भाजपने चक्रे फिरविली आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये झालेल्या या राजकीय स्थित्यंतरामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते विनोद तावडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
भाजपने बिहारमध्ये जनता दलाचे (संयुक्त) नितीशकुमार यांच्याबरोबर मैत्रीचा हात पुढे करून सत्ता मिळविली आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील महत्वाचा मोहरा आपल्याकडे खेचून घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीचा विश्वास खच्ची करण्यात भाजपला यश मिळाले आहे. नितीशकुमार यांचे नाव ‘इंडिया’ आघाडीचे निमंत्रक किंवा विरोधकांचा पंतप्रधानपदासाठीचा चेहरा यासाठी चर्चेत होते. पण भाजपने चक्रे फिरविली आणि नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये झालेल्या या राजकीय स्थित्यंतरामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते विनोद तावडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासाठी गेले एक-दीड वर्ष त्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यानंतर भाजपला विरोधकांच्या आघाडीला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले आहे. तावडे यांच्यावर काही काळापूर्वी अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि ईशान्येतील राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती.