shabd-logo

अवतार- कल्पना

6 June 2023

5 पाहिले 5
अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वेदांमध्ये अनेक स्तोत्रे “हे मी आज नवीन स्तोत्र रचीत आहे” असे उद्गार काढताना आढळतात. वेद यांचा अर्थ विचार, ज्ञान, अनुभवसंपदा एवढाच आता घ्यावयाचा. वेदांवर उभारलेला धर्म म्हणजे ज्ञाज्ञावर, अनुभवांवर उभारलेला धर्म. जसजसे ज्ञान वाढत जाईल, अनुभव नवीन येत जाईल, तसतसे सनातन धर्मांचे स्वरूपही नवनवीन होत जाईल. सनातन धर्म म्हणजे वाढता धर्म.

परंतु अवतारवादाने नुकसान का व्हावे, हे समजत नाही. या अवतारवादातील मूलभूत कल्पना त्रिकालाबाधित आहे. अवतारवाद म्हणजे दुर्बलतावाद नव्हे. अवतारवाद म्हणजे प्रयत्नांचा अभाव नव्हे. अवतारवाद म्हणजे अपरंपार प्रयत्नवाद. अवतारवाद म्हणजे अविरत कर्म, अखंड उद्योग.

आपण स्वस्थ बसून अवतार होत नसतो. घुसळल्याशिवाय नवनीत हातात येत नाही. धडपडीशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय कार्य नाही. त्याप्रमाणे प्रयत्नाशिवाय अवतार नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठेला अवतार हे फळ लागत असते.

आपल्या मनातील आशा-आकांशा ज्याच्या ठायी अवतरलेल्या आपणांस दिसतात, तो अवतार होय. आपल्या मनातील ध्येये, आपल्या भावना, आपली सुखदुःखे, आपली मनोगते ज्याच्या ठायी मूर्तिमंत दिसतात तो अवतार होय.

अवतार आधी नाही. आधी आपण आणि नंतर अवतार. आपण सारे धडपड करीत असतो. लहान-मोठे प्रयत्न करीत असतो. जो तो आपापल्या परीने समाजात सुखस्वास्थ्य निर्माण करण्यासाठी प्राणपर कष्ट करीत असतो. परंतु आपल्या सर्वांच्या प्रयत्नांत एकसूत्रता नसते, एकवाक्यता नसते. आपण कोठे तरी धावत असतो, कोठे तरी घाव घालीत असतो. आपणांस नवीन सृष्टी निर्मावयाची आहे, याची सर्वांना जाणीव असते. सर्वांना उत्कटता असते. तळमळ असते. परंतु हे सारे प्रयत्न अलग होत असतात.

मनात काही तरी कल्पना असते. परंतु ही कल्पना स्पष्ट नसते. ध्येय अस्पष्ट असे डोळ्यांसमोर असते. हे अस्पष्ट ध्येय स्पष्ट करण्यासाठी अवतार लागत असतो. तो येतोच. ती सामाजिक जरुरीच असते. अवतार अकस्मात होत नाही. धूमकेतूसारखा तो कोठून तरी येतो असे नाही. लाखो लोकांच्या अस्पष्ट प्रयत्नांतून स्पष्ट ध्येय देणारा अवतार सृष्टीच्या नियमानुसारच उत्पन्न होत असतो.

भिरीभिरी फिरणारे अणू ज्याप्रमाणे स्थिर होतात, त्याप्रमाणे भिरीभिरी फिरणारे सामान्य जीव ध्येयाची स्पष्ट दिशा दाखविणाऱ्याभोवती स्थिर होतात. लोखंडाचे अणू ज्याप्रमाणे चुम्बकाभोवती येतात, ग्रह ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरू लागतात, त्याप्रमाणे धडपडणारे जीव धडपडीचे गन्तव्य दाखविणाऱ्या महापुरुषाभोवती फिरू लागतात.

श्रीरामचंद्राचा जन्म होण्यापूर्वीच वानर धडपडत होते. त्या वानरांच्या धडपडीत रामाचा जन्म होता. गोकुळातील गोपाळांच्या धडपडीत श्रीकृष्णांचा जन्म होता. गोपाळांच्या हातांत काठ्या होत्या, परंतु त्या काठ्यांना एका ध्येयावर केन्द्रित करण्यासाठी श्रीकृष्णाची आवश्यकता होती. हातांत काठ्या घेऊन फिरणाऱ्या त्या गोपाळांना कृष्ण हाक मारून म्हणाला, “या रे, या रे अवघे जण. इंद्राचा हा जुलूम दूर करावयाचा आहे ना? या, गोवर्धन पर्वत सारे मिळून उचलू. लावा एकदम काठ्या एका ध्येयासाठी सारे उठा.” गोपाळांनीच काठ्या उचलल्या. त्यांनीच पर्वत उचलला. कृष्णाने काय केलं? केवळ बोट दाखविले. येथे काठ्या लावा, येथे एके ठिकाणी या, पर्वत उचला, हा जुलूम दूर करा. कृष्ण नुसते दिग्दर्शन करीत होता. अवतारी पुरुष जनतेच्या प्रयत्नांना विशिष्ट दिशेने वळण देतो. जनतेचीच शक्ती, परंतु ती केंद्रीभूत व सुसंघटित नसल्यामुळे कार्यरत नव्हती. परंतु त्या शक्तीला व्यवस्थित स्वरूप देताच ती अमोघ होते; तेजस्वी, अप्रतिहत होते. सर्व संकटांचा ती चुरा केल्याशिवाय राहात नाही.

छत्रपती श्रीशिवाजीमहाराज म्हणजे महाराष्ट्रातील लाखो धडपडणाऱ्या जीवांना एकत्रित करणारी शक्ती बलवान मूर्ती डोळ्यांसमोर दिसताच सारे धडपडणारे जीव भराभर अनाहूत त्या मूर्तीभोवती उभे राहतात. तिचा आदेश पार पाडण्यास सिद्ध होतात. अवतारी विभूती म्हणजे स्थिर विभूती. ध्येयावर दृष्टी ठेवून अचल उभी राहणारी विभूती. आपण सारे ध्येयपूजक असतो. परंतु त्या ध्येयाला आकाश कोसळो वा पृथ्वी गडप होवो, मी मिठी मारून राहीन, असा आपला निश्चय नसतो. आपण मोहाला बळी पडतो. सुखाला लालचावतो, कष्टाला कंटाळतो, हालांना भितो, मरणापासून पराङ्मुख होतो. ध्येयासाठी आपण धडपडतो, परंतु ती धडपड कधी थंडावेल, कधी गारठेल याचा नेम नसतो.

महापुरुष अशा चंचलांची ध्येयश्रद्धा दृढ करतो. त्या महापुरुषाची जग परीक्षा घेते. सॉक्रेटिसाची परीक्षा होते. ख्रिस्ताची परीक्षा होते. परंतु ते महान पुरुष अविचल उभे राहतात. जगाची श्रद्धा ते ओढून घेतात. जगाच्या प्रयत्नांना आपल्या दिव्य भव्य धैर्याने व आत्मत्यागाने नीट वळण देतात.

महात्मा गांधींच्या पाठीमागे कोट्यवधी हिंदी जनता का उभी राहते? कारण कोट्यवधी हिंदी लोकांच्या तिळ तिळ प्रयत्नांतून ते निर्माण झाले आहेत. कोट्यवधी हिंदी लोकांना स्वतःची ध्येये, स्वतःच्या आशा-आकांक्षा त्या महापुरुषाच्या ठायी अत्यंत उत्कटतेने प्रतीत होत आहेत. आपल्या हृदयातील ध्येय ज्याच्या ठिकाणी अत्यंत प्रखरतेने व स्पष्टपणे मूर्तिमंत झालेले दिसते, तो आपला अवतारी पुरुष होय. आपल्या प्रयत्नांचे, पराकाष्ठेचे परिणत स्वरूप जेथे आपणांस दिसून येते, तेथे आपला अवतार असतो..

मग अवतार म्हणजे काय? अवतार म्हणजे मी कसोशीने प्रयत्न करणे. माझ्या लहान प्रयत्नातून लहान अवतार निर्माण होईल. माझ्या मोठ्या प्रयत्नातून महान अवतार निर्माण होईल. महात्माजींची शक्ती वाढविणे हे आमच्या हाती आहे. रामाच्या शब्दाची किंमत वाढविणे हे वानरांच्या हाती होते. महात्मा गांधी मागे इंग्लंडमध्ये जाताना म्हणाले, “मी तिकडून काय आणणार? आणणारा मी कोण? तुम्ही द्याल तेच मी आणीन. मी म्हणजे तुमची शक्ती.” महापुरुषाची शक्ती बहुजनसमाजाच्या शक्तीने मर्यादित असते. ज्या मानाने बहुजनसमाज प्रयत्नांची पराकाष्ठा करील त्या मानाने अवतारी पुरुषाची प्रभा फाकेल.

तुम्हाला अवतार पाहिजे ना? तर मग भारतीय संस्कृती सांगते, “स्वतःमधील सर्व सामर्थ्याने ध्येयाकडे जाण्यासाठी उभे राहा. स्त्री- पुरुष, लहान-थोर, राव-रंक, सारे, उठा. शर्थ करा. आच लागू दे. हृदय पेटू दे. हातपाय हालू देत. कोट्यवधी लोकांच्या अशा हृदयपूर्ण चळवळीतून महापुरुष प्रकट होतो व त्याच्या प्रयत्नांना पुढे सिद्धीचे फळ लागते.

इमर्सन या अमेरिकन ग्रंथकाराने एके ठिकाणी म्हटले आहे, “महापुरुष म्हणजे लाटेवरचा फेस होय.” किती सुंदर उपमा आहे! लाट कितीतरी दुरून चढत पडत येत असते. वाढत वाढत येत असते. शेवटी ती पराकाष्ठेची उंच होते, त्या वेळी त्या लाटेच्या शिखरावर स्वच्छ फेस उसळतो. त्या लाटेचे ते निर्मळ अंतरंग असते. समाजामध्ये कित्येक वर्षे चळवळ चालत असते. प्रयत्न होत असतात. पाऊल पुढे पडत असते. समाजातील चळवळ वाढत वाढत तिची प्रचंड लाट होते आणि त्या लाटेच्या शिखरावर महापुरुष उभा राहतो! त्या लाटेतील स्वच्छता म्हणजे तो अवतार; जनतेच्या अनंत प्रयत्नांतील खळमळ जाऊन जे स्वच्छ, पवित्र स्वरूप वर येते, ते स्वरूप म्हणजे महापुरुष. जनतेच्या प्रयत्नांतील सारी पवित्र मंगलता, सारी निर्दोष विशालता त्या अवतारी पुरुषाच्या द्वारा जगाला दिसते. लोकांच्या प्रयत्नांचे सुंदर अपत्य म्हणजे ती महान विभूती होय!

सत्पुत्र सत्कुळात निर्माण होतो यातील अर्थ हाच होय. तपस्येच्या पोटी सदंकुर निर्माण होतात. ज्या समाजात तपस्या आहे, तळमळ आहे, धडपड आहे, ध्येयाचा ध्यास आहे, त्या समाजात महात्मे अवतीर्ण होतात. भगवान बुद्ध जन्माला येण्यापूर्वी भारतात प्रचंड वैचारिक चळवळ सुरू होती. हे खरे का ते खरे, याचे वाद उत्कटपणाने ठायी ठायी चालले होते. ठिकठिकाणी चर्चा व अभ्यासमंडळे दिसत होती. अशा त्या प्रचंड वैचारिक खळबळीतून भगवान बुद्ध जन्माला आले. त्या वैचारिक लाटेवरचा शुद्ध-स्वच्छ फेस म्हणजे हा महान सिद्धार्थ !

आपल्या अनंत धडपडींना वळण देणारा, आपल्या अपरंपार प्रयत्नांना अर्थ प्राप्त करून देणारा असा महापुरुष पाहिला, म्हणजे हृदय उचंबळून येतो. आईला आपल्या नऊ मास वाहिलेल्या कष्टांचे व प्रसववेदनांचे प्रत्यक्ष गोरेगोमटे साजिरे गोजिरे फळ पाहून जसे प्रेमाचे भरते येते, तसेच जनतेला होते. जनता महापुरुषाची जननी असते. या महापुरुषाच्या नामाचे उच्चारण करताना जनतेला अपूर्व स्फूर्ती येते.

नाम जपण्यात काय अर्थ आहे, असे आपण सहज म्हणतो. परंतु नाम जपनात अपार सामर्थ्य आहे. 'वन्दे मातरम्' मंत्राचा जप करीत लहान मुले फटके हसत खातात! 'भारतमाता की जय' म्हणत हुतात्मे फाशी जातात! 'महात्मा गांधी की जय' म्हणत स्त्रिया लाठीमार शिरावर घेतात! 'इन्किलाब जिंदाबाद' म्हणत क्रांतिकारक गोळीसमोर उभे राहतात!

नामजपन म्हणजे ध्येयाचे जपन. महात्मा गांधी म्हणजे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य! रामनाम म्हणजे रावणाचे निर्दालन व पददलितांचे उद्धरण. गोपाळकृष्ण म्हणजे भेदातीत प्रेम, स्त्री-शूद्र- वैश्यांस प्रेमाने समान लेखणे. कार्ल मार्क्स की जय, लेनिन की जय, म्हणजे सर्व श्रमजीवी लोकांचे महान वैभव. त्या एकेका नावात अनंत अर्थ असतो, त्या एका नामोच्चारणात अपार स्फूर्ती असते. माझ्या ध्येयाचे ते मूर्तिमंत स्मरण असते. ते स्मरण माझ्या मरणावर स्वार होते.

अवतारी पुरुष तरी निर्भय का असतो? त्याच्या ठिकाणी ती वज्रालाही वाकविणारी शक्ती कोठून येते? अवतारी पुरुषाला माहीत असते, की मी एकटा नाही. मी म्हणजे हे लाखो लोक. या लाखो लोकांचे मी प्रतीक आहे. लाखो लोकांशी मी जोडलेला आहे. लाखो लोकांचे लाखो हात माझ्याभोवती आहेत. माझ्या अंगाला हात लावणे म्हणजे लाखो लोकांच्या अंगाला हात लावणे आहे. माझा अपमान करणे म्हणजे लाखो लोकांचा तो अपमान आहे.

आज महात्मा गांधी का एकटे आलेत ? लाखो चरख्यांवर सूत कातणारे लाखो लोक त्या सुताने त्यांच्याशी चिरबद्ध झालेले आहेत. ग्रामसेवा करणारे हजारो लोक महात्माजींशी जोडलेले आहेत. हरिजनसेवा करणारे शेकडो बंधू महात्माजींशी जोडलेले आहेत. हिंदु-मुस्लिम ऐक्य करू पाहणारे, जातीय तंटे मिटविणारे, दारूबंदी करू पाहणारे, सारे महात्माजींशी जोडलेले आहेत. या कोट्यवधी लोकांची ही जनताजनार्दनाची सुदर्शनशक्ती महात्माजींच्या भोवती फिरत आहे.

आणि जवाहरलाल का एकटे आहेत? पददलितांची बाजू घेणारे, मदोन्मत्तांचा व खुशालचेंडूंचा नक्षा उतरू पाहणारे, श्रमाची महती ओळखणारे, शेतकरी-कामकरी लोकांसाठी बलिदान करू पाहणारे, त्यांची संघटना करणारे, मानव्याचा खरा धर्म ओळखणारे, बाकी सारे दंभ दूर भिरकावून देणारे असे हजारो लोक जवाहरलालांभोवती उभे आहेत, आणि ज्यांच्यासाठी जवाहरलाल जळफळत आहेत, तडफडत आहेत ते कोट्यवधी हिंदु-मुसलमान भाई त्यांच्याशी जोडलेले आहेत. म्हणून जवाहरलाल यांच्या शब्दात तेज आहे, वाणीत ओज आहे, दृष्टीत तेजस्विता आहे.

महापुरुष म्हणजे पुंजीभूत विराट जनता. म्हणून बलवंत सरकारेही अशा महापुरुषाला वाकून असतात. महापुरुषांचे रक्त सांडणे सोपी गोष्ट नाही. संभाजीचे रक्त मोगली साम्राज्य धुळीला मिळवील. गुरू गोविंदसिंहाचे रक्त शिखांचे साम्राज्य उभारील.

विराटाच्या दरबारात अक्षक्रीडा चालली होती. खेळता खेळता संतापलेल्या विराटाने धर्मराजास फासा मारला होता. धर्माच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहू लागले. धर्माने ते रक्त खाली पडू दिले नाही. सैरंध्री ताम्हन घेऊन आली. त्या ताम्हनात ते रक्त धरण्यात आले. धर्माला कोणीतरी प्रश्न केला, “आपण अंजुलीत रक्त का धरून ठेविले? खाली पडले असते म्हणून काय बिघडले असते?” धर्मराज म्हणाला, "या रक्ताचा बिंदू जर जमिनीवर पडता, तर विराटाच्या राज्याचे भस्म होऊन गेले असते.”

अवतारी पुरुषाच्या रक्तातही शक्ती असते. ख्रिस्ताचे रक्त सांडण्यात आले, परंतु त्या रक्ताने जग जिंकले. अवतारी पुरुषांची ही प्रचंड शक्ती कधी कधी सत्तालोलुप लोक विसरतात. ते अवतारी पुरुषाचे रक्त सांडतात आणि ते रक्त सांडताच त्या सत्ताधीशांची सत्ता रसातळाला जाते. इतिहासाचा हा सिद्धान्त आहे. आपल्या प्रयत्नांची शर्थ करून असा अवतारी पुरुष जे बघतात ते धन्य होत. असा अवतारी पुरुष उत्पन्न होण्यासाठी जे आपल्या श्रमाचे सहकार्य करतात, जे एकत्र येतात, लहान-मोठे, स्त्री-पुरुष सर्व श्रेष्ठ- कनिष्ठपणा बाजूस सारून कर्मयज्ञ करतात, ते धन्य होत. हे महान सहकार्य होय. या कर्मात सर्वांना वाव आहे. पतित असोत वा पुण्यपावन असोत, या सर्वजण प्रयत्न करण्यासाठी. आपापल्या लहानशा कर्मांनी आपण महान पुरुषाला ओढून आणू. आपण कर्मांचे डोंगर उभारू, प्रयत्नांचे पर्वत रचू. कणाकणाचेच पर्वत असतात. हे सेवेचे व श्रमाचे पर्वत महापुरुषरूपी जीवनदायी मेघाला ओढून घेतील व समाज सुखी-समृद्ध होईल.

भारतीय संस्कृती सांगते की, महापुरुष जन्मास यावा असे वाटत असेल तर स्वस्थ बसू नका. केवळ हरी हरी म्हणत खाटल्यावर बसल्याने श्रीहरी जन्माला येत नसतो. 'न हि ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः ।' असे श्रुतिवचन आहे. जे दमले -भागले असतील अशांचाच प्रभू मित्र होतो, पाठीराखा होतो. जे श्रमत नाहीत, दिलेल्या हातापायांचा, हृदय - बुद्धीचा उपयोग करीत नाहीत, अशा कर्मशून्यांसाठी परमेश्वर उभा नसतो.

अवतारी पुरुष डोळ्यांनी पाहणे याहून भाग्य कोणते? असा पुरुष आपली आशा असते; असा पुरुष आपले सामर्थ्य असते; अशा पुरुषाला पाहण्याचे आपणांस डोहाळे असतात. अशा विभूतीला पाहण्यासाठी डोळे भुकेलेले असतात. ईश्वराचा महिमा अशांकडूनच कळतो. मानवाचा महिमाही अशांकडूनच प्रकट होतो. मानवाची शक्ती महापुरुष दाखवून देत असतात. मनुष्याला किती उंच जाता येईल याची खूण असे महापुरुष करून ठेवितात.

भारतीय संस्कृतीत कर्मशून्यतेला, आलस्याला, नैराश्याला स्थान नाही. भारतीय संस्कृती म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा; भारतीय संस्कृती म्हणजे अमर आशावाद; भारतीय संस्कृती म्हणजे कोट्यवधी लहान- थोरांचे सहकार्य. अवतारकल्पनेत या सर्व गोष्टींचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आहे. ते सर्वांस ज्या दिवशी समजेल तो सुदिन!


24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा