बिहारची पदयात्रा संपवून विनोबांनी १-१-१९५५ रोजी बंगालमध्ये प्रवेश केला. "तुझ्या हातात नव आशा आकांक्षाचे खड्ग आहे" या रविंद्रनाथांच्या गीताने विनोबांचे स्वागत करण्यात आले. रामकृष्ण परमहंसांनी विष्णुपूर येथे समाधीचा आनंद घेतला. त्याच विष्णुपूरात समाधीचा सामुहिक आनंद घ्यावयाचा आहे असे विनोबांनी जाहीर केले आणि ज्या ठिकाणी विवेकानंदांनी 'दरिद्रीनारायण ' हा शब्द उच्चारला अशा बनसुरीयालाही विनोबा गेले. कारण विवेकानंदांची 'दरिद्री नारायण' ही संकल्पना पुढे गांधीनी पुन्हा मांडलीहोती... कलकत्याच्या आपल्या एका भाषणात विनोबांनी सांगितले की, 'बंगालचा अहिंसक कर्मयोग, जीवनासाठी अत्यावश्यक असतो. त्याला क्रियाशीलतेची जोड आवश्यक असते. असे न झाल्यामुळे येथे हिंसक स्वरूपाची क्रियाशीलता आली. वैष्णवाच्या भक्तीभावाने कार्यसाधत नाही असे दिसल्याबरोबर बंगालचा तरुण हिंसेकडे वळला त्यातून हिंसेचे राज्य आस्तित्वात आले. '
बाकुदा येथील प्रवचनात विनोबांनी 'रचनात्मक श्रद्धा' हा नवा शब्द वापरला. त्याचा संदर्भ अहिंसेशी जोडताना विनोबा म्हणतात, 'अहिंसेचा अर्थ हिंसा न करणे इतकाच होत नाही. त्याचे तीन अर्थ होतात. अहिंसा म्हणजे निर्भयता, अहिंसा म्हणजे प्रेम आणि सहकार्य आणि अहिंसा म्हणजे रचनात्मक कार्यावर विश्वास ठेवणे होय. रचनात्मक कार्याला रचनात्मक कार्यानेच जिंकावे लागेल. यासाठी रचनात्मक श्रद्धा आवश्यक असते. निर्भयता, प्रेमपुण्य सहकार्य व रचनात्मक श्रद्धा या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने अहिंसेची शक्ती आपोआप वाढेल. '
२६ जानेवारी १९५५ रोजी "ज्या भूमीने सम्राट अशोकाला अहिंसेची दिक्षा दिली आणि सम्राट अशोकाने रूपांतर धर्म अशोकात परिवर्तन केले अशा भूमीत प्रवेश करताना मला अती आनंद होत." असे म्हणत ओरिसाच्या भूमीत विनोबांनी प्रवेश केला. २२ फेब्रुवारीला विनोबांच्या ग्रामदानात आणखी एकाची भर पडली. कटक जिल्ह्यातील 'बरी' हे नाव. गोपबंधु चौधरी आणि रमादेवी या दाम्पत्याच्या रचनात्मक कार्याचे केंद्र होते. येथून जवळच मानपूर हे गाव होते. चौधरी दाम्पत्याच्या पुढाकाराने मानपूर हे दुसरे ग्रामदानी गाव ठरले. मानपूर येथील ५७५ एकर जमिनीचे दान व पुनर्वितरण बुद्ध जयंतीचा योग साधून ठेवण्यात येऊन त्याचे व्यवस्थापन सर्वोदय मंडळाकडे सोपविण्यात आले.
२१ मार्च १९५५ रोजी विनोबा जगन्नाथपुरीला पोहचले. २५ मार्च ते २७ मार्च या काळात पुरी येथे सर्वोदय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २२ मार्च विनोबा जगन्नाथाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता, विनोबासोबत असणाऱ्या फ्रेंच महिलेपुढे पुजाऱ्यांनी विनोबांनाही प्रवेश नाकारला. तेव्हा बाहेरून नमस्कार करून विनोबा परतताना म्हणाले, "चारशे वर्षांपूर्वी गुरु नानकासोबतही असेच घडले होते. या युगात प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक धर्माची कसोटी होईल आणि असेच जर आपण स्वतःला चार भिंतीत बंदिस्त करणार असू तर आपली प्रगती खुंटल्याशिवाय राहणार नाही. व्यापक दृष्टीकोन ही जी . हिंदू धर्माची विशेष ओळख आहे तीही संपल्याशिवाय राहणार नाही. आपली मंदिरे आणि धर्मग्रंथ सर्व श्रद्धाशीलांसाठी खुली असावीत, मंदिराचा तुरुंग होता कामा नये. "
१८ एप्रिल १९५५ रोजी भूदान कार्यक्रमाला चार वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त देशभर विशेष कार्यक्रम व्हावे असे ठरवण्यात आले. या निमित्त सेवाग्राम आश्रमातील आश्रमवासियांनी निश्चय केला की दोन वर्षे सेवाग्राम आश्रम बंद ठेवून सर्व आश्रमवासी देशभरात भूदान-ग्रामदानासाठी खास प्रयत्न करतील. रविशंकर महाराज आणि बाबा राघवदासांनी घोषणा केली की ते गुजराथ आणि उत्तर प्रदेशात भूदान-ग्रामदानाचे कार्य करतील.
विनोबांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या महासभेत यावे अशी इच्छा श्रीमन्नारायण यांनी काँग्रेस अध्यक्ष यु. एन. ढेबर आणि पंतप्रधान नेहरू यांचे जवळ व्यक्त केली. त्यासाठी महासभेची बैठक मे १९५५ मध्ये ओरिसात घेण्यात यावी. ज्यामुळे ओरिसात पदयात्रेत असणारे विनोबा महासमितीच्या बैठकीला हजर राहू शकतील. त्यानुसार ओरिसा काँग्रेसने गंजाम जिल्ह्यात बरहामपुर येथे काँग्रेस महासमितीची बैठक बोलावली. विनोबांनी त्याला त्वरीत मान्यता दिली. या काँग्रेस महासमितीच्या बैठकीत विनोबा म्हणालें, "आपल्या देशातील शेतजमीनीचे वाटप अन्यायपूर्ण आहे असे सामान्यपणे दिसून येते. माझ्या मते हवा, पाणी आणि सूर्यप्रकाशाप्रमाणे जमीनीची उपलब्धता सर्वांना खुली असावी. शेतजमीनीची व्यक्तिगत मालकी असता कामा नये. ही समस्या शांततेच्या मार्गाने जर सुटत असेल तर आपल्या अहिंसक शक्तीत वाढ होईल. आणि जर आपण जमिनीच्या फेरवाटपाचा पुन्हा प्रयत्न केला तर काही नव्या समस्या निर्माण होतील ही समस्याच सोडवण्याचा विचार मी सद्या करीत आहे...'
११ सप्टेंबर १९५५ रोजी विनोबाच्या षष्ठ्याब्दीपर्यंत कोरापुट येथील ग्रामदानाची संख्या ४६९ झाली. यानिमित्त गुणपूर या गावी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विनोबांनी यावेळी ग्रामदानाचे महत्त्व सांगताना त्याच्या सात मूलभूत उद्देशाचे वर्णन केले १) गरीबी संपवणे २ ) जमिनीच्या मालकीतून द्वेषाऐवजी स्नेहभावना वाढीस लावणे ३) जमीन वाटपावरून वर्ग विद्वेष संपवून परस्पर सहयोगाची भावना वाढवणे ४) यज्ञ, दान आणि तपावर आधारित भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे, सुदृढ बनवणे ५) श्रमाची प्रतिष्ठा अपरिग्रह, सहकार आणि स्वावलंबनावर आधारित समाज रचना निर्माण करणे ६) देशातील सर्व राजकीय पक्षाना एकाच व्यासपीठावर आणून पक्षिय कटुता दूर करणे ७) जागतिक शांतता निर्माण करण्यास मदत करणे.
कोरापुट जिल्ह्यात विनोबांचा मुक्काम चार महिने होता. त्यांच्या उपस्थितीत ग्रामदानाच्या कार्याला चांगलीत गती मिळाली. ३० सप्टेंबर १९५५ रोजी विनोबांनी ओरिसाची यात्रा संपवली. ज्यावेळी एकट्या कोरापुट जिल्ह्यातील ग्रामदानाची संख्या ८१२ असून भूदानात एकूण दोन लाख सत्तावन हजार तीनशे एकर जमीनीचे दान मिळाले होते.
पुन्हा आंध्रप्रदेश २ ऑक्टोबर १९५५ रोजी विनोबांचे चार वर्षांनंतर : पुन्हा आंधात आगमन झाले. आंध हे राज्य नव्यानेच निर्माण करण्यात आले होते. पहिल्या तीन महिन्यात विनोबांनी श्रीकाकुलम, विशाखापट्टनम्, पुर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि गुंडूर जिल्ह्यात पदयात्रा काढली.. सेवाग्राम आश्रमाचे जुने कार्यकर्ते श्री. प्रभाकरजी सतत त्यांच्याबरोबर असत. तर प्राध्यापक राम चंद्रराव (गोरा) सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले. गोरा विचाराने नास्तिक असले तरी त्यांचा गांधीच्या विचारावर आणि चळवळीवर विश्वास असल्यामुळे संपूर्ण आंध्र राज्याच्या प्रवासात त्यांनी विनोबाला साथ केली. आपल्या आठ महिन्याच्या काळात विनोबांना ६३ हजार एकर जमीन भूदानात मिळाली. सर्वधर्म समभाव एकादश व्रते यावर व्याख्याने दिली. मौन प्रार्थनेचा प्रकारही यावेळी विनोबांनी सुरू केला. मौन ही सर्वोत्तम भाषा आहे. मौन राखून ईश्वराचे ध्यान ही सर्वोत्तम प्रार्थना आहे. सर्वच धर्मात सत्य प्रेम करूणा सांगितली आहे. विनोबांच्या मौनाचा ह्या नव्या उपक्रमाला बरेच यश मिळाले.
१३ मे १९५५ रोजी विनोबांनी तामीळनाडूत प्रवेश केला. एव्हाना विनोबाच्या भूदानाची किर्ती जगभर पसरत चालली होती. परदेशातून लोक भूदान कार्य पाहण्यासाठी येऊ लागलेहोते. विनोबाशी चर्चा करीत एका डच माणसाने गांधीजींचा प्रभाव नष्ट होत चालल्याचे विचारल्याबरोबर विनोबा म्हणाले, 'देशातच नव्हेतर जगात गांधीचा प्रभाव वाढत आहे, कारण भारताने परराष्ट्रीय धोरणात तटस्थता स्वीकारण्यात आली आहे. भूदानाची चर्चा जागतिक पातळीवर होऊ लागली हे सर्व काही गांधीच्या प्रभावाचे लक्षण आहे. ' तामीळनाडूतील सात महिन्याच्या पदयात्रेत विनोबा मदुराई, पांडेचेरी, तंजावर, पलानी, कांचीपूरम करीत १६ एप्रिल १९५७ रोजी कन्याकुमारीला पोहोचले. 'विवेकानंदांनी ज्या शीळेवर बसून ध्यान केले होते, त्याच शिळेवर विनोबांनी प्रतिज्ञा केली, "भारतात ग्राम स्वराज्याची स्थापना होईपर्यंत माझा संचार चालूच राहील आणि यासाठी सतत काम करीत राहीन. यासाठी हे ईश्वरा मला शक्ती दे.'
१८ एप्रिल, १९५७ ला विनोबांनी केरळ राज्यात प्रवेश केला. केरळचे मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांनी त्यांचे स्वागत केले. कम्युनिस्टानी निवडणुकाच्या माध्यमातून सरकार हातात घेणारे केरळ हे जगातील पहिले राज्य ठरले. केरळविषयी बोलताना विनोबा म्हणतात, " या भागावर राज्य आहे शंकराचार्याचे ज्यांनी अभेद शिकविला. जेथे अभेद येतो तेथे मानवता विरून जाते. या भागावर राज्य आहे प्रभु येशूच्या शिष्याचे. आपल्यावर जितके प्रेम कराल तितकेच शेजाऱ्यावर करा" असे सांगून विनोबांनी या प्रदेशांत आपले कार्य केले.
शांतीसेना: १९३५ साली अपूर्ण राहिलेली विनोबांची इच्छा ७ मे १९५७ ला पूर्ण झाली. वायकोम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी इच्छा असूनही विनोबा शंकराचार्याचे जन्मस्थान कालडीला जाऊ शकले नव्हते. या वेळी मात्र ९ व १४ मे १९५७ च्या सर्वोदय संमेलनाच्या निर्मात्याने विनोबा कालडीला गेले. कम्युनिस्टाचा प्रभाव असूनही विनोबांचा संचार राज्यभर अवैध चालू होता. संमेलनाच्या निमीत्याने केलेल्या भाषणात विनोबा म्हणतात, 'ग्रामदानाचा अर्थ आहे साम्ययोग अथवा समविभाग ग्रामदान म्हणजे व्यक्ती आणि समष्टीचे पारस्परीक तादात्म्य. ग्रामदानात जमीनीचे मालक जमीन देतील. कामगार श्रम देतो, बुद्धीवंत बुद्धीदान करतात यातूनच समानयुक्त समाज निर्माण होऊ शकेल.' साम्यवाद्यांनाही हेच हवे आहे. केरळातील परिस्थितीचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून विनोबा म्हणतात, “हिंसेचा प्रतिकार करण्यालाही विनोबांनी शांतीसेनेची कल्पना मांडली. शांतीसेना म्हणजे हिंसेचा प्रतिकार करून शांततेसाठी सर्वस्वाचे समर्पण करणारी सेना होय. पाच हजारांच्या सेवेसाठी एक शांती सैनिक असे त्याचे प्रमाण असेल. केलप्पन यांच्या सेनापती पदाखाली कोलीक्कड येथे ११ जुलै १९५७ रोजी शांतीसेनेची स्थापना करण्यात आली. यावेळी विनोबांना म. गांधीजींची आठवण झाली. कारण शांतीसेनेची मूळ कल्पना म. गांधीजींची होती. त्यांच्या आत्म्याने या कार्याला चैतन्य प्राप्त झाले. थोर माणसाच्या आत्म्याचा असा ही उपयोग होतो" असे विनोबांनी म्हटले होते.
शांतीसेनेची अनिवार्यता सांगताना विनोबा म्हणतात, 'ग्रामसमाजाशिवाय कोणतीच गोष्ट साकार होणार नाही. जसे यु. एस. ए. (युनायटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका) आहे आणि दुसऱ्या बाजूने यू. एस. एस. आर. (युनायटेड सोविएत सोशॅलिस्ट रिपब्लिक- रशिया) आहे. तसेच आम्हालाही प्रत्येक गावाला सर्वोदय रिपब्लिक बनवायाचे आहे आणि त्यासाठी गावोगाव युनायटेड स्टेटस ऑफ सर्वोदय रिपब्लिक व्हायला हवे. असे केले तरच 'पीस पोटेन्शीयल (शांतीबळ) प्रगट होईल.
बैद्यनाथ धाम, पुरीप्रमाणेच गुरुवायुर मंदिरातही विनोबांना प्रवेश नाकारण्यात आला. म. गांधींनी उपवास करण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे गुरुवायुर मंदिर अगोदरच दलितांना खुले करण्यात आले होते. यावेळी विनोबांबरोबर काही ख्रिश्चन सहकारी होते. त्यांना प्रवेश मिळेल का? असे विनोबांनी नम्रपणे विचारल्यानंतर नकार मिळाला. विनोबांनी दर्शन घ्यावे अशी विनंती विनोबांना करण्यात आली तेव्हा विनोबा म्हणाले, "माझा नाईलाज आहे. जर माझ्या मित्रांना सोडून मी देवळात गेलो तर मला तेथे देव दिसणार नाही. " यावरून विनोबांना केरळातील सामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला.
ग्रामदान परिषदः भूदान, ग्रामदान आणि शांतीसेना अशी प्रगती करीत. सर्वोदय समाज कसा असतो. हे कर्नाटकाने दाखवून द्यावे असे आवाहन करीत २४ ऑगस्ट १९५७ला विनोबांनी भूकूर्ग मार्गेकर्नाटकात प्रवेश केला. २१ व २२ सप्टेंबर १९५७ रोजी येलवाल येथे ग्रामदान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सेवा संघाच्या निमंत्रणावरून देशातील प्रमुख नेते या परिषदेत सहभागी झाले होते. पं. नेहरू, मोरारजी देसाई, नंबुद्रीपाद, जयप्रकाश नारायण आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.
६५
सामाजिक, आर्थिक प्रश्नाबाबत, विशेषतः जमिनीच्या प्रश्नासंबंधीचे समाधान प्राप्त व्हावे म्हणून कशा प्रकारे अहिंसक पद्धतीने कार्य केले गेले. याची माहिती विनोबांनी दिली. भूदानापासून ग्रामदानापर्यंत झालेल्या प्रगतीचे विवेचन केले. परिषदेला उपस्थितांनी ग्रामदान आंदोलनाचे स्वागत केले. परिषदेला हजर केंद्रीय व राज्य सरकारच्या सदस्यांनी ग्रामदान आंदोलनाला सर्वोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. सरकारच्या पंचवार्षिक योजनेलाही या कार्याने मदत होईल. सहकारी विकास खंड योजना आणि ग्रामदान चळवळ यांच्यात घनिष्ट सहकार्य प्रस्थापित होणे गरजेचे आहे. असे सर्वात शेवटी प्रतिपादन करण्यात आले.
याच परिषदेने ग्रामदान चळवळीने दोन प्रमुख आक्षेप घेतले जात त्याची उत्तरे विनोबांनी दिली. पहिला आक्षेप भूदान व ग्रामदान आंदोलन गांधींच्या विश्वस्त संकल्पनेच्या विरोधी आहे, कारण यात मालकी हक्काचे विसर्जन आहे. या आक्षेपाला उत्तर देताना विनोबा म्हणतात, ग्रामदानातून प्रत्येकाला जबाबदारीचे शिक्षण मिळणार आहे. दुसरा आक्षेप भूदान ग्रामदानातून जमीनीचे लहान लहान तुकड्यात विभाजन होणार आहे. विनोबा म्हणतात, "जमिनीच्या तुकड्यापेक्षा मी मानवाच्या मनाच्या तुकड्याची चिंता करतो. मनामनाला जोडणारे हे आंदोलन आहे. माणसाची मने जोडली गेली की आपोआपच जमिनीच्या तुकड्यांची समस्या मिटेल."
याच काळात संयुक्त कर्नाटक राज्याचा पहिला वर्धापन दिन आला. या निमित्ताने विनोबांनी 'जय जगत' या नव्या मंत्राची घोषणा केली. 'बाबा साऱ्या जगाचे हित चिंतितो' अशी त्यांची यावेळी सर्वांना प्रार्थना होती. सर्वानी जगाच्या कल्याणार्थ कंबर कसली पाहिजे. येथून पुढे जेथे जेथे विनोबा जात लेथे तेथे जय जगतचाच घोष केला जाई.
सर्वोदय पात्रः १ फेब्रुवारी १९५८ रोजी धारवाड येथे विनोबांनी 'सर्वोदय पात्रा'ची संकल्पना मांडली. शांतीसेनेची स्थापना झाल्यापासून विनोबांना शांतीसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावीत होता. शांतीसेनेचा खर्च कसा भागवायचा? शांतीसेनेच्या कार्यासाठी देणग्या, अनुदानाची कल्पना विनोबांना रुचली नाही. शांतीसेनेचा खर्चही जनतेने स्वच्छेने उचलावा या दृष्टीने विचार करताना विनोबांनी 'सर्वोदय पात्रा'ची कल्पना मांडली. ज्यांचा शांतीसेना विचाराला पाठिंबा आहे अशा कुटुंबाने आपल्या घरी मातीचे वा दुसरे कोणतेही भांडे ठेवावे. त्यात रोज मूठभर धान्य टाकावे आणि शेवटी हे धान्य सर्वोदयासाठी किंवा शांतीसेनेच्या उपजिविकेसाठी वापरावे असा यामागचा विचार होता. यालाच विनोबा 'संमतीदान'ही म्हणतात. एखाद्या कुटुंबाने सर्वोदय पात्र आपल्या घरी ठेवले म्हणजे त्या कुटुंबाची सर्वोदय संकल्पनेले संमती आहे, तो शांततेचा समर्थक आहे असे गृहीत धरून त्याचे मूठभर धान्य स्वीकारले जाईल. कारण या मूठभर धान्यातून मोठी जनशक्ती निर्माण करता येईल असे विनोबांचे मत होते.
दक्षिण भारताची पदयात्रा संपवून विनोबा निपाणी मार्गे २३ मार्च १९५८ रोजी महाराष्ट्रात पोहचले. यावेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोमात चालू होते. विनोबांनीही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी जनतेने केली होती. अर्थात यावर विनोबांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विनोबाचे मत होते, "मी माझी सर्व शक्ती जमीनेचे प्रश्न सोडविण्यावर खर्च करीन. कोणत्याही राजकीय वादाच्या भोवऱ्यात मला पडायचे नाही. माझा कोणत्याही राजकीय संस्था किंवा राजकीय पक्षांशी संबंध नसून विशुद्ध रचनात्मक कार्य करणाऱ्या संघटनेशीही मी संबंधीत नाही तेव्हा जनतेने मात्र इतर वादात गुंतवू नये.
कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्याची पदयात्रा संपवून विनोबा ३० मे १९५८ रोजी पंढरपूरला पोहोचले. विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांनी विनोबांना आपल्या सर्व शिष्यास सर्वधर्मियांनी मंदिरास भेट देण्याची विनंती केली. विनोबा आपल्या सर्व सहकान्यासह विठ्ठल मंदिरात गेले. त्यांच्या शिष्यात जर्मन, मुस्लिम, पारसी, आणि काही दलित सभासदांचा समावेश होता. ही फार महत्त्वाची घटना होती. हिंदू धर्माने मंदिर इतर धर्मियांना खुले होते. विनोबा म्हणतात, "आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. या घटनेचा माझ्या मनावर मोठा प्रभाव पडला. आज महाराष्ट्राने मला एक मोठे दान दिले आहे. सर्वोदयापती हे दान फार मोलाचे आहे. " ३० मे १९५८ रोजी पंढरपुरात सर्वोदय संमेलन सुरू झाले. या संमेलनातील विनोबाचे भाषण खूप गाजले. कारण या भाषणात त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, "अमेरिकेकडे भारतापेक्षा बारापट जमीन आहे. याचा अर्थ जर आमच्या जवळ असणाऱ्या जमीनीपेक्षा बारापट जमीन उपलब्ध झाली तर भौतिकदृष्ट्या आम्ही अमेरिकेची बरोबरी करू शकू. पण आपण एक लक्षात घेतले पाहिजे की हिंसेच्या क्षेत्रात आपण कधीही कोणत्याही बड्या शक्तीची बरोबरी करू शकणार नाही. तेव्हा आपणासमोर दोनच पर्याय आहे पूर्ण अहिंसक होऊन नैतिकतेचा विकास करणे अथवा हिंसेचा अवलंब करून सर्वनाश ओढवणे. आपल्या पदयात्रेत विनोबा साहित्यिकांच्या भेटी घेत. औरंगाबाद येथील साहित्यिकांच्या सभेत विनोबा म्हणाले, "मी साहित्यिक नाही, साहित्यिकांचा भक्त आहे." असे म्हणत त्यांनी साहित्यिकांना 'आम्ही घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे जतन करू' असे सुचवले. नेवाश्याच्या भेटीत शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि गांधी यांचा ऋणयुक्त उल्लेख केला. चाळीस गावच्या सर्वसेवा संघाच्या बैठकीत त्यांची कृपालानीशी भेट झाली. चाळीसगावहून धुळ्याला जाताना जुन्या कारागृहाच्या आठवणी सांगत विनोबांनी अक्राणीमहाला तालुक्याकडे प्रयाण केले. स्वातंत्रदिनाच्या मुहूर्तावर अक्राणी तालुका 'ग्रामदानी' म्हणून घोषित करण्यात आला. देशातील 'अक्राणी' हे पहिले 'तालुकादान' होय. (१५-८-१९५८)
गुजराथ - राजस्थान: २२ सप्टेंबर १९५८ रोजी विनोबांनी गुजराथ राज्यात प्रवेश करताना "म. गांधींच्या दर्शनानेमला जो आनंद होत आहे तोच आनंद मला आज होत आहे. असे म्हटले. सुरत, बार्डोली, बेडणि, बडोदा, पंचमहाल खेडा असा त्यांचा मार्ग होता. बेडणि येथील सभेत विनोबा म्हणाले, "कल्याणकारी राज्याचा अर्थ समाजवाद होऊ शकत नाही. कारण समाजवाद सर्वकाही राज्याच्या सत्तेवर निर्भर असते. सर्वकाही सरकारात केंद्रीत होते आणि सरकारचा प्रमुख आधार असतो. राज्य जोपर्यंत शस्त्र बळावर चालेल तेथे खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. मी तर निवडणुकीला उभे राहायचे ठरवले तर माझ्या निवडणुकाचा जाहीरनामा असेल १) सशस्त्र सैन्याचे विसर्जन २) भंगी मुक्ती ३) कापड गिरण्याची कायद्याने बंदी. या जाहीरनाम्यावर मला कुणीही मतदान करणार नाही, तरीपण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत यासाठी लोकमत बनवावे लागेल. "
बडोद्याला विनोबाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वयाच्या १० व्या वर्षापासून ते २२ वर्षांपर्यंत विनोबाचे शिक्षण बडोद्यात झाले. त्यांची साधना या ठिकाणी झाली. समविचारी मित्रही त्यांना बडोद्यातच मिळाले. अशा सर्व समविचारी मित्रांचे एक संमेलन विनोबाच्या उपस्थितीत झाले. 'मी मैत्रीचे नाते सर्वश्रेष्ठ मानतो' असे या प्रसंगात विनोबा म्हणाले. ज्या घरात आईसोबत त्यांनी बालपण घालवले होते त्या घरालाही भेट दिली. बडोद्यानंतर विनोबा खेडा जिल्ह्यात पोहोचले. तेथून भावनगर, राजकोट, जामनगर आणि सुरेंद्रनगरलाही त्यांनी भेटी दिल्या. राजकोट मुक्कामी विनोबांनी म. गांधीजींची मोठी बहीण रलियान बेन उर्फ फईबा यांची भेट घेतली. राजकोटच्या सायंकाळच्या सभेत विनोबांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, 'गांधीचे अहिंसक समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहिंसक शांतीसेनेची गरज आहे म्हणून शांतीसेनेचे संघटन मजबूत करावे. '
जानेवारी १९५९ मध्ये विनोबांनी राजस्थानच्या पदयात्रेला प्रारंभ केला. राजस्थानविषयी ते म्हणतात, "राजस्थान शूरभूमी व संताची भूमी आहे. मात्र राजस्थानकडून शांतीसेनेसाठी संख्यायुक्त व गुणयुक्त शांतीसैनिक हवे आहेत. मीराबाईच्या भूमीत जमीनीची समस्या प्रेम, करुणा आणि भक्तीच्या माध्यमातून सुटावी. पण आम्ही भक्तीपासून लांब असल्यामुळे आत्मविश्वास गमावला आहे. हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी मीराबाईंचा आदर्श स्वीकारावा. " विनोबा मीराबाईना बंडखोर संत म्हणत.
जय जगत : सर्वोदय समाजाचे ११ वे अधिवेशन अजमेर येथे फेब्रुवारी १९६९ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात अध्यक्ष होते केलप्पन काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी, मास्टर तारासिंह या संमेलनाला हजर होते. उद्घाटनाच्या भाषणात विनोबा म्हणतात, "शांतीसेना ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. वर्तमानकाळात सर्वच प्रश्नाचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरून करावा. म्हणून आपण सतत घोषणा दिली पाहिजे "जग जगत'." याचवेळी विनोबांची अजमेरच्या ख्वाजा मोइनद्दीन चिश्ती यांच्या दर्यालाही भेट दिली. दर्ग्यात मुसलमानासोबत नमाजमध्ये भाग घेतला. मशिदीत स्त्रियांना प्रवेश नव्हता पण विनोबांबरोबर अनेक स्त्रियांही तेथे गेल्या. सर्वांनी मिळून सर्वधर्म प्रार्थना म्हटली. येथील संदेशात विनोबा म्हणतात, 'इस्लामचा संदेश अत्यंत पवित्र असून त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. म्हणून मी जाहीर करतो की, मी हिंदू बरोबर मुसलमान आणि ख्रिश्चनही आहे.
२ मार्चला शांतीसेनेच्या एका पथकाने अजमेर-जयपूर मार्गांवर गंगवाना या गावात समतेची यात्रा काढली. या यात्रेत जयप्रकाश नारायण, केलप्पन, रविशंकर, अप्पा पटवर्धन इ. सामील झाले होते. अमेरिकेचे निग्रो नेते मार्टीन ल्यूथर किंग हेही थोडावेळ या समता यात्रेत सहभागी झाले होते. मार्टीन ल्यूथर किंग आणि त्यांची पत्नी कोरेटा किंग यांनी विनोबांची भेट घेतली. निःशस्त्रीकरणासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नावर चर्चा केली. अणुयुगात 'सत्याग्रहाचे स्थान सांगताना विनोबा म्हणाले, "अणुयुगात मानसिक वृत्तीचे संघर्ष कायम ठेवून आपण पुढे जाऊ शकत नाही. अण्वस्त्रामुळे या जगाचा नाश ठरला आहे. मानसिक स्तरावर विचार करण्यापेक्षा आणि मानसिक स्तरावर जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. अनेक संघर्ष मानसिक स्तरावर निर्माण होत्तात, पण अतिमानसिक स्तरावरून या संघर्षाचे निराकरण केले पाहिजे. माझ्या मते अणुयुगाबरोबरच अतिमानसिक युगाचाही प्रारंभ होत आहे. आणि सत्याग्रहाचा अर्थ सत्याला आपले काम करू द्या, आपण आपला आत्मा सत्याच्या आड येऊ न देणे महत्त्वाचे आहे. "
मार्टीन ल्यूथर किंग यांनी विचारणा केली की, "शांतीसेना भारतीय सेनेला पर्याय होऊ शकेल का?" विनोबांनी उत्तर दिले, "प्रश्न अवघड आहे. परंतु शांतीसेनेची वाट न पाहताच भारतीय सैन्याचे विसर्जन करून टाकावे. शस्त्रत्याग, कल्पनाशक्ती व साहस असेल तर कोणताही देश सैन्याचे विसर्जन करील. भारत एकटाच शस्त्र संन्यासाची सुरुवात करू शकतो कारण ती भारतीय परंपरा आहे. "
दुसरे दिवशी १३ मार्च १९५९ रोजी जमनालाल बजाजच्या काशी-का- वास या जन्मगावी विनोबांनी राजस्थानातील सर्व गोसेवकांची भेट घेतली. त्यांना मार्गदर्शन करताना विनोबा म्हणाले, "भारताचा एक स्वतःचा असा समाजवाद असून गाय ही एक कुटुंबाचा घटक मानला गेला आहे. म्हणून गाईइतकेच इतरावरही प्रेम करा. या समयी ब्रह्मविद्या मंदिराची स्थापना केल्याची घोषणा विनोबांनी केली. या ठिकाणी स्त्रियांना उद्देशून विनोबा म्हणाले, "ज्यापमाणे पुरुषांना ब्रह्मचर्यापासून संन्यासापर्यंत सर्व अधिकार आहे तेच अधिकार J स्त्रियांनाही मिळावे. "
पंजाबात: राजस्थानचा आपला कार्यक्रम आटोपून १ एप्रिल १९५९ ला विनोबांनी पंजाबात प्रवेश केला. राज्यपाल न. वि. गाडगीळ आणि मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरा यांनी त्यांचे स्वागत केले. या निमित्ताने 'बुनियादी तालीम' परिषदेचे आयोजन राजपुरा या गावी करण्यात आले होते. यावेळी विनोबा म्हणाले, "शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक आहेत. मात्र हे बदल वर्तमान काळाची गरज भागविणारे असावेत. "
भाक्रानान्गल धरणाला भेट दिल्यानंतर विनोबा म्हणाले, “भाक्रा नान्गलला पं. नेहरूनी नव्या योजनेतील मंदिर म्हटले होते यांना मी मंदिर तेव्हाच म्हणेल जेव्हा या धरणाच्या पाण्याखालील शेतीचा सहावा भाग भूमीहीनाना मिळेल. या धरणाचा फायदा किती गरीबांना होतो हे मला बघायचे आहे."
एका आठवड्यानंतर होशियापुर येथे शिरोमणी अकाली दलाचे प्रतिनिधी विनोबांना भेटले. विनोबांनी त्यांना सुचविले की, 'आपल्या संघटनाच्या निवडणुका घेणे थांबवून सर्व संमतीवर आधारीत कार्य पद्धतीचा स्वीकार करावा. गुरुद्वाराच्या पवित्र भूमीत प्रवेश करताना राजकारणाचे जोडे बाहेरच काढून ठेवणे इष्ट आहे. २२ सप्टेंबर १९५९ ला पठाणकोट येथे सर्व सेवा संघाच्या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली. त्याला जोडूनच भारतीय शांतीसेना मंडळाची स्थापनाही करण्यात आली. याचवेळी आवाहन करण्यात आले की सर्व राजकीय पक्षांनी आपापली आचारसंहिता लोकशाही तत्त्वानुसार तयार करावी.
हिमाचल प्रदेशात दोन आठवड्याचा वास्तव्यानंतर विनोबा अमृतसरला आले. अमृतसर येथे देशभरातून आलेल्या लेखक, कवीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विनोबांनी लेखक आणि कवींनी जनतेला लोकनीतिचे शिक्षण देण्यासाठी लिखाण करण्याचे आवाहन केले.
काश्मीरातः काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनामुळे विनोबा चिंताग्रस्त होते. या काळात त्यांनी काही निश्चित भूमिका ठरविली होती. पं. नेहरूंशी त्यांनी याबाबत चर्चाही केली होती. पण तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा प्रत्यक्ष तेथे जाऊन अभ्यास करावा असे त्यांनी ठरविलेहोते. मे १९५८च्या पंढरपूरातील सर्वोदय संमेलनही त्यांनी काश्मीरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. २२ मे १९५९ रोजी विनोबांनी काश्मीरात प्रवेश केला.
विनोबांच्या काश्मीर यात्रेबाबत देशीविदेशी पत्रकार, राजकारण्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली होती. काश्मीर प्रश्नावर विनोबा कोणता तोडगा सुचवतात याकडे नेहरूसह सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. लखनपूरच्या पहिल्या सभेत विनोबांनी जाहीर केले, "माझ्याजवळ अशी कोणतीही योजना नसून माझी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे. ईश्वराच्या इच्छेशिवाय इकडची गवताची काडी तिकडे होत नाही. डोळे उघडे ठेवून पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मी आलो आहे. सर्वाच्यासाठी प्रेमाचा उपहार मी आणला आहे. माझ्या भाषणावर विश्वास नाही. मनातून केलेली प्रार्थनाच कामी येते, परिणामकारक ठरते. "
विनोबांच्या काश्मीर यात्रेच्यापूर्वीच दोन महत्त्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. एकतर सरकारनेच जमीनीची कमाल धारणा ठरवून भूमीहीनासाठी जमीन वाटपाचे काम सुरू केले होते. दुसरी बाहेरच्या राज्याच्या रहिवाशावर काश्मीरात ज्या काही मर्यादा होत्या त्या शिथील करण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटनामुळे काश्मीरात भूदान ग्रामदानास अनुकूल वातावरण निर्माण झाले. काश्मीरचे पंतप्रधान बख्शी गुलाम मोहमंदानी विनोबाच्या पहिल्या भेटीतच जाहीर केले की, "राज्यातील सर्व जमीन या भूदान आंदोलनास दिली जाऊ शकते.' पंतप्रधान बख्शी गुलाम महोम्मदांच्या घोषणेचे स्वागत करीत विनोबांनी म्हटले, "पंतप्रधानानी व्यक्त केलेली आकांक्षा व्यावहारिक असून काश्मीर हे एक आदर्श सर्वोदयी राज्य बनावे आणि त्याने उरलेल्या भारताला आदर्श घालून द्यावा. " विचारा आणि या प्रती आपली तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी विनोबांनी आत्मशुद्धीसाठी सकाळचे भोजन सोडले. काश्मीरभेटीपासून प्रवासात काही सामान पाठीवर घेण्याचीही सुरुवात त्यांनी केली. भारताच्या संपूर्ण प्रवासात विनोबांना मेजर जनरल यदुनाथ सिंह यांनी साथ दिली. यदुनाथ सिंहनी राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांचे सैनिकी सचीव म्हणून काम केले होते.
काश्मीर प्रश्नाविषयी चर्चा करताना एके ठिकाणी विनोबा म्हणालें, "काश्मीरच्या समस्या राजकारणातून सुटणार नाहीत. त्या सोडविण्यासाठी अध्यात्मिक पद्धतीने प्रयत्न व्हायला हवेत आणि अध्यात्मिकता म्हणजे परस्पर सद्भाव आणि सर्व संमती.'
"काश्मीरचा संबंध भारत, पाक, अफगाणीस्तान, चीन, रशिया आणि अमेरिकेशी येतो. अमेरिकेशी संबंध पाकीस्तानमुळे येतो. म्हणून काश्मीरी जनतेने अतिमानस भूमिका स्वीकारून जागतिक दृष्टीने विचार केला पाहिजे. ऋग्वेदात 'विश्वमानुष' हा विचार आहे. 'विश्वमानुष' म्हणजे जगाचा नागरिक अशा उदात्त दृष्टीकोनामुळेच आपल्या समस्या सुटतील." तेव्हा एका सैनिकाने उठून जगजगतची घोषणा केली. त्यावेळी विनोबा म्हणाले, "जगजगत म्हणजे स्वतः कुणाला भ्यायचे नाही आणि कुणाला घाबरावयाचे नाही. आज भारत पाकिस्तानला आणि पाकिस्तान भारताला घाबरवतो आहे म्हणून दोन्ही राष्ट्राचा शस्त्रास्त्राचा खर्च वाढत आहे. ही वेडी स्पर्धा थांबली नाही तर सर्वनाश अटळ आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले.
काश्मीरच्या यात्रेत रोज दुपारी अकरा वाजता कुराण पठणाचा कार्यक्रम विनोबांनी सुरू केला. मुस्लीम मोठ्या संख्येन हजर राहत. आधी मुस्लिमांना कुराण म्हणायला सांगत आणि नंतर विनोबा स्वतः कुराण म्हणत. विनोबांचे कुराणाचे ज्ञान, उच्चार आदी बारकावे पाहून काश्मीरीनी आशर्य व्यक्त केले. कुराणाची वचने सांगून झाल्यानंतर विनोबा म्हणत, "जमीनीचा मालक अल्ला आहे. जो माणूस स्वतःला जमीनीचा मालक म्हणवतो तो खरा मुस्लिम नसतो. जमिनीची मालकी सोडून ग्रामदान करणाराच सच्चा मुसलमान आहे. पैगंबराचा आदेश आहे की अल्लाने जी थोडी बहुत भाकरी दिली आहे त्यातील एक हिस्सा दान केला पाहिजे. तेव्हा जमीन असणाऱ्यांनी थोडी बहुन जमीन भूदानात द्यावी." या पदयात्रे दरम्यान सीमा रेषे जवळून विनोबा जात युद्ध बंदी रेषेच्या दोन्ही बाजूला तैनात सैनिक बघून विनोबा म्हणाले, "ही सीझफायर (सीमा रेषा) नसून रेडी टू फायर आहे. शांतता प्रश्नाची ही फार मोठी चेष्टा आहे.
२ ऑगस्ट १९५९ ला विनोबा श्रीनगरला पोहचले. तेथे त्यांचा पाच दिवस मुक्काम होता. तेथून त्यांनी शंकराचार्य टेकडीलाही भेट दिली. शेख अब्दुल्लाची भेट घेतली. एका आठवड्यानंतर विनोबा पहलगामला गेले. तेथून अमरनाथ ९६ मैलावर होते. तेथे भेट देण्याविषयीविचारलेअसता विनोबा म्हणाले, "मी दररोज अमरनाथ दर्शनाचा लाभ घेतो आहे. माझ्या दृष्टीने देशातील दीन दुःखी हेच माझे कुटुंबीय आहे." येथीलच एका समेत विनोबांनी विज्ञान आणि आत्मविज्ञानाची दोन समीकरणे मांडली.
१) राजकारण + विज्ञान = सर्वनाश
२) अध्यात्मिकता + विज्ञान = सर्वोदय अध्यात्मिकता धमपिक्षा मित्र आहे. देशपरत्वे धर्म भित्र असू शकतो परंतु अध्यात्मिकता सत्य, प्रेम, करुणेप्रमाणे सार्वत्रिक व समान आहे. राजकारण मात्र मानवाला एकत्र आणण्याऐवजी त्याच्यात भेद वाढवते. हे विज्ञान युगात अत्यंत घातक आहे. म्हणून अध्यात्मिकता आणि विज्ञान एकत्र येणे गरजेचे आहे.
काश्मीरमधून जम्मूला परतताना विनोबा पीरपंजाल टेकड्या उतरून उधमपूर, गढी, कटरा मार्गे जम्मूला पोहोचले. वाटेत तिबेट मधून शरणार्थी म्हणून आलेल्या तिबेटीशीही त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "चीनशी आपले संबंध दहा हजार वर्षा इतके जुने आहेत. त्यामुळे तिबेटी लोकांना आश्रय दिला. हे काही चूकीचे नाही. पण काहींना ते आवडले नाही. तिबेटींशी आमचे संबंध प्रेमाचे असताना तिबेटींना आश्रय न देणे अमानवी ठरले असते. काश्मीरची " यात्रा संपल्याच्या दिवशी ते म्हणाले, काश्मीर प्रश्नाची सोडवणूक घटनात्मक चौकटीतच होऊ शकते." स्वतंत्र काश्मीर हा विचार अव्यावहारिक आहे. पण भारत सरकारने काश्मीरला अधिकाधिक स्वायतत्ता बहाल करावी.' काश्मीर पदयात्रेत त्यांचा शेवटचा मुक्काम कचुआ येथे पडला. येथील नागालोकांशी संवाद साधताना विनोबा म्हणाले, "येथील जनतेने स्वतःला जागतिक नागरिक समजून येथे सर्वोदयी व्यवहार निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. "याच भागात राहणाऱ्या चीनी नागरिकाशीही त्यांनी संवाद साधला. त्यांना उद्देशून विनोबा म्हणाले, "तुमचे आमचे संबंध दहा हजार वर्षांपासूनचे आहेत असंख्य वंश, जाती आणि लोक येथे आले अजूनही येताहेत. अलीकडे तिबेटमधून काही निर्वासित भारतात आले, भारताने त्यांना आश्रयही दिला. त्यांच्या राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. त्यांना आश्रयाची गरज होती आम्ही त्यांना आश्रय दिला. हा आमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे. या देशात गौतमबुद्धाचा जन्म झाला. हा देश कुणालाही शत्रू मानीत नाही. तसेच जनतेशी आमचे प्रेमाचे संबंध शतकानुशतके आहेत, तसेच आजही असतील. अशावेळी निर्वासित तिबेटीना आम्ही तर आश्रय दिला नाही तर ते आमचे अधःपतन ठरेल.
"भारतात परतल्यानंतर विनोबांना जम्मू काश्मीरबद्दल विचारणा केली असता विनोबा म्हणाले, "सांप्रदायिकतेच्या आधारावर काश्मीरचे विभाजन अनुचित, बुद्धीशून्य आणि आत्मघातकी ठरेल. हिंदु मुस्लिम बहू मतावर आधारीत जर राज्याचे विभाजन केले तर संपूर्ण देशात याची हिंसात्मक प्रतिक्रिया उमटेल, ज्यामुळे कोट्यावधी मुस्लीमाचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. फाळणीनंतरही भारतीय नेत्यांनी आणि जनतेने द्वी राष्ट्रवादाचा सिद्धांत पूर्णतः स्वीकारलेला नाही. या उपर जर साप्रदायिक तत्त्वावर काश्मीरची फाळणी केली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल व पुन्हा हिंसा भडकेल." म्हणून विनोबांनी सुचवले की, "काश्मीर हे मिळते जुळते राज्य बनावे आणि धर्मनिरपेक्षतेच्या आदर्श खऱ्या अर्थाने निर्माण व्हावा.