिक्षण देत असताना, काम-वासनांना उत्तेजन देत असताना, माझे ब्रह्मचर्य कसे राहावे ?

बालवाचनालये, छात्रवाचनालये यांची आपणांस अद्याप कल्पना नाही. निरनिराळ्या विषयांस वाहिलेल्या मासिकांची आपणांस कल्पना नाही. आपल्याकडे प्रत्येक मासिकात सारे प्रकार असतात. शास्त्रास वाहिलेले, इतिहासास वाहिलेले, वाङ्मयास वाहिलेले, आरोग्यास वाहिलेले, राजकारणास वाहिलेले, शिक्षणास वाहिलेले, व्यापारास वाहिलेले, खेळास वाहिलेले, अशा रीतीची जी मासिके असतील, तीच छात्रवाचनालयांतून हवीत. परंतु अशी मासिके आहेत कोठे? निरनिराळ्या विद्यांचे अध्ययन करावयाचे आहे. या शास्त्रांत कामशास्त्रही येईल. परंतु कामशास्त्र म्हणजे चुंबन-आलिंगन-प्रकार नव्हे. मुलांना जननेंद्रियांची माहिती, त्यांची कार्ये, त्यांची निगा, त्यांची स्वच्छता, हे सारे शास्त्रीय दृष्टीने शिकवण्यास हरकत नाही. परंतु हे शास्त्रशुद्ध शिक्षण तर मिळत नाही आणि केवळ वासना उसळविणारे व लंपट करणारे शिक्षण मात्र पैसे मिळवू कथालेखकांकडून देण्यात येत आहे. हे कथालेखक म्हणतील, “आमच्या गोष्टी मुलांच्या हाती देऊ नका.” बरोबर आहे त्यांचे म्हणणे; परंतु समाजाचे तिकडे लक्ष नाही, शाळांचे नाही, ग्रंथालये-वाचनालये यांचे नाही, पालकांचे नाही. मुलांचे मन कोणते खाद्य खात आहे, इकडे कोण बघतो? जेथे देहाला कोणते खाद्य द्यावे, सडीक तांदूळ द्यावे की असडीक द्यावे, शास्त्रीय आहार कोणता याचीही चिकित्सा व काळजी नाही, तेथे मनाच्या खाद्याकडे कोण वळतो?

ब्रह्मचर्याश्रमात या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. मी काय खावे, काय ऐकावे, काय बघावे, काय वाचावे, कसे निजावे, कसे बसावे, केव्हा उठावे वगैरे सर्व गोष्टींचा विवेकपूर्वक निश्चय केला पाहिजे. मी जीभ वाटेल तशी सैल सोडली, उत्तेजक पदार्थ खाल्ले, शारीरिक श्रम करीत नसतानाही भजी -कांदे वगैरेंचा भरपूर आहार घेतला तर माझे ब्रह्मचर्य राहणार नाही. मसाले वर्ज्य केले पाहिजेत, तिखटे वर्ज्य केली पाहिजेत. शास्त्र म्हणजे थट्टा नाही. ब्रह्मचर्याचे एक शास्त्र आहे. ते पाहिजे असेल तर त्या शास्त्राप्रमाणे वागले पाहिजे. म्हणून महात्माजी नेहमी सांगतात, की ब्रह्मचर्य म्हणजे एकेन्द्रियाचा संयम नव्हे. ब्रह्मचर्य म्हणजे जीवनाचा संयम. ब्रह्मचर्य पाळणे तेव्हाच शक्य होईल, ज्या वेळेस कान, डोळे, जीभ वगैरे सर्वांचे संयमन केलेले असेल. कानांनी श्रृंगारिक गाणी ऐकणार नाही, डोळ्यांनी शृंगारचित्रे पाहणार नाही, स्त्रियांकडे रोखून पाहणार नाही, वाचन शृंगारिक कथांचे करणार नाही, मसालेदार व उत्तेजक पदार्थांचे सेवन करणार नाही, मऊ मऊ गाद्यांवर निजणार नाही, इत्यादी व्रते घेतली तरच ब्रह्मचर्यं शक्य होईल, एरव्ही नाही.

लोकमान्य टिळक परस्त्री पाहताच खाली मान घालीत. एका स्त्रीचा तीन तास बसून अर्ज लिहून देत असताना त्यांनी त्या स्त्रीकडे पाहिले नाही. लोकमान्यांच्या डोळ्यांत जसे तेज आहे तसे तेज़ जगातील कोणत्याही महापुरुषाच्या दृष्टीत मी पाहिले नाही, असे नेव्हिन्सन् म्हणाला होता. हे तेज कोठून येते? ब्रह्मचर्याने!

महात्माजींच्या दृष्टीत असेच तेज आहे. आश्रमातील मंडळी सांगतात, महात्माजींनी जरा डोळा वाकडा करून पाहिले की मेल्यासारखे होते. त्यांच्या डोळ्यांची भीती वाटते, ते डोळे जणू समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेतात. त्या दृष्टीपासून तुम्ही काही लपवू शकणार नाही, ते प्रखर किरण आत घुसल्याशिवाय राहात नाहीत.

बंगालमधील आशुतोष मुकर्जी यांच्या डोळ्यांत असेच तेज होते. कलकत्ता विद्यापीठाच्या एका बैठकीत डाक्का कॉलेजचे प्रिन्सिपॉल टर्नरसाहेब आशुतोषांच्या विरुद्ध बोलण्यासाठी उभे राहात होते. परंतु त्या टर्नरसाहेबांनी आपल्या आठवणीत लिहिले आहे: “त्या काळ्या कुळकुळीत पुरुषाने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहताच मी मटकन खुर्चीत बसलो !” (“The black man stared at me and I staggered back in my chair.")

इतिहाससंशोधक राजवाडे नेहमी घोंगडीवर झोपायचे. ते प्रथम-पत्नी पंचविसाव्या वर्षी मेली त्या वेळेपासून नैष्ठिक ब्रह्मचर्याने राहिले. म्हणूनच त्यांची धारणाशक्ती अपूर्वं होती, त्यांची बुद्धी वाटेल त्या शास्त्रात चाले. तसेच स्वामी विवेकानंद. विवेकानंदांच्या एकाग्रतेची कमाल होती. ते परिच्छेदच्या परिच्छेद एकदम वाचीत. त्यांची स्मृती अद्भुत होती. त्यांना कोणते शास्त्र समजत नसे असे नव्हते. तसेच स्वामी रामतीर्थ. ब्रह्मचर्याच्या तेजाच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य करून घेता येतात असे ते म्हणत असत.

असे हे ब्रह्मचर्याचे तेज आहे. हे तेज साऱ्या शरीरात फाकते. डोळ्यांत दिसते, वाणीत उतरते, तोंडावर फुलते. विवेकानंदांना पाहताच दृष्टी दिपून जात असे. रामतीर्थांना पाहताच प्रसन्न वाटत असे. ब्रह्मचर्याचा अपार महिमा आहे.

ज्याला आपले आयुष्य सार्थकी लावावयाचे आहे, त्याला ब्रह्मचर्याशिवाय उपाय नाही. महात्माजी १८-१८ तास न थकता काम करतात. हा उरक कोठून आला ? इच्छाशक्तीचे हे बळ आहे. लोखंडी इच्छाशक्ती महापुरुषाजवळ असते. परंतु ही इच्छाशक्ती तरी कोठून येते? वासनाजयातूनच दृढ इच्छाशक्ती येत असते.

ब्रह्मचर्य हे प्रयत्नसाध्य आहे. ते एकदम थोडेच मिळणार आहे? त्याच्या पाठीस लागले पाहिजे. पुनः पुनः व्रतच्युत होऊ, परंतु पुनः वर उठू अधिक नेटाने पुढे जाऊ. एकदा ते ध्येय मात्र ठरले पाहिजे. आपणांस अशक्य आहे असे म्हटले की ते कधीच मिळणार नाही.

मनुष्य पुष्कळ वेळा आपल्या दुर्गुणांचीच जास्त चिकित्सा करीत बसतो. कधी कधी आपल्या दुर्गुणांचे विस्मरण करणे हाच त्यांना जिंकावयाचा मार्ग असतो. मी असा वाईटच आहे, कसले ब्रह्मचर्य मला साधते, मी सुधारणार नाही, असाच रड्या मी राहणार, असे म्हणाल तर तसेच पतित राहाल. दुर्गुणांचे चिंतन करीत राहिल्याने ते अधिकच दृढ होतात. “पंचवीस दुणे पन्नास" हे मला विसरू दे असा सारखा जप केल्याने पंचवीस दुणे पन्नास आपण विसरणार तर नाहीच, परंतु उलट ते कायमचे ओठांत व डोक्यात बसतील! जागृति-स्वप्नी पंचवीस दुणे पन्नास दिसतील, जे तुम्हांला नको आहे त्याची आठवण करू नका. मी चांगला आहे, मी चांगला होणार आहे, मनाने बळकट होणार, मी पुढे जाणार, असेच म्हणत राहिले पाहिजे. भारतीय संस्कृती सत्संकल्पावर भर देते: अहं ब्रह्मास्मि, शिवः केवलोऽहम् ।

" मी ब्रह्म आहे, मी सर्वशक्तिमान आहे” असे ध्यान करीत जा अशीच कल्पना ठसवीत जा. असे म्हणत राहाल तसे होईल. आपली श्रद्धा आपल्या जीवनाला आकार देत असते.

आज राष्ट्रीय ध्येयासाठी झगडणारे लोक दिसत नाहीत. सर्वत्र निराशा, औदासीन्य, निरुत्साहता. मी ज्ञान मिळवीन, मी शरीर कमवीन, मी मोठा होईन, असे तरुणांच्या मनातच येत नाही. महत्त्वाकांक्षा सर्वत्र मेलेली. खेळात उत्साह नाही. अभ्यासात उत्साह नाही. राष्ट्र कसेतरी जगत आहे. तरुण कसेतरी वागत आहेत. ब्रह्मचर्याचा हास हे एक बलवत्तर कारण या सर्वांगीण दैन्याचे आहे.

उत्कृष्ट ब्रह्मचर्यामधूनच उत्कृष्ट गृहस्थाश्रम सिद्ध होत असतो. माझे ब्रह्मचर्य उत्कृष्ट नसेल तर माझा गृहस्थाश्रमही रडकाच व्हावयाचा. मानसिक, बौद्धिक व शारीरिक सामर्थं संपादून जर मी गृहस्थाश्रमात पडेन, तरच माझ्या गृहस्थाश्रमात तेज येईल, तरच माझा गृहस्थाश्रम सुखाचा होईल.

पतिपत्नींची शरीरसंपदा उत्कृष्ट नसेल, तर बाळसेदार मुले कशी घरात दिसणार? रोगी, चिरचिरी मुले पाहणे म्हणजे मायबापांस केवढे दुःख! लहान मुलाच्या हास्याइतके पवित्र दुसरे काय आहे?

त्या हास्यात अपार सामर्थ्य असते. त्या हास्याने कठोर हृदये मृदू होतात. त्या हास्याने दुःख एका क्षणात पळते. एकदा एका स्टेशनावर मी पुढील प्रसंग पाहिला आहे: एक माता आपला मुलगा खांद्यावर घेऊन जात होती. तिचा पती व इतर बरीच मुलेबाळे बरोबर होती. त्या मुलाचे प्रसन्न मुखकमळ पाहून तो तिकीट पाहणारा अगदी गार झाला. त्याने तिकिटे किती आहेत वगैरे विचारले नाही. तो पिता तिकिटे मोजून घ्या असे म्हणताच तो तिकीट पाहणारा म्हणाला, “असा गोड मुलगा पाहिल्यावर तिकिटे मी कशी मोजू? जा, सारेजण जा.” परंतु अशी हसरी, गोजिरवाणी मुले पतिपत्नींच्या पूर्वांश्रमींच्या दृढ ब्रह्मचर्यातूनच उत्पन्न होत असतात. ज्या जमिनीचा कस गेलेला नाही तेथे भरदार मनगटासारखी कणसे येतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या जीवनाचा कस गेलेला नाही, त्यांच्याच जीवनात अशी तजेलदार फुले फुलतात.

गृहस्थाश्रम म्हणजे सर्व समाजाचा आधार. गृहस्थाश्रम भविष्यकाळ निर्मीत असतो. गृहस्थाश्रम म्हणजे समाजाची धारणा. गृहस्थाश्रमाची थोरवी सर्वांनी गाइली आहे.

धन्यो गृहस्थाश्रमः ।

‘हा गृहस्थाश्रम धन्य आहे.' परंतु अशी धन्यता फुकाफुकी लाभत नसते. ती प्रयत्नसाध्य आहे, कष्टसाध्य आहे.

गृहस्थाश्रमात पतिपत्नींची शरीरे सुंदर, निरोगी हवीत. त्याचप्रमाणे त्यांची मनेही निरोगी हवीत. पतिपत्नींनी परस्परांशी निष्ठेने वागले पाहिजे. ज्या विवाहविधीने पति-पत्नींचे नाते निर्माण केले गेले, त्या विवाहविधीत काही काही मंत्र फारच सुंदर आहेत. वाङनिश्चयाच्या वेळेस ब्राह्मण म्हणतात:

समानी व आकूतिः समाना हृदयानि वः । समानमस्तु वो मनः यथा वः सुसहासति ।

“तुमचा हेतू एक असो. तुमची मने एक असोत. तुमची हृदये एकरूप असोत. तुमच्या सर्व संघटनांस सामर्थ्य येईल अशा रीतीने वागा.” तसेच विवाहहोमाच्या वेळेस वर म्हणतो:

धौरहं पृथ्वी त्वं सामाहमृक्त्वम्
संप्रियौ रोचिष्णु सुमनस्यमानौ जीवेव शरदः शतम्

“मी आकाश आहे, तू पृथ्वी आहेस. मी सामवेद आहे, तू ऋग्वेद आहेस. आपण एकमेकांवर प्रेम करू. एकमेकांस शोभवू, एकमेकांस आवडती होऊ. एकमेकांशी निष्कपटपणे वागून शतायुषी होऊ.” सप्तपदी वगैरे झाल्यावर जेव्हा गृहप्रवेश होत असतो, त्या वेळेस वर म्हणतो:

“हे वधू, तू सासू-सासऱ्यांवर, नणंदा-दिरांवर प्रेमाची सत्ता चालविणारी हो.”

“सर्व देव आमची हृदये मोकळी करोत. उदके आमची मने निर्मळ करोत. मातरिश्वा, विधाता व सरस्वती आमची जीवने परस्परांशी जोडोत.”

गृहप्रवेशाच्या वेळेस मंत्र म्हणतात:

“हे वधू! तू या कुळात येत आहेस. येथे संततियुक्त होऊन तुला आनंद मिळो. या घरात खऱ्या गृहिणीची कर्तव्ये तू दक्षतेने पार पाड. ह्या पतिसहवर्तमान आनंदाने राहा. तुम्ही या घरात बहुत काळ राहून सुखी झालात असे लोक म्हणू देत.”

“चाळणीने धान्य शुद्ध करून घेतात, त्याप्रमाणे या घरात शुद्ध संयमपूर्वक वाणीचा उपयोग केला जातो. म्हणून थोरामोठ्यांची या घराशी मैत्री जुळते. अशा गोड भाषा बोलणाऱ्यांच्या जिभेवर लक्ष्मी वास करते. "

विवाहसूक्तात वधूला अघोरचक्षू व शिवा, सुमना व तेजस्वी, वीरप्रसू व श्रद्धाळू अशी विशेषणे लाविलेली आहेत. अघोरचक्षू हे विशेषण वधू व वर दोघांनी ध्यानात धरण्यासारखे आहे. एकमेकांची दृष्टी प्रेमळ असू दे; भयावह, क्रूर नसू दे.

लग्न म्हणजे केवळ बाह्य लग्न नाही. हृदयाचे लग्न. मनाचे लग्न. वधूने वरास माळ घालणे, वराने वधूस माळ घालणे म्हणजे एकमेकांची निर्मळ हृदयपुष्पे एकमेकांस वाहणे हाच त्याचा अर्थ. अग्नीभोवती सात पावले चालणे म्हणजे जन्मोजन्मी बरोबर चालणे, सहकार करणे. पतिपत्नी सुखात वा दुःखात सदैव बरोबर असतील, बरोबर चढतील, बरोबर पडतील. त्यांच्याभोवती सूत गुंडाळले जात असते. पतिपत्नींचा जीवनपट आता एकत्र विणला जाणार. ताणा व बाणा एकत्र होणार. आता पृथक् काही नाही, अलग काही नाही.

देहावर प्रेम असल्याने खरे प्रेम जडत नाही. देह उद्या रोगाने कुरूप झाला तर? आपण प्रारंभ देहापासून करू. परंतु देहातीत होऊ. देहाच्या आत असलेला आत्मा ओळखून त्याची गाठ घेतली पाहिजे. मनुष्य अंगणातून ओसरीवर येतो, माजघरात येतो, मग देवघरात जातो. तसे वधूवरांनी शेवटी परस्परांच्या हृदयांतील देवघरांत शिरले पाहिजे. माझ्या फक्त देहाची पूजा करणारा पती माझा अपमान करतो असे वाटले पाहिजे. हा मातीचा गाळा म्हणजे काही आपण नाही. पतिपत्नींनी परस्परांस मातीचे गोळे, मांसाचे गोळे समजू नये. हळूहळू या मातीच्या आत जी उदात्तता आहे, जी वर जाण्याची शक्ती आहे, तिच्यावर परस्परांनी ध्यान दिले पाहिजे. पतीला पाहताच पतीतील दिव्यता पत्नीस दिसावी. पत्नीस पाहताच पतीला ती देवता वाटावी. भोग भोगता भोगता एक दिवस विरक्त व्हावयाचे. देहाच्या आत शिरून आत्मा आत्म्याशी जोडावयाचा.

दिव्याच्या काचेला आतील ज्योतीमुळे महत्त्व आहे. त्या ज्योतीचे उपासक आपण झाले पाहिजे. जोपर्यंत आत्म्याचा मोठेपणा कळत नाही तोपर्यंत खरे प्रेम नाही. पत्नीच्या आत्म्याचा मोठेपणा दिसू लागताच पती तिला ज्ञान देईल, ध्येय देईल. तिला केवळ वस्त्रालंकारांनी बाहुलीप्रमाणे नटवीत बसणार नाही. त्याप्रमाणेच ज्या दिवशी पतीमधील दिव्यता पत्नीस दिसेल, त्या दिवशी ती पतीला वाटेल तसे वागू देणार नाही; वाटेल त्या मार्गाने पैसे मिळविण्याचे काम करू देणार नाही.

गृहस्थाश्रमात याप्रमाणे पावित्र्य आणावयाचे. एकमेकांनी एकमेकांस सावध करीत कधी प्रेमाने, कधी रागाने संबोधीत वर वर जावयाचे. पतिपत्नींनी शेवटी बहीणभावाप्रमाणे व्हावयाचे. आसक्तिमय प्रेमातून शेवटी अनासक्त प्रेम निर्माण करावयाचे. चिखलातून कमळे फुलवावयाची. संसारातच मोक्षश्री आणावयाची.

भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रम हा मोक्षाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. ही पायरी आहे. तेथेच कायमचे राहावयाचे नाही. गृहस्थाश्रमात राहून संतती निर्माण करून, वासनाविकार शांत करून, नाना प्रकारचे त्यागाचे धडे शिकत शिकत, शेवटी या छोट्या संसारातून एक दिवस मोठ्या संसारात जावयाचे आहे. ही गोष्ट पतिपत्नींना विसरता कामा नये.

गृहस्थाश्रम! हाही एक आश्रमच आहे. आश्रमाचेच पावित्र्य येथेही पाहिजे. पतिपत्नी, मुलेबाळे यांचा हा आश्रम आहे. सर्वांनी सहकार्य करावयाचे, प्रेमाने नांदावयाचे. ध्येयाची पूजा करावयाची. कुलपरंपरा म्हणून काही असते. त्या कुलपरंपरेला मरू न देणे हे काम असते. रघुवंशात राम सीतेला विमानातून खालची स्थळे दाखवीत आहेत असा एक भाग आहे. एका तपोवनाकडे बोट करून राम म्हणतात, “येथे एक आदर्श ऋषी राहात असत. आल्यागेल्याचे ते मनापासून आदरातिथ्य करीत परंतु त्या ऋषीला मूलबाळ नव्हते. तो ऋषी निवर्तला. परंतु त्या ऋषीचे आदरातिथ्य व्रत तपोवनातील हे वृक्ष करीत असतात. जो कोणी येईल त्याला फुलेफळे, छाया देतात.”

अशा रीतीने कुळाची परंपरा चालवावयाची असते. माझ्या कुळात कोणी खोटे बोलणार नाही, माझ्या कुळात कोणी चोरी करणार नाही, अतिथीला नकार मिळणार नाही अशा प्रकारची विशिष्ट प्रथा त्या त्या कुळात असते.

त्या त्या कुळपरंपरेसाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागला, तरी तो करावयाचा असतो. हरिश्चंद्र सर्वस्वास मुकला. श्रियाळ- चांगुणा यांनी मुलगा अर्पण केला. कुटुंबात जणू एक देव. त्याच्यासाठी कुटुंबात सर्व मंडळी सिद्ध असत. हरिश्चंद्र निघताच तारामती त्याच्या पाठोपाठ जाते. हरिश्चंद्र-तारामती यांच्या पाठोपाठ चिमणा रोहिदास धावत जातो. त्या रोहिदासास मायबाप नको म्हणत नाहीत. “तू लहान आहेस, कशाला हालात येतोस?” असे म्हणत नाहीत. स्वतःच्या तालमीत आपल्या मुलालाही त्यांना तयार करावयाचे असते. ध्येयपूजा स्वतःच्या उदाहरणाने आपल्या मुलाबाळांना त्यांना शिकवावयाची असते.

असे गृहस्थाश्रम आज कोठे आहेत? पती तुरुंगात जाताच पत्नी पाठोपाठ निघत नाही. पत्नी निघताच पती निघत नाही. आईबाप जाताच मुले धावत नाहीत. मुले जाताच आईबाप प्रेमाने त्यांच्या मागे लागत नाहीत. एका ध्येयाची पूजा नाही. ध्येयेच विचित्र असतील तर गोष्ट निराळी. परंतु आसक्ती व भीती आड येत असतील तर मात्र हे वाईट आहे.

याचे कारण काय? याचे कारण ज्ञानचर्चा नाही. पती जे ऐकतो ते पत्नीला सांगणार नाही. राष्ट्रात जे विचार उत्पन्न झाले आहेत त्यांची घरात उजळणी होणार नाही. पती हा पत्नीचा गुरू. मुलीचे मौंजीबंधन बंद झाले. पती हाच गुरु असे ठरले. परंतु हा पती गुरूचे काम करतो का? ज्ञानदान, विचारदान करतो का? आजूबाजूच्या जगाचे ज्ञान पत्नीला करून देतो का?

पत्नी ज्वारीची भाकरी भाजून देते; पती कोणती विचाराची भाकरी तिला देतो? परंतु पतीच्या डोक्यात हा विचार येतच नाही. माझ्या पत्नीला मन आहे, बुद्धी आहे, हृदय आहे, अशी पतीला जाणीव नसते. त्यामुळे जगातील घडामोडी तो घरात बोलणार नाही. मग मुलाबाळांनाही काय कळणार? पत्नीच जेथे विचारांच्या अज्ञानात, तेथे मुलेही अज्ञानातच वाढणार.

भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रम असा नाही. ज्या ब्राह्मणावर बकासुराकडे जावयाची पाळी आली, त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटक मरावयास तयार होतो. पती म्हणतो मला मरू दे. पत्नी म्हणते मला मरू दे. मुलगी म्हणते मला मरू दे. मुलगा म्हणतो मला मरू दे. याला म्हणतात गृहस्थाश्रम. याला म्हणतात कुटुंब. एका विचाराने सारे प्रेरित आहेत. एका ध्येयाची पूजा होत आहे.

गृहस्थाश्रम म्हणजे संयमाची शाळा. गृहस्थाश्रम म्हणजे तपश्चर्या आहे. आपण आपल्या शेकडो वृत्तींना लगाम घालावयास गृहस्थाश्रमात शिकतो. मुले आजारी पडली, त्यांची शुश्रूषा करावी लागते. मुलांच्या लहरी सांभाळाव्या लागतात. पदोपदी रागावून थोडेच भागणार आहे?

गृहस्थाश्रमात आपण त्यागाचे धडे घेतो. पती पत्नीला सारे देऊ पाहतो. पत्नी पतीला सुखवू पाहते. आईबाप फाटके कपडे घालून आधी मुलांना नटवतात. दुसऱ्याचे सुख पाहणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे हे गृहस्थाश्रमाचे शिक्षण आहे.

अर्धनारीनटेश्वर हे माणसाचे ध्येय आहे. पुरुष कठोर असतो. स्त्री मृदू असते. पुरुषाने पत्नीपासून मृदुता शिकावयाची. स्त्रीने पतीपासून कठोर व्हावयास शिकावयाचे. प्रसंगी मेणाहून मऊ व वज्राहून कठोर होता आले पाहिजे. केवळ पुरुष अपूर्ण आहे, केवळ स्त्री अपूर्ण आहे. दोघांच्या गुणांच्या मीलनात पूर्णता आहे. गृहस्थाश्रम म्हणजे पति-पत्नींनी पूर्ण होण्याची शाळा; सर्वांगीण विकास करून घेण्याचे स्थान; हृदयाचे व बुद्धीचे गुण शिकण्याची जागा. उत्कृष्ट मुले तयार करून समाजाला देणे हे महत्त्वाचे काम आईबापांस करावयाचे असते. परंतु मुले चांगली व्हावीत म्हणून स्वतः चांगले राहिले पाहिजे. उच्चाराने, विचाराने, आचाराने, चांगले राहावयाचे. आपली मुले चांगली व्हावीत असे मानणाऱ्या आईबापांनी अत्यंत जागरूकतेने वागले पाहिजे. प्रेम, कर्तव्य, सहकार्य दिसली पाहिजेत, आईबापांची भांडणेच जर मुले रोज पाहतील, तर त्यांच्या जीवनावर किती अनिष्ट परिणाम होईल! आळशी व विलासी आईबाप जर समोर असतील तर मुलेही पोशाखीच होतील.

आपली मुले शरीराने बळकट, हृदयाने विशुद्ध व उदार, बुद्धीने विशाल व निर्मळ होतील असे आईबापांनी पाहिले पाहिजे. ज्या काळात आपण राहतो त्या काळाची कल्पना मुलाबाळांस दिली पाहिजे. जेवताना, हसता-खेळताना मुलांना इतिहासाचे हे सारे ज्ञान दिले पाहिजे. विसाव्या शतकातील मुलांची मने “मांजर आडवे गेले तर काम फसेल.” अशा कल्पनांनी भरून जाणार नाहीत असे केले पाहिजे. माझे एक मित्र आहेत. ते म्हणाले, “माझ्या मुलाबाळांच्या देखत असे जर कोणी बोलला तर मला चीड येते. आमच्या मनावर लहानपणी हे संस्कार झाले, परंतु आमच्या मुलांच्या मनावर तरी असले बावळट संस्कार नकोत व्हायला.” मुलांच्या मनाबद्दल किती

ही काळजी!

आपल्याला किती मुलाबाळांची जोपासना करता येईल, कितींचा विकास करता येईल हे आईबापांनी पाहिले पाहिजे. कारण पुढे वानप्रस्थाश्रम व संन्यास आहेतच. मरेपावेतो काही पाळणा खेळवावयाचा नाही आणि वानप्रस्थाश्रमात शिरताना मुले संसार स्वतः अंगावर घेण्यास योग्य झाली असली पाहिजेत. समजा, साठाव्या वर्षी वानप्रस्थाश्रम घ्यावयाचा तर त्याचा अर्थ काय? साठाव्या वर्षी माझे सर्वांत लहान मूल वीस-पंचवीस वर्षाचे असेल. त्याचे शिक्षण झालेले असेल. त्याची संपूर्ण वाढ झालेली असेल. आईबापांच्या छत्राची त्याला आता जरूर नाही. असे सर्व पाहिजे. म्हणजे चाळिसाव्या वर्षापासून पतिपत्नींनी निवृत्तकाम झाले पाहिजे. चाळीस वर्षांपर्यंतही प्रमाणाने प्रजोत्पादन केले पाहिजे. कारण चाळिसाव्या वर्षांपर्यंतही आठ-दहा मुले व्हायला काय हरकत? परंतु नुसती मुले उत्पन्न करणे हे काम नाही. त्या मुलांची आपणांस व्यवस्था लावता आली पाहिजे. त्यांचे सर्वांचे संगोपन, संरक्षण व शिक्षण करता आले पाहिजे.

आपणांस संयम न साधला, तर संततिनियमनाचे उपाय योजण्यास हरकत नसावी; परंतु माणसास संयमच साजून दिसतो.

गृहस्थाश्रमात संयम, त्याग, वासनाविकारांना आळा घालणे, प्रेम, सहकार्य, इत्यादी गुणांचे शिक्षण मिळते. आपण जरा पिकत जात असतो. उच्छृंखलपणा कमी होतो. पोक्तपणा येतो. जीवनाचा नानाविध अनुभव येतो. आंबटपणा जाऊन जीवनात मधुरता येते.

मर्यादित कुटुंबाची आपण सेवा केली. त्या मर्यादित कुटुंबात जे सेवेचे गुण आपण शिकलो, ते आता समाजात द्यावयाचे. आपण आपल्या कुटुंबाच्या बाहेर येऊन समाज हेच कुटुंब मानावयाचे. अधिक अनासक्त व्हावयाचे; अधिक व्यापक व्हावयाचे. अधिक वाढावयाचे. आत्म्याचे राज्य वृद्धिंगत करावयाचे.

वानप्रस्थ म्हणजे वनास निघालेला. भवन सोडून वनात जावयास निघालेला. हे वानप्रस्थ वनात राहात. तेथे आश्रम चालवीत. तेथे शाळा चालवीत. वानप्रस्थासारखा उत्कृष्ट शिक्षक नाही. अनुभवी, पोक्त, शांतकाम, हसतखेळत शिकविणारा असाच शिक्षक हवा; आणि वानप्रस्थाला काही फार लागतही नाही. त्याच्या पोटाला दिले म्हणजे झाले.

आज हजारो पेन्शनर आहेत. त्यांनी खरे म्हटले तर जिकडे तिकडे शाळा काढल्या पाहिजेत. शिक्षण दहा वर्षांत सर्वत्र फैलावेल. परंतु भारतीय संस्कृतीचे गोडवे गात पुण्याला बंगले बांधून नातवास खेळवीत ते बसतात! आता त्यांनी सर्वांचे नातू खेळविले पाहिजेत. त्यांना शिकविले पाहिजे. त्यासाठी सुंदर आश्रम काढून राहिले पाहिजे. आज समाजात वानप्रस्थ कोणीही नाही. कुटुंबाची मर्यादित आसक्ती सोडून समाजाची सेवा जो निःस्वार्थपणे करू लागला तो वानप्रस्थ.

आणि मग संन्सास! संन्यासात अमक्याच समाजाची सेवा हीही आसक्ती नाही! संन्याशाला हिंदू नाही, मुसलमान नाही. तो सेवाच करीत राहील. भेदातीत प्रेम देईल. जो पशुपक्षी, किडामुंगी, वृक्षवनस्पती यांचाही मित्र होणार, तो का मानवांत खंड पाडीत बसेल? संन्याशी न ओळखील महाराष्ट्रीय, न पाहील गुजराती; तो सर्वांच्या वर जाईल. या भेदांच्या चिखलातून अतीत होईल.

संन्यास म्हणजे निर्वाण. स्वतःला पूर्णपणे मालविणे. माझे कुटुंब, माझा समाज, माझी जात, माझा देश असे तेथे महत्त्व नाही. माझा मान, मला खायला, मला पैसा असला तेथे प्रकार नाही. संन्यास म्हणजे समदृष्टी. सूर्याचे किरण सर्वांसाठी, तसा संन्यास सर्वांसाठी. माझ्याकडे कोणीही येवो, त्यांच्यासाठी मी आहे.

म्हणूनच संन्याशाने एके ठिकाणी राहू नये असे सांगितले आहे. तो वाऱ्याप्रमाणे जीवन देत विचरत राहील. सूर्याप्रमाणे पावित्र्य व प्रकाश देत फिरत राहील.

अशा रीतीने या चार आश्रमांतून शेवटी केवळ निरहंकार व्हावयाचे; विश्वाकार व्हावयाचे. माझ्या आत्म्याने वाढत वाढत सर्वांना प्रेमाने मिठी मारावयाची!

आज आपल्या समाजात ब्रह्मचर्यांचा लोप झाला आहे. वानप्रस्थ व संन्यास ही नावे उरली आहेत. एक गृहस्थाश्रम उरला आहे. पण तोही रडका व निस्तेज

आज वर्णाश्रमधर्म थोडाबहुत कोठे आहे का, असे जेव्हा मी पाहू लागतो तेव्हा तो जवळजवळ कोठेच दिसत नाही. वर्णधर्म तर स्वराज्य येईल तेव्हाच त्याचा प्रयोग सुरू होणे शक्य आहे; आणि आश्रमधर्म आहेत ते प्रत्येकाच्या विवेकातून जन्माला यावयाचे आहेत. ते लादावयाचे थोडेच आहेत? वर्ण एक वेळ लादता येईल. “तुला हे काम चांगले करता येईल, हेच कर." असे सांगता येईल. परंतु वानप्रस्थ व संन्यास म्हणजे का लाल कपड्यांचे वस्त्रदान? दुःखी जीवांना आनंदमूर्ती नाव देणे म्हणजे का संन्यास? संन्यास म्हणजे धंदा नव्हे. संन्यासाची आतून प्रेरणा हवी. स्वतःच्या विकासाची इच्छा हवी. उत्तरोत्तर मी वाढत गेले पाहिजे अशी तहान हवी.

समाजाला आज सर्वत्र वानप्रस्थ व संन्यास यांची जरुरी आहे. शेकडो प्रसारक पाहिजे आहेत. शेकडो संघटना करणारे पाहिजेत. औद्योगिक, आरोग्य-विषयक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व प्रकारचे ज्ञान देणारे हजारो व्रती लोक पाहिजे आहेत. परंतु एकही मिळत नाही. समाज हे मोठे कुटुंब मानून त्या समाजात कामे करण्यासाठी लोक पाहिजे आहेत. वर्णाश्रमधर्माच्या पाट्या लावून सारे बसत आहेत! परंतु नेभळट गृहस्थाश्रमापलीकडे पाऊल तर टाकावयास कोणी तयार नाही!

आज महात्माजी वर्णाश्रमधर्म सांभाळीत आहेत. ते अनेकांना वर्ण देत आहेत. “ये; तुला काम देतो. गोरक्षण आवडते, ये; खादी आवडते, ये; सफाईचे काम करावयाचे आहे, ये; मधुसंवर्धनविद्या शिकावयाची आहे, ये; खेड्यात शाळा शिकवशील, ये; कागदाचा धंदा करशील, ये; तेलाचा घाणा चालविशील, ये." निरनिराळे धंदे निर्माण करून हा महापुरुष निरनिराळ्या वृत्तींच्या माणसांस कामाला लावीत आहे. म्हणजेच वर्णधर्म निर्माण करीत आहे.

राष्ट्रातील कोट्यवधी बेकार माणसांना त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार काम देण्याची व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत वर्णाश्रम हा शब्द म्हणजे थट्टा आहे. आणि जो थोर पुरुष अशी कामे शोधून काढतो आहे; त्यासाठी सतत आशावादी राहून हिमालयासारख्या कष्टराशी उचलीत आहे, त्यालाच धर्मनाश करणारा असे काहींना संबोधावे, हे त्या वर्णधर्माचे दुर्दैव आहे!

ज्याप्रमाणे वर्णधर्माची सेवा महात्माजी करीत आहेत, त्याचप्रमाणे आश्रमधर्मालाही उजळा ते देत आहेत. स्वतःच्या जीवनात गेली तीस-पस्तीस वर्षे पूर्ण ब्रह्मचर्य पाळून त्यांनी कामावर विजय मिळविला आहे. ब्रह्मचर्याची महती ते शतदा सांगत असतात. राष्ट्रात ब्रह्मचर्याचा महिमा त्यांनी वाढविला आहे. ब्रह्मचर्य कसे शक्य होईल यासंबंधी अनुभवाच्या व व्यावहारिक अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ब्रह्मचर्याप्रमणेच गृहस्थाश्रमासही ते उज्ज्वल करीत आहेत. वधूवरांस उज्ज्वल पथदर्शन ते करीत आहेत. पतिपत्नींची ध्येये काय, याविषयी त्यांनी लिहिले आहे.

वानप्रस्थ व संन्यास ते स्वतःच्या उदाहरणाने शिकवीत आहेत. महात्माजींहून आज थोर संन्यासी कोण आहे? आंध्र प्रांतात एक भक्त महात्माजींस त्यांची स्वतःच्या हाताने तयार केलेली एक तसबीर अर्पण करीत होता. महात्माजी म्हणाले, “ही तसबीर मी कोठे लावू? माझी खोली तरी कोठे आहे? आता हा देह अजून उरला आहे. या देहाचेही ओझे आता कमी झाले तर बरे!"

महात्माजींच्या उदाहरणाने आज भारतवर्षात शेकडो कार्यकर्ते वानप्रस्थ होऊन निरनिराळी कर्मे करीत आहेत. संन्यास हा शब्द न उच्चारणेच बरे. परंतु महात्माजींनी वानप्रस्थ निर्माण केले आहेत. ब्रह्मचर्य व आदर्श गृहस्थाश्रम यांसाठी रात्रंदिवस धडपडणारे मुमुक्षू निर्माण केले आहेत.

शेकडो विचारप्रचारक निर्मून महात्माजींनी खरे ब्राह्मण निर्माण केले आहेत. राष्ट्रासाठी मरण्याची वृत्ती निर्माण करून त्यांनी क्षत्रिय निर्माण केले आहेत. राष्ट्रातील लाखो खेड्यांतील लोकांना घास देण्याची व्यवस्था करतील, असे खरे वैश्य ते निर्माण करीत आहेत. राष्ट्रातील घाण दूर करतील, स्वतः झाडतील, विष्ठा उचलतील, नवीन शौचकूपपद्धती शिकवितील, असे खरे शूद्र ते निर्माण करीत आहेत. ज्याला वर्णाश्रमधर्माची आन्तरिक तळमळ असेल, तो या महापुरुषाच्या चरणांशी जाऊन वर्णाश्रमधर्माच्या सेवेला वाहून घेईल.

शुद्ध वर्णाश्रमधर्माची महात्माजी मूर्ती आहेत. त्या धर्माचे सच्चे उपासक ते आहेत. भारतीय संस्कृतीत हे वर्णाश्रमधर्माचे थोर तत्त्व ते वाढवीत आहेत. जीवनात वर्णाश्रमधर्म सत्यार्थाने यावेत म्हणून ते अहर्निश खटपट करीत आहेत. ते भारतीय संस्कृतीच्या थोर उपासका! तुझ्यामुळे भारताचे मुख उजळ होत आहे, भारतीय संस्कृतीचे सत्स्वरूप जगाला कळत आहे. भारतीयांवर तुझे अनंत उपकार!

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा