shabd-logo

मूर्तिपूजा

6 June 2023

7 पाहिले 7
भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे. मूर्तिपूजेचा जितका जितका विचार करावा, लागतो. तितका तितका तिच्यातील भाव खोल असा वाटू

मनुष्यप्राणी हा विभूतिपूजक आहे. आपणांमध्ये ही प्रवृत्ती स्वयंभूच आहे. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे कौतुक आपण करतो. आपल्याहून जे थोर आहेत - बुद्धीने, हृदयाने महान आहेत- त्यांची पूजा करावी असे वाटते. ही महान विभूतीची पूजा करण्याची वृत्ती जर आपणांत नसती, तर आपला विकास होता ना. विभूतिपूजा हे विकासाचे प्रभावी साधन आहे.

मूर्ती म्हणजे आकार. मूर्तिपूजा म्हणजे आकारपूजा, प्रत्यक्ष पूजा. आपल्या डोळ्यांसमोर काही तरी प्रत्यक्ष आपणास लागत असते. आपण जीवनाच्या प्रथमावस्थेत सारे आकारपूजक असतो. आपण व्यक्तीभोवती जमतो. व्यक्तीशिवाय आपले चालत नाही. जिचे डोळ्यांनी दर्शन घेऊ, जिचे शब्द कानांनी ऐकू, जिचे पाय हातांनी धरू, अशी मूर्ती आपणांस पाहिजे असते. म्हणूनच

बौद्धधर्मात तीन साधकावस्था सांगितल्या आहेत:
 बुद्धं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
 धम्मं शरणं गच्छामि

या तीन स्थितींतून मनुष्याला जावे लागते. मनुष्य प्रथम महान व्यक्तीला शरण जातो. कोणी महात्माजींच्याभोवती जमतील, कोणी अरविंदांच्या चरणांजवळ जातील. कोणी रवीन्द्रनाथांच्या विश्वभारतीत शिरतील. अशा रीतीने मनुष्य विकासाकडे जाऊ बघतो.

परंतु व्यक्ती ही क्षणभंगुर आहे. आज ना उद्या व्यक्तीला पडद्याआड जावयाचे आहे. ज्या महापुरुषाच्या शरीरावर आपण प्रेम केले, ते शरीर एक दिवस गळून पडते. ते प्रेमळ डोळे मिटतात. ते सुधा स्त्रवणारे मुख बंद पडते. ते आशीर्वाद देणारे हात थंडगार पडतात.

ज्या विभूतीच्या चरणांशी आपण बसलो, ती विभूती अदृश्य होते. परंतु त्या विभूतीचा बाह्य आकार हा महत्त्वाचा नाही. त्या आकारातून जे दिव्य बाहेर पडत होते ते महत्त्वाचे होते. ते तत्त्व काय होते? ते तत्त्व कसे होते?

त्या महापुरुषाभोवती जमलेले सारे एकत्र बसतात. त्यांचा भ्रातृसंघ होतो. एका गुरूचे ते शिष्य. गुरूच्या उपदेशाचे ते अनुकरण करू पाहतात. परंतु गुरूच्या उपदेशाबद्दल त्यांच्यात मतभेद होतात. तो भ्रातृसंघ टिकत नाही. त्याच्या शाखा होतात. निरनिराळे पंथ होतात. अशा वेळेस काय करावयाचे?

व्यक्ती गेली. संघ गेला. आता काय राहिले? धर्म राहिला. माझा गुरू ज्यासाठी जगला व मेला असे मला वाटते, त्या धर्माला मी शरण जातो. त्या महाविभूतीचे जे जे तत्त्वज्ञान मला वाटते, त्या तत्त्वज्ञानाची मी पूजा करू लागतो. माझ्या दृष्टीने त्या महापुरुषाचे जे स्वरूप मला वाटते, त्या स्वरूपाची मी उपासना करू लागतो.

व्यक्तिपूजेपासून आपण आरंभ करतो व तत्त्वपूजेत त्या आरंभाचे पर्यवसान होते. मूर्तापासून निघून अमूर्ताकडे जात असतो. मूर्तिपूजेची ही मर्यादा आपण ओळखली पाहिजे. शेवटी कधी तरी व्यक्तातून अव्यक्ताकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, आकारातून आन्तरिक तत्त्वाकडे आपणांस गेल्यावाचून गत्यंतर नाही.

आपण मंगलमूर्तीची पूजा करतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी

आपण गणरायाची मूर्ती आणतो. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

करतो. परंतु दोन दिवस, चार दिवस, दहा दिवस ठेवून मूर्तीचे आपण

विसर्जन करीत असतो. त्या मूर्तीतून अव्यक्त, अमर असा भाव

कायमचा जीवनाशी जोडून त्या मूर्तीला आपण बुडवितो. मूर्तिपूजा

हे कायमचे ध्येय नाही. केव्हा तरी मूर्तिपूजेच्या वर मला गेले पाहिजे,

हा यातील अर्थ आहे.

मानवी विकासाला मूर्तिपूजेइतकी मूर्तिभंजकता आवश्यक आहे. आपण मूर्तिपूजक असतो व मूर्तिभंजकही असतो. काल ज्या मूर्तीची मी पूजा करीत होतो, त्याच मूर्तीची पूजा आज मी करीत असेन असे नाही. माझ्या मूर्तीचा उत्तरोत्तर विकास होत असतो. जुनी मूर्ती जाऊन नवीन मूर्ती येत असते. समजा, लहानपणी मी माझ्या आईबापांची मूर्ती पूजीत होतो; परंतु मोठा झाल्यावर ही मूर्ती दूर करून मी भारतमातेची मूर्ती पुजू लागतो. लहान आईचे मोठ्या आईत पर्यवसान झाले. लहान मातेची मूर्ती सोडून मी महान मातेची मूर्ती बनवितो. मी आणखीही पुढे जातो. भारतमातेची मूर्तीही मला मग आवडत नाही. मी विश्वंभराची मूर्ती बनवून तिची पूजा करतो. सर्व मानवजातीची मूर्ती करून तिची मी उपासना करतो. जन्मदात्री माता जाऊन भारतमाता आली; भारतमाता जाऊन मानवजातीची माता आली. अशा प्रकारे उत्तरोत्तर आपण आपली मूर्तिपूजा विशाल करीत असतो.

रामाची मूर्ती मग केवळ रामाची राहात नाही. वालीला मारणारा, शंबुकाला मारणारा, असा राम डोळ्यांसमोर नसतो. रामाची मूर्ती वाढत वाढत ती जगदीश्वराची मूर्ती होते. अयोध्यापती राम मग विश्वव्यापी राम होतो. रामाची मानुष कल्पना नाहीशी होऊन अतिमानुष कल्पना उभी राहते.

अशा रीतीने मूर्तिपूजा ही विश्वपूजा होते. ती लहानशी मूर्ती म्हणजे अनंताची मूर्ती होते. परंतु मूर्तिपूजेतील हा विकास आपणांपैकी पुष्कळांजवळ नसतो. त्या मूर्तीतील अनंतता आपल्या अनुभवास येत नाही. देवळातून बाहेर पडल्यावर त्या मूर्तीचे भानच आपणांस राहात नाही. त्या पाषाणमयी मूर्तीची पूजा करता करता सर्वत्र प्रभूच्या मूर्ती दिसू लागण्याचा योग कधी येत नाही. देवाची मूर्ती त्या मूर्तीच्या पलीकडे जात नाही. परंतु मूर्तातून अमूर्ताकडे गेल्याशिवाय तर समाधान नाही.

लहान मुलाला आई सारखी जवळ हवी असते; ती जरा दृष्टीआड होताच मूल रडते. परंतु त्या मुलाला आईपासून दूर राहण्याची सवय करावी लागेल. आईची भावना मनात ठेवून जगात वावरावे लागेल. मूर्तातून अमूर्ताकडे जावे लागेल. त्या आकारात कोंडलेली आई त्याला विशाल करावी लागेल. आईची प्रेममयी, स्नेहमयी, ज्ञानमयी मूर्ती हृदयात निर्मावी लागेल. मग तो जेथे जाईल तेथे आई आहे.

तेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।

आपण सारे ज्या वेळेस देवळात जातो, त्या वेळेस भक्तिभाव हृदयात असतो. परमेश्वरासमोर उभे राहून आपण आपले कान उपटतो, हळूच थोबाडीत मारून घेतो, साष्टांग लोटांगण घालतो. प्रदक्षिणा घालून देवाची मूर्ती हृदयात ठसावी म्हणून प्रयत्न करतो. परंतु देवळाच्या बाहेर येताच आपला व्यवहार पूर्ववत् सुरू होतो! देवळाच्या बाहेरही जेव्हा देव आपल्याबरोबर येऊ लागेल तेव्हाच मूर्तिपूजेचे सार्थक होईल. आजकाल देवळातील देव देवळातच राहतो. तो आपण बाहेर आणीत नाही. आणि यामुळेच समाजात अपार दुःख व विषमता आहे.

घरच्या आईचे स्मरण मला सदैव हवे, त्याप्रमाणे मंदिरातील मूर्तीचे स्मरण मला सर्वत्र हवे. ती मूर्ती त्रैलोक्यी संचरणारी झाली पाहिजे. मला सर्वत्र तिचे दर्शन झाले पाहिजे.

हिंदू लोकांनी मूर्तिपूजेचा जरी असा विकास केला नसला, असा विकास करण्याकडे जरी त्यांचे लक्ष नसले, तरी इतर धर्मीयांपेक्षा अधिक विकास त्यांनी केला आहे. हिंदुधर्मापेक्षा इतर धर्मांतच मूर्तिपूजा अधिक आहे. हिंदुधर्मांतील मूर्तिपूजेपेक्षा इतर धर्मीयांची मूर्तिपूजा कमी उदार आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोकांचा क्रॉस किंवा मुस्लिमांचा काबा यांच्यातही हिंदुधर्मी मनुष्य पावित्र्य पाहील. जशी माझी शाळिग्रामाची मूर्ती तशी ही त्यांची, असे हिंदू म्हणेल. माझ्या रामाच्या त्या अडीचहाती मूर्तीबाहेर जगात कोठे पावित्र्य नाही असे हिंदू मनुष्य म्हणणार नाही; परंतु याच्या उलट, क्रॉसला पवित्र मानणारा ख्रिश्चन मनुष्य रामाच्या मूर्तीत पावित्र्य पाहू शकणार नाही. काबाला भजणारा मुसलमान हनुमंताच्या मूर्तीला पवित्र मानणार नाही. आपल्या धर्माची प्रतीके, आपल्या धर्मातील चिन्हे यांच्या पलीकडे जगात पावित्र्य असू शकेल, अशी कल्पनासुद्धा त्यांना सहन होत नाही! क्रॉस एवढेच काय ते सत्य, काबा एवढेच काय ते सत्य, असे समजतात. त्या मूर्तीच्या, त्या चिन्ह्यांच्यापलीकडे त्यांना जाता येत नाही. अशा रीतीने पाहिले म्हणजे इस्लामी मनुष्य, ख्रिश्चन मनुष्य, हेच केवळ आकारपूजक, अत्यंत संकुचित मूर्तिपूजक आहेत असे दिसून येईल. हिंदू त्या आकारांच्या पलीकडे जाऊन अन्य मूर्तीही तितक्याच पवित्र मानू शकतो.

मूर्तिपूजा कधीपासून सुरू झाली? मनुष्य जन्मल्यापासून. सूर्याची पूजा, समुद्राची पूजा, झाडांची पूजा, सर्पांची पूजा, हे पूजाप्रकार अनादी आहेत. परंतु दगडांचे आकार करून, मंदिरे करून, मूर्तिपूजा केव्हापासून रूढ झाली? बहुतेक सारे म्हणतात, की बुद्धांच्या निर्वाणानंतर ही मंदिरी मूर्तिपूजा अस्तित्वात आली. बुद्धाच्या निधनानंतर त्याचे शेकडो पुतळे तयार झाले. निरनिराळ्या संघारामांतून बुद्धाच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या. बौद्धधर्माला आत्मसात करून घेतल्यानंतर हिंदुधर्माने तीच प्रथा उचलली. शेकडो देवतांची शेकडो मंदिरे झाली.

पाषाणमय आकारांची पूजा बुद्धांपासून सुरू झाली असली, तरी मूर्तिपूजा ही सनातन आहे, हे विसरून चालणार नाही. शिल्पकलेचा विकास झाल्यावर महान विभूतींचे सदैव स्मरण राहावे, म्हणून त्यांच्या मूर्ती करण्यात येऊ लागल्या, पुतळे होऊ लागले. थोर पुरुष कसे दिसत हे समजण्याची सर्वांस उत्कंठा असते. परमेश्वरही कसा असेल याची आपण कल्पना करू लागलो. आपणांस दोन हात आहेत, त्याला चार असतील; आपणांस एक तोंड आहे, त्याला चार असतील; अशा कल्पना मनुष्य करू लागला. परंतु परमेश्वराची खरी मूर्ती कोण कल्पिणार?

नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये

सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।

सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते

सहस्रकोटीयुगधारिणे नमः ॥

हेच शेवटी स्वरूप ठरविण्यात आले. परमेश्वराची तरी कल्पना आपण कशावरून करावयाची? बायरन कवी म्हणतो, “देवा ! समुद्र हे तुझे सिंहासन आहे!” या भव्य सिंहासनावरून सिंहासनावर बसणाऱ्या राजाधिराजाची कल्पना करावयाची. सृष्टीत ज्या थोर वस्तू दिसतात त्यातून परमेश्वराच्या अपार वैभवाची आपणांस कल्पना येते. म्हणून त्या वस्तूंचीच भगवंत म्हणून आपण पूजा करतो. सागरावरून परमेश्वराच्या वैभवाची कल्पना येते. म्हणून वाटते, की सागर ही ईश्वराची एक मूर्ती आहे. सागराला पाहून आपण हात जोडतो. अनंत लाटांनी अहोरात्र उचंबळणारा, सतत गर्जना करणारा असा जो सागर त्याला प्रणाम नाही करायचा तर मग कोणाला करावयाचा?

आकाशातील सूर्य ही देवाचीच मूर्ती. ज्याच्याजवळ अंधार नाही, जो रात्रंदिवस जळत आहे, जगाला जीवन देत आहे, अशा ह्या धगधगीत तेजोगोलाच्या ठायी परमेश्वरी अंश नको मानू तर कोठे मानू?

गंगेसारख्या हजारो एक जमीन सुपीक करणाऱ्या नद्या, हिमालयासारखे गगनचुंबी बर्फाच्छादित पर्वत, आकाशाला भिडू पाहणारे प्रचंड वटवृक्ष, उदार, धीरगंभीर वनराज केसरी, भव्यदिव्य पिसारा उभारणारा तो सौन्दर्यमूर्ती मयूर, अशांच्या ठायी देवाचे वैभव नको मानू, तर कोठे मानू?

विश्वामित्राने एकशेएक मुलगे डोळ्यांदेखत ठार केले, तरीही शांती न सोडणारे भगवान वसिष्ठ, सत्यासाठी राजपद त्यागून वनात जाणारे प्रभू रामचंद्र, अंगाचे मांस करवतून देणारे मयूरध्वज, बालवयात रानात जाणारा तेजस्वी ध्रुव, महाभारत रचणारे श्रीमत् व्यास, या सर्व ईश्वराच्याच विभूती होत.

मुलाचे लालनपालन करणारी, मुलाला जरा दुखले खुपले तर कावरीबावरी होणारी, स्वतःच्या प्राणांचे पांघरूण घालून बाळाचे प्राण वाचवू पाहणारी, कुठे काहीही गोड मिळो, आधी बाळाला आणून देणारी, बाळाला आधी गोड घास, बाळाला नीट कपडे, बाळाला आधी सारे, असे पुत्रमय जणू जिचे जीवन झाले आहे अशी प्रेमसागर माता, तिला देव नाही म्हणायचे तर कोणाला?

मातृदेवो भव

अशी श्रुतीची आज्ञा आहे. देवाची पूजा तुला करावयाची आहे का? तुझ्या मातेची पूजा कर, म्हणजे ती देवालाच मिळेल. ईश्वराच्या अपार प्रेमाची कल्पना मातेच्या प्रेमावरूनच आपणांस येऊ शकेल.

आणि पशूचा माणूस करणारा तो थोर सदगुरू- तीही ईश्वराचीच मूर्ती. आईबापांनी देहच दिला; परंतु गुरूने ज्ञानचक्षू दिले. मानवी जन्माचे सार्थक करावयाचे त्याने शिकविले. तो गुरू म्हणजे माझा देव.

या साऱ्या ईश्वराच्याच मूर्ती. जगात या थोरांची मंदिरे आहेत, जिकडे तिकडे पुतळे आहेत, तसबिरी आहेत, स्मारके आहेत. युरोप खंडात जाल तर सर्वत्र विभूतिपूजा दिसेल. ईश्वराची अनंत स्वरूपांत तेथे पूजा आहे. संतांमधील दिव्यत्व भारतीय संस्कृती ओळखते. परंतु युरोपीय संस्कृती कवी, तत्त्ववेत्ते, गणिती, विज्ञानवेत्ते, वीर, मुत्सद्दी, संगीततज्ज्ञ, चित्रकार, शिल्पकार, अभिनयविशारद, – सर्व प्रकारच्या परमेश्वराच्या विभूतिमत्त्वाचे पूजन करीत असते.

भारतीय मूर्तिपूजा शेवटी काय संदेश सांगते? भगवदगीतेतील दहावा अध्याय मूर्तिपूजा शिकवीत आहे. जगात जेथे जेथे विभूतिमत्त्व दिसेल, तेथे तेथे माझा अंश तू मान, असे गीता सांगत आहे. परंतु एवढ्यावरच गीता थांबत नाही. गीता सांगते:

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
 विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥

या चराचरात सर्वत्रच मी भरून राहिलो आहे. महान विभूतींत मला प्रथम पाहावयास शीक. परंतु तेवढ्याने भागणार नाही. ज्याप्रमाणे लहान मुलाला शिकविताना प्रथम सोपी अक्षरे देतात, ती अक्षरे मोठ्या आकारात काढतात, परंतु एवढ्याने मुलाचा वाङ्मयात प्रवेश होणार नाही. मुलाला समजले पाहिजे की, मोठे अक्षर तेच बारीक अक्षर. पाटीवरचा मोठा ग व पुस्तकातील रोडका ग दोन्ही एकरूपच. साधी अक्षरे शिकून झाल्यावर लहान-मोठी अक्षरे एकच. हेही समजल्यावर, लहान मुलाने जोडाक्षरेही समजून घेतली पाहिजेत. जोडाक्षरे त्याला न समजतील तर तो पदोपदी अडेल, रडेल.

आई हे सोपे सुटसुटीत अक्षर आहे. आई म्हणजे देव हे समजलो. रामकृष्ण म्हणजे देव हे समजलो. सागर व वटवृक्ष हे देव समजलो. परंतु रावण? कंस? चावायला येणारा विषारी भुजंग? भयंकर व्याघ्र? ही कोणाची रूपे?

हीही देवाचीच रूपे ! परंतु ही जोडाक्षरे आहेत. ही समजायला जरा कठीण आहेत. परंतु ही समजून घेतलीच पाहिजेत. नाही तर जीवनात आनंद नाही, मोक्ष नाही, पाव्हरीबाबांना सर्प चावला; ते म्हणाले, “देव चुंबन देऊन गेला!”

शेवटी सर्वत्र देवाचे दर्शन घ्यावयास शिकावयाचे आहे. मूर्तिपूजेचे हे पर्यंवतास आहे. जेथे तेथे मग त्याच्याच मूर्ती, त्याचीच अनंत राउळे. प्रत्येक वस्तू; प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या चिदंबराचे- दिगंबराचे मंगल मंदिरच होय ! खऱ्या भक्ताला प्रत्येक पदार्थातून चिन्मयाचेच दर्शन होते. तो सर्व सृष्टीकडे भक्तिप्रेमाने पाहात राहतो व त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात!

मूर्तिपूजा करता करता विश्व हीच मूर्ती वाटू लागली पाहिजे. परंतु सर्व चराचर सृष्टी मंगल व पवित्र वाटणे तर दूर राहिले, निदान मानवप्राणी तरी पवित्र व थोर वाटू दे. मूर्तिपूजेचा पहिला धडा तरी आपण शिकला पाहिजे. परंतु हा धडा अद्याप मानवप्राणी शिकला नाही.

आपणांस धर्म यांत्रिक रीतीचा आवडतो. परंतु धर्म म्हणजे संस्कार. प्रत्येक कृतीचा जीवनावर ठसा उमटला पाहिजे. आपण नेहमी मूर्तिपूजा करतो, परंतु त्याचा कोणता ठसा उमटतो? आपण पूजा करताना कधी मनात म्हणतो का; “देवा ! आजच्यापेक्षा उद्या हे माझे हात अधिक पवित्र होतील, आजच्यापेक्षा उद्या हे डोळे अधिक प्रेमळ व प्रामाणिक होतील, आजच्यापेक्षा उद्या हृदय विशुद्धतर व विशालतर होईल, आजच्यापेक्षा बुद्धी उद्या अधिक स्वच्छ व सतेज होईल?”

आपल्या मनात काहीही नसते. चोवीस वर्षांपूर्वी हे हात जितके अपवित्र होते तितकेच, किंबहुना अधिकच अपवित्र, चोवीस वर्षांच्या पूजेनेही आज आहेत! विकास नाही; वाढ नाही, पावित्र्य नाही, प्रेम नाही, भेद गळला नाही, अहंकार झडला नाही. अशी यांत्रिक पूजा काय कामाची?

मूर्तिपूजेत कृतज्ञतेची सुंदर कल्पना आहे. कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात कोणतीही नाही. परमेश्वराने आपणांस सर्व काही दिले आहे. त्याचे उतराई आपण कसे होणार, हा भाव प्रत्येकाच्या हृदयात असतो. ज्या ईश्वराने या विश्वमंदिरात रवी - शशी-तारे पेटवून ठेविले आहेत, त्याला आपण नीरांजनाने ओवाळतो, काडवातींनी ओवाळतो. ज्याने अनंत प्रकारच्या परिमलांची कोट्यवधि फुले पृथ्वीवर फुलविली आहेत, त्याला उदबत्तीचा वास आपण देतो. ज्याने रसाळ फुले दिली, नानाविध धान्ये दिली, कंदमुळे दिली, दूधदुभते दिले, त्या देवाला वाटीभर दुधाचा नैवेद्य दाखवितो; ज्याने सागर उचंबळत ठेविले आहेत, जो मेघमाला पाठवीत आहे, नद्यानाले वाढवीत आहे, वापीतडाग भरवीत आहे, त्याच्यावर तांब्याभर पाण्याचा आपण अभिषेक करतो. ही का देवाची थट्टा आहे?

'लोकहितवादी' नी आपल्या एका पत्रात एके ठिकाणी लिहिले आहे की, हा सारा बावळटपणा आहे. परंतु हा बावळटपणा नाही. ही कृतज्ञतेची खूण आहे. त्या विराट विश्वभराला मी माझ्या चिमुकल्या हातांनी कसा पकडणार? कोणत्या देवघरात त्याला बसविणार? त्या विश्वंभराची माझ्या मनाच्या सुखार्थ मी एक लहानशी मूर्ती करीन, मला आवडेल ते रूप देईन; आणि त्या मूर्तीला मी पूजीन. तिला गंध लावीन, फुले वाहीन; धूप, दीप, नैवेद्य दाखवीन. त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालीन, त्या मूर्तीला लोटांगण घालीन. माझी कृतज्ञता मी प्रकट करीन. सर्वत्र असणाऱ्या प्रभूला ती पूजा पोचेल.

बापाच्या ताटातले घेऊन बाळ बापाला भरवू पाहतो. बापाला अपमान वाटत नाही. तो प्रेमाने तोंड पुढे करतो. तद्वत् तो चराचर पिता भक्तावर रागावणार नाही. देवाचेच घेऊन देवाला द्यावयाचे. गंगेतील पाण्याने गंगेलाच अर्ध्य द्यावयाचे. कोठूनही कृतज्ञता प्रकट करण्याचे साधन मिळाले म्हणजे झाले.

मंदिरातील मूर्तीसमोर आपण भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने काही अर्पण करतो; परंतु आपण देवासमोर जे ठेवतो त्याचा उपयोग काय होतो? देव तर तटस्थ आहे. पुजारी किंवा मालक ते सर्व घेत असतो. आणि त्या पवित्र मंदिरात व्यभिचारांची पूजा सुरू होते! रामाला वाहिलेला शेला मंदिराचा जो मालक त्याच्या वेश्येच्या अंगावर झळकतो! रामाला दिलेले हिरे वारांगनांच्या नाका-कानांत जाऊन बसतात!

आपली होते देवपूजा आणि समाजात वाढते घाण ! परंतु हे होणारच. लोकांना पिळून, छळून आणलेले ते हिरे रामरायाला कसे सहन होतील? ते घाणेरडे हिरे घाणीतच जावयाचे. आपल्याजवळ देवाला द्यावयाला आले कोठून? आपल्यासाठी झिजणाऱ्या आपल्या बांधवांची झीज आपण भरून काढीत नाही, म्हणून धनदौलत उरते. आपले मन आपणास खाते. त्या मनाचे मारून मुटकून समाधान करण्यासाठी आणि गोरगरिबांना छळूनही पुन्हा प्रतिष्ठित व धार्मिक म्हणून मिरवता यावे यासाठी आपण देवाला हिरे-माणके देतो. लक्षावधी, कोट्यवधी, इस्टेटीतील केरकचरा देवापुढे टाकतो. झब्बू लोक धर्मात्मा म्हणून वर्तमानपत्रांतून स्तुती करतात. गरिबांची वर्तमानपत्रे असती तर त्यांनी काय बरे लिहिले असते?

मंदिरांतून जो व्यभिचार चालतो त्याचे पाप तेथे दिडक्या फेकणारांवर आहे. आपण जे काही करतो, त्याचे परिणाम काय होतील हे न पाहणे म्हणजे घोर अधर्म आहे. देवाने दिलेल्या बुद्धीचा तो अपमान आहे. ईश्वराने दिलेल्या परमश्रेष्ठ देणगीचा तो उपमर्द आहे.

द्वारकेसारख्या मोठमोठ्या देवस्थानांचे लिलाव होतात! जसे दारूच्या गुत्त्यांचेच लिलाव ! जो मक्ता घेईल तो मग तेथला राजा. द्वारकेला तो मक्ता घेणारा महंत डुलत डुलत डुलत येतो. त्याच्यावर छत्रचामरे ढाळण्यात येतात. तोच जणू तेथील देव!

मूर्तिपूजेत घाण शिरली आहे. डोळस मूर्तिपूजा सुरू झाली पाहिजे. मूर्तीपुढे धनद्रव्य टाकणे बंद झाले पाहिजे. जेथे सर्वांनी विनम्रभावाने यावे असे स्थान म्हणजे मंदिर. ते स्थान सरकारने स्वच्छ, पवित्र राखावे. तेथे मंगल भाव मनात येतील असे करावे म्हणजे झाले. पवित्र मंदिरात पवित्र होऊन बाहेरच्या जगात पवित्र व्यवहार करण्यासाठी जाणे, हा मूर्तिपूजेचा हेतू आहे. भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजेचा महान महिमा आहे. ज्या संस्कृतीत मूर्तिपूजा आहे, त्या समाजात प्रेम, स्नेह, दयेचे पूर वाहिले पाहिजे होते; परंतु मोठ्या खेदाची गोष्ट ही की, श्रेष्ठ-कनिष्ठ भावांची भुते या मंदिरांतही धुडगूस घालीत आहेत! आमच्या देवांच्या मूर्तीही बाटतात व विटाळतात! जेथे देवही पतित व भ्रष्ट होऊ लागला, तेथे शुद्धी कोण करणार? भूदेव ब्राह्मण!

खरोखर, मंदिराची जरूरच नाही. या विश्वमंदिरात अनंत मूर्ती आहेत. या विश्वातील प्रत्येक अणुरेणूवरून या विश्वाच्या पाठीमागच्या शक्तीची कल्पना येते. एका अरबाला एका ख्रिश्चन मिशनऱ्याने विचारले, “देव आहे हे तुला कोणी शिकविले?” तो अरब म्हणाला, “या वाळवंटातील झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याने; या वाळवंटात वाढणाऱ्या, रसाळ फळे देणाऱ्या खजुरीच्या झाडांनी; रात्री दिसणाऱ्या हिरव्या-निळ्या ताऱ्यांनी.” तो मिशनरी खाली मान घालून निघून गेला.

जिकडे तिकडे देवाच्या मूर्ती आहेत. तारे पाहून हात जोडावेसे वाटतात. फुले पाहून हात जोडावेसे वाटतात. थोर व्यक्ती पाहून प्रणाम करावासा वाटतो. भव्य देखावा पाहून नमावेसे वाटते. अनंत विश्वातील अनंत मंदिरे व अनंत मूर्ती ! परंतु पाहतो कोण?

विवेकानंद म्हणाले, “ज्या मूर्तिपूजेने जगाला श्रीरामकृष्ण परमहंस दिले, त्या मूर्तिपूजेत सहस्र दोष शिरले असले तरी ती मी उराशी धरीन." साधन पवित्र असते; परंतु स्वार्थी लोक ते भ्रष्ट करतात. गंगा पवित्र आहे; परंतु तिला घाण करणारे भेटले, तर ती बिचारी काय करणार!

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा