प्रश्नकर्ता: परंतु बऱ्याच वेळा आपल्याला द्वेष करायचा नसतो
तरी द्वेष होतोच, याचे काय कारण?
दादाश्री : कोणाबरोबर ?
प्रश्नकर्ता: समजा नवऱ्याबरोबर असे झाले तर ?
दादाश्री त्यास द्वेष म्हणत नाही. जे आसक्तीचे प्रेम आहे ना ते नेहमीच रिअॅक्शनरी असते. म्हणजे ते जर चिडले तर हे त्यांच्याकडे पाठ फिरवतात. पाठ फिरवली की थोडे दिवस एकमेकांपासून दूर राहतात, दूर राहिल्यामुळे परत प्रेम वाढते, प्रेम वाढले की ते प्रेम बोचते तेव्हा पुन्हा वाद होतो, नंतर पुन्हा प्रेम वाढते. म्हणजे जिथे अत्याधिक प्रेम असते तिथेच बाद होत असतात. तेव्हा जिथे वाद होत असतील ना, तिथे त्यांच्यात प्रेम आहे असे समजावे. प्रेम आहे म्हणूनच वाद होतात. हे पूर्व जन्मीचे प्रेम आहे म्हणून वाद होतात. अत्याधिक प्रेम आहे, त्याशिवाय वाद होणारच नाही ना! वादाचे स्वरूपच हे असे आहे..
लोक यास काय म्हणतात ? संघर्षामुळेच तर आमचे प्रेम आहे, असे म्हणतात. तेव्हा ही गोष्ट सुद्धा खरीच आहे. ही आसक्ती संघर्षामुळेच तर झाली आहे. जिथे संघर्ष कमी, तिथे आसक्ती नसते. ज्या घरात पती- पत्नीमध्ये संघर्ष कमी होत असतील तिथे आसक्ती कमी आहे असे समजावे, समजेल अशी गोष्ट आहे ना ही ? प्रश्नकर्ता: हो. आणि जास्त आसक्ती असेल तिथे मत्सर पण जास्त असतो ना ?
दादाश्री आसक्ती मुळेच तर ही सर्व झंझट होत असते. ज्या घरात नवरा-बायको आपापसात खूप भांडत असतील तर आपण समजावे की इथे आसक्ती जास्त आहे, इतके समजूनच घ्यावे. म्हणून त्यास आम्ही काय म्हणतो? 'भांडतात' असे म्हणत नाही, एकमेकाला चापट मारत असतील तरीही आम्ही 'भांडत आहेत' असे म्हणत नाही? आम्ही त्यास पोपटमस्ती म्हणतो. एक पोपट दुसऱ्या पोपटाला अशी चोच मारतो तेव्हा दुसरा पोपटही त्याला चोच मारतो, एकमेकाला चोच मारतात पण रक्त काढत नाही. हो, ही पोपट मस्ती ! तुम्ही पाहिली नाही का अशी पोपट मस्ती ?
आता जेव्हा अशी खरी गोष्ट ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्याच चुकांवर, आपल्या मूर्खपणावर हसू येते. खरी गोष्ट ऐकल्यानंतर मनुष्याला वैराग्य येते की अरे, आपण अशा चुका केल्या? फक्त चुकाच नाही पण दुःखही फार सोसले.