shabd-logo

बलोपासना

6 June 2023

27 पाहिले 27
भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची नितान्त आवश्यकता आहे. बलवान शरीर, निर्मळ व सतेज बुद्धी, प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे हृदय, या सर्वांची जीवनाच्या विकासास जरुरी आहे. जीवनाला समतोलपणा तरच येईल.

शरीरच नसेल तर हृदय- बुद्धी राहणार तरी कोठे? या शरीराच्या द्वाराच सर्व पुरुषार्थं प्राप्त करून घ्यावयाचा आहे. निराकार आत्म्याला साकार होऊनच सर्व काही करता येते. बाहेरची काच नसेल, तर आतील ज्योतीची प्रभा तितकी स्वच्छ पडणार नाही. बाहेरची काच स्वच्छ सुंदर, स्वच्छ असेल तरच दिव्याचा प्रकाश चांगला पडेल. आपल्या शरीरातून आत्मसूर्याचा प्रकाश बाहेर पडावयाचा आहे. हे शरीर जितके निरोगी, सुंदर, स्वच्छ व पवित्र राखू तितके आत्म्याचे प्रकाशन सुरेख रीतीने होईल..

उपनिषदांतून बळाचा महिमा गायिलेला आहे. दुर्बळाला काही करता येत नाही. एक बळवान मनुष्य येतो व शेकडो लोकांना तो नमवितो. बळ नसेल तर हिंडता-फिरता येणार नाही. हिंडता-फिरता आले नाही तर ज्ञान मिळणार नाही, अनुभव मिळणार नाही. थोरांच्या गाठीभेटी होणार नाहीत, गुरुसेवा होणार नाही. बळ नसेल तर काही नाही. म्हणून बळाची उपासना करा असे ऋषी सांगतात.

“नायमात्मा बलहीनेन लभ्यः " असे श्रुतिवचन आहे. दुर्बळाला दास्य व दुःख ही सदैव ठेवलेली. अंगात ताकदच नाही तर काहीएक नाही. इमारतीचा पाया खोल, मजबूत लागतो. चांगले भक्कम दगड तेथे रचावे लागतात. खडकावर उभारलेली इमारत पडणार नाही. वाळूत रचलेली इमारत केव्हा कोसळेल वा खचेल त्याचा नेम नाही. शरीर सर्व गोष्टींचा पाया आहे.

“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । ” सर्व धर्मांचे मुख्य साधन म्हणजे हे शरीर. या शरीराची उपेक्षा करणे मूर्खपणा आहे. ते पाप आहे. तो देवाचा व समाजाचा घोर अपराध आहे. शरीर बळवान असल्याशिवाय आपणांस कोणतेही ऋण फेडता येणार नाही. समाजसेवा करून देवऋण फेडता येणार नाही. सुंदर संपत्ती निर्माण करून पितृऋण फेडता येणार नाही. ज्ञानार्जन करून ऋषिऋण फेडता येणार नाही. ही तीन ऋणे आपल्या माथ्यावर असतात. ही तीन ऋणे बरोबर घेऊन आपण जन्मत असतो. त्यांची फेड करावयासाठी शरीर धडधाकट ठेविले पाहिजे.

ब्रह्मचर्य हा बळाचा पाया आहे. त्या ब्रह्मचर्यांची महती स्वतंत्र प्रकरणात सांगितली आहे. मिळविलेले बळ राखणे म्हणजे ब्रह्मचर्य. बळ मिळवा व ते नीट राखा.

बळ मिळविण्यासाठी शरीराला व्यायाम हवा. केवळ पोषाखी बनून भागणार नाही. भारतीय संस्कृतीत नमस्कारांचा व्यायाम घालून देण्यात आला आहे. सूर्याला नमस्कार घालावयाचे, स्वच्छ हवेत तेजस्वी सूर्याला साक्ष ठेवून नमस्काराचा व्यायाम घ्यावयाचा, प्राणायामाचा व्यायामही नित्य सांगितला आहे. संध्या करताना अनेकदा प्राणायाम करावा लागतो. नमस्कार व प्राणायाम यांचा व्यायाम मरेपावेतो घ्यावा.

निरनिराळ्या मल्लविद्या भारतात होत्या. मल्लविद्येसाठी भारतवर्ष प्रसिद्ध आहे. प्रत्येकजण मल्लविद्या शिके व्यायामाचे अनेक प्रकार होते. काही व्यायाम शरीर सुदृढ व सुंदर व्हावे म्हणून असत, तर काही व्यायाम स्वसंरक्षणाची साधने म्हणून असत. लाठी, दांडपट्टा, भाला, तलवार वगैरे स्वसंरक्षणाची साधने म्हणून शिकविण्यात येत.

नाना प्रकारचे खेळ भारतवर्षात होते. साधे सुटसुटीत सांघिळ खेळ. हुतूतू, हमामा, सुरपाट्या, कितीतरी प्रकार होते. श्रीकृष्ण खेळांचा भोक्ता होता. बाळगोपाळ जमवून तो खेळ मांडी. खेळासारखी पवित्र वस्तू नाही. निवेदितादेवींनी एके ठिकाणी म्हटले आहे, “कृष्णाने खेळांना दिव्यता दिली.”—“ "कृष्ण म्हटले की त्याची क्रीडा आठवते. कृष्ण म्हणजे ज्याप्रमाणे गायीची आठवण; त्याचप्रमाणे कृष्ण म्हणजे नदीतीरावरचा खेळ.

