कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे.
रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं असताना कोकणच्या जंगलात हे झाड कसं आलं याचं उत्तर मात्र अजूनही सापडलेलं नाही. या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभागही 24 तास अलर्ट असतो. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अतिदुर्मिळ झाडासाठी चोख सुरक्षा आहे.