ऑक्टोबर १९३७ साली वर्धा येथे आश्रमाच्या शिक्षण मंडळाचा प्रमुख या नात्याने गांधींच्या स्वावलंबी शिक्षण विषयक विचार विनिमयासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन विनोबांनी केले होते. काही दिवसापासून गांधीजीनी 'हरिजन' मधून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीने शिक्षण स्वावलंबी कसे होऊ शकेल या संबंधी लिखाण सुरू केले होते. भारतातील अनेक प्रांतातून १९३५च्या कायद्यानुसार मंत्रीमंडळे अस्तित्वात आली होती. या प्रांताच्या शिक्षण मंत्र्यासमोर व्यवहार्य अशी शिक्षणाची योजना सादर करावी असा गांधीजींचा मानस होता. ७ ते १४ वर्षे. वयाच्या मुलाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाविषयी वेगळी भूमिका असावी असे गांधीजींचे मत होते. प्रत्येक शाळेने त्याच्या खर्चासाठी विविध योजनातून पैसा उभा करावा असाही सल्ला गांधींना द्यावयाचा होता. गांधीजींनी मांडलेल्या धोरणानुकुल आणि धोरणाला प्रतिकूल असे विचार या परिषदेतून मांडले गेले. सर्व संमत निर्णयासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने संबंधित शिक्षणाच्या धोरणाचा सर्वांगाने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असे ठरले. गांधीजीने या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारून समितीच्या इतर सभासदांची नावाची यादीही गांधीजींनी स्वतःच तयार केली होती. विनोबांनी जामोया मिलीया इस्लामियाचे कुलगुरू डॉ. झाकिर हुसेन यांचे नाव या समितीच्या सभासदासाठी सुचवले आणि गांधींनीही त्याला लगेच मान्यता दिली आणि झाकीर हुसेन यांना उर्दूतून निमंत्रण पाठवले व त्यांनी ते लगेचच स्वीकारले.
शिक्षण परिषदः शिक्षण परिषदेतून डॉ. झाकिर हुसेन यांनी सामान्यपणे शिक्षण योजनेचे स्वागत केले, परंतु गांधीच्या स्वावलंबनाच्या विचारावर मात्र त्यांनी टीका केली. कारण झाकीर हुसेनच्या मते शाळेचा खर्च स्वावलंबनातून निघावा या नावाखाली शिक्षक आपल्या पगारासाठी विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने जबरदस्त फी वसूल करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. गांधीजीनेह्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. या परिषदेतून खालील इतर निर्णय घेण्यात आले.
१) सात वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना सक्तीचे मोफत शिक्षण असावे.
२) मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे.
३) गांधीजींची शिक्षणातून उत्पादकता आणि परिश्रमाची संकल्पना मान्य करण्यात आली. तसेच बुद्धी आणि योग्यतेच्या विकास त्यासाठी प्रशिक्षणाचा संबंध निर्माण व्हावा असेही मान्य झाले.
४) अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेतून शिक्षकाचा पगार व इतर खर्चासाठी योग्य तो पैसा उभा केला जावा.
यानुसार या शिक्षण पद्धतीचा सविस्तर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येऊन विशेष निमंत्रित म्हणून विनोबाचाही त्या समितीत समावेश करण्यात आला. या निमित्त डॉ. झाकिर हुसेन अनेकदा वर्ध्यास आले तसे या 'बुनियादी तालिम' योजनेस व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी विनोबांनी मदत करावी अशी विनंती डॉ. झाकिर हुसेन यांनी विनोबांना केली होती.
डिसेंबर १९३७ मध्ये या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. हा अहवाल तयार करण्यात विनोबांची महत्त्वाची भूमिका होती. कारण सुतकताईविणकाम इत्यादीची शास्त्रीय माहिती असणारे तेच एकमेव सभासद या समितीत होते. याच विषयावर नंतर विनोबांनी एक क्रमिक पुस्तकही लिहिले होते. म्हणजे स्वावलंबी शिक्षणाचे गांधीजी जरी जनक असले तरी त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम विनोबांनी केले होते. वास्तविक पाहता अशा प्रकारच्या स्वावलंबी शिक्षणाचा अवलंब विनोबांनी साबरमती आणि वर्धा आश्रमात या पूर्वीच केला होता, फक्त डिसें. १९३७ मध्ये त्याला रितसर 'बुनियादी तालीम' हे नाव मिळाले.
बुनियादी तालीम- अर्थ: या शिक्षण पद्धतीविषयी स्पष्टीकरण देताना विनोबा म्हणतात, “या शिक्षण पद्धतीत ज्ञान आणि काम वेगवेगळे नसून त्याला एकत्व प्राप्त झाले आहे. दोन्हीएक समान पुढे आले असून कामामुळे ज्ञान आणि ज्ञानामुळे उपयोगी काम आणि दोन्हीमुळे बुद्धी प्रत्यक्ष कामाची सुरुवात करत नाही, तोपर्यंत जिज्ञासा व ज्ञानाची भूक भागत नाही, आणि जेव्हा एखादे ज्ञान जिज्ञासेशिवाय मानवावर लादण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते ज्ञान मानव स्वीकारत नाही, ग्रहण करीत नाही. पुस्तकातून ज्ञानाची प्राप्ती होतेच असे नसून त्यासाठी त्याची मानसिक तयारी हवी, त्याच्या चिंतन शक्तीचा विकास व्हावा
म्हणून शिक्षण हे नदीच्या प्रवाहासारखे नित्यनूतन असावे. प्रत्यक्ष कामातून शिक्षणाची पद्धती समजावून सांगताना विनोबा म्हणतात, "वास्तविक पाहता शिक्षण हे प्रत्यक्ष कामाचे अनुषांगिक कल आहे. जो काही उपयोगी काम करतो. तेव्हा त्यातून त्याचे आपोआप शिक्षण होत जाते." शिक्षणाच्या विस्ताराऐवजी त्याचा खोलवर परिणामाचा विचार होणे अगत्याचे आहे, असे विनोबा म्हणतात. विद्यार्थी कसा असावा याबाबत विनोबा म्हणतात, "विद्यार्थी नम्र असावा, त्याचबरोबर तो आपल्या उद्दिष्टाबाबत दृढ निश्चयी, धैर्यशाली असावा.
'बुनियादी तालीम' फक्त ग्रामीण भागातून सुरू करावी हे एकदम चुकीचे आहे. संपूर्ण देशभर ही शिक्षण व्यवस्था अमलात आणावी. ग्रामीण भाग आणि शहरी भागातून वेगवेगळी शिक्षण पद्धती असू नये. खऱ्या अर्थाने नवी शिक्षण व्यवस्था त्याचवेळी आस्तित्वात येईल तेव्हा संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था 'नइ तालीम'च्या आधारावर उभी असेल, बुनियादी तालीमच्या संबंधात धार्मिक शिक्षणाचा विचार करताना विनोबा म्हणतात, "धार्मिक शिक्षण हितकारक ठरते हे निर्विवाद असले तरी आज आपण धर्माचा अर्थ अत्यंत संकुचित केल्याने धार्मिक शिक्षण नको असा विचार येत आहे." पुढे विनोबा म्हणतात, "वास्तविक पाहता धार्मिक शिक्षण हा साहित्याचा विषय नाही. शुद्ध, उत्तम चरित्र, ईश्वरावर श्रद्धा, आत्मा, शरीर नाही. हा धर्माचा प्राण असतो, धार्मिक शिक्षण सत्संग आणि योग्य व्यक्तीच्या सहवासातून मिळत जाते. म्हणून चांगल्या शिक्षकाची नियुक्ती म्हणजेच धार्मिक शिक्षण होय.
पहिला सत्याग्रह : आश्रम पातळीवर या घटना घडत असताना जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. हिटलरने पोलंडवर आक्रमण करून दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली होती. पोलंडशी असणाऱ्या अनाक्रमणाच्या करारामुळे ब्रिटनलाही युद्धात उतरावे लागले. ब्रिटन महायुद्धात पडल्यामुळे आपोआप भारतही महायुद्धाच्या गर्तेत सापडला. याप्रती आपला अहिंसात्मक निषेध व्यस्त करण्यासाठी गांधींनी सामुहिक सत्याग्रहाऐवजी व्यक्तिगत सत्याग्रहाचा मार्ग निवडला आणि पहिला सत्याग्रहीम्हणून विनोबांची निवड केली. १५ ऑक्टोबर १९४० रोजी पवनार येथे विनोबांनी आपलीभूमिका विषद केली. त्यानंतर यासंबंधी सुरगाव, सेलू, देवळी येथेही भाषणे केली. २१ ऑक्टोबर १९४० रोजी सरकारने त्यांना अटक करून युद्ध विरोधीभाषण केल्याचा आरोप ठेवून त्यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावली. तीन महिन्याची शिक्षा संपताच त्यांनी पुन्हा सत्याग्रह केल्यामुळे सहा महिन्याची शिक्षा देण्यात आली. तिसऱ्या वेळी सत्याग्रह केल्यामुळे मात्र त्यांना एक वर्षांची शिक्षा देऊन नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आले.
नागपूर जेलमध्ये जेलर विनोबाकडे जातीने लक्ष देई. त्यांचे जेवण, अभ्यासाला लागणारी पुस्तके व इतर साहित्य त्यांना पुरवले जाई. वाचण्यासाठी खोलीत दिव्याची व्यवस्था करण्यात आली. या काळात विनोबांनी रामकृष्ण बजाज यांना संस्कृत शिकवले. या शिक्षेच्या काळातील त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे 'स्वराज्यशास्त्र' या पुस्तकाचे लेखन. मुळात हे पुस्तक विनोबांनी मराठीतून लिहिले. अहिंसेवर आधारित राजकीय व्यवस्थेचे वर्णन 'स्वराज्यशास्त्र' या पुस्तकातून विनोबांनी केले. या पुस्तकात याच विषयावरील हॅरॉल्ड लास्कीच्या 'ग्रामर ऑफ पॉलिटीक्स' या ग्रंथापेक्षाही राज्यशास्त्राचा अधिक मूलगामी विचार विनोबांनी केलेला दिसतो. म्हणून भारतीय राजकारणाचे व्याकरण असेही स्वराज्यशास्त्र या पुस्तकास म्हणणे संयुक्तिक ठरेल. पन्नास पानाची ही पुस्तिका म्हणजे आधुनिक राज्यशास्त्राचा मुकुटमणी आहे. याच काळात डॉ. भारतन कुमारप्पा नागपूर जेलमध्ये होते. त्यांनी दादा धर्माधिकारी आणि गोपाळराव काळे यांच्या मदतीने 'स्वराज्यशास्त्र' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला.
राज्यसरकार आणि स्वराज्याविषयी मत व्यक्त करताना विनोबा म्हणतात, "राज्य किंवा सरकार ही एक वस्तू असून 'स्वराज्य' ही वेगळीच वस्तु आहे. सरकार किंवा राज्याची प्राप्ती हिंसेने करता येते परंतु स्वराज्याची प्राप्ती फक्त अहिंसेशिवाय असंभव आहे. विचार करणारे राज्याची मागणी न करता स्वराज्याची मागणी करतात, स्वराज्य हा वेदात वापरलेला शब्द असून त्याचा अर्थ होतो, 'प्रत्येकाचे राज्य'. असे राज्य जे प्रत्येकास आपले वाटते स्वराज्यात सतत विकास होतो. त्याच्या पद्धतीतही सतत बदल होत असतो.
शांतीसेनाः याच पुस्तकातून विनोबांनी गावाचे स्वावलंबन, स्वावलंबनाचे मार्ग आदीचेही स्पष्टीकरण केले असून अहिंसक समाज रचनेचेही समर्थन यातून केले आहे. बहुमताचे शासन, आत्ममनाचे रक्षण, निष्पक्ष आणि सुलभ न्याय पद्धती, सार्वजनिक शिक्षणाचे व्यवस्था इत्यादी स्वराज्याचे ध्येय असते, असहकार आणि प्रतिकाराचेही महत्त्व यात सांगितले आहे. अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी 'शांतीसेना' हा पर्यायही विनोबांनी सुचविला आहे. जे स्वराज्यशास्त्रात सांगितले आहे त्यातील तत्त्वानाच पुढे विनोबांनी परंपरागत राजकारणात 'लोकनीति संबोधले असून लोकनीति संघटीत करून तो शक्तीशाली व्हावे असे पुढे म्हटले आहे. त्यामुळे शासनाचा व खऱ्या लोकमताचा पाया मजबूत होईल.
शांतीसेनेचे कार्य आणि अहिंसात्मक व्यवस्था निर्माण झाल्यानंतर परंपरागत राजकारणाच्या ठिकाणी 'लोकनीती' संघटीत आणि सशक्त करण्याचे कार्य विनोबांनी केले आहे. ते म्हणजे 'शासनपद्धतीचा लोकमताचा आधार जितका बळकट असेल तितके त्या शासनाची सत्ता कमी कमी होत जाईल. अशावेळी समन्वय, सल्ला, मार्गदर्शन अशीच कामे सरकारला करावी लागतील. जगातील सर्व राजकीय सत्तेचे केंद्र गावागावातूनच असावे. गावाची व्यवस्था बहुमताऐवजी सर्वसंमतीने चालवले जाईल. विश्व लोकसभा ही सर्वात श्रेष्ठ सत्ता असेल. या मार्फत. आंतरराष्ट्रीय संबंधाचे नियमन आणि संचालन होईल. अशा व्यवस्थित जगातील विभिन्न राष्ट्राचे स्वरूप, विश्व.....तील प्रांतासारखे असेल; विविध देशाचे, विविध प्रदेशाचे स्वरूप जिल्ह्यासारखे आणि हे जिल्हे प्रशासनाचे एकक बनेल. अशा प्रकारे लोकनीतीतून आंतरराष्ट्रीय सहकार निर्माण होईल. जगात सुख शांतता नांदू लागेल. मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास होऊन स्वतंत्र समाज आस्तित्वात येईल. अशावेळी समाजातून अन्याय आणि शोषणाचा नाश होईल...
याच पुस्तकातून विनोबांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्याबाबत महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते 'संयुक्त राष्ट्रसंघाने सुरुवातीलाच घोडचूक केली. संयुक्त राष्ट्रसंघाने एकतर आपल्या सभासद राष्ट्रांना निःशस्त्र करून सर्व ऐक्य स्वत:जवळ ठेवणे किंवा फक्त नैतिक अनुशासनाच्या आधारावर काम करणाऱ्या शांतीसेनेची निर्मिती करणे, हेच योग्य ठरले असते. याशिवाय या पुस्तकात भारतातील निवडणूक पद्धती, मताधिकार अप्रत्यक्ष निवडणुका, ग्राम पंचायती इत्यादी बाबत आपली मते व्यक्त केली आहेत.
भारत छोडो: नागपूर कारागृहातून सुटका झाल्यानंतर विनोबा पवनारला पोहोचले. आणि पूर्ववत कामाला लागले. कैदेतील निवांतपणामुळे विनोबांनी बरेचसे चिंतन आणि मनन केले होते. त्यातून त्याच्या पुढील रचनात्मक कामाची दिशा ठरली. १९४२ च्या सुरुवातीला हिंदी प्रसारासाठी म्हणून विनोबाने दक्षिण भारताच्या प्रवासात असल्यामुळे जानेवारीतील काँग्रेस समितीच्या अधिवेशनास आणि फेब्रुवारीतील गोसेवा संमेलनास विनोबा हजर राहू शकले नव्हते. क्रिप्स मिशनचा अहवाल फेटाळल्यानंतर इंग्रजांविरुद्ध संघर्ष उभा करण्याशिवाय पर्याय नव्हता. "देवाच्या भरवशावर सोडून ब्रिटीशांनी भारत सोडून जावा..." असे आवाहन इंग्रजांना म. गांधींनी 'हरिजन'मधून केले होते. जून १९४२च्या काँग्रेस महासमितीची महत्त्वाची बैठक सेवाग्राम येथे झाली. त्यातच ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील बैठकीत 'करा किंवा मरा' अशा तीव्र संघर्षाला मान्यता मिळाली आणि म. गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ रोजीचा आदेश ब्रिटिशाना दिला. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी म. गांधींनी सांगोपांग विचार करून कार्यक्रम ठरविला होता. जेलमध्ये गेल्यानंतर एक प्रदीर्घ उपोषणाचा विचारही त्यांनी बोलून दाखवला होता. पवनार आश्रमात विनोबा शांतपणे आपल्या दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त होते. सुरुवातीला त्यांना अटक करून नागपूरहून दक्षिण भारतात वेल्लोर येथील जेलमध्ये पाठविण्यात आले. पवनार नाळवाडी, गोपुरी येथील आश्रमाना सील करण्यात आले. रामकृष्ण बजाज आणि इतरावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून अटक करण्यात आली. परंतु पुढे विनोबावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
अटके दरम्यान म. गांधींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणण्यात आले. येवून म. गांधींनी ब्रिटिश शासनाशी थेट पत्रव्यवहार केला, ज्यामुळे त्यांचा उपोषणाचा पूर्ण नियोजित कार्यक्रम लांबणीवर पडला. वेल्लोरला जेलमध्ये दाखल झाल्याबरोबर जेलरला विनोबा म्हणाले, "मी आज तर जेवण घेतले परंतु उद्यापासून मात्र मी बेमुदत उपोषण करणार आहे. कारण अटक झाल्याबरोबर म. गांधी उपोषण करणार आहे म्हणून मी पण बेमुदत उपोषणाला बसणार आहे.'
वेल्लोर जेलमधील विनोबाची महत्त्वाची उपलब्धी म्हणजे तामीळ, तेलगु आणि मल्याळी भाषाचा अभ्यास. डॉ. भारतन् कुमारण्या त्यांना या भाषा शिकवीत असत. या मोबदल्यात विनोबांनी डॉ. भारतन् यांना तुलसी रामायण शिकवीले. या शिवाय सुतकताई आणि गीतेवरील प्रवचने हा या काळातील विनोबाचा दिनक्रम होता. याच काळात दक्षिण भारतीय भाषा लिपी आणि देवनागरी लिपी यांचा संबंध निर्माण करणारी लोक नागरीलिपी विनोबांनी तयार केली. त्यांच्या मते टाईप रायटर आणि टेली प्रिंटर साठी ही लिपी सोयीची आहे.
वेल्लोर जेलमध्ये एका साम्यवादी कार्यकत्याने विनोबांनां साम्यवादी साहित्याचे वाचन करण्यास सुचवले. विनोबा म्हणाले, ठीक आहे. मी जेव्हा चरख्यावर सूत कातण्यासाठी बसेन त्यावेळी तुम्ही वाचायचे आणि मी ऐकायचे. अनेक दिवस कधी एक तास दोन तास हा कार्यक्रम चालू राहिला. एका वर्षांनंतर विनोबा आणि इतर राजकीय कैद्यांना वेल्लोरहून मध्यप्रदेशात सिवनी येथे हलविण्यात आले. सिवनी येथील जेलमध्ये विनोबांनी जवळजवळ १५ महिनेकाढले. येथील वास्तव्यात 'स्थितप्रज्ञ दर्शन' या विषयावर त्यांनी १८ व्याख्याने दिली. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ लक्षणाच्या १८ श्लोकावर ही व्याख्याने होती. त्याचे फ्रेंच, इंग्रजी रुपांतर 'स्टेड फास्ट विसडम' या नावाने प्रसिद्ध झाले.
मे १९४४ मध्ये विनोबांचीसुटका झाली. सिवनीहून विनोबा थेट वर्ध्याला पोहोचले. गोपुरी आश्रमातून त्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. येथे त्यांनी सर्वोदयी तत्त्वाचा प्रयोग म्हणून सामुहिक भोजनालय सुरू केले. व कालातंराने विनोबा पवनारात परतले. याच काळात म. गांधींनी प्रचलित राजकारणातील भूमिका ठरविण्यासाठी दिल्ली, सिमला येथे बैठका आयोजित केल्या होत्या, मात्र विनोबांनी आश्रम सोडायचा नाही असे ठरविले होते, आश्रमाची गरज भागविण्यासाठी पैसा न वापरता आश्रमाला कसे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण करता येईल याचाच ध्यास त्यांना लागला होता. यातून त्यांना हे दाखवून द्यायचे होते की भारतातील खेडी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झाली की भारताचे सर्व प्रश्न आपोआपच सुटतील. गावाच्या समस्या गावातच सुटतील तेव्हाच खेडी खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होतील. अशा वेळी शासनाचीही गरज भासणार नाही. यासाठी विनोबा प्रयत्नशील होते.
नोव्हेंबर १९४५ . ते मे १९४६ या काळात विनोबांनी आपला धाकटा भाऊ शिवाजीच्या मदतीने गीताईच्या अभ्यासासाठी गीताई शब्दकोशाची निर्मिती केली.
पवनार येथील आश्रमात बाबूराव देशमुखांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी इच्छा व्यक्त केली की उर्वरीत आयुष्य रचनात्मक कामासाठी देण्याची आहे. तेव्हा विनोबांनीत्यांना वानप्रस्थाश्रमाची विधीवत दीक्षा दिली. यातूनच अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी रचनात्मक कार्यासाठी वानप्रस्थानाचा आनंदाने स्वीकार केला होता. या काळातील विनोबाचे ही दोन्ही कामे रचनात्मक कार्याच्या दृष्टीने मोलाची ठरली.
इकडे राष्ट्रीय पातळीवरील घटनाना वेग आला होता. १९४२ ला बंद पडलेले 'हरिजन' फेब्रुवारी १९४६ पासून पुन्हा सुरु झाले. मार्च १९४६ बिटनवे पंतप्रधान अॅटली यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत संसदेत घोषणा केली. कॅबिनेट मिशन आणि व्हाईसरॉयने हंगामी मंत्रीमंडळाची घोषणा केली. मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कार्यवाही दिनाची घोषणा करून गोंधळात भर घातली. त्यामुळे शेवटी २० फेब्रुवारी १९४७ रोजी पुन्हा एकदा पंतप्रधान अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश सरकार जून १९४८ पूर्वी भारत सोडील. म. गांधी बादशहाखान, पुरुषोत्तमदास टंडन इत्यादीच्या विरोधाला न जुमानता काँग्रेस महासमितीने विभाजनाला मान्यता दिली व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी सुद्धा विनोबा आपल्या आश्रमात नेहमीप्रमाणेच आपल्या कामात मग्न होते. वर्ध्याच्या काही संस्थांनी त्यांना सायंकाळी व्याख्यानाला बोलावले, तेव्हा विनोबांनी प्रश्न केला, "स्वराज्य मिळाले? ब्रिटिशाचा ध्वज एक दिवसही सहन होणार नाही का?" तेव्हा साहजिकच सर्वांनी नकारार्थी मान हलविली. तेव्हा विनोबा उद्गारले, "ज्याप्रमाणे जुना ध्वज जुन्या सरकारचे चिन्ह आहे त्याचप्रमाणे जुनी शिक्षण पद्धती चालू ठेवल्याने जुने सरकार चालू ठेवण्यासारखे आहे, म्हणून ही शिक्षण पद्धती त्वरीत बदला. म. गांधींनी राष्ट्रासाठी 'नइ तालीम' ही योजना पूर्वीच तयार केली आहे. आपण त्याचा स्वीकार का करीत नाही? माझ्या हातात सत्ता असती तर स्वराज्य प्राप्तीच्या आनंदासाठी मुलांना तीन महिन्याची सुट्टी दिली असती. त्यांना खूप खेळायला सांगितले असते. प्रकृती सुदृढ करण्यास सांगितले असते. आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला सांगितले असते. या दरम्यान देशातल्या शिक्षणतज्ज्ञाकडून तीन महिन्यात . नवी शिक्षण योजना तयार करवून घेतली असती, म्हणजे मुले तीन महिन्याच्या सुट्टीनंतर परतली की नव्या धोरणानुसार त्यांचे शिक्षण सुरू करणे सोपे झाले असते."
वडिलांचे निधन: ऑक्टोबर १९४७ मध्ये विनोबांचे वडील आजारी पडले. विनोबांच्या आईच्या मृत्युनंतर ३० वर्षे त्यांचे वडील एकटेच बडोद्यास राहत होते. या काळात त्यांनी स्वतःची कामे स्वत:च केली होती. याही वयात ते त्यांच्या आवडीच्या रंगछपाई इत्यादीवर संशोधन करीतच होते. संगीताची त्यांना साथ होती. आजार वाढला तेव्हा शिवाजी धाकटा मुलगा त्यांना धुळ्यास घेऊन आला. मित्राच्या आग्रहावरून तब्बल १२ वर्षानंतर विनोबा वडीलांना भेटण्यासाठी धुळ्यास गेले. दुसऱ्याच दिवशी विनोबांच्या वडीलांचे निधन झाले.
प्रकृती अस्वास्थामुळे वडीलांच्या मृत्यूनंतरही विनोबा धुळ्यातच राहिले. तेथे त्यांनी गीतेवर प्रवचने दिली. प्रकृतीस आराम पडताच विनोबा पवनारला परतले. विभाजनामुळे देशात जी परिस्थिती निर्माण झालीहोती, त्याबाबत विनोबांनी 'हरिजन' मध्ये काही लिहावे अशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून १६- २-१९४७ च्या 'हरिजन'च्या अंकात "बाधा कहा है?" (अडचण कोठे आहे?) हा लेख लिहिला. त्याकाळात मुंबई आणि अलाहाबाद येथे जातीय दंगलीमुळे कपड्याच्या गिरण्यातील उत्पादन घटले होते. त्यामुळे कापड पुरवठ्यात शासनाने कपात सुचविली होती. विनोबांनी शासनाच्या या भूमिकेची कडक शब्दात टीका केली होती. 'पैसा नव्हे अन्न हवे' या लेखातून विनोबांनी ग्रामीण भागातील शेती आणि ग्रामोद्योग कसे वाढतील याचे अर्थशास्त्र समजावून सांगितले. तसेच शेतकऱ्यासाठी जोडधंदा म्हणून गोसंवर्धन योजना सविस्तर सांगितलीहोती. या लेखात विनोबा पुढे म्हणतात-
"दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी बाहेरच्या देशातून चांगल्या जातीच्या अधिक दूध देणाऱ्या गायी आयात कराव्यात असे सुचवले जाते. माझ्या मते याची गरज नसून आपण देशी गाईनाच प्राधान्य द्यावे. शेतकऱ्याकडे ज्या गायी आहेत त्याचीच निगा राखण्याचे त्यांना सांगितले पाहिजे. गाय दूध आणि शेतीसाठी बैल देते. दूधाबरोबर शेतीसाठी बलवान बैल या मुद्याचाही विचार व्हावा. शहराना दूध पुरविण्याची गावाची जबाबदारी नाही. गावाची गरज भागल्यानंतरच उरलेले दूध शहरात पाठवावे. तसेच गोपालन, बैलघाणी (तेल उत्पादन) कातडी कमावणे आणि चांगल्या प्रतीचे खत तयार करणे ह्या सर्व बाबी उत्पादनाच्या एकाच अवस्थेत येतात. ग्रामोद्योगावर जास्तीत जास्त भर देण्यात आला पाहिजे.'
हे राम : १० जुलै १९४८ च्या बिर्ला हाऊसच्या एका बैठकीत म. गांधी विभाजनाबाबत म्हणाले होते, "विनोबा दिल्लीस आले असते तर बरे झाले असते." पण विनोबा आणि म. गांधी यांची भेट व्हायची नव्हती. ३० जाने. १९४८ रोजी सायंकाळी गांधीची हत्या झाली. बातमी ऐकताच विनोबा सुन्न झाले. त्यांचा आवडता गुरू, सखा, मार्गदर्शक, आई नंतरची प्रिय व्यक्ती गमावल्याने . विनोबांच्या दुःखाला सीमाच उरली नाही. ३१ जाने. १९४८ ते १२ फेब्रु. १९४८ पर्यंत सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करण्यास विनोबा तयार झाले. पहिले प्रवचन परंधाम आश्रम पवनार येथे तर बाकीची सर्व प्रवचने गोपुरी वर्धा येथे झाली. आपल्या पहिल्याच प्रवचनात विनोबांनी ३० जानेवारी १९४८च्या घटनेची तुलना ५००० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी केली. जेव्हा एका व्याधाने हरिण समजून कृष्णाला बाण मारला. व्याधाला जेव्हा आपली चूक समजली तेव्हा त्याचेच सांत्वन करताना श्रीकृष्णाने म्हटले होते, 'मृत्यू कोणत्यातरी निमित्ताने होतोच, माझ्या मृत्यूस तू निमित्त झालास बस इतकेच ?" त्या वेड्या युवकाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या तोही त्या व्याधाप्रमाणे अज्ञानी होता. पुढे विनोबा म्हणतात, "जगात हिंदू धर्माचे नाव जर कुणी उज्ज्वल केले असेल तर ते म. गांधीनी त्यांना हिंदु धर्मांचा शत्रू समजणे सत्याचे विडंबन होय. त्यांच्या मृत्यूवर शोक करता कामा नये, कारण प्रार्थनेला जाताना म्हणजे तेव्हा गांधींचे मन ईश्वरमय झाले होते म्हणून त्यांचा मृत्यु भव्य समजला पाहिजे. अल्बर्ट आईन्स्टाईनचे मत याच प्रकारचे आहे. "गांधींचा मृत्यु हा त्याचा सर्वात मोठा विजय आहे, म्हणून त्यांच्या मृत्यूचे दुःख उगाळत बसण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन गांधींच्या तत्त्वाप्रमाणे रचनात्मक कार्याला पुढे नेले पाहिजे. "
३ फेब्रुवारी १९४८ च्या व्याख्यानात विनोबा म्हणतात, "गांधीनी जवळ जवळ १५ वर्षे वर्धा आणि सेवाग्राम येथे वास्तव्याला होते म्हणून गांधीच्या आत्म्यास क्लेश पोहोचतील असे कोणतेही काम आपण करता कामा नये. ११ फेब्रुवारी १९४८ रोजी जमनालाल बजाज यांची ७ वी पुण्यतिथी होती. १९४२ ला जमनालाल बजाजाचा अंत्यविधीगोपुरी येथे गांधी विनोबा यांच्या उपस्थितीत झाला होता. सहा वर्षानंतर त्याच दिवशी म. गांधीच्या अस्थी आश्रमात आणण्यात आल्या. त्या निमित्त विनोबा म्हणाले, "जमनालाल बजाज गांधींच्या शिकवणुकीत तयार झालेले खरे टस्टी होते. त्यानी ज्या आस्थेने समाजाची सेवा केली तीच भावना आपण जपावी. " १२ फेब्रुवारी १९४८ रोजी म. गांधींच्या अस्थी पवनार येथील धाम नदीत विसर्जित करण्यात आल्या. यावेळी विनोबांनी आपली भावना व्यक्त करीत
म्हटले, "एक पवित्र आत्मा परमात्म्यात लीन झाला. जो विचार गांधींच्या हृदयात असे तोच विचार आमच्या हृदयात प्रवेश करीत आहे. भविष्यात त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. "
म. गांधींच्या निधनानंतर राजकीय परिस्थितीबरोबरच एकूण देशातील परिस्थितीचा विचार करण्यासाठी देशातील प्रमुख राजकीय आणि रचनात्मक कार्यकर्त्यांची एक परिषद ११ मार्च ते १४ मार्च १९४८ या काळात सेवाग्राम येथे बोलावण्यात आली होती. डॉ. राजेंद्रप्रसाद या परिषदेचे अध्यक्ष होते. पं. नेहरू, अब्दुल कलाम आझाद, आचार्य कृपलानी, विनोबा, शंकरराव देव, काकासाहेब कालेलकर, जयप्रकाश नारायण, देवदास गांधी, किशोरीलाल मश्रुवाला, रंगनाथ दिवाकर, राजकुमारी अमृतकौर आदी महनीय व्यक्ती यावेळी हजर होत्या. त्याचप्रमाणे ओरिसा, मध्यप्रदेशचे राज्यपाल, मद्रास ओरिसा आणि मुंबई प्रांतांचे मुख्यमंत्रीही या चर्चेत सहभागी झाले होते.
परिषदेचे प्रास्ताविक करताना रघुनाथ धोत्रे यांनी सांगितले की, "परिषदेच्या आयोजनाचा मुख्य हेतू वर्तमान परिस्थितीत काम करावे याचा विचार करण्याचा असून गांधीजींनी आपल्या मृत्यूपूर्वी लोक सेवक संघाचा पर्याय सुचवला होता, कार्यकर्तेही याचा विचार करू लागले होते. अहिंसेची शक्ती कशी वाढवावी हीच प्रमुख समस्या आहे." १३ मार्च रोजी नेहरूंनीही देशातील विविध रचनात्मक कार्य करणाऱ्या संघटनाशी काँग्रेसला संबंध टिकवून ठेवायचे आहे असे मत व्यक्त केले. "
विनोबांनी हलक्या स्वरात सुरुवात केली, "माझ्या दृष्टीने नेहरू पंतप्रधान नसून ते गांधी कुटुंबाचे सभासद आहेत. नेहरूंच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारची मदत करावी याबाबत त्यांचेच मार्गदर्शन आम्हाला हवे आहे.' "
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले, "गांधींनी आमच्यासमोर सतत अहिंसेचा मार्ग ठेवला आहे. त्यांची साधन शुचिता संकल्पना फक्त भारतासाठीच नव्हेतर संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारी आहे." शेवटी डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले, "आपण मानवी मूल्याचे रक्षण करावे आपल्या ज्या नैतिक व आध्यात्मिक समस्या आहे याचे उत्तर आपण शोधले पाहिजे." यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अध्यक्षीय समारोपानंतर विनोबांनी परिषदेला पुन्हा एकदा मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा विनोबा ठामपणे म्हणाले, “मी फारसे काही सांगू शकेल असे नाही. पण गांधीजीबरोबर अनेक दिवस राहिल्यामुळे त्यांचा नम्र सेवक म्हणून एवढीच माझी पात्रता आहे. आपल्या सर्व प्रश्नांचा मध्यबिंदु साधन शुचिता असून त्याबाबत पं. नेहरूंनीच याबाबत जास्त मार्गदर्शन करावे असे मला वाटते."
सर्वोदय समाज: विनोबांच्या आवाहनानंतर नेहरूनीही साधन हे साध्याप्रमाणेच शुद्ध असावे असे मत मांडले. त्यासाठी ह्या परिषदेत होणारे निर्णय मात्र मान्य असतील. नेहरू दिल्लीला परतल्यानंतर १४ मार्च १९४८ रोजी विनोबांनी परिषदेत 'सर्वोदयी समाज' स्थापनेचा विचार मांडला. साधनशुचितेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यात बंधुभाव वाढीस लावणे हा एक प्रमुख उद्देश या मागे होता. विनोबा पुढे म्हणाले, "सर्वोदय समाज ही संघटना नियमोपनियमात बंदिस्त न राहता समाज व्यवस्थेल्या मूलभूत तत्त्वाशी त्याचा सबंध असेल." विचार विनीमयानंवर परिषदेने खालील प्रमाणे प्रस्ताव तयार केला.
गांधीजींच्या सिद्धांतावर विश्वास असणाऱ्यांनी बंधुभाव निर्मितीचा निश्चय केला असून ही एक व्यापक संघटना असेल संघटेनेचे नाव : सर्वोदय समाज
मुलभूत सिद्धांत: साध्याप्रमाणेच या संघटनेची साधने शुद्ध असतील उद्देश : सत्य आणि अहिंसेवर आधारित समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे. पहिल्या समितीत खालील मान्यवरांचा समावेश होता. रघुनाथराव धोत्रे, सुशीला पै, धीरेंद्र मुजुमदार, एफ. सत्यनारायण, रामदेव ठाकूर, ए वेदरलाम्, पिल्ले, मनमोहन चौधरी, तिमप्पा नाईक, महेशदत्त मिश्रा, काशिनाथ त्रिवेदी आणि श्रीमन्नारायण, या समितीचे काम म्हणजे सर्व समाजसेवकाची यादी तयार करणे ३० जानेवारी रोजी होणाऱ्या वार्षिक संमेलनाचे स्थळ निश्चित करणे: संमेलनाची तयारी करणे आणि संमेलनात मान्य झालेल्या ठरावाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न करणेइत्यादी कामे या समितीकडे सोपविण्यात आली होती.
याचवेळी रचनात्मक कार्य करणाऱ्या सर्व संघटना एकत्रित करून त्यांची एक संयुक्त समिती बनवावी. यासाठी प्रा. जे. सी. कुमारप्पा यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. यातूनच पुढे सर्व सेवा संघाची एक संयुक्त संघटना बनविण्याचे ठरले. कालांतराने सर्व रचनात्मक कार्य करणाऱ्या सर्व संघटनाचे विलीनकरण सर्व सेवा संघात झाले. असे असले तरी मूळ उद्देश सफल होत नव्हता म्हणून ११ एप्रिल १९४८च्या 'हरिजन'मध्ये विनोबांनी 'सर्वोदय का प्रारंभ' या नावाचा एक लेख लिहिला होता. विनोबा लिहितात, "अलीकडे रचनात्मक कार्य करणाऱ्या संघटना स्वतंत्रपणे एकमेकांपासून स्वतंत्र काम करताना दिसतात, त्याच्यात काही बाबतीत सहकार्य असले तरी मात्र त्यातून अहिंसक प्रभाव पडताना दिसत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील कार्यक्रमाचेही
एकीकरण व्हावे यासाठी प्रत्येकांनी खालील सात बाबींचा अवलंब करावा.
१) प्रत्येक कार्यकर्त्याने दररोज सुत कातावे.
२) त्याने खादी विशेषतः स्वत; कातलेल्या खादीच्या वस्त्राचा वापर करावा.
३) ग्रामोद्योगातीलच वस्तु वापराव्या.
५) महिन्यातून एकदा ग्राम सफाई व मैला सफाईचे काम करावे
४) गायीचेच दूध घ्यावे.
६) शक्य असेल तर आपल्या मुलांना 'बुनियादी तालीम' द्यावी.
७) कार्यकर्त्याने देवनागरी, उर्दू, कोणतीही एक दक्षिण भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा.
सर्वोदय समाजाचे पहिले अधिवेशन मध्यप्रदेशात इंदोर जवळ राऊ येथे पार पडले होते. पूर्वीच ठरल्याप्रमाणे सर्वोदय समाजाचे दुसरे अधिवेशन एप्रिल १९५० मध्ये ओरिसात अनगल या ठिकाणी झाले. काही कारणाने विनोबा या अधिवेशनाला हजर राहू शकले नाही. तिसरे अधिवेशन हैदराबादपासून चार मैलावर शिवरामपल्ली येथे एप्रिल १९५१ मध्ये घेण्याचे ठरले. ६ मार्च रोजी सर्व सेवा संघाची बैठक असल्यामुळे या अधिवेशनाला येण्याची इच्छा नव्हती. परंतु सर्व सेवा संघाच्या बैठकी दरम्यान शंकरराव देव यांनी या अधिवेशनाला येण्याचा खूप आग्रह केला. 'सर्वोदय समाज' ही विनोबाचीच निर्मिती असल्यामुळे, 'तुमच्याशिवाय अधिवेशनाचा हेतू साध्य होणार नाही, नसता अधिवेशन रद्द करण्यात येईल.' असे शंकरराव देव म्हणाले, शंकरराव देवाच्या विनंतीला मान देऊन विनोबांनी अधिवेशनाला पायीच जाण्याचे ठरले.
विनोबांनी ८ मार्चला पवनार आश्रम सोडला. सोबत महादेवीताई, श्रीमन्नारायण यांच्या पत्नी मदालसादेवी आणि सचीव दामोदरदास मूंदडा, दत्तोबा दास्ताने आणि भाऊ पानसे होते. या पूर्ण पदयात्रेत त्यांचे सामान एका बैलगाडीत होते. या पदयात्रेत विनोबा दररोज १० ते १२ मैल चालत. प्रवासात येणाऱ्या गावात सकाळी जात. गावकऱ्यांच्या समस्या ऐकत. सायंकाळी पाच वाजता सामुहिक प्रार्थना व नंतर गीतेवर प्रवचन देत. गावकऱ्यांना स्वावलंबनाचा धडा मात्र विनोबा आवर्जून देत. या यात्रेतील प्रवचनाचे एक पुस्तक 'सर्वोदय यात्रा' वर्धा येथील भारत जैन महामंडळाने प्रकाशित केले होते.
३१५ मैलाचा प्रवास करून सर्वोदय संमेलनाच्या एक दिवस आधी म्हणजे ७ एप्रिल रोजी विनोबा शिवरामपल्ली येथे पोहोचले. या अधिवेशनाला विनोबाच्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण या अधिवेशनानंतरच्या घटनामुळे भूदान यज्ञाची सुरुवात केली.