अर्थात जिथे प्रेम दिसत नाही तिथे मोक्षाचा मार्गच नाही. तुम्हाला काहीच येत नसेल, बोलता देखील येत नसेल, तरी सुद्धा त्यांनी प्रेम लावले तरच खरे.
म्हणजे एक तर प्रामाणिकता आणि दुसरे प्रेम, की जे कधी कमी-जास्त होत नाही. या दोन्ही जागी भगवंत राहतात. कारण जिथे प्रेम आहे, निष्ठा आहे, पवित्रता आहे, तिथेच भगवंत आहेत.
पूर्ण 'रिलेटिव्ह डिपार्टमेंट' पार केल्यानंतर निरालंब होतो, तेव्हा प्रेम उत्पन्न होते. ज्ञान कुठे खरे असते ? तर जिथे प्रेमाने काम घेतले जात असेल तिथे शिवाय प्रेम असेल तिथे देणेयेणे होत नाही. प्रेम असेल तिथे एकता असते. जिथे फी असते तिथे प्रेम नसते. लोक फी ठेवतात ना पाच दहा रुपये ? की 'या, तुम्हाला ऐकायचे असेल तर इथे या, इथे नऊ रुपये फी आहे,' असे म्हणतात. म्हणजे हा धंदाच झाला! तिथे प्रेम नसते. रुपये असतील तिथे प्रेम नसते. दुसरे जिथे प्रेम आहे तिथे ट्रिक (लबाडी) नसते. आणि जिथे ट्रिक आहे तिथे प्रेम नसते.
ज्यावर झोपेल त्याचाच आग्रह होतो, चटईवर झोपत असेल तर चटईचा आग्रह होतो आणि डनलोपच्या गादीवर झोपत असेल तर त्याचा आग्रह होता. चटईवर झोपण्याचा आग्रह करणाऱ्याला गादीवर झोपवाल तर त्याला झोप लागणार नाही. आग्रह हेच विष आहे आणि निराग्रहता हेच अमृत आहे. जोपर्यंत निराग्रहीपण उत्पन्न होत नाही तोपर्यंत जगाचे प्रेम संपादन होत नाही. शुद्ध प्रेम निराग्रहतेमुळे प्रकट होते आणि शुद्ध प्रेम हेच परमेश्वर आहे.
म्हणजे प्रेम स्वरूप केव्हा होता येईल ? तर नियम वियम वगैरे काही शोधणार नाही तेव्हा. जर नियम शोधाल तर प्रेम स्वरूप होता येणार नाही. 'का उशिरा आलात ?' म्हटले तर ते प्रेमस्वरूप म्हटले जात नाही आणि जेव्हा प्रेम स्वरूप व्हाल तेव्हा लोक तुमचे ऐकतील. हो, तुम्ही आसक्तीवाले तर तुमचे कोण ऐकेल ? तुम्हाला पैसे हवेत, तुम्हाला दुसऱ्या स्त्रिया हव्यात, ती आसक्तीच म्हटली जाईल ना ? शिष्य गोळा करणे ती सुद्धा आसक्तीच म्हटली जाईल ना ?