खेळात आपण अनेक गोष्टी शिकतो. लहान-थोर सारे विसरतो. आसक्ती विसरतो. विरुद्ध पक्षात माझा मित्र किंवा भाऊ असला, तरी तो आता माझा भाऊ किंवा मित्र नाही. त्यालाही धरावयाचे; पकडावयाचे. खेळ म्हणजे निष्ठा, खेळ म्हणजे सत्यता; खेळ म्हणजे स्वतःचा विसर.

मुलांच्या खेळाप्रमाणे मुलींचेही खेळ होते. नाना प्रकारच्या फुगड्या, नाना प्रकारचे पिंगे. यांमुळे शरीरास सौष्ठव येई. अंगात चपळाई येई. नागपंचमीच्या वगैरे दिवशी मुले-मुली झोके घेतात. टिपऱ्यांचा खेळ मुलेही खेळतात, मुलीही खेळतात.

निरनिराळ्या प्रकारची आसने शरीराच्या आरोग्यार्थ शोधण्यात आली आहेत. आसनांनी थोडक्या वेळात भरपूर व्यायाम होतो. आसनांमध्ये प्राणायामाचीही जोड असते. भुजंगासन, गरुडासन, कुक्कुटासन, शीर्षासन, वगैरे पाच-दहा आसने दररोज नियमित केली, तर प्रकृती निकोप राहिल्याशिवाय राहणार नाही.

काम करताना मिळणारा व्यायाम हा सर्वोत्कृष्ट होय. व्यायाम हासुद्धा काही तरी निर्माण करणारा असावा. शाळेतील मुलांना बागेत पाणी घालावयास लावावे; खणावयास सांगावे; व्यायामापरी व्यायाम होतो व सृष्टीत फुलेफळेही निर्माण होतात. कण्वाच्या आश्रमात शिकावयास असलेल्या प्रियंवदा, अनसूया वगैरे विद्यार्थिनी झाडांना पाणी घालीत आहेत, असे शाकुंतलात दाखविले आहे. पाणी घालून शकुंतला दमते व घामाघूम होते.

स्वतःचे कपडे धुवावेत, स्वतःची खोली स्वच्छ करावी, स्वतःचे भांडे घासावे, घरात पाणी भरावे, अशा रीतीने सहज व्यायाम होतो. आपल्याकडे जुने लोक असेच श्रमाचे भोक्ते होते. ते पोश्ये नव्हते. श्रमांचा कमीपणा त्यांना वाटत नसे.

सांदीपनींच्या आश्रमातील विद्यार्थी पाणी भरीत, लाकडे फोडीत, जंगलात जाऊन मोळ्या आणीत. हा विद्यार्थी श्रीमंत व हा गरीब असा भेद नसे. गरीब सुदामा व सुखी कृष्ण रानात बरोबर जात. गुरूजवळ सारे समान. सारे श्रम करीत. गरिबांचे काय, श्रीमंतांचे काय, शरीर निरोगी हवे. आरोग्य सर्वांना हवे. प्राचीन भारतीय आश्रमांत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना काटक बनविण्यात येई. थंडी असो, वारा असो, ऊन असो, पाऊस असो, त्याची त्यांना चिंता वाटत नसे. अंगाला वारा लागला पाहिजे, ऊन लागले पाहिजे. पाऊस पडू लागला म्हणजे मुलांना सुट्टी द्यावी; असे मनुस्मृतीत सांगितले आहे. नाचू दे पावसात. पहाटे मुले उठत. नदीवर स्नानास जात. तेथे डुंबत, पोहत. मग नमस्कार घालीत. त्यानंतर दूध पीत. असा भारतीय संस्कृतीचा प्रकार आहे.

आपण जुने लोक पाहिले तर त्यांची शरीरे निरोगी दिसतात. साठी उलटली तरी डोळ्यांस आरशी नाही. दात सारे बळकट, कान तीक्ष्ण, पचनेन्द्रिये चांगली, हातपाय बळकट. पाच-दहा कोस सहज चालतील असे दिसतात. तशाच जुन्या बाया...

परंतु हल्ली शरीरे म्हणजे सापळे झाले आहेत. बसके गाल, खोल गेलेले डोळे; हातापायांच्या काड्या, डोळे मंद झालेले, दात किडलेले, शौचाची सदैव तक्रार असा सर्वत्र देखावा दिसेल. सारे पोषाखी सरदार! पाऊस लागला की आले पडसे, थंडी लागली की आला हिवताप; ऊन लागले की आली भोवळ; असे आपण झालो आहोत. वरच्या पांढरपेशांची ही अशी दैना आहे.

कामकरी-शेतकरी, त्यांना श्रम भरपूर होतात; परंतु पोटभर खायला नसल्यामुळे त्यांची शरीरे कृश होत आहेत. पांढरपेशांना श्रम नाहीत व श्रमजीवी जनतेस अपार श्रम, असा हा देखावा आहे. श्रमजीवी लोकांस विसावा व भरपूर अन्न दिल्याशिवाय त्यांचे आरोग्य सुधारणार नाही. श्रमहीनांस श्रम करावयास लावल्याशिवाय त्यांचे आरोग्य सुधारणार नाही. श्रमहीनांस श्रम करावयास लावल्याशिवाय ते सुदृढ होणार नाहीत.

शरीराला व्यायाम पाहिजे, श्रम पाहिजे, त्याचप्रमाणे भरपूर खायलाही पाहिजे. परंतु काय खावे-प्यावे तेही आपणांस समजेनासे झाले आहे. सकस अन्न आपल्या पोटात जात नाही. ज्ञानाचा दिवा सर्वत्र नेला पाहिजे. कोणत्या भाज्या चांगल्या, कोणते पाले चांगले, कोणत्या डाळी चांगल्या, कच्चे खावे की शिजवलेले खावे, कोरडे खावे की पातळ खावे, मसाले चांगले का वाईट, एक का दोन- शेकडो गोष्टींवर ज्ञानाचा प्रकाश पडावयास हवा.

जीवनसत्त्वाचे नवीन शास्त्र निर्माण झाले आहे. आपण कणीक चाळून घेतो व कोंडा फेकून देतो. शास्त्र सांगते, की हा मूर्खपणा आहे. कोंड्यासकट कणकेची पोळी करा. कोंड्यात सत्त्व आहे. तो प्रकृतीस फार चांगला. आपण गिरणीत सडलेले पांढरेशुभ्र तांदूळ खातो; परंतु शास्त्र सांगते, की हे चूक आहे. न सडलेले तांदूळ खाणे चांगले. असडिक तांदळांत शर्करा असते. सडलेले व बिनसडलेले असे तांदूळ ठेवा. बिनसडलेल्या तांदळांत आधी किडी होतील कारण त्यात शर्करा अधिक आहे. ही शर्करा हाडांना फार चांगली. परंतु ते पांढरे फटफटीत तांदूळ खाऊन आपण पांढरे फटफटीत होत आहोत! तोंडावरचा तजेला जात आहे. परंतु इकडे कोणी लक्ष द्यावयाचे?

यंत्राने सडलेले तांदूळ बेरीबेरी रोग होतो. काही देशांत असे तांदूळ खाऊ नयेत म्हणून कायदे झाले आहेत. परंतु आपल्याकडे कोण करणार? आपले सरकार आहे परकी. ते कशाला काळजी घेईल? परंतु आपल्या शरीराची आपल्याला नको का काळजी घ्यावयास? नवीन सुशिक्षित बुद्धीची व स्वतंत्र विचारांची ऐट दाखवीत असतात. परंतु एकीकडे सायन्स जे सांगते, त्याप्रमाणे वागावयासही ते तयार नाहीत. सडलेले तांदूळ व बिनसडलेले तांदूळ निरनिराळ्या उंदरांस खाण्यास देण्यात आले. बिनसडलेले तांदूळ खाणारे उंदीर धष्टपुष्ट झालेले दिसले.

गायीचे दूध नाहीसे होत चालल्याने उंची कमी होत आहे. दुग्धाहाराला आपण फार महत्त्व दिले होते. तसेच ताकासही. मध- पाणी प्यावयाचीही प्रथा होती. पाहुणा आला, की त्याला मध- पाणी देत मध-पाणी नियमित प्याल्याने आयुष्य वाढते. प्रयोगांनी हे सिद्ध झाले आहे. मध फार आरोग्यदायक वस्तू आहे. इतिहासाचार्य राजवाडे भातावर मध ओतीत व खात.

फलाहाराचेही फार महत्त्व आपण ओळखले होते. मधूनमधून मुद्दाम उपवासांची योजना करून त्या दिवशी तरी फलाहार करावा, अशी योजना पूर्वजांनी केली. परंतु फराळाच्या दिवशीही आपण साबुदाण्याचा चिवडा करतो व खातो! आपण तेलातिखटाचे, तळलेल्या वस्तूंचे भोक्ते झालो आहोत. चणे चटपटे, चिवडा मसालेदार यांची घातुक चटक आपणांस लागत आहे. एक आण्याचा चिवडा खाण्याऐवजी एक आण्याची केळी घेऊन खाल्ली, तर शरीराला कितीतरी फायदा होईल! परंतु विचाराचा डोळा आज फुटलेला आहे. अंधळे आचरण चालले आहे.

पूर्वजांनी काय खावे, काय प्यावे याचे शास्त्र बनविले होते. अमुक निषिद्ध म्हणून खाऊ नये, अमुक चांगले आहे म्हणून खावे, असे त्यांनी नियम केले होते. त्यांचे नियम नवीन शास्त्रीय प्रकाशात तपासले पाहिजेत. नवीन संशोधन केले पाहिजे. निषिद्ध का? केवळ लाल रंग दिसतो म्हणून का? मसुरीची डाळ रक्त शुद्ध करणारी, बद्धकोष्ठ दूर करणारी आहे. मग का न खावी? केवळ भावना की काय? कांदा निषिद्ध का ? चातुर्मास्यात कांदा-वांगे का खाऊ नये? कांद्यात फॉस्फरस आहे. कांदा शक्तिवर्धक आहे. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यांस तो अपायकारक असेल. शेतात श्रमणाऱ्या शेतकऱ्यांस तो हितकर असेल. हे आहाराचे नियम सर्व शोधले पाहिजेत. शास्त्रीय आहार बनविला पाहिजे. त्याचा प्रसार केला पाहिजे. टोमॅटो, बटाटा, बीट वगैरे नवीन पदार्थ आले आहेत. त्यांचेही परीक्षण झाले पाहिजे. पुण्याला वीस-पंचवीस वर्षांपूर्वी लाल टोमॅटो निषिद्ध मानीत. परंतु टोमॅटो प्रकृतीस फार चांगला असे आता कळू लागले आहे.

