अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमान कमी-जास्त होत आहे. पुणे व परिसरात गारठा पुन्हा वाढला असून, उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी (ता. २२) मध्य प्रदेशातील दातीया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात किमान तापमान तीन ते सात अंशांदरम्यान आहे. उत्तर भारतात धुके आणि थंडीची लाट कायम आहे.
उत्तर कोकण आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिणअंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
यापूर्वी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १६ जानेवारीला ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सोमवारी निफाड येथे ८.८, तर जळगाव येथे नऊ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांदरम्यान आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे.