महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंतच थंडी राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज होता. आता मात्र थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे.
नागपूर : महाराष्ट्रात जानेवारी अखेरपर्यंतच थंडी राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होऊन थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, असा अंदाज होता. आता मात्र थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे.
मागील आठवड्यापासून सातत्याने किमान तापमानात घसरण सुरू आहे. परिणामी आता खऱ्या अर्थाने हिवाळा असल्याचे जाणवत आहे. मात्र, हा थंडीचा मुक्काम जानेवारीच्या अखेरीस संपणार असा अंदाज असताना आणखी दहा दिवस तो वाढला आहे. सध्या दिवसा हलकेसे ऊन जाणवायला लागले असले तरीही सायंकाळपासून थंडीची चाहूल लागते. पहाटे थंडीत आणखी वाढ होते. विदर्भात मागील आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. तर आतासुद्धा ते १४ अंश सेल्सिअसच्या आतच आहे. कमाल तापमानात वाढ असली तरी किमान तापमानातील घट कायम आहे. उपराजधानीसह गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानात घट होत आहे.