मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका म्हणत मनोज जरांगेंच्या एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या
Manoj Jaragne : मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असं म्हटलं.
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढणारे मनोज जरांगे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केलं. कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याकडे दिले. यावेळी जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या. न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या आधारे कुणबीप्रमाणपत्र देण्यात यावीत. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र द्यावं, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केली होती. माझ्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला, ३०० पेक्षा अधिक मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांमधील कर्ता पुरुष गेलेला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. या कुटुंबीयांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठा समाजावर आहे.