हल्ली हिंदुस्थानांत स्वातंत्र्याच्या लढाईची गोष्ट बोलली जात आहे. आतां ही लढाई व्हायची ती शेवटची च व्हायची असें कांहीं लोक म्हणतात. आणि द्रष्ट्यांचे तर भाकीत आहे की स्वराज्य अनेक कारणांमुळे दृष्टीच्या च नव्हे पण हाताच्या हि आटोक्यांत आल्यासारखे आहे.
अनेक कारणांमुळे स्वराज्य जवळ आलेले असो पण 'स्व' च्या कारणा- मुळे ते किती जवळ आले आहे हा स्व-राज्याच्या बाबतीत मुख्य प्रश्न असतो. स्वराज्य अनेक कारणांमुळे मिळत नाहीं; तें एका च स्व-कारणानें मिळते.
तिकडे युरोपांत एक महायुद्ध चालू आहे. लांडग्याच्या घशांत गेलेली कोकरें शक्य तर जिवंत, नाहींतर मेलेलीं कां होईना, बाहेर काढण्यासाठीं हैं - महायुद्ध आम्हीं स्वीकारलें आहे, असे विरुद्ध बाजूचे लांडगे म्हणताहेत. तूर्त हया आठ महिन्यांत घशांत गेलेली जुनी कोकरें बाहेर पडण्याचा बेत अजून सुरू झाला नसून नवीन कॉकरें आंत दाखल होण्याचा बेत च चालू आहे. इकडे विरुद्ध बाजूच्या लांडग्यांच्या पोटांत अगाऊ च अडकून पडलेली भली मोठीं अर्धमेली कोंकरें उभयविध लांडग्यांच्या ह्या झटापटीत अवश्य आपण बाहेर ओकून फेंकलीं जाऊं असें आशाळभूतपणे मानीत आहेत.
अशी ही इसापनीतिकथा आहे. तिचे तात्पर्य इसापावर सोपवून आपण पुढे जाऊं. युरोपांतील लढाई हिंसेच्या साधनांनी आणि हिंसक उद्देशासाठी चालली आहे. आमची लढाई अहिंसक साधनांनीं आणि अहिंसक उद्देशासाठीं व्हायची आहे. असा दोहोंत मोठा फरक असला तरी आम्हांला घेण्यासारख्या त्या हिंसक लढाईत हि पुष्कळ गोष्टी आहेत. साधनें कशी हि असली तरी आजकालची लढाई म्हणजे एक सामुदायिक आणि सर्वांगीण सहकारितेचा प्रचंड प्रयत्न असतो. या प्रयत्नाचे फलित जरी विध्वंसक असले आणि उद्देश हि विध्वंसक मानला, तरी हा प्रयत्न स्वतः बहुतेक सर्व विधायक असतो. जर्मनीनें सत्तर लाख फौज उभी केली आहे असें म्हणतात. ८ कोटीच्या राष्ट्रानें एवढी मोठी फौज उभी करणे, तेवढ्या च प्रचंड प्रमाणांत लढाईचीं हत्यारें, अवजारे आणि साधनसामग्री उत्पन्न करणें, निवडक लोक फौजेंत दाखल केल्यानंतर उरलेल्या लोकांकडून राष्ट्रीय जीवन-संसार चालविणें, संपत्तीचा झरा वाहता ठेवण्यासाठीं औद्योगिक योजना शक्य तितक्या अखंड चालू ठेवणें, शाळा इत्यादि तमाम सर्व बंद करणे, नित्याच्या जीवन-सामग्रीचा व्यक्तिगत मालकी हक्क सरकारजमा करणे, विश्वरूप-दर्शनांत ज्या प्रमाणे डोळे, कान, हात, पाय, शिरें, मुर्खे अनंत असली तरी हृदय एक च दाखविलें आहे त्याप्रमाणे संपूर्ण राष्ट्राचें जणूं एक हृदय करणे हा सर्व एक इतका विशाल आणि सर्वतोमुख विधायक कार्यक्रम आहे कीं तो जरी संहारप्रवण असला तरी आम्हांला त्यांतून घेण्यासारखें पुष्कळ आहे.
लोक विचारतात कीं गांधी लढाईची तयारी करा म्हणतात आणि तिच्याशीं विधायक कार्यक्रमाचा काय संबंध जोडतात ? हिंदु-मुसलमान- ऐक्य, अस्पृश्यता निवारण, खादी आणि ग्रामोद्योग, दारूबंदी, ग्रामसफाई आणि नई तालीम हा सारा विधायक कार्यक्रम झाला ! यांत लढाईचे काय तत्त्व आले ? असा लोक प्रश्न करतात. कोण ? जे आपल्याला लढाई अहिंसक साधनांनी लढायची आहे असे कबूल करतात ते च. त्यांच्या हैं कसे लक्षांत येत नाहीं कीं हिंसक लढाईला सुद्धां पुष्कळसा विधायक कार्यक्रम च लागतो. शिपायांसाठीं बिस्किटें बनविण्यापासून, नव्हे शेतांत बटाटे लावण्यापासून, टॉरपेडोने शत्रूचें जहाज फोडण्यापर्यंत सगळा व एक अखंड लढाईचा कार्यक्रम असतो आणि त्यांतला शेवटला भाग वगळला तर बाकीचा बहुतेक सारा विधायक असतो. आणि त्या बाकीच्या विधायकाच्या आधारावर तो शेवटचा विनाशक घडूं शकतो. आणि तो मागचा जर तुटला तर हा पुढचा शिल्लकच रहात नाहीं. किंबहुना हे मर्म जाणून शत्रु सुद्धां समोरच्या पक्षाचा अंतिम विनाशक कार्यक्रम हाणून पाडण्याचा उत्तम उपाय म्हणून त्याचा तो मागचा विधायक कार्यक्रम कसा लुला पडेल याची काळजी घेत असतो. हिंसक लढाईत सुद्धां जेथें ही स्थिति, तेथें अहिंसक लढाईचें विधायक कार्यक्रमाशिवाय कसे चालेल ? स्वराज्य म्हणजे सर्व राज्य म्हणजे प्रत्येकाचें राज्य हें असले स्वराज्य सामुदायिक सहकार्याशिवाय, उत्पादक कार्यक्रमाशिवाय, सर्वोपयोगी राष्ट्रीय शिस्तीशिवाय कसे मिळवायचे ? कॉंग्रेसचे ३० लाख सभासद आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी रोज अर्धा तास कांतलें तरी केवढी संघटना निर्माण होईल ? आणि ह्यांत न करतां येण्या- सारखे काय आहे ? आपण वर्धा तालुक्याचा च विचार करूं. ह्या तालुक्यांत काँग्रेसचें ६००० सभासद आहेत. एवढे २० गटांत वांटून दिले तर प्रत्येक गटांत ३०० सभासद येतील. प्रत्येक गटानें ३०० सभासदांना सालाभरांत सूत कांतर्णे शिकवून द्यायचे असे ठरवले तर ते काम फार कठिण नाहीं. पण आम्हांला मुख्य नडते आमची अश्रद्धा. लोक शिकायला तयार होतील का ? शिकले तरी पुढे कांतील का ? त्याची नोंद ठेवतील का ? ती काँग्रेसकडे पाठवतील का ? अशा अनेक शंका आम्ही काढीत बसतो. • त्याच्या ऐवर्जी कामाला च लागले तर एकेक गोष्ट अनुभवानें उकलूं लागेल.
निदान वर्धा तालुक्यांत हा एवढा कार्यक्रम करून पाहण्यासारखा आहे. काँग्रेस कमिटी, चरखा-संच, ग्रामसुधार-केन्द्रे, आश्रमीय आणि अन्य • संस्था, आणि त्या त्या गांवांतील अनुभवी माणसें ह्यांच्या सहकार्यानें हें काम - व्हावे. कामाची व्यवस्थित नोंद व्हावी, वेळोवेळीं कांतण्याच्या प्रगतीची माहिती सर्वांना मिळत जावी. कांतणे शिकवायचे म्हणजे त्यावरून इतर हि गोष्टी समवायाने शिकवतां येतात आणि शिकवाव्या. ह्या सूचनेचा मंडळींनी विचार करावा. अति जड जाणार नाहीं. लाभदायी होईल. करून पहावे.