१९७० च्या अमृत महोत्सवी वर्षापासून ब्रह्मविद्या मंदिरात राहण्याचा विचार विनोबांनी बोलून दाखविला. अमृत महोत्सव साजरा करण्याऐवजी ७५ लाख सूतगुंड्याचा सूत्रकोट आणि ७५ लाख रुपयांचा ग्राम स्वराज्य कोष जमा करावा आणि त्याचा वापर भूदान ग्रामदानाच्या जमीनी सुपीक करण्यासाठी, त्या शेतकऱ्यांची शेतीची अवजारे, बी, बियाणे घेण्यासाठी खर्च करावा. याला विनोबांनी मान्यता दिली. आणि विनोबांच्या सहकाऱ्यांनी हा संकल्प पूर्णही करून दाखविला.
कर्ममुक्ती, ग्रंथमुक्ती, अध्ययनमुक्ती आणि अध्ययनमुक्ती तून विनोबांनी ७ जून १९७० पासून 'सूक्ष्मतर कर्मयोगा'ची सुरुवात केली. आणि पवनार येथे कायम राहण्याचे मनोदय व्यक्त केला. सूक्ष्मतर कर्मयोग म्हणजे काय? हे सांगताना विनोबा म्हणतात, "मी अधिक सूक्ष्मात प्रवेश करीत आहे. हा निर्णय मी स्वतः माझ्या मनानेच घेतला नसून याला भारतीय परपंरा आहे. क्षेत्रसंन्यास म्हणजे सर्व सोडून एकाच ठिकाणी राहणे. हा विचार अत्यंत प्राचीन आहे. आपले पूर्वज आत्मोन्नतीसाठी असा क्षेत्रसंन्यास घेत. पण माझा विचार तसा नाही. समूहाचे अध्ययन करीत हा सूक्ष्मतर प्रवेश आहे. केवळ बाहेरील हालचालींनी कर्म होत नसून क्रिया जसजशी सूक्ष्म होत जाते तसतसे कर्म विकास पावत असते. म्हणून मी सूक्ष्मातरात प्रवेश करीत आहे.'
सूक्ष्मतर म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरात विनोबा म्हणाले, "सृष्टीला समोर ठेवून ईश्वरी स्वरूपाचे ध्यान करणे. लोकांना अभिमुख राहून अंतरात्म्यात विलीन होणे. जी व्यक्ती सूक्ष्मतराचा प्रयोग करते ती शून्य, शून्यतरामध्ये जाईल. शून्य शून्यतरामध्ये जाणे म्हणजेच त्या व्यक्तीची परीक्षा होय. समाजासाठी याचा परिणाम असा असेल की अणुशक्ती प्रमाणे सर्व कर्म सूक्ष्म होऊन त्याच्या परिणाम स्थूल कमपिक्षा अधिक होईल. "
विनोबा- जयप्रकाशः विनोबांच्या अधिक सूक्ष्मात जाण्यामुळे जनतेत ग्रामीण, सर्वोदय या कार्याला हवा तेवढा प्रतिसाद मिळेना. कार्यकर्त्यात निराशा वाढू लागली. त्यातूनच जयप्रकाशाचा आणि विनोबांचा असे होत विचारप्रवाह पुढे आले. गुजराथमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. देशातील प्रतिगामी शक्तींनी गुजराथ विद्यार्थ्यांचे आंदोलन उचलून धरले. बिहारातही भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. तेव्हा त्याचे नेतृत्व जयप्रकाशांनी घेतले. “सर्वोदयाचे राजकीयीकरण' अशी जयप्रकाशाच्या भूमिकेची संभावना केली जाऊ लागली. अशातच जुलै १९७४ ला पवनार येथे सर्व सेवा संघाच्या बैठकीत विनोबा जयप्रकाश वाद उघड झाला. तडजोड म्हणून विनोबांनी .मार्ग सुचवला. 'गंगा ब्रह्मपुत्रा या दोन धारा आहेत. त्याप्रमाणे सर्वोदय ग्रामस्वराज्य हे मूळ काम ज्यांना करायचे आहे त्यांनी ते करावे आणि ज्यांना बिहार आंदोलनात भाग घ्यायचा आहे त्यांनी सत्य, अहिंसा यांची मर्यादा पाळून फक्त बिहारमध्येच काम करावे. "
विनोबांनी जयप्रकाशाच्या आंदोलनाला दिलेली मूकसंमती गृहीत धरून आंदोलक आक्रमक झाले. ४ नोव्हेंबर १९७४ रोजी आंदोलकांनी आपापल्या मतदार संघातील प्रतिनिधीना राजीनामा देण्यास सांगीतले. त्यासाठी सर्वोदयी कार्यकर्ते पाटण्यास जमू लागले. तेव्हा सरकारने सर्वोदयी कार्यकर्त्यांवर हद्दपारी लादली. येथून आंदोलन देशव्यापी करण्याचे जयप्रकाशांनी जाहीर केले.
२५ डिसेंबर १९७४ ख्रिस्त जन्मदिवस, गीता जयंती व ईदच्या त्रिवेणी संगमाच्या मुहूर्तावर विनोबांनी एक वर्षाचे मौन धारण केले. त्यावेळी संघर्ष आंदोलनाला तात्वीक विरोध करणाऱ्या सहकाऱ्यांना विनोबा म्हणाले, "बुद्धाने त्रिशरण सांगितले बुद्धाला शरण जा, संघाला शरण जा, पण आता संघ (सर्वसेवासंघ) तुटत चालला आहे. संघाला 'रस्ट' लागला आहे. अशावेळी धम्मं सरणं गच्छामि म्हणजे जो धर्म हृदयात आहे त्याप्रमाणे आचरण करा. सर्वसेवा संघाच्या घटनेप्रमाणे सर्वनिर्णय सर्वसंमतीने घ्यायचे असतात. आंदोलनात सहभागी व्हायचे किंवा नाही हा निर्णय होऊ शकला नाही. सर्वसेवा संघाने बेकायदेशीरपणे आंदोलनाला पाठिंबा दिला.
१५. मार्च १९७५ रोजी पवनार येथील सर्व सेवा संघाच्या अधिवेशनापूर्वी जयप्रकाश आणि विनोबा यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी विनोबा स्वतःच जयप्रकाशांच्या निवासापर्यंत चालत गेले. काही मिनिटांसाठी मौन सोडले. जयप्रकाशांनी "चळवळ चालू ठेवावी पण सरकारबरोबर संघर्ष टाळावा" पण जयप्रकाशांची असमर्थता दाखविली. विनोबांनी सर्व सेवा संघाला 'उपवासदान' न देण्याची घोषणा केली. (विनोबा एक दिवसाचा उपवास करून ते दान सर्वसेवा संघाला देणे हे उपवासदान). सर्व सेवा संघाचे विसर्जन करावे ही सूचना केली पण तीही फेटाळली गेली. विनोबा हताश झाले.
अनुशासन पर्व: २५ जून १९७५ रोजी राजनारायण यांनी इंदिरा गांधी विरुद्ध अलाहाबाद न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक विषयक खटला इंदिरा गांधीच्या विरुद्ध गेला व त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केले. परिणामी देशात आणीबाणी घोषित करण्याची विनंती पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतींना केली. संपूर्ण देशभर आणीबाणी घोषित करण्यात आली. आणीबाणी घोषित होताच जयप्रकाश नारायण व इतर सर्वोदयी कार्यकर्ते, मोरारजी देसाई इत्यादी नेत्याना अटक झाली. वृत्तपत्रावर निर्बंध जाहीर झाले. संपूर्ण देशात अस्वस्थता निर्माण झाली. नागपूरचे खासदार वसंतराव साठे यांनी आणीबाणी विषयी मत विचारता एका चिठोऱ्यावर विनोबांनी लिहिले 'अनुशासन पर्व.' याचाच फायदा इंदिरा गांधी सरकारने करून घेतला. विनोबाही आणीबाणीच्या मताचे आहे असे दाखविण्यासाठी विनोबाच्या 'अनुशासन पर्व' अशी पोस्टर्स जागोजागी लावण्यात आली.
विनोबा मौनात असल्यामुळे विनोबांना अपेक्षित 'अनुशासन पर्व'चा अर्थ जाणून घेण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. २५ डिसेंबर १९७५ रोजी विनोबांचे एक वर्षाचे मौन सुटले त्याच दिवशी विनोबांनी अनुशासन पर्वचा त्यांना अपेक्षित अर्थजाहीर केला. " हा शब्द महाभारतात आला आहे, तत्पूर्वी उपनिषदात आला आहे. प्राचीन काळी विद्यार्थी शिक्षकाकडे राहून बारा वर्षे शिक्षण घ्यायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो जेव्हा परत घरी जाण्यापूर्वी शिक्षक त्याला उपदेश करीत 'एतत् अनुशासनम् । एवं उपासित्यम्' हे अनुशासन आहे. आचार्याचे असते अनुशासन आणि राजकारण्याचे असते शासन. शासनाने समस्या सुटत नाही, शासनाच्या आदेशाने चालणारी स्थिती ही आजची स्थिती आहे. त्याऐवजी जग आचार्याच्या अनुशासनाने चालले तर शांतता निर्माण होईल. निर्भय, निर्वेर आणि निष्पक्ष असतो तो आचार्य, अशा आचार्यांच्या मार्गदर्शनाने चालते ते अनुशासन. अनुशासनाला जर शासन विरोध करीत असेल तर शासनासमोर सत्याग्रह करावा. भारताचे शासन अनुशासनाच्या विरुद्ध असे काही करणार नाही. "
आचार्य कुलः १६ ते १८ जानेवारी १९७६ पवनार येते आचार्य कुलाचे आयोजन करण्यात आले. श्रीमन्नारायण आणि विनोबांनी निवडलेल्या २६ जणांच्या परिषदेत आणीबाणीचा सांगोपांग विचार झाला. अंतिम निर्णय पंतप्रधानाला कळवायचा होता. पण आचार्य कुलाची कल्पना काही अमलात आली नाही.
२५ फेब्रुवारी १९७६ रोजी इंदिरा गांधी पवनारला आल्या. विनोबा इंदिरा गांधी भेटीत विनोबांनी आणीबाणी संपवून निवडणुका घेण्याचे, किमान वृत्तपत्रावरील निर्बंध मागे घेण्याचे, काही व्यक्ती सोडून इतरांना कैदेतून मुक्त करण्याची सूचना केली. पण इंदिरा गांधींनी असमर्थता दर्शविली. तेव्हा ११ सप्टेंबर या आपल्या जन्मदिवसापासून विनोबांनी गोहत्या बंदीसाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. साम्यवादी पक्ष नेते, शासनाधिकारी यांनी विनोबांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अखेरीस एका तडजोडीने हा प्रश्न मिटला. केरळ व बंगाल सोडून इतर राज्यात गोहत्या बंदीचा कायदा करण्याची घोषणा करण्यात आली. केरळ व बंगाल राज्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याचे ठरले. ११ सप्टेंबर १९७६ रोजी म्हणजे आपल्या जन्मदिवशी ही घोषणा झाल्यामुळे विनोबांनी समाधान व्यक्त केले. गोहत्या बंदीच्या कायद्याचे श्रेय चार जणांचे असल्याचे विनोबांनी सांगितले. १) परमेश्वर २) माता रुक्मिणी (विनोबांची आई) ३) म. गांधी ४) इंदिराजी यापैकी तीन आकाशात पण इंदिराजी पृथ्वीवर आहेत म्हणून त्यांना धन्यवाद.
जानेवारी १९७७मध्ये लोकसभा विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनता पक्षाला बहुमत मिळाले. आणीबाणीनंतर इंदिराजींनी राजकारण सोडून सम्राट अशोकाचे अनुकरण करावे असा विनोबांचा सल्ला इंदिरा गांधींनी स्वीकारला नाही. ६ ऑक्टोबर १९७९ जयप्रकाशनाचे निधन झाले. जयप्रकाशांची गुरू नानकासोबत तुलना करीत विनोबा उद्गारले, "कोणी शत्रू नाही आणि परका नाही."
गोवंश हत्याबंदी: १९७८च्या अखेरीस कलकत्त्यात कापल्या जाणाऱ्या गाईची करुण कहाणी विनोबांच्या कानावर आली. पुन्हा संपूर्ण गोहत्या बंदीसाठी विनोबांनी उपोषण करण्याची घोषणा केली. २२ एप्रिल १९७९ रोजी विनोबांनी उपोषणाला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या लघवीत ॲसिटोन आढळल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सहाव्या दिवशी त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी घटना दुरुस्तीत हा विषय मध्यवर्ती सूचीत आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर विनोबांनी आपले उपोषण सोडले. या नंतरच २१ सप्टेंबर १९८१ रोजी विनोबांचे भाऊ बाळकोबा भावे यांचे निधन झाले.
३० डिसेंबर १९७९ ते १ जानेवारी १९८० पवनार येथे जागतिक महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. "आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी स्त्रियांची यात्रा' हे या मेळाव्याचे उद्दिष्ट होते. जगभरातून १३०० महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या.
केंद्रात इंदिरा गांधीचे सरकार पुन्हा आले तरी गोहत्या बंदीच्या प्रश्नाची तड लागत नव्हती. दिलेली आश्वासने सरकारतर्फे पाळली जात नव्हती. विनोबांनी म्हटले, "शरीरात श्वासाचे जे स्थान आहे तेच स्थान समाजात विश्वासाचे आहे. बाबाला विश्वास दिला बाबाने विश्वास ठेवला." २४ डिसेंबर १९७१ रोजी मुंबईला गोवंश हत्याबंदीसाठी सत्याग्रह करावा असा आदेश दिला. त्याप्रमाणे सेनापती अच्युतकाका देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली देवनार मुंबईत सत्याग्रह झाला. तरीही त्याचा काहीच उपयोगच झाला नाही. आजही तो प्रश्न तसाच लोंबकळत आहे.