११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्राच्या कुलाबा जिल्ह्यातील गागोदे या गावी विनोबांचा जन्म झाला. चार भाऊ आणि एक बहीण यात विनोबा सर्वात वडील. विनोबांचे वडील नरहरी शंभूराव भावे बडोदा संस्थानात नोकर होते. आजोबा शंभूराव भावे एक प्रगतीशील विचाराचे पण धार्मिक प्रवृत्तीचे होते. विनोबांची आई रुक्मिणीदेवी अत्यंत भाविक, सतत परमेश्वर भजनात मग्न असे. विनोबाचे पाळण्यातले नाव विनायक. त्यांचे बालपण गागोद्यात आजोबांच्या सहवासात गेले. वाईच्या शिव मंदिराचे व्यवस्थापन भावे कुटुंबियांकडे असल्यामुळे वर्षातून सहा महिन्यात एकदा विनोबा आपल्या आजोबासोबत वाईलाही जात. सतत आजोबा सोबत असल्याने विनोबावर आजोबांचा प्रभाव पडला. शंभूराव धार्मिक असले तरी त्यांनी वाईचे शिवमंदिर दलितासाठी खुले केले. कधी कधी मुस्लीम गायकाच्या भजनाचे कार्यक्रमही या मंदिरात घेण्यात येत त्यामुळेकट्टर हिंदू शंभूरावाची टवाळी करीत. तरीही शंभूरावानी कुणालाही जुमानले नाही. या सर्वांचा प्रभाव बालपणातच विनोबावर पडल्यामुळे विनोबांचे विचार धार्मिक व उदारमतवादी बनले.
गागोदे येथे भावे कुटुंबाची शेती होती. या शेतात अनेक आंब्याची झाडे होती. आंब्याच्या दिवसात आंब्याची पहिली खेप शंभूराव आपल्या इष्टमित्रांना वाटीत व नंतरच घरी खात. शंभूराव नाडीपरीक्षा, रोग्याची शुश्रुषा, औषधोपचार विनामुल्य करीत. वयाच्या ३७ व्या वर्षी शंभूरावांनी गृहत्याग करून कोटेश्वराच्या सेवेत पुढील आयुष्य घालवले.
विनोबांची आजी गंगाबाई. वयाच्या ५५ व्या वर्षी लिहीणे, वाचणे शिकली. उदारमताची आणि कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाणे हा तिचा स्वभाव होता. विनोबांचे वडील नरहरराव. विवेकी, नियमबद्ध, व्यवस्थित आणि टापटीपीचे गृहस्थ होते. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान विषयावर त्यांचे प्रेम होते. बडोद्याच्या कलाभवन येथून त्यांनी कला, शिक्षण क्षेत्रातील पदविका मिळविली होती. त्यांची वृत्ती संशोधकाची होती. खाकी कपड्याचा शोध हे त्यांचेच संशोधन ह्यालाच पुढे ब्रिटीशांनी सैन्याच्या गणवेषासाठी स्वीकार केला. काही दिवस बकींगहॅम गिरणीत रंग विभागात सेवा केल्यानंतर ते बडोद्यात गेले. बडोदा संस्थानच्या कार्यालयात कारकूनाची नोकरी केली.
नरहररांची वृत्ती संशोधकाची असल्यामुळे कापडाच्या नवनव्या छपाईचे, नवनवे रंग, डिझाईन तयार करणे हा त्यांचा छंद होता 'कपडा छपाई' तंत्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता. तसेच शिस्तबद्ध आणि जबाबदार व्यक्ती म्हणूनही त्यांचा लौकिक होता. आपल्या प्रमाणेच विनायकानेही इंग्रजी, फ्रेंच शिकावे, परदेशात जावे. बॅरिस्टर व्हावे किंवा किमान आपल्याप्रमाणे (Textile Chemist) औद्योगिक रसायनशास्त्री व्हावे असे त्यांना सतत वाटे.
आजोबा, आजी वडीलांबरोबर विनोबाच्या जीवनावर त्यांच्या धर्मनिष्ठ, प्रेमळ आईचा मोठा प्रभाव होता. विनोबांची आई अत्यंत साधी, संयमी आणि व्रतवैकल्याचे पालन करणारी गृहिणी होती. 'देतो तो देव आणि राखतो तो राक्षस' हा गुप्तमंत्र विनोबांना त्यांच्या आईनेच दिला होता. दारावर आलेला भिकारी हा ईश्वर असतो. पात्र अपात्रता ठरवणे हे आपले काम नाही. विनोबाचे जेव्हा आजन्म ब्रह्मचारी राहून समाजसेवा करण्याचा मानस बोलून दाखवला तेव्हा त्यांच्या या विचाराला संमती व त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्या आईनेच केले होते. जो व्यक्ती विवाहानंतर सदाचारयुक्त आयुष्य घालवतो तो कुलकिर्ती वाढवतो. पण जो व्यक्ति ब्रह्मचारी राहतो तो मात्र आपल्या ४२ पिढ्यांचा उद्धार करतो. हा विचार विनोबांनी वयाच्या १० व्या वर्षी ऐकला तेव्हाच त्यांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला. त्यांचे धाकटे भाऊ बाळकृष्ण उर्फ बाळकोबा शिवाजी आणि दत्तात्रय पैकी दत्तात्रयाचे अकाली निधन झाले. परंतु बाळकोबा आणि शिवाजी यांनीही आजन्म ब्रह्मचर्याचे पालन केले. बहिण शांताबाईच्या लग्नानंतर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला.
विनोबांच्या आयुष्यात वरील सर्व वडीलधाऱ्या मंडळींपैकी आईचेस्थान अनन्य साधारण असे होते. भावी आयुष्यातील अनेक गोष्टीचे मुळ त्यांच्या आईच्या शिकवणुकीत आढळते. 'जीवनाचा खरा आनंद संयम आणि संतोषातच असतो, मनात कोणतीही भीती न बाळगता ईश्वराप्रती पूर्ण श्रद्धा ठेव.' इत्यादी शिकवणुकीचा समावेश होतो.
विनोबांची बालपणीची आठ दहा वर्षे गागोद्यातच गेली. या काळात त्यांचा प्राथमिक शाळेची संबंध आला नाही. आईनेच त्यांच्यावर नैतिक संस्कार केले. या वयातच त्यांना वाचन आणि पाठांतराची गोडी लागली. १९०१ साली गागोद्यातच त्यांचा उपनयन संस्कार करण्यात आला. १९०३ साली वयाच्या नवव्या वर्षी विनोबा बडोद्यास वडीलांकडे आले. बडोद्यात त्यांना एकदम तिसरी इयत्तेत प्रवेश मिळाला. विनोबा पुढे सतत प्रथम येत त्यामुळे दरवर्षी शिष्यवृत्ती त्यांना मिळत असे. सातवीत असताना विनोबांनी मराठीत ६५ टक्के आणि संस्कृतमध्ये ८५ टक्के मार्क्स मिळवून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.
बडोद्याला हायस्कूलमध्येच पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी इंग्रजी येणे आवश्यक होते. तेव्हा त्यांच्या वडीलानीच त्यांना इंग्रजी शिकविले. गणित हा त्यांचा आवडता विषय आणि भूमितीतील प्रमेये सोडवणे हा त्यांचा छंद होता. वाचनाचा त्यांना जबरदस्त व्यासंग होता. दिवस दिवस ते वाचनालयात काढीत. 'देवानंतर कोणती एखादी वस्तू मला प्रिय असेल तर ती भूमिती होय." असे ते म्हणत. याकाळात वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही ते गणित सोडवण्यासाठी मदत करीत. ते सतत आपल्या मित्रांना सूचवत एखादे गणित तुम्हाला सोडवता येत नसेल तर ते लिहून घेत व वर्गात शिक्षक गहन विषय समजूत सांगत अशा वेळी ते गणित सोडवित बसत.
विद्यार्थी दशेपासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'चे विनोबा नियमित वाचक होते. देशांतर्गत राजकीय घटनापासून स्वतःला अवगत ठेवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. बंगालच्या क्रांतीकारी आंदोलनाचेही त्यांना फार आकर्षण होते. १९०५च्या वंगभंगाच्या आंदोलनाच्या काळात टिळक, चिपळुणकर हे त्यांचे आवडते नेते होते.
प्राथमिक शाळेप्रमाणे हायस्कूलमध्येही विनोबांनी आपला प्रथम क्रमांक सोडला नाही. मराठी आणि संस्कृतातील अभ्यासक्रमाबाहेरचे वाचनावर त्यांनी भरपूर वेळ दिला. मोरापंताची' केकावली' हे त्यांचे आवडते काव्य विनोबांनी 'केकावली' चे भाषांतर इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत करावे अशी त्यांच्या वडीलांची इच्छा होती. तर आपल्या मुलाने मराठी आणि संस्कृतकडे अधिक लक्ष द्यावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मातृभक्त असल्याने विनोबाचे वडीलांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले व मराठी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले. इंग्रजीवरील त्याचे प्रावीण्य वडीलांमुळे होते.
'मौनार्थ सर्वार्थ साधनम्' हाच विनोबाचा विद्यार्थी जीवनातला आदर्श होता. अधिकाधिक वेळ मौन हा त्यांचा परिपाठ होता. गंभीर विषयावरील चर्चेत भाग घेणे त्यांना आवडे. स्वच्छ साधा पोषाख पण अस्ताव्यस्त केस असा त्यांचा अवतार असे. अस्ताव्यस्त केसाबद्दल कुणी टवाळी केल्यास तुझे केस कापण्याचे दुकान आहे का? असा सवाल ते करीत.
विद्यार्थी दशेतच शिवजयंती साजरी करताना त्यांनी दाखवलेला स्पष्टवक्तेपणा शिक्षक आणि सहकारी मित्रांना चकीत करणारा ठरला. "गुलाम घरात शिवजयंती साजरी करता येऊ शकते का?" असा प्रश्न विनोबांनी शिक्षक आणि सहकारी मित्रांना करून वर्गाबाहेर शिवजयंती साजरी करण्याचे समर्थन केले. त्यासाठी झालेला दंडही त्यांनी भरला.
Sasural मुक्कामात विनोबांनी लोकमान्य टिळकाचे गीतारहस्य व जोसेफ मॅझिनी या दोन्ही पुस्तकाचे वाचन केले होते. अभ्यासमंडळात या दोन्ही पुस्तकावर भाषण करणें त्यांना आवडे. संघटनात्मक काम मात्र त्यांना आवडत नसे. "तुकारामाला एखाद्या ऑफिसात कारकूनीचे काम देणे" असे त्यांचे संघटनात्मक कामाबाबत मत होते. अभ्यास मंडळाच्या निमित्याने ते सतत बाहेर राहत, उशिरा घरी येत तरी त्यांच्या आईने याबाबत तक्रार केली नाही. उलट उशीरा घरी गेल्यानंतरही आई त्यांना गरम जेवण वाढी. इतका विनोबावर त्यांच्या आईचा विश्वास होता. बाळकोबा त्यांच्या या कालखंडाविषयी लिहीतात, "विनायक अर्ध्या रात्री पर्यंत वाचीत बसे, यामुळेच त्याची दृष्टी अधू झाली, तरी त्याने चष्मा घेण्यास नकार दिला. पुढे म. गांधीच्या आग्रहावरून चष्मा घेतला. विनायकाने आपल्या प्रकृतीची केव्हाही काळजी घेतली नाही. त्याला सतत ताप असे तरी स्वतःची कामे तो स्वत:च करी.
उच्च शिक्षण: १९१३ साली विनोबानी मॅट्रीकची परीक्षा पास केली आणि बडोदा कॉलेजात इंटर मिजीएटसाठी प्रवेश घेतला. तेथेही त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. उलट भटकण्याच्या त्यांच्या छंदात वाढ झाली. आधुनिक शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोग नसल्याने आजकालची महाविद्यालये म्हणजे yours most obedient servant तयार करणारे कारखाने होत असे विनोबा आपल्या मित्रांना सांगत. ह्याही काळात विनोबांनी चौफेर वाचन केले. बडोदा सेंट्रल लायब्ररीत उन्हाळ्याच्या दिवसात विनोबा शर्ट टोपी काढून उघड्या अंगाने वाचीत बसले असता असे बसणे वाचनालयाच्या परंपरेविरुद्ध आहे असे म्हणताच, 'महाशय, देवाने बुद्धी दिली आहे म्हणून मी असा बसलो आहे' असे उत्तर दिल्यामुळे त्यांची तक्रार ग्रंथपालाकडे करण्यात आली. ग्रंथपालाने शिस्त सभ्यतेविषयी सांगायला सुरुवात केल्याबरोबर विनोबा उद्गारले, "महाशय, सभ्यता तुम्हालाच शिकवावी लागेल, समोर खुर्ची रिकामी असताना आलेल्यास आधी बसण्यास सांगावे हा साधा नियम आपणास माहिती नाही का?" विनोबाच्या धाडसाचे कौतुक करीत ग्रंथपालाने हसत हसत विनोबाचा निरोप घेतला.
बडोद्याच्या वास्तव्यातच विनोबांच्या जीवनाचे ध्येय निश्चित होत होते. त्यांच्याभोवती सतत दहा पाच विद्यार्थ्यांचा गराडा असे. विनोबांची बुद्धीमत्ता, निर्भयता, त्यांचे वाचन, मनन, चिंतन आदीमुळे त्यांना विद्यार्थी आणि शिक्षकात लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या नेहमीच्या मित्रात गोपाळराव काळे, शंकरराव तगारे, महादेव मोघे, श्रीधर धोत्रे यांचा समावेश होता. हे सर्व दर रविवारी एकत्र येत. विविध विषयावर चर्चा करीत. यातून १९१४ साली 'विद्यार्थी मंडळा' ची स्थापना करण्यात आली. स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा हा या विद्यार्थी मंडळाचा प्रमुख उद्देश होता. १९१४ सालचे विद्यार्थी मंडळ म्हणजे विनोबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. मंडळाची स्थापना झाली तरी या मंडळामार्फत घ्यावयाच्या कार्यक्रमासाठी, वाचनालयासाठी लागणारा पैसा आदीचा प्रश्न आला तेव्हा विनोबांनी नेतृत्व करावे असे मित्रांनी सुचवले, तेव्हा विनोबा म्हणाले, "एखाद्यावर बॉम्ब टाकायला झाला तर मी तो टाकेन पण माझे पुढारीपण म्हणजे तुकारामाने बँक मॅनेजर होण्यासारखे आहे. "
विद्यार्थी मंडळासाठी पैसे जमविण्यासाठी विनोबांनी घरोघरी जाऊन भाजी विकणे, भांडी घासणे, कपडे धुणे, दळण आणून देणे इत्यादी पर्याय सुचवले आणि सर्वांना ते मान्य झाल्यामुळे अशा प्रकारची कामे करून पैसा जमविण्यास सुरुवात झाली. यातूनच पुस्तकांची जमवाजमव शिवजंयती, गणेशोत्सव, रामदास नवमी साजरी करणे, विविध विषयावर व्याख्याने आयोजित करणे आदी कार्यक्रम घेण्यात येऊ लागले.
गृहत्यागः आई, आजोबा, वडीलांच्या प्रभावाबरोबरच चौफेर वाचनामुळे विनोबांना गौतमबुद्ध, जगत्गुरू शंकराचार्य आणि रामदासस्वामी यांच्या आयुष्याचे आकर्षण वाटू लागले. या तिन्ही व्यक्तींनी ज्याप्रमाणे घर सोडून नवे आयुष्य घडवले तसेच आपणही करावे अशी सुप्त इच्छा या काळात त्यांच्या मनात घोळत होती. २५ मार्च १९१६ रोजी इंटरमिजीएटची परीक्षा देण्यासाठी विनोबा आपले मित्र गोपाळराव काळे आणि इतर मित्रासह गाडीत बसले. सुरत स्टेशन आल्यानंतर गोपाळरावाच्या हाती वडीलांच्या नावे पत्र देत म्हणाले, "मुंबईला गेल्यानंतर पोस्टात टाक." आणि विनोबा, तगारेआणि बेडेकर या मित्रासह भुसावळ मार्गे काशीला जाणाऱ्या गाडीत चढले. वडीलाच्या नावे लिहिलेल्या पत्रात विनोबांनी लिहीले होते, "मी परीक्षेला जाण्याऐवजी इतरत्र जात आहे, आपला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे याची मला जाणीव आहे आणि आपणास हेही माहित आहे की मी कोठेही गेलो तरी कोणतेही गैरकृत्य करणार नाही." हे पत्र वाचून नरहररावांनी मात्र आकाशपाताळ एक केले. टक्केटोपणे खाऊन येईल परत अशी मनाची समजूत घालून ते गप्प राहिले. आईची प्रतिक्रिया मात्र बोलकी होती, “विन्या जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. "
विनोबांनी काशीला जाण्याचे निश्चित केले होते, कारण त्यांना तेथे
संस्कृतचा अभ्यास करायचा होता, बंगाल, हिमालयाचा प्रवास करायचा होता.
काशी या सर्वांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे विनोबांनी मनोमन काशीची निवड
केली होती. काशीला गेल्यानंतर विनोबांनी आपला मुक्काम आहिल्याबाई
होळकर वाचनालय आणि निवासासाठी तात्या टोपेची बहीण खुर्देकराच्या वाड्यात
जागा मिळाली. काशीला पोहोचण्याबरोबर विनोबा वेद आणि उपनिषदाच्या
अभ्यासात मग्न झाले. अन्नछत्रात जेवण आणि अभ्यास असाच त्यांचा दिनक्रम
होता. काही दिवसानंतर त्यांनी घरी पत्राने कळविले, 'मी संसार सोडला असून
ब्रह्मजिज्ञासा हे माझे एकमात्र लक्ष ठरवले आहे. '
काशी येथील वास्तव्यात विनोबा शास्त्रार्थ चर्चेच सहभागी होत. खाजगी शाळेतील नोकरीचा पगार म्हणून त्यांनी स्वतःच दोन रुपये पगार मागीतला. ‘“जेवण अन्नछत्रात असल्यामुळे मला महिन्याला दोन रुपये पुरतील अधिकची जरुरी नाही" असे त्यांनी संस्थाचालकांना सांगीतले. काशीतील सुरुवातीच्या वास्तव्यात विनोबांच्या जीवनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यांच्या सोबत गृहत्याग केलेल्या बेडेकरांचा अचानक मृत्यू. त्यामुळे नोकरीचा पहिला पगार त्यांना बेडेकरांच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च करावा लागला. दुसरी घटना घरासाठी कुलुप खरेदीची. तीन आण्याचे कुलुपाचे दुकानदाराने दहा आणे मागितले. विनोबांनी त्याला दहा आणे देत म्हटले, "मला माहित आहे या कुलुपाची किंमत तीनच आणे आहे तरीपण मी आपणावर विश्वास ठेवून दहा आणे देत आहे." विनोबा त्या दुकानासमोरून दररोज जात, दररोज त्यांची अन् दुकानदाराची नजरानजर होई. एके दिवशी मात्र त्या दुकानदाराने विनोबांना बोलावून सांगितले, "कुलुपाची किंमत तीनच आणे असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून दहा आणे दिले, कृपा करून आपले सात आणे परत घ्या." विनोबांच्या आयुष्यातला हृदय परिवर्तनचा हा पहिला यशस्वी प्रयोग होय. आयुष्यातला पहिला मृत्यू आणि पहिले हृदय परिवर्तनाने विनोबा भारावून गेले.
काशी विद्यापीठ- गांधींचे भाषण : ६ फेब्रुवारी १९९६ रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिग्ज यांच्या हस्ते
काशी विद्यापीठाचा उद्घाटन समारोहाच्या निमित्ताने म. गांधींचेही भाषण झाले होते. या भाषणाचा वृत्तांत विनोबांनी काही महिन्यानंतर बडोद्यात वाचला; पण गांधीनी आपल्या भाषणात दाखविलेल्या धाडसाचा, स्पष्टवक्तेपणाचा प्रभाव विनोबावर पडला. या भाषणात म. गांधीनी म्हटले होते, "मला माझ्या देशबांधवांशी या पवित्र कार्यात या नव्या विद्यापीठाच्या कक्षेत परक्याच्या भाषेतून आपले विचार मांडावे लागत आहेत ही अत्यंत लाजेची आणि अपमानजनक बाब आहे." या विचारांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून ब्रिटीशांच्या सत्ता वैभवाच्या प्रदर्शनावर टीका करीत कार्यक्रमाला हजर असलेल्या संस्थानिकांच्या बडेजाव आणि भरजरी पोषाख व दागिन्यावर गांधींनी टीका केली. म. गांधी पुढे म्हणाले, “या विशाल मंडपामध्ये काय दिसते? एक. भपकेबाज दृश्य की श्रीमंती, जडजवाहीराचे प्रदर्शन, की परदेशातून पॅरीसमधून येणाऱ्या बड्या जवाहिऱ्याच्यासाठी श्रीमंतीचे प्रदर्शन आपल्या ऐश्वर्याने नटलेल्या या संस्थानिकांशी मी या देशातील लक्षावधी हिंदी बांधवांची तुलना करतो... पण मला असे म्हणावेसे वाटते की आपल्या देशबांधवांचे विश्वस्त बनल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. "
पुढे याच भाषणातून गांधीजींनी क्रांतीकारकांच्या दहशतवादी मार्गावर टीका करताना ते म्हणाले, "मीही एक क्रांतीवादी आहे. पण निराळ्या प्रकारचा. आपल्यामध्ये अराजकतावादी क्रांतीकारकाचा आणखी एक वर्ग असून त्यांच्यापर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर मी त्यांना सांगेन की भारतीयांना जर त्यांना जिंकायचे असेल तर भारतात अराजकतावादाला स्थान नाही. अराजकतावादीचे देशप्रेम मी मान्य करतो, स्वदेशासाठी मरण पत्करण्याच्या त्यांच्या धैर्याचे मी कौतुक करतो पण त्यांची हत्या सन्माननीय नाही अशा मार्गांना कोणत्याही धर्मग्रंथात स्थान नाही.....
सर्वात शेवटी गांधीजी म्हणाले, "इंग्रजांनी या देशात् न राहता हा देश सोडून चालते व्हावे असे आम्हाला वाटते... स्पष्टपणे असे सुचवल्यामुळे जर आम्हाला मृत्युदंड दिला तरी आम्ही राजी खुषीने मृत्युदंडही स्वीकारण्यास तयार आहोत.
म. गांधींच्या या भाषणामुळे मात्र सभाध्यक्ष अॅनी बेझंट, सभेत उपस्थित संस्थानिकांनी सभात्याग केला आणि सभा गोंधळात पार पडली.
या घटनेपासून म. गांधींना भेटण्याची विनोबांना तीव्र इच्छा होती. गांधींच्या निर्भयता, अहिंसक प्रतिकाराच्या भावनेचा विनोबावर प्रभाव पडला. काशीतील दोन महिन्याच्या वास्तव्यानंतर त्यांना असे वाटू लागले की आपली राजकीय आणि अध्यात्मिक विषयक आकांक्षाची पूर्तता गांधी भेटीतूनच पूर्ण होऊ शकेल. म्हणून त्यांनी म. गांधींना काही पत्रे लिहिली. यातून आपल्या काही तात्त्विक, सैद्धांतिक शंका त्यांनी विचारल्या. तेव्हा गांधींनी विनोबांना कळवले अशा प्रश्नाची उत्तरे पत्राने देता येत नाहीत त्यासाठी अहमदाबादेस कोचरब आश्रमात येऊनच सर्व शंकाचे समाधान होऊ शकेल.