११ सप्टेंबर १९८२ रोजी विनोबांनी जाहीर केले, "आज बाबाच्या देहाला ८७ वर्षे झाली. बाबाच्या देहाचा आज वाढदिवस आहे. जयंती बाबाची नसून बाबाच्या देहाची आहे.'
विनोबांच्या आश्रम जीवनात फारसा फरक पडला नाही. पण प्रकृती पहिल्यासारखी साथ देत नाही याची जाणीव विनोबांना होऊ लागली होती. काही महिन्यापासून प्रकृती क्षीण होत असून चेहऱ्यावर तेज वाढत होते. ४ नोव्हेंबर १९८२ रोजी विनोबांना थोडा ताप आला. म्हणून सेवाग्रामच्या डॉक्टरांनी त्यांना तपासले लगेच दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता हृदय विकाराचा झटका आला. नागपूरचे हृदय रोग तज्ज्ञ डॉ. चौबे यांनी तपासून उपचार सुरू केला. मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आश्विन मेहता आणि अजय गांधी यांनी विनोबांना तपासून नागपूरात हलवण्यास सांगितले. आश्रमवासियांनी याला नकार दिला. ७ नोव्हेंबर १९८२ रोजी विनोबांना थोडे बरे वाटू लागले. नाडी व रक्तदाब सामान्य असून अंगातला तापही उतरला होता. दूध, मध, पाणी दिले ते त्यांनी घेतले. सायंकाळी दादा धर्माधिकारीशी थोडी चर्चाही केली. ८ नोव्हेंबर १९८२ रोजी नेहमीचा दूध पाणी मधाचा आहार घेतला तो शेवटचा. ९ नोव्हेंबर १९८२ पासून विनोबांनी आहार सोडला. यामुळे त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तरीपण विनोबांनी आहार घेण्यास नकार दिला. १० नोव्हेंबरपासून विनोबांनी औषधोपचारानाही नकार दिला. दुपारी १२.३० च्या सुमारास श्रीमती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी आले. त्यांनीही काही घेण्याची विनंती केली. त्यांनाही विनोबांनी नकार दिला. १४ नोव्हेंबर १९८२ रोजी विनोबांची अस्वस्थता वाढली. हृदयाची गती वाढली. लघवीचे प्रमाण कमी झाले. पिलानीचे डॉ. अमरजितसिंहना विनोबांनी जपुजीचा पहिला श्लोक म्हणायला सांगितला. १५ नोव्हेंबर १९८२ निर्जल निराहाराचा सातवा दिवस. सकाळी नऊ वाजेपासून श्वासाची गती क्षीण होत ९.३० वाजता अगदी सहजगत्या श्वासाची गती थांबली. विनाबांचे नहमनिर्वाण झाले.
विनोबा नेहमी जैन धर्माच्या संथारा व्रताबाबत म्हणायचे, "बाबा संथाराचा विचार नव्हे चितन करतो." त्यांच्या आयुष्यातले शेवटचे सात दिवस म्हणजे संथारा व्रताचे दिवस होत.
शासनातर्फे शासकीय इतमामात अंतयात्रा करण्यास आश्रमवासियांनी नकार दिला. विनोबांच्या इच्छेप्रमाणे आश्रमातील भगिनींनी तिरडी उचलली. धाम नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आश्रमवासिया सोबत गावकऱ्यांनी या समयी दिंडी घेऊन भजन किर्तन केले. त्यातल्याच एका ग्रामीण भगिनीला प्रश्न केला, "विनोबा गेले आता तुमचे काय होणार?" त्या भगिनीचे उत्तर मोठे मार्मिक होते, "पूर्वी जे असूनही नसत, आता नसूनही असल्यागत आहेत." दुसरी भगिनी म्हणाली, "विनोबा गेले नाहीत तर आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत. "
दुसऱ्या दिवशी विनोबांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे त्यांच्या आस्थी गोळा करून ते ज्या कुटीत झोपत त्या कुटीत पलंगाखाली २ x ३ च्या खड्यात विसर्जित करण्यात आल्या.
विनोबांचे जन्मगाव गागोदे यानेही विनोबांच्या स्मृती अगदी अनोख्या पद्धतीने जपून ठेवल्या आहेत. विनोबांच्या आईच्या पवित्र स्मृती पलंगाखाली जपणारा रुक्मिणी तलाव. विनोबाचा जन्म झाला ती खोली, विनोबाच्या वापरातील काही वस्तु. आजही गावात विनोबा आश्रम असून कोणत्याही संस्थेकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता जनाधारित व कार्यकर्त्याच्या स्वावलंबनावर आधारित आजही या आश्रमाची व्यवस्था आहे. स्वपरिवर्तनातून समाज परिवर्तन ही दिशा आणि कृषी, चरखा, अध्ययन सर्वोदयी विचाराचा प्रस्ताव हे या आश्रमाचे बीद आहे. ५ जानेवारी २००० पासून या • आश्रमातील कार्यकर्त्यांनी आणखी एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. आश्रमातील कार्यकर्ते गुराच्या शवविच्छेदनाचे काम करतात. असे काम फक्त गागोदे येथेच होते. खऱ्या अर्थाने विनोबांच्या स्मृती या गावानेक्रांतीकारक पद्धतीने जपून ठेवल्या आहेत.
विनोबा नसूनही त्यांच्या स्मृती कायम राहाव्या यासाठीच. १९८३ साली भारत सरकारने विनोबांना 'भारतरत्न' हा सन्मान मरणोत्तर जाहीर केला आहे.
५० वर्षांपूर्वी एका पाश्चात्य अभ्यासकाने 'संत परंपरेतील शेवटचा संत' असे विनोबांचे वर्णन केले होते. त्याच वेळी वसंत नारगोलकरांनीही मात्र विनोबांची धार्मिक, आध्यात्मिक भाषा आणि एक निरोगी सबुद्ध विश्वसमाज स्थापत्याबाबत अत्यंत पुरोगामी आणि मूलग्राही मित्र करणारा 'परमाणु युगातील पहिला संत' असे जे वर्णन केले होते ते विनोबांनी सिद्ध केले.
विनोबा भावे