ह्या वेळीं खानदेशमध्ये पंधराएक दिवस थेट खेड्यांमध्ये फिरण्याची संधि मिळाली. त्यांतून लोकांचे एक वेगळें च दर्शन मला लाभले. मधल्या जेलच्या काळांत लोकांचा माझा संबंध बाह्यत: तुटला होता. तो : पुनः सांधला गेला. सृष्टीचे सर्ग-प्रलय झाले, तरी ज्ञानी अडोल असतो, असें गतिंत म्हटलें आहे. तीच स्थिति हिंदुस्थानच्या खेड्यांची आहे. "माणसांनो या आणि माणसांनो जा, मी आपला अखंड वाहतों च आहे" हें टेनिसनच्या झयाचें रूप आमच्या जनतेंत अक्षरशः पहावयास सांपडते. हिंदुस्थानची जनता इतकी महान् आहे की तिची महत्ता तिला हि माहीत नाहीं.
इतकी भयानक लढाई हिंदुस्थानच्या दाराशी येऊन ठेपली आहे. वस्तूंच्या महागाईमुळें तिची झळ थेट खेड्यांतल्या विनशिकलेल्या माणसाला हि स्पर्श तर करीत च आहे. तथापि किसान एकंदरीत बेफिकीर पडलेला दिसतो. ह्यांत अज्ञानाचा भाग भरपुर च आहे, आणि तोच दुःखाचा विषय आहे. तथापि ह्यांत हि मला आमच्या जनतेची महत्ता प्रतीत होते. अनेक राज्ये, अधिराज्ये, साम्राज्ये आणि वैराज्यें जेथें उदयास आलीं आणि लोपली, त्या हिंदुस्थानची ही अनुभवी जनता आहे. म्हणून तत्त्वज्ञान्याची बेदरकारी इथे सहज च पहायला सांपडते.
अज्ञान जर उडवितां आलें, तर अंतर्यामांत वाहणारी ही अनुभवाची स्थिरता पुष्कळ च कामाला येईल. खेड्यांची स्थिति ह्या वेळी मला जी दिसली त्याने माझी आशा वाढविली, असें म्हटलें पाहिजे. कठिण प्रसंगी थोड्याशा च संघटनेने आमचीं खेडीं आपलें संरक्षण करून घेतील, असा मला भास झाला. अजून खेड्यांतली हिंमत गेलेली नाहीं. अज्ञानामुळे वाटणारें भय वेगळे. धीर देणाऱ्या ज्ञानाचा तेवढा पुरवठा झाला, तर खेडीं आपलें काम रेटून नेतील, असा भरंवसा वाटतो.
संरक्षणाचा प्रश्न खेड्यांत जड वाटत नाहीं. पण स्वावलंबन मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे आणि गैरवाकबगारपणामुळे विना- कारण जड होऊन बसले आहे. कार्यकर्त्यांना विचारावें, " तुमच्या गांवांत किती चरखें चालत आहेत ? " त्यांनी उत्तर द्यावें, दहा-बारा. " पुनः विचारावें, "आतां ह्या वर्षी किती चरखे कराल ?" तर म्हणतात, “पंधरा- वीस-पंचवीस, तीस हद्द झाली. " मग त्यांना म्हणावें, " हा नेहमींचा सामान्य काळ नव्हे. आपण एका विशेष कठिण काळांतून पसार होत आहोत. जुन्या सत्ता डळमळत आहेत, नव्या धडपडत आहेत, असला हा संधिकाळ आहे. हा च क्रांतीचा काळ असतो. अशा वेळीं एकवटून प्रयत्न केला पाहिजे. नेहमींच्या काळांत दहा चरख्यांचे कोणी वीस चरखे केले तर तो कौतुकाचा विषय झाला असता; पण ह्या वेळीं गांवचे गांव खादीधारी झाले पाहिजेत. गांव सर्व प्रकारें स्वयंपूर्ण बनविला पाहिजे. उद्यां मिला धडाधड बंद पडू लागल्या तर कसें होईल ? मालाची ने आण मंदावली किंवा थबकली तर कसें होईल ? हें सर्व लक्षांत घेऊन, व्यक्तिगत नव्हे पण सामूहिक उठावणी ह्या वेळी झाली पाहिजे, असें स्वावलंबन ह्या वेळीं जड हि जाण्याचें कारण नाहीं. परिस्थिति भयानक खरी. पण ती अशा स्वावलंबनाला एक प्रकारें प्रोत्साहक च आहे. तेवढे जर आपल्याला करतां आलें, तर महापुरांत ज्याप्रमाणे प्रचंड झार्डे उमळून पडतात, पण लव्हाळे वांचतात, त्याप्रमार्णे सांप्रतच्या जगड्व्याळ आणि उलट्या काळजाच्या ह्या महायुद्धांत जिथें प्रचंड शक्तिशाली राष्ट्रें चूर होऊन जातील तिथे गरीब हिंदुस्थान तग धरूं शकेल. " हे ऐकून कार्यकर्ते क्षणभर उत्साहतात, मग थोडा वेळ अवाक् होतात आणि शेवटी म्हणतात, “ इतकेँ एकदम आमच्याने कसे होईल ? हळू हळू, करूँ"
कराल हळू हळू, तर मग काय स्वस्थ बसाल जोरानें ? ' जोराने करूं तर म्हणा! होईल परिस्थितीच्या च वेगाने करणारे आम्ही झालो, तर करविणारा कालात्मा सज्ज च आहे. स्वराज्य वेगाने आमच्याकडे धाव घेत आहे. आम्ही हि आम्हांला साधेल तितका सर्व वेग एकवटून त्याला भेटायला जाऊं या. शेवटीं तें तर त्याच्याच वेगाने आम्हांला भेटणार आहे. पण आम्ही आमच्या बाजूने हि जोर केला तर तें आम्हांला भेटेल, एवढेच नव्हे तर आमच्या जवळ स्थिरावेल. थोडी कल्पनाशक्ति आणि किंचित् समुदायवृत्ति एवढीच आजची गरज आहे.