घरच्यांसोबत 'नफा झाला' असे केव्हा म्हणता येईल ? तर घरच्या सदस्यांना आपल्यासाठी प्रेम वाटेल तेव्हा. आपल्याशिवाय त्यांना करमणारच
नाही, केव्हा येतील, केव्हा येतील ? असेच त्यांना वाटत असते. लोक लग्न करतात पण प्रेम नाही, ही तर फक्त विषयासक्ती आहे. प्रेम असेल तर एकमेकांशी वाटेल तितका विरोधाभास असला तरीही प्रेम कमी होत नाही. जिथे प्रेम नसेल तिथे आसक्ती म्हटली जाते. आसक्ती म्हणजे संडास ! प्रेम तर पूर्वीच्या काळी असायचे. पती परदेशात गेला असेल आणि तो जर परत आला नाही, तर आयुष्यभर तिचे चित्त केवळ पतीतच असायचे, दुसरे कोणी आठवतच नसे. आणि आज तर दोन वर्ष पती आला नाही तर दुसरा पती करतील. मग याला प्रेम कसे म्हणायचे ? हे तर संडास आहे. जसे संडास बदलतात तसे! जे गलन आहे, त्याला संडास म्हणतात. प्रेमात तर अर्पणता असते!
प्रेम म्हणजे लगनी लागणे (आपुलकी वाटणे) दिवसभर आठवतच राहते. लग्नाचे परिणाम दोन रुपात दिसतात, कधी भरभराटीत जाते तर कधी बरबादीत. प्रेम जास्त उफाळते आणि परत निवळते सुद्धा. जे उफाळते ती आसक्ती आहे. म्हणून जिथे उफाळते त्यापासून दूर राहावे. जिव्हाळा तर आतूनच असायला हवा. बाहेरील खोका (शरीर) बिघडला, सडला तरी सुद्धा प्रेम मात्र तसेच राहते. हे तर हात भाजला असेल आणि आपण म्हटले, की 'जरा धुवून द्या' तर नवरा म्हणेल 'नाही, माझ्याने बघवत नाही.' अरे, त्यादिवशी तर तू हात कुरवाळीत होता, आणि आज का असे ? घृणा करुन कसे चालेल? जिथे प्रेम आहे तिथे घृणा नाही आणि जिथे घृणा आहे तिथे प्रेम नाही. संसारी प्रेम सुद्धा असेच असायला हवे की जे एकदम कमी होणार नाही आणि एकदम वाढणार नाही. नॉर्मालिटीमध्ये असायला हवे. ज्ञानींचे प्रेम तर कधीही कमी-जास्त होत नाही. ते प्रेम तर वेगळेच असते, त्यास परमात्म प्रेम म्हटले जाते.
प्रेम सर्वत्र असायला हवे. पूर्ण घरात प्रेम असायला हवे. प्रेम आहे तिथे कोणी चूक काढत नाही. प्रेमात चूक दिसत नाही. आणि हे प्रेम नाही, हा इगोईजम आहे. 'मी पती आहे' असे त्याला भान आहे, प्रेम त्यास म्हणावे की चूक वाटतच नाही. प्रेमात तर कितीही चुका असतील तरी निभावल्या जातात. आले का लक्षात ?
प्रश्नकर्ता: हो, दादाजी
दादाश्री : म्हणजे चुकभूल झाली असेल तर प्रेमापोटी सोडून द्यावी. या मुलावर आपले प्रेम असेल ना, तर मुलांची चूक तुम्हाला दिसणार नाही. असू दे, काही हरकत नाही. असेच वाटते. प्रेमात सर्व निभावून घेतले जाते. निभावून घेतले जाते ना ?
बाकी, ही तर सर्व आसक्ती आहे! घटक्यात बायको गळ्यात हात घालून लगट करते, आणि घटक्यात वाद घालते. 'तुम्ही असे केले नी तुम्ही तसे केले. ' प्रेमात कधीही चूक नसते. प्रेमात चूक दिसतच नाही. हे तर प्रेम आहेच कुठे? प्रेम नको का?
जेव्हा चूक दिसणारच नाही तेव्हा आपण समजावे की याच्यावर आपले प्रेम आहे ! खरोखर प्रेम असेल का या लोकांना ?!
म्हणजे याला प्रेम म्हणायचेच कसे ?
खरे तर, या काळात प्रेम पाहायला मिळतच नाही. ज्यास खरे म्हटले जाते ते प्रेम पाहायला मिळत नाही. अरे, एक माणूस मला म्हणतो की 'माझे तिच्यावर इतके प्रेम आहे, तरीही ती माझा तिरस्कार करते, मी म्हणालो ते प्रेम नव्हे. प्रेमाचा तिरस्कार कोणी करतच नाही.'