shabd-logo

संयम

5 June 2023

39 पाहिले 39
ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार नाही.

भारतीय संस्कृतीचा संयम हा एकप्रकारे आत्मा आहे, असे म्हटले तरी चालेल. भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे. आपण शंकराच्या देवळात जातो; परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते. या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय शिवाकडे, मृत्युंजयाकडे जाता येणार नाही. आणि कासव म्हणजे काय? कासव म्हणजे संयमाची मूर्ती. कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते, क्षणात बाहेर काढते. स्वतःच्या विकासास अवसर असेल तर सारे अवयव बाहेर आहेत; स्वतःला धोका असेल, तर सारे अवयव आत आहेत. असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानिले आहे. देवाकडे जावयाचे असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा. कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा. वाटेल तेव्हा इंद्रिये स्वाधीन राखता आली पाहिजेत. ज्याला जगाचे स्वामी व्हावयाचे असेल, त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे. ज्याला देव आपलासा करून घ्यावयाचा आहे, त्याने स्वतःचे मन आधी आपल्या ताब्यात घ्यावयास पाहिजे.

शंकराची मूर्ती डोळ्यांसमोर आणा. शंकराला तिसरा डोळा आहे. दोन डोळ्यांमध्ये हा तृतीय नेत्र आहे. या तृतीय नेत्राचे काय काम? या तृतीय नेत्राचे काम पहारेकऱ्याचे आहे. डोळ्यांवर, कानांवर, जिभेवर, सर्व इंद्रियांवर या डोळ्याची दृष्टी आहे. या तृतीय नेत्रात अग्नी आहे. माझ्या जीवनाच्या विकासाला जे जे विरोधी असेल, त्याचे त्याचे भस्म करावयास हा अग्नी सिद्ध आहे. हा तिसरा डोळा उघडा ठेवल्याशिवाय जीवनात सिद्धी नाही.

माझ्या डोळ्यांनी वाटेल तेथे नाही पाहता कामा, कानांनी वाटेल ते नाही ऐकता कामा, जिभेने वाटेल ते नाही बोलता कामा, नाही खाता कामा. हातांनी वाटेल ते नाही करता कामा, पायांनी वाटेल तेथे नाही जाता कामा. माझ्या ध्येयाला अनुकूल असणाऱ्या गोष्टींकडेच माझी इंद्रिये गेली पाहिजेत. या इंद्रियबैलांनी माझा जीवनरथ खड्ड्यात न घालता माझ्या प्राप्तव्यस्थानी नेला पाहिजे.

ज्ञानेश्वरीमध्ये योगाचे वर्णन करताना फारच सुंदर ओव्या लिहिल्या आहेत. गीतेमध्ये जो-

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।

हा श्लोक आहे. त्या श्लोकावरच्या त्या ओव्या आहेत. ज्याला कर्मयोग साधावयाचा आहे, त्याने हा संयमयोग अंगी आणणे आवश्यक आहे.

नियम पाळावे । जरि म्हणसी योगी व्हावे ॥

योगी म्हणजे कर्मयोगी. सतत कर्मात रंगून जाणे. सारखी सेवा हातून होणे. यासाठी काय केले पाहिजे?

सारे मोजूनमापून केले पाहिजे. मोजके खाणे, मोजके पिणे, मोजके बोलणे, मोजके चालणे, मोजकी निद्रा इंद्रियांना सारे द्यावयाचे, परंतु मोजूनमापून प्रमाणात द्यावयाचे. असे करीत गेल्याने जीवनात प्रसन्नता राहील. ही गोष्ट केवळ काल्पनिक नाही, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.

आपण समजा अधिक जेवलो. भजी आहेत, खाल्ली वाटेल तितकी; बासुंदी आहे, ओरपली भराभर; तर काय होईल? आलस्य येईल. अधिक खाल्ले की अधिक लोळावे लागते. एवढ्याने भागले असे नाही. अपचन होईल, अजीर्ण होईल, पोट दुखेल. कदाचित आजारीही पडण्याचा संभव. क्षणभर जिभेचे सुख अनुभवले, परंतु पुढे दहा दिवस अन्नाची रुची वाटणार नाही. पुढे दहा दिवस काही करता येणार नाही. कोठले कर्म नि कोठले काय!

रात्री गाणे आहे, बसलो दोन वाजेपर्यंत ऐकत. मग झोप पुरी होत नाही. झोप पुरी मिळाली नाही तर पचन नीट होत नाही. दुसऱ्या दिवशी कामही नीट होणार नाही. काम करताना डोळे पेंगू लागतील. अशा प्रकारे कर्मसिद्धी होणार नाही.

ज्याचे जीवन काहीतरी ध्येयासाठी आहे, त्याचे जीवन सेवेसाठी आहे, त्याने म्हणून प्रमाणात सारे केले पाहिजे. प्रमाणात सारी शोभा आहे, प्रमाणात सौंदर्य आहे, संयमात सौंदर्य आहे. संयमाची पुष्कळ अविवेकी लोक टिंगल करतात. आम्हांला ही बंधने नकोत असे ते म्हणतात. परंतु स्वतः स्वतःवर घातलेली बंधने ही बंधने नाहीत. आपल्या लहरींचे गुलाम असणे म्हणजे काही स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे विकास; आणि संयमाशिवाय विकास नाही.

तुम्ही सर्व सृष्टीत पाहा. सर्वत्र संयम दिसेल. वृक्षच पाहा ना. हा वृक्ष मुळांनी बांधून ठेवलेला आहे. वृक्ष जर म्हणेल, “मी असा पृथ्वीशी काय म्हणून बांधला जाऊ? उडू दे मला आकाशात, तोडा माझी मुळे”, तर तो मरेल. जर वृक्षाची मुळे तोडली, तर वृक्ष जगेल का? वृक्ष मुळांनी बांधलेला आहे, म्हणूनच तो उंच जात आहे. म्हणूनच फुले-फळे त्याच्यावर येत आहेत. त्याच्या संपत्तीचे रहस्य त्या दृढ संयमात आहे.

सतार घ्या. सतारील तारा असतात. त्या तारा नुसत्या जमिनीवर ठेवा. त्या तारांवरून बोट फिरवा. त्या तारांतून ध्वनी बाहेर पडणार नाही. त्या तारांतून संगीत बाहेर पडणार नाही. परंतु त्या तार सतारीच्या खुंटीला बांधा, मग त्या बंधनात घातलेल्या तारांतून डोलविणारे संगीत स्रवू लागते. त्या जड तारा चिन्मय होतात. त्यांच्यातून अपरंपार माधुरी पाझरू लागते. संयमातून संगीत प्रकट होते.

नदी पाहा. डोंगरावरील पाणी दाही दिशांस गेले तर त्याचा प्रवाह होणार नाही. परंतु ते पाणी एका विशिष्ट दिशेने जाईल तर त्याचा प्रवाह होईल. प्रवाहाला तीरांचं बंधन असते. नदी दोन तटांनी बांधलेली आहे. त्या दोन तीरांतून ती वाहते. मला तीरांचं बंधन नको असे जर ती म्हणेल, तर काय होईल? पाणी सर्वत्र पसरेल व चार दिवसांत ते आटून जाईल. नदीला बंधन आहे म्हणून तिला गती आहे, खोली आहे, गंभीरता आहे. तिला बंधन आहे म्हणूनच ती पुढे पुढे वाढत जाते व महासागराला जाऊन भेटते. तिला बंधन आहे म्हणूनच हजारो एकर जमीन ती सुपीक करते; सदैव ओलावा देते. नदीला बंधनामुळे अमरता आली आहे. नदीला संयमामुळे सागराची भेट घेता येत असते.

वाफ पाहा. वाफ बंधनात नसेल तर तिला शक्ती नाही. स्वैर संचार करणारी वाफ दुबळी आहे. प्रचंड नळीत बद्ध केलेली वाफ प्रचंड यंत्रे चालविते. मोठमोठ्या आगगाड्या ओढते.

संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. हे जीवन ज्यांचे त्यांना सेवेद्वारा अर्पण करावयाचे आहे.

या जीवनाला म्हणून कीड लागू देता कामा नये. देवाच्या पूजेसाठी न वास घेतलेले फूल न्यावयाचे, न कोमेजलेले, न किडलेले; रसमय व गंधमय असे स्वच्छ, सुंदर फूल न्यावयाचे. आपले जीवनपुष्पही समाजदेवाला अर्पण करावयाचे आहे. हे जीवन रसमय व गंधमय व्हावयास पाहिजे असेल तर संयमाची अत्यंत जरुरी आहे.

इंद्रियांना उत्तरोत्तर उदात्त आनंदाची सवय लाविली पाहिजे. खाण्यापिण्याचा आनंद हा पशुपक्षीही घेतात. मनुष्य हा केवळ खाण्यापिण्यासाठी नाही. त्याला खाणे पाहिजे; परंतु दुसऱ्या ध्येयासाठी ते खाणे पाहिजे आहे. खाणे-पिणे झोपणे ही माझ्या पूर्णतेच्या ध्येयाची साधने झाली पाहिजेत.

न्यायमूर्ती रानड्यांची गोष्ट सांगतात. त्यांना कलमी आंबा आवडत असे. एकदा आंब्यांची करंडी आली होती. रमाबाईंनी आंब्याच्या फोडी करून न्यायमूर्तीसमोर बशी नेऊन ठेविली. न्यायमूर्तींनी त्यांतील एक-दोन फोडी खाल्ल्या. रमाबाईंनी काही वेळाने येऊन पाहिले तर फोडी बऱ्याच शिल्लक. त्यांना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, “एवढ्या चिरून आणल्या, तुम्हांला आवडतात, मग का बरे घेत नाही?” न्यायमूर्ती म्हणाले, “आंबा आवडतो म्हणून का आंबाच खात बसू? खाल्ली एक फोड. जीवनात दुसरे आनंद आहेत.”

खाण्यापिण्याच्या गोष्टींची चर्चा करण्यात आपला किती वेळ जातो! जणू जिभेचे गुलाम आहोत आपण. परंतु आपणांस कळले पाहिजे की, शेवटी गोडी वस्तूत नसून माझ्यात आहे. मी माझी गोडी त्या त्या वस्तूत ओततो व ती वस्तू गोड म्हणून खातो. सर्व मधुरता आपल्या अंतरंगात आहे. ती गोडी ज्याला लाभली त्याला काहीही द्या, त्याला सारे गोडच लागेल.

जगातील सर्व थोर पुरुष संयमी होते. त्यांचे खाणेपिणे साधे असे. महंमद पैगंबर साधी भाकर खात व पाणी पीत. लेनिनचा आहार अत्यंत साधा होता. महात्मा गांधी पाच पदार्थांपेक्षा अधिक पदार्थ जेवताना घेत नसत. महात्माजींचा आहार-विहार असा नियमित नसता तर इतके अपरंपार काम त्यांना करताच आले नसते. देशबंधू दासांच्या पत्नी वासंती देवी देशबंधूंची फार काळजी घ्यावयाच्या. देशबंधूंच्या जेवणाकडे त्यांचे लक्ष असे. देशबंधूंना त्या म्हणावयाच्या, “आता पुरे, उठा. "

परंतु या आहार-विहाराच्या संयमापेक्षाही दुसरा संयम आहे. समाजात आनंद नांदावा म्हणून या उदात्त संयमाचे जितके महत्त्व गावे तेवढे थोडेच आहे. आपल्या हिंदुस्थानात प्राचीन काळापासून एकत्र कुटुंबपद्धती चालत आली आहे. एकत्र कुटुंबपद्धती संयमाशिवाय चालूच शकणार नाही. संयम नसेल तर दहांची तोंडे दहा दिशांस होतील! कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच इच्छांना जर प्राधान्य देऊ लागेल, तर सर्वांचे पटावयाचे कसे? सारी आदळआपट व धुसफूस चालेल.

एकत्र कुटुंबपद्धतीत जो मुख्य असतो त्याच्यावर फारच जबाबदारी असते. त्याला सर्वांची मने सांभाळावी लागतात. यासाठी त्याला अपरंपार त्याग करावा लागतो. तो मुख्य मनुष्य स्वतःच्या मुलांबाळांस आधी दागिने करणार नाही, स्वतःच्या पत्नीस आधी इरकली लुगडी घेणार नाही. आपल्या लहान भावांची मुलेबाळे, आपल्या पाठच्या भावांच्या बायका, त्यांची काळजी तो आधी घेईल. त्यांना आधी वस्त्रे, अलंकार तो घेईल. असे तो करील तरच त्याच्या शब्दाला मान राहील. तरच त्याच्याबद्दल आदर व आपलेपणा कुटुंबातील सर्वांस वाटेल. त्यागाने वैभव मिळत असते ते असे.

संध्येच्या वेळी आपण एक मंत्र म्हणतो, त्यात पुढील चरण आहे-

"सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे"

“आता कोणाचाही विरोध नाही. आता मला माझे ब्रह्मकर्म आरंभू दे.” सर्वांचा अविरोध फार महत्त्वाचे आहेत हे शब्द. आधी कोठले ब्रह्मकर्म? आधी कोठली स्नानसंध्या ? कोठले देवदेवतार्चन? कोठले जप-तप? समाजात आधी सलोखा निर्माण करा. स्नेह निर्माण करा. मानवजातीतील विरोध दूर करा, कलह मिटवा, द्वेष- "

मत्सर नाहीसे करा व मग तुमची ब्रह्मकर्मे आरंभा.' हा अविरोध कसा निर्माण होईल? संयमाने प्रत्येकजण आपल्या

वासना इच्छा यांना जर थोडासा लगाम घालील, तर अविरोध निर्माण होणे सुकर होईल. पेटीतील प्रत्येक सुर वाटेल तसा ओरडू लागला, तर संगीत कसे निर्माण होईल? त्या सुरांनी स्वतःच्या इच्छांना संयत केले पाहिजे. त्याप्रमाणे जीवनातून संगीत निर्माण व्हावे असे जर मानवजातीस प्रांजलपणे वाटत असेल, तर मानवजातीने स्वतःच्या सुरांवर संयम घातला पाहिजे. इटली आपला सूर फारच उंच काढील, जर्मनी तिकडून बोंबलत उठेल, जपान आदळआपट करीत भांडत बसेल, तर संगीत कसे निर्माण व्हावयाचे?

भारतीय जीवनात आज संगीत नाही. प्रांताप्रांतांत भांडणे आहेत. मतभेद असू शकतात, परंतु मतभेदांतून मत्सराची भुते उठतात तेव्हा भय वाटते. भारताचा राष्ट्रव्यापक एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रयोग आहे. भारत हे एक राष्ट्र आहे. पूर्वजांनी भारताचे तुकडे कधी कल्पिले नाहीत. आपल्या डोळ्यांसमोर भारतीय ऐक्याची भव्य कल्पना त्यांनी सदैव ठेविली होती. आपण स्नान करताना केवळ महाराष्ट्रातील नद्यांचे स्मरण नाही करणार, तर सर्व भरतखंडातील नद्यांचे स्मरण करतो. “हरगंगे, यमुने, नर्मदे, तापी, कृष्णे, गोदावरी, कावेरी-" असे आपण म्हणतो. कलशाची पूजा करताना त्या लहान कलशात सारा हिंदुस्थान आपण पाहात असतो.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥

अशा प्रमुख नद्यांचे स्मरण आपण करतो. “अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवन्तिका । पुरी द्वारावती चैव” अशा या पवित्र सप्तपुरी आपण भारताच्या चारी दिशांत ठेविल्या आहेत.

दुर्लभं भारते जन्म |

असे ऋषीने मोठ्या गौरवाने म्हटले आहे. पूर्वजांच्या डोळ्यांसमोर अंग, वंग, कलिंग नसे; गुर्जर, विदर्भ, महाराष्ट्र नसे; त्यांच्या डोळ्यांसमोर 'भारत' असे!

या विशाल भारतात अनेक प्रांत आहेत. मोठ्या कुटुंबात पुष्कळ भाऊ असावेत, त्याप्रमाणे या विशाल भारतीय कुटुंबात पुष्कळ भाऊ आहेत. या भावांनी परस्परांशी संयमाने वागले पाहिजे. एक कुटुंबात राहावयाचे असेल तर आपापलीच तुणतुणी वाजवून चालणार नाही. आपापलेच सूर उंच करून भागणार नाही. युरोपात लहान लहान अनेक देश विभक्त आहेत. आणि कापाकापी करीत आहेत. तसे जर भारताचे व्हावयास नको असेल तर भारताने जपले पाहिजे. आणि एकत्र कुटुंबात दुसऱ्याचे सुखदुःख आधी पाहावयाचे, आधी माझे नाही, आधी तुझे; हे जसे करावे लागते, तसेच आपणांस भारतीय संसारात करावे लागेल. महाराष्ट्रीयाने गुजरातला म्हणावे, “धन्य गुजरात! महात्माजींस जन्म देणारा गुजरात धन्य होय.” गुजरातने महाराष्ट्रास म्हणावें, “धन्य महाराष्ट्र ! लोकमान्यांना जन्म देणरा, छत्रपती श्रीशिवाजीस जन्म देणारा शूरांचा महाराष्ट्र धन्य आहे! बंगालला म्हणावे, “बा वंग देशा ! कृतार्थ आहेस तू! जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र, रवीन्द्र यांना जन्म देणाऱ्या! देशबंधू, सुभाषबाबू यांना जन्म देणाऱ्या! श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांना प्रसवणाऱ्या ! बलिदान देणाऱ्या शेकडो सुपुत्रांनी शोभणाऱ्या! धन्य आहे तुझी !” पंजाबला म्हणावे, “हे पंजाबा ! दयानंदांची तू कर्मभूमी! स्वामी रामतीर्थांची जन्मभूमी! श्रद्धानंद, लालाजी, भगतसिंग यांची तू माता ! थोर आहेस तू!” सरहद्द प्रांताला म्हणावे, “पंचवीस लाख लोकांतून सोळा हजार सत्याग्रही देणाऱ्या तेजस्वी प्रांता! धन्य आहे तुझी ! देवाचे सैनिक देणाऱ्या प्रांता! तू भारताची शोभा व आशा आहेस !” अशा रीतीने सारे प्रांत परस्परांची मुक्तकंठाने स्तुती करीत आहेत, एकमेकांचा गौरव करीत आहेत, एकमेकांचा प्रकाश घेत आहेत, एकमेकांपासून स्फूर्ती घेत आहेत, एकमेकांचे हात हातांत घेत आहेत, -असा देखावा या भारतात दिसला पाहिजे ! परंतु याला मोठे मन हवे. याला संयम हवा. स्वतःचा अहंकार दूर राखावयास हवा.

जो दुसऱ्याच्या सुखदुःखांचा विचार करू लागला, त्याला संयम सुलभ वाटतो. मी असे केले तर त्याला काय वाटेल, मी असे बोललो तर त्याचा काय परिणाम होईल, असे लिहिल्याने व्यर्थ मने तर नाही ना दुखावली जाणार, जोराने पाय आपटीत गेलो तर कोणाची झोप नाही ना मोडणार, रात्री रस्त्याने मोठ्याने चर्चा करीत वा गाणी गात गेलो तर कोणास त्रास नाही ना होणार, सभास्थानी आपण आपसांत चर्चा करू लागलो तर व्याख्यान ऐकून घेण्यास इतरांस अडचण तर नाही ना होणार, एक का दोन, शेकडो बारीकसारीक गोष्टींच्या वेळी दुसऱ्यांची आठवण झाली पाहिजे. परंतु आपल्या देशात ही सवयच नाही. दुसऱ्यांचा विचार क्षणभरही आपल्या मनात डोकावत नाही. कारण सहानुभूती कमी. जेथे सहानुभूती नाही तेथे संयम नाही.

दुसऱ्याला आपल्या कृत्यापासून उगीच त्रास होईल ही भावनाच आपल्या लोकांच्या मनातून गेली आहे. जणू मीच काय तो एकटा जिवंत आहे. आजूबाजूला कोणी नाही, या भावनेने आपण वागत असतो. पाश्चिमात्य देशांत ही वस्तू नाही. पाश्चिमात्य देशांत त्यांच्या सार्वजनिक जीवनात संयम अधिक आहे. ते रस्त्यातून उगी गोंगाट करणार नाहीत. दुसऱ्याला त्रास होईल असे काही करणार नाहीत. सर्वत्र व्यवस्थितपणा आढळेल. संयमाशिवाय व्यवस्थितपणा येत नसतो. जेथे संयम नाही तेथे सारी बजबजपुरीच ! आपल्या सभा पाहा, आपल्या मिरवणुकी पाहा, स्टेशनवर तिकिटाच्या तेथे पाहा. सर्वत्र संयमहीन जीवन आढळेल. आणि कोणी संयम सुचविला तर त्याचीच टर उडविण्यात येते! “अहो, जरा हळू बोला!” असे कोणास सुचविले, तर “गप्प बसा, मोठे आलेत शिष्ट!” असे पुणेरी जोडे एकदम मिळावयाचे!

एखादा शब्द आपण एकदम बोलतो आणि त्याने कायमची मने तोडली जातात. एखादे भरमसाट विधान करतो आणि कायमची वैर उत्पन्न होतात. आणि एकदा तुटलेली मने जोडणे कठीण आहे. फुटलें मोतीं तुटलें मन । सांधूं न शके विधाता ।।

जगात जोडणे कठीण आहे, तोडणे सोपे आहे. वृक्ष वाढविणे कठीण आहे, परंतु त्याला एका क्षणात तोडून टाकता येते. घर बांधणे कठीण, पाडणे सोपे. आपणांस जीवने जोडावयाची आहेत. ती संयमाने जोडता येतील.

आपण रेड्याला कमी मानतो. कारण तो संयमी नाही. तो सारखीच शिंगे उगारतो, सारखेच डोळे वटारतो. आपण त्या पशूंना किंमत देतो, – जे संयमी आहेत, जे लगाम घालून घेतात, गाडीला नीट चालतात, नांगर नीट ओढतात, जो घोडा लगाम घालून घेणार नाही, त्याला कोण जवळ करील? त्याला कोण किंमत मोजील? पशूला चामड्याचा लगाम घालावा लागतो. परंतु माणसाला काही असले लगाम घालावयाचे नाहीत. बुद्धी हा माणसाचा लगात आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागणार नाही तो मनुष्य नाही. संयमी असणे ही मनुष्यत्वाची पहिली खूण आहे. परंतु ही खूण किती जणांजवळ आपणांस आढळेल? आज जगात माणसे वृक-व्याघ्रासारखीच वागत आहेत! परस्परांस खावयास उठली आहेत! स्वतःस उच्च समजून दुसऱ्यास तुच्छ लेखीत आहेत! संयमाचा संपूर्ण अभाव दिसत आहे.

दोन दगड एकत्र जोडण्यास सिमेंट लागते. संयमाचे सिमेंट जर असेल, तरच जीवने जोडली जातील. प्रांत प्रांतास, राष्ट्र राष्ट्रास जोडले जाईल. परंतु अहंकार जर असेल तर हे साधणार नाही. एखाद्या प्रांताला उज्ज्वल भूतकाळ असतो. परंतु त्या उज्ज्वल भूतकाळाच्या अहंकाराने आपण इतरांस जर पदोपदी तुच्छ मानू लागलो तर काय फायदा ? अशा वेळेस उज्ज्वल भूतकाळ नसता तर बरे, असे वाटू लागते. ज्या इतिहासामुळे मी घमेंडखोर बनतो, मीच शहाणा-बाकी दगड असे मला वाटते, तो इतिहास नसलेला पत्करला. मला भूतकाळाच्या इतिहासापासून स्फूर्ती मिळावी, परंतु ती शेजारच्या भावास हिणविण्यासाठी नसावी. महाराष्ट्राने ही गोष्ट ध्यानात धरली पाहिजे.

संयम म्हणजे शरणता नव्हे. संयम म्हणजे नेभळटपणा नव्हे. संयम म्हणजे सामर्थ्य आहे. जीवनाच्या विकासासाठी तो आहे. कर्म उत्कृष्ट व्हावे म्हणून तो आहे. सेवा उदंड हातून व्हावी म्हणून तो आहे. समाजात आनंद अधिक यावा, संगीत अधिक यावे, म्हणून तो आहे. संयम ही सर्वाभौम वस्तू आहे.


24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा