shabd-logo

कर्मफलत्याग

5 June 2023

17 पाहिले 17
श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आहारविहार नियमित करावयाचे. शरीर आणि मन प्रसन्न आणि निरोगी राखावयाचे. अशा रीतीने जीवन सार्थकी लावावयाचे. सेवाकर्म करीत करीत, उत्तरोत्तर अधिकधिक तन्मयतेने करीत एक दिवस सर्व सृष्टीशी सख्य जोडावयाचे, मन भेदातीत करून केवळ चिन्मयाच्या साम्राज्यात रमावयाचे.

परंतु हे सर्व साधावयास आणखी एक वस्तू पाहिजे, आणखी एक दृष्टी पाहिजे. ती दृष्टी म्हणजे फळाची आशा करीत न बसणे. कर्मातच इतके रमावयाचे, की फलाचा विचार करावयास अवसरच नाही. कर्ममयच जीवन. “देवचि खावा, देवचि प्यावा” असे जनाबाई म्हणे. देव म्हणजे आपले ध्येय. आपले सेवाकर्म हे सेवाकर्मच खावयाचे, सेवाकर्मच प्यावयाचे. याचा अर्थ खातानाही कर्माचाच विचार. पितानाही कर्माचाच विचार. झोपेतही कर्माचेच चिंतन. महात्माजी मागे एकदा म्हणाले होते, “मला हरिजनांच्या सेवेचीच स्वप्ने पडतात. मंदिरे उघडताहेत असे दिसते.” रामतीर्थांना झोपेत गणितांची कूटे सुटत. अर्जुनाची गोष्ट अशी सांगतात. अर्जुनावर श्रीकृष्णाचे प्रेम फार म्हणून उद्धव अर्जुनाचा हेवा करी श्रीकृष्णाच्या ध्यानात ते आले. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, “उद्धवा ! अर्जुन काय करतो आहे ते बघून ये." उद्धव निघाला. अर्जुन खोलीत गाढ झोपला होता. परंतु तेथे 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ ध्वनी ऐकू येत होता. तो आवाज कोठून येत होता? उद्धव पाहू लागला. शोधू लागला. तो अर्जुनाजवळ गेला. त्याला काय दिसले ? अर्जुनाच्या रोमारोमांतून ‘कृष्ण कृष्ण' असा ध्वनी येत होता. कृष्णाचे प्रेम अर्जुनाच्या जीवनात ओतप्रोत भरले होते. नानकाने म्हटले आहे, “देवा ! तुझे स्मरण श्वासोच्छ्वासाप्रमाणे होऊ दे." देवाच्या स्मरणाशिवाय जीवन असह्य होऊ दे. त्याचे स्मरण म्हणजे जीवन, त्याचे विस्मरण म्हणजे मरण. त्याचे स्मरण म्हणजे सकल सुख, त्याचे विस्मरण म्हणजे परम दुःख.

"विपद् विस्मरणं विष्णोः संपन्नारायणस्मृतिः”

आणि देवाचे स्मरण म्हणजे ध्येयाचे स्मरण. स्वकर्माचे, स्वधर्माचे स्मरण. ज्याच्यासाठी जगावेसे वाटते, ज्याच्यासाठी मरावेसे वाटते ते आपले दैवत. तो आपला देव. त्याच्या चिंतनात सदैव रमणे म्हणजेच परमसिद्धी.

मनुष्य स्वकर्मात इतका कधी रंगेल? ज्या वेळेस त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाला तो विसरेल तेव्हाच. लहान मूल असते. ते आंब्याची बाठ घेऊन जमिनीत पुरते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती बाठ ते मूल पुन्हा उकरून पाहते. अंकुर फुटला आहे की नाही ते पाहण्याची त्यास उत्कंठा असते. परंतु जर ती बाठ घटकेघटकेला अशी उकरून पाहण्यात आली, तरी तिला कधीही अंकुर फुटणार नाही, कधीही मोहोर येणार नाही, रसाळ फळे लागणार नाहीत. याच्या उलट, त्या बाठीला रोज पाणी घालण्यात आले, खत घालण्यात आले, बकरीने पाने खाऊ नयेत म्हणून कुंपण करण्यात आले, आणि अशा रीतीने त्या आम्रसंवर्धनाच्या कर्मातच जर मनुष्य रमला, तर वर एके दिवशी रसाळ फळे डोलल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्याचा खरा आनंद फलात नसून कर्मातच आहे, असे खोल पाहिले तर दिसेल. आपले हातपाय, आपले हृदय, आपली बुद्धी ही सदैव सेवाकर्मात रंगलेली असण्यातच आनंद आहे. इंग्लंडमधील प्रख्यात इतिहासकार गिबन ज्या मध्यरात्री त्याचा तो प्रचंड इतिहास लिहून संपला, त्या वेळेस रडला! बारा वाजून गेले होते. प्रशान्त रात्र होती. शेवटचे वाक्य लिहून झाले. पंचवीस वर्षे तो उद्योग गिबनचा चालला होता. प्रत्येक क्षण आनंदात गेला. परंतु तो इतिहास संपताच त्याला वाईट वाटले. तो म्हणाला, “आता उद्या काय करू? उद्या कोठला आनंद? आता काय वाचू ? काय लिहू?” ते कर्म करण्यातच त्याचा आनंद होता.

मुले खेळतात. खेळताना आपणास इतका व्यायाम होईल, आपले शरीर असे सुधारेल, वगैरे विचार त्यांच्या मनात नसतात. हे विचार मनात आणून मुले खेळतील तर खेळाचा आनंद त्यांना लुटता येणार नाही. आट्यापाट्या खेळताना माझ्या मांड्यांना आता व्यायाम होत आहे असा का विचार करून खेळाडू खेळेल ? असा विचार करून त्याला कोंडी फोडता येणार नाही. मुले खेळासाठी म्हणून खेळतात. त्याने मिळणारे जे व्यायामाचे फळ, त्या फळाकडे खेळताना त्यांचे लक्ष नसते.

याचा अर्थ असा नाही, की खेळ खेळणाऱ्याला व्यायामाचे फळ मिळत नाही. त्याची प्रकृती निरोगी राहते. तो आनंदी राहतो. तो मनमोकळा होतो. कितीतरी फळे त्याला मिळतात. खेळ खेळावयास जाण्यापूर्वी, खेळाला आरंभ करण्यापूर्वी, व्यायामाचा विचार त्याच्या मनात असतो. मी जर रोज खेळत जाईन, तर माझी प्रकृती निकोप राहील असे तो ठरवितो. फळाचा विचार प्रथम मनात असतो. परंतु एकदा कर्म सुरू झाले म्हणजे त्या फलाचा विसर पडला पाहिजे. प्रत्येक प्रयत्न म्हणजे कर्मसिद्धी आहे, प्रत्येक घाव म्हणजे विजय आहे, प्रत्येक टाकलेले पाऊल म्हणजे ध्येयप्राप्ती आहे, असे वाटले पाहिजे. प्रयत्न म्हणजे सिद्धी..

बेलदार मोगरी हातात घेऊन दगड फोडीत असतो. समजा, दहा घावांनी दगड फुटला नाही, आणि अकराव्या घावास तो फुटला, तर ते पहिले घाव फुकट का गेले? प्रत्येक घाव त्या दगडातील अणूंना आघात करीतच होता. ते अणू अलग केले जात होते. प्रत्येक घाव ध्येयाकडेच नेत होता.

कर्म उत्कष्ट व्हावे म्हणूनच कर्मफलत्यागाची जरुरी आहे. फळाचे सतत चिंतन करण्यापेक्षा कर्मातच जो रमला, त्याला अधिक थोर फळ मिळेल. कारण पदोपदी फळाचे चिंतन करणाऱ्याचा पुष्कळसा वेळ चिंतनातच जातो. पाऊस नाही पडला तर, भाव नीट नाही आला तर, उंदीर लागला तर, अशी पदोपदी जो काळजी आणि विवंचना करीत बसेल, फळाविषयी विचार करीत बसेल, त्याच्या हातात भरपूर उत्साह राहणार नाही; त्याच्या मनात अनंत आशा उरणार नाही; त्याचे कर्म उत्कृष्ट होणार नाही. ह्याच्या उलट, जो शेतकरी कर्मातच रंगला आहे, खत घालीत आहे, पाणी घालीत आहे, निंदणी करीत आहे; दुसरा विचार करावयास ज्याला वेळच नाही, त्याला अधिक उत्कष्ट फळ मिळेल यात शंका नाही.

कमळ असते ना, त्याची गोष्ट रामकृष्ण परमहंस नेहमी सांगावयाचे. कमळाला फुलावयाचे असते. रात्रंदिवस चिखलात पाय रोवून ते धडपडते. सूर्याकडे तोंड करून ते फुलू पाहात असते. त्या कमळाची साधना सारखी अखंड सुरू असते. स्वतःचे फुलणे विसरून जाते. फळाला जणू विसरून जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस, चिखल यांत राहून धडपडत असते. परंतु एक दिवस उजाडतो. ते कमळ मंद-मधुर फुलते. सूर्याचे किरण त्याला चुंबितात. वारे त्याला आंदुळतात; गाणी म्हणतात. आपण फुललो आहोत, याचे भान त्या कमळाला जणू नसते. सुगंधाने, पावित्र्याने, मकरंदाने मी भरून राहिलो आहे, याची जाणीव त्याला नसते. शेवटी भ्रमर गुं गुं करीत येतो. त्या कमळाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्या कमळाच्या अंतरंगात तो शिरतो व सांगतो, “पवित्र कमळा! तू फुलला आहेस. किती गंध, कसा रंग; किती गोड रस !”

मनुष्याचे असेच झाले पाहिजे. फळाचा विचार पडला पाहिजे. फळ पायाशी येऊन पडले तरीही तिकडे दृष्टी जाता कामा नये. ध्रुवाच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष नारायण येऊन उभा राहिला, तरी त्याचे डोळे मिटलेलेच! नारायणाच्या चिंतनातच तो तल्लीन झाला होता. इतकी समरसता साधनेत होणे ही महत्त्वाची वस्तू आहे.

भारतीय संस्कृती साधना शिकविते. अधीर होऊ नका, उल्लू होऊ नका, फळासाठी लालचावलेले होऊ नका, घायकुतीस येऊ नका. महान फळे चुटकीसरशी मिळत नाहीत. अनंत साधना व अखंड, अविरत श्रम त्यासाठी लागतात. वडाचे प्रचंड झाड दोन दिवसांत वाढत नाही. मेथीची भाजी दोन दिवसांत वाढते, चार दिवसांत सुकते. परंतु वडाचे झाड एकदा उभे राहिले म्हणजे हजारोंना छाया देते. त्याच्या शाखा आकाशाला कवटाळायला जातात. त्याचे शिर गगनाला भिडते, त्याची मुळे पाताळगंगेची भेट घेतात. परंतु असा हा स्पृहणीय व महनीय पसारा, हे महान वैभव प्राप्त व्हावयास दगडाधोंड्यांतून मुळे रोवीत रोवीत कित्येक वर्षे त्या वटवृक्षाला धडपडावे लागते.

विनता व कद्रू यांची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कद्रूला एक हजार सर्पबाळे होताच विनता अधीर झाली. तिने एक अंडे फोडले. परंतु ते परिपक्व नव्हते; त्यातून लुळापांगळा अरुण बाहेर पडला. विनता कष्टी झाली. तिच्या उतावीळपणाचे बक्षीस तिला मिळाले. परंतु ती अनुभवाने शहाणी झाली. दुसरे अंडे तिने फोडले नाही. एक हजार वर्षे ती थांबली आणि मग एक हजार वर्षांनंतर त्या अंड्यातून पक्षिराज गरुड बाहेर पडला. भगवान विष्णूचे तो वाहन झाला!

तुमच्या कर्मातून दुबळी फळे मिळावयास नको असतील व अशी भव्यदिव्य फळे पाहिजे असतील तर शेकडो वर्षे श्रमावे लागेल, साधना करावी लागेल. भारतीय संस्कृतीचे उपासक आज साधना विसरले आहेत. त्यांना चुटकीसरशी फळे हवी असतात. पटकन स्वातंत्र्य हवे आहे. परंतु लाखो खेड्यापाड्यांत जाऊन वर्षानुवर्षं साधना करावयास नको आहे. क्रांती क्षणात होत नसते. राष्ट्रीय शिक्षणाचे महान आचार्य विजापूरकर एकदा म्हणाले, “इंग्रजांना राज्य घ्यावयास दीडशे वर्षे लागली. त्यांना घालवावयास तीनशे लागतील, अशा आशेने सारखे धडपडले पाहिजे.'

कर्मफलत्यागी मनुष्य कधी निराश होत नाही. कारण फलाकडे त्याचे डोळेच नाहीत. जो सारखे फलाचे चिंतन करील, तो कष्टी होईल. निराश होईल. भगवान बुद्ध एकेक गुण अंगी येण्यासाठी एकेक जन्म घेत होते. जीवनाची परिपूर्णता गाठावयास त्यांना शेकडो जन्म घ्यावे लागले.

एकदा दोन साधक तपश्चर्या करीत होते. देव भेटावा अशी त्यांना इच्छा होती. देवदूत प्रथम एकाकडे आला व म्हणाला, “काय रे, देव कधी भेटावा असे तुला वाटते?" तो म्हणाला, “या क्षणी; मी अगदी अधीर झालो आहे.” देवदूत म्हणाला, “तुला हजारो वर्षे झाली तरी तो भेटणार नाही!” देवदूत दुसऱ्याकडे गेला. त्यालाही तोच प्रश्न त्याने विचारला. तो साधक म्हणाला, “किती वर्षांनी भेटू शकेल?” देवदूत म्हणाला, “दशसहस्र वर्षांनी.” साधक सद्गदित होऊन म्हणाला, “काय; इतक्या लौकर देव मला भेटेल? देवाची प्राप्ती व्हावयास कोट्यवधी वर्षे लागतात. मला खरेच का इतक्या लौकर तो मिळेल?” इतक्यात परमेश्वर तेथे आला व म्हणाला, “मी आत्ताच तुला भेटतो. तुझ्या हृदयमंदिरात येऊन राहतो.”

देवाची प्राप्ती व्हावयास कितीही साधना केली तरी ती थोडीच आहे. ध्येय प्राप्तीसाठी अशी ही अमर आशा हवी. प्रयत्नांचा, कष्टांचा, उद्योगांचा कंटाळा येता कामा नये. उत्तरोत्तर अधिकच उत्कट कर्म होऊ लागले पाहिजे. जो हजारो वर्षे श्रमावयास तयार आहे, त्याला त्या घटकेला फळ मिळेल.

परंतु स्वतःच्या मनाचे समाधान हे फळ तर सारखे मिळतच असते. मी माझी पराकाष्ठा करीत आहे, कष्टांची शर्थ करीत आहे, हे माझे आन्तरिक समाधान कोण हिरावून नेणार? आपणांस हा देह, ही बुद्धी, हे हृदय यांची जोड मिळाली आहे. देवाने हे भांडवल आधीच दिले आहे. हे जे मिळाले आहे, त्याचे उतराई होण्यासाठी म्हणून सेवा केली पाहिजे. समाज आपणांस अपरंपार देत आहे. सृष्टी देत आहे. त्यांचे अनृणी होण्यासाठी म्हणून सदैव झिजणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

आणि फळ आपणांस न मिळाले तरी समाज अमर आहे. व्यक्ती जातात, परंतु समाज चिरंतन आहे; कार्य करणारे जातात, परंतु कार्य उरतेच. ते कार्य पुरे करावयास समाज आहेच. माझे पडलेले काम दुसरा कोणी उचलील. मी लाविलेल्या झाडाला दुसरा कोणी पाणी घालील. माझ्या श्रमाचे फळ कोणाला तरी मिळेलच; आणि ज्या कोणाला मिळेल, तो माझाच आहे. त्याच्यात व माझ्यात भेद आहे कुठे? 

आपल्या संस्कृतीत अदृष्ट फळाची एक गोड कल्पना आहे. उथळ बुद्धीचे लोक या कल्पनेची टर उडवितात. परंतु या कल्पनेचा जसजसा विचार करावा तसातसा आनंद होतो. तुझ्या प्रयत्नांना फळ लागेल; परंतु ते तुला प्रत्यक्ष दिसणार नाही; तुझ्या कल्पनेच्या दिव्य चक्षूंना ते दिसेल. न दिसणारे फळ तुला मिळेलच मिळेल. हिंदुस्थानात स्वराज्यासाठी कितीतरी मोठमोठी माणसे आमरण कष्ट करून निघून गेली. त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांना मिळाले नाही. परंतु अदृष्ट फळ त्यांना मिळतच होते. न्यायमूर्ती रानडे एकदा म्हणाले, “तो पाहा सुखी समृद्ध हिंदुस्थान मला दिसत आहे. ही देवांची आवडती भूमी स्वतंत्र व मुक्त अशी मला दिसत आहे. रोग-दुष्काळ नाही, अज्ञान नाही, रूढी नाही, भांडण नाही, तंटा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, साऱ्या जाती, सारे धर्म परस्परांशी गुण्यागोविंदाने वागत आहेत. सर्वांना अन्न आहे, वस्त्र आहे, राहावयाला घरदार आहे, असा तो हिंदुस्थान मला दिसत आहे!” न्यायमूर्तीच्या विशाल दृष्टीला- शास्त्रपूत व श्रद्धापूत दृष्टीला ते अदृष्ट फळ दिसत होते. मनुष्याला त्याच्या श्रमाचे अदृष्ट फळ मिळेल. म्हणजे श्रम फुकट जाणार नाहीत. जगात काहीही फुकट जात नाही.

अदृष्ट फळ याचा दुसराही एक अर्थ आहे. नदी वाहात असते. कितीतरी तरुवेलींना ती ओलावा देत असते, परंतु तिला ते माहीत नसते. कितीतरी जलचरांना तिने पोटाशी धरलेले असते, परंतु त्याची तिला जाणीव नसते. आपण किती जमीन सुपीक व समृद्ध केली याची तिला जाणीव नसते, किती विहिरींना आपल्यामुळे पाण्याचा पुरवठा झाला हे तिला माहीत नसते. नदी वाहात असते. रात्रंदिवस कर्म करीत असते. ओलावा देत असते. परंतु हा ओलावा कोठे, कोणाला, किती मिळाला हे तिला काय ठावे? ते फळ तिला माहीत नाही. तिला दिसत नाही. परंतु तिच्या नावावर ते जमा आहे. तिच्या कर्माला लागलेली ती अनंत फळे आहेत.

आपण किती ठिकाणचा अंधार दूर केला हे सूर्यास माहीत नसते. त्याला जर आपण म्हटले, “भगवान सूर्यनारायणा ! केवढा तुझा उपकार! तू सारा अंधार दूर केलास.” सूर्य म्हणेल, “कोठला अंधार मी दूर केला? मला दाखवा चिमूटभर. मी अंधार पाहिलाही नाही, मग दूर कोठून करू? मला प्रकाशणे माहीत. रात्रंदिवस जळत राहणे, एवढेच मला माहीत. "

सूर्याने आपल्या जीवनाचे यज्ञकुंड सतत पेटत ठेविले आहे. परंतु त्याला त्या कर्माचे फळ मिळत का नाही? सूर्याच्या उष्णतेमुळे प्राणिमात्र जगत आहेत. फुले-फळे उत्पन्न होत आहेत. वृक्ष- वनस्पती वाढत आहेत. सर्व विश्वाचा कारभार चालला आहे. सर्व जगाचा तो आत्मा आहे.

"सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च”

या स्थिरचर सृष्टीचा तो प्राणदाता आहे. सूर्याला ह्या महान फळाची वार्ताही नाही. परंतु हे अदृष्ट फळ त्याला मिळतच आहे.

बाहेर सुंदर सुगंधी फूल फुलते. कितीतरी मानवांच्या जीवनात त्या फुलाच्या दर्शनाने आनंद उत्पन्न होत असतो. परंतु फुलाला त्याची कोठे कल्पना आहे? वाऱ्याबरोबर त्या फुलाचा परिमळ आसमंतात पसरतो व लोकांना सुख होते. आजाऱ्याला प्रसन्न वाटते. मधमाशा, फुलपाखरे, भुंगे फुलाशी येतात, त्याला लुटतात, त्याच्याजवळ गुजगोष्टी करतात. फुलाला त्याची स्मृती नाही. त्याने आपले जीवन फुलवून ठेविले आहे. परंतु हजारो जीवांना आनंद दिल्याचे त्याला माहीत नसलेले ते अदृष्ट फळ त्याला मिळतच असते.

लहान मूल हसते, खेळते. जगू का मरू अशा स्थितीत असणाऱ्या टेनिसनला फुले व मुले पाहून आशा मिळते. त्या मुलाला काय माहीत की हे हास्य निराश व निरानंद जीवनात सुधासिंधू ओतीत आहे! आपल्या आईबापांना, भावाबहिणींना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना आपल्यामुळे सुखसमाधान मिळत आहे हे मुलाला ठाऊक नसते. परंतु ते अदृष्ट फळ त्याला मिळत असते.

आपण खादी विकत घेतली. त्यामुळे कोणत्या खेड्यात, कोणत्या उपास काढणाऱ्या कुटुंबाला दोन घास मिळाले, ते आपणांस माहीत नसते. परंतु आपणांस माहीत नसले, तरी तिकडे दोन जीव सुखी झाले ही गोष्ट काही खोटी नाही. चिंचेचा पाला शिजवून खाणारे लोक भाकर खाऊ लागले हे खरे आहे. मला दिसो वा न दिसो, ते अदृष्ट फळ मला मिळालेच आहे.

मनुष्याने सेवा करीत राहावे. सत्कर्म करीत राहावे. त्यामुळे मनाचे समाधान हे दृष्ट फळ तर त्याला पदोपदी आहेच; परंतु समाजाला आनंद देण्याचे अदृष्ट फळही त्याला मिळत असते. या जगात जर काहीच फुकट जात नाही, तर सत्कर्म तरी फुकट कसे जाणार? घराजवळ घाण केली तर डास होतात. घराजवळ स्वच्छता ठेवली तर आरोग्य व आनंद नांदेल. वाईट तो चांगले- दोघांना फळे येतच असतात. काटे पेराल तर काटे खाल. गुलाब लावाल तर गुलाब मिळतील. प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्वतःवर व सभोवतालच्या सृष्टीवर होत असतो. आकाशात तारा चमकतो व माझ्या जीवनात पावित्र्य येते. ध्रुवतारा दिसतो व माझी नौका सुरक्षित जाते. मनात आलेल्या भावनांचा व विचारांचाही जर परिणाम होतो, तर मग केलेल्या कृतीचा परिणाम कसा होणार नाही? हा परिणाम अदृष्ट असेल, परंतु तो होत असतो यात शंका नाही.

केवळ कर्मातच रमून जाणे हे एकदम साधणार नाही. मनुष्य प्रथम लोभाने कर्मास प्रवृत्त होतो, आई मुलाला म्हणते, “श्री ग काढ, म्हणजे खारीक देईन." त्या खारकेच्या आशेने तो मुलगा पाटी घेतो. वडी मिळेल म्हणून शाळेत जातो. परंतु पुढे विद्येचा आनंद कळतो. विद्येसाठी म्हणून तो विद्या शिकतो. त्या वेळेस इतर फळे त्याला मिळत नाहीत असे नाही. लहानपणी खारीकच मिळे, परंतु आता फळाची सोडून विद्येची अशी उपासना करू लागताच त्याला मानसन्मान, कीर्ती, पदव्या, सारे मिळते. त्याला निमंत्रणे येतात, त्याची स्वागते होतात. अनंत फळे त्याच्यापुढे हात जोडून उभी राहतात. ऋद्धिसिद्धी त्याच्याभोवती तिष्ठत राहतात. परंतु त्या मानसन्मानांचा त्या विद्यानंद पुरुषास आनंद वाटत नाही.

तैं गजबजो लागे कैसा । व्याधें विंधिला मृगु जैसा।।

बाणाने हरिण विद्ध व्हावा, घायाळ व्हावा, त्याप्रमाणे मानसन्मानांनी तो गजबजून जातो, गांगरून जातो.

तुकारामहाराजांची कीर्ती ऐकून शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे पालखी वगैरे पाठविली, घोडेस्वार पाठविले. पालखीत घालून तुकारामांना मिरवीत आणावे असे शिवाजीमहाराजांस वाटले. परंतु तुकाराम कष्टी झाले. आपल्या सत्कर्माला वैभवाची लागलेली फळे पाहून त्यांना वाईट वाटले. ते देवाला म्हणाले, “देवा ! ह्या दिवट्या, हे घोडे, ह्या पालख्या, ही छत्रचामरे, कशाला हे सारे? मला का याची आवड आहे?” तुकारामांना सेवेसाठी सेवा पाहिजे होती. मोक्षाचे फळही त्यांना नको होते. मोक्षावरसुद्धा त्यांनी लाथ मारली.

"दंभ कीर्ति मान । सुखें टाकितो थुंकून ।। जा रे चाळवी बापुडीं । ज्यांना असे त्याची गोडी ।।"

असे तुकाराम स्वच्छ सांगत आहेत. “कीर्तीला, मानाला आम्ही झुगारून दिले आहे. त्याच्या पाठीमागे लागून कर्मच्युत होणारी दीनदुबळी अहंपूज्य माणसे आम्ही नाही. त्या गोष्टींनी च्युत होणारी दुसरी माणसे आहेत.”

ही दृष्टी शेवटी माणसास आली पाहिजे. कर्म म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच संतोष. कर्म म्हणजेच सर्व काही. सत्कर्माची सवय झाली पाहिजे. सूर्याला जळणे माहीत. मेघाला वर्षणे माहीत, वाऱ्याला वाहणे माहीत, संताला दुसऱ्याचे अश्रू पुसणे माहीत. सवय झाली म्हणजे अहंकार जातो, फलेच्छा मरते. नाक सारखे श्वासोच्छ्वास करीत आहे. म्हणून त्या नाकाचे आपण आभार मानीत नाही. नाकालाही वाटत नाही की आपण फार मोठे काही करीत आहोत. तसे आपले झाले पाहिजे. स्वतःच्या मुलाचा शेंबूड आई जितक्या सहजतेने, फलविरहित हेतूने काढते, तितक्याच सहजतेने शेजारच्या मुलाचा शेंबूड काढण्याची तिच्या हाताला सवय झाली पाहिजे. प्रथम शेजारच्या मुलाचा शेंबूड काढताना ती आजूबाजूला पाहील. त्या मुलाची माता “हे काय, तुम्ही कशाला काढलात?” वगैरे बोलून आपला गौरव करीत आहे की नाही इकडे तिचे लक्ष असेल. परंतु पुढे पुढे हे सारे नाहीसे झाले पाहिजे. हाताचा तो सहजधर्म झाला पाहिजे.

"मामनुस्मर युद्धय च"

अशी भगवंताची शिकवण आहे. फळ येवो वा न येवो, सत्याची आठवण ठेवून सदैव कर्म करीत राहा. देवाचे स्मरण ठेवून कर्म करावयाचे. परंतु देवाचे स्मरण म्हणजे काय? सच्चिदानंदाचे स्मरण. माझे कर्म सच्चिदानंदरूपी परमेश्वराचे पूजन करणारे झाले पाहिजे. मांगल्याची पूजा करणारे माझे कर्म आहे की नाही हे पाहणे म्हणजे सत्स्वरूप स्मरणे. तसेच माझे कर्म ज्ञानविज्ञानयुक्त आहे की नाही हे पाहणे म्हणजेच चित्स्वरूपी परमेश्वराचे स्मरण; आणि हे कर्म करताना माझे हृदय उचंबळत आहे की नाही, मला अपार आनंद होत आहे की नाही, हे पाहणे म्हणजे आनंदस्वरूपी परमेश्वराचे स्मरण. कर्मात समाजाचे मांगल्य हवे; कर्मात ज्ञान हवे; कर्माचा मला बोजा न वांटता आनंद वाटायला हवा. याला म्हणतात सच्चिदानंदाची पूजा.

भारतीय संस्कृती जय वा पराजय, सिद्धी वा असिद्धी, यश वा अपयश यांच्याकडे लक्ष देत नाही. समुद्राच्या लाटा वर उसळतात व खाली पडतात. वर चढतो व खाली पडत समुद्र तीराला गाठतो. समुद्राला भरती येते व ओहोटी येते. परंतु त्याची धीरगंभीर गर्जना कधी थांबत नाही, त्याचे कर्म चालले आहे. जीवन वा मरण, संपत्ती वा विपत्ती, दास्य वा स्वातंत्र्य, जय वा पराजय, इकडे लक्ष न देता ध्येयाकडे सदैव जावयाचे. चारित्र्य ही मुख्य वस्तू आहे. माझा स्वतःचा विकास ही मुख्य वस्तू आहे. तिच्यासाठी मी आहे. जयापजयाच्या लाटांशी झुंजत मी पुढे जाईन. जयाने हुरळणार नाही, पराजयाने होरपळून जाणार नाही. संपत्तीत गर्वान्ध होणार नाही, विपत्तीत निस्तेज होणार नाही. मी माझे कर्म हातात घेऊन पुढे जात राहीन. भारतीय संस्कृती केवळ विजयाचे तत्त्वज्ञान सांगत नाही. केवळ विजयावरच जर ती उभारलेली असेल, तर जगातील निम्म्या अनुभवांवरच ती उभारलेली आहे असे होईल. सदैव सुखाच्या स्वर्गात राहशील अशी लालूच भारतीय संस्कृती दाखवीत नाही. विजयामुळे उतूमातू नकोस; पराजयामुळे कष्टी, हताश होऊ नकोस; हा भारतीय संस्कृतीचा महान संदेश आहे. जयापजयांना छाटीत, काटीत आपण पुढे जावयाचे. जयाचे व पराजयाचे साक्षी व्हावयाचे. ख्रिस्ताला क्रॉसवर जाण्याची वेळ आली तरी तो महापुरुष म्हणाला. “प्रभो ! जशी तुझी इच्छा !” कर्म करीत असताना फास मिळो वा सिंहासन मिळो, हार मिळो वा हाल मिळोत, यश मिळो वा अपयश मिळो, माझा आत्मा मलिन होणार नाही. अशी खऱ्या कर्मवीराची श्रद्धा असते. अदृष्ट फळ त्याला दिसत असते. शेवटी सत्याचा विजय होईल, हे त्याच्या दृष्टीला दिसत असते. विजयाचे नगारे वाजवू नकोस. पराजयाची रडगाणी गाऊ नकोस. दोहोंच्यावर स्वार होऊन, निर्द्वद्व होऊन, सदैव स्वकर्म करीत राहा. त्यात तन्मय हो. तोच तुझा मोक्ष, तीच पूजा, तोच खरा महान धर्म, असे भारतीय संस्कृती सांगत आहे. पण ऐकणार कोण !

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा