पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) विभागातर्फे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्यानिमित्ताने जगभरातील नामांकित वैज्ञानिकांची मांदियाळी विद्यापीठात जमणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते सोमवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित राहणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात होणार आहे. विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘विविध रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन’ या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. यात प्रा. एड्रियन हिल (कोविशील्ड लस संशोधक, ऑक्सफर्ड विद्यापीठ), डॉ. पॅट्रिक डफी (मलेरिया लस संशोधक), डॉ. एलिझाबेथ उंगेर यांसारखे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.