shabd-logo

स्त्री-स्वरूप

6 June 2023

235 पाहिले 235
भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप्रमाणे भारतीय स्त्रिया कुटुंबात सतत कष्ट करून, निमूटपणे श्रम करून आनंद निर्माण करीत असतात. प्रत्येक कुटुंबात तुम्ही पाहा. पहाटेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत राबणारी ती कष्टाळू मूर्ती तुम्हाला दिसेल. क्षणाची विश्रांती नाही, फारसा आराम नाही.

सीता-सावित्री, द्रौपदी-गांधारी हे त्यांचे आदर्श आहेत. त्यागमूर्ती व प्रेममूर्ती अशी ही भारतीय स्त्रियांची दैवते आहेत. सीता म्हणजे चिरयज्ञ. भारतीय संस्कृतीत स्त्रीचे जीवन म्हणजे पेटलेले होमकुंड आहे. लग्न म्हणजे यज्ञ. पतीच्या जीवनाशी संलग्न झाल्यापासून स्त्रीच्या जीवनयज्ञास आरंभ होतो आणि हा यज्ञ मरणानेच शान्त होतो.

स्त्री म्हणजे मूर्त कर्मयोग. तिला स्वतंत्र अशी जणू इच्छाच नाही. पतीच्या व मुलांच्या इच्छा म्हणजेच तिची इच्छा. पतीला आवडेल ती भाजी करा, पतीला आवडेल तो खाद्यपदार्थ करा, मुलांना आवडेल ते पक्वान्न करा. ज्या दिवशी घरात पती जेवावयास नसतो, त्या दिवशी पत्नी स्वतः भाजी वगैरे करणार नाही. पिठले ढवळील, नाही तर लोणच्याची चिरी घेईल. स्वतःसाठी काहीएक नको. पतीला आवडणारे लुगडे नेसणे, पतीला आवडणारे पुस्तक वाचणे, पतीला आवडणारे गाणे गाणे, पतीसाठी विणणे, पतीसाठी शिणणे, त्याचे कपडे स्वच्छ ठेवणे, त्याच्या प्रकृतीस जपणे. पती हेच पत्नीचे दैवत.

“चरणांची दासी” हे त्याचे भाग्य ! कबीर ईश्वराला म्हणतो:

"मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा । तू साहिब मेरा ।"

भारतीय स्त्री न कळत, न वळत पतीला हेच म्हणत असते. ती सर्वस्व पतीला अर्पण करते. सर्वस्वाने त्याची पूजा करते.

भारतीय स्त्रीने स्वतःला पतीत मिळवून टाकिले आहे; परंतु पतीने काय केले आहे? भक्त देवाचा दास होतो. परंतु देवही मग भक्ताच्या दारात तिष्ठत उभा असतो. नारद एकदा विष्णूच्या भेटीसाठी गेले, तेव्हा भगवान विष्णू पूजा करीत होते ! नारदाला आश्चर्य वाटले. सारे त्रिभुवन ज्याची पूजा करते तो आणखी कोणाची पूजा करीत बसला आहे? भगवान विष्णू बाहेर येऊन म्हणाले:

“प्रल्हादनारदपराशरपुंडरीक
 व्यासाम्बरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ।।
 रुक्माङ्गदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन्
 पुण्यानिमान् परमभागवतान् स्मरामि ।।"

भक्त हे देवाचे देव होत असतात. ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी फारच सुंदर ओव्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, “अर्जुना ! भक्त हे माझे परम थोर दैवत.”

"तो पहावा ऐसे डोहळे ।
 म्हणून अचक्षूसी मज डोळे हातींचेनि लीलाकमळे |
 पुजूं तयातें ।।
 दोंवरी दोनी ।
 भुजा आलों घेवोनी आलिंगावया लागोनी । तयाचें आंग ।।"

भक्ताला पूजिण्यासाठी देवाच्या हातात कमळ, भक्ताला मिठी मारण्यासाठी दोन हात पुरणार नाहीत म्हणून चार हात ! भक्ताला पाहावयाचे डोहाळे होतात म्हणून निराकर प्रभू साकार होतो! किती गोड आहे हा भाव !

आपण प्रेमाने ज्याचे दास होऊ, तो आपलाही दास होतो. प्रेमाने दास होणे म्हणजे एक प्रकारे मुक्त होणे. परंतु आपल्या कुटुंबात काय अनुभवास येते? स्त्री सर्वांची सेवा करीत आहे, ती सर्वांची प्रेममयी दासी आहे, परंतु तिचे दास कोण आहे? तिला सुख व्हावे, तिला आनंद व्हावा, तिच्या हृदयाला विसावा मिळावा म्हणून कोणाला चिंता आहे का? स्त्रीच्या मनाच्या व हृदयाच्या भुका कोणाला माहीत आहेत का? तिची आन्तरिक दुःखे कोणाला कळतात का? तिची कोणी प्रेमाने विचारपूस करतो का?

स्त्रीच्या हृदयात कोणीच शिरत नसेल! सारे स्त्री-जीवनाच्या अंगणात खेळत असतात! तिच्या अंतरंगाच्या अंतर्गृहात कोणीही जात नाही. ते अंतर्गृह उदास आहे. तेथे प्रेमाने कलश घेऊन कोणी जात नाही. स्त्रीहृदय हे सदैव मुकेच आहे! स्त्रिया मुक्या असतात. त्यांची हृदये फार गूढ व गंभीर असतात. त्या प्रेमयाचना करीत नाहीत. हृदयाला ज्याची तहान आहे ते प्रेम असो की बाहेरची भाजी असो, स्त्री त्याची मागणी करणार नाही. जे आणून द्याल ते ती घेईल.

भारतीय स्त्रियांच्या हृदयाची कल्पना भारतीय पुरुषांस फारशी नसते. स्त्रियांना खायला-प्यायला असले, थोडेसे नीट नेसायला असले म्हणजे झाले, त्यापेक्षा स्त्रियांना काही अधिक पाहिजे असते असे त्यांना वाटतच नाही! त्यांना स्त्रियांच्या आत्म्याचे दर्शन नसते. स्त्रियांना आत्माच नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, आणि जेथे आत्माच नाही तेथे मोक्ष तरी कशाला?

भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाचा पुरुष अगदी अनाठायी फायदा घेतात. कधी कधी ते घरात काडीइतकेही लक्ष देत नाहीत. मुलाबाळांचे पाहणार नाहीत. दुखलेखुपले पाहणार नाहीत. रात्री जागरण करणार नाहीत. मूल रडू लागले तर आदळआपट करतील. बिचारी माता त्या मुलाला मांडीवर घेऊन बसते. त्याला पायांच्या पाळण्यात घालते. ती रडकुंडीस येत. पतीची झोपमोड होऊ नये म्हणून किती जपत असते!

पती कसाही असो, त्याला पत्नी सांभाळून घेते. कुटुंबाची अब्रू ती संरक्षिते. कुटुंबाची लाज ती उघडी पडू देणार नाही. स्वतः उपाशी राहील, दळणकांडण करील, परंतु कुटुंब चालवील. तेवढ्यातल्या तेवढ्यात मुलाबाळांचे करील. खाऊ द्यावयास नसेल तर मुके घेईल व त्यांना हसवील! स्वतःचे अश्रू, स्वतःचे दुःख ती कोणास दाखविणार नाही! तिचे दुःख केवळ तिलाच माहीत असते!

पतीची लहर सांभाळणे म्हणजे तिचा धर्म होऊन बसतो ! रात्री आठ वाजता येतात का दहा वाजता येतात, ती बिचारी वाट पाहात असते. पती उशिरा आल्यावर म्हणतो, “तू जेवून का नाही घेतलेस?” तो जर पत्नीच्या हृदयात कधी डोकावता, तर असे शब्द त्याने कधी काढले नसते.

पतिमुखावरचे हास्य म्हणजे पत्नीचे सुखसर्वस्व ! ती पतीच्या मुद्रेकडे पाहात असते. पतीचे डोळे हसले, ओठ हसले तिला मोक्ष मिळतो. पती गोड बोलला की तिला सारे मिळाले! किती अल्पसंतोषी भारतीय सती! परंतु हा अल्पसंतोषही त्यांना मिळत नसतो.

पापी, दुर्गुणी, दुराचारी पतींचीही सेवा भारतीय स्त्रिया करीत असतात. एकदा ज्यांच्याशी गाठ पडली ती कशी सोडावयाची! जरी काही जातींत काडीमोड होत असली, तरी काडीमोड हे संस्कृतीचे चिन्ह समजले जात नाही. जरी काही जातींत पुनर्विवाह लागत असला, तरी पुनर्विवाह हे सांस्कृतिक लक्षण गणले जात नाही. पती म्हणजे त्यांचा देव. त्यांचा महान आदर्श! त्यांचे दिव्य ध्येय !

पती दुर्वृत्त असला तरी त्याल थोडेच टाकावयाचे? एकदा त्याला मी माझा असे म्हटले. आपलेपणाचे नाते परीस आहे. माझा मुलगा खोडकर असला म्हणून का त्याला मी टाकीन ? सारे जग माझ्या मुलाला नावे ठेवील, म्हणून मीही ठेवावी? मग त्याच्यावर मायेचे पांघरूण कोणी घालावयाचे? कोणाच्या तोंडाकडे त्याने बघावे, कोणाकडे जावे? जसे मूल, तसाच पती. साऱ्या जगाने माझ्या पतीची छीः थू केली, त्याला हिडीसफिडीस केले तरी मी नाही करता कामा. मीही त्याला दुःख दिले, मीही त्याला प्रेमाचा शब्द दिला नाही, प्रेमाने जेवू घातले नाही, तर मग हे घर तरी कशाला? सारे जग लोटील, परंतु घर लोटणार नाही. घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा, घर म्हणजे प्रेम, घर म्हणजे आत्मीयता! हे घर माझ्या पतीसाठी व मुलांसाठी मी प्रेमाने भरून ठेवीन.

अशी ही भारतीय स्त्रियांची दृष्टी आहे. पती वाईट आहे, पतीशी माझे पटत नाही म्हणून भराभर जर घटस्फोट होऊ लागले, तर काय साधणार आहे? मग जगात प्रेम, त्याग या शब्दांना अर्थ तरी काय? जगात पटवून घ्यावे लागत असते. जग म्हणजे सहकार्य. जग म्हणजे तडजोड. संसार म्हणजे देवाण - घेवाण. परंतु पती सहकार्य करीत नसेल, तर मी का त्याला सोडून जाऊ? त्यागमय प्रेमाने मी त्याच्याशीच राहीन. माझ्या प्रेमाचे त्यातच बळ आहे. दुर्गुणालाही सांभाळील तेच प्रेम. मी आशेने सेवा करीन, प्रेम देईन. मनुष्य हा शेवटी किती झाले तरी ईश्वरी अंश आहे. एक दिवस माझ्या पतीतील दिव्यता प्रकट होईल. त्याच्या आत्मचंद्राला ग्रहण लागले म्हणून का मी त्याला सोडू? उलट, त्याच्याबद्दल मला अनुकंपा वाटली पाहिजे, मला वाईट वाटले पाहिजे. सारे जग त्याला हसत आहे. मीही का हसू ? नाही, नाही. माझ्या प्राणांनी मी त्याला सांभाळीन. त्याला सांभाळता सांभाळता कदाचित मला माझे बलिदानही द्यावे लागेल, काही हरकत नाही. ते बलिदान व्यर्थ जाणार नाही. माझ्या जीवनाने जे झाले नाही, ते मरणाने होईल. सिंधूच्या मरणाने सुधाकरचे डोळे उघडतील. सिंधूचे मरण फुकट नाही गेले.

जगात आपणास एकमेकांना सुधारावयाचे आहे. दगड मुलाला शिकविण्यातच गुरूची कसोटी. दगडांना जर गुरु दूर लोटील, तर तो गुरू कसला? दगड पाहून गुरूच्या प्रतिभेला पाझर फुटले पाहिजेत. येथे आपल्या कलेला खरा अवसर आहे, प्रयोगाला पूर्ण वाव आहे, असे त्याला वाटले पाहिजे. स्त्रीही पतीच्या बाबतीत असेच म्हणेल, “माझ्या नाठाळ पतीची मी गुरु होईन. त्यांना सुधारणे हेच माझे दिव्य कर्म. मी आशेने प्रयत्न करीत राहीन. "

इब्सेनचे 'पीर जिन्ट' म्हणून एक काव्यमय नाटक आहे, किंवा नाट्यमय काव्य आहे. पीर जिन्टची पत्नी रानातील एका झोपडीत त्याची वाट पाहात असते. पीर जिन्ट जगभर भटकत असतो. जगातील नानाविध अनुभव घेतो. कितीतरी वर्षांनी भारावलेला असा तो आपल्या पत्नीच्या दारात उभा राहतो. पत्नी अंधळी झालेली असते. ती चरख्यावर सूत काढीत असते. पती येईल असे आशेचे गाणे म्हणत असते.

पीर जिन्ट: हा पाहा मी आलो आहे. दमूनभागून आलो आहे. ती: या; आलात? मला वाटलेच होते तुम्ही याल. या, तुम्हांला थोपटते, माझ्या मांडीवर निजवते; तुम्हाला ओव्या म्हणते. पीर जिन्ट: तुझे माझ्यावर अजून प्रेम आहे?

ती: तुम्ही चांगलेच आहात. पीर जिन्ट: मी चांगला आहे? सारे जग मला वाईट म्हणते. मी

का तुला चांगला दिसतो?

ती: हो.

पीर जिन्ट: मी तर वाईट आहे. कोठे आहे मी चांगला ?

ती: माझ्या आशेत, माझ्या प्रेमात, माझ्या स्वप्नात तुम्ही मला चांगलेच दिसत आहात ...!

अशा स्वरूपाचा त्या पुस्तकाचा अंत आहे. “माझ्या आशेत, माझ्या प्रेमात, माझ्या स्वप्नात " हे शेवटचे शब्द आहेत. त्या शब्दांत स्त्रीचे सारे जीवन आहे. पतीकडे पाहण्याचे तिचे डोळेच निराळे असतात. ती ज्या डोळ्यांनी पाहते, त्या डोळ्यांची आपणांस कशी कल्पना येणार? कितीही दुर्वृत्त पती असो, एक दिवस तो चांगल्या रीतीने वागेल, अशी अमर आशा प्रेमळ स्त्री - हृदयात असते.

घर म्हणजे एकमेकांना माणसाळविण्याची शाळा आहे. पिसाळलेले कुत्रे असते, ते जगाला का चावते? ते कुत्रे जगाचा द्वेष करीत नसते. त्याच्या दातांत विष लसलसते, ते विष कोठे तरी ओतावे असे त्याला वाटत असते. त्याप्रमाणेच माणसाचे आहे. स्वतःचे कामक्रोध कोणावर तरी ओतावेत असे त्याला वाटत असते. ते कोठे तरी ओतले म्हणजे मग शांत होतात. हे पोटातील विष ओतण्याची जागा म्हणजे घर. पती येईल व पत्नीवर रागावेल. सासुरवाशीण मुलावर रागावेल. कोठे तरी आपल्या विकारांना प्रकट व्हावयास अवसर हवा असतो.

पत्नी म्हणते, “घरात काही करा; परंतु जगात नीट वागा. आणा सारी घाण घरात. ती काढायला मी समर्थ आहे. ओरडा माझ्यावर, रागवा माझ्यावर. तुमचा कामक्रोध होऊ दे शांत. पशुत्व माझ्या ठायी होमा. तुमचे पशुत्व होमण्याची मी पवित्र वेदी आहे. बाहेर जाल ते माणूस होऊन जा, पशुपती होऊन जा, शिव होऊन जा. " सत्स्वरूपी पतीला शिवशंकर करणारी स्त्री ही शक्ती आहे. पत्नी पतीला माणसाळविते, शांत करते, स्थिर करते, आळा घालते, संयम घालते, मर्यादा घालते.

परंतु हे सारे करावयास पत्नीच्या प्रेमात शक्तीही हवी. तिचे प्रेम दुबळे असता कामा नये. तिची सेवा शक्तिहीन असता कामा नये. एक प्रकारचे तेज व प्रखरता त्या प्रेमातही हवी. धीरोदात्तता हवी. मुळूमुळू रडणे म्हणजे प्रेम नव्हे. प्रेम रडत नाही बसत. प्रेम कर्तव्य करावयाला पदर बांधते. पती दारू पितो, नाही मी पिऊ देणार. पती सिगरेट ओढतो, नाही मी ओढू देणार; - हे मुखकमल त्या घाणेरड्या धुराने भरवायचे? ते सुंदर ओठ काळेकुट्ट करावयाचे? विडा खाऊन सारख्या पिचकाऱ्या मारतात, नाही मी घाण करू देणार. पती म्हणजे माझे ठेवणे. मी ते सांभाळीन. मलिन होऊ देणार नाही. पतीला निर्मळ ठेवण्यासाठी मला मरावे लागले तरी चालेल. पतीच्या व्यसनात मी त्याला साहाय्य नाही करणार. मी आड उभी राहीन. मी जिवंत असताना पतीकडे व्यसन कसे येईल? माझ्या जीवनाचे सुदर्शन मी आड घालून ठेवीन.

भारतीय संस्कृतीत मांडव्य ऋषीला त्याची पत्नी वेश्येकडे घेऊन जाते, अशी कथा आहे. आदर्शाची ही पराकाष्ठा होय! ह्या त्यागाची व धैर्याची कल्पना करवत नाही. पतीची इच्छा म्हणजे माझी इच्छा. त्याने शेण मागितले तरी निरहंकारपणे शेण देईन. माझे हात म्हणजे पतीचे हात. माझ्या हातून त्याला पाहिजे ते तो घेईल. माझे हात तदर्थ आहेत. मी केवळ एक किंकरी!

परंतु ह्या आदर्शाची मला कल्पना करवत नाही. भारतीय सतींचा आदर्श दुबळा नसावा असे मला वाटते. वरच्या उदाहरणातील आदर्श दुबळा आहे असे माझ्याने म्हणवत नाही. पतीबरोबर चढेन किंवा पडेन, जेथे राती तेथे मी, जेथे त्याची इच्छा तेथे मी. ह्या आदर्शासमोर माझे डोळे मिटून जातात; मला घेरी येते!

सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात, त्यांतील हाही एक असू शकेल. परंतु हा दुस्तर आहे. भारतीय स्त्रीचा हा सर्वमान्य आदर्श होऊ शकणार नाही. भारतीय स्त्रियांचा आदर्श आज दुबळा झाला आहे! तो प्रखर व्हावा एवढेच मला म्हणावेसे वाटते. घटस्फोटाचा कायदा झाला तर मी त्याला नावे ठेवणार नाही. परंतु प्रेम, त्याग, सहकार्य, सुधारणा या शब्दांना काही अर्थ उरावा असे जर वाटत असेल, तर पतिपत्नींनी एकमेकांचा कालत्रयी, कोणत्याही परिस्थितीत त्याग करणे हेच मला श्रेयस्कर वाटते. यातच माणुसकी आहे. यात माणसाची दिव्यता आहे.

भारतीय स्त्रियांच्या व्रतातील दुबळेपणा जाऊन प्रखरपणा यावा, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेम-वृत्तीत विशालता यावी. स्त्रियांचे प्रेम खोल असते, परंतु लांबरुंद नसते. त्यांच्या दृष्टीची मर्यादा फारच संकुचित आसते. कुटुंबापलीकडे त्यांचे फारसे लक्ष नसते; आणि यामुळेच स्त्रिया भांडणाला कारण, असे कुटुंबात म्हणतात. स्त्रियांचे क्षितिज मोठे झाले पाहिजे. आजूबाजूच्या जगाचा विचार त्यांना असला पाहिजे. जगातील सुखदुःखाची कल्पना त्यांना हवी. भेदभाव कमी करायला हवा. पती व आपली मुलेबाळे यांच्यापलीकडे जग नाही, असे त्यांना वाटता कामा नये.

वकिलाच्या पत्नीला वाटेल की, “आपण सुखी आहोत. आपला पती पुष्कळ पैसे मिळवितो. आपल्या मुलांबाळांना कपडे आहेत. त्यांना नीट शिकता येते. रहायला सुंदर बंगला; लावायला फोनो, घरात गडीप्रमाणे, सारे काही आहे."

परंतु तिने दृष्टी विशाल केली पाहिजे. “हे पैसे कोठून येतात? माझा पती खोटेनाटे नाही ना करीत? शेतकऱ्यांची भांडणे तोडण्याऐवजी ती कशी वाढतील असे तर नाही बघत? पती माझ्या अंगाखांद्यावर दागिने घालीत आहे. माझ्यासाठी रेशमी लुगडी आणीत आहे. परंतु ह्या वैभवासाठी तिकडे कोणी उघडे तर नाही ना पडत ?” असा विचार स्त्रीने केला पाहिजे.

व्यापाऱ्याच्या पत्नीने असेच मनात विचारले पाहिजे, “माझा पती गरिबांस छळीत नाही? गरिबांची मुलेबाळे उपाशी तर नाहीत ना? फाजील फायदा नाही ना घेत? फाजील व्याज नाही ना घेत? परदेशी मालाचा व्यापार नाही ना करीत?"

सरकारी नोकराच्या पत्नीने म्हटले पाहिजे, “माझा पती लाचलुचपत तर नाही ना घेत ? कोठून येतात हे पैसे? कोठून येते हे तूप, हा भाजीपाला ? माझा पती अन्यायाने तर नाही ना वागत? अन्यायी कायद्याची तर अंमलबजावणी नाही ना करीत? नीट जनतेचे खरे हितच करीत आहे ना?"

भारतीय स्त्रिया असे प्रश्न स्वतःच्या मनास कधीही विचारीत नाहीत. पती त्यांना अज्ञानाच्या अंधारात ठेवतात. परंतु पतीच्या पापात त्याही भागीदार असतात, हे त्यांनी विसरता कामा नये. माझा सावकार पती हजारो शेतकऱ्यांना रडवून मला शेलाशालू घेत आहे, माझा डॉक्टर पती गरीब भावाबहिणींपासूनही कितीतरी फी उकळून मला माझ्या महालात हसवीत आहे, माझा अधिकारी नवरा रयतेला गांजून पैसे आणीत आहे, असा विचार जर भारतीय स्त्रियांच्या हृदयात जागा झाला, तर त्या खडबडून उठतील. कारण धर्म हे भारतीय स्त्रियांचे जीवन आहे.

भारतीय स्त्रिया देवदेव करतात. परंतु आपला संसार पापावर चालला आहे; ही गोष्ट अज्ञानाने त्यांना कळत नाही. भारतीय स्त्रियांनी असे अज्ञानात नाही राहता कामा. . दृष्टी व्यापक व निर्भेळ केली पाहिजे. तरच जीवनात धर्म येईल. पती पैसे कोठून कसे आणतो ते माहीत नाही आणि दानधर्म केलेला ; देवापुढे टाकलेला; क्षेत्रात दिलेला पैसा कोठे जातो त्याचाही पत्ता नाही. घरी पती पैसे आणीत आहे तेही पापाने, व दानधर्मातील पैसेही चालले आलस्य, दंभ, पाप, व्यभिचाराकडे! ही गोष्ट स्त्रिया विचार करू लागतील तरच त्यांना कळेल. आणि मग ती रेशमी वस्त्रे त्यांचे अंग जाळतील ! ते दागिने निखारे वाटतील ! त्या माड्या नरकाप्रमाणे वाटतील ! आपल्या पतीला सन्मार्गावर आणण्याची त्या खटपट करतील.

भारतीय स्त्रिया ध्येये पाळणाऱ्या आहेत. समाजात जी जी नवीन ध्येये उत्पन्न होतील ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत. तरच ती अमर होतील. गायीचे माहात्म्य भारतात उत्पन्न झाले, स्त्रियांनी ते टिकविले. शुचिर्भूतपणाचे तत्त्व उप्पन्न झाले, त्यांनी ते पराकोटीला नेले. पातिव्रत्याचे ध्येय निघाले, त्यात पराकाष्ठा केली. दारात कोणीही येवो, त्याला मूठभर दाणे घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत. “कोणी देवही असेल रूप घेऊन आलेला!” असे त्या म्हणतील. एकीकडे शुचिर्भूतपणाच्या ध्येयामुळे सोवळेपणाची कमाल, तर दुसरीकडे देव सर्वत्र आहे या तत्त्वाचा - कोणीही दारात येवो त्याला मूठभर द्या, असे म्हणण्यात प्रत्यक्ष आचार. एकादशी वगैरे उपवास त्यांनीच ठेविले आहेत. नदीवर स्नानास जाणे, यात्रा करणे यांची त्यांनाच हौस असते.

स्त्रिया ध्येये कदाचित निर्माण करणार नाहीत, परंतु ती निर्माण झाली की त्यांना मरुही देणार नाहीत. ज्याप्रमाणे पुरुष बाहेरून धान्य वगैरे माल आणतो, परंतु घरात तो सांभाळणे, तो सांडू न देणे, घाण होऊ न देणे हे स्त्रियांचे काम असते, त्याप्रमाणे समाजात जी जी ध्येये निर्माण होतील ती ती मरू न देणे हे स्त्रियांचे काम असते. मुले आजारी पडली तर सांभाळणे हे मुख्यत्वे त्यांचेच काम; तद्वत ध्येयबाळेही सुरक्षित ठेवणे हे त्यांचेच काम.

पुरुष पोटच्या पोरांची उपेक्षा करील, परंतु स्त्री करणार नाही. त्याप्रमाणेच पुरुषांनी केलेली ध्येये पुरुष सोडू पाहील, परंतु स्त्री सोडणार नाही. श्रियाळ राजा आयत्या वेळेस अतिथीबरोबर जेवावयास कुरकुरतो. त्याला धैर्य होत नाही. परंतु पतीचा हात धरून चांगुणा त्याला बसविते. ती ध्येयबाळाला मरू देणार नाही..

भारतीय स्त्रियांचा हा महान विशेष आहे. आणि तो लक्षात घेतला पाहिजे. जी जी नवीन ध्येये आज उत्पन्न होत आहेत ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत, तरच ती टिकतील. हरिजनसेवा, ग्रामोद्योग, खादी, स्वदेशी इत्यादी नवीन व्रते, हा नवीन दयामय व प्रेममय धर्म, हा सेवाधर्म त्यांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. स्त्रियांच्या धर्मबुद्धीला जागृत करा. हा नवधर्म त्यांना पटवा, की तो राष्ट्राचा झाला. स्त्रियांच्या पेटीत जे जाईल ते नष्ट होणार नाही.

म्हणून माता या दृष्टीनेच भारतीय स्त्रियांचा अपार महिमा. त्या सांभाळणाऱ्या आहेत. मुले सांभाळणाऱ्या, पतीला सांभाळणाऱ्या, ध्येयांना सांभाळणाऱ्या! त्या कोणाला मरू देणार नाहीत. त्या सर्वांना प्रेम देतील, आशीर्वाद देतील, सेवा देतील. ईश्वराचेच रूप ! ईश्वराला भक्तांनी माता हाच शब्द योजिला आहे. कारण ईश्वराचेच जे हे सांभाळण्याचे मुख्य कर्म, सर्वांवर पांघरूण घालण्याचे कर्म ते या जगात माता करीत असतात. ईश्वराला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही - अन्वर्थक हाक नाही ! ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणती वस्तू असेल तर ही माता होय.

म्हणून भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. उपनिषदांतील आचार्य ऐहिक देवतांची नावे सांगताना, प्रत्यक्ष संसारातील देवतांची नावे सांगताना प्रथम 'मातृदेवो भव' असे सांगतो. आधी माता, मग पिता पति-पत्नींमध्ये आधी पती आहे. परंतु आई-बापांमध्ये आधी आई आहे! पतीला पिता व्हावयाचे `आहे, पत्नीला माता व्हावयाचे आहे. आणि या दोन स्वरूपांत माता हे उदात्ततर, श्रेष्ठतर स्वरूप होय.

म्हणून शेवटी भारतीय संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालणे म्हणजे म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे होय. आईबापांची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. “न मातुः परदैवतम्” – आईविना दैवत नाही. आईचे ऋण कधी फिटत नाही.

विठ्ठल म्हणजे आई, भारत म्हणजे आई, गाय म्हणजे आई ! भारतवर्षात सर्वत्र मातेचा महिमा आहे. आईला आधी वंदन. कोणताही मंगल विधी असो, आधी आईचा आशीर्वाद, तिला नमस्कार.

पतीचे सहस्त्र अपराध पोटात घालून त्यालाही सांभाळणारी, आपल्या मुलाबाळांना सांभाळणारी, आणि भारतीय ध्येय सांभाळणारी, अशी जी ही भारतीय माता – तिला अनंत प्रणाम! - आणि पतीबरोबर चितेवर हसत चढणारी सती किंवा पतिनिधनोत्तर त्याचे चिंतन करीत वैराग्याने व्रतमय जीवन कंठणारी गतभर्तृका ! या दोन वस्तूंचे कोण वर्णन करील? भारतातील सतीची वृंदावने लग्न म्हणजे काय यावरची मूक प्रवचने आहेत. ही वृंदावने भारतास पावित्र्य देत आहेत. ठिकठिकाणी हे यज्ञमय इतिहास लिहिलेले आहेत.

आणि गतधवा ? गतधवा नारी म्हणजे क्षणोक्षणीचे चितारोहण! भारतीय बालविधवा म्हणजे करुण-करुण कथा आहे. आजूबाजूच्या विलासी जगात तिला विरक्त राहावयाचे असते. प्रत्येक क्षण म्हणजे कसोटी ! मंगल वाद्ये तिच्या कानांवर येतात. मंगल समारंभ होत असतात. कोठे विवाह आहे; कोठे डोहाळेजेवण आहे, कोठे ओटीभरण आहे; कोठे बारसे आहे; परंतु तिला सारे समारंभ वर्ज्य ! कोपऱ्यात गळा कापलेली ही कोकिळा बसलेली असते! व्रते-वैकल्ये तिच्यावर लादण्यात येतात. सारे विधिनिषेध तिच्यासाठी. सारे संयम तिच्यासाठी.

अशा आगीतून ती दिव्य तेजाने बाहेर पडते. बाळकृष्णाशी बोलते. त्याला नटवते. त्याला नैवेद्य देते. देव हे तिचे मूल. देवाची ती माता होते. ती यशोदा होते, परंतु या यशोदेला अपयशी समजण्यात येते! तिचे दर्शन नको! जिच्या पायाचे तीर्थ घेऊन सारे गाद्यांवरचे संत उद्धरत जातील, तिला हे सारे गादीमहाराज अशुभ समझत असतात!

सर्वांची सेवा हे तिचे काम. कोणाची बाळंतपणे करील, कोणाचे स्वयंपाक करील. कोठे कुटुंबात अडले की तिकडे झाली तिची पाठवणी. तिला मोकळीक नाही, गंमत नाही, आनंद नाही. जगातील सारे अपमान सोसून जगाचे भले चिंतणे हे तिचे ध्येय असते.

भगवान शंकर हलाहल पिऊन जगाचे कल्याण करतात. तसेच गतधवेचे आहे. ती निंदा, अपमान, शिव्याशाप यांचे विष मुकाट्याने पीत असते. आणि पुन्हा सेवेस सिद्ध !

आदर्श विधवा जगाची गुरू आहे! ती संयम व सेवा यांची मूर्ती

आहे. स्वतःचे दुःख गिळून जगासाठी झटणारी ती देवता आहे. भारतीय संस्कृतीत हा महान आदर्श आहे. अशा दिव्य देवतेसमोर सतरांदा लग्न करणारे पुरुष सूकरासारखे वाटतात.

स्त्रीजातीची धन्यता वाटते.

आदर्श उच्च असावा. परंतु ज्याला तो झेपत नसेल त्याला तो देण्यात अर्थ नाही. श्रीकृष्ण मारूनमुटकून अर्जुनाला संन्यासी करू इच्छीत नाही. बालविधवांना तर आईबापांनी कुमारिका समजूनच त्यांचे पुन्हा विवाह लावून द्यावेत. परंतु यातही त्यांना स्वातंत्र्य असावे. स्त्रीजातीचे उदात्त ध्येय त्यांना पूजावयाचे असेल तर मोकळीक असावी. परंतु फार उंच उंच ध्येय पकडावयाला गेल्यामुळे पडण्याचा संभव असतो. त्यापेक्षा जरा खालचे ध्येय घेऊन तेथे नीट पाय रोवून राहणे अधिक श्रेयस्कर आहे.

भारतीय स्त्रियांच्या पावित्र्याची, संयमाची, वैराग्याची धन्य आहे! भारतात आज शेकडो वर्षे ओतलेले हे वैराग्य व्यर्थ का जाईल? भारतीयांच्या उज्ज्वल भवितव्यास त्यापासून खत नाही का मिळणार? भारतीय सतींनो ! तुमचा दिव्य महिमा वर्णावयास मला शक्ती नाही. तुमची चित्रे माझ्या अंतश्चक्षूंसमोर मी आणतो व तुमचे पाय भक्तीच्या अश्रुजलाने धुतो. दुसरे मी क्षुद्र पामर काय करणार?

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा