अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. पूज्य साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांचीही संमेलनात उपस्थिती राहणार आहे. संमेलनात पूज्य साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शन देखील भरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संमेलनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संमेलनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. १९५२ या वर्षी ज्या जागेवर साहित्य संमेलन झाले होते. तेथेच पुन्हा संमेलनाचे आयोजन होत आहे. तीन सभा मंडप, ३०० गाळे असलेले भव्य ग्रंथ दालन, खान्देशी खाद्यपदार्थांचे दालन, चित्र प्रदर्शन, सेल्फी पॉईंट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी पूर्ण होत आहे. साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रम दि. २९ जानेवारी पासून सुरु होत आहेत. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम, मराठी पाऊल पडते पुढे, आमची माणसं आमची संस्कृती, सूर तेचि छेडीता, अशी पाखरे येती या कार्यक्रमांचा समावेश असून अमळनेरसह खान्देशातील कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.