मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. या शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
भंडारा : ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना सर्वेक्षण सुरू झाल्याने काही शाळांमध्ये बारावी आणि दहावीच्या सराव परीक्षांवर याचा परिणाम झाला आहे. अशातच आता मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. या शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचं काम जोरात सुरू आहे. शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शिक्षकांवर या कामाचा अतिरिक्त भार आल्याने त्यांनी हा भार विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकल्याची धक्कादायक घटना लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील असून या प्रकरणी मेंढे शिक्षकाचे नाव समोर आले असून शिक्षक आपल्या कामासाठी विद्यार्थ्यांना गावात फिरवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांना विचारले असताना त्यांनी शिक्षणाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर योग्य चौकशी करुन कारवाही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.