shabd-logo

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023

13 पाहिले 13
भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास भारतीय संतांचा इतिहास, भारतीय वीरांचा इतिहास.

सत्यासाठी रामचंद्र वनात गेला. पित्याचा शब्द खोटा पडू नये, यासाठी तो बारा वर्षे रानावनांत राहावयास आनंदाने सिद्ध झाला, आणि बारा वर्षांनंतर पुन्हा जेव्हा अयोध्येचे राज्यपद त्याला मिळाले, त्या वेळचे त्याचे वर्तन किती उदात्त ! भगवती सीतादेवीच्या पावित्र्याविषयी प्रजेच्या मनात शंका आहे, असे कळताच तो थोर प्रभू गर्भवती सीतेचा त्याग करतो. प्रजेच्या समोर धुतल्या तांदळासारखी दानत हवी. इवलीही संशयाला जागा देता कामा नये. एखादा वात्रट मनुष्य काही तरी बोलला, त्याचा रामाने एवढा बाऊ करावयाला नको होता, असे आपण म्हणू, परंतु रामासमोर भिन्न आदर्श होता. राम सर्व प्रजेचे पुंजीभूत पावित्र्याचे प्रतीक होता. प्रजेला पवित्र ठेवू पाहणारा राजा स्वतः संशयातीत हवा. प्रजेचे पापपुण्य राम स्वतःकडे घेत होता. काही तरी आपलेच चुकले असे त्याला वाटे.

भारतीय संस्कृतीत त्याग व पावित्र्य या दोन गुणांना अत्यंत मोठे स्थान आहे. भारतीय मनुष्य केवळ पैशाला, केवळ सत्तेला मान देत नाही. त्या गुणाबरोबर त्याग व पावित्र्य हवे. दरिद्री शुक्राचार्याला भारतीय जनता देवाप्रमाणे मानील. भारतीय जनतेने राजांच्या पालख्या कधी उचलल्या नाहीत. परंतु संतांच्या पालख्या दरवर्षी लाखो लोक घेऊन जातात. जनक केवळ राजा होता म्हणून नव्हे, तर ज्ञानी असून विरक्त होता म्हणून तो प्रातः स्मरणीय. त्यागाशिवाय ज्ञान नाही. आसक्ताला ज्ञान कोठून असणार ? ज्ञान म्हणजे अद्वैतज्ञान, ज्ञान म्हणजे अद्वैताची अनुभूती. ही अद्वैताची अनुभूती जसजशी अधिकाधिक जीवनात येते, तसतसा अधिकाधिक त्याग होऊ लागतो. म्हणून त्याग हे अद्वैताचे लक्षण भारतीय संस्कृती मानते.

अशा त्यागाबरोबर पावित्र्यही येतेच. जो त्याग अद्वैताच्या अनुभूतीतून होतो तो पावित्र्य बरोबर आणल्याशिवाय राहात नाही. भारतात स्त्री-पुरुष-विषयक संबंध कसे आहेत, इकडे सर्वांचे डोळे असतात. हे कामपावित्र्य आधी पाहिले जाते. तुमच्याजवळ इतर शेकडो गुण असून हा कामपावित्र्याचा महनीय गुण नसेल, तर जनता तुम्हाला मानणार नाही. जनतेच्या हृदयाचे स्वामी तुम्ही होणार नाही.

लोकमान्य, महात्माजी, यांच्याविषयीच्या अलोट भक्तीचे कारण त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात व अपरंपार त्यागात आहे. भारतीय जनता हे काम पावित्र्याचे थर्मामीटर सर्वांस लावून बघते. त्यागाचे थर्मामीटर सर्वांस लावून बघते. या दोन्ही कसोट्यांत जो उतरला, त्याचे वेड तिला लागते. त्या महापुरुषाला डोक्यावर घेऊन ती नाचेल.

लोकांच्या मनावर हे दोन गुण ठसविण्यासाठी या भारतवर्षात अपरंपार त्याग ओतलेला आहे. पावित्र्याची शंका येताच राम सीतेचा त्याग करतो. आपल्या पावित्र्याचा भंग होईल या भीतीने रजपूत रमणी जीवनाच्या होळ्या पेटविते. पतिमरणानंतर आपल्याला तनमनाने पवित्र राहता येईल की नाही, या शंकेने स्त्रिया पतीबरोबर हसत हसत चितेवर चढत व ज्वाळांना मिठी मारीत! ती ज्वाळांना मिठी नसून पावित्र्याला मिठी होती! सूरदासांचे कमळासारखे कमनीय व रमणीय डोळे पाहून एका स्त्रीच्या मनात कामवासना उत्पन्न झाली. हे सूरदासांना कळताच त्यांनी आपले डोळे कापून काढले! त्या प्रेमविव्हल रमणीने विचारले, “देवाने दिलेले डोळे असे का काढले?" सूरदास म्हणाले, “या सुंदर डोळ्यांपुढे सुंदरतम परमेश्वराचे स्मरण तुम्हांला झाले असते, तर या डोळ्यांना मी धन्यवाद दिले असते. हे सुंदर डोळे देणारा देव किती बरे सुंदर असेल, असा विचार तुमच्या मनात येता तर किती गोड झाले असते! माझे डोळे कृतार्थं झाले असते. परंतु माझ्या या गोड डोळ्यांनी तुमच्या हृदयात आगडोंब पेटविला. क्षुद्र कामभोगाची लालसा उत्पन्न केली. या डोळ्यांनी तुम्हाला चिखलात ओढले. जे विषारी डोळे लोकांचा असा अधःपात करतात ते कशाला ठेवू? त्यांना दूर करणे हेच योग्य होते.”

राम राजा होता. त्याचे उदाहरण जनता डोळ्यांसमोर ठेवणार. 'यथा राजा तथा प्रजा' ही म्हणच आहे. म्हणूनच राजावर अपार जबाबदारी आहे. भारतवर्षातील पुढाऱ्यांनी हे रामाचे उदाहरण कधी विसरता कामा नये. रामाने ध्येयाची पराकाष्ठा गाठली. पावित्र्यासाठी, लोकांची पावित्र्यावरची श्रद्धा अविचल राहावी म्हणून. असा त्याग जेव्हा जनता पाहील, तेव्हाच त्या पावित्र्याची महती थोडी थोडी बहुजनसमाजाला कळेल; एरव्ही नाही.

रामाची हिमालयाच्या धवल शिखरासारखी ही उदात्तता जशी दिसते तितकीच सीतेची सहनशीलता दिसते. पतीला बोल लागलेला तिला कसा खपेल ? स्वतःची निंदा झाली ह्या दुःखापेक्षा रामाच्या चारित्र्याची निंदा तिला अधिक झोंबली असेल. आणि राम-सीता निरनिराळी थोडीच होती? ती एकरूपच होती! सीता कोठेही गेली तरी तिच्या जीवनात रामच ओतप्रोत भरलेला होता, आणि सीता कोठेही असली तरी ती रामाच्या जीवनात मिसळलेली होती.

सीता दुबळी स्त्री नव्हती. पावित्र्याची सामर्थ्य तिच्याजवळ होते. पतिप्रेमाचे कवच ती ल्यायली होती. पतीची इच्छा तीच तिची इच्छा. स्वतःला स्वतंत्र इच्छाच तिने ठेविली नाही. ती प्रेमात मिळून गेली होती. सीता केव्हाच मरून गेली होती. रामरूप झाली होती. रामाने सीतेला नाही वनात टाकले, स्वतःचेच अर्धे अंग जणू कापून त्याने फेकून दिले होते! प्रेम म्हणजे प्रिय वस्तूत बुडून जाणे. प्रेम म्हणजे “आपुले मरण पाहिले म्या डोळां . " सीतेचे प्रेम पराकोटीला पोचले होते. प्रेमाची परम सीमा ती होती. म्हणून सीता भारतीय स्त्रियांचा महान धर्म झाला आहे. स्त्रियांचा धर्म म्हणजे सीता. बायकांच्या शेकडो ओव्यांत सीतेचा हा महिमा आहे:

सीता वनवासी । दगडाची केली बाज घोर अरण्यांत । अंकुशबाळा नीज

आणि भरताचे ते बंधुप्रेम ! माझा राम वनात जातो, आणि मी का गादीवर बसू? राम कंदमुळे खाणार आणि मी का लाडू-जिलबी खाऊ? भरतही नंदिग्रामी बारा वर्षे रामाचे स्मरण करीत राहिला. त्यानेही वल्कले धारण केली. त्यानेही जटा धारण केल्या. तोही कंदमुळांवर राहिला.

लक्ष्मण तर प्रत्यक्ष रामाबरोबर वनात गेला. भरत रामाचे चिंतन करून जगला. परंतु लक्ष्मण रामाच्या दर्शनानेच जगला असता. तुळशीदासांच्या रामायणात हा प्रसंग फारच सुंदर रंगविला आहे. लक्ष्मण म्हणतो, “रामा ! पाण्याशिवाय मासा कसा राहील? आईशिवाय बाळ कसे राहील? तसा तुझ्याशिवाय मी कसा राहू?"

“रामा! काठीवर ध्वज फडकत असतो. तुझ्या यशोध्वजामाठी या लक्ष्मणाची काठी होऊ दे. तुझ्यासाठी लक्ष्मण आहे. तुझ्याशिवाय लक्ष्मणाला अर्थ नाही. "

भारतीय संस्कृती राम-लक्ष्मण, भरत - सीता यांनी बनविली आहे. भारतीयांच्या रक्तारक्तांत त्यांची चारित्रे गेली आहेत. हे महान आदर्श अमर असे भारतीयांच्या डोळ्यांसमोर लिहिलेले आहेत.

भिन्न भिन्न आदर्शाचा तोटा नाही. ब्रह्मचर्याच्या ध्येयाचे भारतीय उपासक पाहा. हनुमान पाहा. लंकेचे शोधन करीत असता स्त्रीनिवासाकडे तो वळत नाही. फक्त एका खोलीत रामनामाचा जप त्याला ऐकू आला म्हणून तेथे तो डोकावला. तेथे त्रिजटा होती. तसेच ते अलोट इच्छाशक्तीचे इच्छामरणी भीष्म ! आणि पूर्ण वैराग्याने रंगलेले शुक !

भारतीय साहित्यात काही प्रसंग असे आहेत, की त्यांना जगाच्या वाङ्मयात तोड नाही. शुकपरीक्षेचा प्रसंग असाच आहे. वसंत ऋतू आपले सारे उन्मादक वैभव तेथे पसरतो. कोकिळा प्रेमोत्कट कुऊ करते. पाखरे प्रेमाने परस्परांस खाजवीत आहेत. फुलांचा घमघमाट सुटला आहे. प्रसन्न वारा वाहात आहे. नवपल्लव कोवळे कोवळे फुटले आहेत. सारे वातावरण जसे मादावलेले आहे. आणि ती शुभांगी रंभा शेकडो विलासी हावभाव करीत उभी आहे. वारा तिचा पदर ओढीत आहे. साऱ्या सृष्टीतील मोहक सुंदरता आसमंतात ओतलेली आहे. ती रंभा त्या शुकाच्या गळ्याला मिठी मारते. परंतु त्याचा रोमही वाकडा होत नाही!

धन्य तो शुक! धन्य ही भरतभूमी, व त्या शुकाला रंगविणारी प्रतिभा !

वैराग्यमूर्ती शुकाबरोबरच निश्चयमूर्ती ध्रुव डोळ्यांसमोर येतो. बापाने मांडीवरून ढकलले हा अपमान त्याला सहन होत नाही. जेथून कोणी ढकलणार नाही असे अढळ पद घेण्यासाठी तो तेजस्वी बाळ घराबाहेर पडतो. बापाला लाज वाटून तो त्या मुलाच्या मागे लागतो. "फीर बाळा देईन दोन गांव । ध्रुव बोले देईल देवराय"

बाप सारे राज्य देऊ करतो. तरी ध्रुव माघारा वळत नाही. आज भारतवर्षीयांस या ध्रुवाची आठवण नाही. ती आठवण असती तर फेकलेल्या तुकड्याकडे आशाळभूतपणाने पाहात ते बसले नसते. “आमचे ध्येय आम्ही गाठू. हे मधले मोह नकोत,” असे ध्रुवाच्या वारसदारांनी म्हटले पाहिजे.

तसाच तो बालभक्त प्रल्हाद नाही म्हणजे नाही. पर्वतावरून लोटा, आगीत लोटा, सुळावर चढवा वा फासावर चढवा, नारायणाचे स्मरण केल्याशिवाय मी राहणार नाही. असा हा ध्येयवादी प्रल्हाद भारतास सदैव स्फूर्ती देईल. वंदे मातरम्, स्वराज्य, इन्किलाब जिन्दाबाद, मी म्हणणार! साम्राज्यशाही नष्ट होवो, भांडवलशाही नष्ट होवो, मी म्हणणार! मग या देहाचे काहीही करा. माझे ध्येय माझ्या जीवनातून प्रकट होणार ! ओठांत तेच पोटात तेच. हातांत तेच, डोळ्यांत तेच. नारायणाचे स्मरण म्हणजे सर्व मानवजातीचे स्मरण ! सर्व नरांचे जेथे अयन होते, ते नारायणाचे स्वरूप. सर्व मानवजातीस सुखी करू पाहणे म्हणजेच नारायणाचा झेंडा फडकविणे!

आणि सत्यमूर्ती तत्त्वसागर राजा हरिश्चंद्र ! स्वप्नातील शब्द खरा करण्यासाठी केवढा त्याग! किती कष्ट ! स्वप्नातही असत्याचा स्पर्श नको. तारामती, रोहिदास, हरिश्चंद्र ! त्रिभुवनमोलाची तीन नावे. पाणपोईवरचे फुकाचे पाणी बाळ रोहिदास पति नाही! आणि आज भारत देशात श्रीमंतांची मुलेही शाळांतून नादारीसाठी अर्ज करतात! श्रीमंत लोक मोफत दवाखान्यातून दवा नेतात! स्वाभिमान! भारतवर्षात सत्त्वाची व स्वाभिमानाची पूजा केली जात असे. लाचारपणाची लाज वाटत असे.

डोंबाकडे नोकरी करताना कसे हृदयद्रावक प्रसंग ! स्वतःच्या मुलाला अग्नी देता येत नाही, स्वतःच्या पत्नीवर घाव घालण्याची पाळी! कशी ती फुलाप्रमाणे कोमल परंतु वज्राप्रमाणे कठोर मने!

ध्येयापासून अल्पशा झालेल्या च्युतीचेही प्रायश्चित्त भोगावे लागते. ध्येय म्हणजे ध्येय. कापराच्या राशीला एक काडी लागली तरी सर्व भस्म होणार! 'नरो वा कुंजरो वा' असे म्हणताच धर्मराजाचा पृथ्वीपासून चार अंगुळे वर चालणारा रथ इतरांच्या रथांप्रमाणे पृथ्वीवरून चालू लागला ! पवित्रतम नळराजाच्या पायाचे एक बोट नीट धुतले गेले नाही, ते जरा मलिन राहिले, तेवढ्या त्या तिळाएवढ्या जागेतून कली नळराजाच्या जीवनात शिरला!

या प्रसंगांतून महान सत्य सांगितले आहे. पाप असे हळूच न कळत शिरत असते. एकच प्याला! हा एकच प्याला फेकून दिला पाहिजे. पहिले चुकीचे पाऊल, तेच पडू न देण्याची दक्षता व सावधानता घेतली पाहिजे. रवीन्द्रनाथांच्या गीताञ्जलीत एक सुंदर गीत आहे:

" तो म्हणाला, मला एका कोपऱ्यात जागा द्या. मी गडबड करणार नाही. परंतु रात्रीच्या वेळेस त्याने बंड केले व तो माझ्या हृदयावर येऊन बसला. हृदयसिंहासनावरची एक मूर्ती ढकलून त्याने आपले राज्य स्थापिले. "

या गीतात हाच भाव आहे. सैतानाचे आगमन असे फसवीत असते. रोगाचा जंतू हळूच शिरतो व सर्व देह व्यापून टाकतो. परकी सत्ता हळूच येते व सर्वत्र पसरते. म्हणून प्रारंभीच दक्ष राहा.

महारथी कर्ण व थोर राजा बळी यांनी दातृत्वाची कमाल केली. स्वतःला मरण येईल असे नक्की माहीत असताही कर्ण आपली अंगची कवचकुंडले कापून काढून देतो. तोंडातून नकार येण्यापेक्षा मरण पत्करले, अशी त्याची वृत्ती आहे. तो स्वतःच्या पित्याला - सूर्याला म्हणाला, “मी मूर्ख नाही, मी व्यवहारी आहे. थोड्या किंमतीत पूष्कळ मिळवितो त्याला जग व्यवहारी म्हणते. मी हे मर्त्य शरीर देऊन अमर कीर्ती मिळवीत आहे. ही माती देऊन जगाच्या अंतापर्यंत टिकणारे यश मिळवीत आहे. कसा सुंदर व छान सौदा केला!”

आणि तसाच तो बळी! वामनाला पाऊल ठेवावयास जागा नाही, तर स्वतःचा माथा तो पुढे करतो. बळीची फजिती झाली असून मत्सरी देव नगारे वाजवितात, दुंदुभी वाजवितात, परंतु धीरोदात्त बळी म्हणतो: "नभीं सुरांच्या जयवाद्यनादा । भीतों जसा मी अपकीर्ती-वादा।"
‘माझ्या यशाची मला चाड आहे. या देवांच्या गोंगाटाची मला पर्वा नाही.'
चारुदत्ताने मृच्छकटिकात असेच उद्गार काढले आहेत:
"विशुद्धस्य हि मे मृत्युः पुत्रजन्मसमः किल ।"

भारतीय संस्कृतीचा हा आवाज आहे.
आश्रय मागणाऱ्या कपोताचे संरक्षण शिबी राजा मांडीचे मांस कापून देऊन करतो. मयूरध्वज अतिथीला अर्धे अंग कापून देतो, आणि डाव्या डोळ्यांतून पाणी आले म्हणून अतिथी निघून जाऊ लागताच मयूरध्वज म्हणतो, “हे शरीर कर्वतून द्यावे लागत आहे म्हणून हे पाणी नाही. तर उजवे अंग सार्थकी लागले; आपले तेवढे भाग्य नाही, म्हणून या डाव्या अंगाचा डावा डोळा भरून आला आहे!”

अतिथीला एकुलता एक पुत्र शिजवून वाढणारी चांगुणा आपल्या मुलाचे मस्तक ओव्या म्हणत कांडते ! केवढे धैर्य, किती त्याग, कशी ध्येयोत्कटता ! आणि शेवटी अतिथी राजाला जेवायला बोलावतो. राजा श्रियाळ कचरतो, त्या वेळेस ती थोर सती पतीला धीर देत म्हणते:

“नवमास वाहिला म्यां उदरांत । तुम्हां जड नव्हे चौ प्रहरांत । " “आपल्या बाळाला मी नऊ महिने पोटात ठेविले. तुम्हांला चार प्रहर

ठेववत नाही का?"

जो युद्धाला बाहेर पडणार नाही, त्याला तापलेल्या तेलात टाकण्यात येईल, अशी हंसध्वज राजा दवंडी पिटवितो; परंतु त्याचा प्रिय पुत्र सुधन्वा पत्नीप्रेमाने घरी राहतो. त्याला यावयास उशीर होतो. परंतु न्यायी हंसध्वज मागेपुढे पाहात नाही. जी शिक्षा मी इतरांस केली असती ती माझ्या मुलास नको का? सुधन्वा तप्त तेलात टाकला जातो!

सावित्री पतीसाठी मरणापाठोपाठ जावयास तयार होते! घोर अरण्य! रात्रीची वेळ! समोर मृत्युदेव! परंतु ती सती भीत नाही. ती मृत्यूचेही मन वळविते.

आणि ती गांधारी! पतीला दृष्टिसुख नाही, मग मी ते कसे भोगू? ती आपले डोळे जन्मभर बांधून ठेविते ! त्या त्यागाची कल्पनाच करवत नाही. समान हक्कासाठी भांडणाऱ्या भारतीय नारींनो! हा पाहा सती गांधारीचा समान हक्क ! गांधारीसमोर भगवान श्रीकृष्ण थरथरत उभा राहात असे. भारतीय पतिव्रतांनो! तुम्हांस अनंत प्रणिपात !

विश्वावर प्रेम करणारे भगवान बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात! संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल, म्हणून त्याच्या पाठोपाठ तूप घेऊन धावतात! झाड तोडणाऱ्यासमोर तुळशीदास जाऊन उभे राहतात. आणि म्हणतात, “माझ्या मानेवर घाव घाला. त्या सुंदर झाडावर नको.” कबिराच्या आज्ञेवरून रानातून गवत कापून आणण्यासाठी गेलेला कुमार कमाल ते प्रभातकाळच्या मंद वाऱ्याने डुलणारे गवत पाहून विरघळतो. “नको रे कापू, नको रे कापू” असे जणू ते म्हणत आहे असे त्याला वाटते. त्याच्या हातातील विळा गळून पडतो. डोळ्यांतून प्रेमाश्रू गळतात. तसाच तो माघारा येतो. कबीर कमालच्या चरणी लागतो.

जगन्नाथपुरीजवळचा निळा निळा सागर पाहून हा माझा मेघश्याम कृष्णच पसरला आहे असे मनात येऊन त्या समुद्रात बाहू उभारून नाचत नाचत फिरू पाहणारे थोर बंगाली वैष्णव वीर चैतन्य! विषाचा पेला पिणारी, कृष्णसर्पाला शालिग्राम मानणारी, भक्तिप्रेमाने नाचणारी मीरा ! स्वामिकार्यार्थ स्वतःच्या पुत्राचे बलिदान करणारी पन्ना !

दिवसाच्या चोवीस तासांऐवजी पंचवीस असते तर प्रजेचे कल्याण आणखी करता आले असते असे म्हणणारा विश्वभूषण राजा अशोक!

प्रत्येक पाच वर्षांनी सर्व खजिना वाटून देऊन केवळ अकिंचनत्वाने शोभणारा राजा हर्ष! रानात कंदमुळांवर जगणारा व गवतावर झोपणारा स्वातंत्र्यसूर्य

राणा संग!

प्रजेने लाविलेल्या झाडासही हात लावू नका असे आज्ञापत्र काढणारे व परस्त्री मातेप्रमाणे मानणारे थोर शिवछत्रपती !

धन्याच्या फळबागेतील एक फळ हातून तोडले गेले, म्हणून

स्वतःचा हात छाटू पाहणारे दादोजी कोंडदेव ! “मी पाच तोफा ऐकल्या; आता सुखाने मरतो!” असे म्हणणारे बाजी!

“आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे!” असे म्हणणारा महात्मा वीरमणी तानाजी!

धर्मासाठी राईराईएवढे तुकडे करून घेणारा शौर्यमूर्ती संभाजी!

स्वामिकार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडो बल्लाळ ! “बचेंगे तो और भी लढेंगे", म्हणणारा शूर दत्ताजी!

“तोंडातील कफ शौचाच्या द्वारा पडेल असे करा, म्हणजे माझे तोंड रामनाम घ्यावयास मोकळे राहील", असे वैद्यांना विनवणी करणारे पुण्यमूर्ती पेशवे पहिले माधवराव !

“तुम्हाला देहान्त प्रायश्चित्तच पाहिजे", असे राघोबाला सांगणारे थोर रामशास्त्री !

प्रजेला त्रास देणाऱ्या स्वतःच्या पुत्राचाही त्याग करणारी देवी

अहिल्याबाई! “माझ्या देहाला मरताना परस्पर्श होऊ देऊ नका", असे

सांगणारी रणरागिणी राणी लक्ष्मी ! “मी योग्य तेच केले. खुशाल फाशी द्या.” असे सांगणारा तात्या

टोपे !

अशी ही भारतीय परंपरा आहे, अशी ही ध्येयपूजा आहे! भारताच्या प्रांताप्रांतांत अशी ध्येयपूजक नरनारीरत्ने सतत निघाली आहेत.

भारतवर्ष आजही काही वांझ नाही. या पारतंत्र्याच्या सर्वभक्षक काळातही भारताने सदैव हृदयाशी धरावी, अशी ध्येयनिष्ठ माणसे येथे झाली आहेत.

“मला फाशी दिले तरी चालेल, परंतु बंडवाल्या फडक्याचे वकीलपत्र मी घेणार”, असे म्हणणारे स्वदेशीचे आचार्य सार्वजनिक काका ! पुत्र प्लेगाने आजारी असतानाही शांतपणे 'केसरी लिहिणारे लोकमान्य!' आज दोन तपे केवळ ध्यानात रमणारे अरविंद ! “सरकारी धोरणाप्रमाणे पत्र चालवा, म्हणजे तुम्हाला मदत देऊ”, असे बंगालचा गव्हर्नर सांगत असता “देशात एक तरी प्रामाणिक संपादक नको का?” असे म्हणून निघून जाणारे 'अमृतबझार पत्रिके'चे आद्य संपादक बाबू शिशिरकुमार घोष ! नागपूरच्या १९२० मधील राष्ट्रीय सभेत असहकारिता ठराव मांडीत असता “अहो, तुम्ही अजून बॅरिस्टरी चालवीत आहात!” असे श्रोत्यांतून कोणी म्हणताच “चित्ररंजन जे बोलतो ते करतो" असे गर्जणारे व दुसऱ्याच दिवशी सर्वस्व त्याग करणारे देशबंधू ! एके दिवशी मनात विषय-वासना आली म्हणून स्वतःवर संतापून तापलेल्या तव्यावर जाऊन बसणारे स्वामी विवेकानंद! आईने बोलावले, परंतु साहेब जाऊ देत नाही, असे पाहताच राजीनामा देणारे व वाटेत प्रचंड पूर आला असताही नदीत आईच्या नावाने उडी टाकणारे ईश्वरचंद्र विद्यासागर ! " माझ्या पत्नीकडे गेली वीस वर्षे मी माता म्हणूनच पाहात आहे", असे सीलोनमध्ये सांगणारे महात्माजी ! “चलाव तेरी गोली ” असे म्हणून गुरखा शिपायासमोर आपली विशाल छाती उघडी करणारे स्वामी श्रद्धानंद! ‘गांधी टोपी काढ, नाही तर गोळी झाडतो', असे पिस्तूल रोखून सांगितले जात असताही अविचल राहणारे सोलापूरचे वीर तुळशीदास जाधव ! मोटरीखाली चिरडून घेणारा हुतात्मा बाबू गेनू ! गीतेचे स्मरण होताच, रामनाम मनात येताच, तनू पुलकित होऊन ज्याच्या डोळ्यांतून घळघळ अश्रुधारा वाहू लागतात, असे ते वर्ध्याचे ज्ञान-कर्म -भक्तीची मूर्ती पूज्य विनोबाजी ! “जगातील कोणती शक्ती माझ्या मोटरीवरचा झेंडा काढते बघू दे”, असे गर्जणारे निर्भयमूर्ती ध्येयरत जवाहरलाल !

किती ज्ञात-अज्ञात नावे! भारतीय संस्कती मेली नाही. स्वातंत्र्य व पारतंत्र्य या लाटा आहेत! कधी जय वा कधी पराजय ! परंतु राष्ट्राचे चारित्र्य मरता कामा नये. पूर्वजांनी जे चारित्र्यधन मिळविले ते गमावता कामा नये. ते चारित्र्य वाढविले पाहिजे. ते चारित्र्य जोपर्यंत वाढत आहे, तोपर्यंत भारतवर्ष जिवंत आहे. ते चरित्र्य जोपर्यंत जिवंत आहे, प्रकट होत आहे, तोपर्यंत भारतीय संस्कृती जिवंत आहे.


24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा