हा भाऊ कोणाला दान देत असेल, तेथे कोणी बुद्धीवान म्हणेल की, अरे, याला का देताय ? तेव्हा तो भाऊ म्हणेल, 'आता देऊ या ना, गरीब आहे.' असे म्हणून दान देतो आणि तो गरीब घेतो. पण तो बुद्धिवान जो बोलला त्यामुळे त्याने अंतराय टाकला. म्हणून मग त्याला त्याच्या दुःखातही कोणी दाता भेटणार नाही. जिथे स्वतः अंतराय टाकतो, त्याच जागेवर तो अंतराय काम करतो.
प्रश्नकर्ता: वाणीने अंतराय टाकले नसेल, पण मनाने अंतराय टाकले असतील तर ?
दादाश्री मनाने टाकलेल्या अंतरायाचा जास्त परिणाम होतो. ते तर दुसऱ्या जन्मात परिणाम करतात. आणि हे वाणीने बोललेल्याचा परिणाम या जन्मात होतो. वाणी निघाली की नगदी झाले, कॅश झाले. म्हणून मग फळ सुद्धा नगद येते आणि मनाने जे चित्रण केले ते तर पुढच्या जन्मी रुपक होऊन येणारच.