Manoj Jarange Family Reaction : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांनी आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्ही९ मराठीशी बोलताना मनोज जरांगे यांच्या पत्नीम्हणाल्या की, आरक्षण भेटल्याने नक्कीच आनंद झाला, तो आनंद शब्दात सांगता येणार नाही असा आहे. उपोषण बसणार याचं दुखः झालं होतं, त्यामुळे रडू देखील आलं होतं. पण सरकारने ती वेळ येऊ दिली नाही यासाठी सरकारला खूप शुभेच्छा. साडेपाच महिने झालं ते घरी आले नाहीत. पण आता न्याय मिळाल्याने ते नक्की घरी येतील.
मराठ्यांचा विजय झाला आहे. पप्पा घरी येतील त्याचा खूप आनंद आहे. ज्यांनी आत्महत्या केली त्यांचं हे मोठं यश आहे, त्यांच्या बलिदानामुळेच खरंतर आरक्षण मिळालं अशी प्रतिक्रिया मुलीने दिली. तर दुसरी मुलगी म्हणाली की, आज मराठ्यांचा सत्तर वर्षांचा लढा सार्थ ठरला. पप्पांनी साडेपाच महिने झालं जो संघर्ष केला त्याला फळ मिळालं. मराठा समाजाला खूप आनंद झाला आहे. मराठा समाजासाठी आज दिवाळी आहे. पप्पांना खूप त्रास सहन करावा लागला. साडेपाच महिने पप्पा घरी आले नाहीत, संभाजीनगर मध्ये रुग्णालयात भरती असताना आम्ही भेटायला जायचो. आंदोलनाच्या ठिकाणी कधी गेलो नाहीत, पप्पा घरी तर आलेच नाहीत. पप्पांचा हट्ट होता की समाजाला आरक्षण मिळवून देईन आणि आज तो पूर्ण केला आहे असे मत व्यक्त केलं.