shabd-logo

बुद्धीचा महिमा

3 June 2023

105 पाहिले 105
भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे.

वेद किती आहेत? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही, एकच पैगंबर नाही, एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.

जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील, हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे, ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पडावा, ते गांधर्ववेद सांगेल. हे सारे वेदच आहेत.

काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वांआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही, ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितान्त आदर आहे.

भारतीय संस्कृती एकाच काळी सारे ऋषी झाले असे कधीही मानणार नाही. असे म्हणणे अहंकार आहे. तो परमेश्वराचा अपमान आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही जरूरच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकावयाची, एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधावयास काही जर शिल्लकच नसेल, तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही.

नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणांस मिळते. युरेनस व नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, ते आता दिसू लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात, त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरे पाहिले तर इतर सर्व शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ह्या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरले नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत, संशयातीत अशी काही तत्त्वे आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी दोन नि दोन चार यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असे एकही तत्त्व निःशंकपणे अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे, यांची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत.

असे असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचा आग्रह धरीत नाही. “बुद्धेः फलमनाग्रहः " - कोणत्याही तत्त्वाचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णांनी शेवटी अर्जुनाला " यथेच्छसि तथा कुरु” असे सांगून त्याच्या बुद्धीला महत्त्व दिले. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणे, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणे. “अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे” असे भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयातील बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. “मनःपूतं समाचरेत्” या वचनाचा अर्थ हाच. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तमुक तत्त्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस.

वेद अपौरुषेय आहेत वगैरे सर्व कल्पना भ्रामक आहेत. मानवी बुद्धींचा हा सारा पसारा आहे. वेदाला मानणे म्हणजे बुद्धीला मानणे. वेदातील सर्वांत पवित्र मंत्र म्हणजे गायत्रीमंत्र. या गायत्रीमंत्राला एवढे महत्त्व का? या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात एवढे काय आहे? या मंत्रात बुद्धीची निर्मळता मागितली आहे.

“त्या तेजस्वी प्रेरणा देणाऱ्या सूर्याच्या परमश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. तो सूर्य आमच्या बुद्धीस चालना देवो !” विश्वामित्र ऋषीने देवाजवळ आपल्या समाजासाठी निर्मळ बुद्धीची देणगी मागितली. वेदांमध्ये गायी दे, पुत्र दे, यश दे, इत्यादी शेकडो याचना देवाजवळ केलेल्या आहेत. परंतु त्या सर्व मत्रांपेक्षा हा लहान मंत्र परमश्रेष्ठ ठरला. यावरून भारतीय पूर्वज कोणत्या वस्तूला सर्वांत अधिक महत्त्व देत होते ते दिसून येईल.

मनूने एके ठिकाणी स्वच्छ सांगितले आहे की, “माझे म्हणणे तर्कास पटत असेल तर घ्या; नाही तर फेकून द्या.” शंकराचार्य म्हणतात, “शेकडो श्रुती येऊन अग्नी थंड आहे म्हणून सांगू लागल्या तरी त्याला कोण महत्त्व देईल?” तर्काच्या कसोटीवर घासून घासून जे शंभर नंबरी असेल, तेच ज्ञानधन पूज्य माना, असे ते प्राचीन कवी सांगत आहेत.

महाभारतात “कोऽयं धर्मः कुतो धर्मः” असा भीष्माला प्रश्न करण्यात आलेला आहे. हा धर्म कोठून येतो? हा धर्म का ईश्वर कानात येऊन सांगतो? भीष्मांनी सांगितले की, विचारवंत लोक चिंतन करून, अभ्यास करून हा धर्म निर्माण करतात. “मतिभिरुद्धृतम्।” आपापल्या मतींनी ते तत्त्वे शोधून काढतात. वेदधर्म म्हणजे विचारधर्म वेदधर्म म्हणजे बुद्धिप्रधान धर्म. श्रुतीचे श्रृतीला पटत नाही, स्मृतीचे स्मृतीला जुळत नाही, एका ऋषीचे दुसऱ्या ऋषीला सम्मत नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की, प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करी. त्याच्या त्याच्या काळात जी परिस्थिती असे, त्याप्रमाणे तो विचार करी. ऋषी अंधळे नव्हते, ते पोपट नव्हते. ते तेजस्वी गायत्री मंत्राची उपासना करणारे होते. पदोपदी ते फरक करीत. 'बाबावाक्यं प्रमाणम्' ची त्यांना अपार चीड येई. ते चर्चा करीत. बैठका भरवीत . ज्ञानाचा शांतपणे खल करीत.

प्राचीन काळात सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्यांच्या नुसत्या निरुक्तात पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टींच्या शेकडो मंडळांची नाबे त्यात आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिकाः अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेकडो पंथ, शेकडो सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. प्रांजलपणे वाद करीत आहेत, पटले तर घेत आहेत, त्याप्रमाणे वागू लागत आहेत, असा तो देखावा दिसतो. नि:शंकपणे व निर्भयपणे विचारांची मांडणी करण्यात येत असे. त्या चर्चा ऐकावयास लोक जमत असत. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टी परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडो मते होती; परंतु कोणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणाऱ्यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे.

ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेच्या तपे देत. उपनिषदांत अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनात गढून जात, ते आले आहे. ज्ञान मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठी नम्रपणे जाई. ज्ञान कोठेही असो, ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाची दृष्टी हवी. देवांचा कच दैत्यांच्या गुरूकडेही जाईल आणि दैत्यांच्या गुरूही शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु-मित्र नाही.

नचिकेता प्रत्यक्ष मृत्यूजवळही ज्ञानाचीच भिक्षा मागता झाला; याच्याहून ज्ञानाची थोरवी आणखी कोणती असावी? ज्ञानासाठी मृत्यूजवळही जावे लागेल ! ज्ञानाला कशाची भीती नाही. ज्ञान मिळवू पाहणारा साऱ्या त्रिखंडात जाईल व त्यासाठी वाटेल तो त्याग करावयास तयार होईल.

समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्यतर दुसरे काय आहे? चिंतन करून आपणास जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये.

ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्या त्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य निःस्वार्थपणे कसा धडपडतो आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरेतिसरे काहीच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनात ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहीत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ.” “व्याजिघ्रति स व्याघ्रः ". पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकले! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काही विसरून जातो. त्याच त्या विचारांशी तो तन्मय होतो. त्याची जणू समाधी लागते. समाधी म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधी म्हणजे ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण ! समाधी म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे.

ज्ञानाचा प्रांत कोणताही असो, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचे टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो, तोच ऋषी. ज्याची पैशावर किंवा सुखावर दृष्टी असते, तो अशा फंदात कधी पडणार नाही. तपस्वीच ज्ञान देतात. ज्ञान देतात. ज्ञान असो वा विज्ञान असो, ते सिद्ध करण्यासाठी, जीवनात आणण्यासाठी महात्मेच मरतात. ज्ञानोपासक सारखा पुढे जाईल. ज्ञानदेवाचे दर्शन घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. जीवनाच्या नानाविध क्षेत्रांत अपार संशोधनास वाव आहे. भारतीय संस्कृती त्या त्या संशोधकाचा सन्मान करावयास उभी आहे. ज्ञानसंशोधनात खाणेपिणे विसरणारा न्यूटन हा ऋषीच होता. पन्नास वर्षे अध्ययन करून, विचार करून नवदृष्टी देणारा कार्ल मार्क्स हा महर्षीच आहे. जगाच्या विचारात क्रांती घडविणारा चार्ल्स डार्विन याला ऋषी कोण म्हणणार नाही? इंग्लंडमधील एका झोपडीत राहून सहकार्याने नवीन नवीन मार्ग जगाला दाखविण्यासाठी धडपडणारा तो हद्दपार झालेला थोर क्रॉपोट्किन्-त्याला ऋषी म्हणावयाचे नाही तर कोणाला?

भारतीय संस्कृती या सर्वांची पूजा करील. रवीन्द्रनाथ टागोरांनी जगातील ऋषींची भारत आपलेपणाने पूजा करतो, हे विश्वभारती विद्यापीठ काढून दाखविले आहे. जगातील महान आचार्यांना ते तेथे बोलावून घेत होते व त्यांचा सन्मान करीत होते. रवीन्द्रनाथ भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखीत होते. भारतीय संस्कृतीचे ते खरे उपासक होते.

भारतीय संस्कृतीत ज्ञानाला कधी विरोध नव्हता. अगदी क्रांतिकारक मत मांडणाऱ्यांचाही तेथे गौरव होई. ते मत ऐकिले जाई. त्या मताच्या पाठीमागे किती तळमळ, किती व्यापकता, केवढा अनुभव, किती चिन्तन आहे हे पाहण्यात येई. त्या त्या मतासाठी मतस्थापक किती त्याग करावयास तयार आहे हे पाहण्यात येई. भारतीय संस्कृती प्रत्येक नवीन मत पटकन उचली असे नाही. प्रत्येक मतास वाव असे. सत्य असेल तर काळाच्या ओघात टिकेल. असत्य असेल तर अदृश्य होईल.

परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान, असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? 'ज्ञानम् ब्रह्म' ज्ञान म्हणजे ब्रह्म ज्ञान म्हणजेच परमेश्वर, ईश्वराची

याच्याहून थोर व्याख्या जगाला कोणीही दिली नाही. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे, ज्ञानाची उपासना अनंत रूपांनी करणे. समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल असो, इतिहास असो, आयुर्वेद असो, तत्त्वज्ञान असो, योग असो, कर्मयोग असो, गणित असो, संगीत असो, ती ती ज्ञानस्वरूप परमेश्वराचीच पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. महाभारतातील श्लोकांइतकीच गणितातील प्रमेयेही पूज्य आहेत. श्रुति - स्मृतींच्या अभ्यासाइतकेच सृष्टिशास्त्राचे अध्ययन पवित्र आहे. सनातन धर्मातील ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलली पाहिजे. परमोच्च बौद्धिक विकासाची ज्वाळा पुन्हा पेटविली पाहिजे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजाने नटेल. आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले - कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहात आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ-सनातनी आहेत.

सनातन या शब्दाचा अर्थच काय ? “ सनातनो नित्य नूतनः । ” जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात:

"हैं नित्यनूतन देखिजे । गीतातत्त्व ।।"

गीतेतील शब्दांचे अर्थ निरनिराळे दिसू लागतील. कारण त्या शब्दांकडे आज विसाव्या शतकातील परिस्थितीतून आपण पाहणार. अर्थाचा विकास होत असतो. शब्द लहान असतो, परंतु त्यातील अर्थ अनन्त आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते.

भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वाऱ्याने पडेल, अशी का या संस्कृतिरक्षकांना भीती वाटते? या नवीन विचारांच्या वाऱ्यांनी जर ती पडण्यासारखी असेल, तर ती टिकण्यात तरी अर्थ काय? जर आलेली वाऱ्याची झुळूक ज्याला सहन होत नाही, तो क्षयी लवकरच मरणार, असाच नाही का ध्वनी निघत ? भारतीय संस्कृती का अशी लेचीपेची आहे ? आमच्या दृष्टीने ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर ज्या संस्कृतीचा पाया रचला आहे, त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्लेकोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातील बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीस नको आहे. नवीन विचारांचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. जगातील कोणतीही अनुभवाच्या कसोटीस उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा; भारतीय संस्कृतीचा तिच्याशी विरोध नाही.

जगातील प्रयोगाचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले, तर त्यांत श्रीकृष्णाचे बालचरित्र भारतीय संस्कृतीस दिसेल. गोकुळातील लोणी चोरणार श्रीकृष्ण, सर्व पददलितांची बाजू घेणारा श्रीकृष्ण, सर्व साम्राज्ये धुळीस मिळविणारा श्रीकृष्ण, त्याचेच दर्शन साम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखणाऱ्यास होईल. “सत्याअसत्यासी मन केले ग्वाही" असे म्हणणाऱ्या तुकारामाचेच दर्शन, 'स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करा' असे सांगणाऱ्या ध्येयवादी नवविचारवंतांत खऱ्या संस्कृतीच्या उपासकाला घडेल ! भारतीय संस्कृतीस भीती, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही; आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे.

भारतीय संस्कृती प्रत्येक पाऊल बुद्धिपूर्वक टाकावयास सांगत आहे. “दृष्टिपूतं न्यसेत्पादम् वस्त्रपूतं पिबेज्जलम् !” विचार करून वागा, पाहून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते की विचार सर्वत्र घेऊन जा. धर्म म्हणजे काय ? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी सात वाजता स्नान करून संध्या करणे, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे चोवीस तास होणारी कर्मे. जन्मभर होणारी कर्मे धर्म का देवघरापुरता असतो? धर्म सर्वत्र आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे पाहिजे, त्याप्रमाणे धर्म सर्वत्र हवा. तुम्ही विधिमंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कोठेही जा, जे जे कर्म कराल ते ते धर्ममय पाहिजे.

धर्ममय पाहिजे म्हणजे वेदमय पाहिजे, विचारमय पाहिजे. याचाच अर्थं प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा. परंतु बुद्धी शुद्ध व्हावयास हृदयाची जरूर असते. हृदय व बुद्धी यांच्या एकतानतेतून जो महाविचार निर्माण होईल तो धर्म होय! अशी एकतानता ज्याची होते; त्यालाच आपण धर्मस्थापक म्हणतो. समर्थांनी एकच धर्मस्थापक सांगितला नाही.

"धर्मस्थापनेचे नर | झाले आहेत, पुढे होणार"

त्या त्या काळातील परिस्थितीचा खोल विचार करून, त्या त्या काळातील बहुजनसमाजाच्या सुखदुःखांचा एकरूपतेने विचार करून, महापुरुष त्या त्या काळातील युगधर्म देत असतो. त्या त्या काळाला नवीन दृष्टी देतो, नवीन विचार देतो. अशा रीतीने धर्म वाढत जातो.

भारतीय धर्म हा वर्धिष्णू धर्म आहे. नवीन नवीन तो घेईल व पुढे जाईल. नवीन नवीन क्षेत्रांत घुसेल. सारे ज्ञान आपलेसे करून समाजाचे धारण करू पाहील. विचाराशिवाय समाजाची धारण कसे होणार? ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील? मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणाऱ्या सूर्याला धरावयाला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणाऱ्या भव्य, दिव्य, नव्य विचारांना कवटाळू पाहील. भारतीय संस्कृती ही स्थाणूंची स्थाणुसंस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधी थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शने घ्यावयास भारतीय आत्मा तडफडेल. सत्याचा संशोधक " आता बस झाले” असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. आज महात्मा गांधीच पाहा. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत! राजकारणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग त्यांनी चालविलेच आहेत. उद्योगधंद्यांची गोष्ट घ्या, त्यातही ते शिरतीलच. राष्ट्रीय शिक्षण असो, राष्ट्रभाषा असो, समाजसुधारणा असो, धार्मिक प्रश्न असो, आरोग्य असो, खाण्यापिण्याचे प्रयोग असोत, ब्रह्मचर्यादी मानसिक प्रश्न असोत, प्रत्येक क्षेत्रात ते शिरतील. ते बुद्धीचे उपासक आहेत. शुद्ध हृदयाची शुद्ध बुदीला जोड देऊन ते प्रयोग करीत असतात. खऱ्या सनातनी वेदधर्माचे ते खरे अनुयायी आहेत.

बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जुने लोक कलियुग, कलियुग म्हणतात. नवीन लोक यंत्रयुग, यंत्रयुग म्हणतात. गांधी म्हणतील, “मी माझे युग निर्माण करीन. मी चरख्याचे युग आणीन. ग्रामोद्योगाचे युग आणीन.” बुद्धिमान मनुष्य री ओढीत बसणार नाही. तो स्वतःच्या विचारांचे युग आपल्याभोवती

निर्माण करू पाहतो.

जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात! परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा. आणि स्वतःच्या समाजाला काय हितकर ते बघा.

सत्याची तहान या सत्यकामाच्या भूमीत आज उत्पन्न झाली आहे की नाही? मानवजातीने जे जे उद्योग सुरू केले आहेत, जे जे विचारप्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सर्व ठिकाणी आपण गेले पाहिजे. यंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, कला, रसायन, व्यायाम, क्रीडांगण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सर्व सत्याच्या साक्षात्कारांच्या क्षेत्रांत न थकता, न दमता पुढे घुसणारे लोक भारतीय संस्कृतीच्या उपासकांत निर्माण झाले पाहिजेत. सहकारी चळवळी असोत, मजुरांची संघटना असो, शेती सुधारणे असो, नवीन उद्योगधंदे सुरू करणे असो, सर्वत्र आपण गेले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. प्रयोग केले पाहिजेत. हीच परमेश्वराची पूजा. देवाने दिलेले वाढविणे म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करणे म्हणजेच खरा धर्म.

त्या त्या काळातील प्रश्न त्या त्या विचारवंतांना सोडवावयाचे असतात. अर्वाचीन बुद्धीसमोर अर्वाचीन प्रश्न आहेत. भारतीय संस्कृतीत ही हिम्मत नाही का? जगातील राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क वेद घोकून मिळणार नाही, पूर्वजांची स्तुतिस्तोत्रे गाऊन मिळणार नाही. नवीन प्रश्नांस आपण हात घातला पाहिजे. प्रयोगालये म्हणजे होमशाळा काढल्या पाहिजेत. होऊ देत सुरू प्रयोग-सत्यदेवाचे सर्वांगीण स्वरूप समजून घेण्याचे प्रयोग!

आता कोठेही अडता कामा नये. आपले घोडे सर्वत्र दौडत जाऊ देत. ग्रामसंघटन, खादीशास्त्र, समाजशास्त्र, नवनीतिवाद, कोणतेही क्षेत्र असो; त्या त्या विषयात घुसू व नवीन ज्ञान निर्मू. ठिकठिकाणी संग्रहालये, प्रयोगालये, ग्रंथालये स्थापू, बौद्धिक व वैचारिक सहकार्य मिळवू. ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे. प्रत्येक विचार हा सहकार्यातून निर्माण झाला आहे. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहात असतो. गांधी टिळकांच्या कल्पनांचा विकास करतील. जवाहरलाल गांधींना पुढे नेतील. ज्ञानाच्या प्रत्येक प्रांतात अशी स्थिती आहे. तेथे अहंकार नाही, नम्र व निष्ठापूर्वक ज्ञानेश्वराची पूजा आहे.

भारतीय संस्कृती सांगत आहे, “माझ्या मुलांनो! जगात ज्ञानासाठी जीवनेच्या जीवने देणारे शेकडो लोक निर्माण होतात. येथेही विचारपूजा सुरू होऊ देत.”

विचार तलवारीपेक्षा प्रखर आहे. विचार नवजीवन देतो. “वन्हि तो पेटवावा रे।” विचारांचा वन्ही पुन्हा प्रखरतेने पेटविल्याशिवाय कश्मले जळून जाणार नाहीत.

भारतात आज क्रान्तीचा समय आलेला आहे. ही क्रांती केवळ राजकीय नाही. ही शतमुखी क्रांती आहे. सारा संसार धांडुळावयाचा आहे. साऱ्या कल्पना पारखून घ्यावयाच्या आहेत. नवीन काळ, नवीन दृष्टी! मजुराला पोटभर घास कसा मिळेल हे पाहणे म्हणजे आज महान धर्म आहे. राष्ट्राच्या एखाद्या नवीन उद्योगात रात्रंदिवस गढून जाणे म्हणजे संन्यासी होणे आहे.

निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची आज नितान्त आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उताविळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची जरूर आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची जरूर आहे. समाजाला सुखी कसे करता येईल, ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागाल. मग जो विचार स्फुरेल त्याचा आचार सुरू होईल; आणि या विचाराला व आचाराला 'युगधर्म' असे नाव दिले जाईल.


24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
23
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
13
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
10
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
5
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
3
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
1
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
1
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा