shabd-logo

कर्म

4 June 2023

5 पाहिले 5
भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. मी केवळ माझ्यापुरते पाहणे म्हणजे मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दुःख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वतःसाठी पाहता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वतःपुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल. त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल ? समाधान कसे नांदेल ? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वतःचे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल.

जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, या मानवजातीसाठी आहोत, या सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तरी त्याला महत्त्व नाही, परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याल महत्त्व येते. आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसलो पाहिजे व तेथे शोभले पाहिजे.

समाजाला सत्यता आहे, व्यक्तीला नाही. परंतु याचा अर्थ व्यक्तीला स्वातंत्र्य नाही असा नाही. समाजासाठी व्यक्ती आहे; परंतु व्यक्ती आपल्या गुणधर्माप्रमाणे समाजासाठी जगेल. माझ्या ठायी जो वर्ण आहे, त्या वर्णाच्या विकासाने मी समाजाची सेवा करीन. मी समाजाची सेवा करीन हे खरे, परंतु माझ्या विशिष्ट आवडीप्रमाणे मी सेवा करीन. माझा वर्ण समाज मारणार नाही. माझ्या वर्णाच्या विकासासाठी समाज सोयी करून देईल. परंतु माझ्या विकासाने मी समाजाचीच पूजा करीन. माझा विकास हा समाजाला शोभवील, सुखवील, हसवील, पोषवील. मी समाजासाठी व समाज माझ्यासाठी. समाजाला माझ्यामुळे शोभा व समाजामुळे मला शोभा. असा हा अन्योन्य संबंध आहे.

मनुष्याने समाजाची सेवा करावयाची, परंतु कोणती सेवा त्याने करावयाची? त्याची निवड कोणी करावयाची? हे कोणी ठरवावयाचे?

कर्माशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. आपण जर सारे कर्मशून्य होऊ, तर समाज चालेल कसा? सारी सृष्टी कर्म करून राहिली आहे. प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे. प्रत्येकाला शरीर, हृदय व बुद्धी आहे. शरीराने कर्म करावयाचे, त्या कर्मात हृदयाचा जिव्हाळा ओतावयाचा; व ते कर्म करताना बुद्धी वापरावयाची. अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीने शरीर, हृदय व बुद्धी या तिहींच्या योगाने समाजासाठी रात्रंदिवस झिजावयाचे, आनंदाने श्रमावयाचे.

परंतु कोणत्या कर्मात रमावयाचे? आपल्या आवडीच्या कर्मात. आपला जो वर्ण असेल, आपली जी वृत्ती असेल, त्याला अनुरूप अशा कर्मात रमावयाचे. त्याच कर्मात आपण अखंड रमू, -जे कर्म आपणावर लादलेले नसून आपल्या आवडीचे असेल.

जे कर्म माझ्या इच्छेविरुद्ध मला करावे लागेल, त्याने माझा आत्मा शिणेल. त्यात मला आनंद वाटणार नाही. ते कर्म योग्य रीतीने माझ्याकडून होणार नाही. रडतराउतांना घोड्यावर बसविण्यात काय अर्थ?

आपल्या आवडीनुसार कोणतेही सेवेचे कर्म आपण उचलावे व तद्द्वारा समाजदेवाची पूजा करावी. सेवेची सर्व कर्मे पवित्र आहेत. कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही, हीन नाही. वर्णामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ- भाव नाही. सारे वर्ण देवाघरी सारख्याच योग्यतेचे. सेवेच्या सर्व कर्मांची सारखीच किंमत.

समाजाला तत्कालानुरूप नवविचार देणारा पुरुष जितका थोर, तितकाच समाजाला धान्य देणारा शेतकरीही थोर. समाजाचे रक्षण करणारा योद्धा जितका थोर, तितकाच समाजाला मोट करून देणारा चांभारही थोर. शाळेतील शिक्षक जितका थोर, तितकाच रस्ता झाडणारा झाडूवालाही थोर. हृदय ओतून विचारपूर्वक केलेले कोणतेही सेवाकर्म मोक्ष देणारे आहे.

गीतेमध्ये मोक्ष मिळविण्याचे साधन म्हणून स्वकर्म सांगितले आहेः

"स्वकर्मकुसुमीं त्यास पूजितां मोक्ष लाभतो ।"

ईश्वराला दुसऱ्या फुलांची आवड नाही. तुमची दैनंदिन होणारी हजारो कर्मे म्हणजेच फुले. ही कर्मफुले रसमय, गंधमय आहेत की नाहीत एवढे पाहणे म्हणजेच खरा धर्म.

हे स्वकर्म प्रत्येकाचे भिन्नभिन्न असू शकते व असणारच. ईश्वर एकाच मासल्याची माणसे उत्पन्न करीत नाही. छापखान्यातून भराभर आवृत्त्या निघतात, त्याप्रमाणे ईश्वर करीत नाही. ईश्वराची प्रतिमा दुबळी नाही. शेकडो गंधांची व रंगांची फुले तो फुलवितो. शेकडो गुणधर्मांची माणसेही तो या जगदुद्यानात पाठवितो. बागेत शेकडो फुले असतात; परंतु कोणते फूल थोर, कोणते अधिक योग्यतेचे? बागेत एकाच रंगाची व एकाच गंधाची फुले आपणांस आवडणार नाहीत. गुलाब, मोगरा, जाई-जुई, शेवंती यांच्याबरोबरच झेंडू, तेरडा ही फुलेही हवीत. प्रत्येकाचा रंग निराळा, गंध निराळा. सर्वांमुळे बाग नयनमनोहर दिसते. त्या फुलांच्या भोवती हिरवे हिरवे गवतही पाहिजे. गवताला ना फूल, न फळ; परंतु ते हिरवे गवत- ते साधे गवत- तेथे नसेल तर ती फुले शोभणार नाहीत.

मानवी समाजात एकाच वर्णाचे सारे असतील, तर किती नीरस होईल ते जीवन! सारेच गाणारे, सारेच वाजविणारे, सारेच शास्त्रज्ञ, सारेच कुंभार- असे जर असेल तर समाज चालणार नाही. समाजात आनंद दिसणार नाही. विविधतेत आनंद आहे. परंतु ही विविधता साऱ्या समाजासाठी आहे.

या विविधतेत तेव्हाच आनंद राहील, ज्या वेळेस खोटे श्रेष्ठ- कनिष्ठपणाचे भाव समाजात माजणार नाहीत. भारतीय संस्कृतीत ज्या वेळेपासून वर्णावर्णात श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे बंड घुसले, त्या वेळेपासून संस्कृती पोखरली जाऊ लागली. समाजाचा अधःपात आतून नकळत हळूहळू सुरू झाला. भगवान श्रीकृष्णांनी या वृत्तीविरुद्ध बंड पुकारले. समाजसेवेचे प्रत्येक कर्म थोर आहे, हे श्रीकृष्णाने स्वतःच्या कृतीने दाखविले आहे. श्रीकृष्णाने गाई चारल्या, घोडे हाकले, शेणगोळे फासले, उष्टी उचलली, गीताही सांगितली! प्रत्येक कर्म पवित्र आहे अशी त्या महापुरुषाने घोषणा केली.

‘स्त्रियों वैश्यस्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।' मोक्षाची दारे श्रीकृष्णाने खाडखाड सर्वांसाठी मोकळी केली. स्त्रियांना म्हणे ज्ञानाचा अधिकार नाही. मोक्षाचा अधिकार नाही! श्रीकृष्ण म्हणतो, “चुलीजवळ बसणारी, दळण दळणारी, शेण लावणारी, पाळणा हालविणारी स्त्रीही मोक्षाची अधिकारी आहे." जी पतीच्या इच्छेत स्वतःची इच्छा मिळवून टज्ञकते, मुलाबाळांच्या संवर्धनात स्वतःला विसरते, त्या कर्मयोगी स्त्रीस मोक्ष नाही, तर मग कोण बाबा मोक्षाचा अधिकारी?

समाजाच्या सेवेचे कोणतेही कर्म हाती घ्या. त्याने तुम्ही मुक्त व्हाल. सारे संत ही गोष्ट सांगत आहेत. संत टाळकुट्ये नव्हते. संत आळशी नव्हते. परपुष्ट नव्हते. समाजावर स्वतःचा भार त्यांनी कधीच घातला नाही. कोणताही संत घ्या, कोणते तरी समाजोपयोगी कार्य तो करीत असे. कबीर वस्त्रे विणी, गोरा कुंभार, मडकी भाजी, सावता माळी भाजी देई, सेना न्हावी हजामत करी, जनाबाई दळी, तुलाधार वैश्य वाण्याचा धंदा करी, सजन कसाई खाटकाचा धंदा करी. हे सारे संत मोक्षाचे अधिकारी होते.

कसाई मुक्त कसा, असा कोणी प्रश्न करील. समाजात जोपर्यंत मांस खाणारे लोक आहेत, तोपर्यंत समाजात कसायाचा धंदा करणारे लोक असणारच. तो धंदा समाजाच्या सेवेचाच झाला म्हणावयाचा. कसाईखाने म्युनिसिपालिटीस बांधून द्यावे लागणार.

तो कसाई प्राण्याचे हाल न करता त्याला मारील, त्या कसाई - कामातही ज्ञान वापरील, तो मुक्त होईल. तो घाण होऊ देणार नाही. वाटेल तेथे पशुहत्या करणार नाही. लहान मुलाबाळांच्या डोळ्यांआड कोठेतरी ते कर्म करील. कसाई स्वतः मांस खातही नसेल. परंतु पुर्वजांचा धंदा चालत आला आहे, समाजाला तो पाहिजे आहे, तर मग त्या धंद्यात अनभ्यस्त माणसाने पडून पशूंचे अधिक हाल करण्याऐवजी त्या धंद्याचे नीट ज्ञान असणारानेच त्यात पडणे भूतदयेच्या दृष्टीने अधिक श्रेयस्कर आहे. अनासक्त राहून ते काम तो करील.

कसायाप्रमाणेच फाशी देणारा मांगही. समाजात जोपर्यंत फाशीची शिक्षा आहे, तोपर्यंत फाशी देणारे कोणीतरी पाहिजेत. कोणा अनभ्यस्त माणसाने कसातरी वेडावाकडा फास गळ्याला लावून द्यावा व तो दुर्दैवी अपराधी धडपडत अधिक वेळ लोंबकळावा, यात किती दुःख आहे ! फाशी द्यावयाचेच आहे तर त्याला नीट द्या. पटकन फास बसेल व झटकन, फार वेदना न होता, फार हाल न होता प्राण जाईल असे करा. आणि ही गोष्ट त्या कर्मात कुशल असाच मनुष्य करू शकेल. इंग्लंडमध्ये कुऱ्हाडीने डोके तोडावयाचे अशी शिक्षा असे. ज्या वेळेस मोठमोठ्या मोहऱ्यांना ही शिक्षा देण्यात येई, त्या वेळेस मुद्दाम दूरदूरचे कुन्हाडवाले बोलावण्यात येत. एका घावासरसे मुंडके सफाईने दूर करील अशाला मुख्यत्वेकरून बोलावून आणीत. हेतू हाच की कैद्याला कमी दुःख व्हावे.

फाशी देणाऱ्या मांगाने तो फास नीट काळजीपूर्वक दिला, कसायाने पशूला फार त्रास न देता एकदम नीट मारले, तर तो मांग व तो कसाई मुक्त आहेत. दोषी कोणी असेलच तर सारा समाज दोषी आहे.

अशा रीतीने समाजाच्या सेवेची जी जी कर्मे आहेत ती ती करणारे मुक्त होतात, असे गीता - महाभारत सांगत आहेत. त्या त्या कर्माची योग्यता सारखीच; कोणालाही अहंकार नको. मी श्रेष्ठ वर्णाचा म्हणून कोणाची मान फार वर व्हावयास नको. कोणाचीही मान मी नीच वर्णाचा असे मनात येऊन खाली व्हावयास नको. सर्वांची मान सरळ असू दे. सर्वांची एकच उंची, एकच किंमत.

उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. एकदा इंद्र, वायू, अग्नी वगैरे देवांत फार वाद माजला. प्रत्येकजण म्हणे मी श्रेष्ठ. इंद्र म्हणाला, “मी पाऊस पाडतो. पाऊस न पडेल तर पृथ्वी सुकेल. जीवन अशक्य होईल.” वायू म्हणाला, “एक वेळ पाणी नसले तरी चालेल; परंतु हवा तर आधी हवी. मी सर्वांत श्रेष्ठ आहे.” अग्नी म्हणाला, “ऊब आधी हवी. उष्णता नाहीशी होताच मनुष्य थंडगार होतो. पाय गार पडत चालले असे लोक म्हणतात! अग्नीशिवाय, उष्णतेशिवाय सारे मिथ्या आहे. "

असे वाद चालले असताना तेथे एकदम एक तेजस्वी देवता आली. ही देवता कोण, कोठली वगैरेचे देवांना गूढ पडले. अग्नी म्हणाला, “मी त्या देवतेजवळ जाऊन तिची माहिती विचारून येतो.”

अग्नी त्या देवतेजवळ गेला व म्हणाला, “आपण कोण?” त्या देवतेने उलट प्रश्न केला, “आपण कोण?" अग्नी चिडून म्हणाला, “माझे नाव माहीत नाही? मी अग्नी !” देवता म्हणाली, “आपण काय करीत असता?”

अग्नी संतापाने म्हणाला, “अहो, सारे ब्रह्मांड एका क्षणात मी जाळून टाकीन! माझा पराक्रम हा तुम्हांला माहीत नाही?” ती देवता म्हणाली, “असेल तुमचा तसा पराक्रम. परंतु माझ्या

ऐकिवात नाही. ही येथे एक काडी आहे, ती जाळून दाखवा बरे." अग्नीने आपल्या साऱ्या ज्वाळा प्रज्वलित केल्या, परंतु ती काडी त्याच्याने जाळवेना. अग्नी खट्टू झाला. खाली मान घालून तो निघून

गेला!

नंतर वारा आला.

“आपण कोण?” वायूदेवाने प्रश्न केला.

“आपण कोण?" देवतेने उलट विचारले.

“अहो, मी वारा.” वायू अहंकाराने म्हणाला.

"म्हणजे काय करता आपण?” देवतेने प्रश्न केला.

“अहो, मी पर्वताचे चेंडू करतो! वृक्ष उपटतो! पाण्याला नाचवतो. प्रचंड लाटा निर्माण करून गलबते बुडवितो ! माझा पराक्रम तुम्हाला माहीत नाही?" वायूने रागारागाने विचारले.

“नाही; ही येथे एक काडी आहे ती उडवून दाखवा बरे.” देवतेने सांगितले.

वाऱ्याने सारी शक्ती एकवटली. परंतु ती क्षुद्र काडी त्याला जागची हालविता आली नाही. वारा लज्जेने खाली मान घालून निघून गेला! अशा रीतीने ते सारे भांडखोर अहंमन्य देव फजित झाले. शेवटी ती अध्यात्मदेवता उमा त्या देवांना म्हणाली, “अरे वेड्यांनो, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ असे भांडता काय? कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. त्या विश्वशक्तीने इंद्राच्या ठिकाणी पाऊस पाडण्याची शक्ती ठेवली आहे, म्हणून इंद्र पाऊस पाडू शकतो. अग्नीच्या ठिकाणी जाळण्याची शक्ती ठेवलेली आहे, म्हणून अग्नी जाळतो. वाऱ्याच्या ठिकाणी वाहण्याची शक्ती ठेवलेली आहे, म्हणून वारा वाहतो. त्या विश्वशक्तीने ती शक्ती जर काढून घेतली, तर तुम्ही शून्य आहात. मढी आहात. त्या त्या शक्तीचा अहंकार नका बाळगू. त्या त्या विशिष्ट शक्तीमुळे दुसऱ्यास हीन नका समजू.”

ही गोष्ट अत्यंत बोधप्रद आहे. ज्ञान देणाऱ्या ऋषीने रस्ता झाडणाऱ्या झाडूवाल्यास तुच्छ लेखू नये. चित्रकाराने गवयास हीन समजू नये. कुंभाराने विणकरास कमी समजू नये. आपण सर्वांनी एकमेकांस रामराम करावयाचा. रामराम म्हणजे काय ? तू राम व मी राम! तूही पवित्र व मीही पवित्र !

“हे मलमूत्र नेणाऱ्या भंगीदादा, तू राम आहेस. हा प्रणाम घे." असे सद्गदित होऊन ऋषी म्हणेल. “हे दिव्य ज्ञान देणाऱ्या ऋषे! माझा प्रणाम घे. तूही रामच

आहेस." असे भंगी गहिवरून नम्रपणे म्हणेल. “रामराम”, “सलाम आलेकूं, आलेकूं सलाम” असे म्हणत सर्वांनी आनंदाने नांदावयाचे आहे.

परंतु भगवान श्रीकृष्णांची ही थोर दृष्टी भारतवर्ष विसरला. संतांचे दिव्य जीवनकर्म सारे विसरले; आणि श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे वाद समाजात माजून सारा समाज पोखरला गेला. बुद्धिजीवी आणि श्रमजीवी असे समाजपुरुषाचे तुकडे पाडण्यात आले. बुद्धिजीवी स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. श्रमजीवी मनुष्याला सारे हीन समजू लागले. संपत्ती निर्माण करणारा तुच्छ मानला जाऊ लागला. गादीवर बसून संपत्तीचा उपभोग घेणारे देवाप्रमाणे मानले जाऊ लागले.

रामायणात एक लहानशी गोष्ट आहे. रामचंद्र ज्या वेळेस शबरीला भेटावयास आले, त्या वेळचा तो प्रसंग आहे. ज्या वनात राम बसले होते, त्या वनात सर्वत्र फुले फुलली होती. ती फुले कोमेजत नसत, सुकत नसत, सदैव मधुर गंध त्यांचा सुटलेला असे. राम शबरीला म्हणाले, “ही फुले कोणी लाविली?” शबरी म्हणाली, “रामा, त्याचा इतिहास आहे.”

रामाने विचारले, “कोणता इतिहास?”

शबरी म्हणाली, “रामा, ऐक. एकदा मतंग ऋषी आश्रमात जळण नव्हते म्हणून मनात विचार करीत होते. येथे मतंग ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या आश्रमात पुष्कळ विद्यार्थी असत. आश्रमात दूरदूरचे ऋषिमुनीही काही दिवस येऊन राहात. पावसाळा जवळ येत होता. पावसाळ्यासाठी चार महिने पुरेल इतके जळण साठवून ठेवण्याची जरुरी होती. परंतु विद्यार्थी निघेनात. शेवटी वृद्ध मतंग ऋषी खांद्यावर कुऱ्हाड घेऊन निघाले. आचार्य निघताच सारे छात्रही उठले. आश्रमातील पाहुणेही निघाले. सारे दूर रानात गेले. वाळलेली काष्टे त्यांनी तोडली. मोठमोठ्या मोळ्या त्यांनी बांधल्या. त्या मोळ्या डोक्यावर घेऊन सारी मंडळी परत फिरली.

“रामा! ते भर उन्हाळ्याचे दिवस. प्रखर ऊन पडले होते. सारी मंडळी घामाघूम होऊन गेली होती. त्यांच्या अंगप्रत्यंगांतून घाम निथळत होता. तो घाम जमिनीवर गळत होता. तिसऱ्या प्रहरी सर्व आश्रमात परत आले. त्या दिवशी मग सुट्टी होती. सारे श्रान्त होते, थकलेभागले होते. लवकर झोपले. "

“पहाटे मतंग ऋषी उठले. सारे विद्यार्थी उठले. स्नानाला निघाली मंडळी एकदम सुगंध आला. त्या मंद मंद उषःकालीन वाऱ्यांच्या झुळकांबरोबर प्रसन्न वास येऊ लागला. तसा सुगंध पूर्वी कधीही आला नव्हता. 'कोठून येतो वास, कोठून येतो वास', असे सारे विस्मयाने बोलू लागले. शेवटी मतंग ऋषी म्हणाले, 'जा रे पाहून या.' मुले हरिणाप्रमाणे उड्या मारीत निघाली, तो त्यांना काय दिसले? ज्या ज्या ठिकाणी रानातून मोळ्या आणीत असताना घाम गळाला होता, त्या त्या ठिकाणी एक एक सुंदर फूल फुललेले त्यांना दिसले! रामा, ही घामातून निर्माण झालेली फुले आहेत!”

ज्या वेळेस रामायणात मी हे वाचले, त्या वेळेस मी नाचलो. मी गहिवरलो. “घर्मजानि कुसुमानि । ” घामातून निर्माण झालेली फुले! निढळाचा घाम ढाळणाऱ्या आपल्या मुलांकडे भूमाता जणू शत डोळे उघडून पाहात होती. ती फुले नव्हती, भूमातेचे ते प्रेमळ पवित्र डोळे होते! माझी मुले कशी श्रमताहेत ते ती पाहात होती. मी मनात विचार करू लागलो. जगात कोणते पाणी श्रेष्ठ, असा मी स्वतःला प्रश्न विचारला. गंगा-यमुनांचे, कृष्णा-गोदावरीचे, सप्तसमुद्रांचे पाणी का पवित्र ? स्वाती नक्षत्राचे का पाणी मोलवान? पश्चात्तापाने डोळ्यांतून अश्रू येतात ते का पवित्र ? दुसऱ्याच्या दुःख- यांतून अश्रू येतात ते का पवित्र ? प्रेमळ माणसाचे स्मरण होऊन डबडतात, त्या अश्रुधारा का सर्वांत थोर ?

मी म्हटले, “श्रमजीवी माणसाच्या अंगातून गळणारे घामाचे पाणी हे सर्वांत थोर.” ते पाणी जगाचे पोषण आहे. देव पाऊस पाडील; परंतु शेतकरी स्वतःच्या घामाचा पाऊस जर शेतात पाडणार नाही, तर काय पिकणार आहे? माणसांना दाणे मिळणार नाहीत. पाखरांना दागे मिळणार नाहीत. सारी सृष्टी मरेल !

इंग्लंडमधील अत्यंत प्रतिभावान व थोर मनाचा कवी शेले एके ठिकाणी म्हणतो, “जगातील सर्वांत थोर कलावान कोण? तर शेतकरी. ” किती यथार्थ आहे त्याचे म्हणणे ! भगभगीत उजाड दिसणाऱ्या जमिनीला तो हिरवी हिरवीगार करतो. फुलाफळांनी तिला नटवितो, हसवितो; परंतु अशा त्या थोर शेतकऱ्याची आज काय स्थिती आहे? या ऋषींच्या भूमीत त्या शेतकऱ्याची काय दैना आहे? सारे त्याला तुच्छ लेखतात. सारे त्याला अपमानितात. त्याला कोणी गादीशी बसविणार नाहीत. सारे त्याला दारात बसवितील. ज्या दिवशी शेतकऱ्याला प्रथम लोड मिळेल त्या दिवशी भारतीय संस्कृती लोकांना समजू लागली असे मी म्हणेन. परंतु आज सर्वांना पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनवृक्षावर बांडगुळाप्रमाणे जगणाऱ्यांनाच मान मिळत आहे! किती विद्रूप व नीच आहे हा देखावा !

आज आपल्या समाजात धडे व मुंडकी दूर दूर पडलेली आहेत. घडाला मुंडके नाही व मुंडक्याला घड नाही! समाज- पुरुष असा मरून पडला आहे. बुद्धिजीवी लोक, डोकेबाज लोक श्रमजीवी माणसाची कदर करीत नाहीत. परंतु हे मुंडके धडाजवळ गेल्याशिवाय राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न होणार नाही. श्रमजीवी, बुद्धिजीवी एकत्र येऊ देत. बुद्धिवादी श्रम करू देत व श्रमणाऱ्याला विचाराचा आनंद मिळू दे, असे होईल तो सुदिन.

भारतीय संस्कृती कर्ममय आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आळस खपत नाही. या संस्कृतीस कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही. कर्माचा महिमा भारतीय संस्कृतीत किती वाढविलेला आहे हे जरा पाहा तरी. ती ती कर्माची साधनेसुद्धा आपण पवित्र मानली आहेत. साधनेसुद्धा पवित्र, मग ते कर्म किती पवित्र असेल?

बायका केरसुणीला पाय लावू देत नाहीत, जात्याला पाय लावू देत नाहीत, चुलीला पाय लावू देत नाहीत, याचा अर्थ काय? बायकांची ही सेवासाधने आहेत. केर काढून, दळून, स्वयंपाक करून त्या सेवा करतात. त्या सेवेने त्या मुक्त होतात. त्यांच्या मोक्षप्राप्तीची साधने म्हणजे ती केरसुणी व ती चूल. केरसुणीला पाय लावणे म्हणजे पाप, ही गोष्ट ज्या संस्कृतीने शिकविली, त्या संस्कृतीच्या भक्तांनी व उपासकांनी केर काढण्याचे काम तुच्छ मानावे, झाडूवाल्याला पतित समजावे, हीन मानावे, ही केवढी खेदाची गोष्ट!

शेतकरी नांगराला पाय लावणार नाही. पंडित पुस्तकास पाय लावणार नाही. चांभार आपल्या दारावर कातड्याच्या तुकड्यांचे तोरण लावील. महार हाडे दारावर लावील. यात महान अर्थ आहे. ते ते सेवाकर्म पवित्र आहे. ब्राह्मण समाजाची सेवा ज्ञानदानाने करीत असेल, तर सेवासाधन जे पुस्तक ते तो स्वतः पवित्र मानील; आणि इतरही त्याचे ते सेवासाधन तुच्छ मानणार नाहीत. महार - चांभार मृत ढोरे फाडून समाजाची सेवा करीत असतील, तर ती हाडे, ती चर्मे पवित्र आहेत. त्यातून ते संपत्ती निर्माण करीत आहेत. स्मशानात शिव राहतो व त्याच्या गळ्यात हाडांचे अलंकार आहेत. महार- चांभार म्हणजेच शिवशंकराची मूर्ती होय.

महाभारतात अर्जुनाला गांडीव धनुष्याची निंदा सहन होत नसे, अशी गोष्ट आहे. गांडीवाची निंदा करणाऱ्या धर्मराजासही मारावयास तो धावला. अर्जुनाला गांडीव इतके प्रिय व पवित्र का वाटे? कारण ते त्याचे सेवासाधन होते. समाजाचे दुष्टांपासून संरक्षण करण्याचे, दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्याचे ते धनुष्य साधन होते. त्याची निंदा अर्जुनाला सहन होणार नाही.

ती ती सेवासाधनेही पवित्र आहेत. मग ती कर्मे पवित्र नाहीत का? लेखणी असो वा तलवार असो, तराजू असो वा नांगर असो, चूल असो की झाडू असो, आरी असो की वस्तरा असो, ही सारी सेवासाधने भारतीय संस्कृती पवित्र मानते; आणि नव्या युगात जी नवीन सेवासाधने निघतील, तीही भारतीय संस्कृती पवित्र मानील.

सेवेच्या साधनांची कितीतरी काळजी घेण्यारबद्दल सांगितले आहे. सेवासाधने सदैव स्वच्छ ठेवावीत, नाहीतर सेवा उत्कृष्ट करता येणार नाही. पंडिताजवळची पुस्तके नीट व्यवस्थित असावीत. वीराजवळची शस्त्रे घासून-पुसून ठेवलेली असावीत. चूल सारवलेली असावी. कोयता, विळा धार लावलेले असावेत. सेवेची साधने नीट न ठेवली तर उत्कृष्ट सेवा करता येणार नाही.

परंतु येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. मनुष्य सेवासाधन काळजीपूर्वक वापरतो, परंतु काही साधनांकडे तो दुर्लक्ष करतो. सेवासाधने दोन प्रकारची आहेत: सजीव व निर्जीव.

मनुष्य सजीव साधनांपेक्षा निर्जीव साधनांची अधिक काळजी घेतो असे आपणांस दिसून येते. एखादा जमीनदार बैलगाडी नीट ठेवील, चाक नीट आहे की नाही पाहील, वंगण घातलेले आहे की नाही पाहील; परंतु बैलाला पोटभर चारा मिळाला की नाही, वेळेवर पाणी मिळाले की नाही हे पाहणार नाही.

मोठ्या कारखान्यात तुम्ही जा. तेथे यंत्राला सारखे तेल मिळत असते. यंत्राची खूप चिंता वाहण्यात येते. यंत्रे वरचेवर स्वच्छ करण्यात येतात. परंतु या निर्जीव यंत्रासमोर जे एक सजीव यंत्र असते, त्याची कोण काळजी घेतो? त्या मजुरांच्या शरीरयंत्राला तेलातुपाचे ओंगण भरपूर मिळते की नाही, याची काळजी कोणता कारखानदार घेतो?

कारखाना हे सेवेचे साधन आहे. कारखान्यातून समाजाला उपयुक्त वस्तू पुरविण्यात येतात. कारखाना ही पवित्र वस्तू आहे. या पवित्र कर्माची सर्वं साधनेही पवित्र आहेत. म्हणूनच यंत्राची नीट काळजी घेणे म्हणजे महान धर्म होय. देवाची मूर्ती म्हणजे माझा साचा. तो साचा घासूनपुसून ठेवणे म्हणजे देवाची मूर्ती घासणे होय. परंतु निर्जीव यंत्रांच्या पूजेबरोबरच सजीव यंत्रांचीही पूजा कारखानदाराने केली पाहिजे. त्या मजुरांना चांगले अन्न, पुरेसे कपडे, राहावयाला नीट हवेशीर घरे, प्यायला स्वच्छ पाणी, अपघातात तत्काल मदत, मजुरांचा विमा, त्यांना पगारी रजा, त्यांना करमणूक इत्यादी सर्व गोष्टी आहेत की नाहीत हे पाहणे म्हणजे महान धर्म होय. हा महान धर्म न पाळणारा नरकाचा धनी आहे. साऱ्या समाजात तो दास्य-दारिद्र्याचा नरक निर्माण करील. दुर्गुणांचा नरक निर्माण करील. व्यभिचार, चोरी, दारू, खून यांचा प्रसार करील.

समाजात हा दुःखप्रद देखावा दिसतो आहे. श्रीमंत मनुष्य मोटर ठेवण्यासाठी जितकी सुंदर खोली बांधील, तितकी गड्याला राहावयासाठी बांधणार नाही. माणसांपेक्षा मोटरी पूज्य आहेत ! मजुरांपेक्षा यंत्रे मौल्यवान आहेत ! परंतु ही सजीव सेवासाधने जर उपेक्षिली गेली तर सारा संसार मयाण होईल, ह्याची ह्या विचारहीन स्वार्थी कारखानदारांस कल्पनाही नसते.

गीतेतील पंधराव्या अध्यायात क्षर व अक्षर असा दोन प्रकारचा पुरुष सांगितला आहे; आणि या दोघांना व्यापून असणारा तो पुरुषोत्तम. क्षरसृष्टी, अक्षरसृष्टी व त्यांना वेढून असणारा परमात्मा. तिघेही पवित्र. क्षरसृष्टी म्हणजे आजूबाजूची बदलणारी सृष्टी. या क्षरसृष्टीतून आपणांस सेवेची साधने मिळतात. फुले, फळे, धान्य सारे मिळते. लाकूड, धातू, दगड सारे मिळते.

कालची चूल फुटली आज नवीन घातली. पहिली मोटर बिघडली, नवीन घेतली. पहिला दिवा बिघडला, नवीन घेतला. अशा प्रकारे ही साधने बदलत आहेत. परंतु ही क्षर साधनेही पुरुषोत्तमाचेच रूप. ही क्षरसृष्टीही पूज्यच आहे.

मोठमोठ्या कारखान्यांतील मजूर हीसुद्धा एक प्रकारची क्षरसृष्टीच आहे. कारखाना शंभर वर्षे चालेल. जुने मजूर गेले, नवीन आले. मजूर नेहमी बदलत राहतीलच. परंतु मजूर कोठलाही असो, तो पवित्रच आहे. हे बदलणारे मजूर पुरुषोत्तमाचीच रूपे आहेत. त्यांची पूजा करणे हे कर्तव्य आहे.

कारखानदाराच्या दृष्टीने मजूर क्षर आहे. परंतु तो मजूर अक्षरही आहे. त्याच्यात अमर परमात्मा आहे. तो कधी नष्ट होत नाही. त्या अमर परमात्म्याची ओळख तो मजूर स्वतःच्या सेवाकर्माने करून घेईल.

सेवेचे कर्म उत्कृष्ट व्हावयास पाहिजे असेल, तर साधने पवित्र माना. सजीव-निर्जीव साधने पवित्र माना. त्यांना प्रसन्न ठेवा. दुसरा देव नाही, दुसरा धर्म नाही. जो कारखानदार मजुरांना देवाप्रमाणे मानील, त्यांना स्वसेवेची पवित्र साधने मानून त्यांना संतुष्ट ठेवील, त्याच्याहून देवाला कोण अधिक प्रिय वाटेल?

भारतीय संस्कृतीच्या उपासकांनो ! कोणतेही कर्म - सेवाकर्म तुच्छ मानू नका. मरेपर्यंत सेवा करा. स्वतःच्या आवडीचे कर्म करा. स्वतःचा वर्ण ओळखून तदनुसार वागा. ते ते कर्म उत्कृष्ट करा. त्या कर्माची सजीव-निर्जीव साधने पवित्र मानून त्यांची काळजी घ्या; आणि अशा रीतीने स्वकर्म उत्कृष्ट करून त्या जनताजनार्दनाची, या समाज-पुरुषाची पूजा करा. हा श्रीगीतेचा धर्म आहे. परंतु या धर्माची खरी ओळख आज कितीकांना आहे बरे?
24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा