आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान व भक्ती यांचा समन्वय पाहिजे.
ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक आध्यात्मिक ज्ञान व दुसरे विज्ञान. कर्म चांगले व्हावयास या दोन्ही हातांची आवश्यकता आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच अद्वैत. सारी मानवजात माझी आहे, हे सर्व माझेच भाऊ, आणि यांची सेवा करावयासाठी मला विज्ञान पाहिजे आहे, अशीच जी दृष्टी ती ज्ञान विज्ञानात्मक दृष्टी.
ही दृष्टी जोपर्यंत नाही, तोपर्यंत विज्ञान सुरक्षित नाही. विज्ञानाच्या पाठीमागे हे अद्वैताचे तत्त्वज्ञान, हे प्रेमाचे तत्त्वज्ञान जर नसेल, तर विज्ञान सर्व जगाची होळी करील. विज्ञानाने संसार सुंदर होण्याऐवजी भयाण होईल.
टॉलस्टॉय म्हणूनच म्हणत असे की, “इतर शास्त्रांचे अभ्यास आधी बंद करा. समाजात परस्परांविषयी कसे वागावयाचे त्याचे शास्त्र आधी सिद्ध होऊ दे." सर्व शास्त्रांत मुख्य शास्त्र म्हणजे हे समाजशास्त्र आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती अद्वैताचे शास्त्र पुढे करून प्रगती पाहते. समाजात सर्वांना सुख मिळावे, सर्वांना ज्ञान मिळावे, सर्वांना पोटभर खायला मिळावे, अंगभर ल्यायला मिळावे, सर्वांच्या विकासाला वाव असावा. कोणी कोणास हिणवू नये. प्रबळाने दुर्बळाला पिळू नये, दुसऱ्यास गुलाम करू नये, स्वतःच्या हवेल्य़ा बांधून दुसऱ्यांच्या घरांच्या होळ्या करू नयेत. इटालियन जगावेत म्हणून अबिसीनियाने मरावे असे होऊ नये. अशा प्रकारचा सिद्धान्त आधी स्थापन झाला पाहिजे. राष्ट्राराष्ट्रांचे, जातिजातींचे असे प्रेमाचे संबंध जोपर्यंत मानण्यात येत नाहीत तोपर्यंत जगात खरी शांती येणार नाही, खरे स्वातंत्र्य येणार नाही.
आज जगात कोण स्वतंत्र आहे? कोणीही स्वतंत्र नाही. आपणांस वाटते की इटली स्वतंत्र आहे, जर्मनी स्वतंत्र आहे, जपान स्वतंत्र आहे; परंतु ही भूल आहे. एक गुलाम असताना दुसरा स्वतंत्र होऊ शकत नाही. आपण सिंह हा पशूंचा राजा मानतो. परंतु सिंह हा सारखा मागे पाहात असतो. त्याला वाटत असते, की आपणांस कोणी खावयास येईल! तो सिंह हत्तीचे रक्त प्राशून आलेला असतो. त्याचे मन त्याला खाते. त्याचे मन म्हणते, “तुला कोणी खावयास येईल, तुझे रक्त पिण्यास येईल.”
जगातील स्वतंत्र राष्ट्रांची हीच दशा आहे. जपानला वाटते, रशिया प्रबळ झाला. रशियाला वाटते, जर्मनी स्वारी करील. इंग्लंडला वाटते की इटली प्रबळ होत आहे. फ्रान्स जर्मनीला भीतच असतो. अशा प्रकारे सर्वत्र भीतीचे साम्राज्य आहे. बंदुकीवर हात ठेवून सारे सुखाची भाकरी खाऊ पाहात आहेत! बाँबगोळे जवळ ठेवून चहा पीत आहेत! तलवारी उशाला घेऊन झोपत आहेत! त्याने गुप्त तह नाही ना कोठे केला, त्याने नकळत आरमार नाही ना वाढविले, त्याने नवीन मारक शोध नाही ना लाविला, अशी धास्ती एकमेकांना वाटत असते. जिकडेतिकडे गुप्त पोलिसांचा सुळसुळाट, सर्वत्र कारस्थाने, कट, कारवाया ! असे हे जगाचे नरकाचे रूप आहे. सर्वत्र भय, भीती, धोका आहे. शाश्वती क्षणाची नाही. केव्हा आग- डोंब पेटेल याचा नेम नाही.
जगात जोपर्यंत हिंसा आहे, स्वार्थ आहे, तोपर्यंत जगाचे असेच स्वरूप राहावयाचे. माझ्या पोळीवर तूप पाहिजे, मला माडी पाहिजे, दुसऱ्याचे काही का होईना, ही वृत्ती जोपर्यंत आहे, तोपर्यंत सारे भयभीतच राहणार. हिंसा ही भित्री आहे. हिंसेला आपली कोणी हिंसा करील का अशी सदैव भीती असते. जगात प्रेमच निर्भय असते.
“आनन्दं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचन । " ब्रह्माची गाठ घेणारा निर्भय असतो. त्याला स्व-पर नाही. सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून तो धडपडतो.
आज विमानांतून बाँबगोळे फेकून जीवने धुळीत मिळविली जात आहेत. आज विषारी गॅस सोडून लोक मारण्यात येत आहेत. प्रचंड यंत्रांचे शोध करून मजुरांना पिळून काढण्यात येत आहे. विज्ञानाचा अशा रीतीने दुरुपयोग होत आहे. बुद्धीचा आग लावण्याकडे उपयोग होत आहे.
अद्वैताची दृष्टी आल्याशिवाय, आत्मौपम्य आल्याशिवाय विज्ञान फुकट आहे. ज्ञानहीन विज्ञानाच्या हातात समाज सोपविणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्याप्रमाणेच आहे. म्हणून आधी सारे भाऊ भाऊ व्हा. सारे एका ईश्वराचे व्हा. कोणी आर्य नाही, कोणी अनार्य नाही; कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही; सारे मानव आहोत. या मानवांची निरपवाद पूजा विज्ञानमय कर्माने करावयाची आहे.
जर्मनीतून ज्यू लोकांची हकालपट्टी हिटलरने केली. आर्य लोकांशी ज्यूंचा संबंध नको, आर्य म्हणजे श्रेष्ठ, असला आचरटपणा व रानवटपणा तो हिटलर करीत आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की, काही हिंदुसंघटनवाले हिटलरचा हा कित्ता गिरवण्यास हिंदूंस सांगत आहेत! “पाहा तो हडेलहप्पी हिटलर. कसा तो ज्यूंचा हकालपट्टी करीत आहे. तुम्हीही तशीच मुसलमानांची करा.” असले तत्त्वज्ञान सांगण्यात येत आहे. ही भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृती सर्व जगातील मानवांना हाक मारील. भारतात 'शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः”-
'अमृतस्वरूपी देवाच्या लेकरांनो, ऐका' अशी ऋषी गर्जना करील. भारतीय संस्कृती हे करीत आली, हेच पुढे करील. आर्य असोत, अनार्य असोत; कृष्ण असोत, पीत असोत, रक्त असोत; बसक्या नाकाचे असोत, जाड ओठांचे असोत, रुंद जबड्याचे असोत वा घाऱ्या डोळ्यांचे असोत, ठेंगणे वा उंच असोत; सारे मानव स्वतःच्या दिव्य झेंड्याखाली घेण्यासाठी भारतीय संस्कृती उभी आहे.
तात्पुरत्या विजयाने हुरळून हिटलरी अनुकरणे करून पशू होणे योग्य नव्हे. आपला थोर वारसा आहे. आपण दिव्य मानव्यासाठी जगू या व मरू या. प्रत्येक मानवजातीत थोर पुरुष उत्पन्न झालेले आहेत. मानवजातीस ज्यांचा चिरंतन अभिमान वाटावा, अशी नरनारीरत्ने सर्व मानववंशांत जन्मली आहेत. कोणी कोणास हसण्याची जरुरी नाही.
ही मानवी ऐक्याची भव्य कल्पना भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. कोणतेही कर्म करताना ही दृष्टी हवी. भक्ती म्हणजे हे अद्वैत ज्ञानच. दुसऱ्याबद्दल तेव्हाच प्रेम व भक्ती वाटेल, -ज्या वेळेस तो माझ्यासारखाच आहे, एकच सत्तत्त्व सर्वांत आहे असे समजेल तेव्हा! तो म्हणजे मीच आहे, आणि म्हणूनच त्याच्यावर मी प्रेम केले पाहिजे. मी दुसऱ्यावर प्रेम करतो, म्हणजे स्वतःवरच प्रेम करतो.
कर्मामध्ये हे आत्मौपम्य आले म्हणजे कर्म मनापासून होईल. परंतु ते कर्म हितकर व्हावे म्हणून त्यात विज्ञानही हवे. विज्ञान म्हणजे ते ते कर्म कसे करावयाचे याची माहिती. केवळ प्रेम असून भागत नाही. समजा, एखाद्या रोग्याची मी शुश्रूषा करीत आहे. त्या रोग्याबद्दल मला प्रेम आहे. त्याच्याबद्दल मला आपलेपणा आहे. परंतु त्याची शुश्रूषा कशी करावयाची ह्याविषयीचे नीट ज्ञान जर मला नसेल, तर नुकसान होण्याचा संभव असतो. प्रेमामुळे, जे देऊ नये तेच मी खावयास देईन; जे करावयास नको तेच करीन; जे पाजावयास नको तेच पाजीन. अशा रीतीने माझे प्रेम तारक होण्याऐवजी मारकच व्हावयाचे.
प्रेम हे डोळस प्रेम हवे; तरच कर्म हितपरिणामी होईल. आजकाल विज्ञान कितीतरी वाढले आहे. प्रत्येक कर्मात त्याची जरुरी आहे. स्टोव्ह कसा पेटवावा, पाणी स्वच्छ कसे करावे, कोणती पावडर टाकावी, इलेक्ट्रिकजवळ कसे वागावे, टेलिफोन कसा करावा, सायकल कशी दुरुस्त करावी, इंजेक्शन कसे द्यावे, कोणत्या भाज्या चांगल्या, व्हिटॅमिन्स कशांत आहेत, कोणते व्यायामप्रकार चांगले कोणती शिक्षणपद्धती चांगली, सदीप व्याख्याने कशी द्यावी, खेड्यांचे आरोग्य कसे सुधारावे, खते कशी तयार करावी, बी किती अंतरावर पेरावे, एक ना दोन शेकडो प्रकारचे ज्ञान आपणांस आपल्या रोजच्या व्यवहारात पाहिजे आहे. आपली प्रत्यहीची कर्मे सुंदर, त्वरित व चांगली व्हावीत म्हणून सर्व प्रकारचे शास्त्रीय ज्ञान आपण हस्तगत केले पाहिजे.
जर प्रेम असेल तरच आपण ज्ञान मिळवू. माझ्या भावावर जर माझे प्रेम असेल, तरच त्याच्यासाठी जे कर्म मी करणार त्यात विज्ञान वापरीन. शाळेतील विद्यार्थ्यांवर प्रेम असेल तरच मी शिक्षणशास्त्राचा अभ्यास करीन; मुलांचे मानसशास्त्र अभ्यासीन; मी ते ज्ञान मिळवण्याचा कधीच कंटाळा करणार नाही. प्रेमाला आळस माहीत नसतो.
आज भारतीय संस्कृतीत विज्ञानाचा जवळजवळ अस्तच झाला आहे. विज्ञानाचा दिवा विझला आहे. विज्ञानपूजा लोपली आहे. हा विज्ञानाचा नंदादीप पुन्हा प्रज्वलित केला पाहिजे. एखादा महापुरुष विशिष्ट क्षेत्रात संशोधन करतो. मग त्याचा तो शोध सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारात येतो. असे संशोधक भारतात उत्पन्न झाले पाहिजेत. संसाराला सुंदरता आणणारे हे विज्ञान-त्यात भिण्यासारखे काहीच नाही. लोक पाश्चिमात्यांना केवळ भौतिक म्हणून तुच्छ मानितात आणि स्वतःला आध्यात्मिकही नाही व भौतिकही नाही. आपण केवळ मढी आहोत !
पाश्चिमात्यांत भौतिक विज्ञानाच्या पाठीमागे अद्वैताची- मानव्याची थोर कल्पना नसल्यामुळे जगात हैदोस घालण्याचे आसुरी कर्म त्यांनी चालविले आहे. त्यांच्या भौतिकतेला आध्यात्मिकतेची जोड मिळाली तर सारे सुंदर होईल. भारतात भेदांचा बुजबुजाट आहे. श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे आहेत. मुखाने अद्वैत घोकतील व कृतीने दुसऱ्यास लाथ मारतील ! अध्यात्म ग्रंथात आहे. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म आज विलुप्त झाले आहे ते आपण कृतीत आणू या. सर्वांस सुखविण्याची इच्छा धरू या, आणि ही इच्छा मूर्त करण्याकरिता विज्ञानाचीही कास धरू या.
पाश्चिमात्यांत केवळ आध्यात्मिकतेची वाण आहे. परंतु आपण दोन्ही दृष्टींनी दिवाळखोर आहोत. ज्ञान-विज्ञान दोन्ही येथे मरून पडली आहेत. आर्यभट्टांच्या व भगवान बुद्धांच्या या भरतभूमीत पुनरपि ज्ञान-विज्ञानांची जोपासना नाही का सुरू होणार? अध्यात्मविद्या व भौतिक विद्या यांचा संगम नाही का होणार?
ईशोपनिषदात हीच गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे. विद्या व अविद्या; संभूती व असंभूती यांचा समन्वय करावयास ऋषीने सांगितले आहे.
विद्यां च अविद्यां च यस्तद्वेदोभयं सह
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्रुते ॥
अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान. या भौतिक ज्ञानाने आपण मृत्यू तरतो म्हणजे हा मृत्युलोक तरतो; संसारातील दुःखे, रोग, संकटे यांचा परिहार करतो. संसारयात्रा सुखकर करतो. आणि विद्येने अमृतत्त्व मिळते. अध्यात्मज्ञानाने या शरीराच्या आतील, या आकारातील चैतन्य एकच आहे हे कळून अमरता अनुभवास येते.
जो केवळ विद्येला भजेल किंवा केवळ अविद्येला भजेल, तो पतित होईल. एवढेच नव्हे, तर हे उपनिषद सांगते की, केवळ अविद्येची उपासना एक वेळ पत्करली; परंतु केवळ अध्यात्मात रमणार तर फारच घोर नरकात पडतो. कारण विज्ञानाची उपासना करणारा संसाराला, निदान स्वतःच्या राष्ट्राच्या संसाराला तरी शोभा आणील. परंतु कर्मशून्य वेदान्ती सर्व समाजाला धुळीत मिळवितो. समाजात तो दंभ निर्माण करतो. अध्यात्म व भौतिक शास्त्र यांत कोणत्या एकाचीच कास धरावयाची असेल, तर ईशोपनिषद म्हणते, 'भौतिक शास्त्रांची कास घर.' केवळ भौतिक शास्त्रांची कास धरल्याने पतित होशील, परंतु तितका पतित होणार नाहीस - जितका केवळ अध्यात्मवादी झाल्याने होशील-
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यां उपासते ।
ततः भूयः इव ते तमः येऽविद्यायां रताः ।।
कर्मे करीत शंभर वर्षे उत्साहाने जगा असा महान संदेश देणारे हे उपनिषद असे सांगत आहे. विज्ञानाची कुटाळकी व हेटाळणी करणे हे भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्यांना शोभत नाही. विज्ञान तुच्छ नाही; विज्ञान महान वस्तू आहे हे आता तरी आपण ओळखू या.
गीतेमध्ये ज्ञान-विज्ञान हे शब्द नेहमी बरोबर येतात. विज्ञानाशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे, आणि ज्ञानाशिवाय, अद्वैताशिवाय विज्ञान भेसूर आहे. ज्ञानाच्या पायावर विज्ञानाची इमारत उभारली तर कल्याण होईल. पाश्चिमात्य लोक विज्ञानाची इमारत वाळूवर उभारीत आहेत. म्हणून ही इमारत गडगडेल व संस्कृती गडप होईल. विज्ञानाचा पाया अध्यात्माच्या पायावर उभारणे हे भारतीय संस्कृतीचे भव्य कर्म आहे. हे महान कर्म भारताची वाट पाहात आहे. भारत हे कर्म नाही का अंगावर घेणार?
प्रपंच व परमार्थ यांचे हे रमणीय संमीलन आहे. ज्ञान- विज्ञानाच्या या विवाहातून मांगल्याची बाळे जन्माला येतील व पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल !
महात्माजी आज हे करीत आहेत. महात्मा गांधींना भेद माहीत नाहीत. अद्वैत त्यांच्या रोमरोमांत बाणले आहे. सर्वत्र त्यांना नारायणच दिसत आहे. परंतु या नारायणाची सेवा शास्त्रीय दृष्टीने ते करू पाहात आहेत. महात्मीजींना विज्ञान पाहिजे आहे. चरख्यात सुधारणा करणाऱ्यांना त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ केले होते. अर्थशास्त्रावर निबंध लिहिणारास एक हजार रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. त्यांना संशोधन पाहिजे आहे; कल्याणवह संशोधन पाहिजे आहे. खाण्यापिण्याचे ते प्रयोग करतात. गूळ चांगला की साखर चांगली, सडलेले तांदूळ चांगले की असडिक तांदूळ चांगले, हातसडीचे तांदूळ हितकर की यांत्रिक तांदूळ सत्त्वयुक्त. कोणते पाले खावेत, घोळीची भाजी, निंबाचा पाला, वगैरेंत कोणती सत्त्वे आहेत; चिंचेचे सरबत चांगले की वाईट; कच्चे खावे की शिजलेले खावे, मधाचा काय उपयोग, मधूसंवर्धनविद्या देशात कशी वाढेल, एक की दोन शेकडो प्रकारचा विज्ञानविचार महात्माजी करीत असतात. आजारीपणात पाणी, माती, प्रकाश वगैरे नैसर्गिक उपचारांचा उपयोग ते करू पाहतात. कारण हे उपाय स्वस्त व सुलभ आहेत. आपल्या बांधवांचा संसार सुंदर व्हावा म्हणून महात्माजींची कोण आटापीट, केवढे प्रयोग, किती कष्ट!
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बुद्धीचा दिवा घेऊन ते जात आहेत. विज्ञानाला घेऊन जात आहे. संसाराला, सर्व जनतेच्या संसाराला सौंदर्य देणारे, समृद्धी देणारे विज्ञान त्यांना पाहिजे आहे. ज्ञान- विज्ञानाची उपासना करणारे व त्यात भक्तीचा जिव्हाळा ओतणारे असे महात्माजी म्हणजे भारतीय संस्कृतीची मूर्ती आहेत. भारतीय संस्कृती म्हणजे ज्ञानयुक्त, विज्ञानयुक्त व भक्तियुक्त केलेले शुद्ध कर्म! असे कर्म कसे करावे हे महात्माजींसारख्यांपासून शिकावे. महात्माजींच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा आत्माच अवतरला आहे असे मला वाटते.
अशी ही भारतीय संस्कृती संपूर्ण आहे. ती कोणत्याही एकाच गोष्टीला महत्त्व देणारी नाही. ती मेळ घालणारी आहे. शरीर व आत्मा दोघांना ती ओळखते. शरीरासाठी विज्ञान व आत्म्यासाठी ज्ञान ! शरीराने नटलेल्या या आत्म्याला, विज्ञानाने नटलेले अध्यात्म व अध्यात्माने नटलेले विज्ञान यांचीच जरूर आहे. भारतीय जनता हे दिव्य सूत्र ओळखील तो सुदिन !