बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi)
धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं वह पसरली माती जशी शाल पांघरली बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व हे गारलं शेत जसं अंगावरतीं शहारे
ऊन वाऱ्याशी खेयतां एका एका कोंबांतून पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी कसे वा-यानं डोलती दाने आले गाडी गाडी दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !