Gaming : गेमिंगच्या इतिहासातील सर्वात मोठी डील; मायक्रोसॉफ्ट विकत घेणार 'कॉल ऑफ ड्यूटी', 'कँडी क्रश' बनवणारी कंपनी
Activision Blizzard : मायक्रोसॉफ्ट तब्बल 68.7 बिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीला अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड खरेदी करणार आहे.
गेमिंग इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या करारासाठी मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट आता अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड ही कंपनी खरेदी करू शकणार आहे. कॉल ऑफ ड्यूटी, कँडी क्रश अशा गेम्ससाठी ही कंपनी ओळखली जाते.
मोठा अडथळा दूर
ब्रिटनच्या कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटी (CMA) या संस्थेने एप्रिलमध्ये ही डील थांबवून ठेवली होती. क्लाउड गेमिंगमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोनोपॉली होईल या भीतीने ही डील थांबवून ठेवण्यात आली होती. मात्र आता CMA ने या कराराला मंजूरी दिली आहे.
यानंतर मायक्रोसॉफ्ट आता तब्बल 68.7 बिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीला अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड खरेदी करणार आहे. मायक्रोसॉफ्टने करारासाठीच्या अटी मान्य केल्यामुळे या डीलला मंजूरी मिळाली आहे. (Gaming News)
गेमिंगचे हक्क सोडावे लागणार
अर्थात कंपनी विकत घेतली तरी मायक्रोसॉफ्टकडे क्लाउड गेमिंगचे अधिकार नसणार आहेत. याच अटीवर CMA ने डीलला परवानगी दिली आहे. याला कारण म्हणजे Xbox हा गेमिंग कन्सोल देखील मायक्रोसॉफ्टच्याच मालकीचा आहे. जर मायक्रोसॉफ्टला अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डच्या गेम्सचा एक्सक्लुझिव्ह हक्क मिळाला, तर गेमिंग क्षेत्रात त्यांची मोनोपॉली होऊ शकेल, या भीतीने ही डील थांबवण्यात आली होती.