shabd-logo

मृत्यूचे काव्य

6 June 2023

35 पाहिले 35
भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!

मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप जीवन व मरण दोन्ही परम मंगल भाव. जीवन व मरण वस्तुतः एकरूपच आहेत. निशेतूनच शेवटी उषा प्रकट होते व उषेतून पुन्हा निशा निर्माण होते. जीवनाला मरणाचे फळ येते व मरणाला जीवनाचे फळ येते.

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे, असे म्हटले आहे. काम करता करता हे वस्त्र जीर्ण झाले, फाटले. ती त्रिभुवनमाउली नवीन वस्त्रे देण्यासाठी आपणांस बोलाविते. आपणांस ती उचलून घेते. पुन्हा नवीन आंगडे-टोपडे लेववून या जगाच्या अंगणात खेळावयास आपणांस ती ठेवते व दुरून गंमत बघते. कधी कधी जीव जन्मला नाही, तोच जातो. कोणी बालपणी मरतो, कोणी तरुणपणी. आई अंगरखा देऊन पाठवते. परंतु जगात पाठवले नाही तोच तिला दुरून तो अंगरखा चांगला वाटत नाही. पटकन ती बाळाला मागे नेते व नवीन अंगरखा घालते. आईच्या हौसेला मोल नाही.

माझी माता काही भिकारी नाही. अनंत वस्त्रांनी तिचे भांडार भरलेले आहे. परंतु मातेचे भांडार भरलेले आहे म्हणून दिलेले कपडे मी वाटेल तसे फाडून टाकता कामा नयेत, शक्य तो काळजीपूर्वक हा कपडा वापरला पाहिजे. तो स्वच्छ, पवित्र राखला पाहिजे आणि सेवा करता करता तो फाटला पाहिजे.

देह म्हणजे मडके. कोणी मेला तर आपण त्याच्यापुढे मडके धरतो. हे मडके होते, फुटले. त्यात रडण्यासारखे काय आहे? सेवेसाठी हे मडके मिळाले होते. महान ध्येयवृक्षांना पाणी घालण्यासाठी हे मडके मिळाले होते. कोणाचे लहान मडके, कोणाचे मोठे. नाना प्रकारची ही मडकी तो महान कुंभार निर्माण करतो व जगाची बाग तयार करू बघतो. फुटलेले मडके तो पुन्हा नीट करतो. पुन्हा ते मडके पाणी घालू लागते. असा प्रकार हा चालला आहे.

व्हिक्टर ह्यूगोने एके ठिकाणी म्हटले आहे: “मनुष्य म्हणजे काय? हा नरदेह म्हणजे काय? हा मातीचा गोळा आहे. परंतु त्यात एक चित्कळा आहे. त्या चित्कळेमुळे या मातीच्या गोळ्याला महत्त्व आहे.”

एक मातीचा गोळा बदलून विश्वंभर दुसरा तयार करतो. ती चित्कळा त्यात ठेवून पुन्हा या जगात तो पाठविण्यात येतो. ज्याप्रमाणे लहान मुले पतंग फाटला तर पुन्हा नवीन कागद घेऊन दुसरा तयार करतात, , तसेच हे. परमेश्वर जीवरूपी पतंग कोणत्या तरी अदृश्य गच्चीत बसून सारखे उडवीत आहे. त्यांना खाली वर खेचीत आहे. पतंग फाटले तर पुन्हा नीट करतो. नवीन कागद, नवीन रंग. पुन्हा ते उडवतो. नाना रंगांचे, नाना आकारांचे, नाना धर्मांचे, नाना वृत्तींचे असे हे कोट्यवधी पतंग प्रत्यही उडत आहेत, फाटत आहेत. नवीन येत आहेत. प्रचंड क्रीडा, विराट खेळ!

मृत्यू म्हणजे महायात्रा, मृत्यू म्हणजे महाप्रस्थान, मृत्यू म्हणजे महानिद्रा ! दररोजच्या धडपडीनंतर आपण झोपतो. झोप म्हणजे लघू मरण. सर्व जीवनाच्या धडपडीनंतर, अनेक वर्षांच्या धडपडीनंतरही असेच आपण झोपतो. रोजची झोप आठ तासांची. परंतु ही झोप मोठी असते, एवढाच फरक.

मृत्यू म्हणजे आईच्या कुशीत जाऊन झोपणे! लहान मूल दिवसभर खेळते, खिदळते, रडते, पडते. रात्र पडताच आई हळूच त्याला उचलून घेते. त्याची खेळणी वगैरे तेथेच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. ती आईची ऊब घेऊन बाळ ताजेतवाने होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहाने चेष्टा करू लागते. तसेच जीवाचे. जगात दमलेल्या, श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते. बाळाची इच्छा नसतानाही उचलून घेते. आपल्या सोबत्यांकडे, आपल्या सांसारिक खेळण्यांकडे बाळ आशाळभूत दृष्टीने बघत असतो. परंतु आईला बाळाचे हित ठावे. त्या रडणाऱ्या बाळाला ती घेते. कुशीत निजविते. जीवनरस पाजून पुन्हा पाठवते.

मृत्यू म्हणजे माहेरी जाऊन येणे. सासरी गेलेली लेक दोन दिवस माहेरी जाऊन येते. पुन्हा प्रेम, उत्साह, आनंद, मोकळेपणा घेऊन येते. त्याप्रमाणे त्या जगन्माउलीजवळ जाऊन येणे म्हणजेच मृत्यू. लहानपणी शाळेत जाणारी मुले मध्येच घरी जाऊन येतात. पाणी पिण्याचे निमित्त करून, भुकेचे निमित्त करून, आजारीपणाचे निमित्त करून, मुले घरी जातात. त्यांना आईचा मुखचंद्र पाहावयाची तहान असते. आईच्या प्रेमाची भूक असते. आई प्रेमाने बघते. पाठीवरून हात फिरविते. वडी देते. जा म्हणते, मुले हसत-खेळत पुन्हा प्रसन्नपणे शाळेत येतात व धडे शिकू लागतात. तसेच हे जगाच्या शाळेत कंटाळलेले, किदरलेले जीव आईचा मुखचंद्र पाहावयास आसावतात. ते आईकडे जातात. भरपूर प्रेमरस पिऊन पुन्हा या संसाराच्या महान विद्यालयात शिकू लागतात.

मरण म्हणजे विश्रांती! मरण म्हणजे अनंतात स्नान! थकलेले, कंटाळलेले लोक गावाबाहेर तलावात पोहून येतात, समुद्रात डुंबून येतात. नदीच्या पाण्यात नाचून, कुदून येतात. त्यांचा थकवा जातो. जीवनात डुंबल्यामुळे जीवन मिळते. मरण म्हणजे काय? जगात दमलेले जीव अनंत जीवनाच्या सिंधूत डुंबून येतात. हे डुंबावयास जाणे म्हणजे मरण. ही सुट्टी आहे. मरण म्हणजे अनंत जीवनात पोहून येण्यासाठी मिळालेली महान सुट्टी. त्या जीवनात न्हाऊन, माखून, पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जगात कर्मे करावयास येतो.

उंच शिखरावरच्या महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या असतात. त्याप्रमाणे परिपूर्णतेच्या शिखराकडे जाण्यासाठी जन्म- मरणाची पावले टाकीत जीव जात असतो. मरण म्हणजे एक पाऊलच, मरण म्हणजेही प्रगतीच. मरण म्हणजे पुढे जाणे. देवाकडे नेणाऱ्या पायऱ्यांना आपण प्रणाम करतो. त्या पायऱ्या पवित्र वाटतात, ध्येयसाधन वाटतात. त्याप्रमाणे मरणही पवित्र व मंगल आहे. आतल्या ध्येयाकडे ते घेऊन जाणारे आहे. मरणाला प्रणाम असो!

मरण म्हणजे एक प्रकारे विस्मरण, जगात स्मरणाइतकेच विस्मरणाला महत्त्व आहे. जन्मल्यापासून ज्या ज्या गोष्टी आपण केल्या, जे जे ऐकिले, जे जे पाहिले, जे जे मनात आले, त्या सर्वांचे जर सारखे आपणांस स्मरण राहिले तर तो केवढा भार होईल! त्या प्रचंड पर्वताखाली आपण चिरडले जाऊ. हे जीवन असह्य होईल.

व्यापारी ज्याप्रमाणे हजारो घडामोडी करतो, परंतु शेवटी एवढा फायदा किंवा एवढा तोटा, एवढी सुटसुटीत गोष्ट ध्यानात धरतो, तसेच जीवांचे आहे. मरण म्हणजे जीवनाच्या व्यापारातील नफा-तोटा पाहण्याचा क्षण. साठ-सत्तर वर्षे दुकान चालविले, त्याचा आढावा घेण्याची वेळ म्हणजे मरण. त्या नफ्या-तोट्याच्या अनुभवाने शहाणे होऊन आपण पुन्हा दुकाने थाटतो. आईची अनुज्ञा घेऊन पुन्हा व्यापार करावयास आरंभ करतो. कनवाळू, स्वातंत्र्य देणारी आई कधी प्रतिबंध करीत नाही.

मरणाची फारच आवश्यकता असते. कधी कधी जगातून या सद्यःकालीन नामरूपाने नाहीसे होणे हे इष्ट व आवश्यक असते. एखादा मनूष्य, समजा, वाईट रीतीने वागत होता. या माणसास पश्चात्ताप होऊन पुढे तो जरी चांगल्या रीतीने वागू लागला, तरी जनतेला त्याच्या काळ्या भूतकाळाचे विस्मरण होत नाही. लोक म्हणतात, “तो अमुक मनुष्य ना? माहीत आहे त्याचे सारे; 'करून करून भागले आणि देवपूजेला लागले!' उगीच सोंग करतो झाले. पुन्हा ये रे माझ्या मागल्या त्याचे सुरू होईल. कसला पश्चात्ताप नि काय!” लोकांचे हे उद्गार स्वतःची सुधारणा करू पाहणाऱ्या त्या अनुतप्त जीवाच्या मर्मी लागतात. स्वतःचा भूतकाळ तो विसरू पाहतो. परंतु जग तो विसरू इच्छीत नाही. अशा वेळेस पडद्याआड जाऊन नवीन रंग व नवीन नामरूप घेऊन लोकांसमोर पुन्हा येण्यातच मौज असते. 

मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. मरणामुळे संसाराला रमणीयता आहे. मरणामुळे जगात प्रेम आहे. आपण सारे जण अमर असतो, तर एकमेकांस विचारले नसते. सारे दगडासारखे दूर दूर पडून राहिलो असतो. उद्या आपल्याला जावे लागले तर का वाईट वागा, असे मनुष्य मनात म्हणतो व गोड वागतो. इंग्रजी भाषेत एक कविता आहे: दुःखी भाऊ म्हणतो, कोठे आहे माझा भाऊ? मी का आता एकट्याने खेळू? एकटा नदीकाठी हिंडू ? फुलपाखरांपाठीमागे धावू? कोठे आहे माझा भाऊ? तो जिवंत असतानाच त्याच्यावर प्रेम केले असते, तर किती सुरेख झाले असते! परंतु आता काय?

मरण उपकारक आहे. जीवनाने जे काम होत नाही, ते कधी कधी मरणाने होते. संभाजीमहाराजांच्या जीवनाने मराठ्यांत फूट पडली, परंतु त्यांच्या महान मरणाने मराठे जोडले गेले. ते मरण म्हणजेच अमृत ठरले. ख्रिस्ताच्या जीवनाने जे झाले नाही, ते त्याच्या क्रॉसवरच्या मरणाने झाले. मरणात अनंत जीवन असते.

आपल्याला वाटते, की मरण म्हणजे अंधार, परंतु मरण म्हणजे अमर प्रकाश, अनंत प्रकाश. मरण म्हणजे निर्वाण, म्हणजेच अनंत जीवन पेटविणे. भगवान बुद्ध म्हणत, “स्वतःचे निर्वाण करा म्हणजेच जगावर खरे प्रेम करता येईल. स्वतःला विसरा. स्वतःच्या वैयक्तिक आशा, आकांक्षा, क्षुद्र स्वार्थ-लोभ विसरा. म्हणजेच खरे अमर जीवन प्राप्त होईल.” स्वतःची सर्व आसक्ती विसरणे, स्वतःच्या देहाच्या, मनाच्या, इंद्रियांच्या स्वार्थी वासना विसरणे म्हणजेच मरणे. हे मरण या देहात असूनही अनुभवता येते. नारळातील गोटा नारळापासून अलग होऊन जसा खुडखुड वाजतो, त्याप्रमाणे देहेन्द्रियांपासून आत्म्याला अलग करून वागणे म्हणजे मरण. तुकाराममहाराज म्हणूनच म्हणत असत:

आपुले मरण पाहिलें म्यां डोळां
 तो सुखसोहळा अनुपम
 हे मरण ज्याने एकदा अनुभविले, त्याला पुनश्च मरण नाही. जिवंतपणी जो मरावयास शिकला, तो चिरंजीव झाला.

जर्मन दंतकथांमध्ये एक फार भीषण गोष्ट आहे: एक राक्षस आहे. ‘तू कधी मरणार नाहीस' असा शाप त्या दैत्याला देवाने दिलेला असतो. आपल्या देशातील राक्षसांनी हा वर मानला असता. कधीही मरण न येणे याच्याहून भाग्याची गोष्ट कोणती, असे त्यांनी म्हटले असते. परंतु तो जर्मन देशातील राक्षस अस्वस्थ होतो. त्याला जीवनाचा कंटाळा येतो. स्वतःच्या त्याच त्या जीवनाचा विसर पडावा असे त्याला वाटते. स्वतःच्या देहाचा विसर पडावा असे वाटते. देहाचा चिकटलेला हा मातीचा गोळा पडावा असे त्याच्या आत्म्याला वाटते. ही देहाची खोळ, हे देहाचे ओझे कधी गळून पडेल असे त्याला होते; परंतु त्याला मरण येत नाही. तो उंच कड्यावरून स्वतःला खाली लोटतो; परंतु चेंडूसारखा तो वर उसळतो. अग्नी त्याला जाळीत नाही, पाणी बुडवीत नाही. विष मारीत नाही. फासाचा हार होतो, विषाचे अमृत होते. देवाच्या नावाने तो दातओठ खातो. कडाकडा बोटे मोडतो. त्याच्या हृदयाची होळी पेटते. परंतु ही होळी शांत करणारे मरणाचे मेघ ओथंबून येत नाहीत. त्या अनुकंपनीय राक्षसाची केविलवाणी दीन दशा सरत नाही, मरणाचे सौभाग्य त्याला मिळत नाही.

किती असह्य आहे ही दशा ! हे मरण निर्माण करणाऱ्या परमेश्वराचे कितीही आभार मानले, तरी ते पुरेसे होणारे नाहीत. मरण म्हणजे जिवा-शिवांचे हितगूज. मरण म्हणजे जीवनातील चिखल खाली बसणे. मरण म्हणजे पुनर्जन्म.

अमावास्येला आपणांस अंधार दिसतो. अमावास्येला चंद्र नाही असे वाटते. परंतु समुद्राला सर्वांत मोठी भरती अमावास्येच्या दिवशीच येत असते. अमावास्य म्हणजे मोठी पर्वणी. अमावस्येला चंद्र-सूर्याची भेट होत असते. चंद्र सूर्याशी एकरूप होऊन जातो. त्याप्रमाणे मरण म्हणजे जीवनाची अमावास्या होय. जीव शिवाशी मिळून जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. जीव दिसत नाही, कारण तो विश्वभरात विलीन झालेला असतो. अमावास्येला सर्वांत मोठी भरती. त्याप्रमाणे मरण म्हणजे अनंत जीवनात मिळून जाणे. मरणाची अमावास्या म्हणजे जीवनाची मोठी पूर्णिमा होय.

देशबंधू दास यांनी मरणसमयी एक सुंदर कविता केली होती. त्या कवितेत ते म्हणतातः

“प्रभो! माझ्या ज्ञानाभिमानाचे गाठोडे माझ्या डोक्यावरून आता उतर. माझ्या पोथ्या पुस्तकांची पोटली माझ्या खांद्यावरून खाली घे. हा बोजा वाहून वाहून मी आता जीर्णशीर्ण झालो आहे. माझ्यात राम नाही. मी सारखा धापा टाकीत आहे. पावलागणिक मला दम लागत आहे. डोळ्यांसमोर काळोखी येत आहे. उतर, माझा भार उत्तर.

“डोक्यावर मोरमुकुट आहे, हातात बासरी आहे, असा तो राधारमण श्यामसुंदर गोपाळ पाहावयासाठी माझ्या प्राणांना तहान लागली आहे.

“आता वेद नको, वेदान्त नको. सारे विसरून जाऊ दे. ते तुझे अनंत राज्य मला आता दिसत आहे. प्रभो! तुझ्या कुंजद्वारात मी आलो आहे. माझ्या प्रिय अशा त्या द्वारात मी आलो आहे. माझा विझू पाहणारा दिवा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी तुझ्या दारात मी आलो आहे.”

मरण म्हणजे तेल संपत आलेला दिवा भरून आणणे; नंदादीप पुन्हा प्रज्वलित करणे. प्रकाश आणण्यासाठी जाणे म्हणजे मरण. किती सहृदय आहे ही कल्पना! जगण्याचा कंटाळा नाही. सेवेचा कंटाळा नाही.

तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी

संतांचे हेच मागणे असते. या अनंत जगात पुनःपुन्हा ते खेळावयास

येत असतात. मोठे धैर्याचे असे ते खेळिये असतात. भारतीय संस्कृतीत मरण म्हणजे अमर आशावाद आहे. भारतीय संस्कृती-सारखी आशावादी दुसरी संस्कृती नाही. मरणानंतर पुन्हा तू खेळावयास येशील. रात्री झोपून सकाळी उठलेले बालक पुन्हा पूर्वीच्या खेळण्यांशी खेळते त्याप्रमाणे आपण मेल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या गोष्टींस आरंभ करतो. आदल्या दिवशी अर्धवट विणलेले वस्त्र दुसऱ्या दिवशी पुन्हा विणकर विणू लागतो, तसेच आपण करतो. पूर्वीच्या सर्व गोष्टी हळूहळू आपणांस आठवतात. पूर्वीचे ज्ञान आपल्याजवळ येते. पूर्वीचे अनुभव येतात. पूर्वजन्मीच्या इतर सर्व गोष्टींचे विस्मरण पडून ज्ञानानुभवाचा जो अर्क, तो आपणांजवळ असतो. पूर्वजन्मीचे सार घेऊन आपण नवीन जन्माला आरंभ करतो. काही फुकट जात नाही, आशेने काम कर, हळूहळू तू पूर्ण होशील, असा आशावाद भारतीय संस्कृती देत आहे. धीर सो गंभीर. मरण म्हणजे पुन्हा नवीन जोमाने, नवीन उत्साहाने ध्येयाची गाठ घेण्याची सिद्धता !

मरण म्हणजे सक्तीने अनासक्ती शिकवणे. उपनिषदे म्हणतात, “ तेन त्यक्तेन भुञ्जीथाः” “अरे, जगात दुसऱ्याची झीज भरून काढ आणि मग तू स्वतः उपभोग घे.” परंतु आपण हा आदेश विसरत असतो. आपण कोठारे भरतो, स्वतःच्या नावावर पैसे साठवतो. शेजारी दुःखी दुनिया मरत असते. आणि जीवाचा उद्धार करणारे मरण येते. या संचयाच्या पंकातून जीवाला वर उचलण्यासाठी मरण म्हणजे मातेचे मंगल हात. आसक्तीच्या चिखलात वरबटलेल्या जीवाला धुऊन स्वच्छ करू पाहणारे ते हात.
 धुळीमध्यें गेलें तन-मन मळून
 तुझ्या अमृतहातें टाकी रे धुऊन
 तुझ्या पायाजवळीं ठेवी रे निजवून
 काय सांगू देवा, कोणा सांगू? |

अशी जीवाची, आतील हृदयाची हाक असते. जगातील कोणतीही अन्य वस्तू ही घाण दूर करू शकणार नाही. शेकडो देवालये फोडून जमा केलेल्या अगणित संपत्तीच्या चिखलात महंमद रुतला होता. बेडकाप्रमाणे त्या चिखलात तो आनंदाने उड्या मारीत होता. देवाला मानवाचा हा अधःपात पाहवला नाही. महंमदाला उचलण्यासाठी तो धावला. महंमद रडू लागला. तो आसक्तिमय पसारा त्याला सोडवेना; परंतु देवाने त्याला वर उचलले; मरणाचा साबण लावून त्याला धुतले.

मदीय मालिन्य धुवावयातें
तुझ्याविणें कोण समर्थ माते ।

हे जीवाचे मालिन्य धुवावयास हातात मरणाचे अमृत घेऊन येणाऱ्या जगन्माउलीशिवाय दुसरे कोण समर्थ आहे?

मरण आपणांस सावध करते. सारे सोडून जावयाचे आहे, असे स्पष्टपणे समजून येते. जीव गादीवरून घोंगडीवर येतो. देवाच्या दारात नम्र होऊनच गेले पाहिजे. सुईच्या नेढ्यातून हत्ती एक वेळ पलीकडे जाईल; परंतु जगाला कृश, हीन दीन करून स्वतः कुबेर झालेला संपन्मत्त मनुष्य देवाच्या दारातून आत जाऊ शकणार नाही.

द्वार किलकिले स्वर्गाचे । सताड उघडें नरकाचें नरकाकडे यांच्या मोटरी जाऊ शकतील. परंतु स्वर्गाच्या अरुंद

रस्त्यातून दुसऱ्यासाठी झिजून चिपाड झालेला मनुष्य जाऊ शकेल. भारतीय संस्कृती सांगते, “मरताना तरी गाद्यागिरद्यांवरून खाली

ये.” आपण बाहेर जगात मिरवतो तेव्हा कोट-बूट घालून जातो. सर्वं ऐट त्या वेळेस असते. परंतु सायंकाळी घरी येऊन तुळशीच्या अंगणात बसलेल्या आईला जेव्हा आपण भेटावयास जातो, तेव्हा उपरणे, रुमाल, कोट सारे ओटीवरच राहते. आपण आईचा मंगल हात अंगावरून फिरावा म्हणून तिच्याजवळ उघडे येऊन बसतो. त्याप्रमाणे जगात मिरविल्यानंतर जेव्हा आयुष्याच्या सायंकाळी आपण त्या परम थोर मातेला भेटावयास जाऊ त्या वेळेस उघडे होऊन गेले पाहिजे. एक भक्तिप्रेमाचे वैभव घेऊन आईजवळ जावयाचे.

परंतु मनुष्याला कधी कधी आईलाही उघडे होऊन भेटावयाची लाज वाटते. दुर्योधन आईची कृपादृष्टी सर्वांगावर पडून अमर होण्याची इच्छा करीत होता. परंतु त्याला लाज वाटली. फुलांची चड्डी तरी तो नेसलाच. त्याचे इतर शरीर अमर झाले, परंतु मांड्या भीमाच्या गदेने चूर्णं झाल्या! आईजवळ आडपडदा नको. अमर जीवन पाहिजे असेल तर मातेजवळ मूल होऊन जा. जन्माला आलेत तेव्हा घोंगडीवर आलेत. आता मरताना घोंगडीवर मरा. जन्मताना बाळ व मरताना बाळ. फरक इतकाच की, जन्मताना आईपासून दूर आलेत म्हणून रडलेत. आता मरताना पुन्हा आईजवळ जावयाचे आहे म्हणून हसा. जन्मताना आपण रडलो, परंतु लोक आनंदाने हसले, आता मरताना आपण हसू व लोक आपली गोड आठवण करून रडतील असे करू.

जीवन कसे जगलो, याची परीक्षा म्हणजे मरण. तुमच्या मरणावरून तुमच्या जीवनाची किंमत करण्यात येईल. जो मरताना रडेल, त्याचे जीवन रडके ठरेल. जो मरताना हसेल, त्याचे जीवन कृतार्थं समजण्यात येईल. थोरांचे मरण म्हणजे एक दिव्य वस्तू आहे, ते अनंताचे दर्शन आहे. किती शांती, किती समाधान!

सॉक्रेटीस मरताना अमृतत्व भोगीत होता. गटे मरताना म्हणाला,- “अधिक प्रकाश, अधिक प्रकाश. " तुकाराम महाराज 'रामकृष्ण हरि' करीत गेले. समर्थ म्हणाले, “माझा दासबोध आहे, रडता का?” लोकमान्य " यदा यदा हि धर्मस्य" हा श्लोक म्हणत गेले. पंडित मोतीलाल नेहरू गायत्रीमंत्र म्हणत गेले. देशबंधू दास “आलो, तुझ्या प्रियतम दारात दिवा पुन्हा पेटविण्यासाठी आलो” असे म्हणाले. हरिभाऊ आपट्यांजवळ मरताना नामदार गोखले म्हणाले, “हरिभाऊ ! या जगाची गंमत पाहिली. आता त्या जगातील " भगिनी निवेदिता निजधामाला जाताना म्हणाल्या, “तो पहा पाहू." उषःकाल होत आहे. भारताचा उषःकाल येत आहे. प्रकाश पाहून मी मरत आहे. धन्य!” शिशिरकुमार घोष चैतन्यचरित्रामृताचा जो शेवटला भाग, त्यातील शेवटच्या पानातील शेवटच्या ओळीचे मुद्रित पाहून म्हणाले, 'आता माझे काम संपले. निताई गौर ! घ्या आता मला पदरात.' हे शब्द बोलून त्या महापुरुषाने डोके उशीवर टेकले ते टेकलेच! महात्मा गांधींचे प्राण पुण्यश्लोक मगनलाल गांधी, “मंगल मंदिर खोलो, देवा! दार उघड. दिव्य प्रेमामृताची तहान लागलेला हा बालक तुझ्या दारात येत आहे. प्रेमाचा पाऊस पाड. या संसारात भटकून भटकून दमलेल्या या बाळाला पोटाशी घे. तुला गोड हाका मारणाऱ्या या मुलाजवळ देवा, गोड गोडवे बोल. उघड, तुझे मंगल दार उघड. " अशा अर्थाचे दिव्य गीत म्हणत निजधामास गेले.

जगात अशी कितीतरी थोर महाप्रस्थाने झाले असतील. मरण म्हणजे मेवा. मरण म्हणजे शांती. मरण म्हणजे नवजीवनाचा आरंभ. मरण म्हणजे आनंदाचे दर्शन. मरण म्हणजे पर्वणी. जिवाशिवाच्या ऐक्याचे संगीत. मरण म्हणजे प्रियकराकडे जाणे.

कर ले शृंगार चतुर अलबेली ।
 साजन के घर जाना होगा |
 मिट्टी ओढावण मिट्टी बिछावन ।
 मिट्टीमें मिल जाना होगा ।
 नहाले धोले शीस गुंथा ले ।
 फिर वहाँ से नहिं आना होगा ।

“आज प्रियकराच्या घरी जावयाचे आहे. शृंगार - साज सारा कर. मातीची ओढणी अंगावर घे. मातीच्या शय्येवरच आज मिळून जावयाचे आहे, न्हाऊन माखून तयार हो. नीट केस वगैरे विंचर. वेणीफणी कर. एकदा त्या घरी गेल्यावर फिरून नाही येणे होणार. कर सारी तयारी. "

किती सुंदर आहे हे गाणे ! किती सुंदर आहे भाव! मरण म्हणजे जगाचा वियोग, परंतु जगदीश्वराशी योग ! जिवाशिवाची लग्नघटिका म्हणजे मरण! आपण मनुष्य मेला म्हणजे त्याला नवे वस्त्र नेसवितो. त्याला अंघोळ घालतो, त्याला सजवितो. जणू ते विवाहमंगल असते! मरण म्हणजे विवाहमंगल! मरण म्हणजे विवाहकौतुक!

भारतीय संस्कृतीने मरणाची नांगी काढून टाकली आहे. भारतीय संस्कृतीने मरणाला जीवनाहून सुंदर व मधुर बनविले आहे. 'प्राणो मृत्युः' -मृत्यू म्हणजे प्राण असा सिद्धान्त स्थापिला आहे. मरण म्हणजे गंमत. मरण म्हणजे मेवा. मरण म्हणजे अंगरखा काढणे. मरण म्हणजे चिरलग्न.

ज्या संस्कृतीने मरणाचे जीवन बनविले, त्या संस्कृतीच्या उपासकांत आज मरणाचा अपरंपार डर भरून राहिला आहे. मरण हा शब्दही त्यांना सहन होत नाही. केवळ शरीराला कुरवाळणारे सारे झाले आहेत. महान ध्येयासाठी ही देहाची मडकी हसत हसत फोडावयास जे निघतील, तेच भारतीय संस्कृतीचे खरे उपासक! कातडी सांभाळणारे भारतीय संस्कृतीचे पुत्र शोभत नाहीत. भारतातील सर्व प्रकारचे दैन्य- दास्य, सर्व प्रकारचे विषमय वैषम्य, सर्व प्रकारचा अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील, त्या वेळेसच भारतीय संस्कृतीचा सुगंध दिगंत जाईल व भारत नवतेजाने फुलेल.

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा