[२७]
श्री भगवान् म्हणाले
आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज ।
विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥
राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन ।
प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥
लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती ।
मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ॥ ३ ॥
मी चि अव्यक्त रूपाने जग हे व्यापिले असे ।
माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ॥ ४ ॥
न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की ।
करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ॥ ५ ॥
आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो ।
माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी ॥ ६ ॥
कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे ।
कल्पारंभी पुन्हा सारी मीचि जागवितो स्वये ॥ ७ ॥
हाती प्रकृति घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा ।
भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ॥ ८ ॥
परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज ।
उदासीनापरी राहे अनासक्त म्हणूनिया ॥ ९ ॥
साक्षी मी प्रकृति द्वारा उभारी सचराचर ।
त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ॥ १० ॥
[२८]
मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती ।
नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक ॥ ११ ॥
ते आशा बाद मूढांचे कर्मे ज्ञाने हि ती वृथा।
संपत्ति जोडिली ज्यांनी आसुरी मोह-कारक ॥ १२ ॥
देवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज ।
अनन्य भावे जाणून मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥
अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ व्रती ।
भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ॥ १४ ॥
दुसरे ज्ञान यज्ञाने भजती व्यापका I
मज ब्रह्म-भावे विवेकाने अविरोधे चि देखुनी ॥ १५ ॥
मी चि संकल्प भी यज्ञ स्वावलंबन अन्न मी
मंत्र मी हव्य ते मी चि अग्नि मी मी चि अर्पण ॥ १६ ॥
मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी ।
मी तिन्ही वेद ॐ कार जाणण्या योग्य पावन ॥ १७ ॥
साक्षी स्वामी सखा भर्ता निवास गति आसरा ।
करी हरी धरी मी चि ठेवा मी बीज अक्षय ॥ १८ ॥
तापतो सूर्य रूपे मी सोडतो वृष्टि खेंचितो ।
मृत्यु मी आणि मी मोक्ष असे आणि नसे हि मी ॥ १९ ॥
[२९]
वेदाभ्यासी सोम- पाने पुनीत ।
माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ॥
ते पुण्याने जाउनी इंद्रलोकी ।
तेथींचे ते भोगिती दिव्य भोग ॥ २० ॥
त्या स्वर्गात भोगुनी ते विशाळ ।
क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती ॥
ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी ।
येणे-जाणे जोडिती काम मूढ ॥ २१ ॥
अनन्य भावे चिंतूनि भजती भक्त जे मज ।
सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम चालवी ॥ २२ ॥
श्रद्धा पूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते ।
यजिती ते हि माते चि परी मार्गास सोडुनी ॥ २३ ॥
भोक्ता मी सर्व यज्ञांचा फल दाता हि मी चि तो।
नेणती तत्त्व हे माझे म्हणूनि पडती चि ते ॥ २४ ॥
देवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि ।
भूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती ॥ २५ ॥
[३०]
पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ।
ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे ॥ २६ ॥
जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप ।
जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण ॥ २७ ॥
अशाने तोडुनी सर्व कर्म-बंध शुभाशुभ ।
योग-संन्यास सांधूनि मिळसी मज मोकळा ॥ २८ ॥
सम मी सर्व भूतांस प्रियाप्रिय नसे मज ।
परी प्रेम-बळे राहे भक्त माझ्यांत त्यांत मी ॥ २९ ॥
असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो ।
मानावा तो जसा साधु त्याचा सुंदर निश्चय ॥ ३० ॥
शीघ्र तो होय धर्मात्मा शांति शाश्वत मेळवी ।
जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो ॥ ३१ ॥
धरूनि आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्र I
हि की पाप-योनि जे जीव ते हि मोक्षास पावती ॥ ३२ ॥
तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशास ती ।
भज तू मज आलास लोकी दुःख-द नश्वर ॥ ३३॥
प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज ।
असे जोडूनि आत्म्यास मिळसी मज मत्पर ॥ ३४ ॥
अध्याय नववा संपूर्ण