लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेतला व ठाकरे गटाला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला सुरू केले.
नगरः बऱ्याच मोठ्या काळानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नगरमध्ये मेळावा आयोजित केला होता. करोना संसर्गापूर्वी ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नगरचा दौरा केला होता. त्यानंतर कोणताही वरिष्ठ नेता नगरकडे फिरकला नव्हता. शिवसेनेत फूट पडली, नगर जिल्ह्यात काही प्रमाणात पडझड झाली तरीही कोणत्याही नेत्याने नगरकडे लक्ष दिले नव्हते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नगरमध्ये मेळावा घेतला व ठाकरे गटाला सक्रिय करण्याचा प्रयत्न केला सुरू केले. खासदार राऊत यांनी स्वतःच नगरची जबाबदारी आता माझ्याकडे असल्याचे स्पष्ट केले.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे ठाकरे किंवा शिंदे गटाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे संसदेत गेले, त्यांनी सुरुवातीला ठाकरे गटाकडे राहण्याचा निर्णय जाहीर करत नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. जुन्या ऋणानुबंधाच्या परतफेडीच्या भावनेने नगर शहरातील चार-पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, मात्र ठाकरे गटाकडील महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अबाधित राहिले. महापालिकेतील सत्तेमुळे ठाकरे गटाची नगर शहरात मोठी पडझड टळली. खासदार लोखंडे यांच्याबरोबर जाणेही अपवाद वगळता निष्ठावानांनी टाळले.