प्रश्नकर्ता: संसारात राहिल्यावर कित्येक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि जबाबदाऱ्या पार पाडणे तो एक धर्मच आहे. त्या धर्माचे पालन करताना जाणते-अजाणतेपणी कटू वचने बोलावी लागतात, तर ते पाप किंवा दोष मानले जाते का? या संसारी धर्माचे पालन करते वेळी कटू वचने बोलावी लागतात, तर ते पाप किंवा दोष आहे ?
दादाश्री : असे आहे ना, कटू वचन बोलतेवेळी आपला चेहरा कसा होऊन जातो ? गुलाबाच्या फुलासारखा होतो नाही का? म्हणजे आपला चेहरा बिघडला तर समजायचे की पाप लागले. कटूवचन बोलू नये. मुलाशी हळूवारपणे, शांतपणे बोला. मोजकेच बोला, परंतु शांतपणे, समजून बोला, प्रेम ठेवा, तर एक दिवस जिंकाल. कटूतेने जिंकू शकणार नाही. उलट तो विरोध करेल आणि त्याच्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे तो मनात ठरवेल की 'आता तर मी वयाने लहान आहे, म्हणून मला इतके झिडकारता पण मी मोठा झाल्यावर तुम्हाला बघून घेईल. ' तेव्हा असे करू नका. त्याला समजवावे. कधी ना कधी प्रेम जिंकेल. दोन दिवसातच त्याचे फळ येणार नाही, दहा दिवस, पंधरा दिवस, महिन्यापर्यंत तुमचे प्रेम असू द्या. पाहा मग त्या प्रेमाचे काय फळ येते ते तर पाहा! तुम्हाला आवडली ही गोष्ट ? कटू वचन बोलल्यावर आपला चेहरा बिघडत नाही का ?
प्रश्नकर्ता: आपण त्याला अनेकदा समजावतो, तरी सुद्धा तो समजत नसेल तर काय करावे ?
दादाश्री : समजावण्याची गरजच नाही. तुमचे प्रेम असू द्या. पण
तरी आपण त्यास हळूवार समजवावे. आपल्या शेजाऱ्यांनाही असे कटू वचन बोलतो का आपण ?
प्रश्नकर्ता: पण इतका धीर असला पाहिजे ना?
दादाश्री : आता डोंगरावरून जर एखादा दगड घरंगळत आला आणि तो तुमच्या डोक्याला लागला तेव्हा तुम्ही वर पाहता आणि मग कोणावर रागावता? त्यावेळी शांत राहता ना? तिथे कोणी दिसत नाही म्हणून आपण समजतो की हा दगड कोणी टाकलेला नाही, म्हणजे आपोआपच पडला आहे. तेव्हा कोणाचाही दोष मानत नाही. तसेच इथेही आपोआपच पडत असते. फक्त इथे टाकणारा दिसतो, बाकी आपोआपच पडत असते. हा तुमचाच हिशोब चुकता होत आहे. या जगात सर्व हिशोबच चुकते होत आहेत. नवीन हिशोब बांधले जात आहेत आणि जुने हिशोब चुकते होत आहेत. समजले ना? म्हणून मुलांबरोबर सरळ बोला, चांगली भाषा बोला.