आले व लिंबू यांचे भारतीय आहारात फार माहात्म्य आहे. आले व लिंबू म्हणजे साठ चटण्या व साठ कोशिंबिरी ! आल्याचा तुकडा व लिंबाची फोड असली म्हणजे सर्व काही आले. आले-लिंबू हे आरोग्याला फार हितकर आहे. लिंबाच्या रसाने केसही पचेल अशी जुनी म्हण आहे.

आहारविहारावर तर आरोग्य अवलंबून आहे. विहार म्हणजे व्यायाम, खेळ; योग्य विहार व योग्य आहार यांची जर जोड असेल, तर शरीर सुंदर व सतेज राहील. उदंड सेवा करता येईल.

आजारी पडणे म्हणजे पाप आहे असे वाटले पाहिजे. बर्नार्ड शॉ तर एका ठिकाणी म्हणतो की, “कोणी आजारी पडला तर त्याला मी तुरुंगात पाठवीन.” सृष्टिनियमाप्रमाणे वागला नसेल, व्यायाम घेतला नसेल; प्रमाण ठेवले नसेल, वेळेवर झोपला नसेल, वेळेवर जेवला नसेल, म्हणून आजारीपण आले. आजारीपण म्हणजे निसर्गाची शिक्षा आहे. आपण आजारी पडल्यामुळे आपली समाजसेवा तर अंतरतेच, परंतु आपल्या शुश्रूषेसाठी दुसऱ्याचाही वेळ मोडतो. घरात चिंता पसरते. आरोग्य म्हणजे आनंद आहे. आजारीपण म्हणजे दुःख आहे.

निरोगी शरीर सुंदर दिसते. रोगट फिक्कट शरीर कितीही सजवले तरी ते विद्रूप दिसते. पीळदार शरीराला फाटका कपडाही शोभून दिसतो. आरोग्य म्हणजे सौंदर्य. तुम्हांला सौंदर्य पाहिजे असेल तर निरोगी रहा. व्यायाम करा. शरीरश्रम करा. शरीराला ऊन, पाऊस, वारा लागू दे. तो सृष्टीचा स्पर्श तजेला देईल.

सकाळ-सायंकाळ गावाबाहेर असलेल्या महादेवाला जावे, अशी परंपरा आहे. त्यात बाहेरची हवा लागावी, क्षणभर संसाराच्या बाहेर मन जावे, मोकळे वाटावे, हाच हेतू असे. पाय मोकळे होतात, मन मोकळे होते, विशाल आकाश दिसते. हिरवी झाडे दिसतात. वाहणारी नदी दिसते. मन रमते, प्रसन्न होते. देवाला, तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या, यात व्यायामाचाच हेतू होता. शरीरास आरोग्य व मनासही आरोग्य.

भारतीय संस्कृतीत व मुसलमानी संस्कृतीत धर्माशी आरोग्याशी सांगड घातली आहे. नमाज पढावयाच्या वेळेस मुसलमान भाई बसतो, उठतो, वाकतो. शरीराच्या निरनिराळ्या हालचालींत आरोग्याची तत्त्वे गोवलेली आहेत. दिवसातून पाच वेळा नमाज पढावयाचा. पाच वेळा शरीरास हा नियमित व्यायाम होतो. शरीरास आरोग्य व प्रार्थनेमुळे मनासही आरोग्य. नमस्कार, प्रदक्षिणा वगैरे गोष्टींत भारतीय संस्कृतीने असाच मेळ घातला आहे.

स्वच्छतेवर भारतीय संस्कृतीचा कटाक्ष आहे. या उष्ण हवेत दररोज स्नान हवेच. तीन वेळाही स्नान सांगितले आहे. स्नानाचा महिमा सांगणारी पुराणे आहेत. कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान, वगैरे स्नानांची व्रते सांगितली आहेत. स्नानांचा हा केवढा महिमा! स्नान केल्याशिवाय खाऊ नये असा दंडक होता. जेवताना जंतू पोटात जाऊ नयेत म्हणून कोण ही दक्षता ! जेवावयास जाण्याआधी हातपाय धुवावयाचे, बाहेरून येताच हातपाय धुऊन घरात जावयाचे. स्वयंपाकघर, देवघर ही तरी पवित्र ठेवावयाची. घरात धूप वगैरे घालावयाचा. स्वच्छतेसंबंधी भरपूर काळजी घेण्यात येत होती. दररोज धुतलेले धोतर नेसावयाचे. शिळे खाऊ नये, तेच वस्त्र वापरू नये, अशी आज्ञा आहे. जेवताना वस्त्रान्तर करून बसावे. ज्या वस्त्राने बाहेर हिंडतो - फिरतो, ते वस्त्र जेवताना नको. ते घामट सदरे वगैरे काढून ठेवा. स्वच्छपणे जेवा.

केस काढण्यातही स्वच्छतेची दृष्टी होती. या उष्ण हवेत घाम येतो. केसांत घामाने घाण होते. मळ साचतो. म्हणून फार केस वाढू न देणे अशी पद्धत अनुभवाने पडली. केस ठेवावयाचेच असतील तर स्वच्छ राखावे, शिकेकाईने धुवावे असे सांगण्यात येई. स्वच्छता म्हणजेच सौंदर्य हे ज्या दिवशी कळेल तो सुदिन !

आरोग्य का मिळवावयाचे? शरीरसंपदा का मिळवावयाची?

बळाचा उपयोग काय? भारतीय संस्कृती सांगते, की बळ हे स्वधर्माचरणासाठी आहे. आपली विविध ऋणे पार पाडण्यासाठी आहे. बळ दुसऱ्यास पिळण्यासाठी नको आहे. बळ दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठी आहे.

आर्तत्राणाय वः शस्त्रं न प्रहर्तुमनागसि ।

—'तुझे शस्त्र पीडितांचा सांभाळ करण्यासाठी असू निरपराधी जनतेची कत्तल करण्यासाठी म्हणून नको!”

जे दुर्बळ असतील त्यांना मी दरडावणार नाही. दुर्बळांना हात देऊन उठवण्यासाठी माझे बळ आहे. दुर्बळांना बलवान करण्यासाठी माझे बळ आहे. पाश्चिमात्य देशांत नीत्शेचे एक बळाचे तत्त्वज्ञान आहे. 'बळी तो कान पिळी' अशा स्वरूपाचे ते तत्त्वज्ञान आहे. दुर्बळांचे जगात काय काम, दुर्बळांची कीव करता कामा नये, दुर्बळाला फेकून द्यावे, असे ते तत्त्वज्ञान आहे. परंतु अशा तत्त्वज्ञानावर जग चाललेले नाही. दुर्बळांना फेकून द्यावे, असे तत्त्वज्ञान अंगीकारले तर समाज टिकणार नाही. मातेने दुबळ्या मुलाला का वाढवावे? ते शेंबडे, रडवे मूल, त्याची काळजी का घ्यावी? माता म्हणते, “माझे दुबळे बाळ बलवान होईल. मी आज त्याचे बोट धरीन व तो चालू लागेल, माझ्या साहाय्याने एक दिवस ते समर्थ होईल. माझी त्याला जरूर लागणार नाही. दुबळ्या बाळाला बलवान करण्यासाठी, स्वाश्रयी - स्वावलंबी करण्यासाठी माझे बळ आहे.”

जग शेवटी सहकार्यावर चालले आहे. मी दुसऱ्याला हात देईन व तोही उठेल. सारे उठू देत, सारे आनंदाने नांदू देत.

शरीराचे बळ, तसे ज्ञानाचे बळ, तसेच प्रेमाचे बळ. उत्तरोत्तर ही बळे श्रेष्ठतर अशी आहेत. प्रेमाने रानटी क्रूर पशूंसही आपण जिंकून घेतो. शास्त्रीय ज्ञानाने आपण रोग जिंकतो. अंगबळापेक्षा अकलेचे बळ अधिक आणि अकलेच्या बळापेक्षा प्रेमाचे, पावित्र्याचे, शीलाचें, चारित्र्याचे बळ अधिक! ही तिन्ही बळे आपण प्राप्त करून घेतली पाहिजेत. निरोगी शरीर, प्रेमळ व उदार हृदय, विशाल व कुशाग्र बुद्धी या तिन्हींच्या समन्वयापासून जे बळ निर्माण होईल ते अपूर्व होय.

रवीन्द्रनाथ 'गीताञ्जली'त म्हणतात, “देवा ! हे शरीर तुझे मंदिर आहे; म्हणून ते मी सदैव पवित्र राखीन. हे हृदय तू मला दिले आहेस; प्रेमाने भरून तुला ते मी आणून देईन. ही बुद्धी तू मला दिली आहेस; हा बुद्धीचा दीप निर्मळ व सतेज असा मी सदैव पेटत ठेवीन. "

भारतीय संस्कृतीत हनुमान हा बळाचा आदर्श आहे. सर्व प्रकारची बळे त्याच्या ठिकाणी संपूर्णपणे विकसित झाली आहेत.

मनोजवं मारुततुल्यवेगम्

जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥

मारुती केवळ बलभीम नव्हता, तो मनाप्रमाणे चपळ होता. मोठमोठे पहिलवान असतात, त्यांना जरा पळवत नाही, चपळ मुले त्यांना चिमटे घेऊन बेजार करतील ! त्यांना पटकन मागे वळता येत नाही; पुढे वळता येत नाही. सर्व प्रमाणात पाहिजे. मारुतीचा वाऱ्याप्रमाणे वेग होता. तो नुसता लठ्ठेभारती नव्हता. मारुतिरायाचे शरीर वज्राप्रमाणे दणकट होते व वाऱ्याप्रमाणे चपळ होते. त्याच्या पायांनी दगडाचा चुरा केला असता व तेच पाय द्रोणागिरी आणावयास क्षणात दहा कोस जाते.

या शारीरिक बळाबरोबरच मनोबळही त्यांच्याजवळ होते. ते जितेंद्रिय होते, संयमी होते. शीलवान, चारित्र्यवान, व्रती होते. मिळविलेल्या बळाची उधळपट्टी त्यांनी केली नाही. वासनाविजय त्यांनी केला होता, शरीराच्या अवयवांवर ज्याप्रमाणे त्यांनी विजय मिळविला होता, स्नांयूवर ज्याप्रमाणे सत्ता त्यांनी मिळविली होती, त्याचप्रमाणे मनाच्या ऊर्मीवरही त्यांनी मिळविली होती. मनोविजय ज्याने मिळविला, त्याने सर्व काही मिळविले.

शरीर बलवान, हृदय शुद्ध व पवित्र, त्याचप्रमाणे मारुतिरायांची बुद्धीही अलौकिक होती. ते बुद्धिमंतांचे राजे होते. बुद्धीचे त्यांना वावडे नव्हते. आपल्याकडे एक कल्पना रूढ झाली आहे की जो बलवान आहे तो बुद्धिवान नसावयाचा; आणि जो बुद्धिवान आहे तो बलवान नसावयाचा. परंतु मारुतिराय म्हणतात दोन्ही पाहिजेत.

शरीर, हृदय व बुद्धी, तिहींचा उत्कृष्ट विकास आहे; तरीही आणखी एका वस्तूची जरुरी आहे. ती म्हणजे संघटना- कुशलता. आपण स्वतःशी पुष्कळ चांगले असतो, परंतु जर समाजात मिसळलो नाही तर कामे उठत नाहीत. तेज पसरत नाही. मारुती हा वानरयूथमुख्य होता. तरुणांच्या संघटना हाती घेतल्या पाहिजेत, त्यांच्यात घुसले पाहिजे, त्यांना बलोपासना शिकविली पाहिजे; शारीरिक, मानसिक व बौद्धिक अशी त्रिविध बलोपासना. तरुणांबरोबर खेळले पाहिजे. त्यांचे संघ स्थापन केले पाहिजेत. त्यांच्याबरोबर चर्चा केल्या पाहिजेत. तरच कार्य झपाट्याने पुढे जाते.

समर्थांनी अशीच संघटना केली. ही त्रिविध बलोपासना त्यांनी शिकविली. हजारो मारुती त्यांनी स्थापन केले. गावोगावी आखाडे उभे राहिले. दंड वाजू लागले. कुस्त्यांचे फड पडू लागले. यात्रांतून कुस्त्या होत होत्या. या आखाड्यांबरोबरच रामकथाही गावोगाव नेली. रामकथा म्हणजे साम्राज्यनाशार्थ संघटना हे विचारही सर्वत्र गेले. पीळदार दंड जनतेला स्वराज्य देण्यासाठी उपयोगात येऊ लागले. 'मराठा तितुका मेळवावा' हा मंत्र देऊन हृदयात ऐक्य निर्माण करण्यात आले. हृदय, बुद्धी, शरीर, तिघांना तेजस्विता आली. करंटेपण दूर होऊ लागले. 'जो' 'बुद्धीच सांगतो' असला चावटपणा नाहीसा होऊन श्रीशिवाजीमहाराजांभोवती सारे जमा होऊ लागले. धार्मभोवती गोळा होऊ लागले.

कारण शरीरबळ, पवित्र हृदय व प्रखर बुद्धी त्याप्रमाणेच सारी संघटना, यांचा उद्देश काय? या सर्व साधनांचा उपयोग रामसेवेत करावयाचा. ‘रामदूत’ यात मारुतीचा मोठेपणा आहे. माझी शक्ती दुसऱ्यास गुलाम करण्यासाठी नाही. माझी बुद्धी दुसऱ्यावर साम्राज्ये लादण्यासाठी नाही. माझ्या अंतर्बाह्य शक्ती रामाच्या सेवेसाठी आहेत. आणि रामसेवा म्हणजे तेहतीस कोटी देव दास्यातून मुक्त करणे.

हे तेहतीस कोटी देव कोणते? रावणांकडे हे देव झाडीत होते; पाणी भरीत होते, सारी श्रमकर्मे करीत होते. साम्राज्य स्थापन करणारे सर्व दुनियेला दास करतात, तिला केवळ हमाल बनवितात. देवाप्रमाणे शोभणारी माणसे दास होतात. रामाला मानवाचा मोठेपणा सिद्ध करावयाचा होता. देवांचे दास करणे हे त्याचे काम नव्हते. प्रत्येक मनुष्यात दिव्यता आहे. प्रत्येकजण देव आहे. परंतु त्याच्यातील दिव्यता प्रकट व्हावयास अवसर नसतो. सत्तावान त्याला मजूर व पाणक्या करून ठेवतो. तेहतीस कोटी देव म्हणजे कोट्यवधी माणसे हाच अर्थ आहे. या माणसांस मुक्त करणे हे प्रभू रामाचे काम होते.

मारुतीने आपली सारी संघटना रामाच्या ध्येयार्थ अर्पण केली. स्वतःचे सारे बळ रामाला दिले. साम्राज्यशाही दूर करणारा राम दिसताच मारुती उठला. त्याच्याबरोबर अठरा पद्म वानर उठले. आपल्या बांधवांस स्वातंत्र्य व स्वराज्य देण्यासाठी त्यांचे सर्व बळ होते.

भारतीय संस्कृती ही वस्तू आपणांस सांगत आहे - शरीर, हृदय व बुद्धी यांचे बळ मिळवा, संघटना करा, संघ स्थापा, वातावरण तेजस्वी करा, आणि ही सर्व संघटना महान ध्येयासाठी उपयोगात आणा. राम आर्य व अनार्य पाहात नाही. तुडवले जाणारे जे जीव त्यांना राम बघतो. त्यांचा कैपक्ष घेतो. आणि जे तुडवणारे असतात, त्यांचा निःपात करतो. तुडवणारे मग कोणीही असोत. तुडवणारे हिंदू असोत, मुसलमान असोत, इंग्रज असोत, जपानी असोत. राम दोनच वर्ग ओळखतो. पददलित व मदोद्धत. तो पददलितांची बाजू घेऊन उठेल.

भारतीय संस्कृती आर्य व अनार्य हे शब्द वंशवाचक समजत नाही. आर्य म्हणजे उदार, आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य म्हणजे विशाल दृष्टीने पाहणारा, अनासक्त, विमोह. अर्जुन केवळ आपले नातलग पाहून धनुष्यबाण टाकतो. या कर्माला श्रीकृष्ण 'अनार्यजुष्ट' म्हणतात. अन्याय करणारा कोणीही असो, त्याला दंड देणे हे आर्याचे काम. हा आपला म्हणून त्याचे दोष झाकणे अनार्यांचे म्हणजेच मोहग्रस्तांचे, मूढांचे, आसक्तिमयांचे काम आहे.

'कृण्वन्तो विश्वसार्यम्' -याचा अर्थ सर्वांना हिंदू करावयाचे व सर्वांना शेंड्या - जानवी द्यावयाची असा नाही. सर्व जगाला आपण उदार करू, सर्व विश्वाला माणुसकी ओळखावयाला शिकवू, सर्वजण खरीखुरी माणसे होऊ, असा त्याचा अर्थ आहे.

स्वतः उदार झाल्याशिवाय जगाला उदार करता येत नाही. स्वतः मोहरहित झाल्याशिवाय, आपापल्या डबक्यात राहणे सोडल्याशिवाय आर्य होता येत नाही. आमच्या संस्कृतीत मानवाचा महिमा आहे, डबक्यांचा महिमा नाही. फार तर सत् व असत् ही दोन डबकी आम्ही मानली आहेत. हे दोन भेद आहेत. जगात सदसतांचा लढा आहे. हिंदु-मुसलमानांचा नाही. हिंदू हा भारतीय संस्कृतीचा शब्द नाही. भारताबाहेरच्या लोकांनी आम्हांस हिंदू करून डबक्यात, एका खोलीत बसविले आणि आम्हीही त्या डबक्यात आनंद मानू लागलो !

जी संघटना जे जे असत् आहे त्याच्याविरुद्ध लढावयास उठेल, ती भारतीय संस्कृतीची संघटना आहे, ती गीताप्रणीत आर्यजुष्ट संघटना आहे. अशी संघटना आज या भारतवर्षात राष्ट्रीय सभा निर्माण करीत आहे. भारतीय संस्कृतीचा आत्मा राष्ट्रीय सभा ओळखते. राष्ट्रीय सभा सर्व पददलितांसाठी झुंजावयास तयार आहे. "नाठाळाच्या काठी हाणूं माथा"

जो जो नाठाळ असेल, त्याच्यावर तिचा प्रहार आहे. जिना, शौकतअल्ली, यांच्यावरही तितक्याच तेजस्वितेने त्यागमूर्ती जवाहरलाल कोरडे उडवितात, जितक्या प्रखरतेने ते संकुचित डबकेवाल्या हिंदूंवर उडवतात. जे जे गरिबांची पायमल्ली करतील, भ्रामक व खोटे भेदाभेद आणि स्वार्थी, क्षुद्र धर्म यांच्या बळावर जगात हैदोस घालीत असतील, त्या सर्वांवर नरवर जवाहरलाल घसरतील. खऱ्या सज्जनाचे ते कैपक्षी आहेत. जे. जे असत् आहे, त्याच्याशी त्यांचा विरोध आहे. मग त्या असताच्या बाजूस माझे जातभाई असले तरीही. माझी गीता मला सांगते, “मामनुस्मर युद्ध्य च”–परमश्रेष्ठ सत्याचे स्मरण ठेवून घे झुंज, कर प्रहार.

याला आर्यधर्म म्हणतात. याला अनासक्त आर्यकर्म म्हणतात. हा गीतेचा संदेश. हा भारतीय संस्कृतीचा महान विशेष. हेच रामचरित्राचे रहस्य. 

भारतातील बलोपासना या ध्येयासाठी सुरू होऊ दे. ती सुरु झाली आहे. आज हे ध्येय युगधर्म होत आहे. आज स्पेनमधील पददलितांची बाजू घ्यावयास आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक शिरकमळे वाहात आहेत. जगात न्यायी व अन्यायी दोनच पक्ष राहणार. राम आणि रावण दोनच पक्ष. हिंदू-मुसलमान पक्ष ही फार जुनी गोष्ट आहे. जग झपाट्याने पुढे जात आहे. खरे म्हटले तर भारतीय संस्कृतीच्या उपासकांना हा युगधर्म आधी कळला पाहिजे.

भारतीय संस्कृतीची महान ध्येये पूजणाऱ्या राष्ट्रीय सभे, तुझे अनंत उपकार! तुझी आज थट्टा होईल. जातीय मुसलमान तुला दगड मारतील. जातीय हिंदू तुला दगड मारतील. तुला हुतात्मत्व स्वीकारावे लागेल. भरडणाऱ्या जातीच्या दोन तळ्या असतात. मोत्यासारखे टपोरे ज्वारीचे दाणे भरडणे हे त्या दोन्ही तळ्यांचे काम असते. सनातनी हिंदू व सनातनी मुसलमान, जातीय हिंदू व जात्याय मुसलमान दोहोंकडून तुला भरडतील. परंतु भरडलेली तू त्यांच्याच तू उपयोगी येशील. ते ज्वारीचे पीठ भरडणाऱ्यालाच पुष्टी देईल!

हे दिव्य-स्तव्य राष्ट्रीय सभे! तू जी थोर बलोपासना शिकवीत आहेस, ती एकदम फोफावणार नाही. या जातीय कर्दमात जे बी तू पेरू पाहात आहेस ते तुडवले जाईल. परंतु ते बी मरणार नाही. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अनेक वृक्षांची बीजे असतात. ती मरत नाहीत. प्रचंड ओक वृक्ष त्यातून निर्माण होतात. त्याप्रमाणे तू पेरलेले दाणे एक दिवस वर येतील. ते फोफावतील, वाढतील आणि या भारताला खरी शांती मिळेल! भारताच्या द्वारा जगालाही ती मिळेल!

माझ्या डोळ्यांना तो देखावा दिसत आहे. “जगातील पिळले जाणाऱ्यांनो, एक व्हा" अशी घोषणा आज होत आहे. जागतिक संघटनेचे हे मंगल वारे वाहात आहेत. हे वारे भारतीय संस्कृतीचेच आहेत. भारतात या वाऱ्यांचे स्वागत होईल. या वाऱ्यांना भारत माहेरघर वाटेल. कारण डबकी करून न राहता मानवजात ओळखा अंशी शिकवण येथील थोर पूर्वजांनी दिलेली आहे. क्रांतिकारकांचा मुकुटमणी लेनिन मला परका नाही वाटत. माझा भगवान श्रीकृष्णच मोरमुकुटपीतांबर सोडून हॅट, बूट, सूट घालून माझ्यासमोर उभा आहे असे मला वाटते. तो गोकुठ्ठातील लोणी चोरून गरिबांना वाटणारा श्रीकृष्णच मला लेनिनमध्ये दिसतो. अन्यायाच्या बाजूला उभे असलेले सगेसोयरे एका रक्ताचे व एका जातीचे असले, तरी त्यांच्याशी लढ, असे सांगणारा श्रीकृष्णच मला लेनिनमध्ये दिसतो. त्यावेळच्या त्रैगुण्यविषयक वेदांविरुद्ध बंड करणारा, “स्त्रिया वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम् ” असे म्हणून मोक्षाची दारे खाडखाड सर्वांना उघडणारा, स्वर्गात अप्सरा व अर्मृताचे पेले मिळतील अशा लाळघोट्या व जिभलीचाट्या पुष्पितावाणीच्या वेदवादरतांची टर उडविणारा, “स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः” असे सांगून श्रमाचा सार्वभौम धर्म स्थापून यज्ञयागादिकांचा धर्म दूर करणारा, “यथेच्छसि तथा कुरु" असे सांगून पुन्हा बुद्धिस्वातंत्र्य देणारा, असा हा जो महान क्रांतिकारक श्रीकृष्ण तो मला लेनिनमध्ये दिसतो.

श्रीकृष्णाची तीच थोर ध्येये, भारतीय संतांची तीच मानव्याला ओळखणारी ध्येये, आज जगात व या भारतात पुन्हा दिसू लागली जात आहेत. हृदय विशाल व शुद्ध होत आहे. बुद्धीचा दिवा पेटवला जात आहे. गायत्रीमंत्राची उपासना पुनश्च नव्याने सुरू होत आहे, आणि या ध्येयासाठी मध्यंतरी लुप्त झालेली परंतु आज पुन्हा प्रकट होणारी जी ही अभिजात भारतीय ध्येये, यांसाठी श्रमावयास, झिजावयास व मरावयास नवसंघटना होत आहे. नवबलोपासना होत आहे. धन्य! त्रिवार धन्य आहे हे दृश्य! जो जो भारतीय संस्कृतीचा खरा अभिमानी असेल, अनासक्त आर्यजुष्ट कर्मधर्म शिकविणाऱ्या गोपाळकृष्णाचा भक्त असेल, तो तो राष्ट्रीय सभेच्या बलसंघटनेत शिरल्याशिवाय राहणार नाही!

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा