नॅक मुल्यांकनाची श्रेणी आता बंद; जून २०२४ पासून नवी पद्धती लागू
महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे.
देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या मुल्यांकन श्रेणी पद्धतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यापुढे देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना नॅक(National Assessment and Accreditation Council) मूल्यांकना अंतर्गत श्रेणी दिली जाणार नाही.आता फक्त मुल्यांकन झाले किंवा नाही एवढेच पाहिले जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. फ. अश्या सर्व मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये समानता अथवा बदल करण्याचे प्रस्तावित होते. त्यामधील नॅकच्या अनुषंगाने गठीत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारला असून २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या नॅकच्या बैठकीत ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा झाली आणि जून २०२४ पासून ही मूल्यांकन प्रक्रिया लागू करण्याचे ठरले.
नवीन मूल्यांकनामध्ये आमुलाग्र बदल होणार असून आत्ता अस्तित्वात असलेली आणि ज्या मुळे महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे. आता फक्त त्या महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले अथवा नाही (बायनरी) एवढाच भाग असणार आहे. नॅक साठी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सोपी करणेत आली असून One Nation One Data या प्लॅटफॉर्मचा सदर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असणार आहे, महाविद्यालयांना नॅकसाठी आवश्यक असणारा डाटा हा या प्लॅटफॉर्मवर ठेवावा लागणार आहे.