shabd-logo

चार पुरुषार्थ

5 June 2023

56 पाहिले 56
धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू. पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ मराठीत आता कृतार्थता, पराक्रम, सार्थकता, प्रौढी अशांसारखा झाला आहे. “असे करण्यात काही पुरुषार्थ नाही.” असे आपण म्हणतो. याचा अर्थ असे करणे माणसास शोभत नाही, साजत नाही, यात कौतुक करण्यासारखे काही नाही, पराक्रम काही नाही असा होतो.

भारतीय संस्कृती सांगते, की संसारात चार वस्तू मिळवा. चार वस्तू सोडा. भारतीय संस्कृती एकाच वस्तूवर जोर देत नाही. ती व्यापक आहे, एकांगी नाही. भारतीय संस्कृती दैन्य-नैराश्यांची गाणी गाणारी नाही. भारतीय संस्कृती पैशाला वमनवत् समजत नाही. अर्थ ही एक पुरुषार्थाची वस्तू आहे. द्रव्य, संपत्ती त्याज्य नाही. प्रयत्नाने द्रव्य जोडा, संपत्ती मिळवा. संपत्तीचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. संपत्तीला पचविणारी भारतीय संस्कृती आहे. संपत्तीप्रमाणेच कामोपभोग. भारतीय संस्कृती कामाला सन्मान्य स्थान देत आहे. काम ही एक पुरुषार्थाची वस्तू मानली गेली आहे. संपत्ती पवित्र आहे. कामही पवित्र आहे. अर्थ आणि काम माणसाने मिळवावेत. संपत्ती मिळवावी आणि तिचा नीट उपभोगही घ्यावा. काम म्हणजे केवळ रतिसुख एवढाच येथे अर्थ नाही. काम म्हणजे उपभोग, सुखोपभोग. काम म्हणजे विषयसुख, पंचेन्द्रियांचे सुख, पंचविषयांचे सेवन. अशा व्यापक अर्थी काम हा शब्द घेतला पाहिजे.

तुकारामांच्या एका अभंगात एक फार थोर वचन येऊन गेले

आहे:

विधीनें सेवन | धर्माचें पालन ।।

विषयांचे विधियुक्त सेवन कराल, तर ते धर्महीन नाही. मर्यादित प्रमाणात विषयभोग घेणे यात धर्माची च्युती नाही. धर्म म्हणजेच विधियुक्त ग्रहण. तुकारामांचा दुसराही एक चरण आहे:

जोडुनीयां धन उत्तम व्यवहारें । उदार विचारें वेच करी ॥

धन मिळवू नका असे हो थोर संत सांगत नाही, परंतु धन उत्तम व्यवहाराने जोडा आणि ते जोडलेले धन विवेकाने व उदारपणाने खर्च करा, असे तो सांगत आहे.

विधी म्हणजे आज्ञा. स्मृतीतून विधी शब्द नेहमी येत असतो. कोणतेही कर्म विधिपुरः सर करा असे स्मृती सांगत असते. म्हणजे शास्त्रवचन. विधी म्हणजे स्मृतीतील विधान. विधी म्हणजे धर्म. जे कर्म विधियुक्त नाही ते अधार्मिक होय, असे स्मृतिकार सांगतात. परंतु विधी कसला? कशाविषयी विधी? कशाविषयी आज्ञा ? कशाविषयी बंधन? कशाविषयी मर्यादा?

भारतीय संस्कृती मानवी मन ओळखते. मनुष्याच्या हृदयाच्या भुका ती ओळखते. मनुष्याला वासना - विकार आहेत, ही गोष्ट भारतीय संस्कृती डोळ्यांआड करीत नाही. भारतीय संस्कृतीचे ध्येय परमोच्च असले, तरी ती मर्यादा ओळखते. मानवी आत्मा या मातीच्या शरीरात अडकलेला आहे, हा आत्महंस या चिखलात रुतलेला आहे, त्याला हळूहळू या चिखलातून बाहेर काढले पाहिजे ही गोष्ट भारतीय संस्कृती कधी विसरत नाही.

सारी मानवी संस्कृती चिखलातूनच वर आली आहे. चिखलात किडेही होतात; परंतु चिखलातून पंकजही फुलते. चिखलातून कमळे पुरविणे हे भारतीय संस्कृतीचे ध्येय आहे. अंधारातून प्रकाश निर्माण करणे, मातीतून हिरे व माणके निर्माण करणे, मरणातून अमरता मिळविणे, हे भारतीय संस्कृतीचे ध्येय आहे.

रवीन्द्रनाथांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेत रवीन्द्रनाथ म्हणतात, “फुलापासून दिलेल्या गंधाची, दिलेल्या रंगाची देव मागणी करतो. कोकिळा पासून दिलेल्या कुहूकुहूची फक्त तो अपेक्षा करतो. वृक्षापासून विवक्षित फळाचीच तो आशा राखतो. परंतु मानवाच्या बाबतीत देवाचा नियम निराळा आहे. त्याने मनुष्याला दुःख दिले आहे व त्यातून माणसाने सुख मिळवावे अशी त्याची अपेक्षा आहे. त्याने माणसाला अंधार दिला आहे; 'या अंधारातून प्रकाश प्रकट करा' असे तो सांगतो. त्याने माणसास मर्त्य केले आहे; ‘या मरणातून अमृतत्व मिळवा' असे तो म्हणतो. त्याने आजूबाजूस घाण ठेविली आहे, असत् ठेविले आहे; 'असतातून सत् मिळवा, या विषातून सुधा सृजा, या अमंगलातून मंगलता निर्माण करा' असे तो म्हणतो. देवाचा मानवाच्या बाबतीतच असा पक्षपात का बरे? मानवावरच ही महान जबाबदारी का? मानवाच्या बाबतीत काही कठोरता, का ही अशक्य अपेक्षा? नाही, देव कठोर नाही. दुष्ट नाही. सर्व सृष्टीत मानवप्राणी थोर असे देवाला वाटते. मानवापासून या गोष्टी त्याने नाही अपेक्षावयाच्या तर कोणापासून? यात मानवाचा गौरव आहे. एखाद्या वीराला लहानसा किडा मारावयास सांगणे हा जसा त्याचा अपमान आहे, तद्वत मानवापासून क्षुद्र वस्तूंची अपेक्षा राखणे म्हणजे त्याच्या शक्तीचा अपमान आहे. माझा लाडका मनुष्यप्राणी हे सर्व करू शकेल अशी देवाला आशा आहे. चौऱ्यांयशी लक्ष योनींनंतर जन्माला आलेला हा थोर मानवप्राणी, हा सर्व सृष्टीचा मुकुटमणी, माझी आशा फोल करणार नाही अशी देवाला श्रद्धा आहे.”

किती सुंदर आहे ही कविता, किती थोर आहे हा विचार, किती विशाल व गंभीर आहे ही सृष्टी! शेक्सपीअरने एके ठिकाणी मानवाचा मोठेपणा असाच वर्णिला आहे: 'कसा बोलतो, कसा सुरेख चालतो, कसा सुंदर दिसतो, कसे थोर हृदय, कशी विचार करण्याची शक्ती, कशी विशाल दृष्टी ! मनुष्य म्हणजे भगवंताची मूर्तीच होय.' अशा अर्थाने ते वर्णन आहे.

धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पहा हो।।

असे समर्थांनी थोर उद्गार काढले आहेत.

बहुता पुण्यपुण्येन क्रीतेयं कायनौस्त्वया ||

'अरे, हा मानव-देह मोठ्या भाग्याने तुला मिळाला.' असे हे वचन सांगत आहे. तुकारामांनी तर नरदेहाला 'सोनियाचा कलश' असे म्हटले आहे. या नरदेहात जन्मून नराचा नारायण होणे हे महत्त्वाचे ध्येय, असे भारतीय संत सांगत आहेत.

मनुष्यापासून किती थोर अपेक्षा ! परंतु ही अपेक्षा मनुष्य कशी पुरी करणार? पशूप्रमाणे वागणारा मनुष्य देवाप्रमाणे केव्हा होणार? बर्नार्ड शॉने एके ठिकाणी म्हटले आहे, “मनुष्याला निर्मून हजारो वर्षे झाली. आशेने देव वाट पाहात आहे. देव स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग करीत होता. निरनिराळे प्राणी निर्माण करीत होता. हा प्राणी आपले हेतू पूर्ण करील, आपल्या आशा सफळ करील, असे करीत करीत देवाने हजारो प्राणी निर्माण केले. परंतु त्याच्या आशा अपूर्णच राहिल्या. पूर्वीच्या अनुभवाने शहाणा होऊन देव नवीन प्राणी निर्माण करीत असे. परंतु नवीन प्राणी पुन्हा देवाच्या तोंडाला पाने पुशी ! असे करता करता देवाने मानव निर्माण केला. सर्व चातुरी खर्चून; सर्व अनंत अनुभव ओतून हा दिव्य जीव देवाने निर्मिला आणि देव थांबला. दमलेला देव निजला. त्याला वाटले की हा मानवप्राणी माझ्या सर्व आशा पूर्ण करील, माझे मनोरथ पुरवील. निःशंकपणे देव निजला. आपण जागे होऊ तेव्हा त्या मानवी प्राण्याची दिव्य कृती पाहावयास सापडेल व आपल्या डोळ्यांचे पारणे फिटेल या आशेने देव झोपला आहे, परंतु आता हजारो वर्षे होऊन गेली व देव जर जागा झाला तर काय दिसेल? देवाला प्रसन्न वाटेल का? त्या परात्पर पित्याला धन्य धन्य वाटेल का? मानवी संसाराचा सोहळा पाहून त्याच्या डोळ्यांतून आनंदाक्षू घळघळतील का? त्याचे हृदय प्रेमाने वोसंडून येईल का? मानवाला तो पोटाशी धरून त्याला प्रेमाश्रूंनी न्हाणील का?

“छे छे! मनुष्य मनुष्याला गुलाम करीत आहे. मनुष्य मनुष्याला छळीत आहे. पिळीत आहे, गांजीत आहे, भाजीत आहे. राष्ट्र राष्ट्रांचे लचके तोडीत आहेत. दातओठ खाऊन एकमेकांकडे पाहात आहेत. वृक-व्याघ्र बरे; सर्प-सिंह बरे; घारी- गिधाडे पत्करली; परंतु मनुष्य नको! सर्व सृष्टीचा त्याने संहार चालविला आहे. तो पाले खातो, फुलफळे खातो, तो पशु-पक्षी मारून खातो. कधी कधी लीलेने त्यांची शिकार करतो! परंतु हे एक वेळ जाऊ दे. तो स्वतःच्या जातीचाही निःपात करीत आहे! वाघीण स्वतःची पिले खाते. तिचे एखादे पिलू वाचते. मांजरीही स्वतःची पिले कधी कधी खाते. प्रसववेदनांनी कष्टी झालेली ती माता स्वतःचीच पोरे मटकावते ! स्वतःच्या पोटाची वखवख, भुकेची आग शान्त करण्याकरिता स्वतःची पोरे वाघीण भक्षिते. परंतु मानवही तेच करीत आहे! स्वतःच्या पोटाची आग शांत करण्याकरिता तो शेजारच्या राष्ट्रांना खाऊन टाकतो. मानव मानवाला भक्षीत आहे. मनुष्य म्हणजे बुद्धिमान वाघ! क्रौर्याला बुद्धीही जोड मिळाली. मग काय? वाघाला फक्त नखे व दात आहेत. प्राणी जवळ आला तरच त्याला वाघ खाऊन टाकील, फाडून खाईल. परंतु बुद्धिवान मानवी वाघाने चमत्कार केले आहेत! तो पंचवीस मैलांवरून मारू शकतो. तो हेवतून मारील, पाण्यातून मारील, रात्री मारील, दिवसा मारील. हवेने मारील, किरणांनी मारील. सर्व सृष्टीतील संहारतत्त्वे शोधून त्यांचा तो उपासक होत आहे! मारण्याची साधने शोधून काढणे हीच त्याची संस्कृती! रक्ताने भरलेला हा मानवी संसार आहे. येथे आरोळ्या व आक्रोश आहेत. बळी दुर्बळाला रगडीत आहे, मारक शक्तीचे गोडवे गायिले जात आहेत. पाशवी बळाची उपनिषदे पढविली जात आहेत. कोणी सुखात तर कोणी दुःखात, कोणी विलासात तर कोणी विलयात, कोणी माड्यामहालांत तर कोणी रस्त्यावर पडलेले, कोणी अजीर्णाने मरत आहेत तर शेकडो अन्नाविणे मरत आहेत, कोणी वस्त्रांनी गुदमरत आहेत तर कोणी वस्त्र नाही म्हणून गारठत आहेत, कोणी सदैव गाद्यांवर लोळत आहेत; शरीराला श्रम नाही, हातपाय मळत नाहीत, थंडी ऊन लागत नाही, तर दुसऱ्यांना सुखाची झोप ठाऊक नाही. विश्रांती ठाऊक नाही; ऊन असो, पाऊस असो, दिवस असो, रात्र असो, खायला असो, खायला नसो, आजारीपणा असो वा बरे असो, घरात मुले तडफडत असोत, बायको मरत असो, सदैव काम करावेच लागत आहे. एकीकडे संगीत, एकीकडे विवळणे ! एकीकडे चैन, एकीकडे वाण ! एकीकडे मजा, एकीकडे मरण! काय हा मानवी संसार !

“अरेरे! देवाला हे हृदय फाडून टाकणारे दृश्य पाहून काय वाटेल? स्वतःच्या साऱ्या आशा-आकांक्षा धुळीत मिळालेल्या पाहून त्या जगदीश्वराला काय वाटेल? निराशेने तो वेडापिसा होईल. त्याची अनंत आशा संपेल. त्याच्या सहनशीलतेचा शेवटचा क्षण येईल. तो मानवाकडे संतापाने पेटलेल्या डोळ्यांनी पाहील. मानवाचे भस्म होऊन जाईल. तो मानवाला सृष्टीतून साफ पुसून टाकील. हा प्रयोग फसला असे तो ठरवील. कदाचित दुसरा प्रयोग तो करील. कोणाला माहीत?"

बर्नार्ड शॉला देव मानवाला पुसून टाकील असे वाटत आहे. परंतु तसे देव करणार नाही. कारण या मानवी प्राण्यांत काय शक्ती आहे ते त्याच्या अनुभवास आले आहे. याच राक्षसी व मुर्दाड मानवांतून भगवान बुद्ध जन्माला आले, भगवान ख्रिस्त जन्माला आले. याच मानवी प्राण्यांतून सेंट फ्रॅन्सिस बाहेर पडले, तुलसीदास बाहेर पडले. याच मानवी प्राण्यांतून महात्माजी प्रगट झाले आहेत, रवीन्द्रनाथ जन्मले आहेत. देवाला आशा आहे. फळाचा त्याग करू नये. ती आंबट कच्ची कैरी एक दिवस पिकेल. तिच्या आंबट रसाचे मधुर रसात परिवर्तन होईल. त्याप्रमाणे मानवप्राणी पिकतील. काही पिकलेली फळे फारच मधुर निघाली. देवाने हे पाहिले आहे. तो आशेने अनंत काळ वाट पाहात बसेल.

रामतीर्थ म्हणत असत, “ज्ञानाची शिडी चढणारी आपण सारी बाळे आहोत. कोणी सर्व पायऱ्या चढून वरच्या दिवाणखान्यात गेली, कोणी वरच्या शेवटच्या पायरीवर आहेत, कोणी मध्ये आहेत, कोणी शिडीकडे येत आहेत. एक दिवस सारी बाळे दिवाणखान्यात येतील व अपूर्व सोहळा होईल. मधुरतम संगीत होईल."

मानवी यात्रा सुरू झाली आहे. आपण सारे यात्रेकरू आहोत. मांगल्याकडे जाणारे यात्रेकरू. नदी सागराकडे जाते, ती का सरळ जाते? ती का एकाच गतीने, एकाच वेगाने जाते? नदी कधी वाकडी जाते, कधी कड्यावरून नि:शंकपणे उडी घेते, कधी उच्छृंखल होते, कधी गावेच्या गावे उद्ध्वस्त करते. कधी गंभीर तर कधी उथळ, कधी हसते तर कधी रडते, कधी भरलेली तर कधी रिती, कधी रानावनांत, काट्याकुट्यांत शिरते, तर कधी प्रसन्नपणे मैदानातून जाते; परंतु शेवटी सागराच्या पायावर जाऊन पडते आणि नदीची वाट पाहणारा, त्या सहस्त्र सरितांची रात्रंदिवस वाट पाहणारा तो सागर सहस्र हस्तांनी त्यांना हृदयाशी धरतो, स्वतःशी एकरूप करतो.

ते पर्वत, ते सरितांचे जन्मदाते ! ते आपल्या मुलींवर संतापत नाहीत. ते आशेने मुलींकडे पाहात असतात. ते आपले आशीर्वाद पाठवीत असतात. ते जीवनाचा पुरवठा करीत असतात. माझ्या मुली शेवटी अनंत सागराकडे जातील, वेड्यावाकड्या गेल्या तरी ध्येयाला जाऊन गाठतील, अशी पर्वताला अमर आशा असते. स्वतः वितळून तो हिमालय त्यांना पाणी पुरवतो. “जा, बाळांनो जा, मी श्रद्धावान आहे. गंगे-यमुने, जा. माझा तुमच्यावर विश्वास आहे.” असे तो भव्य हिमालय मुकेपणाने सांगत असतो.

परमेश्वराची अशीच आशा आहे. मानवी प्राणी शेवटी माझ्याकडे येईल. प्रेमाकडे, सहकार्याकडे, ऐक्याकडे, मांगल्याकडे, पावित्र्याकडे येईल, अशी त्याला श्रद्धा आहे. या श्रद्धेनेच तो चंद्र-सूर्य पेटवीत आहे, धान्य पिकवीत आहे.

मनुष्याला या ध्येयाकडे घेऊन जाणे हे धर्माचे काम आहे. संस्कृतीचे हेच प्राप्तव्य, हेच गन्तव्य. संत याच ध्येयाकडे मानवी समाजाला घेऊन जाण्यासाठी तडफडत असतात. संत हे मुक्त असतात. परंतु बद्धांना मुक्त करण्यासाठी ते स्वतः बद्ध होतात. चिखलात रुतलेल्यांना काढण्यासाठी ते पुन्हा चिखलात येतात. वरती दवाखान्यात त्यांना बसवत नाही. रानावनांत भटकणाऱ्या बंधूंना ज्ञानाच्या सोपानाकडे आणण्यासाठी कमर कसून आशेने संत प्रयत्न करतात. स्वतःचे बलिदान देतात.

संत मनुष्याला चुचकारून ध्येयाकडे घेऊन जात आहेत. घोड्याला चुचकारावे लागते, तसेच मानवी प्राण्याचे आहे. संत म्हणतात, “विषयोपभोग घे, संपत्ती जोड, काही हरकत नाही; परंतु थोडी मर्यादा सांभाळ.” खा, पी, झोप घे, विषय भोग, संपत्ती मिळव, मारामारी कर, हिंसा कर; या गोष्टी मनुष्याला शिकविण्याची जरूर नाही. या त्याच्या रक्तातच आहेत. या उपजत वृत्तीच आहेत. धर्म या गोष्टी सांगत नाही. धर्म या वृत्तींना मारीतही नाही. धर्मं म्हणतो, “या वृत्तींना मर्यादा घाल.” तुला खायचे असेल तर खा बाबा. परंतु गड्या, जर बेताने खा. तेलतिखट खाऊ नकोस. शिळेपाके खाऊ नकोस. मांसमच्छर खाऊ नकोस. वाटेल तेव्हा खाऊ नकोस. भूक लागेल तेव्हाच खा. खाण्याची वेळही ठरव. निजायच्या आधी दोन तास खा. खाल्ल्याबरोबर फार व्यायाम करू नकोस. जे पचेल तेच खा. मांसमच्छरही खावयाचे असेल तर वाटेल त्या प्राण्याचे खाऊ नकोस. जे पचण्यासारखे असेल तेच खा. तेथेही नियम पाळ, विचार कर.

तुला झोपायचे असेल तर झोप. परंतु लौकर झोप व लौकर ऊठ. फार झोपू नकोस. त्यामुळे आळस येईल. शरीरही दुबळे बनेल. मोकळ्या हवेत झोप. कुशीवर झोप. पाय लांब करून झोप. रात्रीच्या वेळीच झोप. दिवसा झोपू नकोस. विधिपूर्वक झोप घे.

विषयभोग तुला भोगावयाचा आहे, भोग बाबा. परंतु नेहमीच भोग भोगणे शोभत नाही. पशुपक्षीही संयम पाळतात. तू तर मनुष्य. अमावास्या वर्ज्य कर. अमुक वार वर्ज्य कर. काहीतरी संयम पाळ ज्याप्रमाणे एकच दिवस खूप खाल्लेस तर मरशील, परंतु रोज बेताचे खाल्लेस तर रसनेचे सुख पुष्कळ वर्षे तुला घेता येईल. त्याचप्रमाणे प्रमाणात विषयसेवन करशील तर तुझी शक्ती पुष्कळ काळ पुरेल. तुझ्या सुखासाठी तू बंधन पाळ,

तुला हिंसा करावयाचीच आहे, तर कर बाबा. परंतु तेथेही काही नियम पाळ. विषारी वायू सोडू नकोस; बाँबगोळे फेकू नकोस; गदायुद्धात कमरेखाली मारू नकोस; रात्री लढाई करू नकोस; एकावर अनेकांनी हल्ला करू नका; स्त्रिया, मुले, वृद्ध पुरुष यांना मारू नका; उगीच अन्यायाने मारू नकोस; तुला कोणी मारायला आला तरच प्रतिकार करावयास उभा राहा; कपटाने मारू नकोस.

संपत्ती मिळवावयाची आहे, मिळव. परंतु उत्तम व्यवहाराने मिळव. कोणाला फसवू नकोस. लुबाडू नकोस. चोरीमारी करू नकोस. गरिबाला पिळू नकोस. फार फायदा घेऊ नकोस. फार व्याज घेऊ नकोस. दुसऱ्या देशांतील लोकांना दारू पाजून पैसे नको मिळवू. दुसऱ्या देशांतील लोकांना तलवारीच्या धारेखाली अफू खायला देऊन पैसे नको मिळवू. दुसऱ्या देशांतील लोकांना बेकार करून, त्यांचे उद्योगधंदे मारून त्यांना गुलाम करून पैसे नको मिळवू. दुसऱ्यांची घरे पाडून स्वतःच्या माड्या नको बांधू. दुसऱ्याला नाडून स्वतः नको नटू. दुसऱ्याला रडवून स्वतः नको हसू.

असे धर्म सांगतो. हळूहळू तुम्हांला प्रगतीकडे धर्मस्थापनेचे नर घेऊन जात असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अर्थ आणि काम यांच्या आरंभी धर्म आहे व अंती मोक्ष आहे. मनुष्याचा प्रयत्न मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजे मोकळेपणा, आनंद. मोक्ष म्हणजे दुःखापासून, चिंतेपासून सुटका, मोक्ष म्हणजे परम सुख, केवळ शांती. हा मोक्ष मिळविण्यासाठी मानवाची धडपड आहे. हा मोक्ष कसा मिळेल? वासना-विकारांचा केवळ गोळा असा जो हा दुबळा मानव, त्याला ही परमशांती कशाने मिळेल?

केवळ भोगाने शांती मिळेल का? भोग भोगताना हसणारा व भोगल्यावर रडणारा असा हा मानव आहे. भोगाने खरे सुख नाही. अनिर्बंध मर्यादाहीन भोगात सुख नाही. विधिहीन, व्रतहीन, संयमहीन भोग रडवितो. स्वतःला रडवितो व समाजासही रडवितो. भोग भोगण्याचे प्रयोग मानवाने करून पाहिले आहेत. ययातीने सारखा विषयभोगाचा प्रयोग करून पाहिला. पुनः पुनः तो तरुण होत होता. आपल्या मुलांचे तारुण्य तो घेई व पुनः भोग भोगी. परंतु शेवटी कंटाळला बिचारा। हजारो वर्षे हा प्रयोग करून पुढील सिद्धान्त त्याने मानवजातीला दिला आहे.

"न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति”

कामाचा वर्षानुवर्षे उपभोग घेतला, तरी काम शान्त होणे शक्य नाही.' अग्नीत आहुती दिल्याने अग्नी न विझता अधिकच प्रज्वलित होतो. तेव्हा हा प्रयोग फसला. मग काय करावयाचे? इंद्रिये तर

भोगासाठी लालचावली आहेत. "इंद्रियांची दीनें । आम्ही केलों नारायणे।।"

या इंद्रियांचे आपण गुलाम आहोत. ही इंद्रिये एकदम स्वाधीन कशी करून घ्यावयाची? त्यांना अजिबात भोग न दिला तर ती वखवखतील आणि संधी सापडताच बेफाम होतील. त्यांना उपाशी ठेवणे, बळजबरीने त्यांना माणसाळविणे हेही कठीण आहे. त्यांना मोकाट व स्वैर सोडणे म्हणजेही नाशकारक आहे. भारतीय संस्कृती सांगते, “भोग दे, परंतु प्रमाणात दे. बेताने दे. मोजका दे."

अर्थ आणि काम यांच्या पाठीशी धर्म हवा. आधी धर्माचे अधिष्ठान. धर्माच्या पायावर अर्थ- कामाची मंदिरे बांधा. अर्थ आणि काम यांचा सांगाती जर धर्म असेल, तर तेच अर्थ - काम सुखकर होतील. बद्ध करणारे न होता मुक्त करणारे होतील. अर्थ आणि काम यांच्यातही अर्थाला प्राधान्य. कारण अर्थ नसेल तर कोठला काम? खायला-प्यायला नाही तर मी मरेन. मग कामोपभोग कोठला ? अर्थ म्हणजे कामाची साधने. अर्थाशिवाय कामवासना, निरनिराळ्या विषयभोगेच्छा कशा तृप्त होणार? द्रव्याशिवाय सर्व फुकट. धनधान्याशिवाय काम तडफडून मरेल.

अर्थ आणि काम या ज्या दोन प्रवृत्ती, त्यांतही अर्थाचे स्थान आधी, हे भारतीय संस्कृतीने ओळखले; आणि अशा ह्या दोन वृत्तींच्या पाठीमागे धर्माचे बंधन ठेवले. अर्थ- काम धर्माने नियंत्रित करा. परंतु धर्माने नियंत्रित करणे म्हणजे काय ? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे का शेंडी ? धर्म म्हणजे का गंध ? धर्म म्हणजे का माळा? धर्म म्हणजे का जानवे ? धर्म म्हणजे का हरिहरी म्हणणे ? जप करणे ? धर्म म्हणजे का काही न करता भोग भोगायचे? धर्म म्हणजे का घंटा वाजविणे, शंख फुंकणे? धर्म म्हणजे का वाद्यबंदी ? धर्म म्हणजे का वाद्ये वाजविणे? धर्म म्हणजे काय?

धर्माची अत्यंत शास्त्रीय व्याख्या भारतीय संस्कृतीने केली आहे. “धारणात् धर्मः ही ती व्याख्या. सर्व समाजाचे धारण ज्याने होते तो धर्म धारण कोणाचे? माझे, माझ्या जातीचे, माझ्या देशाचे, मानवजातीचे, का चराचर सृष्टीचे ? मानव हा सर्व सृष्टीतील थोर प्राणी आहे. थोरवी फुकाफुकी मिळत नसते. थोरवी म्हणजे जबाबदारी. मानवाने सर्वांची व्यवस्था लावायची. मानवाच्या नीतिशास्त्रात सर्व सृष्टीचा विचार हवा. मानवाने मानवाशी कसे वागावयाचे याचा विचार पाहिजेच; परंतु पशुपक्ष्यांशी, तृणवृक्षवनस्पतींशी, नदीनाल्यांशी कसे वागावे याचेही विवेचन मानवी नीतिशास्त्र करील.

मनूने आपल्या स्मृतीला 'मानवधर्मशास्त्र' असे नाव दिले. आर्यांचे, भारतीयांचे, असे नाव त्याने दिले नाही. मनू मानवांचा धर्म सांगत आहे. मनू त्याच्या दृष्टीने मानव्याचा आचार सांगत आहे. मनूचे विचार आज पटणार नाहीत. त्याची दृष्टी आज सदोष वाटेल; परंतु मनू मानवजातीचा विचार करीत आहे ही गोष्ट थोर आहे. ‘मानवधर्मशास्त्र' हा शब्दच हृदयाला व बुद्धीला आनंद देतो.

तेव्हा धर्म कल्याण करणार ते मानवजातीचे. मानवेतर सृष्टी क्षणभर दूर ठेवू या. निदान मानवाचे कल्याण तरी पाहू या. मनू सांगतो, “सर्व मानवांचा विचार करा.” अर्थशास्त्र सर्व मानवजातीच्या कल्याणावर उभारलेले असले पाहिजे. जे अर्थशास्त्र विवक्षित जात, विवक्षित धर्म, विवक्षित राष्ट्र यांचाच विचार करते, ते अर्थशास्त्र धर्ममूल नाही. धर्ममूल अर्थशास्त्र सर्वांचा विचार करील.

हिंदुस्थानला भिकारी करून इंग्लंड धन - कनक - संपन्न होणार असेल, तर इंग्लंडचे अर्थशास्त्र अधर्ममूलक आहे. चीनचा गळा दाबून जपान गबर होत असेल, तर जपानचे अर्थशास्त्र अन्यायाचे आहे. अनार्य जातींना दास करून केवळ आर्यांचा उदो उदो करू पाहणारे अर्थशास्त्र सदोष आहे. मुसलमानांस वगळून केवळ हिंदूंना श्रीमंत करणारे अर्थशास्त्र सनातन संस्कृतीचे नाही. ब्राह्मणेतरांना वगळून ब्राह्मण श्रीमंत होऊ पाहतील, हरिजनांना वगळून ब्राह्मणेतर धनिक होऊ पाहतील, महाराष्ट्राला मारून गुजरात श्रीमंत होत असेल, बंगालला बुडवून मारवाडी कुबेर होत असतील, तर तेथे धर्ममय अर्थशास्त्र आहे असे म्हणता येणार नाही. कुळांना लाचार करून, रात्रंदिवस गुलामांप्रमाणे राबवून, त्यांनी पिकविलेले आयते आपल्या कोठारात भरून श्रीमंत होणारा जमीनदार पापी आहे; मजुरांना दहा-दहा तास बैलांप्रमाणे राबवून पोटभर खायला न देणारा, त्यांच्या राहण्याची नीट सोय न लावणारा, त्यांच्या मुलांबाळांची फिकीर न करणारा, त्यांना पगारी रजा न देणारा, त्यांच्या सुखाची काळजी न करणारा, असा श्रीमंत होणारा कारखानदार हा पापी आहे. ह्या सर्वांचे अर्थशास्त्र अन्यायावर, अधर्मांवर उभारलेले आहे. शेतकऱ्याला पिको न पिको, भरमसाट व्याजाचे दर आकारून त्याच्या पिकावर जप्ती नेऊन त्याच्या घरादारवर नांगर फिरविणारा, त्याची आवडती गायीगुरे बांधून घेऊन जाणारा, मुलाबाळांना अन्नास मोताद करणारा, खुशालचेंडू, हृदयहीन, कृपणमति सावकार हा अधर्माचे अर्थशास्त्र चालवीत आहे.

आज सर्व जगात हेच अधर्माचे अर्थशास्त्र अमलात आहे. म्हणून तर सर्वत्र विषमता आहे; म्हणून दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचा सुकाळ आहे. काही भांडवलवाले सर्व जगावर सत्ता गाजवीत आहेत. भारतीय संस्कृती ही गोष्ट सहन करणार नाही. भारतीय संस्कृती अद्वैतावर उभारलेली, समाजधारणेवर उभारलेली आहे.

"सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु ॥"
ही भारतीय संस्कृतीची ध्येये आहेत. एकाला सुखी करण्यासाठी, एकाला चैनीत लोळावयास मिळावे म्हणून लाखो लोकांनी कसे तरी कीडमुंगीप्रमाणे जगावे, मर मर मरावे, असे भारतीय संस्कृती सांगत नाही.

"अवघाचि संसार सुखाचा करीन ।

आनंदे भरीन तिन्ही लोक ॥"

ही भारतीय संतांची घोषणा आहे. सर्वांना सुखी व समृद्ध करण्याचा झेंडा संतांनी खांद्यावर घेतला आहे. मजुरांना पशूंप्रमाणे, गुलामांप्रमाणे वागवणारे दांभिक कारखानदार, शेतकऱ्यांना पिळणारे दांभिक सावकार, कुळांना गांजणारे खोत व जमीनदार, आणि या पिळवणुकीला आशीर्वाद देणारे दांभिक संत-महंत हे भारतीय संस्कृतीचे उपासक नाहीत. सनातन संस्कृती त्यांना कळत नाही, समजत नाही. विशाल हृदयाच्या थोर ऋषींनी भारतीय संस्कृती निर्मिली आहे. संकुचित व क्षुद्र वृत्तीच्या अनुदार लोकांना ती समजेल असे मला वाटत नाही. आज भारतीय संस्कृतीच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक विषमता निःशंक पाहात आहेत. त्यांना त्याचे दुःख नाही. श्रमहीन छळणाऱ्या श्रीमंतांना त्यांचे शत आशीर्वाद आहेत. हे श्रीमंत किती जणांना रडवीत आहेत इकडे त्यांचे लक्ष नसते. “भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती" म्हणून गाजावाजा करणारे हे लोक भारतीय संस्कृतीचा वध करीत आहेत! संतांना व ऋषींना धुळीत मिळवीत आहेत ! उपनिषदे व वेदान्त यांना मूठमाती देत आहेत! भारतीय संस्कृतीचा आत्मा साम्यवादीच ओळखू शकेल. "दरिद्रान् भर कौन्तेय"

असा महाभारतात अर्थशास्त्राचा सिद्धान्त सांगितला आहे. जो दरिद्री आहे त्याचे भरण केले पाहिजे. जे खळगे असतील ते भरून काढले पाहिजेत. परंतु एकीकडे खळगे भरून काढावयास दुसरीकडच्या टेकड्या खणाव्या लागतील. आज समाजात एकीकडे पैशाचे ढीग आहेत आणि दुसरीकडे कवडीही नाही. हे पैशाचे ढीग सर्वत्र वाटून दिले पाहिजेत.

समाजातील संपत्तीची साधने समाजाच्या मालकीची हवीत. व्यक्तीची त्याची मालकी अपायकारक आहे. विशेषतः प्रचंड उत्पादनाची साधने तरी खाजगी असता कामा नयेत. याशिवाय समाजातील हे खळगे दूर करता येणार नाहीत. समाजात जी संपत्ती निर्माण होईल तिचे नीट विभाजन झाले पाहिजे.

आजपर्यंत जो तो आपल्या विशेष गुणधर्माची विशेष किंमत करीत असे. परंतु कोणत्याही कर्माची, कोणत्याही कौशल्याची किंमत आपण कशी ठरविणार? मजुराच्या आठ तास अंग मोडून केलेल्या कामाची का दोन आणेच किंमत, आणि डॉक्टराच्या पाच मिनिटे भेटीची का तीन रुपये किंमत? कारकुनाच्या कामाची का महिना पंधरा रुपयेच आणि मामलेदाराच्या श्रमाची चारशे रुपये ? प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या अध्यापनाची का वीस रुपये किंमत, आणि प्राफेसराच्या प्रत्यही दोन-तीन तास शिकविण्याची का हजार-पाचशे किंमत ? थंडीवाऱ्यात, रात्री-बेरात्री दिवा दाखविणाऱ्या रेल्वेच्या कामगाराची का दहा रुपये किंमत, आणि गाडीवरून हिंडणार इंजिनियर त्याच्या श्रमांची का पाचशे रुपये किंमत? रस्ता झाडणाऱ्याला महिना पाच रुपये आणि एका गवयाच्या तासभर गायनाला पाचशे रुपये ?

या किंमती कोण ठरवितो? हे मोल कसे निश्चित करावयाचे? एखाद्या मिलचा मालक म्हणतो, “मी प्रथम माझे भांडवल घातले. मी हिंडलो, शेअर जमविले, भांडवल वाढविले, सर्व योजना आखली, संघटना केली, म्हणून ही गिरणी उभी राहिली. माझ्या कर्तबगारीची किंमत करता येणार नाही. मजुरांना थोडीशी मजुरी देऊन बाकी उरेल तो सारा फायदा माझ्या संघटनाबुद्धीची, माझ्या कल्पकतेची, माझ्या या व्यवस्थाचातुर्याची किंमत आहे; मी ती घेणार. यात अन्याय नाही. यात अधर्म नाही. माझ्या विशेष गुणांचा मोबदला मी का न घ्यावा?"

एखादा बलभीम येऊन जर म्हणेल, “मी बलवान आहे. माझ्या शक्तीचा मी वाटेल तसा उपयोग करीन. इतरांस तुडवीन, बुडवीन, छळीन, पिळीन.” तर ते योग्य होईल का? माझ्याजवळ शक्ती आहे ती इतरांच्या रक्षणार्थ आहे, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. कारण माझी शक्ती माझी नाही. तीही समाजाने दिली आहे. समाजाने मला खायला-प्यायला दिले, सृष्टीने मला प्रकाश दिला, हवा दिली म्हणून मी जगलो, बलवान झालो. माझी शक्ती मी मला वाढविणाऱ्या समाजाच्या सेवेत खर्चिली पाहिजे.

भारतीय संस्कृती सांगते की आपापल्या वर्णांप्रमाणे सेवेची कर्मे उचला. परंतु त्या कर्मांत प्रतवारी लावू नका. बौद्धिक कर्माची विशेष किंमत, शारीरिक श्रमांची कमी किंमत असे नका लेखू. कोणत्या कर्माची कोणत्या क्षणी किती किंमत येईल, त्याची कल्पना करता येणार नाही. ज्याने त्याने आपापल्या विशिष्ट गुणधर्माप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या पात्रतेप्रमाणे कर्म करावे. ज्याला देखरेख करता येईल त्याने देखरेख करावी; यंत्र दुरुस्त करता येईल त्याने यंत्र दुरुस्त करावे; यंत्र चालविता येईल त्याने ते चालवावे. कर्मे निरनिराळी असली म्हणून त्यांचा मोबदला कमीअधिक नको.

लायकीप्रमाणे काम व जरुरीप्रमाणे मोबदला, हा धार्मिक अर्थशास्त्राचा सिद्धान्त आहे. दोन मजूर आहेत, एक अधिक कुशल आहे, दुसरा तितका नाही; परंतु जो कुशल आहे, त्याला दोनच मुले आहेत व जरा कमी कुशल आहे त्याला चार मुले आहेत असे समजा. तर हुशार मजुरापेक्षा त्या कमी कुशल मजुराला अधिक मजुरी द्यावी लागेल. कारण त्याची गरज अधिक आहे. समाजाने त्या मुलांची स्वतंत्र रीतीने तरी व्यवस्था करावी किंवा त्या मजुराला मजुरी तरी अधिक द्यावी.

कारकुनाला चार मुले असतील व मामलेदाराला मुळीच मूल नसेल. तर कारकुनाला पन्नास रुपये पगार द्यावा व मामलेदाराला पंधरा द्या. मामलेदार झाला म्हणजे तो खंडीभर खातो अशातला भाग नाही. पगार हा आवश्यक गरजा भागविण्यासाठी आहे. मामलेदाराला हिंडावे लागत असेल तर त्याची व्यवस्था सरकार निराळ्या रीतीने करील. परंतु केवळ खाण्यापिण्यासाठी म्हणून अधिक पगार नको. मामलेदाराकडे पुष्कळ लोक येणार- जाणार त्यांच्यासाठी कायमचा एक बंगला बांधून ठेवण्यात येईल म्हणजे झाले.

मामलेदार अधिक लायक असतील, अधिक शिकलेले असतील, कायद्याचा नीट अभ्यास केलेले असतील, तर त्यांच्या हातात सत्ता अधिक द्या. त्यांच्या लायकीचे काम द्या. परंतु पगार हा लायकीवर अवलंबून ठेवणे योग्य नाही. लायकीप्रमाणे काम व जरुरीप्रमाणे पगार, हे तत्त्व अमलात आणले म्हणजे वर्णधर्म पाळला असे होईल. वर्णधर्म म्हणजे लायकीप्रमाणे समाजाचे काम उचलणे व पोटापुरते लागेल ते घेणे.

भारतीय संस्कृतीत जे यज्ञतत्त्व सांगितले आहे त्यात महान अर्थ आहे. वर्णधर्मात लायकीप्रमाणे कर्म उचला हे तत्त्व आहे, तर यज्ञधर्म सांगतो की, सर्वांची काळजी घ्या. यज्ञ म्हणजे काय ? यज्ञ या शब्दात खोल अर्थ आहे. देवासाठी यज्ञ करावयाचा. देव आपणांस पाऊस देतात, प्रकाश देतात, वारे देतात. देव आपणांसाठी झिजतात. देव झिजतात तर त्यांची झीज आपण भरून काढली पाहिजे. यासाठी आपण देवांना हविर्भाग द्यावयाचा. आपणांजवळची जी तुपाची संपत्ती, तिचा भाग देवांना अर्पण करावयाचा. देव आपणांसाठी झिजले, आपण देवांसाठी झिजू या. म्हणजे परस्परांची झीज भरून काढणे. तू माझ्यासाठी झीज, मी तुझ्यासाठी झिजतो. मी तुला जीवन देतो, तू मला जीवन दे. "जीवो जीवस्य जीवनम् "

या वचनाचा एकप्रकारे विशेषही अर्थ आहे. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाचे जीवन आहे. प्रत्येक प्राणी दुसऱ्यासाठी झिजत आहे. आपण सारे एकमेकांसाठी झिजून, त्याग करून, एकमेकांना जीवन देत आहोत.

