प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे.
पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल किंवा हिरवा ठिपका देऊन भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते, शिक्षण विभागाचा निर्णय अतार्किक असल्याची टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांना अंडी, केळी देण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी, त्या अनुषंगाने देण्यात आलेली निवेदने विचारात घेऊन योजनेच्या अंमलबजावणीत अधिक स्पष्टता येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या.
शाळेतील ४० टक्के विद्यार्थ्यांनी अंड्याऐवजी केळी देण्याची मागणी केल्यास संबंधित शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना केळी किंवा फळ देणे, अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरवा ठिपका देण्याबाबत परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या परिपत्रकावर टीका करण्यात येत आहे. बहुतांश जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांकडे ओळखपत्रे नाहीत. त्यामुळे ठिपका देण्यासाठी ओळखपत्रांचा खर्च शिक्षण विभाग करणार का, असा प्रश्न ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्रचे संयोजक विक्रम अडसूळ यांनी उपस्थित केला.