shabd-logo

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023

114 पाहिले 114
भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्या पाठीशीही उत्तुंग व भव्य असे अद्वैतदर्शन आहे. कैलासावर बसून ज्ञानमय भगवान शंकर अद्वैताचा डमरू अनादी कालापासून वाजवीत आहेत. शिवाजवळ शक्ती असणार. सत्याजवळच सामर्थ्य असणार. प्रेमाजवळच पराक्रम असणार. अद्वैत म्हणजे शिवत्व. अद्वैत म्हणजे निर्भयता. या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्मू शकेल.

भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली. अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला. या मंत्राइतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही. जगात दुजाभाव असणे म्हणजे दुःख असणे व समभाव म्हणजे सुख असणे. सुखासाठी धडपडणाऱ्या मानवाने अद्वैताची कास धरल्याशिवाय तरणोपाय नाही.

ऋषी कळकळीने सांगत आहेत, की ज्याच्या ज्याच्याबद्दल तुला दुजाभाव वाटत असेल, त्याच्या त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने मिठी मार.

"सहनाववतु । सह नौ भुनक्तु । 
 सहवीर्यं करवावहै । 
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । 
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। "

या थोर मंत्राचा खोल अर्थ काय? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणावयाचा नाही. हा मंत्र सर्वत्र उच्चारावयाचा आहे व तदनुरूप वागायचे आहे. केवळ गुरु-शिष्यापुरता हा मंत्र नाही. ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांबद्दल व ब्राह्मणेतरांना ब्राह्मणांबद्दल दुजाभाव वाटत आहे का? येऊ देत ते एके ठिकाणी व म्हणू देत हा मंत्र. स्पृश्य व अस्पृश्य परस्परांपासून दूर आहेत का? येऊ देत त्यांना जवळजवळ व उच्चारू देत हा मंत्र. हिंदु-मुसलमान परस्परांस पाण्यात पाहात आहेत का? येऊ देत ते जवळ. हातात हात घेऊन उच्चारू देत हा मंत्र. गुजरातेतील व महाराष्ट्रातील लोक एकमेकांचा द्वेष करीत आहेत का? येऊ देत त्यांना जवळ व उच्चारू देत हा मंत्र.

ज्यांना एकमेकांबद्दल दुजाभाव वाटत नाही, त्यांच्यासाठी हा मंत्र नाही. दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे. जगात सर्वत्र दिसून येणाऱ्या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीने हा महान दीप दिला आहे. हा दीप हातात घेऊन आपण पाहू या. आपले व्यवहार करू या. आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना. समर्थांनी सारे अद्वैत तत्त्वज्ञान माझ्या मते एका ओवीत सांगून ठेवले आहे. अद्वैताचे प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकविले आहे.

" आपणास चिमोटा घेतला । तेणें जीव कासावीस झाला।

आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे ।।"

मला कोणी मारले, तर मला दुःख होते. मला अन्नपाणी मिळाले नाही, तर माझे प्राण कंठात येतात. माझा कोणी अपमान केला, तर मेल्याहून मेल्याप्रमाणे मला होते. मला ज्ञान मिळाले नाही, तर मला लाज वाटते. माझ्याप्रमाणेच दुसऱ्याला असे होत असेल. मला मन, बुद्धी, हृदय आहे. दुसऱ्यालाही ती आहेत. मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे, तशीच ती दुसऱ्यालाही असेल. माझी मान वर असावी, तशीच दुसऱ्याचीही असणे योग्य आहे. थोडक्यात, आपणांस येणाऱ्या सुख-दुःखांच्या अनुभवांवरून दुसऱ्याच्या सुखदुःखांच्या कल्पना येणे, म्हणजेच एक प्रकारे अद्वैत. मला ज्या गोष्टींनी दुःख होते, त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत मी करणार नाही, हा त्यापासून मनाला बोध मिळतो. मला ज्या गोष्टींनी आनंद होतो, त्या दुसऱ्यासही लाभाव्यात अशी मी खटपट करीन, असेही माझे अद्वैत मला सांगते. अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे; अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे; अद्वैत म्हणजे अनुभूती.

ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत. सर्व जगाशी, सर्व चराचराशी ते एकरूप झाले, रुद्रसूक्त लिहिणारा ऋषी मानवांना काय काय लागेल त्याची काळजी वाहात आहे. सर्व मानवजातीच्या गरजा जणू त्याला स्वतःच्या वाटत आहेत. शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, भुका तो अनुभवीत आहे.

“घृतं च मे, मधुं च मे, गोधूमाश्च मे सुखं च मे, शयनं च मे हीश्च मे, श्रीश्च मे, धीश्च मे, धिषणा च मे । "

“ मला तूप हवे, मध हवा, गहू हवेत, सुख हवे, आंथरूण-पांघरूण हवे, विनय हवा, संपत्ती हवी, बुद्धी हवी, धारणा हवी, मला सारे हवे."

तो ऋषी स्वतःसाठी हे मागत नाही. तो जगदाकार झाला आहे. आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे. या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागली आहे. पोटभर खायला, अंगभर ल्यायला या सर्व भावाबहिणींना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसे लाभेल, याची चिंता त्या महर्षीला लागूनच राहिली आहे.

समर्थांचेसुद्धा असे एक मागणे आहे. राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्तोत्रात मागितली आहे; त्याला “पावनभिक्षा” असे सुंदर नाव दिले आहे. विद्या दे, संगीत दे, गायन दे. साऱ्या हृद्य व मंगल वस्तू त्यांनी मागितल्या आहेत.

रुद्रसुक्तातील कवी समाजाच्या गरजा सांगत आहे व गरजा पुरविणाऱ्यांना तो वंदन करीत आहे. त्या ऋषीला अमंगल व अशुची कोठेही इवलेसुद्धा दिसत नाही. 
“चर्मकारेभ्यो नमो, रथकारेभ्यो नमो, कुलालेभ्यो नमो । ” “अरे चांभारा, तुला नमस्कार; अरे सुतारा, तुला नमस्कार; अरे कुंभारा, तुला नमस्कार !”

समाजपुरुषाची कर्ममय पूजा करणारे हे सारे श्रमजीवी त्या थोर ऋषीला वंद्य वाटत आहेत. तो चांभाराला अस्पृश्य मानीत नाही, कुंभाराला तुच्छ लेखीत नाही, समाजाला जिवंत विचार देणाऱ्या विचारस्त्रष्ट्यांइतकीच मडकी देणाऱ्यांचीही तो योग्यता मानीत आहे.

"There is nothing great or small in the eyes of God." “देवाच्या दृष्टीने समाजसेवेचे कोणतेही कर्म उच्च किंवा तुच्छ

नाही.” ती ती सेवाकर्मे करणारे मंगल व पवित्रच होत. परंतु रुद्रसूक्तातील ऋषी सेवा करणाऱ्यांना वंदन करीत आहे असे नाही, तर तो पतितांनाही प्रणाम करीत आहे. मनुष्ये पतित तरी का होतात?

समाजाच्या दोषांमुळेच ती पतित होतात.

"स्तेनानां पतये नमो"

असे हा ऋषी म्हणत आहे. चोरांना व चोरांच्या नायकांना हा ऋषी प्रणाम करीत आहे. हा ऋषी वेडा नाही. चोर तरी चोरी का करतो? श्रीमंताच्या मुलाजवळ शेकडो खेळणी असतात. गरिबाच्या मुलाजवळ एकही नसते. त्या गरिबाच्या मुलाने एखादे खेळणे चोरले तर त्याला फटके मारतात! शेतात मरेमरेतो काम करणाऱ्या मजुराला जेव्हा पोटभर खावयाला मिळत नाही, तेव्हा तो धान्य चोरतो; त्यात त्याचा काय दोष? तो चोर नाही. त्याला उपाशी ठेवणारा समाज चोर आहे. ऋषी कळवळून म्हणतो, “अरे चोरांनो ! तुम्ही चोर नाही. समाज नीट वागेल, तर तुम्हांला चोरी करावी लागणार नाही. तुमच्यातील माणुसकी मी पाहात आहे. तुमच्यांतील दिव्यता मला दिसत आहे. तुमच्या आत्म्याचे वैभव दुसऱ्या दगडांना दिसले नाही, तरी निर्मल दृष्टी असणाऱ्या मला ते दिसल्याशिवाय कसे राहील?"

अद्वैताचा विसर पडलेल्या समाजात मग क्रांती होते. ईश्वर जगाला धडा देऊ इच्छितो. शेजारी भावाला, तो रात्रंदिवस श्रम करीत असूनही राहायला नीट घर नाही, खायला पोटभर अन्न नाही, आणि मी माझ्या प्रचंड बंगल्यात रेडिओ ऐकत बसतो! ही भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृतीचा हा खून आहे! उपाशी लोकांना पाहून दामाजीने कोठारे उघडी केली. घरात चोरी करावयास आलेल्या माणसास एकनाथ म्हणाले, “आणखी थोडे घेऊन जा.” चोरी करणाऱ्या माणसास पाहून आपणांस आपली लाज वाटली पाहिजे. आपल्या समाजाची चीड आली पाहिजे.

अद्वैत म्हणजे थट्टा झाली आहे. भरल्या पोटी अद्वैताची चर्चा करीत बसतात. परंतु जीवनात अद्वैत जाणणारा भगवान बुद्ध वाघिणीला उपाशी व आजारी पाहून तिच्या तोंडात मांडी देतो! अद्वैताचा अनुभव घेणारा तुलसीदास झाड तोडणाऱ्यापुढे आपली मान करतो व ते फुलणारे, फळणारे, छाया देणारे चैतन्यमय झाड राखू पाहतो! अद्वैताचा अनुभव घेणारा कमाल गवत कापण्यासाज्ञठी रानात गेल्यावर,

"सुटे मंद वारा डुले सर्व रान"

असे दृश्य पाहून विरघळतो. नको रे कापू, नको रे कापू, असे जणू हे गवत सांगत आहे, असे त्याला वाटते. त्याच्या हातातील विळा गळून पडतो. अद्वैताचा अनुभव घेणाऱ्या ऋषींच्या आश्रमात वाघ व शेळी प्रेमाने नांदतात, हरिणे सिंहाची आयाळ खाजवतात, साप मुंगसाला मिठी मारतो. अद्वैत म्हणजे उत्तरोत्तर वाढते प्रेम. विश्वाला विश्वासाने आलिंगिणारे प्रेम..

परतु अद्वैताला जन्म देणाऱ्या व अद्वैत जीवनात अनुभवू पाहणाऱ्या थोर संतांच्या या भरतभूमीत आज अद्वैताचा संपूर्ण अस्त झाला आहे. आम्हांला ना शेजारी ना पाजारी ! आम्हांला आजूबाजूचे विराट दुःख दिसत नाही. आमचे कान बधिर झाले आहेत, डोळे अंधळे झाले आहेत. सर्वांना हार्ट डिझीज झालेला आहे!

वेदांतील एक महर्षी हृदय पिळवटून सांगत आहे:

"मोघमन्नं विन्दते अप्रचेताः

सत्यं ब्रवीमि वध इत् स तस्य न अर्यमाणं पुष्यति नो सखायं केवलाघो भवति केवलादि"

“संकुचित दृष्टीच्या मनुष्याला मिळालेल्या धान्याच्या राशी फुकट आहेत. त्याच्या घरात साठवलेले ते धान्य नसून ते त्याचे मरण साठवलेले आहे! जो भावाबहिणींस देत नाही, योग्य माणसांस देत नाही, असा केवळ स्वतःपुरते पाहणारा मनुष्य केवळ पापरूप होय.”

आजूबाजूला लाखो कष्ट लोक अन्नवस्त्रहीन असता आपल्या बंगल्यात कपड्यांचे ढीग व धान्याची कोठारे ठेवणे हे धोक्याचे आहे. ऋषी म्हणतो, “तुमचा चक्काचूर करणारे ते बाँबगोळे आहेत. ' " ऋषींचे हे म्हणणे इतर देशांत अनुभवास येत आहे. आपल्याही देशात येईल.

नामदेवांनी उपाशी कुत्र्याला तूप पोळी खाऊ घातली. त्याच संतांच्या भूमीत उपाशी माणसांची कोणी कदर करीत नाही. कोणी अद्वैतांचा अभिमानी शंकराचार्य संस्थानिकास सांगत नाही की कर कमी कर; सावकारास सांगत नाही की व्याज कमी कर; कारखानदारास सांगत नाही की मजुरी वाढव व कामाचा थोडा वेळ कमी कर. सर्वांच्या पुड्या खाऊन व पाद्य-पूजा घेऊन संचार करणारे 'श्री' जीवनात अद्वैत यावे म्हणून मरत आहेत का?

आजच्या या साम्यवादाला हे संस्कृतीच्या गप्पा मारणारे हसतात. परंतु साम्यवाद म्हणजे एक प्रकारे कृतीत आणलेला वेदान्त होय. हजारो वर्षे वेदान्त घोकला जात आहे. कथा-पुराणांतून सांगितला जात आहे. वेदान्त शिकविणाऱ्या समाजाला अशी विकलता का यावी? आमचा पाया पोखरला जात होता. अद्वैत शिकविणाऱ्या समाजात द्वैताचा नुसता बुजबुजाट उडाला आहे. या बुजबुजाटात सुखशांती आणण्याचे काम साम्यवादी करीत आहेत.

"सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।"

“सारे सुखी असोत, सारे निरोगी असोत” असे मंत्र पुटपुटल्याने सुख व आरोग्य निर्माण होत नसते. मंत्र म्हणजे ध्येय. ते ध्येय कृतीत आणण्यासाठी मरावयाचे असते. झिजावयाचे असते. हे मंत्र पुटपुटताना किती लोकांना सुख नाही, किती लोकांना औषध नाही, किती लोकांना घाणेरड्या खोलीत राहावे लागते, किती लोकांना स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, किती लोकांना आरोग्याचे ज्ञान नाही, याचा विचार तरी मनात येतो का? आपल्या लोकांत सर्वत्र दंभ बोकाळला आहे. महान वचने ओठांवर, पोटात काही नाही! परंतु धर्म जीवनात आल्याशिवाय जीवन सुंदर होत नाही. भाकरीचा तुकडा नुसता ओठांवर ठेवून भागत नाही; तो पोटात जावा लागतो, तेव्हाच शरीर सतेज व समर्थ होते. थोर वचने जेव्हा कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंपन्न होईल.

साम्यवादी हे मंत्र पुटपुटत बसणार नाहीत. या महान मंत्राचा आचार केव्हा सुरू होईल याची उत्कट तळमळ त्यांना लागली आहे. यासाठी ते तडफडत आहेत. धर्मबिर्म आम्हांला कळत नाही असे ते म्हणतात. परंतु खरा धर्म तेच आचरू पाहात आहेत. सर्वांना खायला-प्यायला देऊ पाहात आहेत. समाजातील अन्याय, दैन्य, दास्य दूर करू पाहात आहेत. समाजातील दुर्गुण दूर करावयाचे असतील, तर अद्वैत जीवनात आणा; आपणावरून दुसऱ्याला ओळखावयास शिका, असे ते सांगत आहेत. ते स्वतःला भाई म्हणवून घेत आहेत. आपण सारे भाई भाई. “अमृतस्य पुत्रः ” – त्या अमृतरूपी चैतन्याची आपण सारी लेकरे. या, एके ठिकाणी खपू, एके ठिकाणी खाऊ, एके ठिकाणी खेळू, एके ठिकाणी शिकू, गाऊ, हसू-असे हे साम्यवादी म्हणत आहेत.

ऋषींच्या आश्रमातील प्रेमाच्या प्रभावामुळे साप व मुंगूस एके ठिकाणी राहात. हे ध्येय आपणांपासून पुष्कळ दूर आहे हे खरे. मनुष्य आपल्या प्रेमप्रकर्षाने विश्वातील सर्व विरोध दूर करीत आहे, हे ध्येय कदाचित आपल्या दृष्टीत येत नसेल, परंतु सर्व मानवजातीने तरी प्रेमाने एकत्र नांदावे यात काय कठीण आहे? या भरतभूमीत हा प्रयोग ऋषी करू पाहात होते. अद्वैताचा तारक मंत्र देऊन हे प्रेमैक्य निर्माण करू पाहात होते. परंतु त्यांची परंपरा पुढे चालवू पाहणारे सर्वच भेदभाव माजवीत आहेत, वैषम्य वाढतीत आहेत.

सृष्टी एक प्रकारे अद्वैत शिकवीत आहे. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य-चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते ते सर्वांना देऊ. सर्व मिळून उपभोग घेऊ, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत. देवाचे जीवनप्रद वारे सर्वांसाठी आहेत. परंतु मनुष्य भिंती बांधून स्वतःच्या मालकीच्या इस्टेटी तयार करू लागतो. जमीन सर्वांची आहे. सारे मिळून ती कसू या, पिकवू या. परंतु मनुष्य त्यातील तुकडा अलग करतो व म्हणतो, हा माझा तुकडा ! अज्ञानानेच जगात अशांती उत्पन्न होते, द्वेष - मत्सर उत्पन्न होतात. स्वतःला समाजात बुडविले पाहिजे. पिंडाला ब्रह्मांडात बुडविले पाहिजे. व्यक्ती शेवटी समाजासाठी आहे. दगड इमारतीसाठी आहे, बिंदू सिंधूसाठी आहे, हे अद्वैत कोण पाहतो? कोण अनुभवतो? हे अद्वैत जीवनात आणणे म्हणजे केवढा आनंद!

ज्याला लाखो भाऊ सर्वत्र दिसत आहेत, त्याला केवढी कृतकृत्यता वाटेल! संतांना हीच तहान होती, हेच वेड होते:

"ऐसें भाग्य कधी लाहता होईन,

अवघे देखें जन ब्रह्मरूप

मग तया सुखा अंत नाहीं पार,

आनंदे सागर हेलावती"

अवघा समाज ज्याला स्वतः इतका पूज्य वाटत आहे, प्रिय वाटत आहे, त्याच्या भाग्याचे कोण वर्णन करील?

"जिकडे तिकडे देखें उभा

अवघा चैतन्याचा गाभा"

जिकडे तिकडे चैतन्यमय मूर्ती दिसत आहेत. दगडा-धोंड्यांतही चैतन्य पाहून डोलणारा संत मानवातील चैतन्य नाही का पाहणार? 
"जेथें तेथें देखें तुझीच पाऊलें
सर्वत्र संचले तुझें रूप"

सर्वत्र तेच स्वरूप आहे. चैतन्यमय आत्म्याचे स्वरूप आहे. या चैतन्यमय मूर्तीची सेवा करावयास संत तडफडत असतो. त्याला वाटते की सहस्त्र हात असते तर सहस्त्र बोलत्या - चालत्या मूर्तीना वस्त्रे नेसविली असती, जेवूखाऊ घातले असते!

परंतु लाखो वस्त्रहीन, अन्नहीन, चैतन्यमय देवाची पूजा करावयास कोण उभा राहतो! अद्वैत म्हणजे मरण आहे, स्वतःचे मरण!

"आपुले मरण पाहिलें म्यां डोळां"

स्वतः मेल्याशिवाय या आसमंतात पसरलेल्या परमेश्वराचे दर्शन होणार नाही. स्वतःचा अहंकार कमी करा. स्वतःची पूजा कमी करा. जसजसे तुमचे ‘अहं’चे रूप क्षुद्र होत जाईल, तसतसे परब्रह्म तुम्हांला दिसू लागेल. बुद्धाने स्वतःचे निर्वाण केले, स्वतःला मालवून टाकले, तेव्हा त्याला सर्व चराचराला अपरंपार प्रेम देता आले.

अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वतःच्या स्वार्थी सुखावर निखारा

ठेवणे!

"तुका म्हणे व्हावी प्राणांसवें तुटी नाहीं तर गोष्टी बोलूं नये"

प्राण द्यावयास तयार असाल तर वेदान्ताच्या वल्गना करा. दुसऱ्यासाठी दोन दिडक्याच नव्हेत, तर सर्वस्व अर्पण करावयास तयार असणे म्हणजे अद्वैताची दीक्षा.

"जीवतळीं आंथरिती । जीव आपुला "

आपल्या प्राणाच्या पायघड्या दुसऱ्यासाठी आनंदाने घालणारे, ते अद्वैताचे अधिकारी.

शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या सिंहगर्जनेने इतर तत्त्वज्ञाने

पळून गेली असे म्हणतात. सिंह पाहताच कोल्ही: कुत्रीच नव्हे, तर प्रचंड हत्तींचीही तारांबळ उडते. शंकराचार्याच्या अद्वैतामुळे द्वैतवादी पळाले, परंतु समाजातील द्वैत पळाले नाही! समाजातील दंभ, आलस्य, अज्ञान, रूढी, भेदभाव, उच्च-नीचपणा, स्पृश्यास्पृश्ये, वैषम्ये, दारिद्रय, दैन्य, दास्य, दुबळेपणा, भ्याडपणा या गोष्टी पळाल्या नाहीत. ही सारी द्वैताची प्रजा आहे. समाजात दुजाभाव असला म्हणजे हे सारे भीषण चित्र दृष्टीस पडू लागते. भारतीय समाजात तोंडातील अद्वैत समाजातील रोजच्या आचारात अल्पस्वल्पही जरी दाखविण्यासाठी कोणी मनापासून झटते, तर भारताला अशी अधोगती येती ना.

थोर स्वामी विवेकानंद म्हणूनच खेदाने म्हणत की, “हिंदुधर्माइतकी तत्त्वे सांगणारा दुसरा धर्म नाही, आणि हिंदू लोकांइतके प्रत्यक्ष आचारात अनुदार लोकही अन्यत्र सापडणार नाहीत!”

शेकडो वर्षे अद्वैताचे डंके वाजत आहेत. परंतु रानातील रानटी लोकांजवळ आमचे मठ सोडून आम्ही कधी गेलो नाही. कातकरी, भिल्ल, गोंड-शेकडो जाती; त्यांच्यापासून अहंकाराने आम्ही दूर राहिलो. अद्वैतावर भाष्ये लिहिणारे व ती वाचणारे प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात अद्वैतशून्य दृष्टीने जणू वागत.

अद्वैत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. या तत्त्वाचा उत्तरोत्तर जीवनात अधिक अधिक अनुभव घेत जाणे म्हणजेच भारतीय संस्कृतीत भर घालणे होय. आपल्या सर्व आंतरबाह्य कृतींतून अद्वैताचा सुगंध जसजसा येऊ लागेल, तसतसा भारतीय संस्कृतीचा आत्मा आपणांस समजू लागला असे म्हणता येईल. तोपर्यंत त्या संस्कृतीचे नावही उच्चारणे म्हणजे त्या थोर ऋषींची व त्या थोर संतांची केवळ विटंबना आहे, दुसरे काय?
24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा