shabd-logo

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023

35 पाहिले 35
भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.

कृष्णाच्या चरित्राकडे एका अगदी निराळ्या प्रकाराने या प्रकरणात मी पाहणार आहे. गोकुळात प्रेमस्नेहाचा साम्यवाद स्थापन करणारा, किंवा जरासंध - शिशुपालादी सम्राटांना धुळीस मिळविणारा, छळल्या जाणाऱ्या द्रौपदीसारख्या सतींची बाजू घेणारा, किंवा अर्जुनाचे घोडे प्रेमाने हाकणारा, अशा त्या कृष्णाचे वर्णन या प्रकरणात नाही. कृष्णाकडे एक प्रत्यक्ष व्यक्ती या दृष्टीने येथे मी पाहणार नाही. कृष्णाकडे एक प्रतीक या दृष्टीने पाहणार आहे.

गोकुळातील श्रीकृष्ण यात फार खोल अर्थ आहे. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिये. गायी ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून वाटेल तेथे चरत जातात, त्याप्रमाणे ही इंद्रिये ते ते विषय पाहून त्यांच्या पाठीमागे स्वैर पळत सुटतात. आपले जीवन म्हणजेच गोकुळ. कुळ म्हणजे समुदाय. इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ. असे गोकुळ आपल्या प्रत्येकाजवळ आहे.

परंतु या गोकुळात आनंद नसतो, या गोकुळात सुखसमाधान नसते. येथे संगीत नसते, मधुर मुरली नसते. येथे व्यवस्था नाही. नृत्य-गीत नाही. या जीवन- गोकुळात सारे बेसूर काम चाललेले असते. इंद्रियांच्या शेकडो ओढी असतात. हे इंद्रिय खेचते, ते इंद्रिय खेचते. मनाच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्या प्रवृत्तींत एकवाक्यता नसते. अंतःकरणात सारा गोंधळ. सारी आदळ-आपट. या गोकुळात वणवे पेटलेले असतात. अंतःकरणाच्या यमुनेत अहंकाराचे कालिये ठाणी देऊन बसतात. अधासुर, बकासुर ( बकासुर म्हणजे दंभासुर) या गोकुळात येऊ पाहात असतात. आपल्याला आपल्या हृदयात सारखा गदारोळ व धांगडधिंगा ऐकू येत असतो. रात्रंदिवस हृदयमंथन सुरू असते. आपण समुद्रमंथनाची गोष्ट वाचतो. समुद्रमंथन म्हणजे हृदयसमुद्राचे मंथन. या हृदयसागरावर अनेक वासना-विकारांच्या लाटा प्रत्येक क्षणाला उसळत असतात. या मंथनातून नाना प्रकारच्या वस्तू बाहेर पडतात. कधी लक्ष्मी येऊन मोह पाडते, कधी अप्सरा भुलविते. कधी दारू समोर येऊन उभी राहते. कधी आपण लोकांना चाबूक मारीत सुटतो, तर कधी आपण शंख फुंकतो. कधी प्रेमाचा चंद्र उगवतो, तर कधी द्वेषाचे हलाहल निर्माण होते. कधी सद्विचारांची फुले देणारा पारिजात फुलतो, तर कधी सर्वांना तुडविणारा ऐरावत उभा राहतो. अमृतप्राप्ती होईपर्यंत - खरे समाधान, खरी शांती यांचा लाभ होईपर्यंत- हे असे हृदयमंथन सुरूच राहणार.

आपल्या या हृदयातील अशांतीने आपली तगमग होते. द्वेष- मत्सरांनी मस्त झालेल्या अशा जीवन- गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो. वसुदेव-देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला; नंद-यशोदेने त्याचा प्रेमाने प्रतिपाळ केला. नंद म्हणजे आनंद. यशोदा म्हणजे यश देणाऱ्या सद्वृत्ती. आनंदासाठी तडफडणारा हा जो जीवात्मा आणि या जीवात्म्याला साहाय्य करणाऱ्या ज्या सत्ववृत्ती यांच्या तळमळीतून हा श्रीकृष्ण जन्माला येतो. हृदयातील मोक्षाची तळमळ म्हणजेच कृष्णजन्म.

कृष्णजन्म व रामजन्म केव्हा झाला ते आपण जर पाहू लागलो, तर त्यात केवढा अर्थ आपणांस दिसेल. रामजन्म भर दुपारी झाला. टळटळीत दुपारी जन्माला रामराणा. पाय भाजत आहेत, कोठे छाया नाही, कोठे विसावा नाही, अशा वेळी राम जन्मास येतो. ज्या वेळेस जीवात्मा तडफडत असतो, हृदयाची दुःखाने लाही लाही होत असते, संसार म्हणजे पेटलेला वणवा असे वाटते, अशा वेळेस जीवात्म्याला रमविणारा, हृदयातील दशेन्द्रियमुखी सम्राट रावणाला मारून टाकणारा राम जन्म घेत असतो.

• आणि कृष्ण केव्हा जन्मतो ? राम भर दुपारी जन्मला, तर कृष्ण भर मध्यरात्री जन्मला. श्रावणातील मुसळधार पाऊस, मेघांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, यमुना तुडुंब भरलेली; अशा वेळी कृष्ण जन्म घेतो. ज्या वेळेस जीवनात कृष्णपक्षातील अंधार असतो, भयंकर निराशा असते, डोळ्यांतून अश्रूंचा पूर चाललेला असतो, मार्ग दिसत नाही, हृदयाची यमुना भरून आलेली असते, दुःखदैन्यांचे काळेकुट्ट मेघ जमून आलेले असतात, अशा 'वेळी कृष्ण जन्मतो.

कृष्ण म्हणजे व्यवस्था लावणारा, राम रमविणारा, कृष्ण आकर्षून घेणारा. कृष्ण सर्व गोकुळाला वेध लावतो. कृष्ण गोपाळ होतो. गोपाळ म्हणजे इंद्रियांचा स्वामी. तो इंद्रियांना चरू देतो, परंतु वाटेल तिकडे जाऊ देत नाही. त्या इंद्रियरूपी गायी वाटेल तेथे जाऊ नयेत, म्हणून तो गोड मुरली वाजवितो. कृष्ण सर्व इंद्रियांना सुखसमाधान देतो. त्याना ओढून, आकर्षून, संयमात राखून संगीत निर्माण करतो.

आपल्या जीवनातील अव्यवस्थेत व्यवस्था लावणारा असा हा श्रीकृष्ण असतो. रवीन्द्रनाथांनी गीताञ्जलीत म्हटले आहे, “सारा दिवस सतारीच्या तारा लावण्यातच गेला. अजून सतार लागत नाही, संगीत सुरू होत नाहीं.” आपली सर्वांची ही स्थिती आहे. आपल्या जीवनात मेळ नाही. जीवनाची सतार नीट लागत नाही. ही जीवनाची सतार सात तारांची नसून सहस्र तारांची आहे. ही अनंत तारांची हृदयतंत्री केव्हा नीट वाजणार?

आपल्या हजारो प्रवृत्ती म्हणजेच या तारा. आज एक वाटते, उद्या दुसरे वाटते. या क्षणी अमुक करावे असे वाटते, दुसऱ्या क्षणी दुसरेच वाटते. या हजारो वासना आपणांस नाचवीत असतात. आपली कुतरओढ चाललेली असते. एखाद्या नवऱ्याला दोन बायका असल्या, तर त्याची किती केविलवाणी स्थिती होते! मग या जीवात्म्याच्या त्या हजारो बायका - त्याची काय दशा करीत असतील बरे?

सदैव चाले ओढाताण हृदयावरती पडतो ताण उरतें न मला अल्प त्राण काय करावें? मी केवळ मरुनी जावें असे जीवाला वाटू लागले.

श्रीकृष्णाला सोळा हजार नारी होत्या, असे आपण वाचतो. सोळा हजारच काय, सोळा कोटीही असतील. आपल्या या क्षणाक्षणाला वदलणाऱ्या शेकडो मनःप्रवृत्ती म्हणजेच या नारी, म्हणजेच या गोपी. या गोपी जीवाला ओढीत असतात. परंतु गोकुळात जन्मलेला श्रीकृष्ण या गोपींची फजिती करतो. तो गोपींचे वस्त्रहरण करून त्यांना लाजवितो.

प्रत्येक प्रवृत्ती गोंडस स्वरूप घेऊन जीवात्म्याला मोह पाडीत असते. गटेच्या 'फाउस्ट' काव्यामध्ये एके ठिकाणी एक व्यक्ती म्हणते:

“मला माहीत होते, की हे पाप आहे. परंतु ह्या पापाने किती सुंदर वेश धारण केला होता! हे पाप किती गोड व सुंदर दिसत होते!”

परंतु श्रीकृष्ण या गोपींच्या बाह्य रूपरंगावर भुलत नाही. तो त्यांचे खरे स्वरूप प्रकट करतो. त्यांचे आतील ओंगळ व हिडिस स्वरूप त्यांच्या निदर्शनास आणून देतो. त्यांची लाक्षणिक वस्त्रे दूर करतो. त्या त्या दुष्ट प्रवृत्ती मग लाजतात. त्या नरमतात, विरमतात. त्या श्रीकृष्णाच्या चरणी रत होतात, “बा कृष्णा ! आता तू सांगशील तसे वागू. तू सांगशील ते करू. तू आमचा स्वामी,” असे त्या हात जोडून म्हणतात.

जीवनात हेच मुख्य काम आहे. सर्व इंद्रिये, सर्व वृत्ती यांना एका महान ध्येयाच्या भजनी लावणे, जीवनात स्थिरता आणणे. नदी सागराकडे जाणार, पतंग प्रकाशाकडे जाणार; भुंगा कमळाकडे वळणार, मोर मेघाकडे वळणार. आपल्या सर्व वृत्ती, सारी शक्ती कोणत्या तरी एका ध्येयाकडे घेऊन जाणे हे कार्य असते.

श्रीकृष्ण हे काम करतो. सर्व प्रवृत्तींना खेचून ध्येयाकडे त्यांना तो वळवितो. यामुळे जीवनातील अशांती लयाला जाते. एकच सूर हृदयात घुमू लागतो. परंतु हे काम सोपे नाही. हृदयात ऐक्याची मुरली वाजू लागण्यापूर्वी कृष्णाला कितीतरी काम करावे लागते.

अहंकाराचा कालिया नाहीसा करावा लागतो. आपला अहंकार सारखा फूत्कार करीत असतो. आपल्या आजूबाजूस कोणी येऊ शकत नाही. मी मोठा, मी श्रेष्ठ, इतर सारे मूर्ख, असल्या अहंकाराच्या शेजारी कोण राहणार?

“समस्तांसि भांडेल तोचि करंटा"

अशा सृष्टीत सर्वांशी भांडत जाणारा हा अहंकारी एकटा जीव कधी मुक्त होणार?

श्रीकृष्ण या अहंकाराच्या फणेवर उभा राहतो. जीवन-यमुनेतून

या कालियाला तो हाकलून देतो.

या जीवन-गोकुळातील द्वेषमत्सरांचे वणवे कृष्ण गिळून

टाकतो. दंभ, पाप यांचे राक्षस नाहीसे करतो. अशा प्रकारे जीवन शुद्ध होते. एक ध्येय दिसू लागते. त्या ध्येयाचा ध्यास जीवाला लागतो. जे मनात तेच ओठांत, तेच हातात. आचार, उच्चार व विचार यांत ऐक्य येते. हृदयातील गडबड थांबते. साऱ्या तारा ध्येयाच्या खुंटीला नीट बांधल्या जातात. त्यांतून दिव्य संगीत स्रवू लागते...

गोकुळात कृष्णाची मुरली केव्हा वाजू लागली?
 शरद ऋतु उदय चंद्राचा
वनिं वृंद उभा गवळणिंचा
 सुगंध सुटत पवनाचा
 ये वास मलयगिरीवरचा

अशी ती प्रसन्न पावन वेळा होती. हृदयाकाशात शरद् ऋतू पाहिजे. हृदयात वासना-विकारांची वादळे आता नाहीत. स्वच्छ आकाश आहे. शरद् ऋतूमध्ये आकाश निरभ्र असते. नद्यांतील खळमळ खाली बसून स्वच्छ शंखासारखे पाणी वाहात असते. आपले जीवन असे झाले पाहिजे. आसक्तीचे ढग जमा होता कामा नयेत. अनासक्त रीतीने केवळ ध्येयभूत कर्मांतच जीव रंगून गेला पाहिजे. शुद्ध आचार व शुद्ध विचार रात्रंदिवस होत राहिला पाहिजे.

शरद् ऋतू आणि शुक्लपक्ष आहे. प्रसन्न चंद्र उगवला आहे. चंद्र म्हणजे मनाची देवता. चंद्र उगवला आहे; म्हणजे मनाचा पूर्ण विकास झाला आहे. सद्भाव फुलला आहे. सद्विचारांचे स्वच्छ चांदणे पडले आहे. अनासक्त हृदयाकाशात शीलाचा चंद्र शोभत आहे. प्रेमाची पूर्णिमा आली आहे.

अशा वेळेस साऱ्या गोपी जमतात. साऱ्या मनःप्रवृत्ती कृष्णाभोवती जमतात. हृदयात व्यवस्था लावणारा, गोंधळातून सुंदरता निर्माण करणारा तो श्यामसुंदर कोठे आहे, अशी त्यांना तळमळ लागते. त्या ध्येयगोपाळाची मुरली ऐकावयास साऱ्या वृत्ती अधीर होतात.

एका बंगाली गीतात एक फारच गोड भाव एकदा मी वाचला होता. एक गोपी म्हणते:

“माझ्या अंगणात प्रत्यही काटे सराटे पसरून त्यांच्यावरून चालत जाण्याची सवय मी करीत असते. कारण, त्याची मुरली कानी पडताच मला धावत जावे लागेल; आणि वाटेत काटे असले तर मी अडायची एखाद वेळी. सवय असली म्हणजे बरी.

“माझ्या अंगणात पाणी ओतून मी खूप चिखल करते, आणि त्या गाऱ्यातून चालण्याचा अभ्यास मी करीत असते. कारण त्याची मुरली ऐकली की मला जावे लागेल. आणि वाटेत चिखल असेल, तर फजिती व्हायची; परंतु सवय असली म्हणजे पळत जाईन.”

ध्येय एकदा ठरले म्हणजे मग चिखल असो वा काटे असोत, फास असो वा विष असो, त्याच्याकडे साऱ्या जीवाची ओढ लागली पाहिजे. कृष्णाची मुरली ऐकताच सर्वांनी धावत आले पाहिजे, फेर धरला पाहिजे, हातात हात घालून नाचले पाहिजे. अंतर्बाह्य एकता. हृदय शुद्ध आहे, प्रेमाचा चंद्र फुलला आहे, साऱ्या वासना

संयत आहेत, एक ध्येय दिसत आहे, आसक्ती नाही, द्वेष - मत्सर मालवलेले आहेत, अहंकार शमला आहे, दंभ दुरावला आहे, अशा वेळेस गोकुळात मुरली सुरू होते. या जीवनात संगीत सुरू होते, त्यां संगीताची गोडी कोण वर्णील? त्या संगीताची गोडी कोण चाखील?

महात्माजी म्हणाले की, “माझ्या हृदयात तंबोरा लागलेलाच आहे.” थोर उद्गार! प्रत्येकाच्या हृदयात असा तंबोरा लागू शकेल. प्रत्येकाच्या जीवन-गोकुळात ही मधुर मुरली वाजेल. परंतु केव्हा? व्यवस्था लावणारा, इंद्रियांना आकर्षून घेऊन ध्येयाकडे नेणारा श्रीकृष्ण जन्मेल तेव्हा.

हा श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. ज्याप्रमाणे एखाद्या डोंगरात बाहेरच्या खडबडीत, ओबडधोबड खडकात एखादे शिवालय असते, त्याप्रमाणे आपल्या या ओबडधोबड, ओंगळ जीवनाच्या आतील बाजूस एक शिवालय आहे. आपल्या सर्वांच्या हृदय-गाभाऱ्यात हा शंभू, हा मृत्युंजय, हा सदाशिव आहे. तो प्रत्यही दिसत नाही; परंतु तो आहे यात संशय नाही. अॅमिल या एका थोर पाश्चिमात्य विचारवंताने एके ठिकाणी लिहिले आहे:

"Deep within this ironical and disap- pointed being of mine, there is a child hidden, sad, simple creature who believes in the ideal, in love, in holiness and all heavenly supersti- tions.”

याचा भावार्थ असा, की या माझ्या परस्परविरोधी, संशयी, निराश अशा जीवनाच्या आतील गाभाऱ्यात एक लहानसे बालक आहे. ध्येयावर श्रद्धा ठेवणारे, प्रेमावर, पावित्र्यावर, मांगल्यावर विश्वास ठेवणारे, सर्व दैवी वृत्तींवर श्रद्धा ठेवणारे असे हे बालक आहे. हे बालक दिसत नाही, परंतु ते आहे. ते अजून लहान आहे, साधे आहे; खिन्न असे आहे; परंतु आहे.

हे बालक म्हणजे बाळकृष्ण. हा बाळकृष्ण वाढू लागतो. तो खिन्न न राहता बलवान होती. गुदमरून न जाता प्रकट होऊ लागती. जीवन-गोकुळात संगीत निर्माण करण्यासाठी धडपडू लागतो. या बाळकृष्णाला वाढविणे हे आपले काम आहे. जीवनात संगीत पाहिजे असेल तर ह्या वेणुधराला वाढवा.

हृदयातील ही वेणू एखाद्या वेळेस ऐकू येते. परंतु हा वेणुनाद अखंड ऐकावयास आला पाहिजे. इतर आवाज बंद केल्याशिवाय हा अंतर्नाद ऐकावयास मिळणार नाही. इतर वासनांची गीते बंद केल्याशिवाय ध्येयगीत कसे ऐकू येणार? बरचे दगडधोंडे दूर केले की खालचा झुळूझुळू वाहणारा झरा दृष्टीस पडतो. त्याचप्रमाणे अहंकार, आसक्ती, राग, द्वेष यांचे फत्तर फोडून दूर केले म्हणजे हृदयातील भावगंगेचे गुणगुणणे ऐकू येईल. कामक्रोधांचे ताशे बंद करा. म्हणजे हृदयातल्या शिवालयातील मुरली ऐकू येईल.

हरिजनांबद्दलच्या उपवासाच्या वेळी महात्माजींनी आश्रमातील बाळ गोपाळांस लिहिलेल्या पत्रात म्हटले होते:

“चाळीस वर्षांच्या सेवेने माझ्या अंतःकरणात मी थोडी व्यवस्था निर्माण केली आहे. संयमाने, तपस्येने मी जीवनातील बेसूरपणा दूर केला आहे, म्हणून तो आतील मंजुळ ध्वनी मी ऐकू शकतो. "

सेवेने, संयमाने हे संगीत निर्माण करावयाचे आहे. कृष्ण म्हणजे मूर्त संयम-कृष्ण कर्षून घेणारा, अर्जुनाचे घोडे संयमात राखणारा, इंद्रियांचे घोडे स्वैर जाऊ न देणारा म्हणजे कृष्ण. संयमाशिवाय संगीत नाही. संगीत म्हणजे मेळ; प्रमाण. प्रमाण म्हणजे सौंदर्य. जीवनात सर्व गोष्टींचे प्रमाण साधणे म्हणजेच संगीत निर्माण करणे. हाच योग.

यासाठी धडपड हवी. रात्रंदिवस प्रयत्न हवा. ती अत्यंत गोड मुरली ऐकण्याचे भाग्य पाहिजे असेल, तर रात्रंदिवस अविश्रान्त प्रयत्न हवेत, दक्षता हवी.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग
 अंतर्बाह्य जग आणि मन ||

रात्रंदिवस जनात व मनात पदोपदी झगडे होतील. पुनःपुन्हा पडू परंतु पुनःपुन्हा चढू. धडपड हेच मानवाचे भाग्य आहे. पशूच्या जीवनात धडपड नाही. आजच्यापेक्षा उद्या पुढे जाऊ, आजच्यापेक्षा उद्या अधिक पवित्र होऊ ही भावना त्याच्याजवळ नाही. जो मुक्त झाला, त्याला ही धडपड नाही. ज्याच्या जीवनात धडपड नाही तो मुक्त तरी असेल, किंवा पशू तरी असेल.

धडपड हे आपले ध्येय. आपण सारी धडपडणारी मुले. 'इन्किलाब जिंदाबाद' याचा अर्थ 'क्रांती चिरायू होवो!' असा आहे. धडपड चिरायू होवो. उत्तरोत्तर विकास होवो. धडपड करता करता एक दिवस परमपद गाठू.

याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा ॥

हा सर्व अट्टहास, ही सारी धडपड, तो शेवटचा दिवस गोड यावा म्हणून आहे. तो गोड वेणुध्वनी कानी पडावा म्हणून आहे. तो दिवस शतजन्मांनी आला, तरी लवकरच आला असे म्हटले पाहिजे.

फ्रान्समधील विख्यात कथालेखक अनातोले याने एके ठिकाणी लिहिलं आहे: दैवाने ‘तुझे काय करू' असे जर मला विचारले, तर मी त्याला म्हणेन, ‘माझे सारे काही दूर कर, परंतु माझी धडपड दूर करू नकोस. माझे दुःख दूर करू नकोस.”

कुंती म्हणाली, “सदैव मला विपत्तीच दे." विपत्ती म्हणजेही धडपडच, ओढाताण. पूर्णतेचे स्मरण ठेवून तिला गाठण्यासाठी होणारी जीवाची तगमग, ही तगमग ज्याच्याजवळ आहे तो धन्य होय. त्याच्या जीवनात आज ना उद्या कृष्णाची मंजुळ मुरली वाजू लागेल.

श्रीकृष्णाने गोकुळात आनंदीआनंद आधी निर्माण केला. गोकुळात मुरली त्याने आधी वाजविली, आणि नंतर जगात संगीत निर्माण करावयास तो गेला. आधी गोकुळातील वणवे त्याने विझविले. गोकुळातील कालिये मारले, अघासुर, बकासुर मारले. नंतर समाजातील कालिये, समाजातील दंभ, समाजातील द्वेष-मत्सराचे वणवे दूर करावयास तो बाहेर पडला. स्वतःच्या जीवनातील संगीत सर्व त्रिभुवनास तो ऐकवू लागला. दगडधोंडे पाझरू लागले.

मनुष्य स्वतःच्या अंतःकरणात जेव्हा स्वराज्य स्थापील, तेथे संगीत, सुसंबद्धता, ध्येयात्मकता, निःशंकता, सुसंवादता निर्मील, तेथले वणवे विझवील. तेथले असुर संहारील, थोडक्यात स्वतःचा जेव्हा स्वामी होईल, तेव्हाच तो जगातही आनंद निर्माण करू शकेल. ज्याच्या स्वतःच्या जीवनात आनंद नाही, तो दुसऱ्याला काय देणार? जो स्वतः शांत नाही, तो दुसऱ्याला काय माती शांती देणार? ज्याच्या स्वतःच्या जीवनात संगीत नाही, तो दुसऱ्याच्या जीवनातील रडगाणी कशी दूर करणार? जो स्वतःचा गुलाम आहे, तो दुसऱ्यास कसे मुक्त करणार? जो स्वतःस जिंकू शकत नाही, तो दुसऱ्यास काय जिंकणार? स्वतः पडलेला दुसऱ्याला उठवू शकत नाही; स्वतः बद्ध असलेला दुसऱ्याला मुक्त करू शकत नाही; सदैव ढोपरात मान घालून रडणारा दुसऱ्यास हसवू शकत नाही. स्वतः स्फूर्तिहीन दुसऱ्यास कशी चेतना देणार? स्वतः निरुत्साही दुसऱ्यास उत्साहसागर कसा बनविणार? स्वतःच्या जीवन- गोकुळाला आधी सुखमय, आनंदमय करा. मगच या सभोवतालच्या संसाराला तुम्ही आनंदमय करू शकाल. स्वतःची बेसूर जीवनबासरी सुधारा दुसऱ्याच्या जीवनबासऱ्या तुम्ही सुधारू शकाल. मग परंतु तो दिवस कधी येईल? येईल, एक दिवस येईल. ही जीवन-यमुना तो दिवस येईपर्यंत अशान्त राहील. या जीवन-यमुनेवर कधी क्रोध-मत्सरांच्या, कधी स्नेह - प्रेमाच्या प्रचंड लाटा उसळतील. परंतु या जीवन-यमुनेची सारी धडपड, ते वेडेवाकडे उचंबळणे त्या ध्येयासाठी आहे. श्रीकृष्णाच्या परमपवित्र पायांचा स्पर्श व्हावा म्हणूनच ही खळबळ आहे. एक दिवस कृष्णाचा पदस्पर्श होईल व यमुना शान्त होईल. त्या ध्येय भगवानाच्या चरणावर स्वतःस ओतण्यासाठी ही यमुना अधीर आहे. शान्त होण्यासाठी वादळ उठते. शान्त होण्यासाठीच जीवन धडपडत आहे. संगीत निर्माण करणाऱ्या प्रभूच्या पायांचा स्पर्श व्हावा म्हणून जीवन अधीर आहे. येईल, तो शरद ऋतू एक दिवस येईल, तो प्रसन्न सुगंध एक दिवस सुटेल. ते प्रसन्न सुगंध एक दिवस सुटेल. ती प्रसन्न पूर्णिमा एक दिवस फुलेल. त्या दिवशी गोकुळात प्रेमराज्य स्थापणाऱ्या, अव्यवस्था, गोंधळ, बजबजपुरी, घाण, वणवे, दंभ दूर करून मेळ निर्माण करणाऱ्या त्या कृष्णकन्हैय्याच्या मुरलीचा अमृत-ध्वनी माझ्या जीवनात ऐकू येईल! त्या श्यामसुंदराची वेड लावणारी वेणू वाजत राहील!

हृदयंगम वाजत वेणू
स्वैर न विचरति इंद्रियधेनू ॥
 जीवन-गोकुळीं ये वनमाळी
अमित सुखाची सृष्टी पिकली
शिरिं धरिन तदीय पदांबुजरेणू ॥
 प्रेमळ गोपी या मम वृत्ती
 वेडावुन प्रभुरूपीं जाती
 प्रभुविण वदति कीं कांहींच नेणूं ॥

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
23
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
13
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
10
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
5
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
3
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
1
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
1
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा