१९१५ साली बडोद्यात गीतेवर प्रवचने चालू होती. विनोबांची आई प्रवचनाला जात असे. दोन चार दिवसानंतर विनोबांची आई विनोबाला म्हणाली, "विन्या, प्रवचन मला समजतच नाही. गीतेवरील एखादे मराठी सोपे पुस्तक आणून दे. विनोबांनी आईला द्रवीडशास्त्र्याचे मराठी गीतेवरील पुस्तक आणि वामन पंडितांच्या गीतेचा समश्लोकी अनुवाद आणून दिला. तरीही विनोबाच्या आईला समजेना, तेव्हा आई विनोबाला म्हणाली, “विन्या तूच का करीत नाही माझ्यासाठी गीतेचा अनुवाद!" आईचे हे बोल विनोबांच्या सतत ध्यानात येत. पण त्यांना ते काही जमलेच नाही. परंतु आईवरील श्रद्धेने त्यांनी कधीतरी हे काम करण्याचे मनाशी ठरवले होते. ज्ञानेश्वरी म्हणजे विस्तृत गीताच होय. तरीपण सामान्यांना समजावी अशी गीता लिहावी असा त्यांचा मानस होता.
गीताई: विनोबांनी ७ ऑक्टो. १९३० रोजी ब्राह्म मुहूर्तावर गीतेच्या पद्यानुवादाला सुरुवात केली. वर्धा महीलाश्रमाचे सर्व दैनंदिन व्यवहार सांभाळून दररोज रामप्रहरात विनोबा संस्कृतमधील गीता मराठीत आणण्याचेही काम करीत होते. ६ फेब्रु. १९३१ रोजी लिखाणाचे काम संपले या चार महिन्याच्या काळात विनोबा स्वतः मध्ये शिल्लक राहिले नव्हते. 'मी गीतामय झालो होतो' असे विनोबांनी सांगितले. याचे नाव गीता + आई गीताई असे ठरले. भगवद्गीतेबाबत = गाढ आदर आणि आईवरील अगाध प्रेम या दोहोंच्या संगमातून गीताईची निर्मिती झाली. ६-२-१९३१ रोजी विनोबांनी गीताईचे पुर्नेलेखन केले. त्यात ९०० दुरुस्त्या केल्या.
गीताईचे लिखाणापूर्वी विनोबांनी दहा बारा वर्षे यावर चिंतन केले होते. गीतेवरील अनेकांची भाष्ये, थोर महात्म्यांच्या टीका, शंकराचार्याचे भाष्य, लोकमान्य टिळकाचे गीतारहस्याचे वाचन केले. विनोबा म्हणतात, "ज्ञानेश्वरीचे माझ्यावर फार उपकार आहेत. प्रत्यक्ष जगण्याशिवाय गीता कळायची नाही... आज गांधीजीचे जीवन हे त्यांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे." असे विनोबांनी याबद्दल लिहिले आहे. तरीपण गीताईची छापील ५००० प्रतीची पहिली आवृत्ती १४ जुलै १९३२ रोजी विनोबा धुळे येथील तुरुंगात असताना प्रकाशित झाली.
विनोबांचे धाकटे बंधू शिवाजी भावे यांनी गीताईचा गावोगाव प्रचार केला. महाराष्ट्रातील सर्व गांधीवादी संस्थातून गीताई पाठ होत असत. देशातील बहुतेक समविचारी संस्थातून गीताई पाठ घेत. खुद्द बापूनींही सेवाग्राम आश्रमाच्या दैनिक प्रार्थनेत गीताईचा समावेश केला.
मराठीतील गीतेवरील तत्वज्ञानावर आधारीत 'गीताई' ह्या एकमेव पुस्तकाच्या २००५ पर्यंत २४३ आवृत्या निघाल्या असून आतापर्यंत ३७ लाखावर प्रतीचा खप ..झालेला हा मराठी पुस्तक क्षेत्रातील एक विक्रमच आहे. दुसरा विक्रम केला तो जमनालाल बजाज यांनी विनोबा जे जे लिखाण करतील ते सर्व प्रकाशित करावे अशी जमनालाल बजाजाची इच्छा होती. त्याप्रमाणे जमनालालजीच्या हयातीत प्रकाशीत झालेल्या सर्व आवृत्त्यावर प्रकाशक म्हणून जमनालाल बजाज यांचेच नाव आहे. कालांतराने शिवाजी भावेच्या मदतीने विनोबांनी गीताई शब्दकोश तयार केला. या कोशाचे स्वरूपही इतर कोशापेक्षा निराळे असून हा शब्दकोश म्हणजे गीताई वरचे भाष्यच आहे. गीताईतील एकूण एक सर्व शब्दाचा संग्रह, त्याच्या उल्लेखासह केलेला आहे. तसेच प्रत्येक शब्दाचे व विविध शब्दाचे अर्थही नमूद करण्यात आले आहेत. पुढे सामान्य वाचकाच्या दृष्टीने श्लोकाचे विवरण श्लोकाखाली देऊन अभ्यासाला अधिक सोयीचे व्हावे म्हणून 'गीताई चिंतनिका लिहिण्यात आली. गीताईच्या अभ्यासकांना गीताई चिंतानिकालाही तितकीच उपयुक्त ठरते.
१९३२ साली विनोबांचे जळगावात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शासनाने काँग्रेससह त्यांच्याही भाषणावर बंदी जाहीर केली होती. तरीपण विनोबांनी आपले भाषण सुरू केले तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांची रवानगी सहा महिन्यासाठी धुळे येथील तुरुंगात करण्यात आली. या तुरुंगात जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, खंडूभाई देसाई, प्यारेलाल, बाळूभाई मेहता, गोपाळराव काळे, सानेगुरुजी, द्वारकानाथ हरकारे इत्यादी अनेक सत्याग्रही होते. तुरुंगाधिकाऱ्याने विनोबांना 'ब' वर्ग व इतरांना 'क' वर्ग दिला होता. तेव्हा विनोबांनी व वर्ग नाकारून क वर्गातच राहणे पसंत केले.
एकदा सत्याग्रही आणि तुरुंगाधिकाऱ्यात मिळणाऱ्या सवलतीवरून भांडण झाले, तेव्हा काही सत्याग्रहींनी अन्नसत्याग्रह सुरू केला. त्यात विनोबाही सहभागी झाले. जेलरने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊनही विनोबांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. विनोबा म्हणाले, "साधारणपणे मी एकादशी, शिवरात्रीलाही उपवास करीत नाही. आता सुरुवात केली आहे तेव्हा सत्याग्रहीच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही.” शेवटी सत्याग्रहीच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतरच विनोबांनी उपवास सोडला.
गीता प्रवचने धुळ्याच्या तुरुंगातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे दर रविवारी विनोबांची होणारी गीतेवरील प्रवचने. गीता प्रवचनाची सुरुवात २१ फेब्रु १९३२ रोजी झाली. आणि शेवटचे प्रवचन १९ जून १९३२ ला संपले. या चार महिन्याच्या प्रवचनातून विनोबांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायावर सविस्तर विचार मांडले. सानेगुरुजींनी विनोबांच्या प्रत्येक व्याख्यानाचे सविस्तर टिपण लिहिले. सानेगुरुजींच्या या सविस्तर लिखाणातूनच 'गीता प्रवचने' हे पुस्तक आकाराला आले.
या प्रवचनाची सुरुवात करतानाच पहिल्या प्रवचनातून विनोबांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गीतेचा आणि त्यांचा संबंध त्यांनी या प्रवचनातून सांगितला. ते म्हणतात, "... गीतेचा व माझा संबंध तर्कापलीकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले आहे. त्यापेक्षा कितीतरीपट माझे हृदय आणि बुद्धीचे पोषण गीता • दूधावर पोसले गेले आहे. मी सतत गीतेच्याच वातावरणात वावरत असतो. गीता हे माझे प्राणतत्त्व आहे...
गीतेची पार्श्वभूमी सांगताना विनोबांनी पहिल्या प्रवचनात सांगितले, "महाभारत हे व्यापक आहे. महाभारतात समाजातील सर्वच प्रश्नाचे चित्रण व्यासांनी केले आहे. युधिष्ठिर, भीम यांच्या गुणाबरोबरच दोषही आहेत. दुर्योधन, दुःशासन यांच्या दोषाबरोबर गुणही आहेत. अलिप्त राहून व्यासाने जगातील विराट संसाराचे छाया प्रकाशमय चित्र तुम्हा आम्हासमोर उभे केले आहे. गीता प्रवचनाचा समारोप करताना विनोबांनी फलत्यागाचा विचार मांडला असून त्याचे आठ पैलू मांडले आहेत.
१) राजस व तामस कर्माचा त्याग
२) फलत्यागाचा अहंकार नको
३) सात्विक कर्माच्या फलाचा त्याग
४) सात्विक कर्मे फल त्यागपूर्वक करीत राहायची.
५) सात्विक कर्म जे ओधप्राप्त आहे ते करायचे. ओघप्राप्त नाही
त्याचा मोह नको.
६) क्रिया तर होतील, कर्म होतच राहिल.
७) फलत्याग पूर्वक कर्म केल्याने चित्त शुद्ध राहते. ८) सहजप्राप्त
स्वधर्म बदलणारा व न बदलणारा असतो, वर्णधर्म बदलत
नाही,
९) आश्रमधर्म बदलतो, स्वधर्मे बदलत राहावा त्यामुळे प्रकृती
शुद्ध राहते.
या प्रवचनातून विनोबांनी गीतेला 'साम्ययोग' हे नाव दिले आहे. गीतेचे साम्ययोगावर विवरण गीता प्रवचनातून आले आहे. वेदोपनिषद, ज्ञानेश्वर, तुकाराम, अरविंद, टिळक इ. लिखाणाचे प्रतिबिंब गीता प्रवचनातून पडलेले दिसते. त्यामुळे गीता प्रवचनाना व्यापकता आली असून देशातील बहुतेक भाषेत त्याचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. सर्व सेवा संघाने गीता प्रवचनाची इंग्रजी, नेपाळी, डॅनिश आवृत्ती प्रकाशित केली. विनोबानीही आपली सर्वोत्तम कृती म्हणून गीता प्रवचनास वाखाणले आहे. गीता भाष्यावरील १५ लाख प्रती विकला जाणारा हा एकमेव ग्रंथ असावा.
ग्राम सेवा मंडळ धुळ्याहून सुटका झाल्यानंतर विनोबा सरळ वर्ध्याला पोहोचले. १९३२ कायदेभंगाच्या काळात ब्रिटिश सरकारने आश्रमावर बंदी घातली होती. त्यावेळी जवळ जवळ दोन महिने कॉटन मार्केटजवळ काही खोल्या भाडयाने घेऊन विनोबा आपल्या सहकाऱ्यासोबत राहिले. कारावासाच्या दरम्यान विनोबांना मनातल्या मनात देशाच्या ग्रामीण भागाकडे लक्ष दिल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची जाणीव झाली होती. म्हणून वर्धा तालुका अंतर्गत येणाऱ्या गावांतून संघटनेचे काम त्यांनी सुरू केले. त्यासाठी 'ग्रामसेवा मंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. वर्ध्यापासून जवळच 'नाळवाडी' या गावी ग्राम सेवा मंडळाचे कार्यालय उघडण्यात आले. नाळवाडीचे वैशिष्ट्य असे की ८०० लोकांच्या वस्तीतील सर्वच दलित होते. २९-१२-१९३२ रोजी विनोबांनी गांधींना लिहिले, "वर्धा आश्रमाला १२ वर्षे झाली. एक युग संपले. अनुभव चांगला आहे. कर्तेपणाची भावना लुप्त झाली. ईश्वरच आहे, याची प्रचिती आली. एक तप वर्ध्यात आपल्या आशेनेच होतो.... व्रताचे पालन करूनही स्वतःला अपूर्णत्वच भासते. ईश्वरावर माझी जितकी श्रद्धा आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक ईश्वराची कृपा माझ्यावर असण्याचा अनुभव मला येत आहे. '
नाळवाडीला विनोबा सुरुवातीला एका साध्या झोपडीत राहत. कुणातरी नाळवाडीच्या रहिवाशाची ती झोपड़ी होती. तेथे स्नानही उघड्यावरच करावे लागे. जमीन मातीची असल्यामुळे सतत सारवावे लागे. काही दिवसानंतर स्वयंपाक घरासाठी म्हणून बाबूंची कौले असणारी वेगळी झोपडी तयार करण्यात आली. काही दिवसांनी नाळवाडीतच सुतकताई आणि विणण्यासाठी आणखी एक झोपडी तयार केली गेली. येथेच विनोबांनी टकळीवरील सुत कातण्याचे अनेक प्रयोग केले. आठ तासाच्या कातकामानंतर दररोज दोन आणे मिळत.
याची माहिती नियमीतपणे पत्राने विनोबा गांधीजींना कळवीत. अशा एका पत्रापैकी एक पत्र तर १० पानी होते. त्यात विनोबांनी टकळीवरील सुतकताई आणि त्यावरील विविध प्रयोगाची माहिती दिली होती. चरख्यापेक्षा अधिक गतीने टकळीवर कातता येऊ शकते हे विनोबांनी सिद्ध करून दाखविले होते. सुत
नाळवाडीत विनोबांनी आणखी एक नवा उपक्रम सुरू केला होता. ज्यात कार्यकर्त्यांना महिन्यातील पंधरा दिवसात १४ दिवस आसपासच्या गावातून फिरून माहिती जमा करायची व पंधराव्या दिवशी आश्रमात अनुभवाची देवाण घेवाण करून दुसऱ्या पंधरवड्यात पदयात्रा काढून गावकऱ्यांशी संपर्क वाढवायचा. याबाबत विनोबा म्हणत, "गावातील जनता हाच आमचा ईश्वर आहे. त्याच्या दर्शनासाठी आपण वारंवार गेले पाहिजे त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे. हाच ग्रामीण जनतेच्या सेवेचा मार्ग आहे. दोन " वर्षाच्या अशा सतत संपर्कानंतर नाळवाडी आश्रमातील सर्व कार्यकर्ते आपापल्या इच्छित गावी विकास कामे करण्यासाठी रवाना झाले. प्रत्येकाने आपापल्या गावात एक स्वतंत्र आश्रम वसवावा, आश्रमाचे बांधकाम प्रत्येकाने स्वत:च करावे असा दंडकही पाळण्यात आला. अशा आश्रमात पुलगाव, देवळी, भिवापूर, जुनोना, सिंदी, रोहिणी आणि जामशी हे प्रमुख होत. आश्रमवासियांच्या जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांनी केली. आश्रमवासी गावात सफाई टोळीची स्थापना, औषधाचे वितरण प्रार्थनासभा, ग्रामीण रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करीत. तसेच एखाद्याला टकळीवर सुत कातणे, विणकामही शिकवले जाई.
ग्राम सेवा मंडळाच्या कार्याचा ग्रामीण जनतेवर मोठा प्रभाव पडला. तेव्हा वर्धा तालुकातील सर्व गावे खादीमय व्हावी, गरजवंताला, बेकार माणसाला, दैनंदिन उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, किमान कपड्याच्या बाबतीत स्वावलंबन , निर्माण व्हावे ही ग्राम सेवा मंडळाची अपेक्षा होती. याच काळात विनोबा 'आश्रमवृत्त' हे मासिकही काढीत यातून नाळवाडी आणि परिसरातील आश्रमातील कार्यकर्त्याच्या कामाचा अहवाल आणि गांधी, विनोबा, जमनालाल बजाज करीत असलेल्या कामाची माहिती असे.
नाळवाडीचा प्रयोग : १९३६ मध्ये नाळवाडी आश्रमाजवळ टकळी आणि चरखा तयार करण्यासाठी एक कार्यशाळा सुरू करण्यात आली. तेथेच गोसंवर्धनसाठी गोशाळा आणि जनतेला दुध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे यासाठी 'सहकारी गोरस भांडार' उघडण्यात आले. यातील महत्त्वाची आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे १९३७ मध्ये गोपाळराव काळे आणि वाळूजकरांच्या देखरेखीखाली नाळवाडीतच खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मदतीने एक चर्मोद्योग केंद्र 'चर्मालय' सुरू करण्यात आले. नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या जनावरांच्या .कातडीपासून चप्पल, बूट इत्यादीकातडी वस्तू या चर्मालयात तयार केल्या जाऊ लागल्या. आश्रमातील आणि गावातील लोकांना यामुळे रोजगार मिळू लागला. मनोहर दिवाण यांनी ग्रामसेवा मंडळामार्फतच कुष्ठरोग पिडीताचे कार्यही सुरू केले. सुरुवातीला काही आश्रमवासीयांनी मनोहर दिवाण यांच्या कामाला विरोध केला. मात्र विनोबांनी दिवाणांच्या कामाला प्रोत्साहन दिले. पुढे वर्धा-नागपूर रस्त्यावर दत्तपुर येथे १९३६ मध्ये 'महारोगी सेवा मंडळ' स्थापन करण्यात आले. उत्पादकता आणि स्वावलंबी असणारी अशी भारतातील ही एकमेव कुष्ठरोगी संस्था होती...
नाळवाडी येथे 'चर्मालय', 'महारोगी सेवा मंडळ' या दोन स्वायत्त संस्था असल्या तरी ग्राम सेवा मंडळाचे मार्गदर्शनाखाली त्या काम करीत या सर्वाचा व्याप बराच वाढला होता. मनोहर दिवाणानी आपले सर्व आयुष्य महारोगी सेवा मंडळासाठी अर्पण केल्याने त्याचाही व्याप प्रचंड वाढला होता. त्यामुळे नाळवाडीतील जागा अपुरी पडू लागली. १९३२च्या सत्याग्रहानंतर ब्रिटिश सरकारने वर्धा येथील आश्रम बंद केला. एका वर्षानंतर त्याचा ताबा विनोबांकडे दिला. पण तेथे जाण्यास विनोबाचे मन तयार होईना विचाराअंती आश्रम ग्राम सेवा मंडळ व इतर निवासी जागा आखिल भारतीय महिलाश्रमाला देण्यात आल्या. यापूर्वी या ठिकाणी कन्याशाळा आणि रचनात्मक कामाचे शिक्षण देणारे केंद्र, मुलींसाठी कन्या आश्रम चालवले जाई. म. गांधींनी ७ नोव्हेंबर १९३३ च्या हरिजन यात्रेची सुरुवातही याच ठिकाणाहून केली होती.
सत्याग्रहाश्रमः वर्धा सत्याग्रहाश्रमाची एक मोठी अडचण होती, ती जागा सामान्य माणसाच्या संपर्कापासून अत्यंत दूर होती. ग्राम सेवा मंडळाचे संघटन करताना स्वावलंबन आणि सहकार्य या तत्त्वावर भर देण्यात आला होता. ह्या तत्त्वांना यशही मिळाले होते. गोपुरी येथील कार्यशाळेत सुतकताई आणि चरख्याशी संबंधित सुटे भाग तयार केले जात. या कार्यशाळेसंबंधीचे निर्णय सर्वसंमतीने घेतले जात. त्याला जोडूनच एक सहकारी भांडारही होते. सुताच्या गुंड्या देऊन त्या बदलण्यात आवश्यक वस्तुंची देवाण घेवाण या सहकारी भांडारामार्फत होई.
खादी यात्रा हा ग्राम सेवा मंडळाच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. दरवर्षी विनोबा खादीयात्रा आयोजित करीत. खादी यात्रा म्हणजे खादी आणि इतर रचनात्मक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. या निमित्त आसपासच्या गावातील लोक एकत्र येत. दोन दिवस भरपूर कार्यक्रम आयोजित
केले जात. भाषण, चर्चा, सुतकताई, खादी विणकाम स्पर्धा आणि खादी ग्रामोद्योग प्रदर्शन असे या खादीयात्रेचे स्वरूप होते. १९४१ पर्यंत अशी खादी यात्रा नियमितपणे आयोजित केली जाई. कार्यक्रमाच्या संख्येपेक्षा त्याची योग्यता आणि गुणाचा विचार विनोबा करीत म्हणून विनोबा म्हणत, "सेवा व्यक्तीची आणि भक्ती समष्टीची (समाजाची)"
सत्याग्रह आश्रम आणि नाळवाडी या दोन्ही आश्रमात विनोबांनी योग्यता आणि गुणाबरोबरच भाषा शिक्षणाला अधिक महत्त्व दिले होते. शिक्षण, अभ्यास नियमित असावा. ज्याप्रमाणे घराची सफाई दररोज केली जाते तसेच अभ्यासाचे असते,
मार्च १९३० मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी दांडी पदयात्रेच्या सुरुवातीलाच गांधीनी "स्वराज्य मिळाल्याशिवाय साबरमती आश्रमात परत येणार नाही" अशी प्रतिज्ञा केली होती. साबरमती आश्रम सोडताना आश्रमाचे रुपांतर दलित शिक्षण संस्थेत केले होते. मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम संपल्यानंतर गांधी अहमदाबादेस गेले असता साबरमती आश्रमाऐवजी गुजराथ विद्यापीठात थांबत. तेव्हा जमनालाल बजाज यांची म. गांधीना सुचविले की म. गांधींनी वर्ध्यालाच आपले केंद्र बनवावे, तेव्हापासून म. गांधींचे वर्ध्याला येणे जाणे वाढले. शेवटी ३० एप्रिल १९३६ रोजी म. गांधीजीं पायीच वर्ध्यापासून चार मैल अंतरावरील सेवाग्रामला पोहोचले आणि तेथेच राहू लागले.
परंधाम- पवनार अत्याधीक श्रम, निकृष्ट आहारामुळे १९३८ च्या सुरुवातीला विनोबाजींची प्रकृती एकदम खालावली. प्रकृती खालावण्याचे आणखी एक कारण असे होते की, नाळवाडी आश्रम वर्धा नागपूर रस्त्याला लागूनच असल्यामुळे वाहनाच्या धुळीचाही त्रास आश्रमाला होई. तेव्हा म. गांधींनी विनोबांना सुचविले की उंच डोंगरावर जाऊन विनोबांनी विश्रांती घ्यावी. त्यानुसार एक दिवस विनोबा पवनारला गेले. पवनार हे ठिकाण नागपूर रस्त्यावर वर्ध्यापासून सहा मैलावर आहे. जमनालाल बजाज यांनी धाम नदीच्या काठावर एक घर बांधलेले होते. विनोबांना ही जागा आवडली आणि हीच जागा त्यांनी कायम निवासासासाठी निश्चीत केली. येथेही विनोबांनी एक आश्रम सुरू केला आणि आश्रमाचे नाव निश्चित केले, 'परंधाम आश्रम'. धाम नदीकाठी असल्यामुळे परंधाम, पण याचा दुसराही अर्थ महत्त्वाचा आहे. परं म्हणजे श्रेष्ठ आणि धाम म्हणजे लोक निवास श्रेष्ठ (दिव्य) लोक येथे आल्यानंतर विनोबांनी आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले. विनोबा म्हणतात या ठिकाणी १५०० वर्षापूर्वी २४ प्रदेशात पवन (म्हणजे वारा) राज्य होते. या पवनराज्याच्या राजधानीच्याच ठिकाणी आजचे पवनार वसलेले आहे. विनोबांनी स्वतः शेतात श्रम करून उगवलेल्या भाजीपाला, भूईमूग, दूध आदी त्यांचा आहार होता. सहा महिन्यातच विनोबांचे वजन ९० पौंडावरून १२० पौंड वाढले, याबाबत विनोबा म्हणतात, "मी माझ्या सर्व काळज्या ईश्वराधीन केल्या, जवळ कोणतेही पुस्तक नव्हते होती फक्त काही मराठी संताची भजने. . याकाळात मी कोणतेच गंभीर विचार, वाचन, लिखाण केले नाही.'
परंधाम आश्रमातील विनोबांचे वास्तव्य म्हणजे, 'एकात्मिक जीवन' पद्धतीचे दिवस होते. या काळात विनोबांनी कुणाशीही फारसा संपर्क ठेवला नाही. एकाग्रपणे सूत 'कातणे हाच त्यांचा सततचा दिनक्रम होता. याच काळात आचार्य कृपलानी गांधींच्या सांगण्यावरून भेटायला आले असता विनोबांनी त्यांच्याकडे पाहिले न पाहिले केले. कृपलानीला वाटले ते ध्यानमग्न आहेत. पुन्हा कृपालीनी आवाज दिली तरीही विनोबांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. अर्ध्यातासानंतर कृपालनी निघून गेले आणि घडलेली घटना गांधींना सांगितली. तेव्हा गांधी म्हणाले "ही एका आध्यात्मिक साधकाच्या ध्यानावस्थेची आदर्श अवस्था आहे. "
परंधाम आश्रमातच विनोबांनी पवित्र कुराणाचा अरबीमधून अभ्यास करण्यासाठी एका मौलवीची मदत घेतली. पवित्र कुराणाचा मूळात अभ्यास झाल्यानंतर त्यातील अत्यंत महत्त्वाच्या भागावर विनोबांनी एक पुस्तक लिहिले. सर्व सेवा संघाने या पुस्तकाच्या हिंदी, उर्दू आणि इंग्रजीतून अनुवाद प्रसिद्ध केला. हिंदी 'कुराणसार', उर्दूत 'रुहल कुराण' आणि इंग्रजीतून 'The Essence of a cron' ही त्यांची नावे. मूळ अरबी भाषेतही विनोबाचे हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा त्यांची विद्वत्ता अरबी मौलवीही मान्य केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकामुळे कुराणातील प्रतिपादीत विषयाबाबत जे अनेक गैरसमज होते ते गैरसमज दूर करण्यात या पुस्तकांची फार मदत झाली.
आजही पवनार आश्रमात भरत राम मंदिर आहे. त्याची मुहूर्तमेढही विनोबांनी याच काळात रोवली. जमनालाल बजाजाची इच्छा या ठिकाणी भरत राम मंदिर असावे अशी होती. योगायोगाची घटना अशी की शेतात खोदकाम करताना विनोबाना एक मोठी शिळा लागली. खोल खणून ती शिळा बाहेर काढता ती शिळा म्हणजे भरत राम भेटीची कलात्मक मूर्ती होती. विनोबांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, अशा प्रकारे भरतराम मंदिर स्थापनेची जमनालाल बजाजाची इच्छा पूर्ण झाली.
पवनारपासूनच तीन मैलावर सूरगाव आहे. विनोबा या गावी नियमित जात आणि सूरगाव स्वच्छ ठेवण्यासाठी साफसफाई करीत. पुरुष आणि स्त्रिया प्रातर्विधी उघड्यावरच करीत. विनोबांनी अनेक दिवस हा मैला साफ करण्याचे काम केले.
परिणामी सूरगाव ग्राम पंचायतीने स्त्रियांसाठी संडासचे बांधकाम केले. पुरुषाच्या सवयीत काहीच फरक पडला नाही तरी विनोबांनी आपला दिनक्रम अनेक दिवस चालूच ठेवला होता.
कांचन मुक्ती: परंधाम आश्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या आश्रमात विनोबांनी केलेला 'कांचनमुक्ती'चा प्रयोग होय. १९४९ साली पैशासंबंधी विचार करताना त्यांना हा प्रयोग सूचला. विनोबांना सुरुवातीपासून संपत्तीबाबत उपेक्षाभाव, तिटकारा, अनिच्छा होती. पण पवनारमध्ये कधी कधी मजूरांना मजूरी देताना जेव्हा पैशाचा प्रश्न येई तेव्हा विनोबा विचार करीत मी दहा तास सूत काततो तेव्हा मला अधिकाधीक चार आणे मजूरी आणि माझा खर्च । सहा आणे. यातूनच मजूराची मजूरी आणि त्यांचा खर्च यांची तोंड मिळवणी करण्यासाठी विनोबांनी मजूरांना सुचवले की सर्वांना मिळणारी मजुरी एकत्र करून त्याची समानवाटणी करावी. मजुरांनी त्याला समंती दिली. श्रमाची पूर्ण मजुरी म्हणजेच श्रमप्रतिष्ठा वाढवणे होते. हे यातून विनोबांच्या लक्षात आले. त्यातून पुढे कांचनमुक्तीचा प्रयोग सुरू झाला.
पैसा मानवाचे सामाजिक व सार्वजनिक जीवन दूषीत करतो. समाजात उत्पात आणि विषमता निर्माण होण्याचे मुख्य कारण पैसाच. म्हणून समाजातून पैशाचे अस्तित्वच संपवावे. अध्यात्मिक साधनेसाठी कांचनाचा निषेध केलेलाच आहे. आध्यात्मिक जीवनाबरोबरच व्यावहारिक जीवनातही निर्मळता आणण्यासाठी कांचनाचा निषेध आवश्यक आहे असे विनोबांना वाटले. म्हणून १ जाने १९५० पासून आश्रमाच्या व्यवहारात कांचनमुक्तीचा प्रयोग सुरू करण्याचे विनोबांनी जाहीर केले. कांचनमुक्तीतून स्वावलंबनाची सुरुवात आश्रमासाठी लागणारी भाजी विकत घेण्यापासून झाली. आश्रमास लागणारा भाजीपाला, धान्य आदीचे उत्पादन आश्रमातच सुरू करण्यात आले. शेतीचीही संकल्पना विनोबांनी वेगळ्या प्रकारे सांगितली आहे. हाताने शेती, यंत्राच्या मदतीने शेती आणि बैलाच्या मदतीने शेती अशा प्रकारच्या शेतीला विनोबांनी वेगवेगळी नावे दिली. ऋषिशेती (हाताच्या बळाने शेती करणे), वृषभशेती (बैलाच्या मदतीने शेती करणे), आणि इंजिनशेती (यंत्राच्या सहाय्याने शेती करणे) असे हे तीन प्रकार होतात. पाण्याची सोय असेल तर ऋषीशेती चांगल्या प्रकारे करता येते व उत्पन्नही चांगले मिळते. बैल हा आपल्या कुटुंबाचा घटकच असतो हे ध्यानात ठेवून त्याला शेतीत राबवले पाहिजे, त्यातून दीडपड उत्पन्न वाढवता येते. मर्यादित प्रमाणात आधुनिक सुधारलेली अवजारे यांचा उपयोग करण्यास हरकत नाही. असे विनोबांनी सुचवले होते. पवनार आश्रमातून ह्यापैकी तिन्ही प्रकारे शेती केली जात होती. शेतीला जोडूनच एक गोशाला तयार करण्यात आली. कपड्याची गरज भागविण्यासाठी खादीचे उत्पादन वाढविण्यात आले. प्रवास, टपाल, तार, मीठ, रॉकेल आदीसाठी पैशाची गरज लागे. ती गरज भागविण्यासाठी एक छापखाना सुरू करण्यात आला. शेतीला पाणी पुरवठ्यासाठी विहीर खोदण्यात आली. विहीरीसाठी पैशाच्या मदतीऐवजी श्रमदानाची मागणी करत मदत उभी केली. विहिरीतून पाणी काढण्यासाठी बैलाची मदत नाकारून 'पार्शियन व्हील'चा वापर करण्यात आला. याच ठिकाणी सांयकाळी प्रार्थना होई. ही प्रत्यक्ष कर्मणा पूजा होती. या विशिष्ठ अशा प्रार्थनेमुळे जयप्रकाश नारायणांना विनोबांच्या शक्तीशाली व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण निर्माण झाले होते.
ब्रह्मविद्या मंदिर: लहानपणापासून विनोबांना ब्रह्मविद्येचे आकर्षण होते. यासाठी त्यांची गृहत्यागही केला होता. ईश्वर प्राप्तीचा आपला अभिनव प्रयोगही विनोबांनी परंधाम आश्रम पवनार येथेच सुरू केला होता. "आपल्या समाजात स्त्रियांची साधना नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. तिवा साक्षात्कार होण्याची आवश्यकता आहे. जगाच्या शांतीसाठी पुरुषाबरोबरच स्त्रीलाही समाज संचालनात सहभागी करावे हा एक विचार विनोबांच्या मनात कितीतरी दिवस होता. त्याची सत्यता ब्रह्मविद्या मंदिराने झाली. देशातील विभिन्न भागातील केवळ अविवाहित मुलीनाच येथे सामील करून घेतले जाई. त्याचे आयुष्य पूर्णतः स्वावलंबी करण्याकडे विनोबाचा कल होता. त्यासाठी त्यांचा स्वयंपाक, दैनंदिन कामे, शेती, संडास सफाई ही सर्व कामे त्यांनीच करावी असा दंडक होता. ब्रह्म विद्या मंदिरातच एक छापखानाही होता. तोही त्या मंदिरातील स्त्रियांतर्फेच चालवला जाई. सामुहिक साधना, धर्मनिष्ठा आणि ध्यान स्वाध्याय या तीन तत्त्वांना ब्रह्म विद्यामंदिरात प्राधान्य होते. विनोबांचा 'स्त्रीशक्ती' हा ग्रंथ म्हणजे स्त्रीशक्तीचे श्रेष्ठत्व दाखवणारा ग्रंथ होय. या पुस्तकात विनोबा म्हणतात, "माझी तर अशी अपेक्षा आहे की स्त्री ही शास्त्र निर्माण करणारी घटक बनावी. भारतात पूर्वी स्त्री शक्तीचा प्रभाव समाजावर फार मोठ्या प्रमाणात पडलेला होता. तरीपण त्या शास्त्रकार नव्हत्या. पण ब्रह्मविद्येचे जे शास्त्र बनले आहे ते पुरुषांनी बनवल्यामुळे एकांगी आहे. त्याचे संशोधन होऊन खरी ब्रह्मविद्या जगासमोर यायला हवी. स्त्रिया जर ब्रह्मचारिणी असतील, तर जगाचे चित्र बदलून जाईल." पुढे विनोबा म्हणतात, "मी जर स्त्री असतो तर माहिती नाही मी किती बंड केले असते! स्त्रियातर्फे बंड
व्हायला हवे, अशी माझी अपेक्षा आहे." पुढे त्याच्या कल्पनेतील बंडखोर स्त्री कशी असावी याचेही चित्रण विनोबांनी केले आहे. विनोबा पवनारला फार काळ राहू शकले नाही. पण येथील अल्पशा वास्तव्यातही विनोबांनी नियमीत लिखाण केले आहे. या माध्यमातून आश्रमवासियांना विनोबांचे बौद्धिक मार्गदर्शन होत असे. पवनारात बाळकोबा सहा महिने राहत आणि तेथील कामकाज सांभाळीत उरलेले सहा महिने पुण्याजवळील उरुळीकांचन येथे निसर्गोपचार केंद्राचे काम पाहात.
याच काळात विनोबांनी आश्रमवासियांना गणिती चमत्काराचे दर्शन घडवले. "शून्याला मोठ्यातल्या मोठ्या संख्येने गुणिले तरी उत्तर शून्यच येते. हा शून्याचा चमत्कार आणि रोचकता आहे. गणितातून जर शून्य काढून टाकला तर गणिताची अद्भूतता संपुष्टात येईल हे त्यांनी आश्रमवासियांना पटवून दिले.