कारखानदार मजुरासाठी झिजला, मजूर त्याच्यासाठी झिजोत. कुळे खोतासाठी झिजली, खोत कुळांसाठी झिजो. शेतकरी सावकारासाठी झिजले, सावकार त्यांच्यासाठी झिजो. प्रजा सरकारसाठी झिजते, सरकार प्रजेसाठी झिजो. परस्परांची झीज भरून काढू या.

आपण शेती करतो, पृथ्वीची झीज होते. ती झिजून आपणांस धान्य देते. तिचा कस, तिचे सत्त्व कमी होते. आपण तिची झीज भरून काढली पाहिजे. आपण तिला नांगरून ठेवतो. सूर्याची उष्णता तिच्या आत शिरते. आपण तिच्यात खत घालतो. अशा रीतीने तिचा कस पुन्हा भरून काढतो. आपण पृथ्वीसाठी जी ही झीज सोसली. उन्हात नांगरले, खत ओतून पैसे खर्च केले, ही जी आपण शारीरिक व आर्थिक झीज पृथ्वीसाठी केली, ती झीज उत्कृष्ट पीक देऊन पृथ्वी भरून काढते. ती माझ्यासाठी झिजते, मी तिच्यासाठी झिजतो.

गीतेच्या तिसऱ्या अध्यायात हे महान यज्ञतत्त्व सांगितले आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करतानाच यज्ञतत्त्व निर्माण केले आहे.

“सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।

अनेन प्रसविष्यध्वम् एष वोऽस्त्विष्टकामधुक् ।। प्रभू म्हणाला, “लोकहो! हा यज्ञही तुमच्याबरोबर मी निर्माण केला आहे, या यज्ञाने सर्व काही मिळवून घ्या. यज्ञालाच कामधेनू समजा.” परमेश्वराने सकलसुखाचे साधन जे यज्ञ, ते आपल्या स्वाधीन केले आहे. परमेश्वराच्या नावाने आता रडण्यात काही अर्थ नाही. त्याच्या नावाने हाका मारू नका. त्याच्या नावाने बोटे मोडू नका. आपणांस जर दुःख असेल, समाजात जर विषमता असेल, दुःख-द्ररिद्र्य असेल, समाजात जर असमाधान, अशांती असेल, प्रक्षुब्धता असेल, तर आपण यज्ञधर्माची नीट उपासना नाही केली हेच त्याचे कारण. ते दुःख दूर व्हावे असे वाटत असेल, तर आपण यज्ञाची पूजा केली पाहिजे. यज्ञ म्हणजेच साधन, यज्ञ म्हणजेच धर्म, यज्ञ म्हणजेच ईश्वर. आपण ईश्वराचे वर्णन “ यज्ञस्वरूपी नारायण” असे केले आहे.

आज मानवी समाजात हे यज्ञतत्त्व पाळण्यात येत नाही, म्हणून मानवी समाज दुःखी आहे. काही वर्ग दुसऱ्यासाठी सारखे झिजत आहेत. परंतु त्यांची झीज भरून काढण्यासाठी मात्र कोणी झिजत नाही. मजूर झिजून झिजून भांडवलदारांसाठी चिपाड होत आहेत. भांडवलदार झिजून झिजून मजुरांसाठी चिपाड होत नाही. तो सारखा लठ्ठच होत आहे ! त्याच्या मोटरी वाढत आहेत. त्याची चैन वाढत आहे. मजूर सुखी व्हावेत म्हणून ही चैन कमी होत नाही. परंतु सृष्टी सांगते, “मेघांसाठी नद्या कोरड्या झाल्या, वापी - तलाव शुष्क झाले, पुष्करिणी आटल्या; परंतु त्यांना भरून टाकण्यासाठी मेघ रिकामे होतील.” मेघाजवळची पाण्याची संपत्ती नदीवाल्यांनी उन्हाने वाफाळून दिली आहे. त्या नदीनाल्यांची ती तपश्चर्या, ती प्राणमय सेवा मेघ विसरत नाहीत. ते कृतज्ञतेने ओथंबून खाली येतात व सर्वस्व अर्पण करून रिते होतात. पुन्हा त्या भरलेल्या नद्या प्रेमाने आटून मेघांना भरून टाकतात. असा या प्रेमाचा अन्योन्य यज्ञधर्म आहे.

मजुरांनी म्हणावयाचे, “शेठजी ! तुमच्यासाठी आम्ही यंत्राजवळ झिजतो, सारी संपत्ती तुमच्या हातात देतो; घ्या.” शेठजीने म्हणावयाचे, “बंधूंनो! ही सारी संपत्ती पुन्हा तुमच्यासाठी मी देऊन टाकतो; घ्या.” अशा रीतीनेच समाजात आनंद राहील.

परस्पर जर याप्रमाणे वागतील, तर समाजात समता राहील.

एकीकडे खळगे व एकीकडे टेकाडे दिसणार नाहीत. एकीकडे प्रचंड प्रासाद व एकीकडे क्षुद्र झोपड्या हे दुःख दिसणार नाही. एकीकडे आनंदमय संगीत तर दुसरीकडे शोकाचे रडगाणे, असा हृदयभेदक देखावा दिसणार नाही.

पाण्याचा धर्म समान पातळीत राहणे हा आहे. तुम्ही पाण्यातून एक घागर भरून घ्या. तेथे झालेला तो खळगा भरून काढण्यासाठी आजूबाजूचे सारे जलबिंदू धावतात. तो खळगा भरून येतो. एका क्षणार्धात भरून निघतो. तो खळगा पाहण्यास आजूबाजूच्या बिंदूंना आनंद वाटत नाही. परंतु याच्या उलट रस्त्यावरचे खडीचे ढीग पाहा, एकाबाजूने खडी नेलीत तर तेथील खळगा भरून काढण्यासाठी आजूबाजूची खडी धावणार नाही. तो खळगा आपणांस दिसतो. चार-दोन खडे, अगदी जवळचे खडे धावतात. परंतु पुष्कळ गंमतच पाहतात. दगडत ते! त्यांना थोडेच दुःख आहे?

समाजात हीच दगडांची स्थिती आहे. पाण्याच्या बिंदूप्रमाणे आपण सहृदय नाही म्हणूनच जीवन सुकत चालले आहे. आपण परस्परांचे खळगे भरून काढून समता निर्मीत नाही. यज्ञधर्माचा लोप झाला आहे. अग्निहोत्रांचे यज्ञ व बोकडांचे यज्ञ विक्षिप्त लोक पुन्हा सुरू करीत आहेत. परंतु “ परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ” – एकमेकांची काळजी घेऊन, एकमेकांबद्दल भावना बाळगून, आनंद मिळवून घ्या; खरे कल्याण, खरे श्रेय (स्वतःचे फक्त नव्हे) प्राप्त करून घ्या असे जे भगवद्गीत यज्ञकर्म, त्याचे पुनरुज्जीवन करावयाचे कोणाच्याच मनात नाही. आणि “हे यज्ञकर्म करा; झिजणाऱ्या मजुरांची, श्रमणाऱ्या शेतकऱ्यांची झीज नीट भरून काढा” असे अट्टहासाने सांगणाऱ्या साम्यवादी, ध्येयवादी जवाहरलालसारख्यांचीं धर्मशून्य म्हणून संभावना होत आहे! जवाहरलाल गीतेचा महान यज्ञधर्म आचरा व परमश्रेय प्राप्त करून घ्या असे सांगत आहेत. थोर यज्ञधर्माची दीक्षा यज्ञहीनांस देऊ पाहणारे ते थोर धर्मसेवक आहेत.

साम्यवादी लोक म्हणत असतात, “धर्म वगैरे आम्हांस काही समजत नाही. धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. आम्हाला सर्वांना सुखी कसे करावे याची प्रखर चिंता आहे. हाच आमचा धर्म." साम्यवादी लोक 'धर्म' या शब्दाला का कंटाळणार नाहीत? जो धर्म लाखो लोकांची दैना आनंदाने बघतो, तो का धर्म? त्या धर्माचे नाव त्यांना कसे सहन होईल?

केनोपनिषदात म्हटले आहे, “अविज्ञानं विजानताम् । विज्ञानं अवि-जानताम्।” जो म्हणेल की मला समजते, त्याला काहीही समजले नाही; आणि जो म्हणेल की मला काही कळत नाही, त्यालाच सारे कळले. त्याप्रमाणे जे धर्म धर्म म्हणून शंख करतात व लाखो लोकांची उपासमार होत असता सुखात नांदतात, त्यांना धर्म नाही. आणि जे “धर्मबिर्म आम्हांस समजत नाही, परंतु सारा समाज सुखी, आनंदी, ज्ञानी कसा होईल असा ध्यास आम्हांला लागला आहे, यासाठी आम्ही जगू, मरु...” असे म्हणतात व रात्रंदिवस तडफडत काम करतात, रक्ताचा बिंदून् बिंदू आटवितात, त्यांच्याजवळ धर्माची पवित्र मूर्ती आहे.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले।। तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।

ज्ञानेश्वरीवर, गीता-भागवतावर प्रवचने करणारे, श्रम न करता शिरा- पुरी खाणारे, पाद्यपूजा घेणारे, पुड्या खाणारे, सुखात राहून अद्वैतावर भाषणे करणारे, हे संत नव्हत. त्यांच्याजवळ ना देव, ना धर्म. धर्म त्याच्याजवळ आहे, जो रंजल्या-गांजल्यांची बाजू घेतो, त्यांना पोटाशी घेतो.

दया करी जे पुत्रांसी । तेचि दासा आणि दासी।

अशा भेदातीत वृत्तीने सर्वांची दुःखे दूर करावयासाठी तो प्राणपर कष्ट करतो. हिंदु-मुसलमान बघत नाही. पीडलेले सारे मजूर-शेतकरी माझे; त्यांच्यासाठी मी तळमळेन. स्पेनमधील गरीब जनता तडफडत आहे का? एक आणा त्यांना पाठवून दे. पैसा नसेल तर सहानुभूती तरी दाखवू दे. त्यांचे दुःख ते माझे दुःख आहे. माझा केवळ सहानुभूतीचा शब्दही त्यांना धीर देईल. आज सारी सृष्टी जवळ येत आहे. आगगाडी, आगबोट, विमान, बिनतारी यंत्रे, आकाशवाणी, सर्व साधनांनी मानव जवळ जवळ येत आहे. दूर दूर असलेले भाऊ जवळ येत आहेत. घेऊ दे त्यांना जवळ. त्यांच्यापासून का मी दूर राहू? माझा हात सर्वांसाठीच आहे, माझे अश्रू सर्वांसाठी आहेत, माझे हृदय सर्व पददलितांसाठी तडफडत आहे, असे जो म्हणेल, असा जो वागेल, हे ज्याचे महनीय-स्तवनीय ध्येय, त्याच्याजवळ संतत्व आहे, ऋषित्व आहे. त्याच्याजवळ खरा धर्म आहे. देव कोठे असलाच तर त्याच्याजवळ असण्याचाच संभव आहे.

तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनीं ।

अशा महान सज्जनांजवळ प्रत्यक्ष रोकडा देव आहे.

अग्नी म्हणजे देवांचे मुख. आपणांसाठी झिजलेल्या देवांचे तोंड म्हणजे अग्नी. या, आहुती द्या म्हणजे देव तृप्त होतील.

अग्निर्वै देवानां मुखम् ।

हा अग्नी कोठे आहे? लाखो श्रम करणाऱ्या लोकांचा जठराग्नी पेटला आहे, त्या अग्नीत आहुती द्या. त्या श्रमणाऱ्या देवांच्या पोटात आग पेटली आहे; ती आग शांत करण्यासाठी उठा सारे सनातनी, उठा सारे शेठसावकार, उठा धर्माच्या नावाने गप्पा मारणाऱ्या खोतांनो, जमीनदारांनो, संतमहंतांनो, महाराजांनो! हा भावाबहिणींच्या, त्यांच्या गोड मुलांबाळांच्या पोटांतील अग्नी तृप्त करणे म्हणजे महान यज्ञ. म्हणजे खरा धर्म.

परंतु हा यज्ञ सनातनींस समजेनासा झाला आहे. लाखो गरिबांची हायहाय त्यांना दिसत नाही. त्यांची बुद्धी मेली आहे, हृदय सडले आहे. केवळ कार्पण्य त्यांच्याजवळ उरले आहे. दुसऱ्यांची उपासमार पाहून त्यांचे पोट दुखत नाही. सज्जनगडावरची एक गोष्ट जुने लोक सांगतात. दासनवमीचा सज्जनगडावर नऊ दिवस उत्सव असतो. नऊ दिवस गडावर येणाऱ्या सर्वांना जेवण मिळते. समर्थांच्या गादीवर जे महाराज असतील त्यांनी गडावर कोणी उपाशी नाही ना, अशी सर्वत्र चौकशी करून मग रात्री जेवावयाचे. एकदा काय झाले, असा उत्सव चालला होता. परंतु एके दिवशी मध्यरात्री महाराजांचे पोट दुखू लागले. काही केल्या राहीना. शेवटी महाराज म्हणाले, “गडावर कोणी उपाशी तर नाही ना राहिला? जा, पाहून या.” मंडळी मशाली पाजळून धावली. चौकशी सुरू झाली. एका झाडाखाली एक माणूस - अंधळा का पांगळा भुकेने तडफडत होता. मंडळींनी त्याला उचलून नेले. महाराजांनी त्याला गोड बोलून पोटभर जेवू घातले. महाराजांचे पोट दुखावयाचे थांबले. गरिबाचे पेटलेले पोट शांत होताच महाराजांचे पोट शांत झाले!

अशी ही धर्ममय पोटदुखी किती संस्कृतिसंरक्षकांना आहे? धर्माच्या गावाने कंठशोष करणाऱ्यांत आहे? दुसऱ्यांची पेटलेली पोटे, ती यज्ञकुंडे, ते पवित्र जठराग्नी शांत होत नाहीत म्हणून किती जणांना अशान्ती वाटते, किती जणांचे डोळे दुःखाने ओले होतात? संतापाने पेटतात? ज्याचे पोट दुखेल तो खरा समर्थांचा भक्त, ज्याचे असे पोट दुखेल तो भारतीय संस्कृतीचा खरा उपासक; तो संतांच्या सेवक, ऋषींचा पूजक; म्हणून महात्माजी, जवाहरलाल यांसारखे तळमळणारे आत्मे हे खरोखरच संस्कृतिसंरक्षक आहेत; संतांचे व ऋषींचे सत्पुत्र म्हणून शोभतात. खरे अग्निहोत्र त्यांनी चालविले आहे व महान प्रखर दीक्षा शेकडो तरुणांस ते देत आहेत.

धर्ममय अर्थशास्त्र अशा दृष्टीने आहे. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांतील ‘अर्थ' अशा थोर धर्माच्या पायावर उभारला गेला पाहिजे. सर्व समाजांतील शक्तीचे नीट धारण होईल, नीट पोषण होईल, अशा स्वरूपाचे हे अर्थशास्त्र पाहिजे. सर्व मानवजातीचे हित पाहणारे असे मग हे अर्थशास्त्र होईल. या अर्थशास्त्राला अजून आरंभही झाला नाही. म्हणून जगात मोक्ष किंवा स्वातंत्र्य अद्याप कोठेच नाही. मोक्षाचा जन्म अद्याप व्हावयाचा आहे. आपण सारे गुलाम आहोत. हिंदुस्थानच इंग्लंडचे गुलाम आहे असे नाही, तर इंग्लंडही हिंदुस्थानचे गुलाम आहे. हिंदुस्थान माल घेईल तरच इंग्लंड जगणार! चार नोकर श्रीमंत धन्याला कुबड्या देऊन चालवितात, त्यातलाच हा प्रकार आहे. ते नोकर त्या श्रीमंताचे गुलाम व तो श्रीमंत त्या नोकरांचा गुलाम ! ते नोकर जर आधार देणार नाहीत, तर तो लुळापांगळा श्रीमंत धुळीस मिळेल. हिंदुस्थान इंग्लंडचा आधार काढून घेईल तर इंग्लंड मरेल. दुसऱ्यास गुलाम करणारा स्वतःही नकळत गुलाम होत असतो. जे पेरावे ते मिळत असते. एक श्रीमंत गुलाम, एक दरिद्री गुलाम ! एक ढेरपोट्या गुलाम व एक पोटाची दामटी वळलेला गुलाम ! एक गाल वर आलेला गुलछबू गुलाम, एक बसक्या गालांचा निस्तेज गुलाम ! परंतु शेवटी दोघेही गुलामच !

जगात जोपर्यंत धर्ममय अर्थशास्त्र येत नाही, सर्वोदय करणारे, मानवास साजेसे अर्थशास्त्र येत नाही, तोपर्यंत जगात खरे स्वातंत्र्य नाही. आज स्वातंत्र्याची सोंगे आहेत. स्वातंत्र्याच्या पडछाया आहेत. स्वातंत्र्याची पिशाचे आहेत. खरे मंगलदायक व आनंददायक, सर्वांचा सर्वांगीण विकास निरपवाद करू पाहणारे स्वातंत्र्य अद्याप बहुत दूर आहे. पृथ्वीला या मंगलमय बालकाच्या प्रसववेदना थोड्या थोड्या होऊ लागल्या आहेत. परंतु पृथ्वीच्या पोटाच्या एका कोपऱ्यात या कळा सुरू झाल्या आहेत. परंतु प्रसववेदना पूर्ण होऊन दिव्य स्वातंत्र्य-बालक जन्माला यावयास किती युगे लागतील, ते कोण सांगू शकेल?

धर्ममय अर्थशास्त्र, त्याप्रमाणेच धर्ममय कामशास्त्र. भारतीय संस्कृती कामाला गाडू पाहात नाही. काम म्हणताच कानांवर हात ठेवू पाहणारी ती नाही. मानवी विकारांची व्यवस्था लावणारी ही संस्कृती आहे. विकारातून विकास करू पाहणारी ही संस्कृती आहे. श्रीमद्भगवद्गीता म्हणते:

"धर्माऽविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ।"

ज्या कामाचा धर्माशी विरोध नाही तो मर्यादित काम म्हणजे माझेच स्वरूप. तो मर्यादित काम म्हणजे मी परमेश्वर. ती माझीच एक दिव्य विभूती !

भारतीय संस्कृतीने कामालाही धर्माचे अधिष्ठान दिले. आणि धर्म म्हणजे समाजाचे धारण; मानवजातीचे धारण. माझ्या विषयभोगाने समाजाचे स्वास्थ्य बिघडता कामा नये, समाजात अशांती उत्पन्न होता कामा नये, समाजात दुःख, दैन्य, दास्य, दारिद्र्य उत्पन्न होता कामा नये, माझा विषयभोगही समाजाला सुखकर झाला पाहिजे.

काम या शब्दात पंचेंद्रियांचे जरी भोग असले, तरी मुख्यतः स्त्री-पुरुष संबंधच आपल्या दृष्टीसमोर उभा राहतो. आणि स्त्री- पुरुषसंबंध ही महत्त्वाचीच गोष्ट आहे. या संबंधावर समाजाचे स्वास्थ्यच नव्हे, तर समाजाचे अस्तित्वही अवलंबून आहे.

'अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ।'

सदैव विषयातच जो रमला, तो दीन-दुबळा होणार. त्याला उत्साह राहणार नाही. मग समाजाची सेवा तो काय करणार? स्वतःचे कर्म नीट कसे पार पाडणार? समाजाचे कर्म नीट पार पाडता यावे म्हणून आपण मर्यादितच विषयसुख घेतले पाहिजे.

स्त्री-पुरुषांचे परस्परसंबंध प्रेमाचे हवेत. स्त्री म्हणजे काही सत्तेची एक वस्तू नाही. तिला हृदय आहे, बुद्धी आहे, तिला भावना आहेत. तिला स्वाभिमान आहे. तिला आत्मा आहे. तिला सुख- दुःख आहे. या सर्व गोष्टींची जाणीव पुरुषाने ठेविली पाहिजे. स्त्री म्हणजे जगातील महान शक्ती. या शक्तीशी वागणाऱ्या पुरुषाने शिव झाले पाहिजे. शिव व शक्ती यांच्या प्रेमावर सर्व समाजाचा प्राण अवलंबून आहे. शिव व शक्ती यांच्या प्रेममय परंतु संयममय संबंधापासूनच कर्तृत्ववान कुमारांचा संभव होत असतात. शौर्य- धैर्याचे सागर, विद्येचे आगर असे सत्पुत्र जन्माला येतात.

मनुष्याने नेहमी आपल्या कृतीचा परिणाम काय होईल याचा विचार करून त्या कृतीला आरंभ केला पाहिजे. स्त्री- पुरुषसंबंधापासून मुलेबाळे जन्मणार. एक मूल जन्माला घालणे म्हणजे एक देवाची मूर्ती निर्माण करणे होय. या देवाची आपणांस नीट काळजी घेता येईल का, याला पोटाला पुरेसे देता येईल का, याच्या वर्णाचा नीट विकास करता येईल का, याचा विचार आईबापांनी करावयास हवा. नाही तर घरात खंडीभर मुले चिरचिरी, रोगी दिसत आहेत; त्यांना ना शिक्षण, ना संरक्षण. अशाने सुखाचा संसार कसा होणार, आणि तो समाजही कसा तेजस्वी राहणार? त्या समाजाचे धारण कसे होणार?

खरे पाहिले तर अर्थशास्त्र सुधारल्याशिवाय कामशास्त्र सुधारणार नाही. धर्ममय, समाजाचे नीट धारणपोषण करणारे, सर्वांचा विकास करू पाहणारे अर्थशास्त्र जोपर्यंत नाही, तोपर्यंत तेजस्वी कामशास्त्र तरी कसे संभवणार? मजुराला का आम्ही ब्रह्मचर्याचे धडे शिकवीत बसायचे? वरच्या वर्गांनी वाटेल तशी चैन करावयाची आणि मजुरांच्या मुलांची उपासमार व्हावयाची! श्रीमंत दोन तऱ्हाांनी पाप करीत आहेत. श्रीमंत आता संततिनियमन करून खुशाल माड्या-महालांत भोग भोगीत असतात; समाजाला बालकेही ते देत नाहीत. समाजाचे हे महान कर्म ते टाळू पाहात आहेत. समाजात संपत्तीची निर्मिती मजुरांनीच करावयाची आणि मुलांची निर्मिती करून समाजाचे अस्तित्वही त्यांनीच टिकवावयाचे! परंतु मजुरांच्या मुलांना पोटभर खायला मिळेल अशी व्यवस्थाही हे श्रीमंत करू इच्छीत नाहीत. श्रीमंत स्वतः संतती निर्माण करीत नाहीत; आणि जे संतती निर्माण करतात त्यांच्याजवळ संपत्ती निर्माण करूनही संपत्ती नाही. गरिबांनीच झिजून संपत्ती निर्माण करावयाची आणि गरिबांच्या बायकांनीच झिजून संतती निर्माण करावयाची! मेणबत्ती बिचारी दोन्हीकडून पेटली, तर लवकरच खलास होईल, झाले!

मजुरांजवळ पोटाला पुरेसे नाही आणि संततिनियमनाची साधनेही त्यांच्याजवळ नाहीत. संततिनियमनाविरुद्ध सनातनी आरडाओरड करतात. परंतु मजुरांच्या मुलांना पोटभर खावयाला मिळेल, त्या मुलांच्या वर्णांप्रमाणे त्यांना शिक्षण मिळेल, असे धर्ममय अर्थशास्त्र समाजात निर्माण करण्यासाठी मात्र ते ओरडत नाहीत! जोपर्यंत समाजात ही विषमता आहे, तोपर्यंत गरिबाला संततिनियमनाशिवाय कोणता मार्ग? त्याला का ब्रह्मचर्याचे उपदेश पाजणार? ती दुःखावर डागणी आहे.

परंतु हे संततिनियमनाचे ज्ञान तरी मजुराला कोण देणार? ज्ञानाची साधनेही श्रीमंतांसाठीच आहेत. ते उपायही श्रीमंतच करू शकतात. औषधाला दिडकी ज्याच्याजवळ नाही, तो कोठून आणणार डॉक्टर ? साध्या आरोग्याचे ज्याला ज्ञान नाही. तो या गुंतागुंतीच्या शास्त्रात कसा नीट वागणार? मजुराच्या संसारात खायला नाही, ल्यायला नाही, शिकायला नाही, तेथे सारा अंधार आहे! मुले उत्पन्न होणार व समाज दिवसेंदिवस दीन-दरिद्री, दुःखी होणार!

धर्ममय अर्थशास्त्र समाजात आल्यावर ते या सर्व गोष्टींचा विचार करील. पृथ्वीवर किती माणसे जगू शकतील? कितींचे पोषण होईल? पड़ित जमिनी लागवडीस आणू. सुधारलेली शेती करू. विद्युत उष्णता देऊन वर्षातून चार-चार, पाच-पाच पिके घेऊ. वाळवंटेही सुपीक करू. कृत्रिम पाऊस पाडू. लोकसंख्या वाढत चालली, अशी उगीच हाकाटी धर्ममय अर्थशास्त्र करणार नाही आणि किती लोकसंख्या पृथ्वीला चालेल हे पाहून मग नियमन घालील. इतकीच मुले निर्माण करा, असे हे धर्ममय अर्थशास्त्र आज्ञा करील. ज्याप्रमाणे यंत्रातून जरूर तितकी वस्त्रे निर्माण केली जातील त्याप्रमाणे धर्ममय अर्थशास्त्रही जरूर तेवढीच मुले समाजाला देईल. ज्या वेळेस हिंदुस्थानात भरपूर जमीन होती, लोकसंख्याच कमी होती त्या वेळेस “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद देणे म्हणजे धर्म्य वस्तू होती; परंतु समाजात धर्ममय अर्थशास्त्र नसताना आणि समाजात लोकसंख्या मात्र भरपूर असताना “अष्टपुत्रा भव” असा आशीर्वाद देणे म्हणजे शापच आहे! आपण काय बोलतो हेच आपणांस समजत नाहीसे झाले आहे! “अष्टपुत्रा भव” असा आशीर्वाद देणाऱ्याला जर म्हटले, “त्या आठ पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून साम्यवाद समाजात आणशील का ?” तर तो म्हणेल, “अब्रह्मण्यम्! साम्यवादाचे पाप कशाला? नाव काढू नका त्या भ्रष्ट साम्यवादाचे!” मग पुन्हा त्या आशीर्वाद देणाऱ्याला म्हणा, “आठ

पुत्र घेऊन काय करू? संततिनियमन मला शिकवा. तुझा आशीर्वाद

नसला तरी मला मुले होणारच; परंतु त्यांचे पोषण कसे करू ?

पोषण करावयास समाजाचे धारण करणारे साम्यवादी अर्थशास्त्र आणा असे म्हणताच तुम्ही रागावता, तर मग मुले न होताच कसा भोग भोगू ते सांगा. भोग न भोगणे जमणार नाही. ते देवांनाही शक्य झाले नाही. ऋषिमुनींना शक्य झाले नाही. कोणी भिल्लीण पाहून भुलले, कोणी कोळीण पाहून भुलले! तेव्हा उगीच ब्रह्मचर्याचा मंत्र बोलू नका. भोग भोगावयाचा, परंतु समाजात रडकी, दुबळी मुले पाहण्याचे तरी दुःख नको. आपले पोटचे गोळे वस्त्रहीन पाहणे मायबापांना का आवडेल? अहो, आपण गायी-बैलांनाही थंडील झूल करतो तेव्हा तुम्ही संततिनियमनाचे शास्त्र सांगा.” तर तो धर्ममार्तंड ‘अब्रह्मण्यम्' म्हणून पळून जाईल!

साम्यवाद तरी आणा, नाही तर संततिनियमनाचा तरी प्रचार गोरगरिबांत करा. तो प्रचार करणे म्हणजे आज महान धर्म आहे. परंतु हे दोन्ही महान धर्म न करता त्या दोन्ही गोष्टींना अविवेकाने नावे ठेवणे हे जडत्वाचे लक्षण आहे. हृदये दगड झाल्याची ती खूण आहे. यात ना धर्म, ना माणुसकी, ना बुद्धी, ना शास्त्र. हा राक्षसीपणा आहे.

स्त्रियांच्या मानाची तर कोणीच काळजी घेत नाही. बिचारीला पोटभर खायला नाही, विश्रांती नाही; आणि पुनःपुन्हा बाळंतपणे. आसन्नप्रसवा अशी स्त्री अपार कष्ट करताना पाहून कोणाचे डोळे भरून येणार नाहीत? स्त्रियांची विषयनिवृत्ती होते, परंतु पुरुषाची होत नाही. एक थोर माता माझ्याजवळ म्हणाली, “आपल्या लेकी- सुनांची मुले पाळण्यात असताना स्वतःच्या मुलांचेही पाळणे शेजारी असावेत, याची मला लाज वाटते. परंतु काय करायचे? त्यांच्यासाठी सारे सहन करायचे. त्यांचे पाऊल वाकडे पडू नये म्हणून जपायचे!”

ते उद्गार मी कधी विसरणार नाही. स्त्रियांना विसावाच पुरुष देत नाहीत. स्त्रियांनाही कामवासना असते. परंतु कामवासनेचे नियमन जोपर्यंत करता येत नाही, आणि समाजातही जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत संततिनियमन करून भोग भोगणे हाच मर्यादित धर्म ठरतो.

समाजात रोगी मुले उत्पन्न होऊ नयेत, याची धर्ममय कामशास्त्र काळजी घेईल. आपण पशूंची अवलाद चांगली व्हावी म्हणून खटपटी करीत आहोत; परंतु माणसाची अवलाद चांगली निघावी म्हणून कोण शास्त्रीय दृष्टीने खटपट करणार? एकदा गोरक्षणाच्या सभेला अध्यक्ष व्हा म्हणून विवेकानंदांना सांगण्यात आले. ते म्हणाले, “मानवरक्षणाच्या सभेचा मी अध्यक्ष होईन.” याचा अर्थ ते गोरक्षण कमी मानीत होते असे नाही. परंतु माणसे पशूंसारखी झाली आहेत, याची कोणी काळजी घ्यावयाची?

म्हणून 'जर्मनीत नालायक पुरुषांची कायद्याने खच्ची करण्यात आली. समाजाच्या कल्याणासाठी मनुष्य स्वतःवर विवेकाचे बंधन जर न घालील तर कायद्याने बंधन त्याच्यवर लादावे लागेल. घोड्याला लगाम द्यावा लागतो. त्याचप्रमाणे कायद्याचा काटेरी लगाम मनुष्यरूपी पशूला घालणे आवश्यक होईल ! प्रेम, विवेक, संयम या गोष्टी मनुष्याला शेवटी कायद्याने शिकवाव्या लागणार का? मनुष्याने सर्वांसाठी झिजले पाहिजे; परंतु तो झिजत नाही. मग कायद्याचे व क्रांतीचे साम्यवादी सरकार येते आणि कायद्याने झिजवायला लावते. जे रोगी आहेत त्यांनी संतती निर्माण करू नये. परंतु ते ऐकत नाहीत. मग कायद्याने त्यांना खच्ची करणे भाग पडते.

म्हणून आपल्या स्मृतींतून विवाह करण्याच्या आधी वधूवरांची भिषग् – रत्नांकडून नीट परीक्षा केली जावी असे सांगितले आहे.

"स्त्रीत्वे पुंस्त्वे परीक्षितः" वधू गर्भधारणक्षम आहे ना, काही दोष नाही ना, काही रोग नाही

ना, हे आधी परीक्षून घ्यावयाचे. तसेच वर नपुंसक नाही, रोगी नाही, उत्कृष्ट शक्तीने संपन्न आहे, तपासून घ्यावयाचे, आणि मग लग्न लावावयाचे. तरच ते लग्न समाजाच्या कल्याणाचे व वधूवरांनाही आनंद देणारे होईल, परंतु मला कितीतरी उदाहरणे माहीत आहेत, की क्लीब पुरुषांनी पुनःपुन्हा लग्ने केली आहेत! परंतु क्लीबाने शतदा लग्ने केली म्हणून का संतती होणार आहे?

एक संताच्या गादीवरचे महाराज एका श्रीमंताकडे गेले. त्या श्रीमंताला नव्हते मूलबाळ, ते गादीवरचे महाराज म्हणाले, “पुन्हा लग्न करा. होईल आशीर्वादे मूल !” त्या श्रीमंताने पुन्हा लग्नाची तयारी केली. परंतु त्या क्लीबाला का संतती झाली असती? गादीवरच्या महाराजांनी दुसरे काही प्रयोग केले असते, आशीर्वादाच्या जोडीला व्यभिचार जोडले असते, तर कदाचित झाले असते मूलबाळ हे गादीवरचे महाराज विचार करीत नाहीत. पुनःपुन्हा लग्न करावयास सांगतात, आणि स्त्रियांची जीवने निराश व निरानंद करण्यात येतात. अशा स्त्रिया वेड्या होतात, भ्रमिष्ट होतात, किंवा काही घरच्या धष्टपुष्ट हिंदू वा मुलसमान नोकराजवळ विषय भोगतात. अशी काही निरानंद व भ्रमिष्ट स्त्रियांना भुताने पछाडले आहे असेही मग ठरविण्यात येते व भूत काढण्यासाठी त्यांना मारहाण होते! अरेरे! हा काय धर्म ! काय ही संस्कृती!

लग्न लावणाऱ्या आचार्याने आधी विचारले पाहिजे, “या वधूवरांची नीट परीक्षा घेतली आहे का? तरच हा धार्मिक विवाह होईल.” परंतु असे विचारणे म्हणजे आचार्याला अब्रह्मण्यम् वाटते! इतर साऱ्या चौकशा करतात. हुंड्याची चौकशी, शिक्षणाची चौकशी, सारे होते. परंतु वैद्यकीय चौकशी मात्र होत नाही.

वधूवरांचे गुणधर्म म्हणजे मानसिक परीक्षा व वधूवरांचे आरोग्य म्हणजे शारीर – परीक्षा. ह्या दोन परीक्षा झाल्या पाहिजेत. समान वर्णांचा विवाह हवा. आणि वर्ण म्हणजे आवड, रंग असे आपण मागे पाहिजे आहे. मुलीला कसली आवड आहे, कोणते काम तिला येते, तिच्या बुद्धीला, हृदयाला, कोणता रंग आहे हे पाहिले पाहिजे. परंतु मुलीच्या अंगाचा वर्ण पाहण्यात येतो. तिच्या बुद्धीचा व हृदयाचा वर्ण, तिच्या अंतरात्म्याचा वर्ण यांच्याकडे कोणाचे लक्षही नाही! उलट, स्त्रियांना आत्माच नाही; म्हणजे एक प्रकारे त्यांना वर्णच नाही, असे समजण्यात येते! म्हणून आजचे सारे विवाह हे अशास्त्रीय व अधार्मिक विवाह आहेत. ज्या विवाहात स्त्री-पुरुषांच्या हृदय- बुद्धीचा वर्णं पाहण्यात येईल, त्यांच्या शरीराची अव्यंगता पाहण्यात येईल, तेच विवाह खरे शास्त्रीय विवाह होतील.

आज राक्षसगण आहे का देवगण आहे, हे पंचांगावरून ठरवितात. ह्याचा वर्ण राक्षस आहे का देवाचा आहे, हे का पंचांगावरून ठरेल? समाज उपाशी मरत असता जो स्वतःची कोठारे व स्वतःच्या पेढ्या भरून ठेवतो तो राक्षस. स्वतःसाठी राखणारा तो राक्षस व दुसऱ्यांना देतो तो देव. वर्ण हे कृतीवरून ओळखावयाचे. आत्म्याचे रंग प्रत्येक कृतीतून प्रगट होत असतात. ते पंचांगातून पाहावयाचे नसतात.

तसेच, काही काही लहान जाती त्या जातींतच विवाह करीत असतात. त्या जातींत सर्वांचे रक्त एक होऊन गेलेले असते. सारे एकमेकांचे नातलग असतात. खानदेशात लाडसक्के जात आहे. त्या जातीत सारे परस्परांचे नातलग आहेत. परंतु त्या जातीच्या जरा बाहेर ते विवाह करणार नाहीत. आणि असे हे एका रक्ताचे अशास्त्रीय विवाह सनातनी ब्राह्मण प्रत्येक वर्षी लावीत आहेत! केवढा हा अधर्म ! केवढी ही अशास्त्रीयता !

वर्ध्याच्या सत्याग्रहाश्रमाचे थोर आचार्य विनोबाजी एकदा म्हणाले, “विवाह समुद्रातले नकोत आणि डबक्यातले पण नकोत.” महान सूत्र त्यांनी सांगितले. एकदम एका भारतीयाने उठून अमेरिकेतील कोणाशी लग्न लावणे तेही सदोष होईल, व आपापल्या लहान जातीतच सारखी लग्ने लावणे तेही सदोष होईल. महाराष्ट्रातील गाईला एकदम युरोपियन वळू कदाचित मानवणार नाही. महाराष्ट्रातील गायीला पंजाबचा किंवा गुजरातचा वळू मानवेल. फार लांबचे नको, कारण वातावरण सारे अगदी भिन्न असते; आणि अगदी जवळचेही नको, कारण तेच वातावरण असते.

आणि कधी कधी मिश्रविवाह समाजाच्या हितासाठीही असतील. जमिनीत एकच पीक सारखे घेत नाहीत. मध्येच बी- वाढ करावयास दुसरे पीक घेतात. बी – वाढीसाठीच दुसरे पीक ! मध्येच एक वर्ष दुसरे पीक घेतले म्हणजे पुन्हा ते पहिले पीक भरदार येते. समाजाच्या संततिशास्त्रातही अशी वेळ कदाचित येत असेल. मिश्रविवाहाने समाज कदाचित भरदार होईल. सर्वसाधारण जनतेचा उत्साह व सर्वसाधारण जनतेची बुद्धी यांची कदाचित वाढ होईल. भारतातील सारे प्राचीन महर्षी मिश्रविवाहाची फळे होत. “ऋषीचे पाहू नये कूळ, नदीचे पाहू नये मूळ" असे आपण म्हणत असतो. परंतु त्यात ऋषीला कमीपणा थोडाच आहे? मिश्रविवाह हे कधी कधी आवश्यकही असतील. आज भारतात ती वेळ आली आहे असे वाटते.

मांस खाऊन आपणांस जोम येणार नाही, तर मिश्र विवाहाने जोम येईल. दोन सर्पांपासून जन्मणारा अक्करमाशा हा अधिकच क्रूर असतो. याचा अर्थ मिश्रविवाहाचे फळ जो अक्करमाशा तो अधिक जोमदार असतो. सर्पाचा दुष्टपणा अधिक वाढीस लागतो.

मिश्रविवाह सदैवच असावा असे नाही. परंतु काही विशिष्ट काळी काही शतके त्याची जरुरी असेल, काही काळ गेल्यावर समाजाची स्थिती पाहून पुन्हा नवीन नियम करा. अशा सर्व रीतींनी कामशास्त्राचे खरे धार्मिक व बौद्धिक विवेचन व आचरण झाले पाहिजे. कामशास्त्र म्हणजे एक प्रकारे संततिशास्त्र. संतती सतेज, निरोगी कशी होईल, त्याचप्रमाणे संततीचे नीट पोषण व विकसन कसे होईल, हे सर्व पाहणे धर्ममय कामशास्त्रात येते.

संयम स्त्री-पुरुषांचे प्रेम, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचे शारीरिक निर्दोषत्व व बौद्धिक समानत्व इत्यादी अनेक गोष्टी प्रकाशात पाहाव्या लागतील. ज्ञान वाढते आहे, अनुभव वाढत आहे, वेद अनंत आहेत, वेदांवर म्हणजे अनुभवांवर, शास्त्रीय ज्ञानावर उभारलेला हा सनातन धर्म नवनवनी प्रकाश जीवनात आणील व खरे धर्ममय अर्थशास्त्र व धर्ममूल कामशास्त्र जनतेस देऊन खऱ्या शांतीचा, खऱ्या आनंदाचा, खऱ्या निश्चित व निर्मळ सुखाचा मोक्ष सर्वांना देईल.

सर्व समाजाचे धारणपोषण करणारे अर्थ-काम हे मोक्षाकडे नेत असतात. परंतु अशा रीतीने अर्थ - कामांची ज्ञानविज्ञानमय, शास्त्रीय, म्हणजेच धार्मिक व्यवस्था लावू पाहणारे, आज नरकाकडे नेणारे असे समजण्यात येत आहे, हा केवढा दैवदुर्विलास!

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा