ह्या वर्षी खादीयात्रेस यात्रेच्या खऱ्या पद्धतीनें येऊन जाण्याची इच्छा होती. शारीरिक कारणासाठी सध्या मी पवनारला पडून आहें. ह्या विश्रांतीत कमीत कमी भंग करून खादीयात्रेत मुख्य भागापुरतें म्हणजे तकली उपासनेपुरतें हजर रहावें असा विचार होता. पण थोडेसे बोलावें असें ऐकणारांचे मत पडल्यामुळे नाइलाजानें बोलत आहे. आणि तें हि माझ्या दृष्टीने खादीयात्रेत मुख्य वस्तु कोणती ह्यावर.
पुष्कळदां मनुष्याला वरवरचें अनुकरण करण्याची संवय लागते. आकाशांतील नक्षत्रे पाहून आपण देवळांत हंड्या झुंबरें लावतों. आकाशांतली नक्षत्रे आनंद देतात. पण इंडया झुंबरें घरांतली चांगली वरच अनुकरण हवा जाळतात. चार महिन्यांच्या पावसाळ्यानंतर धुऊन निघालेल्या आकाशांतील असंख्य तारा पाहून आपण दिवाळी सुरू केली. आम्ही लहानपणीं कोरांटीच्या फळांत खोबरेलाचे दिवे लावीत असूं. हल्लीं खेडयांतून सुद्धा मातीच्या तेलाचे भयानक धूर काढणारे दिवे लावण्यांत येतात. मोठ्या काँग्रेसचे अनुकरण म्हणून आम्ही सुरवातीला संगीत ठेवतों. तें समजत हि नाहीं. अमुक गेट म्हणून दरवाजे करतो. पण अनुकरण आंतून झालें पाहिजे, काँग्रेसच्या ठिकाण राष्ट्राचे वैभव दिसो. पण खादीयात्रेत राष्ट्राचे वैराग्य प्रगट झालें पाहिजे. हिमालयांतून निघालेली गंगा गंगोत्रीजवळ लहान वैभव आणि पण स्वच्छ आहे. प्रयागच्या गंगेत अनेक नद्या, नाले, मोऱ्या मिळून ती वैभवशाली झालेली आहे. दोन्ही ठिकाणीं एक च पवित्र गंगा. पण गंगोत्रीची गंगा जर प्रयागर्चे अनुकरण करूं लागेल, तर प्रयागची विशालता तर तिला येणार च नाहीं, पण ती अस्वच्छ होऊन बसेल. काँग्रेससारख्या मोठ्या परिषदात राष्ट्रांचे वैभव व सिद्धि प्रगट होतात. छोटया खादी-यात्रेत वैराग्य व शुद्धे दिसावयास पाहिजे. काँग्रेसचें वैभव केवढा हि प्रयत्न केला तरी खेड्यांत आपण आणूं शकणार नाहीं. तेथें खेड्यांतल्या लोकांचा कस आणि ताकद प्रगट झाली पाहिजे.
खादी यात्रेत आपण कशासाठी जमतो ? व्याख्यानें, खेळ, पोवाडे ह्यांसाठी जमत नाहीं. कोणा हि यात्रेकरूस विचारा. यात्रेच्या ठिकाणीं मुख्य वस्तु बाजार असतो, गमती असतात, दुसन्या हजार वस्तु देवता-दर्शन असतात. पण तो तेथें कां जातो ? तर देवतेच्या दर्शना- साठी. कोणी म्हणतात, दगडांत काय ठेवलें आहे हो ? पण यात्रेला जाणाऱ्या मनुष्यास तो दगड नसतो. उभरेडजवळच्या गांवच्या महाराचा मुलगा पंढरपूरला जातो. त्याला आंत प्रवेश हि मिळत नाहीं. पण देवतेचें दर्शन व्हावें म्हणून तो गेला. त्याला आपण वेडा म्हणू. पण त्याच्या दृष्टीने तो वेडा नसतो. त्याला विचारले, "इतक्या दूर पार्यो पार्थी धंदा टाकून कशाला जाऊन आलास ? " तो उत्तर देतो, "घरीं जरा वैताग आला. वाटलें देवाला भेटून येऊं ! " उलट आम्हांला पंढरपूरच्या देवाशी कांहीं कर्तव्य नसते. पण आम्ही तेथे यात्रेला जमणाऱ्या लोकांचा फायदा घेण्यासाठीं खादी ग्रामोद्योगाचें प्रदर्शन ठेवत. पण उद्देश सफल होत नाहीं. चांगल्या कां हेतूने होईना, पण जनता गांठायची असेल तर मी सरळ सरळ माझ्या मुद्दयावर तिला गांठीन. आम्हांला खादी ग्रामोद्योग ह्याचें स्वतंत्र मंदीर कां करतां येऊ नये ? दुसऱ्या यात्रांचा फायदा कशासाठीं घ्यावा लागतो ?
खादी यात्रेत खादी ग्रामोद्योग आणि अहिंसा ह्यांविषय प्रेम राख- गारे आपण कशासाठीं जमतों ? कोणाला माझ्याप्रमाणे दोन दिवस राहण्यास फुरसत नसते, त्यांनी कोणच्या मुख्य वस्तूसाठ येथे यावयाचें ? तर सर्वांनी मिळून एकत्र सूत कातण्या- ही देवता
परिश्रम
साठीं परिश्रम ही आमची देवता आहे तिच्या दर्शना- साठी. गांधीसेवासंघाच्या सभेला मी बहुतेक जात नाहीं, पण मनातून जाण्याची इच्छा होते, ती एकाच कारणासाठीं कीं तेथें सामुदायिक शरीरपरिभ्रमाचा कार्यक्रम चालतो. खादी-यात्रेत ही गादी कशाला १ खादी आणि गादीचा तर लढा आहे. त्यांत गादी जिंकणार असेल तर खादी आपण सोडून देऊं. अशक्त आणि म्हातारे ह्याच्यासाठी गादी राहो बिचारी. येथें जमीन स्वच्छ सारवून आपला मुख्य कार्यक्रम झाला पाहिजे. दुसरे च कार्यक्रम मुख्य व्हावयाला लागले तर एखादा शेतकरी घरी यावा, सुंदर रांगोळी घातलेले ताट मांडलें असावें, ताटांत चटण्या कोशिंबिरीचे ढग असावे. पण भाकरी मात्र २ तोळे असावी तसा प्रकार व्हावयाचा. तो शेतकरी म्हणेल माझी काय चेष्टा केली ? आम्ही मजुरीच्या कामासाठीं येथें येतो. आमच्या खेड्यांतल्या लोकांची चेष्टा करतां काय ?
दुसरे लोक आम्हांला म्हणतात, काय तुमचा धर्म ? श्रीकृष्णाच्या नांवाचा लोक जयजयकार करतात. पण शेंकडा ९० लोकांना गीता सुद्धा माहीत नाहीं. मला ही तितकी दुःखाची गोष्ट वाटत नाहीं.
श्रीकृष्ण- प्रतिनिधि गोपाळकृष्णाचें नांव सर्वांना परिचित आहे कीं नाहीं, त्याचें जीवन सर्वोना माहीत आहे की नाहीं ? कृष्णाचे - महत्त्व त्यानें गीता सांगितली म्हणून नाहीं. कृष्णाच्या जीवनावर तें अवलं बून आहे. द्वारकेचा राणा झाल्यानंतर सुद्धां श्रीकृष्ण सर्व कामें संभाळून 1. मधून मधून गवळ्यांत येऊन राही. गाई चारी, शेण काढी. ह्या कामाचा - त्याला इतका जिन्हाळा वाटत होता, म्हणून लोकांना हि त्याचा जिव्हाळ अजून वाटतो, व त्याचें स्मरण चाललें आहे. भगवान् श्रीकृष्ण मजुरांच . प्रतिनिधि म्हणून जें करीत होता, तें आपणांस मुख्यतः करावयाचें आहे 'बाकी काय करावयाचें तें करा. पण त्यांत अनुकरणाचे नाटक नको.
गांधीजी अगर्दी टेकीला आले आहेत. अहिंसेच्या बळावर आपण येथ- पर्यंत येऊन पोचलो. पण आतां आमच्या सरकारला हिंदूमुसलमान-दंग्यांत वीरांची अहिंसा पोलीस आणि मिलिटरी बोलवावी लागतात. अहिंसेच्या बळावर दंगा मिटवितां येत नाहींत हा एकप्रकारें अहिंसेचा पराजयच आहे. दुर्बळांची अहिंसा काय करूं शकणार ? कोणी म्हणतात, दिवाणांचा काय दोष ? मी म्हणतों काडीचा हि दोष नाहीं. पण आम्हीं आज दिवाण होऊन जर इंग्रज लष्कराचे आवाहन करायचे तर मागें इतिहासांत हेंच करून आम्हीं इंग्रजांचें राज्य इथें कायम केलें आहे. तोच उद्योग पुन्हां कशाला? गांधींचे देशभक्त अनुयायी आपले लष्कर बोलावतात ह्याचा इंग्रजांना केवढा आनंद वाटून राहिला असेल ! लष्कराशिवाय जर तुमचें चालत नसेल तर तुमचें लष्कर उभारा. हल्ली लष्करांत अगदीं गाळीव तामस लोक दाखल करतात. तसें तरी तुम्ही करणार नाहीं. देश- स्थिति जाणणारे चांगले लोक तुम्ही लष्करांत घ्याल.
गांधीजींनीं आपल्या दोन लेखांत ही गोष्ट स्पष्ट केली आहे की ह्यापुढे आपल्याला वीरांची आहिंसा पाहिजे. दुबळयांची नको. ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे 'जे वेळीं लोह मांसातें घाटे ' त्या वेळीं वीराची परीक्षा होते. अहिंसेचें नांव घेऊं आणि मरायला तयार होणार नाहीं, तर अगद शेवटच्या प्रसंगी आपण भित्रे आहोंत असें आपणांस दिसून येईल.
काँग्रेसचे ३१ लाख सभासद झाले. पण संख्येला काय करायचे 'आहे ? रोज १ वेळ जेवणाराला काँग्रेसचा सभासद करून घेतलें तर ३५ कोटी सभासद होतील. दोन वेळ म्हटले तर मात्र ४१५ कोटी तरी कमी करावे लागतील ? शिंद्यांजवळ साठ हजार लष्कर, होळकरां जवळ चाळीस 'हजार. पण वेलस्लीनें आपल्या पांच हजराने त्यांचा धुव्वा उडवला. वेलस्ली आला त्या वेळी शिंद्यांचे दहा हजार परसाकडे गेले होते. तर दहा हजार निजून होते. आणि दहा हजार डोळे चोळीत होते. अशा बाजारबुणग्यांनी काय होणार ? अहिंसेनें जेथें लढावयाचे आहे, तेथें तर बाजारबुणगे मुळींच चालणार नाहींत. वडाच्या झाडाखालीं जमलले लोक त्याच्या छायेचा फायदा घेतील. पण त्याच्या कोणी उपयोगी पडणार नाहींत. दिवाणगिय घेण्याने काय फायदा झालेला असेल तो असो. पण एक अत्यंत वाईट गोष्ट झालेली दिसते. लोकांची स्वावलंबनाची उमेद कमी झाल्यासारखी दिसते. जनतेची स्वावलंबनाची उमेद कमी होणे, प्रत्येक बाब - तीत सरकारच्या मदतीची आणि रक्षणाची अपेक्षा राहणे, म्हणजे अहिंसेचा आधार च तुटला. मग लष्कराचा आणि हिंसेचा च मार्ग ठरला. पण आम्हांला हिंसेचा च मार्ग पतकरायचा असता तर गेलीं अठरा वर्षे आम्ही आमच्या उत्तमांतल्या उत्तम लोकांना अहिंसेचें शिक्षण देण्याचा मूर्खपणा कशाला केला असता ? क्या तरुणांना जर्मनी - इटलीप्रमाणे उत्तम लष्करी शिक्षण दिलें नसतें काय ? म्हणून गांधी सांगतात-मार्ग शूराचा म्हणून पटत असेल तर घ्या, नाहींतर सोडून द्या.
'पवनारला मजुरांबरोबर मी बसतो, बोलतों. मी मजुरांना सुचविलें, तुमची सर्वांची मजुरी एकत्र करून सारखी वांटून घ्या. तुम्हांला आश्चर्य वाटेल. पण मजूर म्हणाले, 'कांही हरकत नाहीं.' पण
गरिबांच्या हा ठराव अमलांत कसा यायचा ? मी अलग राहून ?
हातांत सत्ता मी त्यांच्यांत दाखल होईन तेव्हां त्यांच्या-माझ्यासकट तो अमलांत येईल. तुमच्या लाख चळवळी सोडून ह्या खऱ्या - राजकारणाकडे तुमचें लक्ष पाहिजे. मजुरांच्या मजुरीची ताकद प्रगट झाली पाहिजे. तुम्हांला गरिबांच्या हातांत सत्ता पाहिजे ना ? मग त्यांचे हात वापरले गेले पाहिजेत. लहानपणीं आम्हीं श्लोक म्हणत असूं "कराग्रे वसते लक्ष्मीः” बोटांच्या अग्रभागी लक्ष्मी राहते. मग हीं चोटें चांगलीं वापरली जावयास नकोत ? त्यांच्यांत उत्तम कलाकौशल्य यायला नको ? आम्ही विदेशी-वस्त्र- बहिष्कार कमिटी काढतों. तिच्या कचेरीत हजार वस्तु असतात. पण चरखा- पिंजण नसतें. गांधीसेवासंघांत महिन्याला हजार वार कांतण्याचा नियम आहे. पण तो हि नीट पाळला जात नाहीं, अशी तक्रार आहे. स्वराज्य मिळविण्याचे हे ढंग नव्हेत. तुमचे स्वराज्य स्वप्नांतलें स्वराज्य आहे.. आम्ही मजुरांबरोबर परिश्रम करण्यास तयार होत नाहीं तोंपर्यंत त्यांचा-आमचा गोपाळ-काला कसा होईल ? त्यांच्यासारखे बनेपर्यंत आमच्या अहिंसेची शक्ति प्रगट होणार नाहीं. कांतण्याच्या मजुरीचे दर वाढविण्यांत येणार आहेत, त्याबद्दल कांह मंडळींची तक्रार आहे. मजुरीचे दर पाहिजे तर वाढवा. पण खादी स्वस्त कांतण्याचे भाव राहू द्या, असें कांहीं लोक म्हणतात. ह्या पुढे अर्थ- शास्त्रज्ञांनी काय रडावें ? कांतण्याचे भाव वाढवून खादी स्वस्त कशी करायची ? ह्याचा हि मेळ घालतां येईल. पण यंत्रे, तोफा, विमानें ह्यांचें साहाय्य घ्यावें लागेल. शहरचे लोक म्हणतील खादी स्वस्त रहावी तर म्हणोत. पण खेड्यातली मंडळी तेंच म्हणतात हें आश्चर्य आहे.. कांतण्याच्या जुन्या दरांत हि मजुरांना जगायची सोय आहे असें तुम्ही म्हणतां. पण नुसतें जगलें म्हणजे झाले का ? इंग्रज सुद्धां मनापासून इच्छितात कीं आम्ही हिंदुस्थानच्या लोकांनीं जगावें आणि जन्मभर त्यांची मजुरी करावी !
खादीकामाचा व्यवस्थापक ३०रु पगार घेत असला तर त्यागी समजला जातो. तें योग्यच आहे. पण त्याच्या हाताखाली काम करणाराला मजुरी दीड आणा ! कामानिमित्त किंवा आजारानिमित्त. सुट्टया नाहींत. मजुरी न घेतां वाटेल तितक्या सुट्टया व्यवस्थापक मजूर आणि घेण्याची मात्र सोय आहे. ह्या मजुरांना खादी यात्रेत यावयाचे तर आपले रोजचें उत्पन्न बुडवून यावें लागतें आणि शिवाय येथचा खर्च द्यावा लागतो. ही तुलना कडू आहे. पण कडूगोडाचा प्रश्न नाहीं. सत्यदर्शनाचा प्रश्न आहे.
कांहीं मंडळी म्हणतात, समाजवादी लोकांनी मजुरांना बगलेंत मारलें आहे. म्हणून आम्ही आतां मजुरांत मिसळले पाहिजे. बाबांनो ! समाज- वाद्यांच्या स्पर्धेनें कशाला, मजुराच्या प्रेमाने च मजुरांत मिसळा. पण तुम्ही मजुरांत कोणत्या पद्धतीने मिसळणार ? अहिंसक पद्धतीनें त्यांच्यांत मिसळायचें तर व्यवस्थापक आणि मजूर ह्यांच्यातील अंतर कमी करीत गेलें पाहिजें, व्यवस्थापकांनी मजुरांसारखे व्हावयास पाहीजे. आणि मजूरांची मजूरी वाढ- विली पाहिजे. मजुरांची मजूरी वाढवून तुम्ही त्यांचा एक खास वर्ग बनबाल' असा आक्षेप घेण्यांत येतो. पण देशाची सेवा करणाऱ्या देशसेवकाचा खास वर्ग मी निर्माण करत असा च माझ्यावर आक्षेप कां घेत नाहीं, १ मजुरीचे दर वाढविल्याखेरीज ते आणि मी एकरूप कसे होणार ? त्यांचा आणि माझा गोपाळ-काला कसा होणार १
किशोरलालभाईचा आग्रह होता की नईतालीमच्या प्राथमिक शिक्षकांना कमीत कमी २५ रुपये पगार मिळाला पाहिजे. आमच्या पवनारला श्रमाची प्रतिष्ठा मास्तरला १६ रुपये च पगार मिळतो, पण त्याचा मजुरांना हेवा वाटतो. तीन वर्षापूर्वी माझा जीव उडून गेला होता, तो कांतण्याचे भाव थोडे वाढल्यामुळे ह्या देहांत येऊन बसला. दहा दहा घंटे कांतून जेमतेम ४ आणे मिळायचे आणि माझा खर्च कर्मीत कमी ६ आणे. मी मजुरांत कसा मिसळणार ?
सध्या श्रमाला नुसत्या वाङ्मयांत प्रतिष्ठा आहे. तिचा उपयोग नाहीं- श्रमाला जास्त मनुरी देणें म्हणजे च त्याची खरी प्रतिष्ठा वाढविणे आहे. ह्याचा आरंभ तुम्ही आम्ही सर्वानी मिळून करावयाचा आहे.
इतके खादीधारी लोक येथे येतात. पण सर्वांजवळ तकल्या किंवा चरखे नसतात. येथे मंडळींना तकल्या द्याव्या लागतात. खादी यात्रेत येणाराने तकल्या विसरून येणे म्हणजे हजामतीला येतांना हजामानें वस्त्रा विसरून येण्यासारखेंच आहे. तेव्हां मंडळींनीं येथें यावयाचें तर आपल्या शस्त्रास्त्रांनीं सिद्ध होऊन आले पाहिजे. आपण येथे मौजा करण्यासाठीं जमत नाहीं. आपल्या खादीयात्रेत वैरागाचें वैभव व परिश्रमनिष्ठा प्रगट झाली पाहिजे.