Maratha Victory: मिळवून दाखवलं का नाही! मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना खिजवलं!
Manoj Jaranage Patil Maratha Reservation News:मनोज जरांगे पाटील यांचे वाशीच्या शिवाजी चौकामध्ये विजयी स्वागत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.
मुंबई- मनोज जरांगे पाटील यांचे वाशीच्या शिवाजी चौकामध्ये विजयी स्वागत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं म्हणत होते. पण, मिळवलं का नाही आरक्षण, मराठे सोपे नाहीत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
तुम्ही पुढे पण अडचणी आणा आम्ही तेव्हाही लढू. सरकारने सर्व सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला का नाही! हा आमचा सातबारा आहे. आता आरक्षण पक्क झालं आहे. जे आवश्यक होतं ते आम्ही घेतलं आहे. मराठवाड्यासाठी गॅझेट घेतलं आहे. अनेकजण म्हणायचे मुंबईत जाऊन रिकाम्या हाताने परत येणार. पण, शेवटी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत जातोय, असं जरांगे पाटील म्हणाले.
कितीही ट्रॅप रचू द्या, कितीही आरोप करु द्या. पण, मराठा समाज माझ्या पाठिशी होता. मुंबईत आल्यावर देखील ट्रॅप रचण्यात आला होता. पण, मी ठरवलं होतं घाबरायचं नाही. आरक्षण मिळवूनच परत यायचं. मराठा समाजाने खूप संघर्ष केलाय. पण, सर्व सगेसोयरे यांना आरक्षणात घेण्याचं काम आम्ही केलं. ते सोप काम नव्हती, असं ते म्हणाले.
काहीजण मुंबईत येऊ म्हणत धमक्या देत होते, पण घेतलं का नाही आरक्षण. घेतलंच, असं म्हणत त्यांनी मुंबईत ओबीसी समाज धडकणार असं म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पुढे काही अडचणी आली तरी, घोळ घालण्याचा प्रयत्न झाला तर मी पुन्हा उपोषण करण्यास तयार होईल, असं जरांगे पाटील म्हणाले. देत नाही म्हणत होते पण आणलं का नाही खेचून, असंही ते म्हणाले.