एक मनुष्य माझा सल्ला मागत होता की मला पैसे द्यायचे आहे, तर मी कशा प्रकारे देऊ? तेव्हा मी विचार केला, याला पैसे देण्याची समज नाही. मी म्हणालो तुझ्याजवळ पैसे आहेत ? तर तो म्हणाला 'हो'. तेव्हा मी म्हणालो की, 'अशा प्रकारे दे.' मी जाणत होतो की तो माणूस मनाचा खूपच स्वच्छ आहे, आणि भोळाभाबडा आहे. त्याला खरी समज द्यावी.
म्हणजे गोष्ट अशी होती की आम्ही एका सदगृहस्थाकडे गेलो होतो. त्याने मला गाडीत सोडण्यासाठी एक माणूस पाठवला. फक्त सोडण्यासाठीच. त्याने त्या डॉक्टरला सांगितले की दादाजींना गाडीत सोडायला तुम्ही जाऊ नका, मी त्यांना सोडून येईल. म्हणजे असे ते सोडायला आले आणि त्यात आमचा वार्तालाप झाला. तो माणूस माझा सल्ला मागत होता की 'मला पैसे द्यायचे आहे तर ते कुठे द्यायचे, कसे दयायचे ?' बंगला बनवला आहे म्हणजे पैसे तर कमवले असतील. त्यावर तो म्हणाला, 'बंगला बनवला, सिनेमा थियेटर बनवले. आताच सव्वा लाख रुपयांचे तर माझ्या गावात दान दिले. ' तेव्हा मी म्हणालो की, 'जास्त कमवले असाल, तर एखादी आप्तवाणी छापून दया.' त्यावर लगेच तो म्हणाला 'तुमच्या सांगण्याचीच वेळ आहे, हे तर मला माहितच नव्हते. मला कोणी समजावतच नाही.' मग तो म्हणाला, 'या महिन्यातच लगेच छापून देईन.' नंतर पुढे विचारतो की किती खर्च होईल ? तेव्हा म्हणालो की, 'वीस हजार होतील, ' लगेच म्हणतो की, 'इतकी पुस्तके मला छापून द्यायची आहेत!' मी त्याला घाई न करण्यास सांगितले. म्हणजे अशी भली माणसे असतात ज्यांना दान कसे देणे हे समजत नसते, आणि ते सुद्धा त्याने विचारले तर आम्ही सांगतो. आम्हाला माहित आहे की तो साधाभोळा आहे. त्याला समजत नाही म्हणून मग त्याला सांगतो. बाकी, समजदारांना तर काही सांगण्याची आम्हाला गरज नाही ना! नाहीतर त्याला दुःख होईल. आणि दुःख होईल असे आम्हाला नकोच. इथे पैशांची गरजच नाही. सरप्लस असेल तरच द्या. कारण ज्ञानदानासारखे दुसरे कोणतेही दान नाही या जगात !
कारण या ज्ञानाची पुस्तके कोणी वाचेल, तर त्याच्यात कितीतरी परिवर्तन होईल. म्हणून असेल तर दयावे, नसेल तर आपल्याकडे तशी काही गरजही नाही.